माझे मराठीचे प्रयोग
डॉ. शंतनू अभ्यंकर
डॉक्टरांची मोठी महत्वाची परिषद असते. नव्या नव्या आणि किचकट विषयांवर
घनगंभीर भाषणे चालू असतात. सभागृहात मंद
उजेड असतो. एसीची घरघर तेवढी ऐकू येत असते. पडद्यावर पहिली पारदर्शीका झळकते,
‘टिप्स अँड ट्रिक्स इन गायनॅकॉलॉजी अँड
ऑब्स्टेट्रिक्स, बाय डॉ. शंतनु अभ्यंकर’. माझी ओळख करून देणारा आता ओळख आटोपती घेतो आणि म्हणतो, ‘मे आय नव इन्व्हाईट डॉ. शंतनु
अभ्यंकर फॉर हिज प्रेझेंटेशन’.
या वाक्यासरशी चार पायर्या चढून मी चपळाईने माईक गाठतो, समोरच्या
प्रेक्षागृहात एक नजर फिरवून जणू एक नजरबंदीचा खेळ सुरू करतो. मी म्हणतो, ‘स्त्री आरोग्य आणि प्रसूतिशास्त्र संघटनेचे
सन्माननीय अध्यक्ष, सचिव, अन्य पदाधिकारी आणि सभासद हो; मला जे सांगायचं आहे ते सांगण्यासाठी मला इंग्रजी बोलण्याची गरज नाही,
म्हणून माननीय अध्यक्षांच्या परवानगीने मी मराठीतच बोलणार आहे!’ यावर सारे सभागृह
स्तब्ध होते आणि मग जणू काही उंदरामांजराच्या पकडापकडीचा जीवघेणा खेळ सुरु होतो. या खेळाचा थरार मी अनेकदा अनुभवला आहे.
होतं असं, की एखाद्या अस्सल वैद्यकीय
विषयावर मी मराठीत बोलणार आहे हे लक्षात येताच सर्वांचे कान टवकारले जातात. एकही
इंग्रजी शब्द न वापरता अस्खलित मराठी बोलायचं असा चंग मी बांधलेला असतो आणि अनवधानाने
का होईना एखादा तरी इंग्रजी शब्द याच्या भाषणात येईलच या अपेक्षेने, उत्कंठेने, श्रोते जीवाचा कान
देऊन ऐकत असतात. माझं भाषण सर्वात लक्षपूर्वक ऐकले जातं. हा भाषिक पकडापकडीचा खेळ खेळताना ते
उच्चविद्याविभूषित श्रोतेही रंगून जातात. रसाळ भाषणात रोजच्या प्रॅक्टीसमधल्या
अडीअडचणींवर अनेक युक्त्याप्रयुक्त्या सुचवून
मी समारोप करतो. म्हणतो, ‘न धरी
शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, अशा अविर्भावात जरी मी बोललो असलो
तरी माझी भूमिका त्या युगंधराची नाही माझी भूमिका त्या धनुर्धराचीच आहे. तुमच्या अनुभवातून
मीही शिकू इच्छितो. अशा युक्त्या आपल्याही
पोतडीत असतील. माझी पोतडी मी रिती केली
आपणही आपले अनुभव सांगा. धन्यवाद.’
