बाप माणूस
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
लग्नाला काही कालावधी लोटला आणि ‘गुड न्यूज’ आली नाही की मंडळी अस्वस्थ होतात. मूल होणे ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया. इतकी, की मुले होत नाहीत त्यांना होत नाहीत ह्यात आश्चर्य नसून, ज्यांना होतात त्यांना होतात कशी हे अचंब्याचे आहे. दिवस रहाण्यात स्त्रीपुरुषांचा समान वाटा आहे. त्यामुळे बिघाडातही जवळपास समसमान वाटा आहे.
मूल रहात नाही म्हटले की दवाखान्यात तपासायला जाणे होते. मूल होणार असते दोघांना, हवे असते दोघांना. काउंटरवरची सिस्टर विचारते,
‘पेशंटचे नाव?’
मग पत्नीचे नाव हमखास सांगितले जाते. खरेतर निम्यावेळी पुरुषात दोष असतो. पण पेपरवर नाव असते बायकोचे. दाखवलेही जाते स्त्रीरोगतज्ञांना, श्री-रोग तज्ञांना नाही. सहसा तपासणीसाठी, औषधासाठी, पहिला नंबर बायकोचा. मग बरेच आढेवेढे घेऊन, डॉक्टरनी चार चार वेळा समजावून, घरच्यांनी दबाव टाकून आला तर नवरा तपासणीला येणार. पुढे ह्याच तिकीटावर हाच खेळ पुन्हा एकदा पार पडल्यावर वीर्य तपासणीला तयार होणार.
पुरुषबीज आणि ह्या बीज निर्मितीमागचा सगळ्यात महत्वाचा प्रेरक, खरेतर संप्रेरक, म्हणजे टेस्टोस्टेरॉन, दोन्हीही तयार होतात वृषणात. (स्पष्ट शब्दात सांगायचे तर ‘गोट्यात’) हे अहर्निश चालणारे काम. सॅटरडे हाफ डे, हनुमान जयंतीला सुट्टी, असला प्रकार नाही. वय वाढले तरीही ही क्रिया चालू रहाते. त्यामुळेच इतर ‘क्रिया’ जमत असतील तर वयस्कर पुरुषही बाप बनू शकतो. स्त्रीचे तसे नाही. जन्मतः मिळालेला स्त्रीबिजांचा साठा हा वय वाढत जाते, तसा वाळत वाळत जातो आणि अंतिमतः संपतो; पाळी जाते आणि मग मातृत्व अशक्य ठरते. पुरुषांत दिवसाला सुमारे शंभर कोटी पुंबीजे तयार होतात. एक थेंब वीर्य तयार व्हायला रक्ताचे शंभर थेंब लागतात अशी एक वदंता महाराष्ट्रातल्या शाळाशाळातून पसरलेली आहे. असे काही नसते. पुरूषबीज हा वीर्यातील एक भाग आहे फक्त. वीर्यात इतरही अनेक स्त्राव असतात. हे निर्माण होण्यासाठी कोणत्याही ‘विशेष’/‘दिव्य’ शक्तीची गरज नसते. शरीरातील लाळ, अश्रू, पित्त असे इतर पदार्थ तयार व्हायला जशी काही उर्जा लागते तशीच ती वीर्य तयार व्हायलाही लागते. शरीरातील उर्जेचे एटीपी हे चलन आहे. तेच चलन वापरून वीर्य निर्मिती होत असते. बलदंड पुरुषात अधिक ‘पॉवरफुल’ वीर्य तयार होते असे काही नाही. वीर्यातील पुरुष बीजाच्या फलनक्षमतेचा आणि दंडातील बेटकुळीचा अर्थाअर्थी संबंध नाही. वृषणात तयार झाल्यावर हे पुरुषबीज नलीकांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या वेटोळ्यातून मार्गक्रमण करता, करता, वीर्यात मिसळून जायला ‘तैय्यार’ होते. तैय्यार हा शब्द मुद्दामच अवतरण चिन्हांत टाकला आहे. या वेटोळ्यातील प्रवास निव्वळ प्रवास नसतो. या प्रवासात बीजाचे भरण पोषण होत असते. बालक मंदिरात जाणारा पोरगा आणि युनिव्हर्सिटीतून बाहेर पडणारा पोरगा ह्यांच्या क्षमतांत जसा फरक असतो तसाच फरक बीजातही पडतो. हे सगळे व्हायला सुमारे तीन महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजेच आज काही आजार झाला (उदाः खूप ताप आला आणि बीजांची संख्या रोडावली) तरी त्याचा दुष्परिणाम ओसरायला तीन महिने लागणार. म्हणजेच आज काही औषध दिले (उदाः पुंबीज वाढीचे म्हणून औषध) तर त्याचा परिणाम दिसायलाही तीन महिने लागणार.
