Friday, 30 July 2021

निर्हेतुक विश्वकल्पनेचा पाईक: स्टीव्हन वाईनबर्ग

 

निर्हेतुक विश्वकल्पनेचा पाईक: स्टीव्हन वाईनबर्ग

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

 

अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ स्टीव्हन वाईनबर्ग यांचं नुकतंच, म्हणजे 23 जुलैला, वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. पाकिस्तानच्या अब्दुस सलाम यांचे बरोबर १९७९ सालचे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले होते. हा सर्वोच्च सन्मान.  इतर अनेक पारितोषिके वेगळीच.    मूलकणांवरील संशोधनासाठी ते विश्वविख्यात होते.  

विज्ञान शिकता शिकता आपण काय शिकलो याचे मोठे बहारदार वर्णन त्यानी केले आहे. (नेचर २३ सप्टेंबर २००३) आधी भौतिकशास्त्र नीट समजावून घेऊ या आणि मग आपल्या संशोधनाचा विषय ठरवू या; अशा प्रयत्नात ते होते.  सुदैवाने त्यांच्या शिक्षकांनी त्यांना आधी  संशोधनासाठी विषय निवडण्याचा आणि त्या अनुषंगाने आवश्यक तेवढं भौतिकशास्त्र अवगत करून घेण्याचा सल्ला दिला.  वाईनबर्ग म्हणतात की, ‘आश्चर्य म्हणजे हे जमलं!’.  इतकंच नाही तर संपूर्ण भौतिकशास्त्र कोणालाच अवगत होऊ शकत नाही, हेही लक्षात आलं.

 

बरेचदा विद्यार्थी ज्ञात संकल्पनांना बद्दलच संशोधन करण्यात रस घेतात.  मात्र वाईनबर्ग त्याच्या विरुद्ध सल्ला देतात.  ते म्हणतात की जिथे अजून पाउलवाटही  निर्माण झालेली  नाही अशा ठिकाणीच संशोधकाने पाऊल ठेवायला पाहिजे.  काहीतरी नवीन गवसण्याची तिथेच सर्वाधिक शक्यता असते.

 

तुमच्या संशोधनाला सध्या किंवा भविष्यात काय आणि किती महत्त्व आहे?, मुळात त्याला थोडं तरी महत्व आहे का?, या  प्रश्नाचे उत्तर बरेचदा देता येत नाही.  पण तरी देखील वैज्ञानिकांनी चिकाटीने प्रश्नांचा मागोवा घेणे  सुरू ठेवले पाहिजे.  लखलखीत यश क्वचितच  पदरी पडतं.  बरेचदा अपयशाचे धनी व्हावे लागते.  पण याला इलाज नाही.  संशोधकाने विज्ञानाच्या इतिहासाबद्दलही माहिती घ्यावी  असा त्यांचा आग्रह असे. वर्तमानात किंवा भविष्यात तुमच्या संशोधनाचं काय होईल हे सांगता येत नसलं तरी इतिहासाच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर तुमचं काम तुम्हाला कदाचित प्रेरणादायी वाटू शकेल!!

म्हणूनच की काय, विज्ञानाचा इतिहास, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाचे तत्वज्ञान त्यांनी  सातत्याने जनतेसमोर मांडले. ते निव्वळ भौतिकशास्त्रज्ञ नव्हते तर आपल्या शास्त्राबद्दल सामान्यांना कळेल अशा भाषेत लिहिणारे असामान्य जन-लेखक होते.

‘द फर्स्ट थ्री मिनिट्स’ या १९७७ साली  प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच पुस्तकात ‘बिग बँग’नंतरच्या पहिल्या काही मिनिटांतील रोमांचक घटना ते वर्णन करून सांगतात. सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगतात. 13.8 बिलियन वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचा विस्मय वाचकांपर्यन्त ते अगदी सहज पोहोचवतात. हे सारे घटित वर्णन करून ते म्हणतात, ‘या विश्वाबद्दलची आपली समज जसजशी वाढते आहे, तसतसे हे विश्व निर्हेतुक आहे, असं लक्षात येऊ लागलं आहे!’

हे विश्व निर्हेतुक आहे ही समज धक्कादायक आणि क्रांतिकारी खरेच.  हजारो वर्ष लोक, याच्या बरोब्बर उलटे  गृहीतक उराशी कवटाळून होते. माणसाचं भलं-बुरं करणं किंवा न करणं हाच हेतु खरा, अशी धारणा होती.  सारी सृष्टी ही मानवासाठी निर्माण केलेली आहे अशी बहुतेक धर्मांची  शिकवणच आहे. किमान देवाच्या मनात मानवाला सततचे स्थान आहे, असे तरी मानवाच्या मनाने घेतले आहे खास.  

वैज्ञानिक प्रगती बरोबरच विश्वाबद्दलची समज वाढली. न्यूटन, डार्विन, आईन्स्टाईन यांच्या सिद्धांतातून  देव कल्पना किती थिटी आहे हे टप्याटप्याने पुढे येत गेले. देवाजीने   घडविलेले  विश्व,  ही मांडणी अपुरी वाटायला लागली.  विश्व निर्माण करणारा आणि चालवणाराही  देव आहे अशी समजूत प्रचलित होती. आता या विश्वाचे अधिक यथास्थित ज्ञान झालं. काही कोडी सुटली, काही नवी लक्षात आली. मग, निर्मिकाने विश्वाची निर्मिती केली आहे मात्र एकदा त्याचे नियम घालून दिल्यानंतर हा खेळ अव्याहतपणे चालू आहे, असा पर्यायी विचार आला. आईन्स्टाईन सारख्यांनी एक व्यक्ती म्हणून आपलं बोट धरणारा, आपल्या नोकरी आणि छोकरीमध्ये विलक्षण रस घेणारा, प्रार्थनेला पावणारा,   देव नाकारला मात्र या विश्वाला देवस्वरूप मानलं.  स्टीफन हॉकिंग प्रभृतींनी विश्वाला स्टार्टर मारायला सुद्धा देवाची गरज आहे का? मुळात विश्वाला ‘सुरुवात’ म्हणता येईल, असं काही असेल का? अशा शंका व्यक्त केल्या.

 

हॉकिंग प्रमाणेच स्टीव्हन वाइनबर्ग हे देखील विश्व अपघाताने निर्माण झालेले आहे आणि काही नियमानुसार चालू राहिलेले आहे आणि यथावकाश लयास जाणार आहे; असं म्हणत होते.  विश्वातल्या प्रत्येक घटितामागे, ‘त्याचा’ काहीतरी ‘हेतू’ अथवा ‘संदेश’ असतो असं समजण्याचं कारण नाही, असं त्यांनी ठामपणे मांडले.

हे विश्व निर्हेतुक आहे असं म्हणताच लोकं चवताळून भांडायला उठतात, हा स्टीव्हन वाईनबर्ग यांचा नित्याचा अनुभव. या विश्वाला हेतू आहे किंवा नाही हे ठरवण्याचे काम विज्ञानाचं नाही, असं लोकं ठासून सांगायची.  स्टीव्हन वाईनबर्ग सांगत, ‘विश्वाला हेतू आहे किंवा नाही हे ठरवण्याचं काम विज्ञानाचे  नक्कीच नाही.   मात्र आमच्या संशोधनानुसार हेतू सापडत मात्र नाही, हे सांगायला काय हरकत आहे?

या विश्वाला हेतू नाहीये हे ऐकताच लोकांना हा जीवन कलह अर्थशून्य भासू लागतो.  आपण आणि आपले प्रियजन हे कधीतरी मरणार,  आपला मागमूसही उरणार नाही,  आयुष्यात जेथे जातो तेथे बोट धरून चालवणारा कोणी नाही, वगैरे कल्पना सुखावह नाहीतच. या कल्पनांचा त्याग करून जगणं जिकिरीचे आहे. स्टीव्हन वाईनबर्गना अर्थातच याची जाणीव होती. ही अडचण सहानुभूतिपूर्वक समजावून घ्यायला हवी  असे त्यांचे म्हणणे होते.

‘विज्ञानाने जनांना देव कल्पनेला कवटाळून बसणे  अशक्य केलेले नाही.  पण विज्ञानाने विचारी जनांना देव कल्पना त्यागणे शक्य केले आहे.’ असे रोखठोकपणे सांगणारा विज्ञानवादी आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.  

 

प्रथम प्रसिद्धी

दैनिक सकाळ

३०/७/२०२१

 

No comments:

Post a Comment