Saturday, 31 July 2021
विज्ञान म्हणजे काय? तर्कशास्त्र. लेखांक ८
Friday, 30 July 2021
आमचे येथे नॅच्युरल सीझर करून मिळेल!!!!!
आमचे येथे नॅच्युरल सीझर करून मिळेल!!!!!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
आठवड्याभरापूर्वीचीच
गोष्ट. मी अगदी मनातून खट्टू झालो. खुदाईखिन्नता पार वेढून राहिली मला. इतका
निराश, इतका हताश, इतका हतवीर्य मी कधी
झालो नव्हतो. आपण अगदी लल्लूपंजू आहोत असे वाटायला लागले. तसा मी बऱ्या
मनोवृत्तीचा माणूस आहे. सुखदु:खे (जमेल तितकं) समे कृत्वा वगैरे. पण काही और घडलं
आणि मी खचलोच.
त्याचं झालं असं की एक पेशंट माझ्याकडे आली. प्रेग्नंसीमुळे तिला
बरीच दुखणी जडली होती. बीपी वाढलं होतं, थायरॉईड बिघडलं होतं, शुगर तर झोके घेत
होती. आधीची तीन सीझर. मी आधीचे पेपर बघितले. रिपोर्टसचा अभ्यास करता करता डोळ्याच्या
कडेने मी तिच्या हालचाली निरखत होतो.
एकूणच एक अस्वस्थता जाणवत होती. तिच्या देहबोलीतून मला वाटलं, ‘डॉक्टर, तुम्हीच नॉर्मलच
डिलिव्हरी करणारच असाल तरच
तुमच्याकडेच डिलिव्हरी’; असा काहीतरी ‘च’कारांत प्रस्ताव ही माझ्यापुढे
ठेवणार. असा प्रस्ताव आला असता तर माझं काम
सोपं होतं. हे शक्य नाही, असं नम्रपणे सांगायचं आणि ही बया आणि बला टाळायची.
पण घडलं भलतंच. त्या बाईनी मला सांगितलं की एकूणच नेचर, म्हणजे
निसर्ग, या प्रकारावर तिचा भलताच विश्वास आहे. जगात जे काही घडतं ते निसर्ग नियमानुसारच घडतं
अशी तिची पक्की खात्री होती. तीन वेळा सिझर करावं लागलं एवढं वगळता तिच्या आयुष्यात अनैसर्गिक असं काही घडलं नव्हतं.
किंबहूना आत्यंतिक काळजी घेऊन तिनी ते घडूच दिलं नव्हतं.
तेव्हा तिचं म्हणणं असं की
सिझर तर मी करावंच, पण ते शक्यतो ‘नॅच्युरल’ करावं! हे ऐकून मी हतबुद्ध, गतप्रभ,
दिग्.मूढ वगैरे वगैरे झालो. सीझर
करण्याच्या विविध पद्धती मला माहीत होत्या पण ‘नॅच्युरल सीझर’ ही भानगड मला अवगत
नव्हती. तसं मी तिला स्पष्टपणे सांगितलं. त्यावर ‘नॅच्युरल’ म्हणजे ‘कृत्रिम उपकरणे
किंवा औषधे न वापरता केलेले सीझर’, अशी व्याख्या तिने मला ऐकवली.
यावर सर्वच उपकरणे
कृत्रिम असतात. अणकुचीदार दगडाने पोट फाडण्याची
मला प्रॅक्टिस नाही, असं मी प्रामाणिकपणे कबूल केलं. तिनी मला तात्काळ माफ करून
टाकलं. तेवढं उपकरणांचं चालेल म्हणाली. पण
मी औषधोपचार करणार त्यात कोणतेही ‘स्टिरॉइड’ नसावेत, ‘हॉर्मोन’ नसावेत आणि ‘केमिकल’
तर अजिबात नसावेत; असा एक नवाच पेच तिने
टाकला.
आता संभाषण रंगात आलं
होतं. मलाही आता वैताग जावून चक्क मज्जा वाटायला लागली होती. मी तिला म्हणालो, ‘असं आहे की, सर्व
हॉरमोन हे केमिकलच असतात पण सारेच स्टीरॉईड नसतात. हां, पण काही हॉरमोन स्टीरॉईड
असतात. तसेच सर्व स्टीरॉईड हे हॉरमोन
नसतात पण केमिकल असतात. त्यातही काही
स्टीरॉईड हॉरमोन असतात. आणि हॉरमोन, स्टीरॉईड
असो वा नसो अथवा स्टीरॉईड, हॉरमोन असो वा नसो; काहीही असलं तरी स्टीरॉईड आणि हॉरमोन, हे दोन्ही केमिकलच असतात!!!’
ती आता संपूर्ण गारद झाली
होती. मग अचानक माझ्या जिभेवर पुलं नाचू
लागले. ‘आयुष्यात मला भावलेलं एक गुज तुम्हाला सांगतो.’ अशी अत्यंत गंभीर सुरवात
करत मी म्हटलं, ‘अहो, तुम्ही ‘बाईसारख्या बाई’
आहात आणि मी ‘पुरुषासारखा पुरुष’ आहे हे त्या स्टीरॉईड हॉरमोनमुळेच बरं का!!’
माझ्या या सरबत्तीचा
चांगलाच परिणाम झाला. आपणच केलेल्या लोकरीच्या गुंत्याकडे मांजरीनी स्तब्ध होऊन
पहावं तसा तिचा चेहरा झाला. आता मिशांवरून पंजा फिरवावा का पंज्यावरून मिशा; असा
प्रश्न पडलेल्या मांजरीसारखी ती दिसू लागली. शेवटी, ‘ते जाऊ दे हो डॉक्टर, तुम्ही
ते नॅच्युरलचं तेवढं बघा ना.’ एवढंच ती पुटपुटली.
पुराणातील आणि
लोककथांतील नायकांपुढे नाही का, अशक्य पेच निर्माण केले जातात आणि त्यातून दैवयोगे त्यांची
सुटका होते; त्याचीच मला आठवण झाली. मी तपासून तिला आठवड्याभराने
यायला सांगितलं आणि अक्षरशः दोन्ही हातांनी डोकं खाजवायला बसलो.
नॅच्युरल सिझर कसे करायचे,
याचा विचार करता करता मी मनातल्या मनात सीझरची उजळणी करायला लागलो. सर्व प्रथम पेशंटला दिले जाते इंजेक्शन अॅट्रोपीन. अॅट्रोपा बेलाडोना या झाडापासून मिळणारे हे द्रव्य. म्हणजे माझ्याकडे जे इंजेक्शन येतं ते काही झाडाच्या
रसापासून बनवलेलं नसतं. पण मूळचा स्त्रोत
तोच. त्यामुळे अॅट्रोपीन या पेशंटला चालायला
हरकत नव्हती म्हणजे निदान माझी तरी हरकत नव्हती. मग त्वचा साफ करण्यासाठी आयोडीन.
