Monday, 27 January 2020

माय मराठी का my मराठी


आयुष्यावर बोलू काही

माय मराठी का my मराठी


हां तर मी काय सांगत होतो... आपलं जिणं, रहाणं, खाणं सगळं सगळं बदललं आहे.
एका इंग्लिश मिडीयम स्कूलच्या, अॅन्युअल डे फंक्शनला, मी परवा चीफ गेस्ट होतो! खर तर चीप गेस्ट होतो. माझ्या इतका सस्त्यातला गेस्ट दुसरा मिळणे दुरापास्त होते. स्वतःच्या खर्चाने शाळेत जाऊन, स्नेहसंमेलन सहन करून, वर देणगी देणारा असा विरळाच. शिवाय चिल्यापिल्यांची दंगामस्ती पहात आणि ऐकत मी भाषणही ठोकले. ते तब्बल साडेतीन मिनटांच्यावर मलाही सोसवेना आणि चिमुकल्या श्रोत्यांनाही. पण त्या दोन तीन तासात  मी तिथे जी भाषा ऐकली, ती थक्क करणारी होती.
घरीदारी मराठी बोलणाऱ्या, घरीदारी मराठी चालणाऱ्या, घरीदारी मराठी वागणाऱ्या त्या चिमुरड्यांचे शिक्षण मात्र इंग्रजीतून चाल होते. भाषा इंग्रजी आणि संस्कृती मराठी अशी रस्सीखेच चालली होती. चांगलीच कुतरओढ होत होती सगळ्यांची. पहाणाऱ्याला मौजेची वाटत असली तरी प्रकार अंतर्मुख करणारा होता.
गॅदरिंग संपताच सगळी किलबिल सरली होती.  प्रिन्सिपॉल बाईंच्या केबिनमध्ये ‘च्यामारी’च्या साथीनं (चहा आणि मारी बिस्किट) चर्चा रंगली होती. संतवचनांनी, संतमहंतांच्या तसबीरींनी आणि पुतळ्यांनी बाईंभोवती प्रभावळ धरली होती. मधूनच शाळेत आया म्हणून काम करणाऱ्या सुलामावशी कुठे आहे असा प्रश्न विचारायची वेळ त्या माउलीवर ओढवली. शाळेत इंग्लिश आणि फक्त इंग्लिशमधेच बोलायचे असा फतवा होता. मग काय थेट सवाल आला, ‘व्हेअर आर सुलामावशी?’ आदरार्थी बहुवचनाने आता लुगड्यातून झग्यात प्रवेश केला होता.  आणि तत्पर  उत्तरही आले, ‘सुलामावशी आर डाऊन!’
सगळे शिक्षणतज्ञ वगैरे वगैरे सांगतात, की मातृभाषेतून शिक्षण हेच योग्य. पण माझ्यासकट अख्ख्या होल महाराष्ट्रात हे फारसं कुणीच मनावर घेतलेलं दिसत नाही. मुलांना लहानात लहान वयात इंग्लिश मिडीयममधे घालायची अगदी चढाओढ सुरु आहे.
पोरही जरा येस-फेस करू लागली की मऱ्हाठी संस्कृतीला आणि घरच्या मऱ्हाठी भाषकांना फालतू समजू लागतात; आणि अशा पोरांचं कौतुकही  वाटतं मायबापाला.  प्रश्न हा आहे. उत्तम इंग्लिश येण आज जीवनावश्यक आहे. पण म्हणून उत्तम मराठी येणं आणि बोलणं  हे कमअस्सल कसं?
मला तर लो. टिळक, शिवाजी महाराज वगैरे मंडळी इतर भाषेत बोलायला लागली की अस्वस्थ वाटतं. टिळक कुठल्याशा मालीकेत हिंदीत बोलत होते.  स्वराज्य हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असून तो ते मिळवणारच  असल्याचं, त्यांनी हिंदीत सांगितल्यामुळे मला बराच वेळ ते पटेचना. ‘अर्रे!, ये अपना आदमी हिंदीमे कैसे बोल्नेकू लग्या?’, असा प्रश्न मला पडला होता. देवबीव मंडळीसुद्धा माझ्या लहानपणी उत्तम  मराठी बोलत पण मी इंग्लिश मिडीयममधे गेल्यावर तीही इंग्लिशमधे बोलायला लागली! Curse, Penance, Wishes हे शब्द अमर चित्र कथांतून माझ्या शब्दसंपदेत जमा झाले.
फार काही बिघडलं असं माझं म्हणणं नाही. संस्कृती आणि भाषा ह्या  प्रवाही असतात. ‘पसायदान कोणत्या भाषेत आहे?’, असं विचारल्यावर, ‘संस्कृत!’ असं उत्तर देणारी मुले आहेत. त्यांचं काही चूक नाही. त्यांच्या कानावर पडलेल्या मराठीचा आणि पसायदानातल्या मराठीचा संबंध नाही एवढाच याचा अर्थ. पण पसायदान परके वाटायला ४०० वर्ष जावी लागली. पुलं परके व्हायला अजून ४०च पुरतील आणि कदाचित वीसच वर्षानंतर, ह्या सदरातील लिखाण मराठीत होतं बरं, असं सांगावं लागेल.
संस्कृतीचा आणि भाषेचा हा बदलांचा झपाटा छाती दडपून टाकणारा  आहे, एवढंच.
सकाळ सातारा २६/१/२०२०



