सखा, नव्हे प्राणसखा!
डॉ शंतनू अभ्यंकर, वाई. मो. क्र. ९८२२०
१०३४९
या आणि अशाच लिखाणासाठी
माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in
सीझर झालं पण त्या बाळानी
श्वासच घेतला नाही. अजीबात. निपचित पडून होतं ते. त्याचा जीव जायला लागला होता.
आणखी थोडा वेळ असंच पडलं तर ते नक्की जाणार. त्याच्याबरोबर आमच्या सगळ्यांचाच जीव
टांगणीला लागला होता. ती बाई आलीच खूप उशिरा. पार पोटातलं मूल अर्धमेलं झाल्यावर
ती आली. त्याचे ठोके लागत होते चाळीसच्या आसपास. असायला हवे होते एकशेचाळीसच्या
आसपास. हा मला धक्काच होता. तिला सांगितलं तर तिलाही हा धक्का होता आणि नातेवाईकांनाही.
पळवत पळवतच तिला ताबडतोब थिएटर मधे घेतली. तिची तयारी घेऊन सलाइन लावेपर्यंत सह्या
घेणं, ट्रॉली लावणं, अॅनेस्थेटिस्टला कळवणं हे सगळं झालं सुद्धा. अॅनेस्थेटिस्ट मोकळा
सापडला हे नशीब. अक्षरशः दवाखान्यात आल्यापासून अठराव्या मिनिटाला बाळ पोटाबाहेर
काढलं होतं आम्ही. इतकं करून ते जेमतेम धुगधुगी धरून होतं. पुढे काय करायचं हे
सगळ्यांनाच माहीत होतं. माझा नीओनॅटोलॉजिस्ट मित्र बाळ पुसणे, त्याला नीट पोझीशन
देणे, ओटू सोडणे, नाक तोंड स्वच्छ करणे, हृदयाचे ठोके तपासणे आणि तेही लागेनात
तेव्हा बाळाला कार्डीअॅक मसाज देणे, असं सगळं यंत्रवत करत होता. आता बाळाच्या
तोंडावरती मास्क चढला आणि अॅनेस्थेटिस्ट ऑक्सिजन पंम्पायला लागला. गलितगात्रं
झालेलं ते बाळ मुळी कितीतरी वेळ श्वासच घेईना. मग अॅनेस्थेटिस्टनी सराईतपणे लॅरिंगोस्कॉप
काढला, तो बाळाच्या घशात घालून एक बारीक नळी श्वासमार्गात सरकवली. मास्कचं काम आता
नळी वाटे होऊ लागलं. अधिक सहज, अधिक सुकर, अधिक सुलभ. दरम्यान इकडे सलाईन लावून
ग्लुकोज वगैरे देणं चालू झालं. सिस्टरनी दहा मिनिटं लोटल्याचं सांगितलं. हा ही
नेहमीचाच प्रकार. एक व्यक्ती निव्वळ घड्याळाकडे लक्ष ठेऊन, किती वेळ लोटला हे सांगत
रहाते. किती वेळात काय काय करायचं आणि ते पुढे किती किती वेळ कराययचं हे सगळं
ठरलेलं. यच्चयावत जे जे करायचं ते ते करून झालं. जीवा शिवाची भेट होऊ नये, म्हणून
हा सारा खटाटोप. आमचे हात चालत होते तोवर बाळाचा श्वास चालत होता. आम्ही थांबलो की
श्वास बंद. तरी नशीब ह्या सगळ्या सपोर्टमुळे त्याचं हृदय आता ठेक्यात चालत होतं.
वीस मिनिटं झाली, आमचा पेशन्स संपत चालला होता. बाळाचा अंदाज घेत, नाजूकपणे पण
निश्चितपणे त्याच्या फुफ्फुसात हवा पंपायचं अॅनेस्थेटिस्टचं काम चालू होतं.
