पीसीओडी
पीसीओडी (PCOD) ही भानगड
काय आहे? आजकाल हे पीसीओडी, पीसीओडी फार ऐकू येते. पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक
ओव्हेरियन डीसीज. शब्दशः अर्थ, स्त्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजेच बीजे दिसणे.
याशिवाय इतरही बरेच काही दिसते. म्हणूनच काही वेळा डिसीज, म्हणजे
‘आजार’ असे न म्हणता सिंड्रोम, म्हणजे ‘लक्षण सम्मुच्चय’ असा शब्द वापरतात. सहसा
डिसीजची कारणमिमांसा माहित असते, आणि निराकरण मिमांसाही बरीचशी ठरलेली असते.
सिंड्रोम हा जरा ऐसपैस प्रकार आहे. ते असो. नावात काय आहे?
संप्रेरकातील घोटाळ्यामुळे
उदभवणारा हा एक आजार आहे. यात स्त्रियांच्या शरीरात पुरुषरसांचे (Androgens) प्रमाण वाढते. परिणामी स्त्रीबीजनिर्मिती
महिन्याच्या महिन्याला होण्याऐवजी, अधून
मधून व्हायला लागते. सोनोग्राफी केली, तर स्त्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजांची रेलचेल
दिसू लागते.
खूप बायकांना असतो हा
विकार. दर विसात एखाददुसरीला. प्रत्येकीला त्रास होतोच, असेही नाही. बरेचदा काही सुद्धा
होत नाही. पाळी नियमित येत रहाते, मुले होत रहातात आणि ओव्हरी पॉलीसिस्टिक दिसत रहातात. काहीत पाळी थोडी पुढे जात रहाते, वजन थोडे वाढते,
थोडी मुरुमे येतात आणि अंगावर, चेहऱ्यावर लव थोडी जास्त रहाते; एवढेच. काहींना मात्र
मूल रहात नाही आणि बहुतेकदा निदान होते ते मूल व्हायला उशीर होतोय म्हणून तपासण्या
केल्या जातात तेंव्हा.
पीसीओडीचे कारण नेमके कळलेले नाही त्यामुळे जनुकीय दोष, एनव्हायरनमेंट,
स्थौल्य वगैरे सराईत गुन्हेगारांवर वहीम आहे. आपल्याला एवढे ठाऊक आहे की, अशा
पेशंटमध्ये मुळात पुरुषरसाचे प्रमाण वाढते. पुरुषरस वाढल्यामुळे लव वाढते. स्त्री-पुरुष
दोघांत, अंगावर प्रतीचौरस सें.मि. जागेत, केसांची मुळे सारख्याच प्रमाणात असतात.
फक्त पुरुषरस अत्यल्प असल्यामुळे स्त्रियांच्या अंगावरचे केस विशेष वाढत नाहीत. जे
वाढतात ते अतिशय पातळ, पारदर्शक आणि आखुड असतात. त्यामुळे ते दिसत नाहीत. पीसीओडी
असलेल्या मुलींना मुरुमेही जास्त येतात, तीही पुरुषरस वाढल्यामुळे. पुरुषरसाचाच परिणाम
म्हणून शरीरात असलेले इन्सुलिन निष्प्रभ ठरते,
पुढे जाऊन शुगर वाढते, आपण म्हणतो, तिला डायबेटीस झाला बरेका. असलेले
इन्सुलिन निष्प्रभ ठरल्यामुळे शरीरात अधिकाधिक इन्सुलिन निर्माण केले जाते. पण अती
झाले आणि हसू आले यातला प्रकार. या अतिरिक्त इन्सुलिनमुळेच स्त्री-पुरुष
संप्रेरकांचा तोल ढळतो आणि पुढचे रामायण घडते. एक प्रकारचे दुष्टचक्रच हे. पहिल्यामुळे
दुसऱ्याला जोर येतो आणि दुसऱ्यामुळे आता पहिल्याला चेव चढतो.