Wednesday, 15 January 2020

माझे मराठीचे प्रयोग


माझे मराठीचे प्रयोग
डॉ. शंतनू अभ्यंकर

डॉक्टरांची मोठी महत्वाची परिषद असते. नव्या नव्या आणि किचकट विषयांवर घनगंभीर भाषणे चालू असतात.  सभागृहात मंद उजेड असतो. एसीची घरघर तेवढी ऐकू येत असते. पडद्यावर पहिली पारदर्शीका झळकते, ‘टिप्स अँड ट्रिक्स इन गायनॅकॉलॉजी  अँड ऑब्स्टेट्रिक्स, बाय डॉ. शंतनु अभ्यंकर’. माझी ओळख करून देणारा आता ओळख आटोपती  घेतो आणि म्हणतो, ‘मे आय नव इन्व्हाईट डॉ. शंतनु अभ्यंकर फॉर हिज प्रेझेंटेशन’.
या  वाक्यासरशी  चार पायर्‍या चढून मी चपळाईने माईक गाठतो, समोरच्या प्रेक्षागृहात एक नजर फिरवून जणू एक नजरबंदीचा खेळ सुरू करतो.  मी म्हणतो, ‘स्त्री आरोग्य आणि प्रसूतिशास्त्र संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष, सचिव, अन्य पदाधिकारी आणि सभासद हो; मला जे सांगायचं आहे  ते सांगण्यासाठी मला इंग्रजी बोलण्याची गरज नाही, म्हणून माननीय अध्यक्षांच्या परवानगीने मी मराठीतच बोलणार आहे!’ यावर सारे सभागृह स्तब्ध होते आणि मग जणू काही उंदरामांजराच्या पकडापकडीचा जीवघेणा खेळ सुरु होतो.  या खेळाचा थरार मी अनेकदा अनुभवला आहे.  
होतं असं, की एखाद्या अस्सल  वैद्यकीय विषयावर मी मराठीत बोलणार आहे हे लक्षात येताच सर्वांचे कान टवकारले जातात. एकही इंग्रजी शब्द न वापरता अस्खलित मराठी बोलायचं असा चंग मी बांधलेला असतो आणि अनवधानाने का होईना एखादा तरी इंग्रजी शब्द याच्या भाषणात येईलच  या अपेक्षेने, उत्कंठेने, श्रोते जीवाचा कान देऊन ऐकत असतात. माझं भाषण सर्वात लक्षपूर्वक ऐकले जातं.  हा भाषिक पकडापकडीचा खेळ खेळताना ते उच्चविद्याविभूषित श्रोतेही रंगून जातात. रसाळ भाषणात रोजच्या प्रॅक्टीसमधल्या अडीअडचणींवर अनेक युक्त्याप्रयुक्त्या सुचवून  मी समारोप करतो.  म्हणतो, ‘न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, अशा अविर्भावात जरी मी बोललो असलो तरी माझी भूमिका त्या युगंधराची नाही माझी भूमिका त्या धनुर्धराचीच आहे. तुमच्या अनुभवातून मीही शिकू इच्छितो.  अशा युक्त्या आपल्याही पोतडीत असतील.  माझी पोतडी मी रिती केली आपणही आपले अनुभव सांगा.  धन्यवाद.’
या प्रयोगाची सुरुवात झाली एका गरजेतून. झालं असं की सातारच्या  स्त्री आरोग्यतज्ञ संघटनेतर्फे गर्भनिरोधन  या विषयावर दिवसभराचं चर्चासत्र आयोजित केलं जाणार होतं. मी विषय निवडला होता ‘इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन’ (आपातकालीन गर्भनिरोधन). मी तयारीही केली. परगावच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी  थोड्या उशिराने आपला