दोन पत्र
विख्यात अभिनेते, डॉ. गिरीश ओक माझे मित्र. एका कार्यक्रमासाठी त्यांनी दोन
पत्रं लिहून मागितली, एक पेशंटनी डॉक्टरना लिहीलेलं आणि दुसरं त्याचं डॉक्टरनी
दिलेलं उत्तर. सद्यस्थितीत दोन्ही बाजूनी विचार करून समतोल पण तरीही अर्थपूर्ण असं
काही तरी मी खरडलंय असं आपलं मला वाटतं. सोबतची पत्र वाचा आणि तुमचं काय मत ते
जरून नोंदवा???
महोदय,
बरेच दिवस लिहायचं मनात होतं. आज हिय्या करून पेन सरसावलं आहे. मनात आहे ते
थेट सांगतो, रागावू नका, गोड मानून घ्या. शेवटी तुकारामांनी म्हटलेलंच आहे, ‘निंदकाचे
घर असावे शेजारी’.
तसं माझं तुमचं काही वैर नाही. पण दरवेळी तुमच्याकडे आलो की पोटात गोळा ठरलेला.
आता हा गोळा मोठा मोठा व्हायला लागला आहे. भीती अशी की आता हा कसाई आपल्याला कसा
कसा कापतोय? कसा कसा नागवतोय? आपण तर आजारी, संपूर्ण परावलंबी, डॉक्टरशिवाय चालणार
तर नाही पण जावं डॉक्टरकडे तर विश्वसनीय ठिकाण नाही. आपलं भलंच होईल या खात्रीऐवजी
आपलं भलतंच होईल ही शंका आता कुरतडू लागते.
काय काय ऐकतो आम्ही, कट प्रॅक्टिस करणं प्रत्येकालाच भाग आहे म्हणे आता,
खोट्या खोट्या तपासण्या, अनावश्यक ऑपरेशन, अनावश्यक औषधे, त्यातला कट, तपासणीच्या अव्वाच्या
सवा फिया, पैसे देऊन विकत घेतलेले डॉक्टरकीचं शिक्षण, मृतालाही व्हेंटिलेंटर लावून
मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार सर्रास सुरु असल्याचं ऐकतो... आणि माझा
माझ्याच कानावर विश्वास बसत नाही.
पूर्वी आमचे फॅमिली डॉक्टर होते त्यांनी सांगितलेले आम्ही मुकाट ऐकायचो आणी
आमचे कधीही वाईट झाले नाही.
फसवणूक तर पदोपदी वाट्याला येते, प्रत्येक क्षेत्रात येते, पण कधी बिल्डरच्या
ऑफिसच्या काचा फुटल्याचं ऐकलं नाही. असं कसं? स्वस्त औषधे लिहून द्यायला डॉक्टर
टाळाटाळ का करतात? अत्यवस्थ पेशंटला उपचारापूर्वी पैसे का भरावे लागतात? लाखोंची
बिलं भरून सुद्धा पेशंट दगावला तर जबाबदार कोण? किरकोळ तक्रारींसाठी तपासण्यांचं
मारूतीचं शेपूट का लावलं जातं? दोन डॉक्टरची मतं अजिबात जुळत नाहीत, उलट नेमकी
विरुद्ध पडतात, असं कसं? एखाद्या हॉस्पिटलमधे केलेली तपासणी ही दुसऱ्या ठिकाणी
नापास का होते? पुन्हा पहिल्यापासून तपासण्या का करायला लावतात? सर्वच डॉक्टर इतके
बिझी कसे असतात? कोणालाच ऐकायला, बोलायला, समजावून सांगायला वेळ नसतो, प्रश्न
विचारले की नाखूष, असं कसं? इतका सगळा गदारोळ होऊनही डॉक्टरच्या संघटना या
गैरप्रकारांबद्दल अगदी क्षीण आवाजात का बोलतात?
