Monday, 12 July 2021

कच्ची बच्ची

 

कच्ची बच्ची  

डॉ. शंतनु अभ्यंकर

 

अकाली मृत्यू इतकाच अकाली जन्म देखील अपार दु:ख आणि अनिश्चितता घेऊन येतो. या अशक्त चिमण्या बाळांचे सगळेच अवयव कच्चे असतात. बाळ कमी दिवसांचं असलं, की पुढे बरेच दिवस त्याचं  काय काय करावं लागतं. त्याला ताबडतोबीनी जसा काही ना काही धोका असतो, तसा तो पुढील आयुष्यातही असतो. जवळपास १० ते १५ % बाळं कमी दिवसाची निपजतात.  कमी दिवसाची म्हणजे सदतीस आठवड्याच्या आतली.

डिलीव्हरीची तारीख दिलेली असते ती, शेवटच्या पाळीपासून  चाळीस आठवडे मोजून. सदतीस आठवड्याला बहुतेक बाळांची,  बहुतेक वाढ पूर्ण होते. फुफ्फुसे  पिकायला तर सदतीस आठवडे पूर्ण होणे अत्यंत गरजेचे. त्यामुळे सदतीसच्या आतली ती सगळी, अकाली जन्मलेली, प्री-मॅच्युअर, ‘कच्ची बच्ची’, अशी व्याख्या आहे.

इतकी सारी प्रगती आणि इतके सारे संशोधन होऊनही प्रसुती कळांची सुरवात कशी होते?; आणि ती पूर्ण दिवस भरल्यावरच  का होते?; ही  कोडी सुटलेली नाहीत. कळारंभ आरंभ अजून निर्गुणच आहे. अकाल प्रसूती घडण्याची शक्यता वर्तवणारी काही कारणे ज्ञात आहेत.  बस्स, इतकंच.

अकाल प्रसूती होणार असल्याची लक्षणंही गोलमाल आहेत. गोलमाल अशासाठी की ही  सगळी लक्षणं गरोदरपणात बहुतेक सर्व स्त्रियांमधे कमी अधिक प्रमाणात उद्भवतच असतात.  अंगावरून चिकट/पांढरा/लाल स्त्राव जाणे, खाली जड जड वाटणे, सतत पाठ/कंबर दुखणे, पोटात कळा  येणे किंवा पोट न दुखता नुसतेच  कडक लागणे, अशी सगळी भयसूचक लक्षणे आहेत. पण निव्वळ लक्षणांवरून अंदाज करणं हे खूप-खूप अवघड असतं.

 म्हणूनच मग इतर कुठल्यातरी  उपयुक्त तपासणीचा शोध काही दशके, खरं तर काही शतके चालू आहे.  पण अजून तरी काही विशेष हाती  आलेलं  नाही.  सोनोग्राफी करून गर्भपिशवीचे तोंड आखूड झालंय का हे तपासता येतं. काही  अंदाज बांधता येतो.  पण आज मूग गिळून मिटलेलं तोंड, हे पुढे काही दिवसांनी आ वासेल का?, हा प्रश्न अजूनही आ वासून उभा आहे.  

अकाल प्रसूतीसाठी जोखमीचे घटक तेवढे आपल्याला माहित आहेत.  पूर्वी जर कमी दिवसाची प्रसूती झाली असेल तर अधिक सावध असायला हवं.  कारण आधीची अकाल प्रसूती, ही आताही तसेच होऊ शकेल, याची निदर्शक आहे.  जुळी, तिळी  वगैरे असतील तर गर्भपिशवीच्या तोंडावर इतका ताण येतो की पूर्ण दिवस भरण्याची शक्यता दुरावते. काही महिलांमध्ये गर्भपिशवीला मध्ये पडदा असतो किंवा गर्भपिशवी तयार होताना दोन भागात तयार झालेली असते.  असे काही जन्मजात रचना-दोष असतील तरीदेखील दिवस पूर्ण जाण्याऐवजी कमी दिवसाची प्रसुती होते.  एखादी स्त्री अतिशय काटकुळी असेल किंवा खूप जाडगुली असेल; तिचा  स्वतःचा जन्म कमी दिवसाचा असेल किंवा रक्ताच्या नात्यातील स्त्रियांना कमी दिवसाची प्रसूती झाली असेल;  तर हे देखील सगळे धोक्याचे इशारे आहेत.  पाठोपाठ बाळंतपणेही वाईट. सरकारने जागोजागी पाट्या लावल्याप्रमाणे, ‘दुसरे मूल केव्हा? पहिले शाळेत जाईल तेव्हा!’ हेच खरं.  आई मधील काही आजारसुद्धा कमी दिवसाची प्रसूती सोबतीला घेऊन येतात. डायबेटीस, बाळंतवात (Pregnancy Induced Hypertension),  वारंवार होणारे गुप्तरोग, लघवीचे इन्फेक्शन वगैरेंमुळे कमी दिवसाच्या प्रसूतीची शक्यता वाढते. गरोदरपणामध्ये यकृतामध्ये कधीकधी पित्त साठून राहते (Intrahepatic Cholestasis Of Pregnancy), कधीकधी रक्ताच्या गुठळ्या बनतात, अशा स्त्रियांना किंवा बाळाचं वजन पुरेसे वाढत नसणाऱ्या स्त्रिया, मधूनच अंगावरून थोडा थोडा रक्तस्राव होणाऱ्या स्त्रियांना  देखील ही जोखिम आहे.  काही महिलांमध्ये दिवसभरण्यापूर्वीच पाणमोट फुटते.  अशा परिस्थितीमध्ये देखील कमी दिवसाची प्रसूती जवळपास अटळ आहे. बाळामध्ये काही व्यंग असेल तर बरेचदा  कमी दिवसाची प्रसूती होते. ताण, तणाव, प्रदूषण हे नेहमीचे व्हिलन आहेतच.  नवोढा आणि प्रौढा (अठराच्या आत आणि  पस्तिशीच्या पुढे)  अशा टोकाच्या वयातील स्त्रियांमध्ये कमी दिवसाच्या प्रसूतीची शक्यता वाढते. गरीब, वंचित, कोणत्याही वैद्यकीय सेवेपर्यंत न पोचलेल्या स्त्रियाही जोखमीच्या गटात येतात.  याशिवाय घरात होणारी मारहाण आणि भावनिक कुचंबणा  हे ही  घटक लक्षात घ्यायला हवेत.

