कसं
हे गोड दुखणं
डॉ.
शंतनु अभ्यंकर, वाई
गरोदरपणाचं
गोड ओझं स्त्रीया हौसेनं वागवतात पण ह्या दरम्यान
जर गोड दुखणं जडलं तर मात्र पंचाईत होते. हे गोड दुखणं म्हणजे गरोदरपणात उद्भवणारा
डायबेटीस.
इंसुलिन
हा तर जगप्रसिद्ध संप्रेरक (हॉरमोन). अगदी
जीवनावश्यक. तसं शरीरात जीवन–अनावश्यक असे भाग/रसायने जवळपास नसतातच. तर ह्या इन्शुलीनमुळे रक्तातली
साखर प्रत्यक्ष पेशींत दाखल होते. मग ती तिथे वापरली जाते. तेंव्हा हा नसला किंवा
असून गतप्रभ ठरला, तर रक्तशर्करा वाढते पण पेशी उपाशी रहातात. ह्याला म्हणतात डायबेटीस.
दिवस
राहीले, की गर्भात आणि वारेत इन्शुलीन हतप्रभ करणारे काही घटक तयार होतात. भरपाई म्हणून आई अधिकचे इन्शुलीन बनवत असते. जवळ जवळ
तिप्पट इन्शुलीन बनवले जाते. पण अशी भरपाई जेंव्हा अपुरी पडते तेंव्हा आईच्या आणि
पर्यायानी गर्भाच्या शरीरातील शर्करा (ह्या लेखात शर्करा/शुगर/ग्लुकोज हे शब्द
समानार्थी म्हणून वापरले आहेत) वाढत रहाते. रक्तातली शुगर जास्त वाढली तर ती
लघवीतून बाहेर पडते. डायबेटीस मेलायटस ह्या
शब्दाचा अर्थच मुळी, मधू-मूत्र!!!
तर
असा हा ‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेह’ (Gestational Diabetes). सुमारे ५ ते १०% गर्भवतींत आढळतो हा. म्हणूनच प्रत्येक स्त्रीनी,
प्रत्येक गरोदरपणात मधुमेहाची चाचणी करून घेणे इष्ट.
एखाद्या
मधुमेही स्त्रीला गर्भधारणा होणे
आणि मूलतः निरोगी स्त्रीला गर्भधारणा
झाल्यामुळे मधुमेह होणे; ह्या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. इथे आपण,
दुसऱ्या प्रकारच्या आजाराची, म्हणजे ‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेहाची’ (Gestational
Diabetes) माहिती घेत आहोत.
हा
तात्कालिक असतो. प्रसूतीनंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदाला येते. तात्कालिक असला, तरी
याचे ताप टाळायचे असतील तर लवकर निदान आणि प्रामाणिक उपचार महत्वाचे आहेत. शिवाय
प्रसूती नंतर हा ‘आखाड सासरा’[1] परत गेलाय ना हेही पहावे
लागते.
या
गोड दुखण्याचा परिणाम म्हणून काय काय दुष्परिणाम होतात ते खाली देतोय. यादीतल्या
सगळ्या गोष्टी सगळ्यांना लागू पडत नाहीत. नीट उपचार घेतले असतील तर बहुतेकदा
काहीही होत नाही. हे लक्षात घेऊनच पुढे वाचावे.
डायबेटीस
जडला तर आईचे बीपी वाढण्याची (PIH बाळंतवात) आणि त्यामुळे कमी
दिवसाची प्रसूती करण्याची निकड भासू शकते.
डायबीटीस
असेल तर मूल गुटगुटीत होते! म्हणजे त्याचा त्रास व्हावा इतके गुटगुटीत होते.
बलदंडच म्हणा ना. चार किलोच्या आसपास वजन
सहज भरते (Macrosomia).
आता एवढा मोठा देह योनिमार्गे प्रकट व्हायचा तर अवघडच ठरणार. बाळाला आणि
आईलाही इजा होण्याचा कितीतरी धोका. मग
अर्थात सीझरचा मार्ग पत्करावा लागतो.
पोटात
अतिपोषित झालेले हे बालक जन्मतः अन्नासाठी वखवखलेले असते. जरा उपास घडला की याची
रक्तशर्करा ढपते (Hypoglycemia). मग शिरेवाटे ग्लुकोज द्यावे लागते. कधी कधी कॅल्शियम आणि मॅग्नीशियमची पातळीही घसरते. हे ही द्यावे लागते.
