Monday, 25 February 2019

डेपो प्रोव्हेरा


डेपो प्रोव्हेरा.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

डेपो-प्रोव्हेरा नामेकरून एक चांगले गर्भ निरोधक इंजेक्शन गेली बरीच वर्ष वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. वाद अजुनही  आहेत पण आता सरकारला  ह्याची महती पटल्यामुळे नुकतेच हे सरकारी गर्भनिरोधक ताफ्यात, सामील केले गेले आहे. प्रसूतीपश्चात सुरवातीला एक दोन वर्ष घ्यायला अगदी बेष्ट आहे हे.  अर्थात एरवीही हे वेगवेगळ्या वयात घेता येईल. अगदी म्हातारं होईपर्यंत घेतलं तरी चालेल. अगदी एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच आजारात हे देता येत नाही.
हे पुरेसे सुरक्षित नाही म्हणून काही स्त्रीवादी गटांचा ह्याला कडाडून विरोध होता. पण सुरक्षा सिद्ध  झाल्यावरही तो मावळला नाही, कारण मुळात ही कंपनी अमेरिकन आणि स्त्रीवादी गट रशियाशी भावनिक जवळीक असणारे! असं हे त्रांगडं होतं. हे देण्यापूर्वी नीट समुपदेशन केलं जाणार नाही, उद्दिष्टांमागे पळत  सुटलेली आरोग्यसेवा यात बायकांना नाहक गुंतवेल, तेंव्हा खाजगीत चालेल पण सरकारीत नको, असे युक्तिवाद होते. काहीसे अर्धसत्य, काहीसे अर्धलागू, काहीसे दुराग्रही. गंमत म्हणजे हा वाद चालू असताना हे खाजगीरित्या भारतात सर्रास उपलब्ध होतं. त्याला रीतसर त्या परवानग्या होत्या. पण सरकारनी हे इंजेक्शन टोचणं, काहींना बोचत होतं. त्यामुळे सरकारी  सेवेच्या लाभार्थी, म्हणजे गरीब स्त्रिया मात्र याला पारख्या होत्या. औषधातही कसं राजकारण असतं बघा!!
डेपो-प्रोव्हेरा (मेड्रॉक्सीप्रोजेस्टेरॅान अॅसिटेट) हे प्रोजेस्टेरॅान ह्या संप्रेराकासारखे औषध आहे. ‘डेपो’ हे विशेषण अशासाठी की ते शरीरात टोचल्या ठिकाणी साठून रहाते आणि हळूहळू त्यातला अंश शरीरात भिनतो. या युक्तीमुळे त्याची अॅक्शन  तीन महिने चालते. या काळात बीजनिर्मिती होऊ शकत नाही, परिणामी दिवस रहात नाहीत.
गर्भनिरोधक म्हणून हे झकास काम करते. पण... यानी पाळी अनियमित येते. म्हणजे पुढे पुढे जाते. खूप काळ इंजेक्शन घेतलं तर बंदही होते. आणि इंजेक्शन थांबवल्यावर पुन्हा सुरु होते. बाळाला अंगावर पाजणाऱ्या बायकांना हे उत्तम ठरते कारण मुळात बाळ अंगावर पीत असल्यामुळे पाळी पुढे पुढे जातच असते. शिवाय लगेच गर्भधारणा नको अशी सगळ्यांचीच धारणा असते. शिवाय बाळावर किंवा आईच्या अंगावरच्या दुधावर ह्या इंजेक्शनमुळे काहीही दुष्परिणाम होत नाही. नेहमीच्या गर्भ निरोधक गोळ्यांनी (इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही द्रव्ये असणाऱ्या गोळ्या) मात्र होतो. दूध कमी येते त्या गोळ्यांनी. म्हणून त्या देता येत नाहीत. म्हणून हे उत्तम. ना दुधावर काही परिणाम ना बाळावर. अगदी गोळीच हवी असा आग्रह असेल तर फक्त प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्याही मिळतात. पण त्या अतिशय नियमित आणि अतिशय वेळेवर घ्याव्या लागतात. बाळाचं करता करता  रोज गोळी घेणं, आणि तीही अगदी वेळेत घेणं किती अवघड, त्या पेक्षा हे बरं. इंजेक्शन जरी घ्यायचं विसरलं, तरी चांगली दोन आठवड्याची मुदत असते. त्या दरम्यान घेतलं की झालं.
डेपो-प्रोव्हेराची धाव तीन महिन्यांपर्यंत. गर्भावस्था टाळण्यासाठी इंजेक्शन दर ३ महिन्यांनी पुन्हा दिले गेले पाहिजे. डेपो-प्रोव्हेरा थांबाविल्यानंतर बीजनिर्मिती तत्काळ सुरु होत नाही. थोडा वेळ लागतो. असा थोडासा परिणाम मागे रेंगाळत असल्यामुळे, इंजेक्शन थांबवले तरी लग्गेच दिवस राहत नाहीत. क्वचित काही वेळा इंजेक्शन थांबवल्यावर, पाळी अजिबात न येता, थेट दिवस राहिल्याची उदाहरणे आहेत. अंगावर पाजणाऱ्या बायकांनाही कधी कधी असे पाळी न येता दिवस जातात. बायकांच्या भाषेत याला ‘मिंधे दिवस जाणे’ म्हणतात.
याचे काही सहपरिणामही आहेत. सहपरिणाम हा शब्द मी मुद्दाम वापरला आहे. जसे सहप्रवासी, तसे सहपरिणाम. काही चांगले काही वाईट, पण बरेचसे निरुपद्रवी. साईड इफेक्ट हा शब्द मुद्दाम टाळला आहे. साईड इफेक्ट म्हणजे फक्त वाईट साईट परिणाम असा एक घट्ट गैरसमज रुतून बसला आहे म्हणून.   अनियमित रक्तस्त्राव किंवा स्पॅाटिंग होणे, मासिक पाळीच्या रक्तस्त्रावात घट होणे किंवा अजिबात रक्तस्त्राव न होणे वगैरे होऊ शकते. शिवाय चक्कर, मळमळ असंही काहींना होऊ शकतं. कुणाला काय होणार हे आधी ओळखता येत नाही. कित्येक बायकांना पाळी थांबली, ही इष्टपत्तीच वाटते. काही घरात मात्र पाळी येणे हा कौटुंबिक इव्हेंट असतो. अशा बायकांना हे पाळी न येणं चालत नाही. असो.  पाळी आली नाही तर दिवस नाहीत हे तपासून घेणे उत्तम. न आल्याने विशेष काही बिघडत नाही. तेंव्हा तुम्ही कम्फर्टेबल असाल तर इंजेक्शन बेलाशक सुरु ठेऊ शकता आणि शक असल्यास ही पद्धत बंद करून दुसरी कोणती तरी पद्धत वापरायला सुरवात करता येईल. गर्भ निरोधक म्हटलं की त्यामुळे वजन वाढतं असा एक समज आहे. डेपो प्रोव्हेरामुळे वजन वाढतबिढत नाही. उलट खा-खा खाऊन आणि व्यायाम न करून, जाड झालेल्या बायकांनी मुद्दाम हा अपसमज पसरवला आहे, अशी मला दाट शंका आहे.
थोडक्यात मूल झाल्या झाल्या वर्ष दोन वर्षाची गॅप ठेवायला हे इंजेक्शन हा एक उत्तम उपाय आहे. वर्षानुवर्षे घ्यायचं असेल तरीही चालेल. लोकांच्या गरजा विविधांगी असतात, तेंव्हा साधनेही विविध गुणधर्माची हवीत असं एक तत्व आहे. या निमित्तानी एक उपयुक्त साधन उपलब्ध झाले आहे. अभिनंदन.

Tuesday, 19 February 2019

पुस्तकांची 'शामची आई'


पुस्तकांची ‘शामची आई’
डॉ. शंतनू अभ्यंकर

खूप वर्षापूर्वीची गोष्ट. मी लहान होतो तेंव्हा. तेंव्हा बाबा आपले सारखे टेबलाची बसून काहीतरी लिहित असायचे. मी विचारलं तर म्हणाले अब्राहम कोव्हूर नावाच्या माणसाचं एक पुस्तक आहे, ‘बिगॉन गॉडमेन’, त्याच भाषांतर करतोय. मला खरंतर काही विशेष कळलं नाही. ‘बिगॉन’चाही अर्थ मला कळला नाही आणि ‘गॉडमेन’चाही नाही. मग त्यांनी फोड करून सांगितलं की बिगॉन म्हणजे चले जाव, आणि गॉडमेन म्हणजे बुवाबाजी करणारे बुवा. तोपर्यंत माझ्यालेखी चलेजाव हे ब्रिटिशांपुरतच मर्यादित होतं.
होता होता हे पुस्तक पूर्ण झालं. ते म्हणे भलतंच स्फोटक होत. या कोव्हूरनी सगळे चमत्कार वगैरे म्हणजे हातचलाखी असते असं सांगायला सुरवात केली होती. नव्हे तसं ते सिद्धच करून दाखवायचे. आपले या लढ्यातील अनुभव त्यांनी लिहिले होते. मग काय, बाबांना निजताना गोष्ट सांगा म्हटलं की, रोज रातीला एक एक चमत्कार आणि त्याचे पितळ कसे उघडं पाडलं याची सुरस आणि चमत्कारिक कथा, असा सिलसिला सुरु झाला. ते पुस्तक, ते अनुभव भन्नाटच होते.
पुढे ते पुस्तक पूर्ण झालं. अनेक प्रकाशकांनी नाकारलं. पण तर्कतीर्थांना (लक्ष्मणशास्त्री जोशी) पसंत पडलं. त्यामुळे साहित्य संस्कृती मंडळानी स्वीकारलं. बस्स, इतकंच. पुढे प्रसिद्ध झालं  का नाही, खपलं का नाही, कशाकशाचा थांग लागेना. लेखक-प्रत वगैरेचा तर पत्ताच नाही. फार मागे लागल्यावर तिथल्या क्लार्कचा असा समज झाला की हे मानधनासाठी मागे लागले आहेत. तेंव्हा त्यांनी मानधनाचा चेक दिला पाठवून. पण प्रश्न तो नव्हता. आपलं पुस्तक निदान आपल्या हातात पडावं एवढी तरी इच्छा असतेच की. पण या साध्या इच्छेची महत्वाकांक्षा व्हायची वेळ आली, पण पुस्तकाची प्रत काही मिळालीच नाही.
मधूनच कोणी वाचक भेटायचा, कोणी चाहता सांगायचा, ‘वाचलं बरं का पुस्तक तुमचं!’ बाबा म्हणणार, ‘अरे, अजून मी पण नाही वाचलं.’
‘अहो छान आहे, वाचा तुम्ही!!!’
कोणी सांगणार, ‘आहे आमच्याकडे.’
बाबा म्हणणार, ‘प्रत पाठवा की मला, निदान बघायला तरी, किंवा झेरॉक्स पाठवा. ट.ख. वेगळा देईन’
पण नुसतंच हो, पुढे कृती शून्य.
पुस्तक आणि लेखक यांची जन्मतः झालेली ताटातूट काही संपायचं नाव घेईना.
बाबांनी त्यांना वेळ मिळेल तसा फॉलोअप ठेवला. अगदी मधु मंगेश कर्णिकांचा सुद्धा वशिला लावला. एकदा ते पुस्तक, मंडळाच्या गोदामात असल्याचं कळलं. पण तेवढंच. साहित्य संस्कृती मंडळाच्या सरकारी जगड्व्याळ कामात एखादं पुस्तक म्हणजे कीस झाड की पत्ती. स्वीकारलेली सारीच पुस्तके काही महामंडळ स्वतः प्रसिद्ध करत नाही. इतर प्रकाशकांनाही देते. तसं ह्या पुस्तकाचं झालंय असं कळलं एकदा. पण कोण प्रकाशक, त्याची प्रत मंडळाकडे तरी असायला हवी ना, वगैरे चौकशीची फारशी कुणी दादच घेतली नाही. शेवटी कंटाळून, वैतागून बाबांनी चौकशी करायचा नादच सोडून दिला. डोंबिवलीच्या एका ग्रंथालयात प्रत असल्याचं असंच सांगोवांगी कळलं. मग तिथल्या परिचितांशी संपर्क साधून शोधायला लावलं. ते पुस्तक होतं पण खराब झाल्यामुळे पूर्वीच कंडम केल्याचं समजलं.
मग एके दिवशी काय झालं, फेबुवर  मंजिरी जोशी वैद्य म्हणून पार्ल्याच्या ग्रंथपाल आहेत, त्यांची पोस्ट एक पोस्ट माझ्या वाचनात आली. नव्या पुस्तकांना जागा करण्यासाठी त्यांनी जुनी, मागणी नसणारी पुस्तके एका कपाटात घातली आणि ते कपात दिलं गॅलरीत ठेऊन. पण बसल्या टेबलावरून त्यांना ते नाराज कपाट सतत दिसत होतं, सतत खुणावत होतं, सतत सतावत होतं. हळूहळू त्या पुस्तकांचे हुंदके ऐकू येऊ लागले. अस्वस्थ जोशीबाईंना  त्या पुस्तकांचे आर्त असह्य झाले आणि त्यांनी ते कपाट दाटीवाटीने पण आतच बसवले. वाचून मला गलबलून आले. अर्थातच मी पोस्ट लाईकली. मग आम्ही फेबु फ्रेंड झालो. एकमेकांचे लिखाण आम्ही वाचत असू. लाईकणे, कमेण्टणे होत असे पण एवढेच.  
