Friday, 24 November 2017

मास्तर

मास्तर
डॉ. शंतनू अभ्यंकर

प्रवेशद्वारावरच्या फळ्यावर ती बहुप्रतीक्षित नोटीस झळकली; नाट्योत्सुक मुलामुलींनी अमुक वाजता हॉलमधे जमावे वगैरे. आम्ही हजर. वेळेच्या आधी. एकेक करत सिनिअर मंडळी जमली. मास्तरबद्दल चर्चा सुरु झाली. मग दस्तूरखुद्द मास्तर अवतरले.  कॉलेजमधे बाकी सगळे ‘सर’ होते. हे मात्र मास्तर. आपल्याला मराठी उत्तम येतं याचा अजिबात गर्व नाही आणि इंग्रजी अजिबात येत नाही याचा अजिबात संकोच नाही; ही यांची खासियत. म्हणून हे ‘मास्तर’ आणि बाकीचे सर! कॉलेजच्या नाट्यमंडळाचे हे  सर्वेसर्वा.
मग नव्या भिडूंनी, प्रत्येकानी आपापली ओळख करून द्यावी असा फतवा निघाला. मग ते झालं. मग सिनिअरनी आपापली नावं आणि कर्तबगारी आळवली. मग मास्तर बोलायला लागले. नवागतांचं स्वागत वगैरे करून ते कॉलेजच्या अभिमानास्पद नाट्यपरंपरेबद्दल बोलले. मधूनच कोणालातरी त्यांनी टोमणा मारलेला असावा. कारण जोरदार हशा उसळला. अर्थात सिनिअर्स मध्ये. आम्हाला त्यांच्या बोलण्यातले संदर्भ लागत नव्हते.  मधूनच पांचट विनोद टाकत, मधूनच चमकदार श्लेष साधत त्यांची फटकेबाजी चालू होती. शेवटी ते म्हणाले, ‘...तर अशा या देदीप्यमान परंपरा असलेल्या कॉलेजच्या नाट्य-वळवळीत, सॉरी हं चळवळीत, तुमचं स्वागत असो.’
चांगला उमद्या उत्साहानी, नाट्य चळवळीत भाग घ्यायला आलेला, जागतिक रंगभूमीवर उलथापालथ करण्यास आसुसलेला मी, हे स्वागत ऐकून चाट पडलो. अर्थात आम्ही जे करत होतो त्याला वळवळ म्हणणं हासुद्धा सरांचा चांगुलपणाच होता, हे खूप खूप नंतर लक्षात आलं.
खरंतर कॉलेजचं नाटक; करणाऱ्यांचं शारीरिक आणि बौद्धिक वयही वर्षानुवर्ष तेच; त्यामुळे सरांनी यात वर्षानुवर्ष इंटरेस्ट घ्यावा म्हणजे जरा जास्तच होतंय असं आम्हाला नंतर वाटायला लागलं. दरवेळी मुले नवीन, चुका त्याच; तितपतच अभिनय त्यांना जमणार, नाटकाची समजही बेताचीच असणार; मग असं असताना त्यात सरांना काय आनंद मिळत असेल? त्यांची झेप आमच्यापेक्षा फार फार मोठी होती. राष्ट्रीय आणि जागतिक रंगभूमीचा अभ्यासही दांडगा होता. पण का कुणास ठाऊक त्यांना आमच्या वळवळीत रस वाटायचा. अगदी रंगून जायचा मास्तर. तो हाडाचा शिक्षक असल्यामुळेच हे शक्य होतं. ज्या शांतपणे आणि चिकाटीने तो वर्गात मुलांच्या त्याच त्या डिफिकल्टी सोडवायचा, तोच वसा त्यानी नाट्यक्षेत्रातही वसला होता. तो म्हणायचा, ‘कॉलेजमध्ये कोणी कुणाला शिकवत नसतो. आमचं काम म्हणजे शिकायचं कसं एवढं तुम्हाला शिकवायचं. पुढे सगळ्यांनी आपलं आपण शिकायचं असतं.’ असंच त्यानी नाटकाच्या बाबतीतही केलं. नाटक वाचायचं कसं, बसवायचं कसं, करायचं कसं, बघायचं कसं, ह्या सगळ्याची एक दृष्टी दिली त्यानी. पुढे कमीअधिक प्रगती आम्ही आमच्या बळावर केली. काहींनी प्रगती केली तशी काहींची अधोगतीही झाली, पण ते जाऊ दे.