या
मधुवंतींच्या तान्ह्यांना बरेचदा ‘कावीळ’ होते. इथे कावीळ म्हणजे जंतूंद्वारे
पसरते ती सुपरिचित कावीळ नव्हे. बाळाच्या अंगात
असलेले आणि जन्मताच अनावश्यक ठरलेले जास्तीचे रक्त आता विघटित होऊ लागतं. ह्याच्या परिणामी
अंगावर पिवळेपणा दिसू लागतो. (याबद्दल सविस्तर अन्य लेखांत) बाळाला अतिनील
किरणांच्या दिव्याखाली ठेवलं की ही कावीळ बरीही
होते.
अशा
बाळांना जन्मतः श्वसनाला त्रास होतो. यांना फुफ्फुसे असतात पण ती पिकलेली नसतात. सबब काही काळ ऑक्सीजन वगैरे लागू शकतो.
काय
होत नाही हे ही लक्षात घेऊ या.
आईतील
मधुमेहामुळे बाळाला लहान वयात मधुमेह होत नाही.
पण तान्हेपणीचे हे सुदृढ बालक पुढे
मोठेपणीही गुटगुटीत रहाते. तेंव्हा मात्र यालाही मधुमेह वगैरे स्थौल्यस्नेही आजार
जडतात. म्हणून अशा मुलांत लहानपणापासूनच योग्य आहार, मैदानी खेळ वगैरेला ‘आईने
सक्रीय उत्तेजन’ देऊन योग्य वजन राखले पाहिजे. ‘आईने सक्रीय उत्तेजन’, हे शब्द
मुद्दामच अवतरण चिन्हांत टाकले आहेत. कारण गरोदरपणात डायबेटीस जडलेल्या ह्या
आईलाही वाढत्या वयात पुन्हा डायबेटीस होऊ शकतो. तेंव्हा योग्य आहार, मैदानी खेळ
वगैरेची गरज आईलाही असतेच.
हा
आजार साधारण पाचव्या-सहाव्या महिन्यानंतर
जडतो. बाळाची शरीररचना तीन महिन्यातच पूर्ण झालेली असते. तेंव्हा बाळांत रचना-दोष, व्यंग आढळत नाहीत.
गोड
दुखण्याचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर गरोदरपणात सुरवातीला एकदा आणि नंतरही किमान
दोनदा डायबीटीससाठीची तपासणी केली पाहिजे.
तपासणीच्या अनेक पद्धती आहेत. ठराविक ग्रॅम ग्लुकोज खाणे आणि
ठराविक कालावधीने रक्त शर्करा मोजणे असे या तपासण्यांचे स्वरूप आहे. ज्या
त्या दवाखान्याची काही पद्धत ठरलेली असते, त्यानुसार चेक करायला हरकत नाही. वारंवार दवाखान्यात येणे, वारंवार रक्त तपासणे
हे आपल्याकडे अनेकींना अवघड असतं. हे जाणून भारतीय शास्त्रज्ञांनी ७५ ग्रॅम
ग्लुकोज खाऊन दोन तासाने एकदाच रक्त तपासण्याची पद्धत विकसित केली आहे (DIPSI). तीच आता सर्वत्र मान्यता पावत आहे.
जर
डायबेटीस असेल तर निव्वळ आहार निट पाळल्याने ८०% स्त्रियांची शुगर आटोक्यात रहाते.
मात्र ही आटोक्यात आहे ना, हे वारंवार तपासावे लागते. दिवसातून तीन-तीन, चार-चार
वेळाही तपासावे लागते. त्यासाठी घरच्या
घरीच तपासणी केलेली बरी. ग्लुकोमीटर मिळतात. ते विकत घ्यावेत. टाळू नये. तुम्ही ग्लुकोमीटर
विकत घेतल्याने डायबेटीसला राग येऊन तो वाढतबिढत नाही. उलट वारंवार तपासणी सहज
शक्य होते. एरवी अवघडलेल्या बाईने दिवसातून तीन-तीन, चार-चार वेळा लॅब गाठणे किती
अवघड आहे. ‘मला एवढी कुठे शुगर आहे?’;
‘डॉक्टरांचं आपलं काहीतरीच!’; ‘आमच्यावेळी असलं नव्हतं’; ‘पप्पांना वीस वर्ष
डायबेटीस आहे, पण त्यांना कुठे ग्लुकोमीटर सांगितलाय?’; वगैरे युक्तिवाद फिजूल
आहेत. तुमचे पप्पा प्रेग्नंट नाहीत हे लक्षात ठेवा.
