Tuesday 14 August 2018

पाळी मिळी गुपचिळी ह्या माझ्या पुस्तकातील माझे मनोगत.


मनोगत
चार पाच वर्षापूर्वी असाच क्लिनिकमध्ये बसल्या बसल्या समोरचा कॉम्प्यूटर चाळत होतो. अचानक एक अर्धवट लिहिलेला लेख पुढे आला. नाव होते ‘पाळी मिळी गुपचिळी!’ वेळ होता, काय लिहायचे ते पक्के होते म्हणून सहजच  बसल्याबसल्या मी तो लेख पूर्ण करून टाकला. पूर्ण केला आणि फेसबुकवर टाकला. तो वाचला डॉ. अमोल जाधव या  माझ्या विद्यार्थ्याने. त्याने तत्परतेने तो व्हाट्सअॅपमुखी घातला. मग काय विचारता, हा लेख वणव्यासारखा पसरला.  हा हा सुद्धा न म्हणता तो सर्वत्र वाजू लागला, गाजू लागला आणि बघता बघता गर्जू सुद्धा लागला. स्त्रिया स्वतःला आणि इतर कुटुंबीय स्त्रियांना, पाळीच्या काळात अशुद्ध, अपवित्र वगैरे समजतात हे किती अर्थहीन आणि मूर्खपणाचे आहे हे त्या लेखात लिहिले होते. हा मुद्दा अगदी वर्मी लागला सगळ्यांच्या. महाराष्ट्रातल्या प्रतिथयश वर्तमानपत्रांनी या लेखाची दखल घेतली, कित्येक जिल्हापत्रांनी तर तो संपूर्ण छापला. चॅनेलवरती या विषयावर चर्चा झडल्या आणि एकूणच वातावरण ढवळून निघाले.
लेखासोबत माझा नंबरही होता. त्यामुळे महीन्याभरात चार-पाचशे फोन आले मला. लेख वाचून माणसे इतकी प्रभावित होत की वाचन संपल्या संपल्या मला फोन केल्याशिवाय त्यांना रहावत नसे. यातले ९०% फोन स्त्रियांचे होते. पण या बरोबर एक गोष्ट नंमूद केलीच पाहिजे, वेळीअवेळी एकही फोन आला नाही. सगळ्यांनी, ‘डॉक्टर, मी अमुक अमुक, आत्ता तुमच्याशी बोलू का? वेळ आहे ना?’ अशीच सुरुवात केली. हा धक्का सुखद होताच पण या पेक्षाही धक्कादायक होता तो बोलणाऱ्या महिलांचा मोकळेपणा. अर्थात बोलणे फोनवर, एका अदृश्य ‘आवाजाशी’ होत होते हे खरेच. पण एका अनोळखी पुरुषाची आपण बोलतोय याचे कोणतेही दडपण न घेता त्या बोलत होत्या; पाळी संदर्भातले आपले अनुभव, व्यथा, वेदना सांगत होत्या; पाळी दरम्यान देवाधर्माचे काही करण्यासाठी माझी परवानगी मागत होत्या; मी, ‘बेलाशक!’ असे उत्तर देताच, उत्फुल्ल होत होत्या आणि ‘तुमच्या सल्ल्याप्रमाणेच आम्ही वागलो, आता खूप मोकळे मोकळे वाटते आहे’, असेही पुन्हा पुन्हा फोन करून सांगत होत्या. एकीनी, ‘पाळी अपवित्र नसते असे सांगून तुम्ही आमची हक्काची सबब घालवली’, अशी गमतीशीर तक्रार केली. एक बाई म्हणाल्या, ‘मी शिक्षिका आहे’, म्हटले, ‘व्वा, तुमच्या विद्यार्थिनीपर्यंत हा विचार नक्की पोहोचवा’. मी असे म्हणताच, त्यांनी त्या बालक मंदिरात शिक्षिका असल्याचा खुलासा केला. कित्येक डॉक्टरांना हा लेख इतका  भावला  की त्यांनी त्याचे फ्लेक्स करून दवाखान्यात लावले. एकूणच ह्या पहिल्याच लिखाणानी मजा आली, योग्य तो परिणामही झाला. एरवी निव्वळ नकारात्मक गोष्टींसाठी सतत चर्चेत असलेल्या या समाजमाध्यमांची सकारात्मक ताकद माझ्याही प्रथमच लक्षात आली.