होकार कळवला. पण चर्चासत्रातील उरलेल्या विषयावर, म्हणजे ‘कौन्सिलिंग इन कॉन्ट्रासेप्शन’वर (कुटुंबकल्याण आणि समुपदेशन) बोलण्यास त्यांनी  साफ नकार दिला. कारण उघड होतं. बाकी विषय थेट वैद्यकविश्वाशी, वैद्यकीय ज्ञानाशी संबंधित होते. हा विषय संवाद कौशल्याशी जास्त निगडित होता. डॉक्टरांसमोर बोलण्यासारखं त्यात विशेष असं काही नव्हतं. हा विषय सगळ्यात शेवटी येणार होता. त्यामुळे बरेचसे मुद्दे आधीच चघळून झालेले असणार होते. शिवाय ठरल्या वेळेपेक्षा कार्यक्रम लांबतोच  आणि भुकेलेल्या मंडळींचे डोळे मिटतात, माना पडतात आणि सभागृहात घोर शांततेचे आवाज घुमू लागतात. त्यामुळे अखेरचा वक्ता हा दशसहस्त्रेषू  असला काय किंवा शतसहस्त्रेषू असला काय, त्याची दांडी गुल होण्याची खात्रीच असते. या ज्येष्ठ डॉक्टरांना ही कोणती जोखीम स्विकारायची नव्हती. त्यांनी सरळ मला फोन केला आणि ‘इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन’बद्दल ते स्वतः बोलणार असल्याचं सांगून टाकलं.
मी पडलो संयोजक. मला नमतं घेणं भागच होतं. आलिया भोगासी असावे सादर असं म्हणून मी तयारीला लागलो. वाचता वाचता विचार करता करता असं लक्षात आलं की समुपदेशन म्हणजे त्या त्या व्यक्तीशी साधकबाधक चर्चा करून, कुटुंब नियोजनाबद्दल, परिस्थितीनुरूप निर्णय घ्यायला मदत करण्याचं कौशल्य. आता हे बोलायचं, विचारायचं, सांगायचं हे सगळं मराठीत. अस्खलित इंग्लिश बोलणाऱ्या बायका आमच्या भागात नाहीतच. मग मराठीत एखाद्या जोडप्याशी काय आणि कसं बोलायचं हे इंग्रजीत समजावून सांगण्यात काय हंशील? शेवटी मराठीतून कशी माहिती द्यावी याचं ज्ञान आणि जिवंत प्रात्यक्षिक, मराठी बोलणाऱ्यांसमोर मराठीतच देणं  योग्य नाही का? मनाचा हिय्या करून मी मराठीत बोलायचं ठरवलं आणि मानसिक हुप्पाहूंय्या करून ‘शुद्ध’ मराठीत बोलायचं ठरवलं!
फार वर्षापूर्वी डॉ. जयंत नारळीकर यांनी अस्खलित मराठीत दिलेली व्याख्याने मी ऐकली होती. अत्यंत ओघवत्या शैलीत ते खगोलशास्त्रातील एका उगवत्या, घनगंभीर विषयावर, दीड तास बोलले होते. मात्र अतिशय अवघड संकल्पना अतिशय सोप्या करून सांगत, त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं. त्यांचा आदर्श माझ्यासमोर होताच. शिवाय एका डॉक्टरी परिषदेत, जीभेच्या शस्त्रक्रियांवरही मराठीतील मांडणी मी ऐकली होती. त्या व्याख्यानाचा शीर्षक होतं, ‘मूकं करोति वाचालम्’. या साऱ्या पार्श्वभूमीवर मी प्रयत्न करून बघायचं ठरवलं.
