जांभूळ काळं मूल
डॉ. शंतनू अभ्यंकर, मॉडर्न
क्लिनिक, वाई.
पिन ४१२८०३, मो. क्र.
९८२२०१०३४९
ती
तसं सगळं सोपं गेलं तिला.
पहिल्या तीन मुली होत्या, ही चौथी खेप. त्यामुळे पोटात दुखायला लागल्या लागल्या ती
घरून निघाली. दवाखान्यात आली आणि झाली देखील. शेवटच्या कळेसरशी एक काळ मिचकुट पोर
जन्माला आलं. आलं आणि कर्कश्य केकाटायला लागलं. इतकं, की त्याला वेगळं रडवयाची गरज
नाही हे त्या अनुभवी सिस्टरनी तत्काळ ताडलं. पोरगं नाळे वेगळं करून ती कात्री खाली
ठेवतेय तोच हीचा प्रश्न, ‘काय झालंय?’ सिस्टरनी बाळाची तंगडी उचलली आणि वाकुन
पाहिलं. पुरुषत्वाचं चिन्ह; ते लिंग, त्यांना लोंबकळताना दिसलं, ‘मुलगा झालाय!’
हीचा
आनंद गगनात मावेना, प्रसुती वेदना तर ती विसरलीच. चौथी खेप असल्यामुळे प्रसुती
वेदना विशेष नव्हत्याच पण संसाराच्या साऱ्या तापांवर आता तिला उतारा सापडला होता
जणु.
घालून
पाडून बोलणारा नवरा, सतत टोमणे मारणाऱ्या नणंदा आणि जावा. ‘अग्गबाई! चौथ्यांदा?’
असं म्हणणाऱ्या शेजारणी आणि ती पाताळयंत्री सासू. साऱ्यांची शस्त्र आता पार बोथट
झाल्यात, गंजल्यात जमा होती. पुत्रप्राप्तीचं हत्यार परजत आता ती संसाराची राज्ञी
होणार होती.
संसार
म्हणजे काही इस्टेट लागून गेली होती असं नाही. बिगाऱ्याचा गवंडी झालेला नवरा;
त्याची मिळकत ती काय? त्यात खाणारी तोंडं किती? तिचा आपला गाडग्या मडक्याचा आणि
चिंध्या ठिगळाचा संसार. पण कसंही असलं तरी तिच्यासाठी सारी दुनियाच होती ती. बयेचा
खोपा देखणा जरी, तरी चिमणीला आपल्याच घरट्याचा अभिमान. सगळ्या वेदना संपल्यामुळे
तिला अर्धवट झोप लागली आणि पुत्रप्राप्तीसाठी केलेले सारे उपासतापास, नवससायास,
देवदेवस्की सगळं सगळं आठवलं तिला. दरवेळी हे सारं करून देखील पदरी निराशाच पडायची.
सुईण सांगायची ‘मूलगीच हाय गं!’ आणि मग सासू जायची निघून, फुरंगटून तिच्या माहेरी.
नवरा अबोला धरायचा. गेल्या जन्मीची पापं आपण फेडतोय असं समजून तीही पदर खोचून लगेच
कामाला लागायची. पाठोपाठ झालेल्या आणि मनोमन नकोशा असलेल्या लेकींची मनापासून आबाळ
करायची. तान्हीपासून थोरलीपर्यंत, साऱ्याच मग साऱ्या घराच्या रोषाच्या बळी
व्हायच्या. पण बळी नाही जायच्या! इतकी आबाळ होऊनही सगळ्या जगल्या, खंगल्या पण
जगल्या. बाईचीच जात ती, त्यांची आई मूलगा होण्याच्या आशेला आणि या साऱ्या
आयुष्याला; चिवटपणे चिटकून राहिल्या.
अचानक
ती भेदरली सिस्टरनी एक भलं दांडगं बाळ मूलगी म्हणत तिच्या मांडीवर ठेवल्याचा तिला
भास झाला. दचकून ती जागी झाली. पाहतो तो सिस्टर चहा बिस्किटे खाण्यासाठी तिला उठवत
होत्या. साधी नव्हती बिस्किटं, ‘किरीम’ची होती. थोरलीच्या ‘हॅपीबड्डे’ला एक पुडा
आणला होता नवऱ्यानी. त्यावेळी एक खाल्लं होतं. तेव्हा भलतंच आवडलं होतं ते तिला.
आता नवऱ्यानी आठवणींनी तेच आणून दिलं होतं तर! सुरु झाली तर पुत्र प्राप्तीची
बक्षिसं, (की बक्षिशी?)