मी काही कुणावर वैयक्तिक आरोप करत नाही, पण आम्हाला स्वस्त, खात्रीपूर्वक
आरोग्यसेवा मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? डोनेशनोत्पन्न डॉक्टरांच्या ह्या
भाऊगर्दीत चांगला डॉक्टर ओळखायचा कसा?
शेवटी एकच प्रश्न, डॉक्टर तुम्ही आजारी पडलात तर हीच व्यवस्था तुमच्याही
वाट्याला येणार आहे याची भीती नाही का वाटत तुम्हाला?
तुमचा
एक पेशंट
आ. पेशंटसाहेब,
स. न.
तुम्ही मोकळेपणानी लिहिलंत हे बरं झालं. तुमचा युक्तीवाद थोडा विस्कळीत आहे,
पण असो. एकूणच पेशंटनी वैतागून एकामागून एक तक्रारी सांगत जाव्यात आणि डॉक्टरनी
त्या ऐकता ऐकताच त्यांची मनातल्या मनातल्या संगती लावावी तसं काहीसं वाटलं मला हे.
प्रथमच सांगतो की तुमच्या तक्रारी, आरोप हे काही प्रमाणात मान्यच आहेत. हे
सत्यच आहे. तुम्ही लिहिलंय त्यात अतिशयोक्ती आहे, गैरसमज आहेत पण हा तुमचा दोष आहे
असं मी म्हणणार नाही. उलट तुम्ही तक्रारींचा पाढा वाचला आहे आता योग्य निदान आणि
उपचाराची योजना मी सुचवायची आहे.
लक्षात घ्या, मी ‘सुचवायची आहे’ असं म्हणतोय. करायची आहे असं नाही. मी सुचवलेले
उपाय स्वीकारायचे किंवा नाही, हा पूर्णपणे तुमचा अधिकार आहे; आणि इथे सर्व सिस्टीमच
पेशंट आहे. याला उत्तर राजकीय, सामाजिक, आर्थिक, नियोजन, इंस्युरंन्स असं अनेक
कलमी आहे.
सगळ्यात महत्वाचं, आणि हे तुम्हालाही मान्य असेल, की डॉक्टरवर हल्ले करून,
दवाखाने जाळून प्रश्न नक्की सुटणार नाही. तुमचा राग थोडा शमेल पण यांनी वातावरण
आणखी बिघडेल. ज्या कुणा पेशंटची जी काही तक्रार आहे, ती सांगायची, सोडवायची,
त्याचा न्याय करायची यंत्रणा आपल्याकडे खूप जुजबी आहे, वेळकाढू आहे आणि त्यामुळे
अशा यंत्रणांना सध्यातरी अजिबात विश्वासार्हता नाही. कायदा हा प्रश्न नीट हाताळत
नाही म्हणुनच तर लोक कायदा हातात घेतात. खरी मेख इथे आहे. तक्रारीची योग्य दखल
घेतली जात असती तर तुम्ही तरी ‘मला’ कशाला पत्र लिहीलं असतंत; थेट संबंधित
अधिकाऱ्यालाच लिहीलं असतंत ना!
एकेकट्या डॉक्टरनी चालवायच्या लहान दवाखान्यांचे दिवस आता भरले आहेत. सतत
खळ्ळ-खटॅकच्या छायेत रहाणं अवघड अवघड होत चाललं आहे. बिलात लवचिकता आणि घराजवळ,
तुलनेने स्वस्त सेवा हे या दवाखान्यांचे
गुण; पण उपचार आणि बिलातील अपारदर्शकता आणि मोजक्याच प्रकारच्या सेवा हे यांचे
तोटे. अशा छोटया दवाखान्यात तुम्ही अमक्या अमक्या डॉक्टरसाठी म्हणून जाता. पण हे
बदलत चाललं आहे. अनेक डॉक्टरनी आणि व्यवस्थापनतज्ञांनी एकत्र येऊन मोठे मोठे दवाखाने व्यावसायिक
पद्धतीनी चालवणं ही आता काळाची गरज आहे. इथे हॉस्पिटलला नाव आहे चेहरा आहे,
डॉक्टरला अजिबात नाही.