असाच रमत गमत लिहित होतो. पुढे वेळोवेळीच्या लिखाणामुळेच मृण्मयी रानडेंशी परिचय झाला. ‘दिव्य मराठीच्या’ महिला पुरवणीत, ‘मधुरीमा’त, त्यांच्याच आग्रहाने मी नियमितपणे ‘अर्थ स्त्री आरोग्याचा’ हे पाक्षिक सदर लिहायला लागलो. मग काय, लिखाणासाठी विषय हेरणे; खमंग, खुसखुशीत, चटकदार लिहिणे;  ‘मधुरिमा’पाठोपाठ ते फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर टाकणे आणि कौतुकाचे फोन घेत बसणे असा सिलसिलाच चालू झाला. हळूहळू प्रत्येक पोस्टपोटी पाच-सहाशे लाईक्स आणि दीडदोनशे शेअर, कमेंट्सचा गल्ला मी सहज गोळा करू लागलो.
मी लिहित गेलो, लोकं आवडीने वाचत गेली आणि ‘पुढे काय?’ असे विचारू लागली. त्यामुळे  सर्वात महत्वाचे आभार माझ्या वाचकांचे. परिचितांनी आणि अपरिचितांनीही वेळोवेळी दाद दिली, शाबासकी दिली, फेसबुक अन् व्हॉट्सअॅपवर भरभरून प्रतिसाद दिला आणि अधिकाधिक लिहायला प्रोत्साहित केले. डॉक्टरांनी तर सक्रीय दाद दिली. कित्येकांनी यातल्या कित्येक लेखांच्या झेरॉक्स प्रती काढून रुग्णांना वाटल्या, काहींनी सूचना केल्या, सुधारणा सुचवल्या, नवे नवे विषय सुचवले आणि मला सतत लिहिते ठेवले. वाचकांचा सततचा, प्रेमळ आग्रह  हीच माझ्या लेखनाची प्रेरणा.
पण या साऱ्यातील मनावर ओरखडा उमटवणारी प्रतिक्रिया म्हणजे, ‘मराठी खूप छान लिहिता हो तुम्ही!’, हे कौतुक. असे कुणी म्हटले की मला खूप वाईट वाटते. एखादा माणूस आपली मातृभाषा उत्तम लिहू शकतो यात कौतुक करण्याजोगे काय आहे. पण याचे कौतुकच काय पण आभिमान आणि आश्चर्य वाटावे इतक्या वेगाने आपल्या भाषेची अवस्था खालावत चालली आहे. असली स्तुतिसुमने म्हणजे उत्तम भाषा दुर्मिळ होत असल्याचे लक्षण. माझ्या साध्याशा कारागिरीला जर हे लोक उत्तम म्हणत असतील तर त्याचा अर्थ मराठीत उत्तमोत्तम लिहिणारे फारच कमी होताहेत. फार भयावह गोष्ट आहे ही. असो.
यातील लेख हे शास्त्रीय विषयावरचे आहेत. थेट बुद्धीला विचारांना, विवेकबुद्धीला आणि तर्काला आवाहन करणारे आहेत. काही आव्हान देणारेही आहेत त्यामुळे आशय महत्वाचा आहे. त्याला मुळीच धक्का लागता कामा नये. पण लिखाण चटपटीत आणि वाचकांना सहज आवडावं म्हणून काही हटके प्रयोगही मी केले. सव्यंग मूल जन्माला आलं तर ती कुटुंबाच्या दृष्टीने मोठी आपत्तीच असते. पण अशाच आणीबाणीच्या प्रसंगी सदसद्विवेकबुद्धी गहाण पडते. चुकीचे निर्णय घेतले जातात किंवा हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. अशा परिस्थितीत काय करावं, विचार कोणत्या दिशेनं करावा, हे ठसवण्यासाठी मी कहाणी लिहीली, ‘व्यंगोबानाथाची कहाणी’. ह्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. ती कहाणी लिहिताना मलाही मजा आली. कहाणीच्या शब्दातील पारंपारिक लय, पद्यमय गद्य असं त्याचं स्वरूप; त्यातील यमक, अनुप्रास, उपमा, दृष्टांत; पात्रांचे अचानक होणारे वाट्टोळे आणि वसा वसल्यानंतर होणारे भाग्योदय; आटपाट नगरातून होणारी सुरवात आणि साठा उत्तरीच्या कहाणीचा पाचा उत्तरी होणारा सुफळ संपूर्ण प्रवास; हे सगळं सगळं सव्यंग मूल जन्माला आलेल्या हतबल कुटुंबाची मानसिकता दाखवण्यासाठी झक्कपैकी वापरता आलं. एखाद्यावेळी ह्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर डॉक्टरांची, वैद्यकीची मर्यादा दाखवायलाही कहाणी हा फार सोयीचा आकृतिबंध वाटला मला.
जी गोष्ट कहाणीची तीच कीर्तनाची. इथे एक कीर्तनही आहे. खरतर कीर्तन ही वाचायची गोष्ट नव्हे, करायची किंवा ऐकायची गोष्ट. मात्र संपादकांना हा आकृतिबंध वाचायला म्हणूनही सुयोग्य वाटला आणि ह्या कीर्तनाचाही पुस्तकात समावेश झाला. इथे कीर्तनकारानी आख्यान लावलेलं आहे ते बिनटाक्याच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचं. कहाणीत जशी काही खास गमत आहे तसच कीर्तनाचीही खास गमत आहे, एक लहेजा आहे. इथे मग पारंपारिक ओव्या, अभंगांची नवीन विषयाशी सुसंगत अशी मोडतोड केली आहे.
‘सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो;
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.’चं
मग ‘आवडो’ झालं. बुवा सुरवातच मुळी ही आर्या गाऊन करतात. वेगवेगळ्या संततिनियमन साधनांच वर्णन बुवा असं करतात...
संत म्हणाले संयम पाळा,
महंत म्हणाले मोजके दिवस टाळा,
सज्जन म्हणाले बाहेरच गाळा,
धर्ममार्तंड म्हणाले, चूप, अहो बोलता काय, तुमच्या जिभेला काही हाड?
जाउ दे, हा विषयच टाळा
सामान्यजन सगळ्यात हुशार, ते म्हणाले,
तुमचं ठरलं की सांगा तोवर, आमचा चालूदे कामुक चाळा!!
         मुक्ताबाईचा अभंग इथे वेगळ्याच रुपात दिसतो.
विश्व रागे झाले वन्ही, पुरुष सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्र झाले क्लेश, पुरुषी मानावा उपदेश
अस्सल मऱ्हाठी तऱ्हेचे हे भाषिक वळण वापरता आलं ते मी मराठीत लिहित होतो म्हणून.
मराठीत शब्दाचं दुर्भिक्ष्य आहे असं सततच सांगितलं जातं. हे खरंही आहे. पण ह्या लिखाणात तरी मला ती अडचण फारशी आली नाही . हे शास्त्रीय विषयावरचं लिखाण असलं तरी जनसामन्यांसाठी आहे. त्यामुळे तितपत शब्दसंपदा उपलब्ध आहे किंवा थोडेसे कष्ट घेऊन चपखल शब्द शोधता येतो. Test आणि Screening test असे दोन शब्द आहेत Test साठी प्रतिशब्द सहाजिकच चाचणी. परीक्षा असे अनेक आहेत. पण Screening test? हा तर पारिभाषिक शब्द आहे. त्याला विशिष्ठ अर्थ आहे. screening टेस्ट म्हणजे अशी टेस्ट की ज्यात नेमके निदान होत नाही पण शंका, शक्यता, आणि अधिक तपासणीची आवश्यकता सुचवली जाते. अचानक मला शब्द सापडला, ‘चाचपणी’. चाचणी म्हणजे खात्रीची टेस्ट आणि चाचपणी म्हणजे अंदाज व्यक्त करणारी टेस्ट.