एके दिवशी फेबुच्या विन्डोत यांचा मेसेज दाखल झाला. त्यांचं काम होतं माझ्याकडे. काम काय, तर एक दुर्मिळ पुस्तक म्हणे वाईच्या टिळक स्मारक ग्रंथालयात आहे ते त्यांना, म्हणजे त्यांच्या कुणा वाचकाला हवं होतं. आता महाराष्ट्रातल्या कुठल्या लायब्ररीत कुठले पुस्तक आहे हे ऑनलाईन बघता येतं. तसं बघून त्यांनी ते पुस्तक वाईच्या लायब्ररीत असल्याचा शोध लावला होता. मग मी वाईचा म्हणून मला मेसेज केला होता. लायब्ररीशी ऋणानुबंध असल्याने मी लगेचच पुस्तक मिळवीन असं सांगितलं. त्यावर त्या बाई जे बोलल्या, ते फार दुर्मिळ आणि भारी होतं. त्या सांगत होत्या,
‘हे पुस्तक खूप दुर्मिळ आहे. फक्त वाईच्याच लायब्ररीत आहे. ती प्रत आता जपून वापरायला हवी. ती प्रत तुम्ही लगेच झेरॉक्सला देऊ नका. ती आधी नुसती बघा. तिला बाईंडिंग असेल तर त्याच्या दोऱ्यामुळे पुस्तक पूर्ण उघडणार नाही. मग झेरॉक्स नीट येणार नाही. घडीच्या बाजूचे शब्द जातील. तेंव्हा झेरॉक्सवाला बाईंडिंग सोडवेल आणि मग ते पुन्हा पहिल्यासारखे जमेल ना जमेल... त्यामुळे तुम्ही आधी ते पुस्तक बाईंडिंगवाल्याला दाखवा. तो दोरा सोडवून पुन्हा व्यवस्थित बायडिंग करेल ना हे त्याला स्पष्ट आणि खात्रीनी विचारा आणि मगंच पुस्तक झेरॉक्सला द्या!!’
माझ्या मनात आलं, ही तर पुस्तकांची शामची आई. मायाळू, ममताळू, ग्रंथप्रेमी ग्रंथपाल. मोठ्या काळजीनी, प्रेमानी, आपुलकीनी आणि निगुतिनी पुस्तकांचं करणारी, त्यांना जपणारी. पुस्तकांना चालता येत असतं तर त्यांच्या पायांना घाण लागू नये म्हणून हिनी पदराच्या पायघड्याही घातल्या असत्या. तिकडून त्यांच्या सूचना चालूच होत्या,
‘...आणि झेरॉक्स काढणार असाल तर दोन काढा. एक तुमच्या लायब्ररीत ठेवा. एक मला पाठवा. पण इथून पुढे मूळ प्रत कुणाला देऊ नका असं बजावा तुमच्या लायब्रेरियनला. द्यायची झालं तर झेरॉक्स द्या म्हणजे मूळ प्रत खराब होणार नाही. जपायला हवं ते पुस्तक आता.’
इतकं सगळं बोलल्यावर पत्थरालाही पाझर फुटेल. मलाही फुटला. मी तडक सगळीकडे जाऊन जातीने चौकशा करून, पुस्तक घेऊन, बायडींग खोलून, झेरॉक्स काढून, पुन्हा बायंडून, त्यांना झेरॉक्स पाठवून दिली. प्रत मिळताच आनंदविभोर होऊन त्यांचा फोन आला. बोलता बोलता बाबांच्या जन्मतः ताटातूट झालेल्या पुस्तकाचा विषय निघाला.
त्या म्हणाल्या थांबा, मी प्रयत्न करते. आणि काय आश्चर्य, चारच दिवसात त्यांनी त्या पुस्तकाचा छडा लावला होता. पार्ल्याहून फोर्टात जाऊन त्यांनी पुस्तक मिळवले होते. त्याची झेरॉक्स करून त्या ती मला पाठवण्याच्या बेतात होत्या. माझा आनंद गगनात मावेना. माझा अधीर आवाज ऐकून त्या म्हणाल्या, ‘बाबांना सांगितलंत का तुम्ही? पुस्तक मिळाल्याचं?’
