Monday, 23 April 2018

ते दिवस त्या रात्री


ते दिवस, त्या रात्री...!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि. सातारा. पिन ४१२८०३


पाळी यायच्या आधी सुमारे दोन आठवडे, काहींना, काहीना काही तरी होत रहाते. ह्या सगळ्या लक्षणांना म्हणतात ‘प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोम’, पीएमएस, (PMS). नाव भारदस्त असले तरी अर्थ मी सुरवातीला मराठीत सांगितलाय तोच आहे.  अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणे उद्भवतात आणि पाळी येताच ओसरतात. बहुतेकींना काहीना काही तरी त्रास जाणवतोच. मूड जाणे, चिडचिड होणे, निराश वाटणे, डोकेदुखी, भूक विझणे, जड जड वाटणे, अंगावर सूज येणे, स्तन हुळहुळे होणे अशा अनेक तक्रारी असू शकतात. सगळ्यांनाच सगळे होत नाही. वेगवेगळ्या जणींना वेगवेगळा अनुभव येतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. इतकेच काय वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळ्या तक्रारी देखील आढळतात. पाच दहा टक्के बायकांना रोजचे कामही करता येऊ नये इतका त्रास होतो.
कारण नेमके माहित नाही. बदलते होर्मोन्स हे एक संभाव्य कारण. गर्भनिरोधक गोळ्या वापरणाऱ्या बायकांत हे बदल इतके तीव्र नसतात आणि ह्यांच्यात पीएमएस ही नसतो. अती खारट पदार्थ, कॉफी, मानसिक ताणतणाव हे नेहमीचे यशस्वी कलाकार इथेही कल्ला करण्यास टपलेले आहेतच. योग्य वजन आणि व्यायामानेही फरक पडतो. BMI तीसच्या आत तरी हवा.
BMI = वजन (किलो)/उंचीचा वर्ग (मिटरमध्ये)
पीएमएस च्या निदानासाठी कोणतीही विशिष्ठ तपासणी नाही. तुमच्या तक्रारींचा पाढा तुम्हीच एखाद्या डायरीत लिहून ठेवायचा. दोनेक महिन्यात तक्रारींचा आणि पाळीचा अन्योन्य संबंध लक्षात आला की झाले निदान.