मास्तर असा मी एकेरीत उल्लेख करतोय तो अनादरानी नाही हं. गेली कित्येक वर्ष आम्ही सगळे असाच उल्लेख करतो. समोर ‘अहो सर’ आणि त्यांच्या अपरोक्ष ए ‘मास्तर’. नात्यांनी जरी ते सर असले तरी मनातल्या मनात मित्र जास्त म्हणून हे अरे-तुरे. हे त्यांनाही माहित आहे आणि याला त्याचाही आक्षेप नाही.
मास्तरच्या काही वाईट खोडी होत्या. एकदा नाटक निवडून प्रॅक्टिस सुरु झाली की परोपरीने बोलावूनसुद्धा मास्तर थेट शेवटच्या दिवशी उगवणार. ‘तुम्ही बसवा रे सगळं मग मी रंगीत तालमीला येईन आणि काय काय चुकलं ते सांगीन!’ मास्तर खरंच करायचा असं. अस्सा राग यायचा. आदल्या दिवशी काही बदल सुचवून काय उपयोग. पण नाही, ती त्याची स्टाईल होती. आल्या आल्याच ‘तुम्ही चर्खमू आहात!’ अशी सुरवात. मग जल्लादाच्या उत्साहानी आमच्या नाट्यकलेच्या कलेवराची चिरफाड. सगळे अगदी डोळ्यात पाणी आणून हे ऐकून घ्यायचे. हे डिसेक्शन संपलं, आम्ही पुरते गारद झालोय अशी खात्री झाली, की मग म्हणणार, ‘नाही पण म्हणजे तसं बरं बसलंय बरं का. निदान प्रेक्षक उठून स्वतःहून तरी पडदा पाडणार नाहीत!’ मग सूचनांचा पाउस पडायचा. एकदोन प्रसंग घोटून घेतले जायचे. पहाटेचे चार वाजले  की हा प्रकार थांबायचा. पण आमच्या वेड्यावाकड्या चार चिंध्या जोडून केलेल्या नाट्य-गोधडीला सरांच्या सूचनांमुळे महिरपी चौकट लाभायची. आमचं नाटक आता कितीतरी नेटकं आणि उठावदार होऊन जायचं. मास्तरबद्दलचा राग कुठल्या कुठे पळून जायचा.
प्रयोगाच्या दिवशी तर मास्तर अत्र तत्र सर्वत्र भिरभिरत असायचा. मेकअप, सेट, बेल देणे, पडदा पाडणे, असं काय पडेल ते काम मास्तरचं. दुसरी घंटा झाली की, मास्तरनी फुलं वहायची, नारळ फोडायचा. सारे आता भावूकतेनी मास्तरला वाकून वाकून नमस्कार करायचे. पडद्यापलीकडील दिव्यांनी उजळलेला तो लाल मखमली पडदा दूर होताच प्रेक्षागारातून टाळ्या, टवाळ्या, शिट्ट्या आणि बाणांचा वर्षाव व्हायचा. ह्या साऱ्याला पुरून उरत नाट्यप्रयोग सुरु व्हायचा आणि पहाता पहाता सारे प्रेक्षागार आमच्या कह्यात यायचं. हक्काचे हशे, हक्काच्या टाळ्या वसूल केल्या जायच्या. पांचट विनोदाला पांचट दाद आणि समरप्रसंगी घनगंभीर शांतता असा खेळ सुरु व्हायचा. इंटरव्हलमधे मास्तर चहाचं बघायचा. नेपथ्य, मेकअपचे बदल तपासायचा... होता होता तिसऱ्या अंकाचा पडदा पडायचा. प्रेक्षागृहं रितं रितं होता होता, मनही रितं रितं होत जायचं. एक अनाकलनीय पोकळी भरून यायची. मिठ्या मारत एकमेकांचं अभिनंदन करताना सगळ्यांच्याच डोळ्यातून आनंदाश्रू वहायला लागायचे. मास्तर तर घळाघळा रडायचा. खमंग पिठलं-भाताबरोबर प्रयोगातल्या गोच्यांची उजळणी व्हायची. सकाळी पहिल्या लेक्चरला मुलं येऊ लागली की आमची पांगापांग सुरु. पुढे कितीतरी दिवस कॉलेजमधे ताठ कॉलरनी फिरण्याचं लायसन्स असायचं आम्हाला.