या प्रयोगाची सुरुवात झाली एका गरजेतून. झालं असं की सातारच्या स्त्री आरोग्यतज्ञ संघटनेतर्फे गर्भनिरोधन या विषयावर दिवसभराचं चर्चासत्र आयोजित केलं
जाणार होतं. मी विषय निवडला होता ‘इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन’ (आपातकालीन
गर्भनिरोधन). मी तयारीही केली. परगावच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी थोड्या उशिराने आपला होकार कळवला. पण
चर्चासत्रातील उरलेल्या विषयावर, म्हणजे ‘कौन्सिलिंग इन कॉन्ट्रासेप्शन’वर (कुटुंबकल्याण
आणि समुपदेशन) बोलण्यास त्यांनी साफ नकार
दिला. कारण उघड होतं. बाकी विषय थेट वैद्यकविश्वाशी, वैद्यकीय ज्ञानाशी संबंधित
होते. हा विषय संवाद कौशल्याशी जास्त निगडित होता. डॉक्टरांसमोर बोलण्यासारखं
त्यात विशेष असं काही नव्हतं. हा विषय सगळ्यात शेवटी येणार होता. त्यामुळे बरेचसे
मुद्दे आधीच चघळून झालेले असणार होते. शिवाय ठरल्या वेळेपेक्षा कार्यक्रम लांबतोच आणि भुकेलेल्या मंडळींचे डोळे मिटतात, माना
पडतात आणि सभागृहात घोर शांततेचे आवाज घुमू लागतात. त्यामुळे अखेरचा वक्ता हा
दशसहस्त्रेषू असला काय किंवा शतसहस्त्रेषू
असला काय, त्याची दांडी गुल होण्याची खात्रीच असते. या ज्येष्ठ डॉक्टरांना ही
कोणती जोखीम स्विकारायची नव्हती. त्यांनी सरळ मला फोन केला आणि ‘इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन’बद्दल
ते स्वतः बोलणार असल्याचं सांगून टाकलं.
मी पडलो संयोजक. मला नमतं घेणं भागच होतं. आलिया भोगासी असावे सादर
असं म्हणून मी तयारीला लागलो. वाचता वाचता विचार करता करता असं लक्षात आलं की
समुपदेशन म्हणजे त्या त्या व्यक्तीशी साधकबाधक चर्चा करून, कुटुंब नियोजनाबद्दल,
परिस्थितीनुरूप निर्णय घ्यायला मदत करण्याचं कौशल्य. आता हे बोलायचं, विचारायचं,
सांगायचं हे सगळं मराठीत. अस्खलित इंग्लिश बोलणाऱ्या बायका आमच्या भागात नाहीतच.
मग मराठीत एखाद्या जोडप्याशी काय आणि कसं बोलायचं हे इंग्रजीत समजावून सांगण्यात
काय हंशील? शेवटी मराठीतून कशी माहिती द्यावी याचं ज्ञान आणि जिवंत प्रात्यक्षिक,
मराठी बोलणाऱ्यांसमोर मराठीतच देणं योग्य
नाही का? मनाचा हिय्या करून मी मराठीत बोलायचं ठरवलं आणि मानसिक हुप्पाहूंय्या करून
‘शुद्ध’ मराठीत बोलायचं ठरवलं!
फार वर्षापूर्वी डॉ. जयंत नारळीकर यांनी अस्खलित मराठीत दिलेली
व्याख्याने मी ऐकली होती. अत्यंत ओघवत्या शैलीत ते खगोलशास्त्रातील एका उगवत्या,
घनगंभीर विषयावर, दीड तास बोलले होते. मात्र अतिशय अवघड संकल्पना अतिशय सोप्या
करून सांगत, त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं. त्यांचा आदर्श माझ्यासमोर
होताच. शिवाय एका डॉक्टरी परिषदेत, जीभेच्या शस्त्रक्रियांवरही मराठीतील मांडणी मी
ऐकली होती. त्या व्याख्यानाचा शीर्षक होतं, ‘मूकं करोति वाचालम्’. या साऱ्या
पार्श्वभूमीवर मी प्रयत्न करून बघायचं ठरवलं.