हताशपणे आम्ही एकमेकांकडे बघत होतो. इतक्यात बाळानी उचकी दिल्यासारखं केलं. एकदा
अगदी जेमतेम. मग पुन्हा अगदी अशक्तपणे. मग पुन्हा एकदा, जरा जोरात. आता बाळ मधूनच
श्वास घेऊ लागलं. अगदी निश्चितपणे. आता अॅनेस्थेटिस्टनी
रोख बदलला. त्याचा पंप छातीच्या भात्याशी ताल साधू लागला. दोघांनाही आता सूर
सापडला होता. एखादं ड्यूएट गाणं चढत चढत जाव तसं त्या दोघांचं चालू झालं. शेवटी बाळानी
दमदारपणे भरदार श्वास घ्यायला सुरुवात केली. अॅनेस्थेटिस्टनी एकदा कृतार्थ मुद्रेनी
साऱ्यांकडे पाहिलं आणि त्यानी बाळाच्या घशातली ट्यूब काढली. एक दीर्घ उसासा सोडून
बाळानी रडण्याची सुरावट आळवली आणि आम्ही सारे जरा आश्वस्त, प्रसन्नचित्त झालो. बाळ
रडायला लागलं आणि इकडे अॅनेस्थेटिस्टच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ओठावर
ओठ दाबून त्यानी किती प्रयत्न केला पण ते अश्रू त्याला आवरता आले नाहीत. त्याचं असंच
आहे. खूप खूप हळवा आहे तो. माझा मित्र आहे. सखा आहे. पण ह्याचं सख्य प्राणांशी
आहे. स्वतःच्या नाही, पेशंटच्या. उगीच नाही मी त्याला प्राणसखा म्हणत.
ह्याचा आधी एकदा असंच
टच्चकन् डोळ्यात पाणी आलं होतं त्याच्या. एका बाळाला असंच सगळं करून, त्याच्या
कुडीत प्राण फुंकून पुढील उपचारासाठी म्हणून अॅम्ब्युलन्स मधून पाठवलं. ते बाळ
वाटेतच गेलं. परत येऊन त्या बाळाच्या बापानी आम्हालाच फैलावर घेतलं. आम्ही बाळाला
वाचवू शकलो नाही पण आमचे प्रयत्न तर प्रामाणिक होते. खरंतर या पलीकडे काहीही,
कधीही आमच्या हाती नसतं. पण हे काही त्याला पटेना. जाता जाता तो म्हणतो कसा,
तुम्ही तर मेलेलंच बाळ दिलं होतं माझ्याकडे. ते प्रेत घेऊन तुम्ही
आम्हाला उगीचच अॅम्ब्युलन्स मधून फिरवलं. हे ऐकून प्राणसखा अगदी रडवेला झाला होता.
अप्रामाणिकपणाचा आरोप त्याला सहन झाला नाही.
प्राणसखा आहे अगदी
हरहुन्नरी. मी सर्जरीत बिझी, त्यामुळे आसपासचं सगळं ह्यालाच बघावं लागतं. सिस्टरला
हाका मारणं, फोन घेणं, मोबाईल घेणं, ऐनवेळी लागणारे धागेदोरे आणि ऐनवेळची काही
इंस्ट्रुमेंट्स काढून देणं, ब्लडचे आणि कसले कसले फॉर्म भरणे... तो हे सगळं करतोच
करतो, पण बसल्या बसल्या एखादा बिघडलेला प्लग दुरुस्त कर, लाईट बदल, सक्शन मशीन कसं
जोडायचं हे नव्या स्टाफला शिकव, अशीही कामं
हौसेनी करतो. हे करत असताना एक डोळा सतत पेशंट वर. ह्याच डोळ्यानी मधून मधून तो
सर्जनवरही लक्ष ठेवत असतो. त्याला अष्टावधानी म्हणणं कमीच आहे, हा तर शतावधानी.
सर्जरीच्या वेळी तो
माझ्यावर आणि मी त्याच्यावर लक्ष ठेऊन असतो. माझ्या हालचाली वरून तो ऑपरेशन कुठवर
आलंय ते ओळखतो. इंस्ट्रुमेंटच्या आवाजावरून मी काय कापतोय ते ओळखतो. त्याप्रमाणे
भुलीची औषधे देतो. मला वाजवीपेक्षा जास्त वेळ लागला, वाजवीपेक्षा जास्त रक्तस्त्राव
झाला तर त्याला सांगावं लागत नाही. मूकपणे त्यानी योग्य ती कृती केलेली असते.
माझा त्याच्यावर डोळा ठेऊन
असणं मात्र त्याला जाचत असतं.
‘मी माझं काम बरोबर करतोय
तू तुझं नीट कर’ असं त्याचं सांगणं.
अॅब्डोमेन क्लोझ करण्याआधी
मी मॉनीटरकडे बघतो. बी.पी. किती आहे हे मला बघायचं असतं. त्याला राग येतो.
‘कमी असतं तर मी तुला
सांगितलंच असतं. मी सांगितलं नाही म्हणजे सारं काही ठीक आहे. तू इकडे बघीतलसंच
का?’ असं म्हणून माझ्याशी भांडण काढतो.
पण स्वतः मात्र माझ्यावर
वॉच ठेवून असतो. वर सल्ल्यांचा भडीमार चालू.
‘तू आधी ती व्हेसल बांध मग
पुढे डिसेक्ट कर.’
‘पाच मिनिटे पॅक घालून शांतपणे
थांब बरं, ब्लीडींग थांबेल बघ.’