अर्थात दरवेळी सारं काही इतक्या सरळपणे व्हायचं नाही. मुळात किती किती दिवस नाटकच ठरायचं नाही. एकदा असंच नाटक कोणतं करायचं हे शेवटपर्यंत ठरेना. नाट्यकंडू बरेच होते. प्रत्येकालाच प्रमुख भूमिका हवी होती. पण एक कॉलेज-हिरो यासाठी विशेष उत्सुक होता. पण त्याचा वकूब काय आहे, हे तो सोडून सारेच जाणून होते. नाटक, पोरींवर इम्प्रेशन, मग पुढे... असा सगळा त्याच्या आयुष्याचा प्रश्न होता. त्यामुळे ज्यात स्वतःला वाव नाही अशा नाटकाला त्याचा विरोध. इथे दिवस भरत आले तरी नाटकाचं ठरेना. शेवटी मास्तरनी एका नाटकाची कथा सांगितली. नाटकाचं नाव होतं, ‘आणखी एक नारायण निकम’. कथेवरून आणि नावावरून नारायण निकम भोवतीच हे नाटक फिरतय हे स्पष्टच होतं. कॉलेज-हिरोनी मग नारायणची भूमिका मागितली. ती मास्तरनी तात्काळ दिली. पुढे स्क्रिप्ट हातात आल्यावर असं लक्षात आलं, की नारायण निकमचा नाटकाच्या सुरवातीलाच खून होतो. ‘आsss’ असं किंचाळण्यापलीकडे त्याला फारसं काम नव्हतं. बाकीचं नाटक हे ह्या खुनाभोवती गुंफलं होतं. पण कॉलेज हिरोनी आधीच ही भूमिका मागून घेतल्यामुळे इतर चांगले कलाकार आवश्यक तिथे फिट्ट बसले आणि नारायण निकमचा परस्पर काटा निघाला.
एकदा असच भांडण विकोपाला गेलं. भरवशाच्या मंडळींनी असहकार पुकारला. शेवटी मास्तरनी मांडवली करून वाटाघाटीच्या अनेक फेऱ्यानंतर नाटक होणारच हे ठरलं. गॅदरिंगला राहिले होते नऊ दिवस. पण दिवस रात्र एक करून नऊ दिवसात तीन अंकी नाटक बसवलं आम्ही. पाठांतर वगैरे भानगड नाही. तीन चार वेळा वाचन की एकदम स्टेजवर स्टँडींग प्रॅक्टिस. दिवस रात्र हॉल मधेच मुक्काम. वडापाव आणि काहींचे डबे हेच जेवण. अंघोळ वगैरे म्हणजे चैन. पण शेवटी हा नवरात्रोत्सव दहाव्या दिवशी सुफल संपूर्ण झाला आणि आमच्या आनंदला पारावार उरला नाही. आधी टेन्शननी झोप उडाली होती आता अत्यानंदानी उडाली. पण या साऱ्यामुळे आमची टीम खूप घट्ट बांधली गेली. पुन्हा कधी वादावादीचे प्रसंग आले तर हे नवरात्रीचं उदाहरण समोर ठेवलं जाऊ लागलं.
दरवेळी नाटक चांगलच व्हायचं असं नाही. पडेल नाटकं आमच्याही नशिबी होती. नुकताच व्हॉट्सअॅप ग्रुप सुरु केला साऱ्या माजी नाट्यकर्मिंचा. अर्थात मास्तरनीच. नाटकाच्या भारी भारी आठवणी तर खूप निघाल्या. मग मास्तरनी टूम काढली, पडलेल्या नाटकांच्या आठवणी टाका. मग काय विचारता. इतक्या फजीत्यांच्या आठवणी की विचारू नका. असंच एक नाटक सपशेल पडलं. तिसरा अंक सुरु असताना प्रेक्षकात चक्क भेंड्या चालू झाल्या. रडून सुजलेले डोळे घेऊन सारी कलाकार मंडळी बाहेर पडतात तो काय, बाहेरच्या फळ्यावर कोणी तरी खरडून ठेवलं होत, ‘तिसरा अंक पहा मिळेल फुकट चहा!’
नाटक सपशेल पडल्यावर गप्पांचा बार भरला. बारच तो, त्यात मतभेदांचे बार उडायला लागले. कोणी काही, कोणी काही बोलत राहिले. अखंड. एकमेकाची उणीदुणीही निघाली, काही घाव वर्मी लागले. वातावरण तंग होतंय असं बघून मास्तर म्हणाला, ‘तू त्याच्या वर्मा वर बोट ठेवलंस हे ठीक पण त्याच्या शर्मावर किंवा गुप्तावर ठेवलं नाहीस हे अधिक ठीक.’ ह्या पीजे वर सगळे फिदीफिदी हसायला लागले आणि वातावरण निवळलं.
हे असलं काही तरी बोलण्यात मास्तर अगदी पटाईत. अभिरूप संसदेत सभापती म्हणून, तावातावाने सगळेच उभे राहून बोलायला लागले. शेवटी ‘प्रत्येकानी आपापल्या बसण्याच्या जागेचा उपयोग बसण्यासाठी करावा’ अशी मजेदार टिपण्णी करून मास्तरनी गोंधळ शमवला.