तो
बाहेर एका पोरगेलीशा नर्सनी
मूलगा झाल्याचं सांगताच क्षणार्धात बदललेला त्याचा चेहरा आणि थरारलेलं अंग, हा बदल
अगदी नजरेत भरण्यासारखा होता. त्याची छाती अभिमानाने फुलून आल्याचं नर्सनं पाहिलं
आणि तिने हसु दाबण्याचा असफल प्रयत्न केला. नर्सचा उत्फुल्ल चेहरा जणु आपल्याला मूलगा
झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आहे असं त्याला वाटलं. खरं तर तिला कालच
ऑपरेशनच्या वेळी बॉसनी सांगितलेला विनोद आठवला होता. बॉसनी सांगितलं होतं,
‘आनंदाने छाती फुलून आली’, याचं भाषांतर एक मूलगा ‘His chest turned into breast’
असं करतो. अर्थात नर्स नेमकं का हसली त्याच्याशी त्याला काही देणंघेणं नव्हतं. मूलगा
झाल्याच्या आनंद कल्लोळात तो आता पेढे आणि औषधे आणायला वळला. वळला पण आत काहीतरी
गडबड असल्याचं त्याला जाणवलं म्हणून जागीच थबकला. बंद दाराआडून वरिष्ठ नर्सचे
दरडावणं ऐकू येत होतं. बाहेर येऊन पुत्रप्राप्तीची बातमी सांगणाऱ्या पोरगेलीशा
नर्सला ती झापत होती.
‘तुला काय गं एवढी गडबड
होती, लगालगा बाहेर जाऊन मूलगा झाल्याचं सांगण्याची? तो माणूस काय गळ्यातला कंठा
काढून देणार होता का तुला? जा, आता तिला पॅडबीड दे मी सरांना फोन करतेय!’
बिच्चारी पोरगेलीशी नर्स.
पहिला पेढा तिलाच द्यायचा असं ठरवून तो दवाखान्यातून बाहेर पडला.
या
एका घटनेची किती वाट पहिली होती त्यानं. मूलगा तर हवाच होता. घरात प्रत्येकालाच.
अगदी तिला सुध्दा. सोनोग्राफीत तपासत होते तोवर सोप्पं होतं. पण आता कायद्याच्या
बडग्याने डॉक्टर मूलगा मूलगी सांगेनात. सांगेनात म्हणजे भडवे आधी ५०० घ्यायचे तिथं
५००० मागायला लागले. पण मूलगा होईपर्यंत मुली होऊ देणं परवडतंय का आत्ताच्या
जमान्यात? पण मुलाच्या आशेपायी प्रत्येक खेपेला यानी, बायकोनी आणि साऱ्या
कुटुंबीयांनीच खस्ता खाल्ल्या. जो तो विचारी ‘मूलगा न्हाय व्हय?’
यावेळी
मात्र सारे शुकुन जुळून आले. त्याच्या सुपरव्हायजरनी पत्रिका बघून मुहूर्त काढून
दिला होता. झोपायची दिशा ठरवली होती. शिवाय गुरुवारी ताक वर्ज्य, शुक्रवारचा
उपवास, ताईत आणि ३ रुद्राक्ष कारगोट्याला अशीही तयारी होती. पुढे जेजुरीला जाणं
झालं आणि तिथला कौल मिळाल्यावर याची खात्रीच पटली. नेहमी गावातल्या सिस्टरनीकडे
इंजेक्शने आणि सुईण बोलावून घरीच सगळं उरकणारा हा गडी, थेट दवाखान्यात जाऊन
बायकोचं नावच घालून आला. खणा नारळावर आणि शेरभर तांदुळावर भागायचं तिथे हजार
बाराशे खर्च होणार होते. पण देवाचा आणि मनाचा कौलच यावेळी तसा होता. शेवटी मनाची
इच्छा नियतीने फाळवली होती.
औषध
आणि पेढ्याचा पुडा घेऊन तो ‘प्रसुती विभागाचं’ दार उघडायची वाट पहात बाहेर ताटकळत
होता. गडबडीने दार उघडून ती पोरगेलीशा नर्स बाहेर आली. ह्याला बघताच थबकली, जरा
दचकली सुध्दा. पण मग काहीच न बोलता औषधं आत घेऊन गेली. तिचा अलिप्तपणा ह्याला
अपशकुनी वाटला. व्हरांड्यात उघड्या पिवळ्या बल्बच्या रणरणत्या उजेडात जिन्याच्या
पायऱ्यांवर याचीच सावली सांडत सांडत खाली गेली होती. हा ही त्याला अपशकुन वाटला.