प्रत्यक्षात मामला भलताच
सोपा गेला. समर्थांचं, ‘लेकुरे उदंड झाली’ हे वचन मला उपयोगी ठरले. पेशंटच्या शंकाकुशंका
त्यांच्याच शब्दात मांडल्यामुळे भाषा आणखी जिवंत झाली. एकूणच कुटुंबकल्याण विषयक
विनोद, उधृते, काव्यपंक्ती, किस्से आणि शाब्दिक कसरती करत करत मी पाऊण तास तुफानी
फटकेबाजी केली. शेवटी मी म्हणालो, ‘पुनरुत्पादनाच्या प्रत्येक पायरीचा आपल्या
समाजाने उत्सव केला आहे. पाळी येणं, लग्न
ठरणं, ते होणं, पहिली रात्र, डोहाळजेवण, बाळाच्या आगमनाचे पेढे-बर्फी आणि बारशाचा
ध्वनिक्षेपकाची भिंत उभारून गाव दणाणून सोडणारा सत्यनारायण या सगळ्याचा समारंभ
आहे. पण पुनरुत्पादनाची क्षमता संपवणे, म्हणजे नसबंदी होणे, याचा काही समारंभ अजून तरी
निघालेला नाही. त्यामुळे, ‘गेल्या
गुरुवारी जाऊबाईंची नसबंदी झाली, आज तीर्थप्रसादाला या, अशी नसबंदी-नारायणाची
बोलावणी येतील तो सुदिन!!’ यावर
हास्यकल्लोळ आणि टाळ्यांचा कडकडाट यातलं काय अधिक गगनभेदी होतं हे सांगणं अवघड आहे.
खुर्चीत बसता बसता माझ्या लक्षात आलं की हे सर्व मी मराठीत बोललो
म्हणूनच शक्य झालं. विषयात नावीन्य नव्हतं पण भाषेमुळे मांडणीत जणू नवचैतन्य आलं.
दिलेल्या विषयाला आणि श्रोतृवृंदाला मराठी भाषाच चपखल होती. एक चूष म्हणून केलेल्या या प्रयोगाची मग मला चटकच लागली.
पण दर वेळचा अनुभवही चटकदार होता.
भाषण संपल्या संपल्या पहिलं
कौतुक होतं शुद्ध मराठीत बोललो याचं. एका बाजूला जो आपल्यासारखाच मिश्र/धेडगुजरी
भाषेत बोलतो तो इतकं अचूक आणि न अडखळता मराठीत, शास्त्रीय परिभाषेत बोलू शकतो आणि
ते श्रोत्यांना सहजपणे समजतं हे पाहून
मंडळी थक्क होतात. मला म्हणतात बर्याच
दिवसांनी इतकं सुंदर मराठी ऐकलं. काहींच्या बोलण्यातून याला बहुधा इंग्रजी धड येत
नसावं अशीही शंका डोकावते. काही सभांमध्ये
मग मी एक विषय मराठीत आणि दुसरा इंग्रजीत
सुनावतो आणि शेवटी म्हणतो, ‘This is just to demonstrate that I
spoke in Marathi by choice rather than out of compulsion.’ (सुरुवातीची मांडणी मी हेतुतः मराठीत केली, नाईलाजास्तव नाही.)
कुठल्याही नवीन विषयावर मराठीत बोलायचं म्हटलं की माझी तयारी सुरू
होते. माझ्या भाषणासोबत पडद्यावर झळकणाऱ्या पारदर्शिका मी इंग्रजीतच ठेवतो. योग्य
ते मुद्दे वैद्यकीय परिभाषेत तिथे
श्रोत्यांना वाचता येतात. त्यामुळे न रुळलेल्या
मराठी शब्दांमुळे होणारे घोटाळे टळतात. एखादा शब्द श्रोत्यांच्या चटकन लक्षात येणार
नाही असं वाटलं तर प्रकाश-शलाकेच्या सहाय्याने मी पडद्यावरचा शब्द दाखवून देतो. एखादा वेगळाच शब्द आला तर तो श्रोत्यांच्या पचनी
पडेपर्यंत चक्क थांबतो. उदा: रुग्णाला ‘अधोशिर
स्थिती’त झोपवावे (Head low position), हे समजायला जरा वेळ लागतो. थोडं थांबलं की काही
क्षणातच मंडळींच्या डोक्यात प्रकाश पडतो. प्रकाशाची प्रभा अन्य मंडळींपर्यंत फाकत जाते. शब्द लक्षात आल्याचा एक सामुदायिक हुंकार उमटतो.