कॉलेज कौन्सिलच्या भर सभेत, रागारागानी एकदा डीनलाच ‘महाविद्यालयाच्या सात बाराच्या उताऱ्यावर आपल्या तीर्थरूपांचे नाव आहे काय?’ असा सवाल मास्तरच्या नावे जमा होता.
वर त्याची एक आवडती थिअरी होती. अत्यंत अश्लील, अत्यंत फालतू जोक करायला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची प्रतिभा लागते! मास्तर म्हणायचा, ‘पीजे वर मी एक तासाचं लेक्चर घेऊ शकतो, अत्यंत टुकार विनोद करायला आणि अत्यंत उत्तम विनोद साधायला एकाच मापाची प्रतिभा लागते.’ आणि एके दिवशी खरोखरच मास्तरनी असं लेक्चर घेतलं. गप्पांमध्ये हा विषय निघाला आणि सुरूच झाला मास्तर. विनोद, त्याची मेंदूतली फिजीऑलॉजी, त्याचे आपल्या शरीर-मनावर होणारे परिणाम, त्याचं भाषाशास्त्र, श्लील-अश्लील अशा कल्पना, नाट्य, गद्य, पद्य, देशी, विदेशी  असे विनोद... बाप रे बाप! टवाळा आवडणाऱ्या हास्यरसावर इतकं गंभीर, वैचारिक आणि तरीही रसाळ प्रवचन मी कधीच ऐकलं नव्हतं आणि आजवर ऐकलेलं नाही. पण हे असलं विवेचन हा अपवाद मास्तरचा नेहमीचा पिंड म्हणजे, जरा बरा दादा कोंडके!
ही सगळी प्रतिभा स्टाफ डिबेट मध्ये उतू जायची. गणेशोत्सवात पार पडणारी स्टाफ डिबेट म्हणजे अधिकृत शिमगाच असायचा. एरवी अत्यंत संयत आणि समंजस वागणारी स्टाफ नावाची जमात चौखूर उधळायची. कमरेच्या वर विनोद केला तर तो वक्ता त्याच वक्ताला बाद. मुळात ते मेडिकल कॉलेज, त्यामुळे जननेंद्रियांबद्दल बोलताना पाचपोच आधीच कमी, त्यात असा भाद्रपद मास. बाई म्हणू नका, बुवा म्हणू नका, सिनिअर म्हणू नका, ज्युनिअर  म्हणू नका; सगळे यात एकदिलाने, हिरीरीने सामील. अशाच एका डिबेटमधे कोणीतरी सवाल केला, ‘वेश्यांना मुलं का होत नाहीत?’ याला मास्तरचा जवाब होता, ‘पायवाटेवर कधी गवत उगवतं का?’ मास्तरचे असे सवाल जवाब गगनभेदी दाद मिळवून जात.
नाटकाच्या प्रॅक्टिस वेळीही ही मिश्किली चालू राही. एकदा काय झालं, रंगीत तालीम अगदी रंगात आली होती. स्टेजवरचं जोडपं तर आणखी रंगात होतं. एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करायला त्यांना अभिनय करावाच लागत नव्हता. त्यामुळे स्टेजवरच्या नाटकातला लव्ह सीन अगदी जिवंत वठत होता. दिवस कॉलेजचे होते. वय फुलपाखरी होतं. नव्या नव्हाळीचं प्रेम मुसमुसत होतं. स्पॉट पडला.  त्या दोघांनी एकमेकाला मिठीत घेतलं, अगदी सहजपणे, निर्व्याजपणे हसत ती दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहिली, रोमँटिक पार्श्वसंगीताचा तुकडा वातावरण भारून टाकत होता. एक गुलाबी शिरशिरी प्रॅक्टिस हॉल मधे भरून राहिली आणि सारी शांतता भेदत सरांचा खर्जातला आवाज घुमला, ‘नाट्यवृक्षाला नवीन फूल  आलेलं दिसतंय, पण इतक्यात फळ येणार नाही याची काळजी घ्या!!!’