‘यु मे बी हॅपी, पण अजून
डिसेक्शन व्हायला पाहिजे.’
त्याच सल्ला मी नेहमीच
मानतो. कोणत्याही सर्जननी केली नसतील एवढी ऑपरेशन्स प्राणसख्यानी बघितलेली आहेत.
एकूणच अॅनेस्थेटिस्टना
वेगवेगळ्या सर्जनची वेगवेगळी तंत्र बघून बघून माहित होतात. नीरक्षीरविवेक चांगलाच
धारदार असतो यांचा. त्यांना पुढचा कॉल नसेल तर त्यांचा सल्ला हा अगदी निरपेक्ष,
पेशंटस्नेही आणि सर्जनस्नेही असतो. पुढचा कॉल असेल तर मात्र काही सांगता येत नाही!
मग सर्जरी लवकरात लवकर कशी आटपेल याचा विचार करून सल्ला दिलेला असण्याची शक्यता
असते.
ही मंडळी सदैव पुढच्या
कॉलच्या अपेक्षेत, प्रतीक्षेत आणि तयारीत असतात. अंम्पायरच्या टोकाचा बॅट्समन् जसा
सदैव रन काढायच्या तयारीत असतो, तसेच हे. सर्जनना शेंड्या लावण्यात महा तयार. दोन
दिवस आधी कळवा, सकाळी आठवणीसाठी फोन करा, आपण थिएटरमध्ये ट्रॉली लावण्याआधी खुंटा
हलवून बळकट करा, काहीही करा, ऐनवेळी एखादा कॉल आला की हे कामा-तूर होऊन तिथे आधी
जाणार! वर फोनवर सांगणार, ‘येतोच आहे...!’, ‘निघालोच आहे...!’, ‘पोहोचतोच आहे...!’
ह्यांच्या भाषेत फक्त चालू वर्तमानकाळ एवढा एकच काळ असतो.
चांगली सात आठ केसेसची
लिस्ट असते, हा पठ्या असाच ऐनवेळी कामातुर होऊन कुठेतरी गायब असतो. आता आयत्यावेळेला
दुसऱ्या कुणाला बोलावणार? मोठी पंचाईत होते. नातेवाईक कधी ऑपरेशन सुरु होणार म्हणून
मागे लागलेले असतात. पेशंटही टेन्शन घेऊन घेऊन कंटाळलेले असतात आणि अशात ह्याची
गाडी वाजते. असा राग येतो मला. पण जिन्यातून वर येता येताच हा ओरडतो, “सिस्टर,
नेक्स्ट पेशंट प्लीज!” फिसकन् हसू फुटतं. सगळा राग निवळतो. पटापट तो पेशंट इंड्यूस
करतो आणि म्हणतो ‘हं, गेलीय अंडर, कर स्टार्ट.’ मुकाटपणे माझा स्काल्पेल् इंन्सीजन
घेतो. मी रागावलोय हे माहित असल्यामुळे तो आता जास्तच शहाण्यासारखा वागतो. अगदी
गुड बॉय बनतो त्याचा. मी कसा छान सर्जरी करतो हे मला ऐकवतो. योग्य वेळी हेड लो
देणे, पेशंट रिलॅक्स असेल हे बघणे, हे सगळं न सांगता करतो आणि मग हळूच विषय काढतो.
उशीराचं कारण अपरिहार्य कसं होतं ते मला पटेपर्यंत त्याची बडबड चालू रहाते. सहसा
मला पटत नाहीच. पण ह्याची बडबड नको म्हणून
मी हूं म्हणतो. मागच्या वेळी माझ्याकडे सर्जरीला वेळ लागला होता. माझ्यामुळे
तेव्हा त्याला उशीर झाला होता. त्या वेळी पुढच्या ऑपरेशनचा कॉल देणाऱ्या डॉक्टरला,
माझ्यादेखतच त्यानी काय काय बाता मारल्या होत्या, ह्याची तो हळूच आठवण करून देतो. त्या
वेळी त्याच्या बातांना माझा फुल्ल सपोर्ट होता, हे ही तो ऐकवतो. त्यामुळे आजची
आगळीक क्षम्य आहे असा त्याचा रोख.
वर स्वतःला सहानुभूती
मिळावी म्हणून म्हणतो कसा,
‘अॅनेस्थेटिस्ट म्हणजे
द्रौपदी सारखी अवस्था आहे असते रे आमची. पाच पाच नवरे सांभाळावे लागतात.’
