कळत नकळत
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
मूल होणे ही कितीतरी
आनंदाची बाब आणि त्यासाठी प्रसूतीवेदना सहन करणे हे मात्र वैतागाचे, चिंतेचे,
भीतीचे आणि सीझरची दुराग्रही मागणी करण्याचे कारण. ह्या कळा मोठ्या विलक्षण.
भल्याभल्यांची खोड जिरवणाऱ्या. अशा कळांनी बेजार झालेल्या नवयौवनेला पहाताच, करुणा
वगळता कोणताच भाव मनात उमटत नाही.
जीवनावश्यक आणि नैसर्गिक
अशा इतर सगळ्या क्रिया न दुखता, सुरळीत, पार पडत असताना मूल होतानाच का दुखावे, हे
एक कोडेच आहे. श्वास घेताना, हृदयाचे ठोके पडताना, शी-शू होताना, अन्न पचताना,
अजिबात दुखत नाही. पण जन्मवेणा मात्र प्राणांतिक. स्त्रीला ही वेदना सुसह्य व्हावी
म्हणूनच की काय, समाजानी मातृत्वाचे, वेदनेचे, उदात्तीकरण केले आहे. जनमानसात हे
उदात्तीकरण इतक्या टोकाला पोहोचले आहे की वेदनारहित प्रसूती शक्य असतानाही तो
पर्याय क्वचितच विचारात घेतला जातो. वापरणे तर दूर की बात.
कधी कधी वेदनेबरोबरच प्रचंड
भीती असते. अशी बाई कुण्णाकुण्णाचं ऐकत नाही. अजिबात सहकार्य करत नाही. डॉक्टरांच्या
भाषेत ह्याला म्हणतात Maternal distress. लवकरच नातेवाईक वैतागतात. आईवडील
वैतागतात. कळवळणारी पोटची पोर त्यांना बघवत नाही. काही तरी करा असा तगादा लावतात.
याला म्हणतात Relative’s distress. मग लवकरच डॉक्टर वैतागतात. हा सगळा त्रास आणि
त्रागा, कधी एकदा आणि कधी एकदाचा संपेल असे सगळ्यानाच होऊन जाते. यावर सहसा सीझरचा
तोडगा काढला जातो. इथे वेदनारहित प्रसूती हा
खरे तर नुसताच पर्याय नव्हे तर, उत्तम पर्याय ठरू शकतो. पण हे तंत्र जाणणारे आणि अंमलात
आणणारे डॉक्टर कमी आहेत. या बद्दलची समजही कमी आहे. पर्यायानी गैरसमज भरपूर.
लोक म्हणतात, ‘फुकट किंवा
सहज काही मिळाले की त्याची किंमत रहात नाही. जरा पोटात दुखूनबिखून मूल झाले की
त्याची किंमत कळते!’ शिवाय ‘आपल्याला’ जे दुखूनखुपून झाले ते ‘हिला’ सहजप्राप्य
होतेय ह्याची किंचितशी असूयाही मनात असते.
प्रसूतीवेदना कमी करण्याचे
बरेच उपाय आहेत. श्वासोच्छवासाच्या तंत्रांपासून ते औषधांपर्यंत. ह्याची चर्चा
आधीच डॉक्टरबरोबर, भूलतज्ञांबरोबर करणे उत्तम. प्रत्येक बाईची वेदना आणि सहनशक्ती
भिन्न भिन्न असते, त्यामुळे कुणाला किती, कधी आणि कोणती भूल द्यायची, हे त्या त्या
वेळी ठरवावे लागते. आधी भीती वाटून सुद्धा ऐनवेळी आपण ह्या वेदना सहन करू शकतो हे
लक्षात घेऊन वेदनाहरण नाकारण्याचा अधिकार आणि पुढे वाटले तर पुन्हा मागण्याचा
अधिकार पेशंटला असतो.
वेदनारहित प्रसूतीसाठी
सर्वोत्तम आणि खात्रीचा पर्याय म्हणजे एपिड्यूरल अॅनाल्जेसिया. अॅनाल्जेसिया आणि
अॅनॅस्थेशिया मध्ये फरक आहे. अॅनाल्जेसिया म्हणजे ‘वेदना’हरण तर अॅनॅस्थेशिया
म्हणजे ‘संवेदना’हरण.
एपिड्यूरल अनाल्जेसिया ही
एक भूल देण्याची पद्धत आहे. वेदनारहित प्रसूतीसाठी ही उत्तम समजली जाते. पाठीच्या
दोन मणक्यांच्या मधून सुई सरकवली तर आतआत
अगदी मज्जारज्जूपर्यंत जाते. अशीच सुई सरकवली जाते, पण अगदी वरवर.
मज्जारज्जूपर्यंत ती नेलीच जात नाही. ह्या मज्जारज्जूला गवसणीसारखे एक कव्हर असते.