 प्रत्यक्षात मामला भलताच सोपा गेला. समर्थांचं, ‘लेकुरे उदंड झाली’ हे वचन मला उपयोगी ठरले. पेशंटच्या शंकाकुशंका त्यांच्याच शब्दात मांडल्यामुळे भाषा आणखी जिवंत झाली. एकूणच कुटुंबकल्याण विषयक विनोद, उधृते, काव्यपंक्ती, किस्से आणि शाब्दिक कसरती करत करत मी पाऊण तास तुफानी फटकेबाजी केली.  शेवटी मी म्हणालो,  ‘पुनरुत्पादनाच्या प्रत्येक पायरीचा आपल्या समाजाने उत्सव केला आहे.  पाळी येणं, लग्न ठरणं, ते होणं, पहिली रात्र, डोहाळजेवण, बाळाच्या आगमनाचे पेढे-बर्फी आणि बारशाचा ध्वनिक्षेपकाची भिंत उभारून गाव दणाणून सोडणारा सत्यनारायण या सगळ्याचा समारंभ आहे. पण पुनरुत्पादनाची क्षमता संपवणे,  म्हणजे नसबंदी होणे, याचा काही समारंभ अजून तरी निघालेला नाही.  त्यामुळे, ‘गेल्या गुरुवारी जाऊबाईंची  नसबंदी झाली,  आज तीर्थप्रसादाला या, अशी नसबंदी-नारायणाची बोलावणी  येतील तो सुदिन!!’ यावर हास्यकल्लोळ आणि टाळ्यांचा कडकडाट यातलं काय अधिक गगनभेदी होतं हे सांगणं अवघड आहे.
खुर्चीत बसता बसता माझ्या लक्षात आलं की हे सर्व मी मराठीत बोललो म्हणूनच शक्य झालं. विषयात नावीन्य नव्हतं पण भाषेमुळे मांडणीत जणू नवचैतन्य आलं. दिलेल्या विषयाला आणि श्रोतृवृंदाला मराठी भाषाच चपखल होती.  एक चूष  म्हणून केलेल्या या प्रयोगाची मग मला चटकच लागली. पण दर वेळचा अनुभवही चटकदार होता.
 भाषण संपल्या संपल्या पहिलं कौतुक होतं शुद्ध मराठीत बोललो याचं. एका बाजूला जो आपल्यासारखाच मिश्र/धेडगुजरी भाषेत बोलतो तो इतकं अचूक आणि न अडखळता मराठीत, शास्त्रीय परिभाषेत बोलू शकतो आणि ते श्रोत्यांना सहजपणे समजतं  हे पाहून मंडळी थक्क होतात.  मला म्हणतात बर्‍याच दिवसांनी इतकं सुंदर मराठी ऐकलं.  काहींच्या बोलण्यातून याला बहुधा इंग्रजी धड येत नसावं अशीही शंका डोकावते.  काही सभांमध्ये मग मी एक विषय मराठीत  आणि दुसरा इंग्रजीत सुनावतो आणि शेवटी म्हणतो, ‘This is just to demonstrate that I spoke in Marathi by choice rather than out of compulsion.  (सुरुवातीची मांडणी  मी हेतुतः मराठीत केली,  नाईलाजास्तव नाही.)
कुठल्याही नवीन विषयावर मराठीत बोलायचं म्हटलं की माझी तयारी सुरू होते. माझ्या भाषणासोबत पडद्यावर झळकणाऱ्या पारदर्शिका मी इंग्रजीतच ठेवतो. योग्य ते मुद्दे वैद्यकीय परिभाषेत  तिथे श्रोत्यांना वाचता येतात.  त्यामुळे न रुळलेल्या मराठी शब्दांमुळे होणारे घोटाळे टळतात.  एखादा शब्द श्रोत्यांच्या चटकन लक्षात येणार नाही असं वाटलं तर प्रकाश-शलाकेच्या  सहाय्याने मी पडद्यावरचा शब्द दाखवून देतो.  एखादा वेगळाच शब्द आला तर तो श्रोत्यांच्या पचनी पडेपर्यंत चक्क थांबतो.  उदा: रुग्णाला ‘अधोशिर स्थिती’त झोपवावे (Head low position),  हे समजायला जरा वेळ लागतो. थोडं थांबलं की काही क्षणातच मंडळींच्या डोक्यात प्रकाश पडतो.  प्रकाशाची प्रभा  अन्य मंडळींपर्यंत फाकत जाते.  शब्द लक्षात आल्याचा एक सामुदायिक हुंकार उमटतो.  उशिरा अर्थ समजल्यामुळे झालेल्या एकमेकांच्या फजितीबद्दलची एक सामुदायिक खसखस पिकते आणि हे संकेत मिळाले की मी पुढे सरकतो.