स्त्रीबीजाचे फलन व्हायचे असेल तर पुरुषबीजाला स्त्रीबीजापर्यंत पोहोचता यायला हवे. पुरूषबीज सोडले जाते योनीमार्गात. स्त्रीबीज असते स्त्रीबीजवाहक नलीकांत, फेलोपिअन ट्यूबमध्ये. इथून तिथे जाण्यासाठी पुरुषबीजाला अंगची हालचाल असते. त्याला एक वळवळती शेपूट असते. हिच्या मदतीने योनीमार्गात पडलेले पुरूषबीज पोहत पोहत स्त्रीबीजापर्यंत पोहोचते. शीर्षस्थ रसायनांच्या किल्लीने स्त्रीबीजाचे दार उघडते आणि स्त्री-पुरुष जनुकांचा संयोग होतो. फलन घडते.
दिवस रहात नाहीयेत म्हटले की वीर्य तपासले जाते. हस्तमैथुन करून वीर्याचा नमुना द्यायला फर्मावले जाते. काही मोजके अपवाद वगळता दवाखान्यातल्या सावर्जनिक संडासात त्या पुरुषाने ही क्रिया उरकावी अशी अपेक्षा असते! ते वातावरण, तिथले वास... बापरे कित्येक ठिकाणी तर वीर्य गोळा करायला म्हणून दिलेली बाटली ठेवायलाही जागा नसते. अशा बिकट परिस्थितीतही जो नरपुंगव हस्तमैथुन करून वीर्याचा नमुना आणून देतो, त्याला अनुकंपा तत्वावर ‘नॉर्मल’ रिपोर्ट द्यावा असे मला कधी कधी वाटते. खरे तर खाजगी आणि आरामदायी अशी खोली हवी, पंखा, उजेड, आरसा, पोर्नोग्राफिक साहित्य, पलंग, खास कंडोम, बाथरूम, साबण, पाणी, टिश्यूपेपर ई सामुग्री हवी. प्रसंग पडल्यास तिथे पत्नीलाही प्रवेश हवा. त्या पुरुषाचा आब राखून आधी नीट माहिती द्यायला हवी, शंकासमाधान करायला हवे. यासाठी युट्युब वगैरेचा वापर सहज शक्य आहे. पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतही पुरुषाचा आब राखला जात नाही असे दिसते, मग बायकांचे तर काय होत असेल?
वीर्य तपासणीत बऱ्याच गोष्टी कळतात आणि बऱ्याच कळतही नाहीत. या तपासणीची प्रमुख मर्यादा म्हणजे पुरुष बीजाचे कार्य, जे की स्त्रीबीजाचे फलन करणे, हेच मुळी तपासले जात नाही; तपासता येत नाही. पुरुष बीजाची संख्या हालचाल इत्यादीवरून अप्रत्यक्ष निष्कर्ष काढला जातो. पण जे काही तपासले जाते त्यातूनही बरीच माहिती मिळते.
वीर्यात पुरुषबीज संख्येने अत्यल्प असू शकतात (Oligospermia), गायब असू शकतात (Azoospermia), अॅबनॉर्मल असू शकतात (विचित्रवीर्य??), आळशी किंवा मंदगती, म्हणजे जेमतेम हालचाल करणारे (Asthenospermia) असू शकतात. काही जनुकीय आजारांत पुरुषांना वंध्यत्व येते (उदाः सिस्टीक फायब्रोसिस). खूप ताप आल्याने वा अती उष्णतेत सतत काम केल्यानेही पुरुष बीजांवर परिणाम होतो (उदाः बॉईलर समोर ई.). धूम्रपान, दारू, अती वजन हे नेहेमीचे व्हिलन आहेतच. कधी कधी या बिजांविरुद्ध काही द्रव्ये पुरुषाच्याच शरीरात तयार होतात आणि मग ह्यांच्या साऱ्याच क्षमता मंदावतात. स्त्रीच्या शरीरातही अशी द्रव्ये तयार होऊ शकतात. तेंव्हा पूर्वी एकदा कधीतरी दिवस राहिले होते याचा अर्थ आत्ता पुरुषबीज तपासायची गरज नाही असा होत नाही. बीजतील सूक्ष्मरचनेपासून ते बायकोपर्यंत काहीही बदललेले असू शकते. बदललेल्या बायकोत, पूर्वीच्या बायकोत नसलेली, पुरुष-बीज-रोधक द्रव्ये असू शकतात. अत्यल्प पुंबीज असलेल्या अथवा अजिबात पुंबीज नसलेल्या पुरुषांत वाय क्रोमोझोम मध्ये घोटाळा असू शकतो. त्यातले काही अंश गायब असू शकतात. (Y Microdeletion). अशांना मग टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय उत्तम ठरतो.