उपचार
नेमके कारण माहित नाही तेंव्हा नेमके उपचारही माहित नाहीत. कुणाला कशाने बरे वाटेल तर कुणाला अगदीच विरुद्ध धर्मी औषधाने. सगळाच सावळा गोंधळ. त्यामुळे अमुक पॅथी, तमुक जडीबुटी वगैरे खेळाडूंना भरपूर वाव आहे.
उपचारांनी किती फरक पडला हे पडताळण्यासाठी डायरीचा छान उपयोग होतो. कधी कधी, काय काय आणि किती प्रमाणात झाले याचा लेखाजोखा ठेवल्याशिवाय हे निट समजत नाही. आपल्याला ‘आत्ता’ जे होतंय तेच सर्वात वाईट दुखणे असे आपण सहजच धरून चालतो.
व्यायाम, पौष्टिक आहार, तणावरहित जीवन  पद्धती अनुसरली तर तीन चार महिन्यात बऱ्यापैकी फरक पडतो. हे करूनही त्रास होतच असेल तर औषधे देता येतात.
गर्भनिरोध गोळ्या, कॅल्शियम, व्हिटामिन डी, व्हिटामिन ई वगैरे परिणामकारक ठरतात. तीन ते चार महिने देऊन गोळ्या बंद केल्या तरी बहुतेकदा पुढे बराच काळ आराम मिळतो. इस्ट्रोजेनचे पॅच मिळतात, तेही वापरता येतील. पण या बरोबर प्रोजेस्टेरॉनचा डोसही घ्यावा लागतो. अगदी क्वचित डॅनेझॉल जी.एन.आर.एच. गटातील औषधे लागतात. पण ती इतकी क्वचित की इथे त्यांचा एवढाच उल्लेख पुरे.
अनेक प्रकारची ‘हर्बल’ औषधे उपयोगी ठरू शकतात. यांच्या उपयुक्ततेबद्दल आणि निर्धोकपणाबद्दल  निश्चित माहिती घेऊनच ही वापरावीत. ‘जे जे हर्बल अथवा नॅच्युरल अथवा बिन-अॅलोपॅथिक ते ते परिणामकारक अथवा सुरक्षित अथवा सुलक्षणी’, असले खुळचट सुभाषित मेंदूत सुवर्णाक्षरांनी वगैरे कोरून ठेऊ नये. 
काही वेळा मानसतज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. तो बेलाशक घ्यावा. मानसोपचार म्हणजे ‘वेड्यांचे डॉक्टर’ आणि त्यांच्याकडे जाणारे सगळे वेडे असतात, असल्या वेडगळ कल्पना उराशी बाळगू नयेत. सर्दी खोकला झाला की शरीराला आधाराची गरज असते म्हणून आपण औषधे घेतो. अशीच कधी कधी मनाला आधाराची गरज पडू शकते. सर्दीची औषधे घेण्यात तुम्हाला वैषम्य वाटत नाही तर मग मानसोपचार घेण्यातही कमीपणा नाही. नैराश्य-नाशक औषधे उपयोगी ठरतात. कोणत्याही ‘इफेक्ट’ असलेल्या औषधांचे  असतात तसे ह्यांचेही काही ‘साईड इफेक्ट’ असतात. ते समजावून घ्यावेत. बंद करताना ती अचानक बंद करून चालत नाहीत.
टोकाच्या परिस्थितीत गर्भपिशवी आणि बीजग्रंथी काढणे हाही उपाय योजावा लागतो.
खरे तर या आजारासाठी डॉक्टर गाठण्याइतकी तीव्रता कमी बायकांच्यात दिसते. पण ते म्हणजे हिमनगाचे टोक आहे. किरकोळ तक्रारी आणि ‘आजारपण’ हे नेहेमीचेच. ह्या दिवसांमध्ये स्त्रीला घरातल्यांनी समजावून घेतले, असे काही होऊ शकते आणि त्याला सहानुभूती आणि शक्य ती मदत, हे महत्वाचे आहे अशी जाणीव बाळगली तरी निम्याहून अधिक काम भागते. पण स्त्रियांच्या मनातच पाळीबद्दल नकारात्मक भावना असतात. पुरुषांना तर पीएमएस या प्रकाराचा थांगपत्ता नसतो. या दिवसात बायकोचे डोके फिरते एवढेच त्यांना कळते. तेंव्हा पुरुष (आणि कुटुंब) शिक्षण हे ही महत्वाचे. माझ्या परिचयाच्या एक ऑफिसर मॅडम आहेत. त्यांना पीएमएसचा प्रचंड त्रास. त्यांच्या मुलाला वर्गात मासिक पाळीबद्दल शिकवताना, ‘असा असा प्रकार तुमच्या आईत होत असतो’ अशा सुरात त्याच्या सायन्स टीचरनी शिकवला. ते सगळे शिकून त्या मुलाच्या वागणुकीत इतका फरक पडला की शालेय वयातला तो मुलगा, आपल्या आईला ‘त्या’ दिवसात काही मदत करू का? पाय चेपून देऊ का? असे आपण होऊन विचारू लागला... आणि त्या बाईंचा पीएमएस पळाला.

Thursday, 12 April 2018

फेनमनचे फँटास्टीक फंडे


फेनमनचे फँटास्टीक फंडे
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि. सातारा. मो.क्र. ९८२२०१०३४९