वरीलपैकी काही घटक टाळता येण्यासारखे आहेत, काही नाहीत.  तेव्हा कमी दिवसाची प्रसूती टाळण्यासाठी काय करावं वा  करू नये,  याची ही  छोटीशी जंत्री.

१.             दिवस राहण्यापूर्वी आपलं वजन प्रमाणात आहे ना हे पाहावे.  

२.             तंबाखू, मिश्री, दारू आणि अंमली पदार्थ यापासून चारच काय चांगलं  आठ हात लांब रहावे आणि नवऱ्यालाही   तसंच करायला भाग पाडावे. नवऱ्यानी ओढलेल्या बीडी-सिगरेटचा धूर खाल्याने देखील आई-गर्भाला इजा  होत असते.  आईच्या दारूचा तर गर्भावर थेट परिणाम होतो.   नवऱ्याच्या दारूचा जरी बाळावर थेट परिणाम होत नसला तरी अप्रत्यक्ष परिणाम बाळाला भोगावेच लागतात.  व्यसनांनी जर्जर झालेल्या बापापेक्षा सुदृढ बाप असेल तर बाळाचं शैशव सुखात जाईल, नाही का?

३.             ब्लडप्रेशर, डायबिटीस, थायरॉईडचे विकार असे आजार असतील तर त्यावर मनोभावे उपचार घ्या आणि ते डॉक्टरी सल्ल्यानुसार चालू ठेवा.  ‘डॉक्टरांनी औषधांची आवश्यकता आहे असं सांगितलंय, पण मी लई भारी! मी  माझ्या निश्चयाच्या बळावर, माझ्या  मनोनिग्रहाने, माझ्या मनःशक्तीने; निव्वळ डाएट करून, निव्वळ व्यायाम करून, निव्वळ  योगासनांनी; ब्लडप्रेशर आणि/किंवा  डायबिटीस आणि/किंवा थायरॉईड वगैरे आटोक्यात आणून दाखवतेच. गोली को गोली मारो!!’ असली भीष्मप्रतिज्ञा करू नका.

४.             डॉक्टरांशी बोलून आवश्यक त्या लसी आधीच घेऊन टाका.  रूबेला, स्वाईन फ्लू, बी प्रकारची कावीळ, अशा लसी दिवस राहण्यापूर्वी घेतलेल्या चांगल्या.

 

इतकं  सगळं करूनही जर कमी दिवसाच्या कळा यायला लागल्या तर अनेक औषधे वापरली जातात  आणि होणारी प्रसूती किंवा किमान त्यापासून होणारे धोके  टाळण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.  बरेचदा कमी दिवसाची प्रसुती तऱ्हेतऱ्हेच्या  इन्फेक्शनमुळे होत असल्याने अँटिबायोटिक्स वापरली जातात. पाणमोट जर फुटली असेल तर ज्या क्षणापासून पाणी बाहेर पडायला लागते तेव्हापासून बाहेरचे जंतूदेखील आत शिरकाव करायला लागतात.  त्यामुळे इथेही अँटिबायोटिक्सचा  उपयोग होतो.  गर्भपिशवीच्या कळा कमी करतील अथवा थांबवतील अशी औषधेसुद्धा उपलब्ध आहेत.  यामुळे कळा पूर्णपणे थांबून अकाली प्रसूती पूर्णतः जरी टळत नसली, तरी आजचा जन्म उद्यावर ढकलण्याचा फायदा होतोच होतो. असे केल्याने  बाळाची वाढ होण्यासाठी जी इंजेक्शने दिली जातात (Steroids), त्यांचा प्रभाव सुरू व्हायला वेळ मिळतो. मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स,  प्रोजेस्टेरॉन अशा प्रकारची औषधं  कळा थांबवण्यासाठी वापरली  जातात.  पूर्वी चक्क दारूची इंजेक्शने  सुद्धा दिली जायची! पण कसं कुणास ठाऊक, यांचा पेशंटवर इफेक्ट यथातथाच   व्हायचा पण आरोग्य कर्मचाऱ्यांवर मात्र इफेक्ट  तात्काळ दिसून यायचे!! आता बंदच आहे तो प्रकार. 