हे तर नॅच्युरलच झालं की. नंतर स्पिरीट;
म्हणजे दारू, म्हणजे सोमरस, म्हणजेही नॅच्युरल! आणि हो नुसतंच नॅच्युरल नाही; चक्क
हर्बल सुद्धा!!
मग भूल देण्यासाठी
झायलोकेन वापरलं जातं. हे मात्र कारखान्यात बनवले जातं. याला नॅच्युरल पर्याय म्हणजे डोक्यात हातोडा
घालून बेशुद्ध करणे आणि तेवढ्या वेळात सिझर उरकणे! पर्याय नॅच्युरल जरी असला तरी
मान्य होण्यासारखा नसणार, असं आपलं मी समजलो.
बाकी पोट उघडून मूल बाहेर
काढताच पेशंटला पिटोसीन आणि मिथार्जिन इंजेक्शन दिलं जातं. पिटोसीन हा एक
हॉरमोन आहे. त्या बाईंच्या उपासाला हा
चालणार का? पण हा तर शरीरातच निर्माण होतो.
डिलिव्हरी होताच त्या बाईंच्या मेंदूतून सर्वदूर पसरणारच आहे तो. तेंव्हा त्यात
माझी थोडी भर घालायला काहीच हरकत नसावी. मिथार्जिन हे देखील नॅच्युरल आणि हो, हर्बल
औषध आहे. म्हणजे त्याची निर्मिती एका
बुरशीपासून केली जाते. शिवाय मी अँटिबायोटिक
देणार पेनिसिलीन. हे तर त्या प्रसिद्ध
बुरशीपासून निर्माण झालेलं. तेंव्हा हे ही हर्बलच. याबद्दलही आक्षेप असायचे कारण नाही.
थोडं सुद्धा डोकं न
चालवता हे कोडं आपोआपच सुटत चाललं होतं.
मी हरखून जात होतो.
पुढे उघडलेले पोट
शिवण्यासाठी कॅटगट हा प्राणीज धागा वापरता
येईल आणि त्वचा शिवण्यासाठी सुताचा दोरा वापरला तरी चालतो. एरवी कॅटगट आणि सुतापेक्षा नवे, चांगले
पर्याय मी वापरत असतो; पण ह्या केसमध्ये खास जुने वापरायची माझी तयारी होती.
ऑपरेशननंतर वेदनाशामक
म्हणून काही औषधे नॅच्युरल नसल्याने मला बाद करावी लागली. पण अॅस्पिरिन
हे विलोच्या खोडापासून बनलेले औषध. फॉर्ट्विन म्हणजे गांजाचा चुलतभाऊ. अर्थात हे नॅच्युरल, हर्बल आणि
वर अध्यात्मिकसुद्धा असल्याने पेशंटची यालाही काही हरकत असण्याची शक्यता नव्हती
राहता राहिलं सलाईन. सलाईन म्हणजे मिठाचं पाणी. अगदीच नॅच्युरल की हो
हे.
सरतेशेवटी माझ्या असं
लक्षात आलं की भूल देणे, सिझर करणे, भूल उतरणे, पुढे काही तास पेशंटची
प्रकृती स्थिर आहे ना हे पाहणे, या सगळ्या
दरम्यान मी शरीरातील अनेक गोष्टींचं संतुलन साधत असतो. म्हणजे इनपुट आणि आउटपुट, रक्तस्राव आणि रक्त भरणे, ऑक्सिजन आणि कार्बन
डाय-ऑक्साइड, पाणी आणि क्षार; असं बरंच काही. त्यामुळे माझं हे ‘संतुलन सिझरही’ होतं!!
शिवाय सिझर करताना बाळ,
बाळा भोवतीचे पाणी, वार आणि मेम्ब्रेन असं सगळं मी काढून घेणार. यातला थोडा जरी भाग आत राहिला तर पेशंटला काही
त्रास होऊ शकतो. त्यामुळे ‘प्रॉटडक्ट्स ऑफ
कन्सेप्शन’चे समूळ निराकरण करणे, ही एक महत्त्वाची पायरी आहे. गर्भवस्था संपुष्टात
आल्यामुळे, डायबेटीस, ब्लडप्रेशर वगैरे गर्भधारणेशी
संबंधित सारे आजारही, समूळ बरे होणार होते!!!
थोडक्यात मी जे करत होतो
ते नॅच्युरल तर होतंच पण हर्बलही होतं. हर्बल तर होतंच पण संतुलितही होतं. संतुलित
तर होतच पण समूळही होतं... आणि इतकं सगळं
होतं तर त्याला होलीस्टिक म्हणायला हरकत
ती कसली?
अचानक कोडं सुटलं. मी
तात्काळ फ्लेक्स बोर्डवाल्याला फोन केला. म्हटलं, “दवाखान्याबाहेर एक बोर्ड
लावायचा आहे, घे मजकूर; ‘आमचे येथे
नॅच्युरल सीझर करून मिळेल.’ थांब, थांब. ‘आमचे
येथे नॅच्युरल, हर्बल, संतुलित, समूळ तसेच हॉलिस्टीक सीझर करून मिळेल!!!!!’”
शेवटी काय, मला विशेष किंवा वेगळं
काहीच करायचं नव्हतं, पाटीवर काय लिहायचं एवढाच तर प्रश्न होता.
प्रथमप्रसिद्धी
लोकसत्ता, चतुरंग
पुरवणी
३१/७/२०२१
निर्हेतुक विश्वकल्पनेचा पाईक: स्टीव्हन वाईनबर्ग
निर्हेतुक विश्वकल्पनेचा
पाईक: स्टीव्हन वाईनबर्ग
डॉ. शंतनू
अभ्यंकर, वाई
अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
स्टीव्हन वाईनबर्ग यांचं नुकतंच, म्हणजे 23 जुलैला, वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. पाकिस्तानच्या
अब्दुस सलाम यांचे बरोबर १९७९ सालचे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले होते. हा
सर्वोच्च सन्मान. इतर अनेक पारितोषिके
वेगळीच. मूलकणांवरील संशोधनासाठी ते
विश्वविख्यात होते.
विज्ञान शिकता शिकता
आपण काय शिकलो याचे मोठे बहारदार वर्णन त्यानी केले आहे. (नेचर २३ सप्टेंबर २००३) आधी
भौतिकशास्त्र नीट समजावून घेऊ या आणि मग आपल्या संशोधनाचा विषय ठरवू या; अशा प्रयत्नात
ते होते. सुदैवाने त्यांच्या शिक्षकांनी त्यांना
आधी संशोधनासाठी विषय निवडण्याचा आणि त्या
अनुषंगाने आवश्यक तेवढं भौतिकशास्त्र अवगत करून घेण्याचा सल्ला दिला. वाईनबर्ग म्हणतात की, ‘आश्चर्य म्हणजे हे जमलं!’.
इतकंच नाही तर संपूर्ण भौतिकशास्त्र कोणालाच
अवगत होऊ शकत नाही, हेही लक्षात आलं.
बरेचदा विद्यार्थी
ज्ञात संकल्पनांना बद्दलच संशोधन करण्यात रस घेतात. मात्र वाईनबर्ग त्याच्या विरुद्ध सल्ला देतात. ते म्हणतात की जिथे अजून पाउलवाटही निर्माण झालेली नाही अशा ठिकाणीच संशोधकाने पाऊल ठेवायला पाहिजे.
काहीतरी नवीन गवसण्याची तिथेच सर्वाधिक शक्यता
असते.
तुमच्या संशोधनाला
सध्या किंवा भविष्यात काय आणि किती महत्त्व आहे?, मुळात त्याला थोडं तरी महत्व आहे
का?, या प्रश्नाचे उत्तर बरेचदा देता येत नाही. पण तरी देखील वैज्ञानिकांनी चिकाटीने प्रश्नांचा
मागोवा घेणे सुरू ठेवले पाहिजे. लखलखीत यश क्वचितच पदरी पडतं. बरेचदा अपयशाचे धनी व्हावे लागते. पण याला इलाज नाही. संशोधकाने विज्ञानाच्या इतिहासाबद्दलही माहिती घ्यावी
असा त्यांचा आग्रह असे. वर्तमानात किंवा
भविष्यात तुमच्या संशोधनाचं काय होईल हे सांगता येत नसलं तरी इतिहासाच्या पार्श्वभूमीवर
पाहिलं तर तुमचं काम तुम्हाला कदाचित प्रेरणादायी वाटू शकेल!!
म्हणूनच की काय,
विज्ञानाचा इतिहास, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाचे तत्वज्ञान त्यांनी सातत्याने जनतेसमोर मांडले. ते निव्वळ भौतिकशास्त्रज्ञ
नव्हते तर आपल्या शास्त्राबद्दल सामान्यांना कळेल अशा भाषेत लिहिणारे असामान्य जन-लेखक
होते.
‘द फर्स्ट थ्री
मिनिट्स’ या १९७७ साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच
पुस्तकात ‘बिग बँग’नंतरच्या पहिल्या काही मिनिटांतील रोमांचक घटना ते वर्णन करून
सांगतात. सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगतात. 13.8 बिलियन वर्षापूर्वी
घडलेल्या या घटनेचा विस्मय वाचकांपर्यन्त ते अगदी सहज पोहोचवतात. हे सारे घटित वर्णन
करून ते म्हणतात, ‘या विश्वाबद्दलची आपली समज जसजशी वाढते आहे, तसतसे हे विश्व निर्हेतुक
आहे, असं लक्षात येऊ लागलं आहे!’
हे विश्व
निर्हेतुक आहे ही समज धक्कादायक आणि क्रांतिकारी खरेच. हजारो वर्ष लोक, याच्या बरोब्बर उलटे गृहीतक उराशी कवटाळून होते. माणसाचं भलं-बुरं
करणं किंवा न करणं हाच हेतु खरा, अशी धारणा होती. सारी सृष्टी ही मानवासाठी निर्माण केलेली आहे अशी
बहुतेक धर्मांची शिकवणच आहे. किमान
देवाच्या मनात मानवाला सततचे स्थान आहे, असे तरी मानवाच्या मनाने घेतले आहे खास.
वैज्ञानिक प्रगती
बरोबरच विश्वाबद्दलची समज वाढली. न्यूटन, डार्विन, आईन्स्टाईन यांच्या
सिद्धांतातून देव कल्पना किती थिटी आहे हे
टप्याटप्याने पुढे येत गेले. देवाजीने घडविलेले विश्व, ही
मांडणी अपुरी वाटायला लागली. विश्व
निर्माण करणारा आणि चालवणाराही देव आहे अशी
समजूत प्रचलित होती. आता या विश्वाचे अधिक यथास्थित ज्ञान झालं. काही कोडी सुटली,
काही नवी लक्षात आली. मग, निर्मिकाने विश्वाची निर्मिती केली आहे मात्र एकदा त्याचे
नियम घालून दिल्यानंतर हा खेळ अव्याहतपणे चालू आहे, असा पर्यायी विचार आला. आईन्स्टाईन
सारख्यांनी एक व्यक्ती म्हणून आपलं बोट धरणारा, आपल्या नोकरी आणि छोकरीमध्ये
विलक्षण रस घेणारा, प्रार्थनेला पावणारा, देव नाकारला मात्र या विश्वाला देवस्वरूप मानलं.
स्टीफन हॉकिंग प्रभृतींनी विश्वाला स्टार्टर
मारायला सुद्धा देवाची गरज आहे का? मुळात विश्वाला ‘सुरुवात’ म्हणता येईल, असं काही
असेल का? अशा शंका व्यक्त केल्या.
हॉकिंग प्रमाणेच
स्टीव्हन वाइनबर्ग हे देखील विश्व अपघाताने निर्माण झालेले आहे आणि काही नियमानुसार
चालू राहिलेले आहे आणि यथावकाश लयास जाणार आहे; असं म्हणत होते. विश्वातल्या प्रत्येक घटितामागे, ‘त्याचा’ काहीतरी
‘हेतू’ अथवा ‘संदेश’ असतो असं समजण्याचं कारण नाही, असं त्यांनी ठामपणे मांडले.
हे विश्व निर्हेतुक
आहे असं म्हणताच लोकं चवताळून भांडायला उठतात, हा स्टीव्हन वाईनबर्ग यांचा
नित्याचा अनुभव. या विश्वाला हेतू आहे किंवा नाही हे ठरवण्याचे काम विज्ञानाचं नाही,
असं लोकं ठासून सांगायची. स्टीव्हन
वाईनबर्ग सांगत, ‘विश्वाला हेतू आहे किंवा नाही हे ठरवण्याचं काम विज्ञानाचे नक्कीच नाही.
मात्र आमच्या संशोधनानुसार हेतू सापडत
मात्र नाही, हे सांगायला काय हरकत आहे?
या विश्वाला हेतू
नाहीये हे ऐकताच लोकांना हा जीवन कलह अर्थशून्य भासू लागतो. आपण आणि आपले प्रियजन हे कधीतरी मरणार, आपला मागमूसही उरणार नाही, आयुष्यात जेथे जातो तेथे बोट धरून चालवणारा कोणी
नाही, वगैरे कल्पना सुखावह नाहीतच. या कल्पनांचा त्याग करून जगणं जिकिरीचे आहे.
स्टीव्हन वाईनबर्गना अर्थातच याची जाणीव होती. ही अडचण सहानुभूतिपूर्वक समजावून
घ्यायला हवी असे त्यांचे म्हणणे होते.
‘विज्ञानाने
जनांना देव कल्पनेला कवटाळून बसणे अशक्य
केलेले नाही. पण विज्ञानाने विचारी जनांना
देव कल्पना त्यागणे शक्य केले आहे.’ असे रोखठोकपणे सांगणारा विज्ञानवादी आता
काळाच्या पडद्याआड गेला आहे.
प्रथम प्रसिद्धी
दैनिक सकाळ
३०/७/२०२१
Tuesday, 27 July 2021
कसं हे गोड दुखणं
कसं
हे गोड दुखणं
डॉ.
शंतनु अभ्यंकर, वाई
गरोदरपणाचं
गोड ओझं स्त्रीया हौसेनं वागवतात पण ह्या दरम्यान
जर गोड दुखणं जडलं तर मात्र पंचाईत होते. हे गोड दुखणं म्हणजे गरोदरपणात उद्भवणारा
डायबेटीस.
इंसुलिन
हा तर जगप्रसिद्ध संप्रेरक (हॉरमोन). अगदी
जीवनावश्यक. तसं शरीरात जीवन–अनावश्यक असे भाग/रसायने जवळपास नसतातच. तर ह्या इन्शुलीनमुळे रक्तातली
साखर प्रत्यक्ष पेशींत दाखल होते. मग ती तिथे वापरली जाते. तेंव्हा हा नसला किंवा
असून गतप्रभ ठरला, तर रक्तशर्करा वाढते पण पेशी उपाशी रहातात. ह्याला म्हणतात डायबेटीस.
दिवस
राहीले, की गर्भात आणि वारेत इन्शुलीन हतप्रभ करणारे काही घटक तयार होतात. भरपाई म्हणून आई अधिकचे इन्शुलीन बनवत असते. जवळ जवळ
तिप्पट इन्शुलीन बनवले जाते. पण अशी भरपाई जेंव्हा अपुरी पडते तेंव्हा आईच्या आणि
पर्यायानी गर्भाच्या शरीरातील शर्करा (ह्या लेखात शर्करा/शुगर/ग्लुकोज हे शब्द
समानार्थी म्हणून वापरले आहेत) वाढत रहाते. रक्तातली शुगर जास्त वाढली तर ती
लघवीतून बाहेर पडते. डायबेटीस मेलायटस ह्या
शब्दाचा अर्थच मुळी, मधू-मूत्र!!!
तर
असा हा ‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेह’ (Gestational Diabetes). सुमारे ५ ते १०% गर्भवतींत आढळतो हा. म्हणूनच प्रत्येक स्त्रीनी,
प्रत्येक गरोदरपणात मधुमेहाची चाचणी करून घेणे इष्ट.
एखाद्या
मधुमेही स्त्रीला गर्भधारणा होणे
आणि मूलतः निरोगी स्त्रीला गर्भधारणा
झाल्यामुळे मधुमेह होणे; ह्या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. इथे आपण,
दुसऱ्या प्रकारच्या आजाराची, म्हणजे ‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेहाची’ (Gestational
Diabetes) माहिती घेत आहोत.
हा
तात्कालिक असतो. प्रसूतीनंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदाला येते. तात्कालिक असला, तरी
याचे ताप टाळायचे असतील तर लवकर निदान आणि प्रामाणिक उपचार महत्वाचे आहेत. शिवाय
प्रसूती नंतर हा ‘आखाड सासरा’[1] परत गेलाय ना हेही पहावे
लागते.
या
गोड दुखण्याचा परिणाम म्हणून काय काय दुष्परिणाम होतात ते खाली देतोय. यादीतल्या
सगळ्या गोष्टी सगळ्यांना लागू पडत नाहीत. नीट उपचार घेतले असतील तर बहुतेकदा
काहीही होत नाही. हे लक्षात घेऊनच पुढे वाचावे.
डायबेटीस
जडला तर आईचे बीपी वाढण्याची (PIH बाळंतवात) आणि त्यामुळे कमी
दिवसाची प्रसूती करण्याची निकड भासू शकते.
डायबीटीस
असेल तर मूल गुटगुटीत होते! म्हणजे त्याचा त्रास व्हावा इतके गुटगुटीत होते.
बलदंडच म्हणा ना. चार किलोच्या आसपास वजन
सहज भरते (Macrosomia).
आता एवढा मोठा देह योनिमार्गे प्रकट व्हायचा तर अवघडच ठरणार. बाळाला आणि
आईलाही इजा होण्याचा कितीतरी धोका. मग
अर्थात सीझरचा मार्ग पत्करावा लागतो.
पोटात
अतिपोषित झालेले हे बालक जन्मतः अन्नासाठी वखवखलेले असते. जरा उपास घडला की याची
रक्तशर्करा ढपते (Hypoglycemia). मग शिरेवाटे ग्लुकोज द्यावे लागते. कधी कधी कॅल्शियम आणि मॅग्नीशियमची पातळीही घसरते. हे ही द्यावे लागते.
या
मधुवंतींच्या तान्ह्यांना बरेचदा ‘कावीळ’ होते. इथे कावीळ म्हणजे जंतूंद्वारे
पसरते ती सुपरिचित कावीळ नव्हे. बाळाच्या अंगात
असलेले आणि जन्मताच अनावश्यक ठरलेले जास्तीचे रक्त आता विघटित होऊ लागतं. ह्याच्या परिणामी
अंगावर पिवळेपणा दिसू लागतो. (याबद्दल सविस्तर अन्य लेखांत) बाळाला अतिनील
किरणांच्या दिव्याखाली ठेवलं की ही कावीळ बरीही
होते.
अशा
बाळांना जन्मतः श्वसनाला त्रास होतो. यांना फुफ्फुसे असतात पण ती पिकलेली नसतात. सबब काही काळ ऑक्सीजन वगैरे लागू शकतो.
काय
होत नाही हे ही लक्षात घेऊ या.
आईतील
मधुमेहामुळे बाळाला लहान वयात मधुमेह होत नाही.
पण तान्हेपणीचे हे सुदृढ बालक पुढे
मोठेपणीही गुटगुटीत रहाते. तेंव्हा मात्र यालाही मधुमेह वगैरे स्थौल्यस्नेही आजार
जडतात. म्हणून अशा मुलांत लहानपणापासूनच योग्य आहार, मैदानी खेळ वगैरेला ‘आईने
सक्रीय उत्तेजन’ देऊन योग्य वजन राखले पाहिजे. ‘आईने सक्रीय उत्तेजन’, हे शब्द
मुद्दामच अवतरण चिन्हांत टाकले आहेत. कारण गरोदरपणात डायबेटीस जडलेल्या ह्या
आईलाही वाढत्या वयात पुन्हा डायबेटीस होऊ शकतो. तेंव्हा योग्य आहार, मैदानी खेळ
वगैरेची गरज आईलाही असतेच.
हा
आजार साधारण पाचव्या-सहाव्या महिन्यानंतर
जडतो. बाळाची शरीररचना तीन महिन्यातच पूर्ण झालेली असते. तेंव्हा बाळांत रचना-दोष, व्यंग आढळत नाहीत.
गोड
दुखण्याचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर गरोदरपणात सुरवातीला एकदा आणि नंतरही किमान
दोनदा डायबीटीससाठीची तपासणी केली पाहिजे.
तपासणीच्या अनेक पद्धती आहेत. ठराविक ग्रॅम ग्लुकोज खाणे आणि
ठराविक कालावधीने रक्त शर्करा मोजणे असे या तपासण्यांचे स्वरूप आहे. ज्या
त्या दवाखान्याची काही पद्धत ठरलेली असते, त्यानुसार चेक करायला हरकत नाही. वारंवार दवाखान्यात येणे, वारंवार रक्त तपासणे
हे आपल्याकडे अनेकींना अवघड असतं. हे जाणून भारतीय शास्त्रज्ञांनी ७५ ग्रॅम
ग्लुकोज खाऊन दोन तासाने एकदाच रक्त तपासण्याची पद्धत विकसित केली आहे (DIPSI). तीच आता सर्वत्र मान्यता पावत आहे.
जर
डायबेटीस असेल तर निव्वळ आहार निट पाळल्याने ८०% स्त्रियांची शुगर आटोक्यात रहाते.
मात्र ही आटोक्यात आहे ना, हे वारंवार तपासावे लागते. दिवसातून तीन-तीन, चार-चार
वेळाही तपासावे लागते. त्यासाठी घरच्या
घरीच तपासणी केलेली बरी. ग्लुकोमीटर मिळतात. ते विकत घ्यावेत. टाळू नये. तुम्ही ग्लुकोमीटर
विकत घेतल्याने डायबेटीसला राग येऊन तो वाढतबिढत नाही. उलट वारंवार तपासणी सहज
शक्य होते. एरवी अवघडलेल्या बाईने दिवसातून तीन-तीन, चार-चार वेळा लॅब गाठणे किती
अवघड आहे. ‘मला एवढी कुठे शुगर आहे?’;
‘डॉक्टरांचं आपलं काहीतरीच!’; ‘आमच्यावेळी असलं नव्हतं’; ‘पप्पांना वीस वर्ष
डायबेटीस आहे, पण त्यांना कुठे ग्लुकोमीटर सांगितलाय?’; वगैरे युक्तिवाद फिजूल
आहेत. तुमचे पप्पा प्रेग्नंट नाहीत हे लक्षात ठेवा.
वारंवार
तपासणी अत्यावश्यक आहे कारण शरीरातील साखर तिन्हीत्रिकाळ नियंत्रित असणे आवश्यक
आहे. तशी ती नसेल, साखरेची पातळी हेलकावे खात असेल, तर ते वाईट आहे. नियमित तपासणीनुसार
आहार, व्यायाम, इतकंच काय पण थोडं थोडं चीटिंग केलेलं चालेल का, हे ही ठरवता येतं.
साखर
आटोक्यात ठेवायची ती नको ती गुंतागुंत उद्भवू नये म्हणून. आहारातील बदल, डाएट, हा
मुख्य मार्ग. पण डाएट म्हणजे आईला उपाशी ठेवणं अभिप्रेत नाही. आवश्यक त्या कॅलरी
आणि पोषक द्रव्ये मिळायलाच हवीत. चयापचयासाठी पुरेशी शर्कराही मिळायला हवी. फक्त कार्बोदकांचा प्रकार बदलायचा आहे. तारेवरची कसरतच आहे ही. शिवाय हा आहार
त्या पेशंटच्या खाद्य संस्कृतीशी सुसंगत हवा. उगाच ब्रोकोली खा पण पास्ता खाल्लात
तर पस्तावाल, असला सल्ला निरुपयोगी आहे.
थेट
साखर खाणे आणि गोडाचे पदार्थ टाळायचे आहेत. केक, जेली, जॅम, मिठाई, कोला वगैरे अगदी बंद. दोन तीन वेळा भरपेट खाण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने
थोडे थोडे खायचे आहे. साखरेऐवजी अन्नात वापरायला
स्वीटनर्स मिळतात. ते चवीपुरते(च) वापरावेत. मांस (मटणापेक्षा चिकन बरे), मासे,
अंडी, दाणे, दुधाचे (बिन सायीचे) पदार्थ जरूर घ्यावेत. यावर बंधन नाही. फळ अगदी
एखादेच खावे. अर्धेच खाल्यास पूर्ण मार्क
मिळतील. गोड नसलेल्या फळभाज्या, कंदमुळे
(पालक, गाजर, मटार, टोमॅटो, कांदे, मश्रूम) ह्यावर बंधन नाही.
शिवाय
दोन वेळा भरपेट जेवण्यापेक्षा, दर थोड्यावेळाने काही खाणे आवश्यक आहे. तसंही
गरोदरपणात थोड्या थोड्या वेळाने भूक लागतेच. शिवाय सर्व प्रकारचे उपास पूर्णतः
टाळावेत. दिवस दिवस उपाशी रहाण्याचे रमजानसारखे उपास डायबेटीसला मानवत नाहीत. उपासाच्या पदार्थात
भरपूर पिष्टमय पदार्थ असतात तेंव्हा ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’, हाही प्रकार टाळावा. (चला, आता तुम्ही फक्त
मुसलमानांच्याच धर्मश्रद्धांबद्दल लिहिता, असा आरोप टळला!) खरोखरच उपाशी रहाण्याचे
उपास तर अजिबातच करू नयेत. वटपोर्णिमा, सोळा सोमवार, मंगळागौर, ग्रहण पाळणे असले
पॉवरफुल उपाससुद्धा करू नयेत. कोणत्याही गर्भारशीने पाच तासाच्या वर उपास काढणे
गैरच आहे. मधू-मित्रा बाईंनी तर असली कर्मकांडे अजिबात टाळावीत.
आहाराबरोबर
व्यायामही महत्वाचा आहे. व्यायामाने इन्शुलीनचे कार्य सुविहीत होते. रोजचे घरकाम हे व्यायाम म्हणून सहसा पुरेसे नसते. पण बऱ्याच सुखवस्तू
बायकांची तशी ठाम श्रद्धा असते. ‘घरकाम म्हणजेच व्यायाम’ असं समीकरण सिद्ध व्हायचं
तर मग चार घरची धुण्याभांड्याची कामे
धरावी लागतील. त्यापेक्षा चालणे, पोहणे, एरोबिकस्
हे बेस्ट आहे. किती जोरात श्रमायचं याचंही साधं गणित आहे. व्यायाम करताना न
अडखळता बोलता यायला हवं. जर धाप लागल्याने
बोलणे होत नसेल, तर तुम्ही नको इतक्या जोरात व्यायाम करताय असा अर्थ होतो. डायबेटीस बरोबर ब्लडप्रेशर
वाढले असेल किंवा आणखी काही गुंतागुंत असेल तर व्यायाम न करणे योग्य.
येणेप्रमाणे
आहार,
व्यायाम वगैरे चालू ठेऊन
सुमारे आठवड्याभराने किती फरक पडला हे तपासले जाते. यासाठी दर थोड्यावेळाने (जेवणापूर्वी,
नंतर वगैरे) रक्त शर्करा मोजली जाते. आहारावर भागलं नाही तर इन्शुलीन इंजेक्शनला पर्याय नाही. (काही औषधे आहेत पण त्यांचा वापर
अजून सर्वमान्य नाही) इन्शुलीनच्या गोळ्या मिळत नाहीत. ते टोचूनच घ्यावे लागते.
इन्शुलीन
हे फक्त डाएट मोडणाऱ्या पापी
स्त्रियांच्या पदरी येतं असं काही नाही. सगळं काही यथासांग आणि मनोभावे करणाऱ्या
बायकांच्या नशिबीही हे येऊ शकतं. त्यामुळे इन्शुलीन सुरू केलं म्हणजे काही तरी
भयंकर घडलं अशी भावना बाळगून स्वतःला दोष देत बसू नये. काहींमध्ये साखर नियंत्रणात रहात नसेल, व्यायाम अशक्य असेल
तर इन्शुलीन हा उत्तम पर्याय आहे. ह्याने बाळाला काही
इजा होत नाही. बाळाला इन्शुलीनची सवय वगैरे लागत नाही. इन्शुलीनचा निर्णय तुमचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासून घेतला
जातो, म्हणूनच नियमित तपासणी आणि नोंद ठेवण्याला महत्व आहे. इन्शुलीन हे तात्पुरते
घ्यावे लागते. प्रसूती होताच मधुमेह आणि इन्शुलीनची गरज संपते.
जसं
जसं वजन वाढत जातं तसा तसा इन्शुलीनचा डोसही
वाढूही शकतो. यात आश्चर्यही नाही आणि कमीपणा तर नाहीच नाही. इन्शुलीनचा डोस वाढत जाणे हे आजार
बळावल्याचे अवलक्षण नसून बाळ बळावल्याचे सुलक्षण आहे. मग कधी एक, तर कधी दोन, तर कधी
तीन वेळा इन्शुलीन सुरू करावं लागतं. हेतु हा की ग्लुकोज पातळी समतल रहावी.
बाळाला
आवर्जून स्तनपान द्यावे. दूध तयार करायला बऱ्याच कॅलरी लागतात. यामुळे साखर
नियंत्रित रहाते, वजन घटते आणि डायबेटीस लवकर आटोपतो.
प्रसूतीनंतर
सहा आठवड्याने पुन्हा एकदा डायबेटीससाठी तपासून पहाणे गरजेचे आहे. आधी
म्हटल्याप्रमाणे हा पाहुणा गेला आहे का याची खात्री करायला हवी. पाहुणा परतला आहे
असा रिपोर्ट आला तर छानच. मात्र परतलेला हा गनीम पुन्हा हल्ला करू शकतो. तेंव्हा
दर तीन वर्षानी तपासणी करत रहावे. आणि पाहुणा मुक्कामीच आहे असा रिपोर्ट आला तर
आता रीतसर डायबेटीसची औषधे वगैरे सुरू करायला हवीत.
पुढच्या
प्रेग्नंसीत पुन्हा डायबेटीस होऊ शकतो किंवा दोन प्रेग्नंसींच्या दरम्यान नकळत
सुरू झालेला असू शकतो. तेंव्हा दिवस राहण्याआधी
शुगर तपासून पहावी. जास्त असेल तर
शुगर कंट्रोल करून मगच दिवस राहू द्यावेत. कारण सुरवातीला, अवयव-जननकाळात, साखरेत घोळवलेलं बाळ सव्यंग निपजू शकतं. दिवस राहण्यापूर्वीची शुगर नॉर्मल असेल तर दिवस
राहिल्यावर लवकरच पुन्हा तपासणी करावी.
भारतात
डायबेटीस बराच वाढला आहे. बाळ सुदृढ आणि मधुरिमा बाळंतीण सुखरूप रहायची असेल तर नेमकी तपासणी आणि नियमित उपचाराला पर्याय नाही.
[1]
महाराष्ट्रात काही ठिकाणी आषाढ महिन्यात सासऱ्याने नव्या सुनेकडे
मुळीच पहायचे नसते. मग हे सासरे आपल्या कोण्या पाहुण्याकडे महिनाभर मुक्काम
ठोकतात. यांना आखाड सासरा म्हणतात.
Monday, 12 July 2021
कच्ची बच्ची
कच्ची
बच्ची
डॉ.
शंतनु अभ्यंकर
अकाली
मृत्यू इतकाच अकाली जन्म देखील अपार दु:ख आणि अनिश्चितता घेऊन येतो. या अशक्त चिमण्या
बाळांचे सगळेच अवयव कच्चे असतात. बाळ कमी दिवसांचं असलं, की पुढे बरेच दिवस
त्याचं काय काय करावं लागतं. त्याला
ताबडतोबीनी जसा काही ना काही धोका असतो, तसा तो पुढील आयुष्यातही असतो. जवळपास १०
ते १५ % बाळं कमी दिवसाची निपजतात. कमी
दिवसाची म्हणजे सदतीस आठवड्याच्या आतली.
डिलीव्हरीची
तारीख दिलेली असते ती, शेवटच्या पाळीपासून चाळीस आठवडे मोजून. सदतीस आठवड्याला बहुतेक बाळांची,
बहुतेक वाढ पूर्ण होते. फुफ्फुसे पिकायला तर सदतीस आठवडे पूर्ण होणे अत्यंत गरजेचे.
त्यामुळे सदतीसच्या आतली ती सगळी, अकाली जन्मलेली, प्री-मॅच्युअर, ‘कच्ची बच्ची’, अशी
व्याख्या आहे.
इतकी सारी
प्रगती आणि इतके सारे संशोधन होऊनही प्रसुती कळांची सुरवात कशी होते?; आणि ती पूर्ण
दिवस भरल्यावरच का होते?; ही कोडी सुटलेली नाहीत. कळारंभ आरंभ अजून निर्गुणच
आहे. अकाल प्रसूती घडण्याची शक्यता वर्तवणारी काही कारणे ज्ञात आहेत. बस्स, इतकंच.
अकाल
प्रसूती होणार असल्याची लक्षणंही गोलमाल आहेत. गोलमाल अशासाठी की ही सगळी लक्षणं गरोदरपणात बहुतेक सर्व स्त्रियांमधे
कमी अधिक प्रमाणात उद्भवतच असतात. अंगावरून
चिकट/पांढरा/लाल स्त्राव जाणे, खाली जड जड वाटणे, सतत पाठ/कंबर दुखणे, पोटात
कळा येणे किंवा पोट न दुखता नुसतेच कडक लागणे, अशी सगळी भयसूचक लक्षणे आहेत. पण निव्वळ लक्षणांवरून अंदाज करणं हे खूप-खूप अवघड असतं.
म्हणूनच मग इतर
कुठल्यातरी उपयुक्त तपासणीचा शोध काही दशके,
खरं तर काही शतके चालू आहे. पण अजून तरी काही
विशेष हाती आलेलं नाही. सोनोग्राफी
करून गर्भपिशवीचे तोंड आखूड झालंय का हे तपासता येतं. काही अंदाज बांधता येतो. पण आज मूग गिळून मिटलेलं तोंड, हे पुढे काही दिवसांनी
आ वासेल का?, हा प्रश्न अजूनही आ वासून उभा आहे.
अकाल प्रसूतीसाठी जोखमीचे घटक तेवढे आपल्याला माहित आहेत. पूर्वी जर कमी दिवसाची प्रसूती झाली असेल तर अधिक
सावध असायला हवं. कारण आधीची अकाल प्रसूती,
ही आताही तसेच होऊ शकेल, याची निदर्शक आहे. जुळी, तिळी वगैरे असतील तर गर्भपिशवीच्या तोंडावर इतका ताण येतो
की पूर्ण दिवस भरण्याची शक्यता दुरावते. काही महिलांमध्ये गर्भपिशवीला मध्ये पडदा असतो
किंवा गर्भपिशवी तयार होताना दोन भागात तयार झालेली असते. असे काही जन्मजात रचना-दोष असतील तरीदेखील दिवस पूर्ण
जाण्याऐवजी कमी दिवसाची प्रसुती होते. एखादी
स्त्री अतिशय काटकुळी असेल किंवा खूप जाडगुली असेल; तिचा स्वतःचा जन्म कमी दिवसाचा असेल किंवा रक्ताच्या नात्यातील
स्त्रियांना कमी दिवसाची प्रसूती झाली असेल; तर हे देखील सगळे धोक्याचे इशारे आहेत. पाठोपाठ बाळंतपणेही वाईट. सरकारने जागोजागी पाट्या
लावल्याप्रमाणे, ‘दुसरे मूल केव्हा? पहिले शाळेत जाईल तेव्हा!’ हेच खरं. आई मधील काही आजारसुद्धा कमी दिवसाची प्रसूती सोबतीला
घेऊन येतात. डायबेटीस, बाळंतवात (Pregnancy Induced
Hypertension), वारंवार होणारे
गुप्तरोग, लघवीचे इन्फेक्शन वगैरेंमुळे कमी दिवसाच्या प्रसूतीची शक्यता वाढते.
गरोदरपणामध्ये यकृतामध्ये कधीकधी पित्त साठून राहते (Intrahepatic Cholestasis
Of Pregnancy), कधीकधी रक्ताच्या गुठळ्या बनतात, अशा स्त्रियांना किंवा
बाळाचं वजन पुरेसे वाढत नसणाऱ्या स्त्रिया, मधूनच अंगावरून थोडा थोडा रक्तस्राव होणाऱ्या
स्त्रियांना देखील ही जोखिम आहे. काही महिलांमध्ये दिवसभरण्यापूर्वीच पाणमोट
फुटते. अशा परिस्थितीमध्ये देखील कमी दिवसाची
प्रसूती जवळपास अटळ आहे. बाळामध्ये काही व्यंग असेल तर बरेचदा कमी दिवसाची प्रसूती होते. ताण, तणाव, प्रदूषण हे नेहमीचे व्हिलन आहेतच. नवोढा आणि प्रौढा (अठराच्या आत आणि पस्तिशीच्या पुढे) अशा टोकाच्या वयातील स्त्रियांमध्ये कमी दिवसाच्या
प्रसूतीची शक्यता वाढते. गरीब, वंचित, कोणत्याही वैद्यकीय सेवेपर्यंत न पोचलेल्या स्त्रियाही
जोखमीच्या गटात येतात. याशिवाय घरात होणारी
मारहाण आणि भावनिक कुचंबणा हे ही घटक लक्षात घ्यायला हवेत.
वरीलपैकी काही घटक टाळता येण्यासारखे आहेत, काही नाहीत. तेव्हा कमी दिवसाची प्रसूती टाळण्यासाठी काय करावं
वा करू नये, याची ही छोटीशी जंत्री.
१.
दिवस राहण्यापूर्वी आपलं
वजन प्रमाणात आहे ना हे पाहावे.
२.
तंबाखू, मिश्री, दारू
आणि अंमली पदार्थ यापासून चारच काय चांगलं आठ हात लांब रहावे आणि नवऱ्यालाही तसंच करायला भाग
पाडावे. नवऱ्यानी ओढलेल्या बीडी-सिगरेटचा धूर खाल्याने देखील आई-गर्भाला इजा होत असते.
आईच्या दारूचा तर गर्भावर थेट परिणाम होतो. नवऱ्याच्या
दारूचा जरी बाळावर थेट परिणाम होत नसला तरी अप्रत्यक्ष परिणाम बाळाला भोगावेच
लागतात. व्यसनांनी जर्जर झालेल्या बापापेक्षा
सुदृढ बाप असेल तर बाळाचं शैशव सुखात जाईल, नाही का?
३.
ब्लडप्रेशर, डायबिटीस,
थायरॉईडचे विकार असे आजार असतील तर त्यावर मनोभावे उपचार घ्या आणि ते डॉक्टरी सल्ल्यानुसार
चालू ठेवा. ‘डॉक्टरांनी औषधांची आवश्यकता आहे
असं सांगितलंय, पण मी लई भारी! मी माझ्या
निश्चयाच्या बळावर, माझ्या मनोनिग्रहाने,
माझ्या मनःशक्तीने; निव्वळ डाएट करून, निव्वळ व्यायाम करून, निव्वळ योगासनांनी; ब्लडप्रेशर आणि/किंवा डायबिटीस आणि/किंवा थायरॉईड वगैरे आटोक्यात आणून
दाखवतेच. गोली को गोली मारो!!’ असली भीष्मप्रतिज्ञा करू नका.
४.
