आयुष्यावर बोलू काही...
डॉ शंतनु अभ्यंकर वाई
सातारा सकाळ मधील माझे नवे साप्ताहिक सदर
देवादिकांना मानवी रूप दिले की किती लोभस दिसतात ते. परवाच यक्षगानाचा कार्यक्रम होता. उत्सुकता म्हणून गेलो. यक्षगान म्हणजे कानडी रामलीलाच होती जणू. काय मस्त प्रकार होता तो. भाषेचा अडसर मुळी जाणवलाच नाही. बरेचसे शब्द संस्कृतोद्भव आणि कथा ओळखीची.
सीताहरणाची कथा. अगदी अथ:पासून इति:पर्यंत माहिती असलेली. पण तरीदेखील अशा पद्धतीने सादर झाली की काळजाचा ठाव घेतला त्या कलाकृतीनी. त्यातला लक्षात राहिला तो रावण!
नांदी आणि गणवंदना झाल्यानंतर वाद्यांच्या गजरात आला की रावण! काय त्याची चाल; दाणदाण पावले टाकत, मोठ्या आवाजात गर्जना करत, हात असे दोन्हीकडे कमरेवर ठेवलेले, ह्या एवढाल्या मिशा, मोठे मोठे डोळे गरागरा फिरवत तो आला आणि किंचाळायला लागला. म्हणाला ‘शूर्पणखेला घेऊन या, ती का आक्रंदन करते आहे, ते मला पाहायचे आहे.’ आपल्या बहिणीबद्दलची तळमळ अचानक त्याच्या चेहऱ्यावर उमटली. अभिनय खरंच देखणा होता या रावणाचा. शूर्पणखेची अवस्था पाहून विव्हल झालेला रावण. मायावी मारीचाला आपल्या कटात सामील करून घेतानाचा कारस्थानी रावण. साळसूदपणे सीताकुटीशी भीक्षा मागतानाचा यतिवेषधारी साधू रावण आणि जटायुशी त्वेषानी लढतानाचा लढवैय्या रावण. असे सारे नवरस भाव ह्या दशाननाने आपल्या एकाच चेहऱ्यावर झरझर उमटवले आणि उतरवले. ते पाहून थक्क व्हायला झालं.
रामायणाच्या कुठल्याही खेळात एकूणच रावण जास्त भाव खाऊन जातो. रावण बिच्चारा माणूस आहे. त्याला क्षोभ आहे, लोभ आहे, माया आहे, असूया आहे. त्याच्या मनात कपट आहे, पाप आहे, प्रेम आहे; आशा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा आहे. असा सर्वगुणदोषसंपन्न आहे रावण.
त्यामानाने रामाचा रोल अगदीच सपक. तो सर्वगुणसंपन्न. देवाचाच अवतार तो त्यामुळे सदा समशीतोष्ण. मर्त्यलोकांत रावण आपल्या आसपास दिसायची सोय आहे पण राम? अं हं! रामायणाच्या प्रयोगात रामाला विशेष कामच नाही. मोठ्यांच्या उठसूट पाया पडायचं आणि आशीर्वाद घ्यायचे, लहानांना पाया पडले रे पडले की आशीर्वाद द्यायचे, एकदा इकडे बघून किंचित हसायचं, एकदा तिकडे बघून यत्किंचित हसायचं आणि इकडे, रावणाचे हसणे सुद्धा दहा मजली. त्यामुळेच रामायणाच्या खेळात एकदा रावण मेला की खेळातला राम जातो.
पण ह्या खेळातला राम सुद्धा लक्षात राहिला बरं. त्याच्या एका वाक्याने तर हशा आणि टाळ्या दोन्ही वसूल केल्या.
झालं असं की ठरल्याप्रमाणे सुवर्णमृग सीतेला दिसले. त्याने तिला भुलवले. आता सीतामाईचं स्वगत चालू झालं. हे सुवर्णमृग आपल्याला हवंच आहे आणि ह्याची कंचुकी आपल्याला कशी शोभून दिसेल असं तीनं बोलून दाखवलं. प्रभू रामचंद्र घरी येताच त्यांना कांचनमृगासाठी कशी कशी गळ घालायची, कसं त्याना ताबडतोब मृगयेला पाठवायचं हे ती मनाशी ठरवते आहे. इतक्यात राम येतो. पतीदेव घरी आले म्हटल्यानंतर सीता त्याच्या पाया पडते. एकदा राम आशीर्वाद देतो. सीता दुसऱ्यांदा पाया पडते. राम पुन्हा आशीर्वाद देतो. सीता पुन्हा पाया पडते! तिसऱ्यांदा पाया पडताच राम आशीर्वाद द्यावा की नाही या विवंचनेत पडतो. प्रेक्षकांना म्हणतो, ‘पतीदेव घरी आल्यानंतर पत्नीने एकदा नमस्कार करणं हे योग्य, दुसऱ्यांदा करणं हे तर पतीचं भाग्य, पण तिसऱ्यांदा नमस्कार करणं म्हणजे काहीतरी घोटाळा आहे खास!!!’ वनवासी रामाची ही टिपण्णी गृहस्थाश्रमी प्रेक्षकांची दाद घेऊन गेली.
No comments:
Post a Comment