स्पर्धा होती विविध गुणदर्शन. मग काय एकेकाला चेवच चढलेला. अफलातून कल्पनांचा पाउस पडला. त्यात एक पावसाचं गाणं होत मधेच. पावसात दोघ बेधुंद होऊन नाचताहेत वगैरे... पण पाऊस कसा पाडणार? मास्तरनी भन्नाट कल्पना सुचवली... लांबलचक कापडाच्या घडीत चुरमुरे भरण्यात आले. हे कापड ड्रॉप पडद्याच्याही वर दोघांनी धरलेलं. बरोब्बर वेळ साधून हे कापड उपडं केलं गेलं. मग काय विचारता. चुरमुऱ्यांचा क्षणिक पडदा झीरझीरत खाली पडला. अंधार आणि फक्त अल्ट्राव्हायोलेट प्रकाश, त्यामुळे ते चुरमुरे अगदी पाण्याच्या थेंबासारखे चमकत होते. नेमका कॅमेऱ्याचा फ्लॅश उडवून विजेचा आभासही साधला गेला... टाळ्यांच्या आणि त्याहीपेक्षा खणखणीत आश्चर्योद्गाराच्या गजरात आम्ही बाजी मारली होती. असा पाउस न कधी पडला होता आणि पुन्हा कोणी पाडलाच तर त्यावर आमचं पेटंट असणार होतं.
एकदा एकानी चक्क नवेकोरे, झकास, धमाल विनोदी, स्क्रिप्ट लिहून आणले. सारे खूष. कॉलेजसाठी हवी तशी ती एकांकिका होती. सर्व पात्र तरुण होती. मुली कमी होत्या. थिल्लरपणा भरपूर होता. प्रोफेसरांवर विनोद करायला भरपूर वाव होता. पण वाचन झालं आणि लेखकाला सरांनी खोपच्यात घेतला. दुसऱ्याच दिवशी ते स्क्रिप्ट लेखकाच्या रूम वरून गायब झालं, संध्याकाळी तर लेखकही गायब झाला... बऱ्याच प्रयत्नानी तो सापडला, तर तो लेखकू सांगू लागला की हे स्क्रिप्ट करायला माझी परवानगी नाही. सगळा धुरळा जरा खाली बसल्यावर मास्तरनी सांगितलं, ते स्क्रिप्ट चक्क चोरलेलं होतं. हे वाग्ड़मयचौर्य मास्तरला मुळीच मान्य नव्हतं. स्क्रिप्ट आणि नाटककार दोन्ही गायब झाले ते मास्तरच्या सूचनेवरून.
बटूमूर्ती, खर्जातला दमदार आवाज, खुरटी दाढी, पोट किंचित जास्त सुटलेले, ते पोट आत राखायचा प्रयत्न करणारा शर्ट आणि गळ्यात शबनम असा मास्तरचा  अवतार. सर डीन झाले पण मूळचा पीळ काही सुटला नाही. मूळचा पोशाखही सुटला नाही. मुळातच पोशाखीपणाला मास्तरच्या वागण्यात मज्जावच होता. त्यामुळे डीन झाल्यावर निव्वळ खोली आणि खुर्ची बदलली, मास्तर तोच. डीनच्या चेम्बरचं दार सताड उघडं राहू लागलं. सर गाडी कधीच वापरायचे नाहीत. क्वाटर्स जवळच होत्या. सर आपले सायकलवरून ये जा करायचे. पार्किंगमधे डीनच्या गाडीसाठी खास चौकोन आखलेला होता. आता सरांची सायकल तिथे लागायची. डीननी राउंड घ्यावा असा प्रघात होता. रोज उठून सगळीकडे चक्कर मारण्याचा सरांना भारी कंटाळा. मग ते विचारणार, ‘खरंच काही प्रेक्षणीय आहे का? का तमाशाच्या बोर्डवरच्यासारखं नुसतंच मला गोल चक्कर मारून, जाऊन आलो म्हणणार मथुरेच्या बाजाराला?’
अर्थात इतक्या बहारदार मास्तरांचं शिकवणंही तेवढच बहारदार असणार की. वर्गात हास्याचे फवारे उडत असायचे. फ्लुकानोझोल, आयट्राकोनाझॉल, आयमीडॅझॉल, आयसोकोनाझॉल, बायफ्लूकानोझॉल ही औषधांची नावं लक्षात कशी ठेवायची असा प्रश्न विचारताच सरांचं थंड उत्तर, ‘अरेsss बाळा sss मराठीतल्या शिव्या नाही का रे येत तुला?’
सरांच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द वहीत टिपून घेणारी एक ललना होती. मग एखादा विनोद झाला की सर तिला सांगणार, ‘डोन्ट नोट धिस डाउन, इट वॉज अ जोक हां.’