वारंवार
तपासणी अत्यावश्यक आहे कारण शरीरातील साखर तिन्हीत्रिकाळ नियंत्रित असणे आवश्यक
आहे. तशी ती नसेल, साखरेची पातळी हेलकावे खात असेल, तर ते वाईट आहे. नियमित तपासणीनुसार
आहार, व्यायाम, इतकंच काय पण थोडं थोडं चीटिंग केलेलं चालेल का, हे ही ठरवता येतं.
साखर
आटोक्यात ठेवायची ती नको ती गुंतागुंत उद्भवू नये म्हणून. आहारातील बदल, डाएट, हा
मुख्य मार्ग. पण डाएट म्हणजे आईला उपाशी ठेवणं अभिप्रेत नाही. आवश्यक त्या कॅलरी
आणि पोषक द्रव्ये मिळायलाच हवीत. चयापचयासाठी पुरेशी शर्कराही मिळायला हवी. फक्त कार्बोदकांचा प्रकार बदलायचा आहे. तारेवरची कसरतच आहे ही. शिवाय हा आहार
त्या पेशंटच्या खाद्य संस्कृतीशी सुसंगत हवा. उगाच ब्रोकोली खा पण पास्ता खाल्लात
तर पस्तावाल, असला सल्ला निरुपयोगी आहे.
थेट
साखर खाणे आणि गोडाचे पदार्थ टाळायचे आहेत. केक, जेली, जॅम, मिठाई, कोला वगैरे अगदी बंद. दोन तीन वेळा भरपेट खाण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने
थोडे थोडे खायचे आहे. साखरेऐवजी अन्नात वापरायला
स्वीटनर्स मिळतात. ते चवीपुरते(च) वापरावेत. मांस (मटणापेक्षा चिकन बरे), मासे,
अंडी, दाणे, दुधाचे (बिन सायीचे) पदार्थ जरूर घ्यावेत. यावर बंधन नाही. फळ अगदी
एखादेच खावे. अर्धेच खाल्यास पूर्ण मार्क
मिळतील. गोड नसलेल्या फळभाज्या, कंदमुळे
(पालक, गाजर, मटार, टोमॅटो, कांदे, मश्रूम) ह्यावर बंधन नाही.
शिवाय
दोन वेळा भरपेट जेवण्यापेक्षा, दर थोड्यावेळाने काही खाणे आवश्यक आहे. तसंही
गरोदरपणात थोड्या थोड्या वेळाने भूक लागतेच. शिवाय सर्व प्रकारचे उपास पूर्णतः
टाळावेत. दिवस दिवस उपाशी रहाण्याचे रमजानसारखे उपास डायबेटीसला मानवत नाहीत. उपासाच्या पदार्थात
भरपूर पिष्टमय पदार्थ असतात तेंव्हा ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’, हाही प्रकार टाळावा. (चला, आता तुम्ही फक्त
मुसलमानांच्याच धर्मश्रद्धांबद्दल लिहिता, असा आरोप टळला!) खरोखरच उपाशी रहाण्याचे
उपास तर अजिबातच करू नयेत. वटपोर्णिमा, सोळा सोमवार, मंगळागौर, ग्रहण पाळणे असले
पॉवरफुल उपाससुद्धा करू नयेत. कोणत्याही गर्भारशीने पाच तासाच्या वर उपास काढणे
गैरच आहे. मधू-मित्रा बाईंनी तर असली कर्मकांडे अजिबात टाळावीत.
आहाराबरोबर
व्यायामही महत्वाचा आहे. व्यायामाने इन्शुलीनचे कार्य सुविहीत होते. रोजचे घरकाम हे व्यायाम म्हणून सहसा पुरेसे नसते. पण बऱ्याच सुखवस्तू
बायकांची तशी ठाम श्रद्धा असते. ‘घरकाम म्हणजेच व्यायाम’ असं समीकरण सिद्ध व्हायचं
तर मग चार घरची धुण्याभांड्याची कामे
धरावी लागतील. त्यापेक्षा चालणे, पोहणे, एरोबिकस्
हे बेस्ट आहे. किती जोरात श्रमायचं याचंही साधं गणित आहे. व्यायाम करताना न
अडखळता बोलता यायला हवं. जर धाप लागल्याने
बोलणे होत नसेल, तर तुम्ही नको इतक्या जोरात व्यायाम करताय असा अर्थ होतो. डायबेटीस बरोबर ब्लडप्रेशर
वाढले असेल किंवा आणखी काही गुंतागुंत असेल तर व्यायाम न करणे योग्य.