डॉक्टरांशी बोलून आवश्यक
त्या लसी आधीच घेऊन टाका. रूबेला, स्वाईन फ्लू,
बी प्रकारची कावीळ, अशा लसी दिवस राहण्यापूर्वी घेतलेल्या चांगल्या.
इतकं सगळं करूनही जर कमी दिवसाच्या
कळा यायला लागल्या तर अनेक औषधे वापरली जातात आणि होणारी प्रसूती किंवा किमान त्यापासून होणारे
धोके टाळण्याचा
किंवा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. बरेचदा
कमी दिवसाची प्रसुती तऱ्हेतऱ्हेच्या इन्फेक्शनमुळे
होत असल्याने अँटिबायोटिक्स वापरली जातात. पाणमोट जर फुटली असेल तर ज्या क्षणापासून
पाणी बाहेर पडायला लागते तेव्हापासून बाहेरचे जंतूदेखील आत शिरकाव करायला लागतात. त्यामुळे इथेही अँटिबायोटिक्सचा उपयोग होतो. गर्भपिशवीच्या कळा कमी करतील अथवा थांबवतील अशी औषधेसुद्धा
उपलब्ध आहेत. यामुळे कळा पूर्णपणे थांबून अकाली
प्रसूती पूर्णतः जरी टळत नसली, तरी आजचा जन्म उद्यावर ढकलण्याचा फायदा होतोच होतो.
असे केल्याने बाळाची वाढ होण्यासाठी जी इंजेक्शने
दिली जातात (Steroids), त्यांचा प्रभाव सुरू व्हायला वेळ मिळतो. मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स, प्रोजेस्टेरॉन अशा प्रकारची औषधं कळा थांबवण्यासाठी वापरली जातात. पूर्वी
चक्क दारूची इंजेक्शने सुद्धा दिली जायची!
पण कसं कुणास ठाऊक, यांचा पेशंटवर इफेक्ट यथातथाच व्हायचा पण आरोग्य कर्मचाऱ्यांवर मात्र इफेक्ट तात्काळ दिसून यायचे!! आता बंदच आहे तो
प्रकार.
ऑक्सिटोसिन हे कळा आणणारे संप्रेरक.
थेट या विरुद्ध काम करणारे औषध
(अॅटोसीबॅन) आता दाखल झाले आहे. पण त्याचीही कामगिरी फारशी चमकदार नाही. पिशवीला टाका घालणे हा
एक डॉक्टरप्रिय उपचार आहे. पुन्हा एकदा शास्त्रीय
निकषानुसार या उपचारालाही काही मर्यादा आहेत.
संपूर्ण विश्रांती हा लोकप्रिय उपाय आहे. पण दुःखद बातमी अशी की, याचाही फारसा परिणाम होत नाही, असं अभ्यास सांगतात.
थोडक्यात अकाल प्रसुतीचे भाकीत वर्तवणे, सध्यातरी शक्य नाही आणि अशी प्रसूती
होणारच नाही, अशा गोळ्या, औषधे, लसी, इंजेक्शने, ऑपरेशनेही उपलब्ध नाहीत. कमी दिवसाची होऊ नये या नावाखाली जे जे केलं
जातं, ते ते मदत आणि सदिच्छा-स्वरूप असतं
म्हणा ना.
अर्थात अकाल
प्रसव टाळता येत नसेल पण त्यापासून बाळाला उद्भवणारा त्रास मात्र बराचसा टाळता येतो.
अत्यंत कमी दिवसाच्या आणि कमी वजनाच्या बाळांची
काळजी घेण्याचे तंत्र (Technology) आणि मंत्र (Protocols) आता विलक्षण प्रगत झालेले आहेत.
बाळाला मुख्य त्रास होतो तो म्हणजे नीट श्वास घेता येत नाही. बाळ पोटात असतं, त्या वेळेला पाण्यात तरंगत असताना
त्याच्या फुफ्फुसांना काही काम नसतं. त्याला
लागणारा ऑक्सिजन आईच्या रक्तातून नाळेद्वारे त्याच्यापर्यंत पोचवला जात असतो. एकदा या जलसमाधीतून बाहेर पडल्यानंतर फुफ्फुसाला
काम करावंच लागतं. आत हवा घेणे, ऑक्सीजन घेणे
आणि कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकणे हे तत्क्षणी सुरू व्हावं लागतं. पहिल्या श्वासाबरोबर हवेने फुलतात फुफ्फुसे.
म्हणजे अनरशाच्या पीठाचा गोळा
चांगला घट्ट असतो. पण अनरशाला छान जाळी पडते.
फुलून येतो अनरसा. तशी फुफ्फुसे फुलून येतात. पण अनरसा
फुलला की तसाच रहातो. पुन्हा त्याचा पिठाचा गोळा बनत नाही. पण अकाली जन्मलेल्या बाळांत, उच्छवासाबरोबर
फुफ्फुसाचा पुन्हा गोळा होऊ शकतो. तसा तो
होऊ नये म्हणून काही विशिष्ट रसायनं तिथे असावी
लागतात. यांना म्हणतात सरफॅक्टंट. कमी दिवसाच्या बाळांमध्ये
ही सरफॅक्टंट नसतात किंवा पुरेशी नसतात. त्यामुळे
बाळाला श्वास घ्यायला अडचणी येतात. सरफॅक्टंट
तातडीने तयार व्हावे, म्हणून कमी दिवसाच्या प्रसूतीची शक्यता दिसताच, आईला काही इंजेक्शने
(Steroids) दिली जातात. यामुळे नऊ महिने भरल्यावर तयार होणारे सरफॅक्टंट,
दोन चार दिवसात तयार होते. आता झाली जरी कमी दिवसाची प्रसूती, तरी बाळाला सहज श्वास
घेता येतो. इतकंच काय अशा उपचारांमुळे मेंदूतील पोकळीत होणारा रक्तस्राव आणि आतडयाच्या अंतःत्वचेचा शोथ आणि
झड, अशा इतर दोन, जीवघेण्या आजारांपासून,
बाळाचे रक्षण होते. बाळाच्या मेंदूतील पोकळीत होणारा रक्तस्राव होऊ नये म्हणून मॅग्नेशियम सल्फेटही
उपयुक्त ठरतं. हेच ते, जे कळा थांबवण्यासाठी वापरलं जातं ते.
बाळाचे अवयव भरभर पिकावेत म्हणून असे बहुविध उपचार आता केले जातात.
कमी दिवसाची बरीच बच्ची आता कच्ची रहात
नाहीत. चांगली धडधाकट होतात, दंगा करतात. हे पिल्लू कमी दिवसाचं होतं बरंका, असं
सांगूनही खरं वाटणार नाही इतकी मस्ती करतात.
प्रथम प्रकाशन
लोकमत
सखी पुरवणी
१३/७/२०२१