काही नवीन शब्द घडवावे लागले. उदाहरणार्थ Evolution ला उत्क्रांती हा शब्द सर्वमान्य आहे पण Evolutionaryला काय म्हणावे बरे. दरवेळी उत्क्रांती विषयक, उत्क्रांतीबद्दल असे किती वेळा म्हणणार? मग शब्द बनवला ‘औत्क्रांतिक’. उदास, उद्योग किंवा उपचारचे रूप जसे अनुक्रमे औदासिन्य, औद्योगिक किंवा औपचारिक असे होते, तसे हे औत्क्रांतिक. Arbitrary या शब्दाला मी असाच अडखळलो पण विचार करता करता, लिखाणाच्या ओघात, मला कितीतरी शब्द सुचले. असंबद्ध, वाट्टेल ते, काहीच्याकाही, आगापीछा नसलेला, शेंडाबुडखा नसलेला...असे पाच निरनिराळे शब्द मला त्या त्या संदर्भात योजता आले आणि ते तिथे फिट्ट बसले. Strategy हाही असाच चकवा देणारा शब्द. ह्यालाही व्यूह, धोरण, डाव, कावा, पावित्रा, तऱ्हा असे अनेक पर्यायी शब्द मला सापडत गेले. त्या त्या ठिकाणी ते चपखल बसले.
एक मात्र सुरवातीलाच ठरवले होते, उगाच अमका आजार आणि तमके उपचार असे साचेबद्धपणे काहीही लिहायचे नाही. अभ्यासाची पुस्तके भाषांतरायची नव्हती मला. प्रत्येक आजाराला एक सामाजिक, कौटुंबिक, भावनिक, आर्थिक बाजू असते. ही देखील महत्वाची असते. चुकीचे निदान किंवा चुकीच्या औषधयोजनेइतकाच चुकीचा दृष्टीकोनही हानीकारक. तेंव्हा ह्यावर जोर हवा असे माझे मत. विज्ञान आणि समाजाच्या सीमारेषेवरील विषय हाताळताना,  विज्ञानवादी, मानवतावादी, समानतावादी सूर उमटायला हवा हीच माझी धारणा. म्हणूनच माझ्या  सीझरबद्दलच्या लेखात सद्य व्यवस्थेच्या मर्यादांवर भाष्य येते किंवा सोनोग्राफीवरच्या लेखात सद्य विज्ञानाच्या मर्यादा अधोरेखित केल्या जातात. म्हणूनच ग्रहणाबद्दलच्या लेखाला  ‘संपेल का कधीही हा खेळ बावळ्यांचा?’ किंवा गर्भसंस्काराचा पर्दाफाश करणाऱ्या लेखाला  ‘डोंबलाचे गर्भसंस्कार’ अशी जहाल शीर्षके येतात. ‘प्रेग्नन्सी आणि सेक्स’सारख्या लेखात पुरुषांनाच जास्त सूचना येतात,  ‘उरोज कुंभापरी’त अमेरिकेतील कंचुकीदहनाच्या कार्यक्रमाचा उल्लेख येतो आणि  ‘अग्गोबाई! अरेच्च्या!!’ सारख्या लेखात स्त्रीवादी (स्त्री)शरीररचनेचा  उल्लेख येतो. कॉलेजमध्ये असताना लोकविज्ञान संघटनेत आणि पुढे अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम केल्याचा हा संस्कार. तोच माझ्या लिखाणात उतरत गेला आणि लोकांना लिखाण  आवडत गेले. 