उशिरा अर्थ समजल्यामुळे झालेल्या
एकमेकांच्या फजितीबद्दलची एक सामुदायिक खसखस पिकते आणि हे संकेत मिळाले की मी पुढे
सरकतो.
मराठी प्रतिशब्द शोधायला शब्दकोश, विश्वकोश यांची तर मदत घेतोच पण
कधीकधी अनपेक्षितरित्या शब्द भेटीला येतात.
नवजात अर्भकाची तपासणी करताना ते ‘अॅलर्ट’
आहे का बघा असा मुद्दा होता. अॅलर्ट म्हणजे येथे सावध नाही, जागं नाही तर जागं, सावध, टकामका बघणारं, खेळणारं, उद्दीपनांना प्रतिसाद देणारं, असं सगळं या अॅलर्टमध्ये
सामावलेलं आहे. या शब्दासाठी मी जंग जंग
पछाडले पण व्यर्थ. शेवटी ‘तरतरीत’ हा
पर्याय निवडला. नेमकं त्याच वेळी
दवाखान्यातल्या मावशी सांगत आल्या, ‘डॉक्टर
काल रात्री गॅस लावलेलं बाळ सकाळी एकदम ‘चल्लाख’
दिसतंय!’ नुसतं ‘चलाख’ नाही ‘चल्लाख’. अर्थात मी हा शब्द उच्चारासह स्वीकारला. ‘स्ट्रेस
युरीनरी इनकाँटीनन्स’ हा असाच एक सलणारा शब्दसमूह. पोटातला दाब वाढला (उदा: खोकणे, शिंकणे, वगैरे)
की अशा पेशंटला नकळत थोडी लघवी होते. याचं
भाषांतर शेवटी ‘दाबजन्य मूत्र विसर्जन’ असं
केलं आणि हशा वसूल केला. मूत्रपिंडाकृती तसराळे (Kidney
tray), स्वरयंत्रदर्शक (Laryngoscope), सदंत/अदंत चिमटा (Tooth/Plain forceps), निर्जंतुक झगा (Sterile
gown) निर्मोजे होणे (To deglove), काममंचक (Orgasmic platform) हेही प्रथम ऐकल्यामुळे हास्यस्फोटक ठरलेले शब्द. काही नविन शब्द मीच बनवले उदा: उरोनलिका (स्तेथोस्कॉप).
प्रसारमाध्यमांनी रूढ केलेले अनेक शब्द
उपयुक्त ठरले. (उदा: संकेतस्थळ, महाजाल, वगैरे) काही सरकारी शब्दप्रयोगही अगदी समर्पक
आहेत उदा: जनन-दर (Birth rate), पात्र-जोडपे (Eligible couple) इत्यादी. काही शब्दांना मला अजूनही प्रतिशब्द सापडलेले
नाहीत. उदा: इलेक्ट्रॉनिक. विश्वकोशातही इलेक्ट्रॉनिक असाच शब्द आहे.
या प्रयोगाच्या मर्यादाही आहेत. निरनिराळ्या अधुनिक शस्त्रक्रिया, त्यांच्यातले
बारीक-सारीक टप्पे, यांना स्पर्श करणे अवघड जातं. एकच
उदाहरण द्यायचं झालं तर नुसत्या बिजवाहक नलिकेचे शरीरशास्त्रानुसार पाच भाग
कल्पिले आहेत. त्यांना पाच वेगवेगळी नावं आहेत. हे सारं मराठीत बसवणं आणि भाषणाच्या ओघात
आश्चर्यमुग्ध श्रोत्यांना चटदिशी समजेल अशा मराठीत बोलणं, केवळ अवघड नाही तर
अशक्यच आहे. अशावेळी मग सोबतच्या इंग्रजी
पारदर्शीका मदतीला येतात किंवा पारिभाषिक
इंग्रजी शब्द वापरणे एवढाच पर्याय राहतो.