शास्त्रज्ञ कसलाही विचार अगदी काटेकोरपणे, डोके चालवूनच करतात. आता थापा मारण्याचेच बघा ना. आपण सगळे कधी ना कधी थापा मारतो. मस्त लोणकढी थाप मारल्याने, मस्त मज्जा येते. कधी त्या पचतात, कधी आपण पकडले जातो.
रिचर्ड फेनमन हा जगप्रसिद्ध नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ. मोठ्या गमत्या आणि खोडसाळ. थापा मारण्याचे सुद्धा एक शास्त्र आहे, असे त्याचे प्रतिपादन. थापा मारण्यासाठी आणि त्या पचण्यासाठी मानवी मनाचा सूक्ष्म विचार करावा लागतो. त्याचे म्हणणे उत्तम थाप ही खरेतर थाप नसतेच. तुम्ही खरेतर खरेच सांगितले पाहिजे, पण अशा खुबीने की समोरच्याला ती लोणकढी थाप वाटायला हवी.
आपल्या कॉलेज जीवनातील अशा अनेक गंमती तो सांगतो.
होस्टेलवर शेजारच्या खोलीत दोन अतिशय अभ्यासू, स्कॉलर, अगदी पुस्तकातील किडे, अशी मुले रहायची. कोणीही आला-गेला तरी यांची एकच सूचना, ‘दार लावून घे रे.’ म्हणजे यांचा अभ्यास निर्विघ्नपणे चालू. बाहेरच्या गोंगाटाचा जरासुद्धा त्रास नको. अर्थातच इतकी स्कॉलर मुले होस्टेलच्या संस्कृतीस अनुसरून, अतिशय लोक-अप्रीय होती.
एके दिवशी पहाटे फेनमन उठला आणि बघतो तर काय कोणीतरी वात्रट पोरांनी, त्या मित्रांच्या खोलीचे एक दारच गायब केले होते. वर पाटी खरडून ठेवली होती, ‘दार लावू घे रे’.
फेनमनने मग दुसरे दारही अलगद बिजागरीतून सोडवले आणि पार गच्चीत पाण्याच्या टाकीमागे लपवून ठेवले. सकाळी उशीरा, खोलीतून आपण त्या गावचेच नाही अशा अविर्भावात, फेनमन बाहेर आला. एव्हाना दार गायब झाल्याची चर्चा सगळीकडे सुरु झाली होती. त्या पाटीवरच्या अक्षरावरून दार कोणी चोरले हे लगेचच लक्षात आले. पण तो मुलगा म्हणायला लागला की, ‘मी फक्त एकच दार चोरले आहे. दुसऱ्या दाराचा मला काहीही पत्ता नाही.’ हा लबाड मुलगा एकच दार चोरल्याची बतावणी करतो आहे ह्याची साऱ्यांनाच बालंबाल खात्री होती. दोन्ही दारे गायब असताना आपण निव्वळ एकच चोरले अशी कबुली देणारा, थापच मारत असणार, नाही का? फेनमन पुढे येऊन साळसूदपणे सांगायला लागला की, ‘दुसरे दार मी काढले आहे! हे काय माझ्या हाताला इथे खरचटले आहे. जिन्यातून दार नेताना हाताला इथे थोडा रंग लागला आहे.’ अर्थातच यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. पहिले दार चोरले त्यानेच दुसरेही चोरले असणार असेच सर्वजण गृहीत धरून चालले. सर्व जण पहिले दार काढणाऱ्या मुलाच्याच मागे लागले. अशाच तंग वातावरणात आठवडा गेला. दुसरे दार काही सापडले नाही. शेवटी रेक्टरने सभा बोलावली. मुलांकडून सूचना मागवल्या.
फेनमन बोलायला उभा राहिला आणि म्हणाला, ‘हे दार चोरा, हे महान शर्विलका, तू जो कोणी असशील तो इथे प्रकट हो. तुझी बुद्धिमत्ता आगाध आहे. तुझी प्रज्ञा सूर्याहून तेजस्वी आहे. आम्ही तुझ्यापुढे काजवे आहोत काजवे. तू आमच्या साऱ्याहून अतिशय हुशार असून, तुला मानला. आम्ही सारे जण तुझ्या चरणासी लोळण घ्यायला तयार आहोत, तुझ्या अंगठ्याचे तीर्थ घ्यायला तयार आहोत, पण तू इथे स्वतःला प्रकट कर. जर ते शक्य नसेल तर निदान दार कुठे लपवले आहेस, ते एखाद्या  चिठ्ठीवर लिहून ती चिठ्ठीतरी गुपचूप कुणालातरी  सापडेल अशी ठेव. तुझी अफाट प्रतिभा, तुझे ज्ञान, तुझे कौशल्य...’ असे करत करत फेनमनने त्या अज्ञात चोराची तोंड फाटेस्तोवर अशी काही स्तुती केली, की लवकरच सर्व मंडळी ह्या नाटकीपणाला वैतागली आणि सर्वांनी मिळून त्याला गप्प केला.