ऑक्सिटोसिन हे कळा आणणारे  संप्रेरक. थेट  या विरुद्ध काम करणारे औषध (अॅटोसीबॅन) आता दाखल झाले आहे. पण त्याचीही  कामगिरी फारशी चमकदार नाही. पिशवीला टाका घालणे हा एक डॉक्टरप्रिय उपचार आहे.  पुन्हा एकदा शास्त्रीय निकषानुसार या उपचारालाही  काही मर्यादा आहेत.  संपूर्ण विश्रांती हा लोकप्रिय उपाय आहे.  पण दुःखद बातमी अशी की, याचाही  फारसा परिणाम होत नाही, असं अभ्यास सांगतात.

थोडक्यात अकाल प्रसुतीचे भाकीत वर्तवणे, सध्यातरी शक्य नाही आणि अशी प्रसूती होणारच नाही, अशा गोळ्या, औषधे, लसी,  इंजेक्शने, ऑपरेशनेही  उपलब्ध नाहीत.  कमी दिवसाची होऊ नये या नावाखाली जे जे केलं जातं,  ते ते मदत आणि सदिच्छा-स्वरूप असतं म्हणा ना.

 अर्थात अकाल प्रसव टाळता येत नसेल पण त्यापासून बाळाला उद्भवणारा त्रास मात्र बराचसा टाळता येतो. अत्यंत कमी दिवसाच्या आणि कमी वजनाच्या बाळांची  काळजी घेण्याचे तंत्र (Technology) आणि मंत्र (Protocols) आता विलक्षण प्रगत झालेले आहेत.    

बाळाला मुख्य त्रास होतो तो म्हणजे नीट श्वास घेता येत नाही.  बाळ पोटात असतं, त्या वेळेला पाण्यात तरंगत असताना त्याच्या फुफ्फुसांना काही काम नसतं.  त्याला लागणारा ऑक्सिजन आईच्या रक्तातून नाळेद्वारे त्याच्यापर्यंत पोचवला जात असतो.  एकदा या जलसमाधीतून बाहेर पडल्यानंतर फुफ्फुसाला काम करावंच लागतं.  आत हवा घेणे, ऑक्सीजन घेणे आणि कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकणे हे तत्क्षणी सुरू व्हावं लागतं.  पहिल्या श्वासाबरोबर हवेने फुलतात फुफ्फुसे.

म्हणजे अनरशाच्या  पीठाचा गोळा चांगला घट्ट असतो. पण अनरशाला  छान जाळी पडते.  फुलून  येतो अनरसा. तशी फुफ्फुसे फुलून येतात. पण अनरसा फुलला की तसाच रहातो. पुन्हा त्याचा पिठाचा  गोळा बनत नाही. पण अकाली जन्मलेल्या बाळांत, उच्छवासाबरोबर फुफ्फुसाचा   पुन्हा गोळा होऊ शकतो.  तसा  तो होऊ नये म्हणून काही विशिष्ट रसायनं  तिथे असावी  लागतात.  यांना म्हणतात सरफॅक्टंट. कमी दिवसाच्या बाळांमध्ये ही सरफॅक्टंट नसतात किंवा पुरेशी नसतात.  त्यामुळे बाळाला श्वास घ्यायला अडचणी येतात.  सरफॅक्टंट तातडीने तयार व्हावे, म्हणून कमी दिवसाच्या प्रसूतीची शक्यता दिसताच, आईला काही इंजेक्शने (Steroids) दिली जातात.  यामुळे नऊ महिने भरल्यावर तयार होणारे सरफॅक्टंट, दोन चार दिवसात तयार होते. आता झाली जरी कमी दिवसाची प्रसूती, तरी बाळाला सहज श्वास घेता येतो. इतकंच काय अशा उपचारांमुळे मेंदूतील पोकळीत होणारा  रक्तस्राव आणि आतडयाच्या अंतःत्वचेचा शोथ आणि झड,  अशा इतर दोन, जीवघेण्या आजारांपासून, बाळाचे रक्षण होते. बाळाच्या मेंदूतील पोकळीत होणारा  रक्तस्राव होऊ नये म्हणून मॅग्नेशियम सल्फेटही उपयुक्त ठरतं. हेच ते, जे कळा थांबवण्यासाठी वापरलं जातं ते.

बाळाचे अवयव भरभर पिकावेत म्हणून असे बहुविध उपचार आता केले जातात. कमी दिवसाची बरीच बच्ची आता  कच्ची रहात नाहीत. चांगली धडधाकट होतात, दंगा करतात. हे पिल्लू कमी दिवसाचं होतं बरंका, असं सांगूनही खरं वाटणार नाही इतकी मस्ती करतात.  

 

प्रथम प्रकाशन

लोकमत

सखी पुरवणी

१३/७/२०२१

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment