Thursday 23 August 2018

मेनोपॉॉज


मेनोपॉज
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

मेनोपॉज, ऋतूसमाप्ती, रजोनिवृत्ती म्हणजे पाळी बंद होणे. हे आज काल फार महत्वाचे झाले आहे. कोणे एके काळी मदर इंडियांची रेलचेल  असलेला भारत आज मिस इंडिया म्हणून मिरवतो आहे. आपल्या लोकसंख्येचे सरासरी वय सध्या  तरूण झाले आहे. पण आता आयुर्मानही वाढते आहे. लोकं अधिक काळ जगत आहेत, तेंव्हा आजच्या मिस इंडिया ह्या उद्याच्या ‘मदर इंडिया’च नाही तर ग्रँडमदर इंडिया ठरणार आहेत. त्यामुळे म्हाताऱ्या बायका आणि त्यांचे आरोग्य विषयक विशेष प्रश्न ह्यांचे प्रमाण वाढणार आहे. या बाबतीत आपण सजग असायला हवे.
वय वाढले की स्त्रीच्या शरीरातला स्त्रीबीजाचा साठा संपतो आणि पाळी जाते. स्त्रीबीज नव्याने निर्माण होत नसते. जन्मतः सोबत एक ठराविक साठा आलेला असतो. त्यातील साडेतीनशे, चारशे  बीजे प्रत्यक्षात पाळीच्या चक्रात विकसित होतात आणि बाहेर सोडली जातात. बाकीची बीजे सतत वाळत जात असतात. सगळी संपली की पाळी जाते. कधी कधी पिशवी आणि बीजग्रंथी काढल्या, कँन्सरसाठी शेक दिले (Radiotherapy) म्हणूनही पाळी जाते. परिणाम साधारण सारखाच होतो.
सुमारे ४५ ते ५५ च्या दरम्यान पाळी जाते. रक्तातल्या नात्यातल्या स्त्रियांची (आई, मावशी, बहीण) पाळी साधारण सारख्याच वयात जाते. क्वचित चाळीशीच्या आतही पाळी निसर्गतः बंद होते, ही अकाली ऋतूनिवृत्ती म्हणायला हवी.
पाळी जाण्याची प्रक्रिया वर्ष दोन वर्ष जारी असते. ‘...अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे गं!’ अशी ही अवस्था. साधारणपणे दोन पाळ्यातील अंतर वाढत जाते, स्त्राव कमीकमी होत जातो आणि अंतिमतः पाळी बंद होते. मेनोपॉज झालाय हे ठरवायला कुठली विशेष टेस्ट लागत नाही. वय ४५ च्या पुढे आहे आणि पाळी वर्षभर बंद आहे एवढी माहिती पुरेशी आहे.
निम्या बायकांना तरी ह्या कालावधीत काही ना काही तरी त्रास होतो. तक्रारींचा पाढा मोठा आहे. गरम वाफा अंगावरून गेल्यासारखे वाटणे ही प्रमुख तक्रार. घटकेत घाम तर घटकेत थंडी वाजते. रात्रीही या तक्रारींनी जाग येते. झोप मोडते. निद्रानाश जडतो. योनीमार्ग कोरडा होतो. संभोग, सुखाचा रहात नाही. तिथली अंतःत्वचा पातळ होते त्यामुळे वारंवार इन्फेक्शन होतात. लघवीची अंतःत्वचाही पातळ होते. तिथेही वारंवार इन्फेक्शन होतात. लघवीवरचे नियंत्रण कमी होते. अंगदुखी, चिंता, नैराश्य, काम-निरसता, ई. तक्रारी बऱ्याचदा आढळतात.
पाळी बंद झाल्यावर हाडे ठिसूळ होतात. पाळी जाताच सुरवातीच्या पाच सहा वर्षात वेगाने अस्थी-विसर्जन घडते! मग हाडे सहजपणे  मोडतात. खुबा, मनगट, कंबर इथे वीकपॉइंट निर्माण होतात. आज्या आपल्या नातवंडांना, ‘हात, पाय मोडून घेशील, सांभाळून!’ असे सतत झापत असतात. खरे तर नातवंडांनी आज्जीला असे म्हणायला हवे.

मानसिक दृष्ट्याही हे वय मोठे त्रासाचे. आता मुले मोठी झालेली असतात. अचानक त्यांची आईची गरज संपते. नवऱ्याने काय जे कर्तृत्व गाजवायचे असते तेही गाजवून झालेले असते. यापुढे त्या आघाडीवरही फारसे उत्साहवर्धक काही घडण्याची शक्यता संपते. याच सुमारास घरातल्या ज्येष्ठांच्या आरोग्य विषयक तक्रारी उचल खातात. त्यांना सेवेची निकड भासू लागते. तीही जबाबदारी बहुधा या स्त्रीवरच येते. माहेरची जिवाभावाची माणसे, आई, वडील, काका, मामा यांनाही जरा आणि मरण येत जाते. एकूणच एक रितेपणा मनात भरून रहातो. रिकाम्या घरट्यातल्या या चिऊताईच्या मनात, आपण राब राब राबायचे पण आपली कुणालाच किंमत नाही असा भाव दाटून येतो. 
अर्थात प्रत्येकीची तऱ्हा वेगळी. सगळ्यांनाच सगळे व्हायला पाहिजे असे नाही. कमी अधिक तीव्रतेच्या वेगवेगळ्या तक्रारी असू शकतात. प्रत्येकीला त्रास व्हायलाच पाहिजे असेही नाही आणि प्रत्येकीने औषध घ्यायलाच हवे असेही नाही. कित्येकींना काही न करता हा त्रास हळूहळू ओसरतो आणि असा काही त्रास होत होता हे आठवतसुद्धा नाही. औषधे द्यायची की नाही आणि कुठली द्यायची हे लक्षणांवरच ठरते.
त्रास होतो तो मुख्यत्वे इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे. तऱ्हेतऱ्हेचा त्रास होतो कारण   इस्ट्रोजेनची अनेक कार्ये आहेत. निव्वळ पुनरुत्पादन एवढेच नाही. पुनरुत्पादन हे प्रमुख कार्य. पण हाडे, हृदय, मूत्राशय इतकेच काय मेंदूतही या स्त्रीरसाचे कार्य चालते. स्त्रियांना हृदयविकार, रक्तदाब, अशासारख्या व्याधी पाळी जाण्यापूर्वी सहसा होत नाहीत. निसर्गानी इस्ट्रोजेनरुपात त्यांना संरक्षण बहाल केले आहे. ही संरक्षक ढाल मेनोपॉजनंतर जाते.  त्यामुळे इस्ट्रोजेन नसला की सगळीकडे अस्वस्थता पसरते, कार्य बिघडते