ज्ञानाच्या आणि ज्ञानदानाच्या जोरावर मास्तर प्रोफेसर इमेरीटस झाला. जणू गुरूंचे गुरु अशी ही उपाधी. हा मोठाच सन्मान. आधी प्राचार्य होता तो आता आचार्य झाला. पण आचार्य झाला तरी ढुढ्ढाचार्य कधीच नाही झाला. एकदा एका नवतरुण डॉक्टरनी ऑपरेशनची एक वेगळीच पद्धत दाखवली. ऑपरेशन तेच पण करण्याची पद्धत अधिक साधी, सुलभ. सगळे ज्येष्ठ प्रोफेश्वर इम्प्रेस्ड पण गप्प. पण विद्यार्थ्यांनी आता हीच पद्धत वापरावी असा आदेश आला तो थेट मास्तरकडूनच. ‘उद्यापासून माझ्या युनिटमध्ये माझे विद्यार्थी ही पद्धत वापरतील!’ बस् एवढ्या एका साध्या वाक्यात त्यानी त्याच्या पेक्षा वयानी, ज्ञानानी, अनुभवानी अगदी लहान असणाऱ्या एका नवख्या डॉक्टरची चमकदार कल्पना विनासंकोच स्वीकारली होती. त्याच्या प्रतिभेला दिलेली ही दाद होती, अगदी दिलखुलास, स्वतःचा मोठेपणा आड येऊ न देता. नव्याचा स्वीकार कसा करावा याचा हा मोठाच धडा होता आमच्यासाठी. म्हणुनच म्हटलं, मास्तर  आचार्य झाला तरी ढुढ्ढाचार्य कधीच नाही झाला.
म्हणून तर अशा सदाहरित मास्तरचा सहवास आजही हवाहवासा वाटतो. आजही व्हॉट्सअॅप वरून हुकुम सुटतो. अमुक नाटकाला अमुक ठिकाणी या रे सगळे; आणि येतात सगळे. स्वतः रिटायर झाला असला तरी कॉलेजमधल्या सध्याच्या  नाटकाच्या ग्रुपशी मास्तरचा संपर्क जैसे थे आहे. त्यामुळे नव्यानंच मिसरूड फुटलेल्यांपासून ‘कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली’ पर्यंत सारे गोळा होतात. मास्तर हा सगळ्यांना जोडणारा दुवा. नाटक चांगलंच रंगतं. मग त्यानंतर गप्पांचा फड उशीरा पर्यंत रंगतो. हा चौथा अंक कित्येकदा नाटकापेक्षाही रंगतदार होतो.












Thursday, 23 November 2017

मूत्र सूत्र

मूत्र सूत्र
डॉ. शंतनू अभ्यंकर
वारंवार युरीनरी इन्फेक्शन होणं ही आपल्याकडची कॉमन समस्या आहे. उन्हाळे लागलेत, उष्णता झाली आहे, असे काही शब्द या साठी प्रचलीत आहेत. महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळतो.
लघवीला जळजळ, घाईची आणि वारंवार लागणे आणि ताप थंडी अशी लक्षणे दिसतात. लघवीला जळजळ होत असल्यामुळे, थंड सरबत वगैरे घेतलं जातं. सोडा, कोकम असे घरगुती उपचार चालतात. काहींना तर, डॉक्टरकडे जाऊन जाऊन, ते कोणत्या गोळ्या देणार हे पाठ झालेलं असतं. मग परस्पर दुकानातून गोळ्या आणल्या जातात. त्यांनी बरं वाटतं, पण पुन्हा काही दिवसांनी येरे माझ्या मागल्या. याला रिकरंट युरिनरी इन्फेक्शन म्हणतात. यातूनच काही वेळा इन्फेक्शन किडनी पर्यंत जातं, त्यामुळे या कडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
सहसा यावर अंदाजपंचे औषध दिलं जातं. कारण जंतू कोणत्या प्रकारचे आहेत आणि ते कोणत्या औषधांनी मरतील याची तपासणी (culture & sensitivity) करून रिपोर्ट यायला चार दिवस लागतात. पण जेव्हा वारंवार इन्फेक्शन होत  असेल तेव्हा  कोणते जंतू आहेत, ते कोणत्या औषधांनी मरतात वगैरे तपासण्या करून मगच त्या जंतूंचा समूळ नायनाट होईल अशी औषधयोजना केली जाते. डायबेटीस वगैरे अन्य बॉयफ्रेंड्स शरीरात मुक्कामी  नाहीत ना हेही बघितलं जातं. सोनोग्राफी, IVP (intra venous pyelography, यात मूत्रमार्गातील अडथळे दिसतात.) वगैरे करून मूत्रमार्गात बाकी काही दोष नाही ना, ते ही बघीतलं जातं.