तपासण्यांचे, उपचारांचे, स्टॅण्डर्डायझेशन होणे महत्वाचे आहे. लॅबोरेटरी
क्षेत्रात हे आजही काही ठिकाणी झालं आहे. उपचाराच्या क्षेत्रात खूप मोठया प्रमाणावर
व्हायला पाहिजे. उपचार हे पूर्वनिश्चित प्रोटोकॉलवर आधारित हवेत. तरच त्यातल्या
त्रुटींचा उहापोह होऊ शकतो. हे काम सरकार आणि तज्ञांच्या संघटना असं दोघांनी मिळून
करायचं आहे.
तपासण्या आणि उपचारांच्या रास्त किमतीचेही प्रमाणीकरण व्हायला हवे. ह्या
साऱ्यातील तफावतीबद्दलच्या तुमच्या तक्रारींचं उत्तर हे आहे.
डॉक्टरनी प्रत्येकाचा आणि प्रत्येकाच्या प्रत्येक नातेवाईकाचा, प्रत्येक
प्रश्न, हा तात्काळ झेलला पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे. अशा प्रश्नांच्या
सरबत्तीला तोंड द्यायला, खरंतर प्रत्येक डॉक्टरला अनेक उप-डॉक्टरांची गरज असते.
परदेशात त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञ नर्सेस हे काम सांभाळतात. आपल्याकडे
परिस्थिती अशी आहे की इथे डॉक्टर जास्त आणि नर्सेस कमी आहेत. संवादाचा अभाव
उद्भवतो तो यामुळे. पुढे त्याचा विसंवाद आणि वाद व्हायला मग कितीसा वेळ? खूप
मोठ्या प्रमाणावर समुपदेशकांची फौज लागणार आहे आपल्याला. डॉक्टरनी सुचवलेले उपचार
आणि व्यवहार यांची सांगड घालायला हे आवश्यक आहे.
सार्वजनिक आरोग्यसेवा ही खूप खूप सुधारायला हवी. खाजगी हॉस्पिटलना चॅलेन्ज अशी
तोलामोलाची असायला हवी. सरकारी दवाखाने हे सर्वदूर आहेत, फुकट आहेत पण अनास्थेनी
त्यांचा कणाच मोडला आहे. तिथे अजून भरपूर पैसा ओतायला हवा, भरपूर स्टाफ हवा, साधन
सामुग्री हवी, त्याशिवाय हे सत्र थांबणार नाही. वजनदार राजकीय नेत्यांनाही माझं
सांगणं आहे की उगाच अमक्याचं बील कमी करा, तमक्याचं ऑपरेशन फुकट करा असली समाजसेवा
कुचकामी आहे. वैयक्तिक संबंधांपोटी एखाद्या पेशंटवर खूष होऊन तुम्ही त्याला मदत
करता, याला सरंजामशाहीचा, दौलतजादा केल्याचा वास येतो. तुमचं काम सार्वजनिक आरोग्यव्यवस्था
सक्षम कशी होईल हे पहाणं आहे, याकडे लक्ष पुरवलं तर आणखी अनेकांचं भलं होईल.
तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरचा उल्लेख केला आहे. फॅमिली डॉक्टर ही किती
उपयुक्त आणि चांगली संस्था होती असं स्मरणरंजन सगळ्यानाच भावतं. लोक मग आपापल्या फॅमिली
डॉक्टरच्या नावे कढ काढतात. एका संथ, स्वस्त आणि वैद्यकविश्वावर विश्वास असणाऱ्या
जीवनशैलीचा परिणाम म्हणून ती संस्था उत्क्रांत झाली होती. अशी रचना डॉक्टरांनी
किंवा समाजानी जाणीवपूर्वक तयार केली नव्हती. जीवनशैली बदलली, विद्युतगती, अवास्तव
अपेक्षा आणि फट् म्हणता निष्काळजीपणाचा आरोप होण्याची शक्यता अशा वातावरणात फॅमिली
डॉक्टर ही संस्था लयास गेली यात नवल ते कसलं? हा मुक्काम सोडून आता बराच काळ लोटला
आहे पेशंट साहेब; आता तर तुम्ही स्वतःला ग्राहक आणि आम्हाला विक्रेते ठरवूनही बरीच
वर्ष झाली. ह्या मुक्कामी आता पुन्हा जाता येणार नाही.
तुम्ही स्वस्त औषधांचा उल्लेख केलात ते बरं झालं. औषधांच्या किमती आणि दर्जा
ह्या दोन्हीची जबाबदारी सरकारची आहे, या बाबत निव्वळ तोंडदेखले उपाय करून डॉक्टरच्याकडे
बोट दाखवणं हा अप्रमाणिकपणा आहे, हा झटपट लोकप्रियतेचा मार्ग आहे. यांनी तेवढंच
होईल, लोकप्रियता मिळेल, पण समाजमन आणखी गढूळलं जाईल, औषधं स्वस्त होणार नाहीत;
याच काय? उलट, किंमत आणि दर्जा सांभाळणारी यंत्रणा सक्षम केली तर सर्वदूर तत्काळ आणि दीर्घकालीन परिणाम
दिसेल.
जीवनशैली बदलली असं आपण सारेच मान्य करतो पण त्याबरोबर मरणशैलीही बदलली आहे
त्याचं काय? आज माणसं तेराव्याच्या खर्चाची काळजी करत नाहीत, आयसीयुच्या खर्चाची
करतात. ‘अरे जगणं मरणं एका श्वासाच अंतर’, असं बहिणाबाईंनी म्हटलय; पण आता तसं
राहिलेलं नाही, मधे व्हेन्टीलेटर आहे, अॅन्जिओग्राफी आहे, अॅन्जिओप्लास्टी आहे,
पेसमेकर आहे, डायेलीसीस आहे... अगदी अवयव-दानही आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या
आजारपणाचा खर्च हा फुगत जाणार हे उघड आहे. त्याचं नियोजन करणं ही प्रत्येकाची
जबाबदारी आहे. मृत्यू ही कितीही हृदयद्रावक घटना असली तरी तो येण्यापूर्वी
केलेल्या धडपडीचं काही तरी मोल असणारच की, ते कोणी तरी भरावं लागणारच की.
चांगला डॉक्टर कसा ओळखायचा हे मलाही सांगता येणं अवघड आहे. पण मी म्हणीन की
स्वतःचे ज्ञान जो अद्यावत ठेवतो, उपचारांच्या यशाबरोबर जो अपयशाचीही चर्चा करतो,
यशापयशाची आकडेवारी सांगतो, अन्य कुणाचाही सल्ला घ्यायला मदतच करतो... असा कदाचित
चांगला असू शकेल. चांगला रिक्षावाला किंवा चांगला बिल्डर किंवा वकील कसा ओळखावा
असं मी तुम्हाला विचारलं तर?
तुमचा शेवटचा प्रश्न मात्र मलाही बुचकळ्यात टाकणारा आहे. ह्याच सिस्टीममधून
मलाही जावं लागेल ही भीतीही आहेच की. त्यावर अर्थात ताबडतोब उपाय नाही. सिस्टीम
बदलण्याचा प्रयत्न करणं आणि आजही जे उत्तम काम करत आहेत त्याचं कौतुक करणं,
त्यांना प्रोत्साहन देणं, आजच्या ह्या सोहळ्यासारखे देखणे समारंभ घडवून आणणं एवढं
तर आपण नक्कीच करू शकतो.
तुमचा
एक प्रामाणिक डॉक्टर