ह्याला म्हणतात ‘ड्युरा’. ह्यालाही धक्का लागणार नाही अशा बेताबेताने ही सुई आत
सरकवली जाते. ड्युराच्या जरा बाहेर सुईचे टोक पोहोचले की त्यातून एक प्लॅस्टिकची नळी
(कॅथेटर) आत सरकवून सुई काढून घेतात. हे
कौशल्याचे काम. आता ही नळी शेपटासारखी
बाहेर लोंबत रहाते. नळीतून गरजेप्रमाणे केंव्हाही हवे ते औषध देता येते. हे त्या
ड्युराच्या बाहेर-बाहेर पसरते. ड्युरातून बाहेर पडणाऱ्या नसा सुन्न करते. म्हणून
हा ‘एपीड्युरल’ अॅनाल्जेसिया. कमीतकमी दुष्परिणाम आणि अधिकाधिक फलप्राप्ती असा हा
समसमा संयोग.
ही भूल असली तरी ही संपूर्ण भूल नाही. ह्याने
कळा थांबत नाहीत. कळा येतात, पण त्यांची जाणीव होत नाही. म्हणूनच ही ‘कळत-नकळत’
प्रसूती. बाई खात-पीत, हिंडत-फिरत, टीव्ही पहात, गप्पा मारत, स्वेटर विणत, ‘मधुरिमा’ वाचत ई. ई. असू शकते. चालताना पायात थोडा अशक्तपणा
जाणवू शकतो एवढेच. जेंव्हा बाळाचे डोके अगदी खाली उतरते आणि आईनेच बाळ बाहेर ढकलायची
वेळ येते तेंव्हा जोर जरा कमी पडतो. मग कधीकधी चिमटा लावून (Forceps) किंवा वाटी
लावून ( थ्री इडीयट्स फेम Ventouse Method) डिलिव्हरी करावी लागते.
एपिड्यूरल प्रमाणेच स्पायनल
प्रकारच्या अनेस्थेशियातही वेदनारहित प्रसूती होऊ शकते. पण तो दीर्घकाळ देता येत
नाही आणि एपिड्यूरल इतका विश्वासू साथीदार नाही. याशिवाय खुब्यावर किंवा दंडात
देता येतील अशी वेदनाशामक इंजेक्शने, ‘टेन्स’ वगैरे पद्धती आहेत. पण ह्या साऱ्या
यथातथा. वेदना खरोखर थांबतात त्या एपीड्यूरलमुळेच. पंधरा वीस मिनिटात दुखणे जवळ
जवळ ८०%ने कमी होते. प्रसूती दरम्यान पेशंटच्या इच्छेनुसार औषधाचे प्रमाण कमी
जास्त करता येते. सीझर लागले तरी त्याच नळीतून आणखी औषध देऊन ऑपरेशन करता येते.
वेगळी भूल द्यावी लागत नाही.
एपीड्युरल ही पद्धत अतिशय
सुरक्षित आहे पण, यातले अल्पस्वल्प धोकेही आपण समजावून घेऊया.
एपिड्यूरलमुळे बीपी कमी होते. बाळाकडेही मग कमी रक्त जाते.
यासाठी सलाईनचा अभिषेक चालू ठेवावा लागतो. शक्यतर डाव्या कुशीवर झोपले की बाळाकडे
जाणारा रक्त प्रवाह वाढतो. एपिड्यूरलमुळे बाळावर कोणताही थेट दुष्परिणाम होत नाही.
वापरली जाणारी सुई जरा जाड असते त्यामुळे ती जागा थोडी दुखते. पण हे दुखणेही
तेवढ्यापुरतेच. यामुळे नंतर कंबरदुखीचा आजार जडत नाही. जर ड्युराला छिद्र पडले तर पुढे
काही काळ डोकेदुखीचा त्रास होतो. झोपून राहिले आणि भरपूर पाणी प्यायले की हा त्रास थांबतो. या प्रकाराने कळा थांबतील,
प्रसूतीला वेळ लागेल आणि डॉक्टरनी सीझर करायला आयतीच सबब सापडेल असाही एक गैरसमज
प्रसृत आहे. एपिड्यूरल दिल्याने असे काहीही होत नाही. जगभरच्या अनेक अभ्यासात हा
मुद्दा स्पष्ट झाला आहे. तेंव्हा दिलाच एपिड्यूरल आणि लागलेच जर सीझर, तर कृपया
दवाखान्याच्या काचा फोडू नयेत.
आणि हो, एपिड्यूरलचा आणखी एक तोटा आहे, एपिड्यूरल दिल्याने,
‘बाळंतपणाच्या आभाळवेणा सोसून मी तुला जन्म दिला आणि आता हेच का पांग फेडतो/फेडते
आहेस?’ असले फिल्मी डायलॉग तुम्हाला मारता येत नाहीत.
.
No comments:
Post a Comment