पुढच्या मुलाने असे सुचवले की अगदी शपथपूर्वक सर्वांनी दार घेतले नसल्याचे सांगावे. ही सूचना लगेचच अंमलात आणली गेली. रेक्टर एकेका मुलापाशी जाऊन, ‘तू दार घेतले आहेस का?’, असे विचारू लागले. सगळे अगदी शपथघेऊन नाही म्हणाले. फेनमन म्हणाला, ‘हो, मी घेतले आहे!’ पण अर्थातच फेनमनवर कोणीच विश्वास ठेवला नाही. स्वतः अतिशय हुशार असल्याचे दाखवण्यासाठीच, तो दार घेतले असल्याची बतावणी करतोय असेच सगळ्यांना वाटले. खोटे न बोलता त्यानी सगळ्यांना बनवले होते.
दुसऱ्या दिवशी फेनमनने दाराचा पत्ता सांगणारी  चिठ्ठी स्वतःच्या सहीसकट, नोटीस बोर्डवर लावली. फेनमनने आपल्याला मामा बनवल्याचे लक्षात येताच सगळेच खो खो हसू लागले.
अशीच दुसरी एक फेनमन गंमत.
कॉलेज जवळच्या ठराविक हॉटेलमधले ठराविक टेबल फेनमनचे ठरलेले. तिथेच तो बसणार, कॉफी पिणार आणि जाणार. तिथली वेट्रेसही त्याला आता ओळखू लागली होती. अगदी चटपटीतपणे कामे उरकणारी ही चुणचुणीत मुलगी. पण फेनमनच्या एक लक्षात आले, की शेवटी तिचे सारे लक्ष त्याने ग्लासखाली ठेवलेल्या टीपवर असे. टिप ठेवताच ती झर्रकन पुढे येऊन आधी टिप खिशात घाली. अर्थात यात काही जगावेगळे नव्हतेच, सर्वच वेटर सारखेच.
एकेदिवशी फेनमनला तिची खोडी काढायची लहर आली. त्याने टिपसाठीचे नाणे  ग्लासात टाकले, तो ग्लास पाण्याने काठोकाठ भरला, त्यावर कागद ठेऊन तो उपडा ठेवला आणि अलगद कागद घेतला काढून. उपड्या ग्लासात पाणी आणि टेबलावर लखलखीत नाणे. आणखीही एका ग्लासाखाली असेच नाणे ठेऊन हा गेला निघून. त्या पाणी भरल्या ग्लासातले नाणे आता पाणी न सांडता काढायचे कसे? ग्लास उचलला की पाणी सांडणार!
दोन दिवसांनी फेनमनची स्वारी रमत गमत टेबलाशी येऊन बसली. सगळे वातावरण लगेचच बदलले. ती नेहमीची वेट्रेस तिथे फिरकली देखील नाही. ती फुरंगटून वेगळ्याच टेबलला सर्व्हिस देऊ लागली. नव्या वेट्रेसकडे याने चौकशी केली तेंव्हा उडालेला सगळा गोंधळ त्याला समजला.
टिप घेण्यासाठी ग्लास उचलणार एवढ्यात काय  गोची आहे हे आधीच्या वेट्रेसच्या लक्षात आले होते. मग तिनी बराच वेळ विचार करून मॅनेजरला बोलावले. त्यानेही खूप विचार केला, पण पाण्याने भरलेल्या उपड्या ग्लासमधील नाणे, पाणी न सांडता कसे घ्यावे हे त्यालाही उमगेना. आसपासची इतर गिर्हाईकेही मग स्वतःहून ह्या बुचकळ्यात पडली. अखेर त्याने, एक प्रयत्न म्हणून, ग्लास जरा वर केला आणि क्षणात टेबलावर आणि टेबलाखाली पाण्याचे थारोळे साठले. ते पुसून घेता घेता तिच्या हातून दुसऱ्या ग्लासलाही धक्का लागला आणि पुन्हा एकदा पाणीच पाणी झाले. त्यातच ती पाय घसरून पडली. साऱ्या हॉटेलला फुकटची करमणूक आणि साऱ्या कॉलेजभर नाही ती चर्चा. या फजितीमुळेच ती आधीची वेट्रेस फुरंगटून बसली होती.
शेवटी ती नवीन वेट्रेस फेनमनला म्हणते कशी, ‘तू तरी सांग बरे, तू नाणे कसे काढले असतेस ते?’ फेनमनने पुन्हा तोच प्रयोग केला आणि तिला म्हणाला, ‘एखादे पातेलं आण बरे.’ मग त्याने पातेले टेबलाच्या कडेला धरले, तो ग्लास अलगद टेबलाच्या कडेबाहेर सरकवला, सगळे पाणी पातेल्यात गोळा झाले आणि ह्याने अलगद ग्लास खालचे नाणे घेतले. सगळे अवाक झाले. आपल्याला हे आधी कसे सुचले नाही, असा विचार करत, हसू लागले.
पण फेनमनची खुमखुमी अजूनही जिरली नव्हती. जाता जाता त्याने कॉफीच्या मग उपडा ठेवला आणि त्याखाली टीप ठेवली.
दुसऱ्या दिवशी स्वारी अवतरली तेंव्हा दुसरी वेट्रेसही घुश्यात होती.
‘काय झाले गं? मिळाली ना टीप काल?’
‘मिळाली की’
‘मग?’
‘मग काय?’
‘नीट घेतलीस ना?’
‘हो, घेतली अन काय! आत जाऊन पातेले आणले. ते खाली धरले, अलगदपणे तो मग टेबलाच्या कडेला आणला आणि पाणी पातेल्यात पडेल अशा बेताने सरकवला.’
‘मग?’
‘मग काय, त्यातले नाणे पडले पातेल्यात, पण इतक्या काळजीपूर्वक मी टेबलाच्या कडेशी आणलेल्या त्या मगमध्ये पाणी नव्हतेच!!!’
****************************************