‘नाही. अहो मलाच आता कळतंय.’
‘मग माझं ऐका, अजिबात सांगू नका. मी त्यांना छान गिफ्टव्रॅप करून पाठवते पुस्तक. तुम्ही त्यांना द्या, आणि ते पार्सल उघडतील त्याचा व्हिडीओ काढा. मला शेअर करा तो व्हिडीओ. आपलं पुस्तक मिळाल्यावरचे, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला पहायचे आहेत!’
अर्थातच मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या सूचनांबरहुकुम सगळा सोहोळा पार पडला. त्यांना तो व्हिडीओ पाठवला. हरवलेल्या मुलाची बापाशी भेट घालून दिल्याने पुस्तकांच्या शामच्या आईच्या गालावरून घळाघळा अश्रू ओघळले असतील नक्कीच.

Thursday, 14 February 2019

माता न तू वैरीणी

माता न तू वैरीणी
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
‘मला नाही तुम्ही आईला सांगा डॉक्टर! (आई कसली वैरीण आहे माझी वैरीण.)’ कंसातलं वाक्यं मनातल्या मानत बोललेलं असतं. पण माझ्या सरावल्या कानांना स्पष्ट ऐकू येतं. 
माझ्या सगळ्या सूचना ऐकून घेऊन समोरची नवप्रसवा विनवत असते, ‘डॉक्टर, आईला सांगा प्लीज.’ तिच्या विनंतीला मान देऊन मी सांगतो सुद्धा. पण हे आई प्रकरण मॅनॅज करणे अवघडच. कितीही सांगा, समजावा, शास्त्रीय माहिती द्या, ह्या आपल्या हेका सोडायला तयार नसतात. तोंडावर हो म्हणतात आणि मग घरी गेल्यावर, जे करायचं तेच करतात. त्या जे काही करतात ते प्रेमभरेच करतात. लेकीची आणि बाळाची आत्यंतिक काळजीच घेत असतात त्या. त्यांच्या हेतूबद्दल माझ्या मनात यकिंचितही किंतु नाही. परंतु सदिच्छेच्या भांडवलावर किती आणि काय काय मारून नेणार? 
भर उन्हाळ्यात निव्वळ प्रसूती झाली म्हणून डोळ्यात बिब्ब्याच काजळ, सर्वांगी तेल चोपडलेल, दोन दोन स्वेटर, हातात ग्लोव्ज, पायात मोजे, कानाला फडकं बांधलेलं अशा अवतारातल्या केवीलवाण्या, घामेघूम बायका वॉर्डात बघितल्या की कीव येते. कानाला बांधणे हे तर या बायकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्याशिवाय आपण डिलिव्हर झालोय असं फिलिंगच येत नाही बहुतेक. शिवाय दारे, खिडक्या, एसी, पंखा हे सगळं बंद आणि पाणी मागायचीही चोरी. कारण पाणी म्हणलं की उकळून गार केलेलं, कोंबट, मचूळ पाणी हजर. सेवेसी असलेली मंडळी हौसेहौसेनी थर्मास भरभरून पाणी घेऊन येतात. खरतर पाणी शुद्ध, पिण्यायोग्य असणं महत्वाचं आहे. त्याचं तापमान हा जिच्या तिच्या आवडीचा भाग. हात धुवायला पाय धुवायलासुद्धा गरमागरम पाणी. कारण गार पाण्यात हात घालायचा नाही. ह्या बरोबर शेक-शेगडी, पोटपट्टा अशीही काही पीडातंत्र आणि छळयंत्र आहेत. भर उन्हाळ्यात रुंदच्या रुंद पोटपट्टा कसून वर रसरसते निखारे आणि त्यांचा धूर सहन करणाऱ्या बायका बाळंतपणातून तावून सुलाखून निघतात असंच म्हटलं पाहिजे. घाम फुटत असतो, पट्याखाली खाजत असतं पण नको म्हणायची काय बिशाद! जेंव्हा हे सुखकर असेल तेंव्हा हे सारं वापरायला कोणाचीच ना नाही, पण असह्य उकाड्यातही ह्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे, अनावश्यक आहे. 
