अॅंग्री यंग मेन
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
...ते असो, मी काय सांगत होतो... यक्षगान; यक्षगान हा पारंपारिक प्रकार. रात्रीच्या वेळी सगळी झाकपाक झाल्यानंतर देवळाच्या आवारात, समयांच्या
आणि टेंभ्यांच्या ढणढणत्या प्रकाशात होणारा खेळ. सुष्टादुष्टाची लढाई हा ठरलेला
कथामेळ. रात्रीची
वेळ; तो नाचरा, पिवळा उजेड, त्याच्या
लवलवणाऱ्या जीभा आणि देवळाच्या कोनाड्यात, भिंतींवर, कमानीवर, ओवरीवर, पारावर,
पिंपळावर पडणाऱ्या त्या पात्रांच्या
भल्यामोठ्या सावल्या!! सगळा अनुभव किती जिवंत होत असेल.
कथा सहसा रामायण, महाभारत, पुराणातली. सगळी पात्र दैवी
किंवा दानवी. मानवी फार क्वचित. त्यामुळे पेहराव आणि आव सगळा अमानवी. कल्पनाशक्तीला भरपूर वाव. लाल, हिरवे, पिवळे,
निळे असे गडद रंगाचे कपडे, त्याला अगदी चकचक चकाकणारी जर. मेकअप सुद्धा भडक.
विशेषतः राक्षस पार्ट्यांचे. भुवया म्हणजे बोटभर जाड सुरवंट आणि कोणाही
राक्षसाला मिसरूड वगैरे भानगड नाही
डायरेक्ट आकडेबाज मिशाच. मोठी मोठी
शिरोभूषणे, दणकट आभूषणे, लांबच लांब केशकलाप असा सगळा मामला. अभिनयही तसाच. राग, क्रौर्य, हास्य, बीभत्स असे ठसठशीत रस. तमाशात असते तशी प्रत्येक संवादाला तालाची थाप. संवाद
आणि पदं घोळवून घोळवून म्हणायची पद्धत आणि
बहुतेकदा मागे झिलकऱ्यांची साथ. संवाद सगळे खड्या आवाजात. इथे कट कारस्थानं सुद्धा
तारस्वरात शिजणार आणि प्रेमळ कुजबूज मुळी कुणाचीही बूज राखणार नाही.
पण करणार काय? इलाजच नाही. शेवटी समईच्या उजेडात लांबवरच्या प्रेक्षकांच्या
नजरेस पडायचं, त्यांच्या कानी पडायचं आणि मनीचे
भाव त्यांच्यापर्यंत पोचवायचे, तर हे सगळं असंच उत्क्रांत झालं असणार, नाही का?
तंत्रज्ञानाने कलाविष्कारही किती बदलले. लांबवर ऐकू जाणे,
झगझगीत उजेड असणं आणि सिनेमाच्या तंत्रामुळे अगदी गालावरचा तीळही दृगोचर होणं शक्य झालं. मगच संयत अभिनय, अस्फुट संवाद आणि वास्तववादी
रंगरंगोटी शक्य झाली. वास्तववादी कथाही शक्य झाली. पूर्वी कोणा सामान्य बाया-बापड्याच्या
दु:खाचा हळवा कोपरा मंचित होणं शक्यच
नव्हतं. महानायक आणि महाखलनायकांचीच रंगभूमी ती.
पण कथा आणि पात्र
पौराणिक असली, सादरीकरण पारंपरिक असलं, तरी हे असले लोकखेळ तितकेच समकालीन असतात. यात आजच्या राजकीय, सामाजिक प्रश्नांवर कधी आडून तर
कधी उघड कोट्या असतात. यातील नारद, सूत्रधार, दारुड्या, शिपाई असली पात्र, हमखास
हशे आणि टाळ्या वसूल करतात ते उगीच नाही. मग स्वर्गारोहणाच्या शीनमधे पांडवांना
स्वर्गाच्या दारावर लाचखोर शिपाई भेटतात आणि देवाधिदेव इंद्र अहिल्येच्या
कुटीबाहेर येताच, त्याचा सारथी त्याला
दम देतो, ‘माझ्या मेव्हण्याला
तुमच्या हापिसात लावून घेताय, का ठोकू
बोंब?’
आपल्या तमाशातला सोंगाड्या किंवा ‘मावशी’ तरी वेगळं काय
करतात? गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे विनोद आणि महाराज, कृष्ण वगैरे पात्रांची आजिबात
पत्रास न ठेवता त्यांना अद्वातद्वा बोलणे
हे यांचे मुख्य काम. ‘मावशी’ तर श्रीकृष्णाला ओळखत सुद्धा नाही. ‘आमची वाट आडीवणारा हयो रे
कोण मुडद्या?’; असं ती पेंदयाला विचारते. तमाशातला सोंगाड्या साक्षात महाराजांना
उलटून बोलतो, त्यांच्यावर ग्राम्य विनोद करतो, त्यांची एकही आज्ञा पाळत नाही,
त्यांची पार फजिती करून सोडतो. राजाधिराजांची ही ऐशी परवड प्रेक्षकांना सुखावून
जाते. प्रस्थापितांबद्दलचा सगळा राग, सगळी
भडास परस्पर निघून जाते. सामन्यांच्या बाजूने व्यवस्थेशी दोन हात करणारे, हे तर आद्य
‘अॅंग्री यंग मेन’. बाकी अमिताभ वगैरे अगदी आत्ता आत्ता आले हो!!!
प्रथम प्रसिद्धी १२ जानेवारी २०२०
आयुष्यावर बोलू काही, लेखांक २
रविवार सकाळ (सातारा)
No comments:
Post a Comment