Tuesday, 10 April 2018

टाका रुते कुणाला...


टाका रुते कुणाला...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
ऑपरेशनबद्दल चर्चा चालू असते. मधूनच बाणासारखा प्रश्न येतो, ‘किती टाके पडतील डॉक्टर?’ विचारते बहुधा ती पेशंट स्वतः.
जितके टाके जास्त तितकं ऑपरेशन मोठं हा घट्ट समज. एके काळी हे सार्वत्रिक सत्य होतं. मोठ्ठ ऑपरेशन करायला, मोठ्ठ पोट फाडावंच लागायचं. जेवढी  मोठी जखम तेवढी ऑपरेशनची किंमत वाढायची. सर्व अर्थानी. मोठ्ठ्या ऑपरेशनवालीची सहनशक्ती मोठी. तिची शान मोठी. तिचा मान मोठा. सन्मान मोठा. ऑपरेशनचा खर्च मोठा. हा खर्च पेलणारा कारभारी मोठा. कौतुक मोठं. अचंबा मोठा. भेटायला येणार लवाजमा मोठा.
कॉलेजमधेही हेच शिकवलं जायचं. पुरेसं लांब इंसिजन (छेद) ही पहिली पायरी. यालाच अडखळला तर मग तो सर्जन कसला? सर्जनला सिंहाची छाती हवी (हे असं इंसिजन घ्यायला), हत्तीचे पाय हवे (बराच वेळ उभं रहायला), गरुडा सारखी नजर हवी आणि स्त्रीचे कोमल हात हवेत; असं वैद्यकीय सुभाषित आहे एक. त्यावेळची परिस्थिती होती खरंच तशी.
आता जग बदललं. भुलीच तंत्र बदललं. नवी नवी औषधं आली. प्रकाश वळवता येतो असा शोध लागला. मग तो वळवून कुठेही नेता यायला लागला. पोटात, गर्भपिशवीत, कानात, नाकात, गुडघ्यात, कवटीत, पाठीच्या मणक्यात... कुठेही. छोटे कॅमेरे, छोटी छोटी इंस्ट्रूमेंट्स निघाली. पोट फाडून जे करावं लागायचं ते आता छोट्याच्या भोकातून शक्य झालं. पोटात काय दडलंय; आत भानगड काय आहे, हे बघायला आता ‘दार उघडण्याची’ गरज नाही. जणू ‘किल्लीच्या भोकातून’ आतली सगळी मज्जा दिसायला लागली.
पण या भानगडीत ते टाक्यांचं कौतुक लोपलं. टाक्यांची असोशी असलेल्या बायका अगदी मनात हिरमुसून जातात. टाके नाहीत म्हणजे भलतंच. टाके नाहीत? मग काय मज्जा?  
सीझर सुद्धा बिन टाक्याचं करता येतं. म्हणजे पोट पूर्वीइतकंच उघडावं लागतं. त्याशिवाय बाळ कसं काढणार? पण शिवताना टाके आतल्या आत रहातील असे घातले जातात. वरून म्हणाल तर दिसायला टाके शून्य! खरंतर ही शिंप्यांची पिढ्यांपिढ्यांची ट्रिक आहे. डॉक्टरांनी ती त्यांच्याकडूनच उचलेली आहे. धावदोरा, कशिदा असे टाके ऑपरेशनमधेही वापरले जातातच. असं काय काय, कुठून कुठून उचललंय डॉक्टरनी. न्हाव्याची कात्री धरायची पद्धत..  गुरख्यांच्या गाठी... लोहाराचं रिबीट... चांभाराची आरी... सुताराची करवत ही आमचीही शस्त्र आहेत. कोणत्याही ऑपरेशनमध्ये पेशंट मोजते ते वरुन दिसणारे टाके. आत बरेच टाके असतात. सीझर झालं तर आत निदान पन्नास टाके तरी असतात, विविध स्तरांना सांधण्यासाठी. वर मात्र दहा पंधरा पासून, शून्य पर्यंत टाके घालून त्वचा शिवता येते. काही वेळा चक्क स्टेपलर आणि पिनाही वापरल्या जातात.