इन्फेक्शन झालं तर डॉक्टरी सल्याप्रमाणे पूर्ण काळ औषधपाणी घ्यावं. बरेचदा एखाद्या गोळीनी आराम पडतो आणि मग पुढच्या गोळ्या घ्यायची टाळाटाळ केली जाते. किंवा त्या विसरून जातात. एखाद्या गोळीनी चांगला फरक पडणं हे तोट्याचं ठरतं अशावेळी. औषधं अर्धवट सोडली की जंतू पुन्हा त्याच औषधाला जुमानत नाहीत. त्यामुळे पूर्ण कोर्स करणं महत्वाचं आहे. शिवाय ह्या औषधांचा  उपयोग झालाय का? जंतूंचं समूळ उच्चाटन झालंय का हे ही पुन्हा culture & sensitivity करून पहायला हवं. कधी कधी ही तपासणी वारंवार करावी लागते.
काही वेळा वारंवार जास्त डोस देण्यापेक्षा एकाच औषधाचा डोस अगदी कमी प्रमाणात पण तीन महिने वगैरे दिला जातो. ही युक्ती बरेचदा लागू पडते.
 पण वारंवार इन्फेक्शन होऊ नये म्हणून काही पथ्य पाळणं, जुन्या सवयी बदलणं आणि नव्या लावून घेणं जरुरीचं आहे.
या सगळ्या सल्यामागचं मुख्य सूत्र असं की लघवी शरीरात कमीतकमी वेळ साठून राहिली पाहिजे. भरपूर पाणी प्यायलं की आपोआपच लघवीला जास्त वेळा जावं लागतं. त्यामुळे भरपूर पाणी पिणं महत्वाचं. उन्हाळ्यात घाम जास्त येतो आणि परिणामी लघवी कमी होते. यासाठी उन्हाळ्यात तहान भागल्यावर वर थोडं जास्त पाणी प्यायला हवं.  थंडीतही विशेष तहान लागत नाही. कमीच पाणी प्यायलं जातं. त्यामुळे थंडीतही उन्हाळे लागू शकतात. अगदी लक्षात ठेऊन थंडीतही जास्त पाणी प्यायला हवं. जरी लघवीला लागली नाही तरी दर दोन तासांनी साठली असेल तेवढी लघवी करून टाकणं महत्वाचं. कामाच्या ठिकाणी, प्रवासात, बरेचदा लघवी करणं टाळलं जातं. लघवी होणं हा ब्लॅडरमधल्या जंतुंसाठी नैसर्गिक फ्लश आहे. तो जास्तीजास्त वापरला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी उशीरात उशीरा आणि सकाळीही उठल्यावर लवकरात लवकर लघवी करण्यानी इन्फेक्शनचं प्रमाण बरंच कमी होतं.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरसंबंध येण्यापूर्वी आणि आल्यावर शक्यतो लगेच बाथरूमला जाणं चांगलं. स्त्रियांचा मूत्र मार्ग (urethra) हा आखूड असतो. शरीर संबंधाच्या वेळी सहज पणे जंतू आत शिरू शकतात, त्यामुळे ही काळजी महत्वाची.
या आणि अशात अन्य लेखांसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in


Saturday, 18 November 2017

Tuesday, 14 November 2017

कठीण समय येता कोण कामास येतो?

                 
कठीण समय येता कोण कामास येतो?
डॉ. शंतनू अभ्यंकर


ऐनवेळी कुणाचे फाटले वा निसटले
नवेळी कुणाचे सरले वा विसरले
नकळत-कळत जेंव्हा भोग-संभोग होतो, 
कठीण समय येता को कामास येतो?

मुळात गर्भ निरोधक साधने वापरायचीच नाहीत. वापरली तर नीट सर्व समजून घेऊन वापरायची नाहीत असा आपला खाक्या.
 गोळ्यांनी म्हणे वजन वाढते, खायला विसरतात, म्हणून नको! कॉपर टी ची भीती वाटते म्हणून नको!! इंजेक्शननी पाळी अनियमित येते म्हणून नको!!! असा हा नन्नाचा पाढा. कितीही समजावून सांगितलं तरी गैरसमजाची जळमटं काही हटत नाहीत.
‘आता’ मुले नकोतचवाली जोडपी सरळ ऑपरेशन करून घेतात. पण ‘आत्ता’ नको (नंतर हवं)वाली मंडळी नन्नाचा पाढा म्हणत बरेचदा निरोध वा काल-निर्णय पद्धत अवलंबतात किंवा काहीच गर्भनिरोधक वापरत नाहीत. मग घोटाळे होत राहतात.
कधी ‘निरोध’ नसतो, कधी असतो पण वापरला जात नाही, कधी निसटतो, फाटतो... मग नको असताना दिवस राहण्याची भीती वाटू लागते! कधी अचानक इकडून येणं होतं, मागणी होते. कधी ‘काल-निर्णय’चा निर्णय चुकतो. कधी ‘नकळत सारे घडले’ या शिवाय अन्य काहीही सबब नसते. नको असताना दिवस रहाण्याची भीती वाटू लागते!! कधी कुण्या अभागीनिवर जोर जबरदस्ती होते; तिला यातून दिवस तर गेले नसतील ना ही कुशंका डोकावते!! मोठा कठीण समय येऊन ठेपतो.