माझ्या ब्लॉगवर सगळे लिखाण मी टाकत होतोच, पण तरीही पुस्तकरूपात ते उपलब्ध व्हावे असा सगळ्यांचाच आग्रह होता. ब्लॉगची पहूंच तशी मर्यादित. शिवाय भेट द्यायला, घ्यायला, वाचायला, संग्रही ठेवायला, चर्चा करायला, (प्रसंगी जाळायला) पुस्तक सोयीचे. पुस्तक कसे घट्टमुट्ट, प्रत्यक्ष अस्तित्वात असलेले, हाताळता येईल असे, उघडताच अंगीचा दरवळ उधळणारे; ब्लॉग बापुडे केवळ प्रतिमा.  भासमान जगातल्या माझ्या अ-क्षर कामगिरीचा, पुस्तकरूपाने प्रत्यक्ष जगात प्रवेश व्हायलाच हवा अशी मागणी वाढत गेली आणि मी प्रकाशकाच्या शोधाला लागलो. पहिल्याच प्रयत्नात विश्वकर्मा प्रकाशनचे सी.ई.ओ. श्री. विशाल सोनींनी पसंती कळवली आणि पुस्तक सुस्थळी पडल्याने मी निश्चिंत झालो.
‘विश्वकर्मा’चे संपादक श्री. मनोहर सोनावणे सहायक  संपादक संदीप तापकीर, तसेच मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह श्री. संतोष पाटील यांच्या प्रोत्साहनाचा आणि मौलिक सूचनांचा विशेष उल्लेख करायला हवा. अतिशय थोडक्या वेळेत त्यानी हे पुस्तक निटसपणे जन्माला घातले. श्री. गिरीश सहस्रबुद्धे यांची चित्रे मी दै.सकाळ मध्ये पहात असे आणि मुखपृष्ठासाठी  असाच चित्रकार लाभावा अशी इच्छाही मनात येई. एके दिवशी श्री. सोनावणे यांनी श्री. गिरीश सहस्रबुद्धे हेच मुखपृष्ठाचे काम करत असल्याचे सांगितले आणि सुखद धक्का दिला. माझे आणि विश्वकर्माचे सूर जुळले आहेत ते असे आणि इतके. विश्वकर्माच्या टीममधील मुद्रितशोधनाचे किचकट काम करणाऱ्या  प्रीता कानिटकर, अक्षरजुळणी करणाऱ्या कविता पासलकर व पुस्तकाची मांडणी व सजावट करणाऱ्या चैताली नाचणेकर यांचे आभार.
पुण्याच्या ज्या बी.जे मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलच्या प्रांगणात मी डॉक्टर झालो, तिथल्या शिक्षकांना, पेशंटना आणि मित्रमैत्रिणींना विसरून चालणार नाही. आजचे हे माझे लिखाण म्हणजे माझ्या पाठीशी असलेली त्यांचीच पुण्याई आहे. तेंव्हा हे लिखाण त्यांनाच सादर अर्पण.
आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा माझा मुळीच परिचय नाही. त्यांचे सार्वजनिक काम हीच त्यांची ओळख. विश्वकर्माच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्या भरगच्च दिनक्रमातून वेळ काढून प्रस्तावना लिहीली हा मी माझा सन्मान समजतो. सेवाव्रती डॉ. राणी बंग; ‘देऊळ’, ‘प्रकाश बाबा आमटे’, ‘सिंघम’ फेम स्टार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि महाराष्ट्र स्त्रीआरोग्य व प्रसूतीतज्ञ संघटनेच्या  अध्यक्षा डॉ. रोहिणी देशपांडे यांनी मोठ्या आत्मीयतेने, शुभेच्छापर लिहिलेल्या चार ओळींनी, पुस्तकाला वेगळेच वलय लाभले आहे.
सरते शेवटी माझी मुले, डॉ अनन्या आणि चि. मोहित, पत्नी डॉ. रुपाली आणि आई-बाबांचे आभार मानतो आणि थांबतो.


No comments:

Post a Comment