येणेप्रमाणे
आहार,
व्यायाम वगैरे चालू ठेऊन
सुमारे आठवड्याभराने किती फरक पडला हे तपासले जाते. यासाठी दर थोड्यावेळाने (जेवणापूर्वी,
नंतर वगैरे) रक्त शर्करा मोजली जाते. आहारावर भागलं नाही तर इन्शुलीन इंजेक्शनला पर्याय नाही. (काही औषधे आहेत पण त्यांचा वापर
अजून सर्वमान्य नाही) इन्शुलीनच्या गोळ्या मिळत नाहीत. ते टोचूनच घ्यावे लागते.
इन्शुलीन
हे फक्त डाएट मोडणाऱ्या पापी
स्त्रियांच्या पदरी येतं असं काही नाही. सगळं काही यथासांग आणि मनोभावे करणाऱ्या
बायकांच्या नशिबीही हे येऊ शकतं. त्यामुळे इन्शुलीन सुरू केलं म्हणजे काही तरी
भयंकर घडलं अशी भावना बाळगून स्वतःला दोष देत बसू नये. काहींमध्ये साखर नियंत्रणात रहात नसेल, व्यायाम अशक्य असेल
तर इन्शुलीन हा उत्तम पर्याय आहे. ह्याने बाळाला काही
इजा होत नाही. बाळाला इन्शुलीनची सवय वगैरे लागत नाही. इन्शुलीनचा निर्णय तुमचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासून घेतला
जातो, म्हणूनच नियमित तपासणी आणि नोंद ठेवण्याला महत्व आहे. इन्शुलीन हे तात्पुरते
घ्यावे लागते. प्रसूती होताच मधुमेह आणि इन्शुलीनची गरज संपते.
जसं
जसं वजन वाढत जातं तसा तसा इन्शुलीनचा डोसही
वाढूही शकतो. यात आश्चर्यही नाही आणि कमीपणा तर नाहीच नाही. इन्शुलीनचा डोस वाढत जाणे हे आजार
बळावल्याचे अवलक्षण नसून बाळ बळावल्याचे सुलक्षण आहे. मग कधी एक, तर कधी दोन, तर कधी
तीन वेळा इन्शुलीन सुरू करावं लागतं. हेतु हा की ग्लुकोज पातळी समतल रहावी.
बाळाला
आवर्जून स्तनपान द्यावे. दूध तयार करायला बऱ्याच कॅलरी लागतात. यामुळे साखर
नियंत्रित रहाते, वजन घटते आणि डायबेटीस लवकर आटोपतो.
प्रसूतीनंतर
सहा आठवड्याने पुन्हा एकदा डायबेटीससाठी तपासून पहाणे गरजेचे आहे. आधी
म्हटल्याप्रमाणे हा पाहुणा गेला आहे का याची खात्री करायला हवी. पाहुणा परतला आहे
असा रिपोर्ट आला तर छानच. मात्र परतलेला हा गनीम पुन्हा हल्ला करू शकतो. तेंव्हा
दर तीन वर्षानी तपासणी करत रहावे. आणि पाहुणा मुक्कामीच आहे असा रिपोर्ट आला तर
आता रीतसर डायबेटीसची औषधे वगैरे सुरू करायला हवीत.
पुढच्या
प्रेग्नंसीत पुन्हा डायबेटीस होऊ शकतो किंवा दोन प्रेग्नंसींच्या दरम्यान नकळत
सुरू झालेला असू शकतो. तेंव्हा दिवस राहण्याआधी
शुगर तपासून पहावी. जास्त असेल तर
शुगर कंट्रोल करून मगच दिवस राहू द्यावेत. कारण सुरवातीला, अवयव-जननकाळात, साखरेत घोळवलेलं बाळ सव्यंग निपजू शकतं. दिवस राहण्यापूर्वीची शुगर नॉर्मल असेल तर दिवस
राहिल्यावर लवकरच पुन्हा तपासणी करावी.
भारतात
डायबेटीस बराच वाढला आहे. बाळ सुदृढ आणि मधुरिमा बाळंतीण सुखरूप रहायची असेल तर नेमकी तपासणी आणि नियमित उपचाराला पर्याय नाही.
[1]
महाराष्ट्रात काही ठिकाणी आषाढ महिन्यात सासऱ्याने नव्या सुनेकडे
मुळीच पहायचे नसते. मग हे सासरे आपल्या कोण्या पाहुण्याकडे महिनाभर मुक्काम
ठोकतात. यांना आखाड सासरा म्हणतात.
No comments:
Post a Comment