पूर्वी सीझर म्हटलं की हे भलं थोरलं इंसिजन, बेंबीपासून ओटीपोटापर्यंत. मोठ्ठा उभा व्रण. मग त्यावर आडव्या रेघांची नक्षी. त्या बाईला मनात आलं तरी बेंबी खाली साडी घालणं अवघड. आता इंसिजन असतं ते आडवं, अगदी खाली, अगदी ओटीपोटावर. बिकिनी घातली तरी दिसणार नाय! ह्याला म्हणतातच ‘बिकिनी इंसीजन’. हे अधिक चांगलं. अनेक अर्थानी. दुखतं कमी. भरून येतं झटपट. नंतर हार्नियाची शक्यता कमी. टाकेही आतल्या आत असतात, आपले आपण विरघळणारे असतात. काढायची भानगड नाही. व्रण अगदी दिसेल न दिसेलसा उमटतो. शिवाय शरीराच्या (सहसा) न दिसणाऱ्या भागावर असतो. त्यामुळे जास्त टाके म्हणजे जास्त मोठ ऑपरेशन असं आता राहिलेलं नाही. बरीच मोठी आणि अत्यंत गुंतागुंतीची ऑपरेशन आता दुर्बिणीतून (टाक्याविना) करता येतात. शक्य असेल तर कोणतही ऑपरेशन बिनटाक्याचंच करणं योग्य. अर्थात त्यासाठी डॉक्टर तशा तयारीचा हवा आणि इतर साधन सामुग्रीही उत्तम प्रतीची हवी. ‘परंतु तेथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे!’ ऑपरेशन टाक्याचं की बिन टाक्याचं हा चॉइस बराचसा डॉक्टरवर सोडायला हवा.
सगळ्यात कॉमनली केलं जाणारं बिनटाक्याचं ऑपरेशन म्हणजे स्त्री-नसबंदी. ‘लाईटीवरचं’, ‘फिरकीचं’, अशी अनेक लाडाची नावं त्याला पेशंटनी ठेवली आहेत. हे ‘फेल जातं’ अशी वदंता आहे. पण अभ्यासात असं दिसून आलेलं नाही. तुलना करता, टाक्याच्या आणि बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये ‘फेल जाण्याचं’ प्रमाण सारखंच आहे.
टाके न भिजवण, हे ही एक कर्मकांड आहे. अंघोळीचं पाणी टाक्यात जाऊन त्यात पाणी होत नाही. टाके नीट जुळले नाहीत, इन्फेक्शन झाले, आतल्या आत चरबीचं पाणी होत राहीलं, तर जखमेत ‘पाणी’ होतं. अंघोळीचं पाणी जखमेत ‘शिरून’ साठूनबिठून रहात नाही. जखम शिवल्यावर काही तासात तिथे एक सीलबंद पापुद्रा तयार होतो. मग फारसं काही आत-बाहेर जाऊ शकत नाही. ड्रेसिंग हे रोगजंतूंचा जखमेशी सहज संपर्क येऊ नये म्हणून असतं. ड्रेसिंगमुळे जखमेला कमालीची सुरक्षा वगैरे मिळत नाही. अशी सुरक्षा आपल्या प्रतिकारशक्तीमुळे मिळते.
भात, बटाटा, पावटा आणि वांगं हे नाहक बदनाम पदार्थ आहेत. यांच्यामुळे म्हणे टाके बिघडतात. असं काही होत नाही. भात आणि बटाटा हे रोजच्या आहारात असणारे जगात कित्येक देश आहेत. आख्खी कोकणपट्टी भातावर जगते... आणि तिथली ऑपरेशने निर्विघ्नपणे पार पडत असतात. भात, बटाटा, पावटा, आणि वांगं एकत्र करून खाल्लं तरी टाक्यांना काsssही फरक पडत नाही. (इथे या व्यक्तीला डायबेटीस वगैरे नाही हे गृहीत आहे हं.)
थोडक्यात टाक्यावरून ऑपरेशनची परीक्षा करण्याचे दिवस आता मागे पडले आहेत.