अतीव आनंदाच्या क्षणी मन धास्तावतंच की. समोरच्या पाटीवर लाल दिव्यांच्या
मुंग्यांनी बनवलेली अक्षरं एका पाठोपाठ पळत होती. त्यांच्या लागण्या मिटण्यातून
निरनिराळे आरोग्य संदेश उमटत होते. पाटीवर अक्षरं झळकली ‘येथे लिंगनिदान चाचण्या
केल्या जात नाहीत’... ‘मूलगा मूलगी एकसमान’... आणि त्याला खुदकन् हसू आलं.
सिनिअर
डॉक्टर
सिनिअर डॉक्टर गडबडीत
लेबररूम मध्ये पोहोचले तर वातावरण गंभीर होतं. सिस्टर आणि काही ज्युनिअर डॉक्टर
बाळाभोवती कोंडळं करून उभे होते. ते मजेत तंगड्या झाडत होतं, पण पुढं काय करावं हे
कुणालाच सुचत नव्हतं. डॉक्टर येताच सारी अदबीनं बाजूला झाली ग्लोव्हज चढवून डॉक्टर
बाळ तपासू लागले. तंगड्या फाकवून सरांनी जननेंद्रिय तपासली. ती विचित्र होती. ना
धड स्त्री लिंग ना धड पुरुष लिंग असं ते बाळ होतं!!
‘Who
noticed the genital ambiguity?’ (लिंगभेद करता येत नाही हे कुणाच्या लक्षात आलं?); सिनिअर
डॉक्टर.
एक
तरुण विद्यार्थी पुढे आला.
‘पेशंटला, नातेवाईकांना
काय सांगितलंय?’; सिनिअर डॉक्टर.
‘सर ‘मूलगा आहे’ असं सांगितलं गेलं... स...र...
ते ज्युनिअर सिस्टरकडून ...’ सिनिअर सिस्टर चाचरत बोलू लागल्या.
राग, नापसंती, तुच्छता आणि काय काय व्यक्त
करणारा एक कटाक्ष सरांनी टाकला आणि त्या नर्सेस तिथे नाहीतच असे समजून ते ज्युनिअर
डॉक्टरशी बोलू लागले. बोलता बोलता सरांचे सराईत हात बाळही तपासत होते. एखाद्या
कसलेल्या गुप्तहेरानं हाती आलेल्या चार दोन धाग्यांवरून थेट गुन्हेगाराचीच गचांडी
धरावी तसं काहीतरी झालं. अमुक दिसतंय म्हणून तमुक दोष नाही, तमुक दिसतंय म्हणून
अमुक आजार नाही, असं करता करता त्यांनी काही मिनिटात संभाव्य निदान म्हणून ‘17 Hydroxylas Defeciency’ मुक्रर केलं. मघापर्यंत ‘आता पुढे काय?’ असं प्रश्न
त्या शिकाऊ डॉक्टरांसमोर आ वासून उभा होता पण सरांनी पायरी पायरीनं योग्य निदान
गाठताना पुढील तपासण्यांचा; त्यांच्या संभाव्य निष्कर्षांचा आणि त्यानुसार
ठरवायच्या पुढच्या दिशेचा एक नकाशाच जणू समोर ठेवला. सरांची बौध्दिक कसरत मनोहारी
होती. सारेच हे पाहून सुखावले, सैलावले. ही संधी साधत सिस्टरनी पुन्हा तोंड उघडलं.
‘सर, मग आता...’
‘तुम्ही
माझ्याशी बोलू नका! तुमच्या मेट्रनना माझ्याकडे पाठवा!’ सर ठामपणे म्हणाले.
सिस्टरचा चेहरा उतरला.
‘सिस्टर,
ही एक सोशल इमर्जन्सी आहे आणि तुम्ही त्यात भरपूर घोळ घातला आहे.’ ‘सोशल
इमर्जन्सी’ हा शब्द समर्पक होता. डिलिव्हरी झाली म्हटलं की सहाजिकच प्रश्न येणार,
‘मूलगा की मूलगी?’ काय उत्तर देणार होती ही बाई... तिचा नवरा...?