शब्दशोधाबरोबरच हे भाषण मला संपूर्ण लिहून काढावं लागतं आणि आधी
वारंवार वाचून ठेवावं लागतं. भाषणाची
सुरुवात धक्कातंत्राने होते. म्हणजे शुद्ध
मराठीत भाषण आहे याचाच श्रोत्यांना धक्का
बसतो. कार्यक्रम-पत्रिकेत अन्य भाषणांच्या
यादीत माझ्याही भाषणाचा विषय इंग्रजीतच छापलेला असतो. मी मराठीत बोलणार आहे याची बरेचदा संयोजकांनाही कल्पना नसते. सुरुवातीच्या धक्क्यानंतर भाषणाची कमान चढती ठेवणं महत्त्वाचं असतं. मराठीत बोलल्यामुळे उत्कर्षबिंदू गाठताना मी हमखास
लोकसंस्कृतीचा, स्थानिक संदर्भांचा उपयोग करू शकतो. थोडंफार तमाशाच्या बतावणीसारखंच हे. अमरावतीला गेलो आणि कळलं की रुक्मिणीला कृष्णाने
इथूनच पळवलं होतं म्हणे. ‘इथल्या सुंदर राजकन्यांना परमुलखातल्या पुरुषांबरोबर
हात धरून पळून जायची जुनी खोड आहे; हे
ऐकून मोठ्या आशेने मी इथे आलोय!’ असं म्हणताच छान दाद मिळाली.
‘आदर्श मातृत्वाची समाजमनातील
कल्पना पूर्वी ‘अशी’ होती’; असं म्हणत मी जिवतीचं चित्र दाखवतो आणि उपस्थित स्त्रियांच्या माना
आपोआप डोलतात.
हळूहळू माझे हे मराठीचे प्रयोग विस्तारत चालले आहेत. सुरूवातीला कुटुंब नियोजन, रक्तदानातील अडचणी वगैरे अर्ध-सामाजिक
विषयांबद्दल बोललो. तिथे शब्दसंपदा तयार होती. आता प्रयत्नपूर्वक ‘कटी तळाच्या स्नायूंचे पुनर्वसन’ (Pelvic
floor rehabilitation), पुरावाधिष्ठीत वैद्यकशास्त्र (Evidence
based medicine) अशा गहन शास्त्रीय विषयांवरही मी बोललो आहे. गेली वीस वर्ष राज्य स्तरावरच्या प्रत्येक
परिषदेत मी ठरवून मराठीत भाषण ठोकतो. आता
तर, ‘मराठीत बोलणार असलास तरच तुला निमंत्रण आहे’, अशी प्रेमळ धमकी असते. श्रोत्यांतील मला ओळखणारी मंडळी मी बोलायला उभा राहिलो की ‘जय महाराष्ट्र!’चा
आवाज टाकतात.
माझ्या या मराठी वाक्-धबधब्यांमुळे संयोजकांची मात्र थोडीशी गोची
होते. माझ्यानंतर मत मांडायला, प्रश्न
विचारायला किंवा आभारासाठी उभी राहणारी मंडळी उत्साहाने सुरुवात तर मराठीत करतात
पण मग लवकरच त्यांची गाडी आधी मिंग्लिश आणि पुढे इंग्लिशची ठेसने घेते.
मराठीत बोलल्यामुळे एक कुंपण
मात्र पडतं. महाराष्ट्रातच हा प्रयोग करता
येतो. पुण्या-मुंबईतही समोर बरेच जण अमराठी
असतात, तेव्हा तिथेही इंग्रजीतच जिभेची स्वोर्ड चालवावी लागते.
अशा रीतीने अमृताशी पैजा
जिंकणाऱ्या भाषेच्या मदतीने सध्या मी इंग्रजीशी पैजा जिंकतो आहे. हा प्रयोग मला आणि श्रोत्यांना आवडतो, बौद्धिक
आनंद देऊन जातो. पण येणाऱ्या दशकात
श्रोत्यांचा पोत बदलेल, त्यांच्या भाषेचाही
बदलेल, आणि मग हा प्रयोग कालविसंगत ठरेल
अशी खात्री मात्र वाटते.
No comments:
Post a Comment