प्रामणिकपणे सांगायचे तर पुरुषबीजांची संख्या वाढेल किंवा हालचाल खात्रीने वाढेल असे पुराव्याने शाबित झालेले एकही औषध उपलब्ध नाही. काही अँटीऑक्सिडेंट्स आणि काही गोनॅडोट्रोपिन्स काही वेळा उपयोगी ठरू शकतात. पण अजून बरीच मजल मारायची आहे, बराच पल्ला गाठायचा आहे. पण असा दावा करणारी मात्र सुमारे दीडशे दोनशे औषधे आहेत. इतकी सारी औषधे आहेत याचाच अर्थ असा की एकही रामबाण औषध नाही. मलेरिया किंवा टीबीवर मोजकीच औषधे आहेत. कारण आहेत ती सारी परिणामकारक आहेत. इथे तसे नाही. एक ना धड भराभर चिंध्या. बिच्चारे पुरुष गतानुगतिक होऊन असली औषधे घेत असतात. अगदी वर्षानुवर्ष घेत रहातात. टेस्ट ट्यूब बेबी तंत्रासाठी येणारा एकरकमी खर्च खिशाला परवडत नसतो. त्यातली अनिश्चितता मनाला पटत नसते. पण औषधापायी रोज थोडे थोडे करत कित्येकांनी तिप्पट पैसा घालवलेला असतो. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, अशा छापाची ही औषधे... दुसरे काय. नेमक्या ज्ञानाच्या आणि उपचारांच्या अभावामुळे पुरुषबीज विकार म्हणजे सर्व पॅथिच्या भंपकांना आणि भोंदुंना मोकळे रान आहे.
संख्या आणि प्रतवारी यथातथा असलेल्या पुरुषबीज दोषांवर चांगला उपाय म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीतील इक्सी तंत्र. Intracytoplasmic Sperm Injection चे ICSI हे लघुरूप. यात एकच पुरूषबीज घेऊन एका सूक्ष्म सुईतून ते स्त्रीबीजात टोचले जाते. अगदी नाजूक पण तितकीच रोमांचकारी कृती आहे ही. यूट्यूबवर तुम्ही व्हिडीओ नक्की बघा. वीर्यात अजिबात पुरुषबीज दिसत नसेल आणि वृषणात ते असेल तर तिथून ते घेऊन इक्सी उपचार करता येतात.
असले महागडे उपचार योग्य वयात सुरु करणे महत्वाचे. स्त्रीच्या वयाचा आणि उपचारांच्या यशापयशाचा थेट संबंध आहे. पण बरेचदा हा निर्णय घ्यायला उशीर झालेला असतो. आधी डॉक्टर डॉक्टर करण्यात आणि मग देव देव करण्यात नाहक वेळ घालवलेला असतो.
रक्तदान करता येते आणि गरजूंची रक्ताची नड भागते तसेच वीर्यदानही करता येते. याच विषयवरचा ‘विकी डोनर’ नावाचा पिक्चर तुम्ही कदाचित पहिला असेल. यात पुरुष जोडीदाराचे वीर्य काही कारणाने निरुपयोगी असेल तर दात्याचे वीर्य स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते. आधुनिक नियोगच हा. यातून निपजणारे अपत्य जीवशास्त्रीयदृष्ट्या त्या स्त्रीचे आणि दात्याचे असणार पण समाजाच्या दृष्टीने, कायद्याने ते त्या पती-पत्नीचे समजले जाणार.
कँन्सरसारख्या आजारात कधी कधी उपचारच पुरूषबीज निर्मितीला मारक ठरतात. अशा वेळी उपचारापूर्वीच वीर्य साठवून ठेऊन ते योग्य वेळी पत्नीच्या शरीरात सोडून गर्भ धारणा होऊ शकते. सीमेवरील सैनिक अथवा बराच काळ परमुलखात गेलेले पुरुषही ही पद्धत वापरून आपल्या अनुपस्थितीत गर्भस्थापनेची संधी मिळवू शकतात.
पितृत्वाची आस असतेच असते. पण जेंव्हा सर्व उपाय थकतात तेंव्हा मूल दत्तक घेणे हा ही एक सुंदर पर्याय आहे. त्या मुलाचा जैविक जनक बनता आले नसले तरी पितृवात्सल्याचा वर्षाव करता येतोच. माणसाचा बाप माणूस बनणे हे हरखून जाण्यासारखे खरेच. कालिदासाच्या शाकुंतलातील दुष्यंत म्हणतो, ‘ज्यांचे कपडे लहान मुलांच्या पावलांनी मळतात ते पुरुष धन्य होत!’; आणि छोट्या भरताला जवळ घेताच त्याला वात्सल्याचा रोमहर्षक अनुभव येतो. भरताच्या पावलांच्या धूळीने त्याचे कपडे मळतात तेंव्हा हा आपलाच मुलगा आहे हे त्याला तरी कुठे माहित असते?