काय करायचं हे सांगून सर निघून गेले आणि शिकावू
डॉक्टर आधाशासारखे त्या बाळावर तुटून पडले. त्याचे फोटो झाले. तात्काळ
पाठ्यपुस्तके, संदर्भग्रंथ यांची उजळणी झाली, नेटाने इंटरनेटवरून सारं काही उतरवून
झालं. तऱ्हेतऱ्हेच्या टेस्टसाठी रक्त-लघवीचे नमुने मिळवून झाले, त्या बाटल्यांवर
नांवे घालणे, फॉर्म भरणे, लॅबला कळवणे, ज्या तपासण्या हॉस्पिटलमध्ये होऊ शकत
नव्हत्या, त्यासाठी
फोनाफोनी करून मोठ्या लॅबशी संपर्क यामध्ये वेळ कसा झर्रकन निघून गेला. शेवटी (डॉक्टर
चमूच्या मते) अत्यावश्यक असणाऱ्या तपासण्यांसाठी आगाऊ पैसे भरण्याची वेळ आली
तेव्हा त्या बाईच्या नवऱ्याला पाचारण करण्यात आलं.
तो
तो
आला तो डोळे सुजलेला, कुठेतरी हरवलेला. काही तरी प्रचंड बिनसलय एवढं त्याला जाणवलं
होतं. यंत्रवत तो खुर्चीत येऊन बसला. बाळाचा आजार, तपासण्यांची यादी, त्या
करण्याची गरज आणि खर्च यांच्या गोषवाऱ्याची एक पिंक त्या ज्युनिअर डॉक्टरांच्या
म्होरक्यांनी त्याच्यापुढे टाकली. बाळाचे अर्धवट
लिंग त्याला नीटसपणाने दाखवलं. ‘आजाराची कल्पना दिली’ अशा आशयाच्या फॉर्मवर त्याची
सही घेतली. त्यानं पैसे भरले तरच पुढे तपासण्या होणार होत्या. खर्चाचा आकडा मोठ्ठा
होता. गवंड्याच्या ऐपतीबाहेरचा होता. कशानुशा सुरात त्यानं विचारलं;
‘खर्च
केला तर लिंग नीट होईल का?’
‘नाही!
दोष खूप मोठा आहे. पण आपल्याला नेमकं कारण कळेल.’ तपासण्या झाल्या तर नेमकं कारण
कळणार होतं. त्यातून बक्कळ शिकायला मिळणार होतं. अशी केस लाखात एखादी. नेमकं निदान
होण्यात डॉक्टरांचे बौध्दिक, शैक्षणिक हितसंबंध गुंतले होते.
‘मग,
भरताय ना पैसे?’ डॉक्टरनी अधीरपणे प्रश्न केला.
लिंग
नीट होणार नाही म्हटल्यावर या घटनेतला त्याचा उरला सुरला रसही संपला. डॉक्टरांनी
परोपरीनं समजावलं, विनवलं पण तो माणूस ढिम्म होता. तो काहीच बोलेना. बोलेल कसा?
अशी बातमी काय थांबून राहते? मुलातील व्यंग आणि त्या व्यंगाबद्दलची चविष्ट चर्चा
हॉस्पिटलभर वणव्यासारखी पसरली. तो पायरीवर दिग्ड़मूढ होऊन बसला होता, तर येणाऱ्या
जाणाऱ्यांचे डोळे मिडीयाच्या कॅमेऱ्यांसारखे त्याच्यावर रोखलेले. त्याच्या
भावनांचे थेट प्रक्षेपण चाललेलं जणू. पाहता पाहता त्याच्या भोवतीची गर्दी वाढू
लागली आणि मग त्याला काय काय वाटायला लागलं. मुलगाच हवा म्हणून सारा अट्टाहास केला
आणि पदरी पडला हिजडा! जन्मजात हिजडा!! त्याला शिसारी आली. आधी त्या मुलाची, मग बायकोची
आणि मग स्वतःची देखील. आपल्या सर्वांगाला लवडे लटकाताहेत असं त्याला वाटलं आणि
उलटी दाबतच तो तडक बाथरूममध्ये शिरला.
जोरदार उलटी झाल्यावर त्याला बरं वाटलं. तोंड
धुवून तो घाम टिपतोय तसं दूर कुठेतरी त्याला त्याच्या नावाचा पुकारा ऐकू आला आणि
तो बाहेर आला. त्याला लेबर रुममध्ये बोलावलं होतं. बाहेर माणसांचे घोळके उभे होते.
