Monday, 27 January 2020

माय मराठी का my मराठी


आयुष्यावर बोलू काही

माय मराठी का my मराठी


हां तर मी काय सांगत होतो... आपलं जिणं, रहाणं, खाणं सगळं सगळं बदललं आहे.
एका इंग्लिश मिडीयम स्कूलच्या, अॅन्युअल डे फंक्शनला, मी परवा चीफ गेस्ट होतो! खर तर चीप गेस्ट होतो. माझ्या इतका सस्त्यातला गेस्ट दुसरा मिळणे दुरापास्त होते. स्वतःच्या खर्चाने शाळेत जाऊन, स्नेहसंमेलन सहन करून, वर देणगी देणारा असा विरळाच. शिवाय चिल्यापिल्यांची दंगामस्ती पहात आणि ऐकत मी भाषणही ठोकले. ते तब्बल साडेतीन मिनटांच्यावर मलाही सोसवेना आणि चिमुकल्या श्रोत्यांनाही. पण त्या दोन तीन तासात  मी तिथे जी भाषा ऐकली, ती थक्क करणारी होती.
घरीदारी मराठी बोलणाऱ्या, घरीदारी मराठी चालणाऱ्या, घरीदारी मराठी वागणाऱ्या त्या चिमुरड्यांचे शिक्षण मात्र इंग्रजीतून चाल होते. भाषा इंग्रजी आणि संस्कृती मराठी अशी रस्सीखेच चालली होती. चांगलीच कुतरओढ होत होती सगळ्यांची. पहाणाऱ्याला मौजेची वाटत असली तरी प्रकार अंतर्मुख करणारा होता.
गॅदरिंग संपताच सगळी किलबिल सरली होती.  प्रिन्सिपॉल बाईंच्या केबिनमध्ये ‘च्यामारी’च्या साथीनं (चहा आणि मारी बिस्किट) चर्चा रंगली होती. संतवचनांनी, संतमहंतांच्या तसबीरींनी आणि पुतळ्यांनी बाईंभोवती प्रभावळ धरली होती. मधूनच शाळेत आया म्हणून काम करणाऱ्या सुलामावशी कुठे आहे असा प्रश्न विचारायची वेळ त्या माउलीवर ओढवली. शाळेत इंग्लिश आणि फक्त इंग्लिशमधेच बोलायचे असा फतवा होता. मग काय थेट सवाल आला, ‘व्हेअर आर सुलामावशी?’ आदरार्थी बहुवचनाने आता लुगड्यातून झग्यात प्रवेश केला होता.  आणि तत्पर  उत्तरही आले, ‘सुलामावशी आर डाऊन!’
सगळे शिक्षणतज्ञ वगैरे वगैरे सांगतात, की मातृभाषेतून शिक्षण हेच योग्य. पण माझ्यासकट अख्ख्या होल महाराष्ट्रात हे फारसं कुणीच मनावर घेतलेलं दिसत नाही. मुलांना लहानात लहान वयात इंग्लिश मिडीयममधे घालायची अगदी चढाओढ सुरु आहे.
पोरही जरा येस-फेस करू लागली की मऱ्हाठी संस्कृतीला आणि घरच्या मऱ्हाठी भाषकांना फालतू समजू लागतात; आणि अशा पोरांचं कौतुकही  वाटतं मायबापाला.  प्रश्न हा आहे. उत्तम इंग्लिश येण आज जीवनावश्यक आहे. पण म्हणून उत्तम मराठी येणं आणि बोलणं  हे कमअस्सल कसं?
मला तर लो. टिळक, शिवाजी महाराज वगैरे मंडळी इतर भाषेत बोलायला लागली की अस्वस्थ वाटतं. टिळक कुठल्याशा मालीकेत हिंदीत बोलत होते.  स्वराज्य हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असून तो ते मिळवणारच  असल्याचं, त्यांनी हिंदीत सांगितल्यामुळे मला बराच वेळ ते पटेचना. ‘अर्रे!, ये अपना आदमी हिंदीमे कैसे बोल्नेकू लग्या?’, असा प्रश्न मला पडला होता. देवबीव मंडळीसुद्धा माझ्या लहानपणी उत्तम  मराठी बोलत पण मी इंग्लिश मिडीयममधे गेल्यावर तीही इंग्लिशमधे बोलायला लागली! Curse, Penance, Wishes हे शब्द अमर चित्र कथांतून माझ्या शब्दसंपदेत जमा झाले.
फार काही बिघडलं असं माझं म्हणणं नाही. संस्कृती आणि भाषा ह्या  प्रवाही असतात. ‘पसायदान कोणत्या भाषेत आहे?’, असं विचारल्यावर, ‘संस्कृत!’ असं उत्तर देणारी मुले आहेत. त्यांचं काही चूक नाही. त्यांच्या कानावर पडलेल्या मराठीचा आणि पसायदानातल्या मराठीचा संबंध नाही एवढाच याचा अर्थ. पण पसायदान परके वाटायला ४०० वर्ष जावी लागली. पुलं परके व्हायला अजून ४०च पुरतील आणि कदाचित वीसच वर्षानंतर, ह्या सदरातील लिखाण मराठीत होतं बरं, असं सांगावं लागेल.
संस्कृतीचा आणि भाषेचा हा बदलांचा झपाटा छाती दडपून टाकणारा  आहे, एवढंच.
सकाळ सातारा २६/१/२०२०



No comments:

Post a Comment