अशा परिस्थितीत गर्भधारणा टाळता येईल अशा पद्धती आता उपलब्ध आहेत. कठीण समय येता आपात्कालीन गर्भ निरोधक साधने उपयोगी पडतात.
गोळी किंवा तांबी अशा स्वरुपात ही साधने उपलब्ध आहेत.
जर गर्भ संभवाची भीती असेल तर अशा संबधानंतर शक्यतो बारा तासाच्या आत ही गोळी (LEVONORGESTREL 1.5mg) घ्यायची असते. याला ना डॉक्टरी सल्ल्याची गरज ना कोणत्याही वैद्यकीय तपासणीची! जेवढ्या लवकर गोळी घेतली जाईल तेवढं उत्तम. अन्य कोणतीही औषधे चालू असतील वा अन्य आजार असेल तरीही ही गोळी घ्यायला हरकत नाही. अतिशय सुरक्षित अशी ही गोळी आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळू शकते.
जर गोळी घेतल्यानंतर २ तासात उलटी वगैरे झाली तर मात्र उलटी होऊ नये, असं औषध घेऊन मग पुन्हा ही गोळी घ्यावी.
दिवस राहणार नाहीत, अशी ऐंशी टक्के खात्री आपण बाळगू शकतो. मात्र ८०%च्या भरोश्यावर रहाण्यात अर्थ नाही. अपेशी २०%त आपण आहोत का, हे जाणून घेणं महत्वाचे आहे. कारण गोळीमुळेही पाळी थोडी पुढे जाते आणि दिवस राहिले तर जातेच जाते. तेव्हा पुढच्या पाळीला आठवड्याभरापेक्षा जास्त ‘उशीर’ झाला तर दिवस गेले आहेत का ते तपासून घेणे इष्ट.
आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. संबधानंतर १२ तासात गोळी घेतली गेली तर उत्तमच. मात्र उशिरात उशीरा ही गोळी ७२ तासापर्यंत घेता येते. मात्र जेवढ्या लवकर घ्याल तितकी परिणामकारकता अधिक.
शिवाय गोळी घेतल्यानंतर पुढे नेहमीची गर्भ निरोधक साधने वापरायलाच हवीत. गर्भसंभव थांबवण्याची गोळीची क्षमता ही गोळी घेण्याआधीच्या ७२ तासातल्या संबधाला लागू पडते. गोळी घेतल्यानंतर जर संबंध व्हायचा झाला तर त्यापासून होणारी गर्भधारणा ही गोळी रोखू शकत नाही. एकाच महिन्यात वारंवार ही गोळी वापरणे चुकीचे आहे. त्यामुळे पाळी पुढे जाते आणि गर्भसंभव होण्याचीही शक्यता रहाते.
गोळीचेही प्रकार उपलब्ध आहेत. १ गोळी घेण्यापासून ५० गोळ्या घेण्यापर्यंतचे डोस आहेत. नेहमीच्या गर्भ निरोधक गोळ्याही या कमी वापरता येतात. पण माहिती सुटसुटीत असावी म्हणून केवळ एकाच पद्धतीची गोळी सांगितली आहे. सर्व माहिती LEVONORGESTREL 1.5mg या गोळीसाठी दिलेली आहे.
गोळी ऐवजी संबधानंतरच्या ५ दिवसांत तांबी बसवली तरीही गर्भ धारणा टाळता येते.
त्यातूनही जर दिवस गेलेच तर गर्भपाताच्याही गोळ्या मिळतात, त्या डॉक्टरी सल्ल्याने घ्याव्यात.
वरील सर्व प्रकार आपात्कालीन स्थितीत वापरायचे आहेत. एरवी नाही. या पद्धती ‘फेल जाण्याची’ शक्यता बरीच आहे (२०%). नियमित वापरायच्या पद्धतीत (गोळ्या/तांबी/इंजेक्शन) मध्ये हे प्रमाण १% पेक्षा कमी आहे. तेव्हा या आपत्कालीन गोळ्या नियमित वापरणे चुकीचे आहे. 
एस.टी.च्या मागच्या खिडकीतून एरवीही ये जा करता येते. पण आपण दारानेच ये जा करतो. मागची खिडकी ‘अपघाताचे वेळीच’ वापरायची असते. तसंच काहीसं हे आहे!

-डॉ.शंतनू अभ्यंकर