कुणी मेल्यावर जमतात तसे. ह्या पृथ्वीतलावर जन्माला आलेलं, लिंगहीन बाळ त्यांना
बघायचं होतं. वेगवेगळ्या विभागातल्या नरसाळ्या पांढरे झगे मिरवत उभ्या होत्या;
बाळंत वॉर्डातल्या म्हाताऱ्याकोताऱ्या अजब नजरेने ही गजब कहानी एकमेकींना सांगत
होत्या. तोंडावर घेतलेले पदर आणि मान वळवून भागेना म्हणून कोन्यातली नजर त्याचा
पाठलाग करत होती.
‘माझी पत्नी प्रसूत होऊन पैदा झालेले; पुरुष
वा स्त्री जातीचे असे नेमके ओळखता न येणारे; २ किलो ८०० ग्रॅम वजनाचे; जिवंत मूल
ताब्यात मिळाले’; सिस्टरनी खणखणीत आवाजात केस पेपरवरचे किरटे अक्षर वाचून दाखवलं
आणि त्याला सही करण्यास फर्मावले. थरथरत्या हाताने त्याने सही केली.
‘हे,
इकडे बघा, हे तुमचे मूल’ त्यानं मान वळवली. बाळाच्या तंगड्या फाकवून धरत ती सिस्टर
बोलतच होती; ‘हे लिंग, वर वर पाहता हे मुलगा आहे असं वाटतंय पण लिंगाच्या खाली पहा
तिथे योनीमार्गासारखं काही तरी आहे. तिथे पुरुष बीज ग्रंथींची पिशवी असायला हवी.
त्यामुळे हे स्त्री जातीचं आहे की पुरुष जातीचं हे सांगता येत नाही. कळलं?’
खणखणीत आवाजातील हा लिंगनामा ऐकताना तो
ओशाळून गेला. असं मूल जन्माला घालणं हा अपराध होता, की आधीच्या कोणत्या पापाची
शिक्षा म्हणून हे जन्माला आलं होतं? त्याचं डोकं गरगरायला लागले. जगातील यच्चयावत
माणसं नागडी फिरताहेत, त्यांची लिंग मोठी मोठी झाली आहेत. आपापली इंद्रिय मोठ्या
दिमाखात मिरवत ती आपल्याला लिंगडावून दाखवत आहेत असं त्याला वाटलं. पुढे एक फारच
विचित्र आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. ते मूल सिस्टरनी दुपट्यात गुंडाळलं
आणि त्याच्या पुढ्यात धरून ती त्याला ते देऊ लागली! ते जांभूळकाळं पोर कॅहॅ कॅहॅ
केकाटत होतं आणि ह्याचे दोन्ही हात जणू शरीराला चिकटून राहिले होते. ते मूल घेऊन
तो काय करणार होता? बाहेरची टोळकी त्याला घेरतील का? ‘बघू बघू हिजडा! बघू, बघू
छक्का!! बघू बघू पावणे आठ!!!’ असा एकच गिल्ला होईल का? त्या नर्सस, त्या
म्हाताऱ्या जोरजोरात टाळ्या वाजवत ह्याच्याभोवती फेर धरून हिजड्यांचं गाणं म्हणतील
का? मग ह्याचे कपडे फेडून ‘तू कोण आहेस तेच आम्ही तपासतो’ असं म्हणतील? वर
बायकोचेही वस्त्रहरण करू मागतील?... विचारांचे थैमान माजलं मनात त्याच्या. पार
डोकं फुटून जायची वेळ आली. फक्त ते मूल पुढ्यात धरलं नर्सनी तर ही अवस्था मग ते
कुशीत घेतलं तर काय झालं असतं? त्या मुलाला हात लावायची त्रैलोक्यव्यापी भीती
जाणवली त्याला आणि अचानक ती भीती आकुंचन पाऊन काळजाएवढी झाली.
‘अगं पाजल्या शिवाय कसं गं ताब्यात देते मूल
तू नातेवाईकांना?’ मुख्य नर्स पोरगेलेशा नर्सवर खेकसली. ती ‘हो,हो’ असं पुटपुटत ते
मूल घेऊन पाजायला आत गेली आणि हा सुटला.