मराठी प्रतिशब्द शोधायला शब्दकोश, विश्वकोश यांची तर मदत घेतोच पण कधीकधी अनपेक्षितरित्या शब्द भेटीला येतात.  नवजात अर्भकाची  तपासणी करताना ते ‘अॅलर्ट’ आहे का बघा असा मुद्दा होता. अॅलर्ट म्हणजे येथे सावध नाही,  जागं  नाही तर  जागं,  सावध, टकामका बघणारं,  खेळणारं, उद्दीपनांना  प्रतिसाद देणारं, असं सगळं या अॅलर्टमध्ये सामावलेलं आहे.  या शब्दासाठी मी जंग जंग पछाडले पण व्यर्थ.  शेवटी ‘तरतरीत’ हा पर्याय निवडला.  नेमकं त्याच वेळी दवाखान्यातल्या मावशी सांगत आल्या,  ‘डॉक्टर काल रात्री गॅस लावलेलं बाळ  सकाळी एकदम ‘चल्लाख’ दिसतंय!’ नुसतं ‘चलाख’ नाही ‘चल्लाख’.  अर्थात मी हा शब्द उच्चारासह स्वीकारला. ‘स्ट्रेस युरीनरी इनकाँटीनन्स’ हा असाच एक सलणारा शब्दसमूह.  पोटातला दाब वाढला (उदा: खोकणे, शिंकणे, वगैरे) की अशा पेशंटला नकळत थोडी लघवी होते.  याचं भाषांतर शेवटी ‘दाबजन्य मूत्र विसर्जन’ असं  केलं  आणि हशा वसूल केला.  मूत्रपिंडाकृती तसराळे (Kidney tray),  स्वरयंत्रदर्शक (Laryngoscope), सदंत/अदंत  चिमटा (Tooth/Plain forceps), निर्जंतुक झगा (Sterile gown) निर्मोजे होणे (To deglove),  काममंचक (Orgasmic platform) हेही प्रथम ऐकल्यामुळे हास्यस्फोटक  ठरलेले शब्द.  काही नविन शब्द मीच बनवले उदा: उरोनलिका (स्तेथोस्कॉप).  प्रसारमाध्यमांनी रूढ केलेले अनेक शब्द उपयुक्त ठरले.  (उदा: संकेतस्थळ,  महाजाल, वगैरे) काही सरकारी शब्दप्रयोगही अगदी समर्पक   आहेत उदा: जनन-दर (Birth rate), पात्र-जोडपे (Eligible couple) इत्यादी.  काही शब्दांना मला अजूनही प्रतिशब्द सापडलेले नाहीत.  उदा: इलेक्ट्रॉनिक. विश्वकोशातही  इलेक्ट्रॉनिक  असाच शब्द आहे.  
या प्रयोगाच्या मर्यादाही आहेत.  निरनिराळ्या अधुनिक शस्त्रक्रिया, त्यांच्यातले बारीक-सारीक टप्पे, यांना स्पर्श करणे अवघड जातं.   एकच उदाहरण द्यायचं झालं तर नुसत्या बिजवाहक नलिकेचे शरीरशास्त्रानुसार पाच भाग कल्पिले आहेत.  त्यांना पाच वेगवेगळी  नावं  आहेत.  हे सारं मराठीत बसवणं आणि भाषणाच्या ओघात आश्चर्यमुग्ध श्रोत्यांना चटदिशी समजेल अशा मराठीत बोलणं, केवळ अवघड नाही तर अशक्यच आहे.  अशावेळी मग सोबतच्या इंग्रजी पारदर्शीका मदतीला येतात  किंवा पारिभाषिक इंग्रजी शब्द वापरणे एवढाच पर्याय राहतो. 