स्त्रीपुरुष संप्रेरकांचा तोल ढळला की पुनरुत्पादनाची क्रिया बिघडते. बीज निर्मिती
अनियमित होऊ लागते. पाळी पुढे पुढे जाते. वजन जास्त असेल, तर दिवस राहिले तरी गर्भ
नीट रुजत नाही. अर्थात पीसीओडी आहे म्हणजे फक्त त्यामुळेच मुले होत नाहीयेत असे
नाही. अन्यही कारणे असू शकतात. खरुज झाली म्हणजे नायटा होत नाही असे थोडेच आहे?
तेंव्हा इतर कारणे नाहीत ना, यासाठीही तपासण्या कराव्याच लागतात. पीसीओडीचे नेमके निदान करण्यासाठी एकच एक टेस्ट नाहीये.
तक्रारी, शारीरिक तपासणी, सोनोग्राफी इत्यादींचा साकल्याने विचार करून रक्त तपासण्या
सुचवल्या जातात. या पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कराव्यात हे उत्तम.
कारण नेमके माहित नाही तेंव्हा उपचारही नेमके ठरलेले नाहीत. त्या त्या डॉक्टरचा
कस पहाणारा हा आजार आहे. वजन जास्त असेल तर ते उतरवणे महा महत्वाचे आहे. एखादे
व्रत करावे तशा निष्ठेने हा वसा घ्यावा. उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये.
वजन कमी करण्याचे फायदे अनेक. पीसीओडी तर आटोक्यात येतोच, पण पाळी नियमित होऊन दिवसही
राहू शकतात. एकूणच दीर्घकालीन आरोग्यासाठी वजन नियंत्रण उपकारक ठरते. काही वेळा
कितीही आटापिटा केला तरीही वजन रहित अवस्था काही प्राप्त होत नाही. अशा काही पेशंटमध्ये, पचन क्रियेदरम्यान,
चरबीसाठी आत जाणारा मार्ग असतो पण बाहेर येणारा मार्गच नसतो. यांना वजन कमी
करण्याच्या ऑपरेशनचा चांगला फायदा होतो. पण त्या क्षेत्रातील तज्ञांचा विचार घेऊनच
हा निर्णय घ्यावा.
शरीरात इन्सुलिन भरपूर असूनही पेशी त्याला दाद देत नाहीत हे आपण वर पहिले.
पेशींच्या या कोडगेपणावर उतारा म्हणून काही औषधे आहेत, उदाः मेटफोर्मीन (Insulin
Sensitising Agents). एकदा हे दुरुस्त झाले की, वाढलेल्या इन्सुलिनचे दुष्परिणामही
कमी होतात. पाळी नियमित यायला मदत होते. दिवस रुजायला मदत होते.
दिवस रहाण्यातील मुख्य अडचण, ही अनियमित स्त्रीबीज निर्मिती ही असल्याने,
स्त्री बीज निर्मिती नियमित होईल अशी औषधे दिली जातात. गोळ्या, इंजेक्शने वगैरे गरजेनुसार
वापरली जातात. कधी कधी लॅपरोस्कोपी करून बीजग्रंथींवर काही शस्त्रक्रिया केली
जाते, ज्याने बीज निर्मिती सुलभ होते. काहीच उपयोगी ठरले नाही तर टेस्ट ट्यूब
बेबीचा पर्याय अवश्य आणि वेळेत वापरावा.
एरवी गर्भ निरोधक म्हणून वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे अनेकानेक उपयोग आहेत. पीसीओडीवरती
ह्या गोळ्या हे एक स्वस्त आणि परिणामकारक औषध आहे. याने पाळी अतिशय नियमित येते,
पिशवीचे अस्तर मर्यादेत वाढते. रक्तस्राव मर्यादेत होतो. पुरुषरस कमी होतात, लव
आणि मुरुमेही आटोक्यात येतात. अविवाहित किंवा इतक्यात मूल नको असलेल्या स्त्रियांसाठी ही उत्तम मात्रा आहे.