ते डॉक्टर
‘There
are five ways in which sex is endowed upon a person...,’ शेवटच्या खोलीत
डॉक्टर्सची चर्चा ऐन रंगात आली होती. X आणि Y या क्रोमोझोम्सनी ठरतं ते गुणसुत्रीय
लिंग. पण त्या बरहुकुम बीजग्रंथी तयार होतीलच असं नाही. क्रोमोझोम्स XY, म्हणजे
पुरुषाचे, पण बीज ग्रंथी स्त्रीची असं होऊ शकतं. त्यामुळे बीज ग्रंथीनुसार ठरतं ते
बीजग्रंथीय लिंग... पण बीजग्रंथीय लिंगानुसार अनुरूप जननेंद्रिय बनतीलच असं नाही. पुरुष
बीजग्रंथी आहेत पण आहे बाह्यांग स्त्रीचं, असंही होऊ शकतं. त्यामुळे बाह्य
इंद्रियानुसारही लिंगभेद ठरतो. शिवाय मानसिक लिंगभाव हा भिन्न असू शकतो आणि बाळाला
घरात, समाजात ‘मुलगा’ म्हणून वाढवलं जातं की ‘मुलगी’ म्हणून यावरही बरंच ठरतं...!!’
अशी अचंबीत करणारी माहिती दिली घेतली जात होती. ‘हे मूलही खरंतर स्त्रीलिंगीच होतं
पण वाढीच्या नेमक्या टप्प्यावर 21 Hydroxylase हे
एक रसायन कमी पडलं. त्यामुळे पुरुष रस वाढले. तोल ढळला. परिणामी स्त्री बीजग्रंथी
असलेल्या मुलीला बाह्यजननेंद्रिय मात्र पुरुषाची प्राप्त झाली. ती ही अर्धवट..!’
इतकं सगळं स्पष्ट झाल्यावर चर्चा रंगतच गेली.
ढासळलेल्या संतुलनाचे अन्यही दुष्परिणाम दिसत होते. बाळाचा रंग चांगलाच काळा होता.
किडनीवर, ब्लडप्रेशरवर विपरीत परिणाम झाला होता. वेळेत उपचार नाही झाले तर बाळ
मृत्यूपंथाला लागणार होते आणि नेमकं निदान झाल्याशिवाय उपचार करणार कसे? नेमक्या निदानासाठी
तपासण्या हव्यात. त्यासाठी पैसा हवा. बापानं तो अॅडव्हान्स भरायला हवा. पण बापाकडे
पैसाच नव्हता. आणि जो होता तो ह्या नपुसकलिंग्यासाठी नव्हता!
ती
‘ती
पेशंट वार्डामध्ये शिफ्ट कर गं’ सिस्टरनी हुकुम सोडला.
‘पण सिस्टर, तिनी अजून पाजलंच नाही बाळाला!’
‘काय!! अगं लाव ना तिला पाजायला’
‘सिस्टर, मी खूप सांगितलं तिला, पण ऐकतच
नाही. मुलाला हातही लावला नाही तिनी. मूल ठेवलं कुशीत तर उठून शेजारच्या लेबर
टेबलवर झोपली ती’
‘काय गं बाई ! शेजारच्या टेबलवर कशी झोपू
दिलीस तिला, आता लेबरचे बेडशीट सगळं खराब झालं असणार.’
‘पॅड दिलंय मी सिस्टर’
‘तरी काय झालं! दोन अॅडमिशन येताहेत; तू तिला
उठव; व्हिलचेअरवर घाल आणि वार्डात सोडून ये’
‘ते फिडींगच?’
‘लिहून टाक पेपरवर; बाळाला अंगावर घेण्यास
नकार दिला म्हणून, आपल्या डोक्याशी डोकेदुखी नको. आल्यापासून ह्या एकटीनीच वात
आणलाय’
थोड्याच वेळात बेंबीच्या देठापासून भुकेने
कळवळून रडणारं ते बाळ तिच्या हातात कोंबलं गेलं आणि व्हिलचेअरवरून ही वरात वॉर्डात
अवतरली.
बघ्यांची गर्दी झाली. ही भिंतीकडे तोंड लपवून
रडत होती. बघ्यांची हळुहळु भीड चेपली. प्रत्येकाने तंगडी फाकवून आणि माना वळवून
लिंग दर्शन घेतलं आणि अप्रसन्न चित्ताने ते निघून गेले. रडून रडून शेवटी थकून
उपाशीपोटीच ते बाळ झोपलं आणि रडून रडून शेवटी थकून उपाशीपोटीच त्याची आईही झोपली.
ते घर
इकडे घरी दारी हलकल्लोळ माजलेला. तिच्या
सासूनं आकाश पाताळ एक केलं. आधी लेकावर फुत्कारली. ‘तुला पाणी कोण पाजणार?’
म्हणाली तो तिरीमरीतच घरातून निघून गेला म्हटल्यावर अख्या आळीला ऐकू जाईल अशा
आवाजात सुनेला शिव्याशाप सुरु झाले. ऐकणाऱ्याची बोटं कानात जावीत अशा जहाल, जळजळीत
शेलक्या शिव्या देत ती बडबडत राहिली. सुनेच्या माहेरच्या कुळाचा उद्धार झाला. पण
एवढ्यांनीही तिचा आत्मा शांत झाला नाही. ज्वालामुखी सारखी ती आतल्या आत धुमसत
राहिली आणि काय कालवा चाललाय हे बघायला नाती घरात डोकावताच ज्वालामुखीचा स्फोट
झाला जणू. लाव्हा, राख, दगड, धूर सारं सारं बरसलं त्या अजाण मुलींवर. आपल्या आजीचा
अवतार पाहून त्या जागच्या जागी थिजून राहिल्या. लाव्हाने माखलेली दगडी शिल्प झाली
त्यांची.
गावाला हा असला तमाशा नवा नव्हता. पण आजचा
खेळ खास होता. कारणही खास होतं, चविष्ट होतं. सर्व काळ सर्वतोमुखी एकच विषय झाला.
छक्का... हिजडा... टाळी... बृहन्नडा... शिखंडी... अर्धनारी नटेश्वर... लिंग.. . योनी..
लवडा.. भोक.
ते पोर
हिनं
बाळ पाजायला नकार दिला; त्यानं बाळासाठी पाच पैसेही खर्च करायला नकार दिला आणि
बाळानं मरायला नकार दिला. भिंतीकडे तोंड करून ती अंधार होत गेली. दैवाला दोष देत
तो आतल्या आत मिटत गेला. बाळही कोमेजत चाललं. २-३ दिवस असेच गेले आणि या विचित्र
बाळ बाळंतीणीचं करायचं काय हे कुणालाच समजेना. त्याचं मन मात्र पुरतं दगड बनलं
होतं. बाळाला संपवणे एवढाच ह्यातून सुटण्याचा मार्ग होता. घरी न्यावं आणि रात्री
पुरावं केळीच्या खड्ड्यात; असं त्याच्या मनानं घेतलं. त्यानं डॉक्टरांच्या मागे
डिसचार्जसाठी घोशा लावला. पण या अवाजवी घाईमागचं कारण चाणाक्ष डॉक्टरांच्या
तात्काळ लक्षात आलं. ही मंडळी बाळाचं काही बरंवाईट करू शकतात हे त्यांनी सरळ
पोलिसांना कळवलं. पोलिसांचं उत्तर खास ‘पोलिसी’ होतं... ‘गुन्हा घडत नाही तोवर
आम्ही काही करू शकत नाही!!!’
हतभागी आई बापाचे ते हिजडं पोर धड जगेना आणि
धड मरेना, ना आई बापाची सुटका ना स्वतःची. आई अंगावर पाजेना, बाप पावडरचं दूध
आणेना. तपासण्यांचे पैसे भरेना. दररोज सकाळ संध्याकाळ त्याची आणि डॉक्टरांची एकच
प्रश्नोत्तरी;
‘डॉक्टर बाळाचं काय?’
‘तपासण्यांचे पैसे भरा तुम्ही. तुमची बायको
बाळाला पाजतच नाही त्याचं काय?’
‘पैसा भरून ते बरं होणार आहे का? त्याचे लिंग
वाढेल का?’
‘नाही’
‘मग मी पैसे भरून काय करू? तुम्ही घरी सोडा.
घरी जावून आम्ही पाजू... वरचं दूध’
‘घरी कसं सोडा? बाळ आजारी आहे.’
‘पण तुम्ही उपचार कुठे करताय?’
‘तुम्ही तपासण्या कुठे करताय?’
‘तपासण्या करून सुद्धा उपयोग नाही असं
तुम्हीच सांगितलं की.’
अशाच एका चर्चेत डॉक्टर वैतागून म्हणाले;
‘तुम्ही जर पोराला पाजत नाही, सांभाळत नाही तर ते अनाथाश्रमाला का नाही देऊन
टाकत?’
ह्या वाक्यासरशी आई बापांच्या डोक्यात लक्कन
वीज चमकली.
जणु मुक्तीचा मार्गच सापडला होता.
‘देतो की?’
इतका साधा उपाय आपल्याला आजवर कसा सुचला नाही
असं वाटून डॉक्टर अचंबित झाले.