शब्दशोधाबरोबरच हे भाषण मला संपूर्ण लिहून काढावं लागतं आणि आधी वारंवार वाचून ठेवावं लागतं.  भाषणाची सुरुवात धक्कातंत्राने होते.  म्हणजे शुद्ध  मराठीत भाषण आहे याचाच श्रोत्यांना धक्का बसतो.  कार्यक्रम-पत्रिकेत अन्य भाषणांच्या यादीत माझ्याही भाषणाचा विषय इंग्रजीतच छापलेला असतो.  मी मराठीत बोलणार आहे याची  बरेचदा संयोजकांनाही कल्पना नसते.  सुरुवातीच्या धक्क्यानंतर भाषणाची  कमान चढती ठेवणं महत्त्वाचं असतं.  मराठीत  बोलल्यामुळे उत्कर्षबिंदू गाठताना मी हमखास लोकसंस्कृतीचा, स्थानिक संदर्भांचा उपयोग करू शकतो.  थोडंफार तमाशाच्या बतावणीसारखंच हे.  अमरावतीला गेलो आणि कळलं की रुक्मिणीला कृष्णाने  इथूनच पळवलं होतं म्हणे.  ‘इथल्या सुंदर राजकन्यांना परमुलखातल्या पुरुषांबरोबर हात धरून पळून जायची  जुनी खोड आहे; हे ऐकून मोठ्या आशेने मी इथे आलोय!’ असं म्हणताच छान दाद  मिळाली.  ‘आदर्श मातृत्वाची  समाजमनातील कल्पना पूर्वी ‘अशी’ होती’; असं म्हणत मी जिवतीचं  चित्र दाखवतो आणि उपस्थित स्त्रियांच्या माना आपोआप डोलतात.  
हळूहळू माझे हे मराठीचे प्रयोग विस्तारत चालले आहेत.  सुरूवातीला कुटुंब नियोजन,  रक्तदानातील अडचणी वगैरे अर्ध-सामाजिक विषयांबद्दल बोललो. तिथे शब्दसंपदा तयार होती. आता प्रयत्नपूर्वक  ‘कटी तळाच्या स्नायूंचे पुनर्वसन’ (Pelvic floor rehabilitation), पुरावाधिष्ठीत वैद्यकशास्त्र (Evidence based medicine) अशा गहन शास्त्रीय  विषयांवरही मी  बोललो आहे. गेली वीस वर्ष राज्य स्तरावरच्या प्रत्येक परिषदेत मी ठरवून मराठीत  भाषण ठोकतो. आता तर, ‘मराठीत  बोलणार असलास तरच  तुला निमंत्रण आहे’, अशी प्रेमळ धमकी  असते. श्रोत्यांतील मला ओळखणारी  मंडळी मी बोलायला उभा राहिलो की ‘जय महाराष्ट्र!’चा आवाज टाकतात.  
माझ्या या मराठी वाक्-धबधब्यांमुळे संयोजकांची मात्र थोडीशी गोची होते.  माझ्यानंतर मत मांडायला, प्रश्न विचारायला किंवा आभारासाठी उभी राहणारी मंडळी उत्साहाने सुरुवात तर मराठीत करतात पण मग लवकरच त्यांची गाडी आधी मिंग्लिश आणि पुढे इंग्लिशची ठेसने  घेते.
 मराठीत बोलल्यामुळे एक कुंपण मात्र पडतं.  महाराष्ट्रातच हा प्रयोग करता येतो.  पुण्या-मुंबईतही समोर बरेच जण अमराठी असतात, तेव्हा तिथेही इंग्रजीतच जिभेची स्वोर्ड चालवावी  लागते.
 अशा रीतीने अमृताशी पैजा जिंकणाऱ्या भाषेच्या मदतीने सध्या मी इंग्रजीशी पैजा जिंकतो आहे.  हा प्रयोग मला आणि श्रोत्यांना आवडतो, बौद्धिक आनंद देऊन जातो.  पण येणाऱ्या दशकात श्रोत्यांचा पोत बदलेल,  त्यांच्या भाषेचाही बदलेल,  आणि मग हा प्रयोग कालविसंगत ठरेल अशी खात्री मात्र वाटते.