गार हवा लागू नये म्हणून इतक्या कडक बंदोबस्ताची काही गरज नसते. आपल्यासारख्या विषुववृत्तीय हवामानात तर नाहीच नाही. तुम्हाला आम्हाला जितका गारवा किंवा उब लागते तितकीच डिलीव्हरीच्या पेशंटलाही लागते. त्यांनी कम्फर्टेबल असणं महत्वाचं. पण लक्षात कोण घेतो? हे असले प्रकार यथासांग केले नाहीत तर आपण आपल्या आईगिरित कमी पडलो असं या बायांच्या आयांना वाटत असतं. येणारी जाणारी प्रत्येक बाई आपल्या वकुबानुसार सूचना करत असते ते वेगळच. त्यातून पूर्वी फक्त प्रत्यक्ष भेटीत सूचना शक्य होत्या. नापसंत सूचना कानाआड करता येत होत्या. आता मोबाईलवरून व्हिडीओ कॉल लावून सूचनांची अंमलबजावणी होत आहे वा नाही ह्याचा पडताळा चालू असतो. ह्या सगळ्या भानगडीत ती नवजात आई मात्र पार गांजून गेलेली असते.
पोटपट्ट्याचा असाच अनाठायी आग्रह चालतो. त्यानी तुम्हाला बरं वाटत असेल, कंबरेला आराम वाटत असेल, तर जरूर वापरा. पण त्याचा जाच वाटत असेल, तर तो न वापरण्यानी काही बिघडत नाही. पोटपट्ट्यांनी म्हणे पोट सुटत नाही. काहीच्या काही! असं असतं तर ढेरपोट्या पुरुषांनी तत्काळ पोटं आत घालवली असती की. प्रसूतीनंतर पोट रहातं ते काय पोटात हवा गेल्यानी नाही. हवा भरून पोट वाढायला पोट म्हणजे काय ट्रकचा टायर आहे? आणि मग असलं पोट सुई टोचून आत गेलं असतं की!! पोट ओघळतं कारण, ‘बाळंतपण मानवलं पाहिजे’ या समजुतीपोटी आया आपल्या बाळंत कन्यांना खा खा खिलवतात. परिणामी वजन वाढतं. शिवाय गरोदरपणी पोटाचे स्नायू इतके ताणले जातात, इतके ताणले जातात, की ते तत्काळ मूळपदावर येउच शकत नाहीत. एखादं इलॅस्टिक अती ताणलं तर ते जसं लेवाळं होतं तसं काहीतरी होतं. स्नायूंची गेलेली ताकद आणि जोम परत मिळवण्यासाठी, व्यायाम हाच उपाय आहे. पैसेवाल्या बायकांसाठी ‘टमि टक’ नावाचं एक ऑपरेशनही आहे. पोटच का, ओघळलेले गाल, स्तन, कुल्ले सगळं काही पुन्हा जिथल्या तिथे उचलून मिळतं. अशा ऑपरेशनला ‘मम्मी मेकओव्हर’ म्हणतात. कृत्रिम कायापालटच हा. झटपट विना-व्यायाम, विना-डाएट, इलाज.
बाळंतीणीच्या खाण्यावर तर हजारो निर्बंध. ह्याचं उल्लंघन केलं तर बाळाला शी होणार, पोटात दुखणार, अशी सतत भीतीची टांगती तलवार. त्यामुळे ह्या बायका मन मारून मुकाट्यानी पानात पडेल ते गिळतात. बहुदा पहिले काही दिवस इतर पदार्थ बंद. फक्त अळणी तूप-भात. मग नंतर मेथीची अळणी भाजी, बिन तिखटामिठाची आमटी असं काहीतरी पानात पडतं. वर तोंडी लावायला ‘पोटभर का जेवली नाहीस?’ असा सवाल आहेच. असलं पथ्य पाणीही पाळायची गरज नसते. आईने भाकरी खाल्ली, गवार खाल्ली, असा अमुक पदार्थ खाल्यामुळे बाळाला तमुक त्रास होतो, असा कोणताही शोध नाही. इतक्या बेचव अन्नाला तोंड देणे कसं शक्य आहे. जर हे अन्न इतकं आवश्यक असेल तर सहानुभूती म्हणून घरच्या सगळ्यांनी बाळंतीणीबरोबर असाच आहार घ्यावा अशी माझी सूचना आहे. पौष्टिक, भरपूर, चौरस आणि चविष्ट जेवण हवं.
बस्स इतकंच.