ही ब्याद आता कोणालाच नको होती. निसर्गानी
घातलेलं कोडे तपासण्यातून उलगडणार होतं. पण तपासण्या करायला नकार देणाऱ्या बापाचं मूल
आता डॉक्टरांच्या कुतुहलापल्ल्याड गेलं होतं. जांघेमध्ये लोंबकळणारं लिबलिबीत लिंग
आणि त्याखाली ओलसर योनी यांचा समसमा संयोग घेऊन जन्मलेलं ते मूल, मुलगा होण्यासाठी
हपापलेल्या आई बापाला तर मुळीच नको होतं. डॉक्टरांची सूचना ऐकून, कोण्या परीने
जादूची कांडी फिरवावी आणि अंगावरची लूत जावी असं त्यांना झालं. अचानक स्वच्छ
निर्मळ वाटू लागलं.
एका फोनसरशी अनाथाश्रमातील माणसं आली. आली ती
बाळाला अंगडं, टोपडं, लंगोट, दुपटं, हातमोजे, पायमोजे, दुधाची बाटली, दूध पावडर
आणि उकळलेलं पाणी घेऊनच!! बाळाला त्यांनी न्हाऊ माखू घातलं, अंजारून गोंजारून
मांडीवर घेतलं आणि बाटली तोंडाला लावताच ते मूल चुरूचुरू लुचू लागलं. हा अनुभव
नवीन होता; बाळाला. त्यानी शी केली. लिंगाखालच्या टाचणी एवढ्या भोकातून शूही फवारली.
थोडा वेळ ट्यॅव ट्यॅव आळवून ते गाढ झोपून गेलं. ग्लानी ऐवजी झोपही ते पहिल्यांदाच
अनुभवत होतं. इकडे दिवसभरात मॅजिस्ट्रेट समोर Relinquishment
Deed चा सोपस्कार उरकून आई मोकळी झाली. तत्क्षणी डिसचार्ज घेऊन ती दवाखान्यातून
चालती झाली.
ते
जोडपं
चर्चच्या आवारातल्या अस्ताव्यस्त लिंबाखाली
खड्डा तयारच होता. प्रार्थना चालू होती. प्रभूची अगाध लीला उपस्थित साऱ्यांनाच
प्रतीत होत होती. त्या अलींगी मुलाचा निष्प्राण देह आता आणखी काळवंडला होता.
खड्ड्यातल्या काळ्याभोर मातीत तो जणू स्वतःहून एकरूप झाला. खड्डा बुजला. शेवटची
प्रार्थना झाली. ‘आमेन’ बरोबर सारे पांगले.
त्या
कृतकृत्य दांपत्यानी मात्र हातातलं गोरंगोमटं, गोंडस पोर त्या ओल्या कबरीवर टेकवलं
आणि बराच वेळ ते रेंगाळत राहिले. प्रभूने त्यांना हा गोंडस मुलगा तर दिलाच होता पण
शिवाय सेवा करण्यासाठी मरणासन्न नवजात लेकरूही दिलं होतं.
आकाशातल्या
बापाच्या एक अनाथ, पंगू, निरपराध, मरणासन्न लेकराला; साक्षात प्रभू इतक्याच मायेनं
सांभाळण्याची, अखेरपर्यंत त्याची सेवा सुश्रुषा करण्याची संधी, त्यांना जणू
प्रभूनेच दिली होती. ते अनाथ लेकरू आता त्या लिंबाखाली चिरविश्रांती घेत पहुडलं
होतं. जेमतेम काही दिवसांचे आयुष्य त्याचं पण त्याची सेवा करण्यात, त्याला दूध
पाजण्यात आणि त्याचं दिवसागणिक खंगत जाणारं शरीर ममतेनं कुरवाळण्यात त्यांना
आत्मिक समाधान लाभलं होतं. जणू येशूच त्या मुलाचं रूप घेऊन आला होता. निश्चितच ही
सारी प्रभूची लीला होती.
प्रभूचीच
ही लीला होती खास. अन्यथा मरणासन्न तान्हुल्याची शुश्रुषा करण्याची इच्छा त्यांनी
अनाथाश्रमाकडे व्यक्त करायला आणि हे मूल दाखल व्हायला एकच गाठ पडली नसती. प्रभूची
लीला अगाध आहे खास. येशूकडे नवस बोलताच त्या दांपत्याला दिवसही राहिले.
नवसाप्रमाणे मुलगाही झाला. पण प्रश्न होता ‘मरणासन्न तान्हुल्याची काळजी घेऊन’ नवस
फेडण्याचा. ह्या काळ्याभोर बाळाच्या रुपानं जणू प्रभूने तीही सोय करून दिली.
प्रभो, अगाध आहे तुझी लीला!!