आयुष्यावर बोलू काही लेखांक २ अॅग्री यंग मेन


अॅंग्री यंग मेन
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

...ते असो, मी काय सांगत होतो... यक्षगान; यक्षगान  हा पारंपारिक प्रकार.  रात्रीच्या वेळी सगळी  झाकपाक झाल्यानंतर देवळाच्या आवारात, समयांच्या आणि टेंभ्यांच्या ढणढणत्या प्रकाशात होणारा खेळ. सुष्टादुष्टाची लढाई हा ठरलेला कथामेळ.    रात्रीची वेळ; तो नाचरा,  पिवळा उजेड, त्याच्या लवलवणाऱ्या जीभा आणि देवळाच्या कोनाड्यात, भिंतींवर, कमानीवर, ओवरीवर, पारावर, पिंपळावर  पडणाऱ्या त्या पात्रांच्या भल्यामोठ्या सावल्या!! सगळा अनुभव किती जिवंत होत असेल.  
कथा सहसा रामायण, महाभारत, पुराणातली. सगळी पात्र दैवी किंवा दानवी. मानवी फार क्वचित. त्यामुळे पेहराव आणि आव सगळा  अमानवी.  कल्पनाशक्तीला भरपूर वाव. लाल, हिरवे, पिवळे, निळे असे गडद रंगाचे कपडे, त्याला अगदी चकचक चकाकणारी जर. मेकअप सुद्धा भडक. विशेषतः राक्षस पार्ट्यांचे. भुवया म्हणजे बोटभर जाड सुरवंट आणि कोणाही राक्षसाला  मिसरूड वगैरे भानगड नाही डायरेक्ट आकडेबाज मिशाच.  मोठी मोठी शिरोभूषणे, दणकट आभूषणे, लांबच लांब केशकलाप  असा सगळा मामला. अभिनयही तसाच.  राग, क्रौर्य, हास्य, बीभत्स असे  ठसठशीत रस. तमाशात  असते तशी प्रत्येक संवादाला तालाची थाप. संवाद आणि पदं घोळवून घोळवून  म्हणायची पद्धत आणि बहुतेकदा मागे झिलकऱ्यांची साथ. संवाद सगळे खड्या आवाजात. इथे कट कारस्थानं सुद्धा तारस्वरात शिजणार आणि प्रेमळ कुजबूज मुळी कुणाचीही बूज राखणार नाही.  
पण करणार काय? इलाजच नाही.  शेवटी समईच्या उजेडात लांबवरच्या प्रेक्षकांच्या नजरेस पडायचं, त्यांच्या कानी पडायचं  आणि मनीचे भाव त्यांच्यापर्यंत पोचवायचे, तर हे सगळं असंच उत्क्रांत झालं  असणार, नाही का?
तंत्रज्ञानाने कलाविष्कारही किती बदलले. लांबवर ऐकू जाणे, झगझगीत उजेड असणं आणि सिनेमाच्या तंत्रामुळे अगदी गालावरचा तीळही दृगोचर   होणं शक्य झालं. मगच  संयत अभिनय, अस्फुट संवाद आणि वास्तववादी रंगरंगोटी शक्य झाली. वास्तववादी कथाही शक्य  झाली. पूर्वी कोणा सामान्य बाया-बापड्याच्या दु:खाचा हळवा कोपरा मंचित  होणं शक्यच नव्हतं. महानायक आणि महाखलनायकांचीच रंगभूमी ती. 
 पण कथा आणि पात्र पौराणिक असली, सादरीकरण पारंपरिक असलं,  तरी हे असले लोकखेळ तितकेच समकालीन असतात. यात  आजच्या राजकीय, सामाजिक प्रश्नांवर कधी आडून तर कधी उघड कोट्या असतात. यातील नारद, सूत्रधार, दारुड्या, शिपाई असली पात्र, हमखास हशे आणि टाळ्या वसूल करतात ते उगीच नाही. मग स्वर्गारोहणाच्या शीनमधे  पांडवांना  स्वर्गाच्या दारावर लाचखोर शिपाई भेटतात आणि देवाधिदेव इंद्र अहिल्येच्या कुटीबाहेर येताच, त्याचा सारथी त्याला  दम  देतो, ‘माझ्या मेव्हण्याला तुमच्या हापिसात  लावून घेताय, का ठोकू बोंब?’ 
आपल्या तमाशातला सोंगाड्या किंवा ‘मावशी’ तरी वेगळं काय करतात? गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे विनोद आणि महाराज, कृष्ण वगैरे पात्रांची आजिबात पत्रास न ठेवता त्यांना अद्वातद्वा  बोलणे हे यांचे मुख्य काम. ‘मावशी’ तर श्रीकृष्णाला ओळखत सुद्धा नाही. ‘आमची वाट आडीवणारा  हयो  रे कोण मुडद्या?’; असं ती पेंदयाला विचारते. तमाशातला सोंगाड्या साक्षात महाराजांना उलटून बोलतो, त्यांच्यावर ग्राम्य विनोद करतो, त्यांची एकही आज्ञा पाळत नाही, त्यांची पार फजिती करून सोडतो. राजाधिराजांची ही ऐशी परवड प्रेक्षकांना सुखावून जाते. प्रस्थापितांबद्दलचा सगळा  राग, सगळी भडास परस्पर निघून जाते. सामन्यांच्या बाजूने व्यवस्थेशी दोन हात करणारे, हे तर आद्य ‘अॅंग्री यंग मेन’. बाकी अमिताभ वगैरे अगदी आत्ता आत्ता आले हो!!!
   
प्रथम प्रसिद्धी १२ जानेवारी २०२०
आयुष्यावर बोलू काही, लेखांक २
रविवार सकाळ (सातारा)