तरूण मुलींना बरेचदा पाळी अनियमित येत असते. निदान होते पीसीओडीचे. यांना आणि
यांच्या आयांना पाळी अनियमित म्हटले की भयंकर भीती वाटते. भ्यायला आमची काही हरकत
नाही. पण कितीही समजावून सांगितले तरी आजाराचे स्वरूप समजावून घेण्याची त्यांची
मानसिकता नसते, हे अधिक भयावह आहे. त्यांचा एकच धोशा, पाळी नियमित यायला पाहिजे असे
एकदाच काय ते औषध द्या. पीसीओडी या आजारात अशी एकदाच एक गोळी नसतेच. पण या बायका
अशी गोळी शोधत रहातात, शॉपिंग करत फिरत रहातात, डॉक्टर आणि दवाखाने बदलत रहातात, देशोदेशीचे
वैद्य हकीम करत रहातात. पण अशी गोळी मिळत नाही. कारण तसा शोधच लागलेला नाही.
आयांनी आणि मुलींनी हे समजावून घेतले
पाहिजे की पीसीओडी ही शरीराची उपजत सवय
आहे, हा आयुष्यभराचा आजार आहे. तो ‘बरा’ होत नाही, फक्त आटोक्यात ठेवता येतो. लग्न
होईपर्यंत आणि पुढेही मूल हवे असा निर्णय होईपर्यंत, औषध चालू ठेवायला हवे. पण
बहुतेकदा गोळ्या परस्पर बंद केल्या जातात. कारण प्रत्येक बाईच्या शेजारी एक ‘बाई’
रहात असते. ही ‘शेजारची बाई’ नावाची चीज फार महत्वाची ठरते. ती एकच वाक्य म्हणते; अखंड
वाक्यसुद्धा नाही दोनच शब्द, ‘अग्गोबाईsss!! गोळ्याsss?’ मग पेशंटच्या आणि पेशंटमातेच्या
काळजात कालवाकालव होते. छातीत धस्स होते. मनात चर्रर्र होते. आतड्याला पीळ पडतो.
हृदयाला घरे पडतात. जीवाला घोर लागतो. शेजारच्या बाईच्या ‘अग्गोबाईsss!!
गोळ्याsss?’ ह्या दोनच शब्दांची शाब्दिक गोळी बरोब्बर लागते. त्यांना वाटते गोळ्याची
आता ‘सवय लागेल’. त्या बंदच केलेल्या बऱ्या. खरेतर मुलीला अनियमित पाळीची ‘सवय’
असते म्हणून तर गोळ्या सुरु केलेल्या असतात. त्यामुळे त्या घेणे शहाणपणाचे.
गोळ्यांविना पण अनियमित पाळी चांगली? का गोळ्या घेऊन नियमित पाळी चांगली?; असा
हा पेच आहे. आमचे उत्तर आहे गोळ्या घेऊन पण नियमित पाळी चांगली! कारण पाळी अनियमित
आली की अनेक त्रास होतात. आतले अस्तर उगीचच अव्वाच्या सव्वा वाढते, ‘पीसीओडी’चे
इतर त्रास वाढतात, ई. ई. पण एकदा औषध करताच पुढे वर्षानुवर्षे बिन गोळ्यांनी
नियमित पाळी आली पाहिजे, ही अपेक्षा डोक्यात फिट्ट बसलेली असते. त्यामुळे ह्यांना
हे पटत नाही.
पीसीओडी साठी आयुष्यभर गरजेप्रमाणे विविध उपचार घ्यावे लागू शकतात. सुरवातीला
लहान वयात, पाळी नियमित येण्यासाठी, मग मूल नको असेल तर तशा गोळ्या, मूल हवे असेल
तर वेगळ्या गोळ्या, भरपूर मुले झाल्यावर पुन्हा वेगळ्या गोळ्या... तुमच्या
आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर तुम्ही आहात यावर औषध बदलत जाते.
ह्या आजाराचे स्वरूप नीट समजावून घ्यायला हवे. साधक बाधक विचार करून कोणते
उपचार निवडायचे हे ठरवायला हवे. वास्तववादी अपेक्षा ठेवायला हव्यात. अन्यथा
अपेक्षांच्या ओझ्याखाली डॉक्टर दबून जातो आणि फक्त उपेक्षाच वाट्याला आली असे
पेशंटला वाटत रहाते. दोन ध्रुवांवर दोघे आपण अशी अवस्था होते, दुसरे काय?