पूर्वी एचआरटी (Hormone Replacement Therapy) नामेकरून होर्मोन्सचे डोस सर्रास दिले जात. त्यांचा फायदा होतो; पण  तोटाच जास्त होतो की काय, अशी आता शंका आहे. त्यामुळे सध्या अगदी आवश्यकता असेल तरच हा उपाय वापरला जातो आणि तोही मर्यादित काळासाठी. बराचसा त्रास होतो तो इस्ट्रोजेन कमी झालेला असतो म्हणून. त्यामुळे इस्ट्रोजेन दिला की बरेच बरे वाटते. एचआरटी मध्ये इस्ट्रोजेन असतोच असतो. इस्ट्रोजेन जसा कमी होतो तसा प्रोजेस्टेरॉनही कमी होतो, टेस्टोस्टेरॉनही कमी होतो. क्वचित हेही हार्मोन द्यावे लागतात.
ह्याला पर्यायी किंवा पूरक म्हणून, तऱ्हेतऱ्हेची देशीविदेशी  ‘हर्बल’ औषधे मिळतात. यातली कोणती किती सुरक्षित आहेत ते त्या त्या तज्ञांना विचारून घ्यावे. आधीच चालू असलेल्या दमा, अपस्मार, हृदयविकार इत्यादींच्या औषधांशी ह्यांचे भांडण असू शकते. तेंव्हा सांभाळून. बऱ्याच पानां, फुलां, फळांत इस्ट्रोजेन गटाची द्रव्ये कमी अधिक प्रमाणात असतात. ती कमी अधिक प्रमाणात आपल्या शरीरात शोषली जातात, कमी अधिक प्रमाणात इस्ट्रोजेन म्हणून आपली भूमिका वठवतात आणि त्यामुळे काही पेशंटना कमी अधिक प्रमाणात फायदा होतो. देशोदेशी अशा इस्ट्रोजेनयुक्त वनस्पती आहेत आणि त्या त्या देशी त्यांच्या ह्या गुणधर्मासाठी त्या ‘देशी’ औषध म्हणून वापरल्या जातात. पण त्यांच्यातील इस्ट्रोजेनचा प्रकार आणि त्याचे प्रमाण अनिश्चित असते त्यामुळे परिणामही अनिश्चित असतो. अर्थात दुष्परिणामही अनिश्चित आणि कित्येकदा (अभ्यासच न झाल्यामुळे) अज्ञात असतो. अशा अज्ञानात सुख असेलच असे नाही.
एचआरटी देताना अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात. किती वर्ष देणार? पिशवी काढली आहे/नाही. असेल तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्ही दिले जाते अन्यथा फक्त इस्ट्रोजेन पुरते. इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉन असे जोडीने देताना नियमित अंगावरचे जाईल अथवा जाणार नाही असेही साधता येते. एचआरटी उपचार गोळ्या, इंजेक्शने, पॅच, जेल, स्प्रे, योनीमार्गात ठेवायच्या रिंग्स ई. प्रकारात उपलब्ध आहे. अंगावरून गरम वाफा जाणे, मूड जाणे, योनीमार्ग कोरडा होणे, ह्यावर एचआरटीचा चांगला उपयोग होतो. एचआरटीमुळे हाडेही तंदुरुस्त रहातात. मोठ्या आतड्याचा कँन्सरची शक्यता घटते. पण गर्भपिशवीचेचे अस्तर वाढते आणि रक्तस्राव होऊ शकतो, तिथे कँन्सरची शक्यता बळावते. रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. यामुळे ब्रेस्ट कँन्सरची शक्यता वाढते की काय यावर प्रचंड संशोधन होऊनही अजून निश्चित आणि संपूर्ण चित्र स्पष्ट झालेले नाही. अर्थात कुठल्याही कँन्सरची शक्यता अनेक कारणांनी कमी जास्त होत असते त्यामुळे नेमके एचआरटीला झोडपणे अवघड झाले आहे. त्यामुळे ही एचआरटी भानगड फुंकूनच प्यावी असा ज्येष्ठांचा सल्ला आहे.
हे सगळे बघता यापेक्षा दुसरे काही उपाय आहेत का असा प्रश्न मनात येणे सहाजिक आहे. काही नैराश्यनाशक औषधे, काही फिटसाठीची औषधे (गाबापेन्टीन), क्लोनिडीन सारखी एरवी ब्लडप्रेशरसाठी वापरली जाणारी औषधे, गरम वाफा आणि निद्रानाशासाठी कामी येतात. आता इस्ट्रोजेन नाही, पण त्याच्याच खुर्चीत बसून त्याच्यासारखे काम करणारी काही औषधे आहेत. (SERM) गरम वाफा आणि संभोगशूलासाठी ही उत्तम समजली जातात.
काही बायकांच्यात पाळी अकाली जाते. कधी तरी कारण  सापडते. उदाहरणार्थ सुप्त टर्नर सिंड्रोम  किंवा स्वतःच्याच शरीरात निर्माण झालेली,  स्त्रीबीजग्रंथी नष्ट करणारी, काही रासायनिक अस्त्रे. जे मेनोपॉजमुळे होते तेच सगळे पाळी लवकर गेली तरीही होते. शिवाय संततीप्राप्तीची इच्छा अधुरी राहू शकते. औषध योजनाही मेनोपॉजला जी असते साधारण तीच इथेही असते. इथे पाळी नियमित येण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. पाळी जाण्याच्या वयापर्यंत या घ्यायच्या असतात.
पाळी येते तशी जाते. काही त्रास जरूर होतो. आवश्यक वाटली तर औषधे जरूर घ्यावीत. योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी ही त्रिसूत्री महत्वाची आहे. काही कालावधीत बराचसा त्रास आपोआपच कमी होतो. बाकी ‘वार्धक्य ही मनाची अवस्था आहे...’ वगैरे ज्ञान मी काय पाजळणार, व्हाट्सअॅपच्या रोजच्या रतीबात ते मिळतच असेल की, तेंव्हा हॅपी मेनोपॉज.

No comments:

Post a Comment