Sunday, 5 January 2020

आयुष्यावर बोलू काही लेखांक १ ... संसार सार

आयुष्यावर बोलू काही...
डॉ शंतनु अभ्यंकर वाई

सातारा सकाळ मधील माझे नवे साप्ताहिक सदर

देवादिकांना मानवी रूप दिले की किती लोभस दिसतात ते. परवाच यक्षगानाचा कार्यक्रम होता. उत्सुकता म्हणून गेलो. यक्षगान म्हणजे कानडी रामलीलाच होती जणू.  काय मस्त प्रकार होता तो.  भाषेचा अडसर मुळी जाणवलाच  नाही. बरेचसे शब्द संस्कृतोद्भव आणि कथा ओळखीची.  
सीताहरणाची कथा. अगदी अथ:पासून इति:पर्यंत माहिती असलेली.  पण तरीदेखील अशा पद्धतीने सादर झाली की काळजाचा ठाव घेतला त्या कलाकृतीनी.  त्यातला लक्षात राहिला तो रावण!
नांदी आणि गणवंदना झाल्यानंतर वाद्यांच्या गजरात आला की रावण! काय त्याची चाल; दाणदाण पावले टाकत, मोठ्या आवाजात गर्जना करत, हात असे दोन्हीकडे कमरेवर ठेवलेले,  ह्या एवढाल्या मिशा, मोठे मोठे डोळे गरागरा फिरवत तो आला आणि किंचाळायला लागला. म्हणाला ‘शूर्पणखेला घेऊन या, ती का आक्रंदन करते आहे,  ते मला पाहायचे आहे.’ आपल्या बहिणीबद्दलची तळमळ अचानक त्याच्या चेहऱ्यावर उमटली.  अभिनय खरंच देखणा होता या रावणाचा. शूर्पणखेची अवस्था पाहून विव्हल झालेला रावण. मायावी मारीचाला आपल्या कटात सामील करून घेतानाचा  कारस्थानी रावण. साळसूदपणे  सीताकुटीशी भीक्षा  मागतानाचा  यतिवेषधारी साधू रावण आणि  जटायुशी त्वेषानी लढतानाचा लढवैय्या रावण.  असे सारे नवरस भाव ह्या दशाननाने   आपल्या एकाच चेहऱ्यावर  झरझर उमटवले आणि उतरवले. ते पाहून थक्क व्हायला झालं.  
 रामायणाच्या कुठल्याही खेळात एकूणच रावण जास्त भाव खाऊन जातो. रावण बिच्चारा  माणूस आहे.  त्याला क्षोभ  आहे, लोभ आहे, माया आहे, असूया आहे. त्याच्या मनात  कपट आहे, पाप आहे,  प्रेम आहे; आशा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा आहे. असा सर्वगुणदोषसंपन्न  आहे रावण. 
त्यामानाने रामाचा रोल अगदीच  सपक. तो सर्वगुणसंपन्न. देवाचाच अवतार तो त्यामुळे सदा समशीतोष्ण. मर्त्यलोकांत रावण आपल्या आसपास दिसायची सोय आहे पण  राम? अं हं!   रामायणाच्या प्रयोगात रामाला विशेष कामच नाही. मोठ्यांच्या उठसूट पाया पडायचं आणि आशीर्वाद घ्यायचे, लहानांना पाया पडले रे पडले की आशीर्वाद द्यायचे, एकदा इकडे बघून किंचित हसायचं, एकदा तिकडे बघून यत्किंचित हसायचं आणि  इकडे, रावणाचे हसणे सुद्धा दहा मजली.  त्यामुळेच  रामायणाच्या खेळात एकदा रावण मेला की  खेळातला राम जातो.
पण ह्या खेळातला राम  सुद्धा लक्षात राहिला बरं. त्याच्या  एका वाक्याने तर हशा आणि टाळ्या दोन्ही  वसूल केल्या. 
झालं असं की ठरल्याप्रमाणे सुवर्णमृग सीतेला दिसले. त्याने तिला भुलवले.  आता सीतामाईचं  स्वगत चालू झालं.  हे सुवर्णमृग आपल्याला हवंच आहे आणि ह्याची कंचुकी आपल्याला कशी शोभून दिसेल असं तीनं  बोलून दाखवलं. प्रभू रामचंद्र  घरी येताच त्यांना कांचनमृगासाठी कशी कशी गळ  घालायची, कसं त्याना ताबडतोब  मृगयेला पाठवायचं  हे ती मनाशी ठरवते आहे.  इतक्यात राम येतो. पतीदेव घरी आले म्हटल्यानंतर सीता त्याच्या पाया पडते. एकदा राम आशीर्वाद देतो. सीता  दुसऱ्यांदा पाया पडते. राम पुन्हा  आशीर्वाद देतो. सीता पुन्हा पाया पडते! तिसऱ्यांदा पाया पडताच राम आशीर्वाद द्यावा की नाही या विवंचनेत पडतो. प्रेक्षकांना म्हणतो, ‘पतीदेव घरी आल्यानंतर पत्नीने  एकदा नमस्कार करणं हे योग्य, दुसऱ्यांदा करणं हे तर पतीचं  भाग्य, पण तिसऱ्यांदा नमस्कार करणं म्हणजे काहीतरी घोटाळा आहे खास!!!’ वनवासी रामाची ही  टिपण्णी गृहस्थाश्रमी  प्रेक्षकांची दाद घेऊन  गेली.