स्वतः कडे कमीपणा घेऊन
बोलणे ही ह्याची खासीयत. या बाबतीत उर्दू शायरांनी याची शागिर्दी पत्करावी. ‘आम्ही
काय यकःश्चित अॅनेस्थेटिस्ट, तुम्ही काय बाबा सर्जन! आम्ही काय तुम्ही कॉल दिला की
येणारे कॉल-बॉय, तुम्ही काय बाबा चिकणे काऊ-बॉय!! आम्ही म्हणजे गावभर फिरणाऱ्या
भांडीवाल्या बायका, तुम्ही काय...!!!’
मग त्याचा लाडका विषय सुरु होतो. मी किती
पैसेवाला आहे आणि तो किती गरीब हे तो मला आवर्जून सुनावतो. लक्ष्मी माझ्या घरी
पाणी भरत असून कुबेर तिच्यावर देखरेखीसाठी मुकादम म्हणून आहे असं त्याचं मत आहे.
त्याच्या कल्पनेतला पैसा माझ्याकडे असता तर... या कल्पनेत मी हरवून आणि हरखून
जातो. अर्थात त्याच्या घरच्या अठरा विश्वे
दारिद्रयाचं वर्णन करायचं म्हणजे, ‘चंदनाच्या पाटावरून, सोन्याच्या ताटामधून, कसेबसे
श्रीखंडपुरीवर दिवस ढकलतोय’ असंच करावं
लागेल! ‘तुझ्यासारखंच दारिद्र्य मला लाभो हीच त्या जगन्नियंत्याचरणी प्रार्थना’, असं
म्हणून मी विषय संपवतो.
तुझ माझं जमेना तुझ्यावाचून
करमेना, असं हे नातं. गवई आणि साथीदारासारखे सूर जुळलेले असतात सर्जन आणि
अॅनेस्थेटिस्टचे. गवई आणि साथीदार ही उपमा चुकीची आहे कारण ह्यात गवयाला महत्व
जास्त आहे. ऑपरेशनमध्ये दोघांना तितकंच महत्व आहे. हे नातं पतीपत्नीच्या
नात्यासारखं आहे. संसाररथाची दोन चाकं न कुरकुरता वगैरे...! यात रुसणं, फुगणं,
प्रेम, असूया, विरह हे सगळं सगळं आहे. हेड एंडला आपला अॅनेस्थेटिस्ट नसेल तेव्हा
सतत चुकल्या चुकल्या सारखं वाटत रहातं. आणि बऱ्याच दिवसांनी कॉलसाठी आलेला
अॅनेस्थेटिस्ट, आपल्या अनुपस्थितीत इथे अन्य कोणी तर येऊन गेलं नाही ना, हे शोधक
नजरेनी पहात असतो. सवतीमत्सर इथेही असतो. आगंतुकाचं आगमन लपवू म्हणता लपवता येत
नाही. पेन्टोच्या इंजेक्शनला सुई तशीच असते, ओटू वरून बंद केलेला नसतो, खुणेनी
ठेवलेलं केटामीनचं इंजेक्शन जागेवर नसतं... असं काही तरी असतंच. मग ‘मी पेन्टोला
कधी सुई तशीच ठेवत नाही’, असा हळूवारपणे चिमटा काढून ‘सवत’ लाडकी नाही, हे सुचवलं
जातं. असं रेशमी चिमटे काढत काढत
घनिष्ट रेशीमगाठीचं नातं जुळवणं हे प्राणसख्याला सहज जमतं.
नात्यात रेशमी, जरीकाठी
वगैरे असला तरी कपड्यात आणि रहाण्यात हा अत्यंत घळ्या. पेशंटशी थेट संबंध येत नाही
तेव्हा चांगलं सोडाच पण नीटनेटकं रहायचीही जबाबदारी हा घेत नाही. दाढी अर्धवट, केस
विस्कटलेले, शर्ट निम्मा आत निम्मा बाहेर, पॅन्ट नक्की मापाची नाही, पट्टा एका
बाजूनी लोंबतोय; आणि हा हे सगळं अभिमानानी मिरवतोय. याचा मधूनच झळकणारा उत्तम टी
शर्ट हा हमखास त्याच्या पोराचा असणार. ‘लागतात कशाला कपडे? बहुतेक वेळ मी थिएटर
मधे असतो, त्या वेळी थिएटरचाच ड्रेस घालावा लागतो. घरी गेलं की, बर्म्युडा आहेच.’ पण कपड्यावरून
याची परीक्षा कराल तर साफ फसाल. ‘पेशंटच्या शिरेत एक जाड सुई आणि घशात
(श्वासनलिकेत) नीट घातलेली ट्युब असेल तर कुणाला रस्त्यावरही अॅनेस्थेशिया द्यायला
मी तयार आहे’, ही ह्याची पोकळ दर्पोक्ती नाही. हे लखलखीत सत्य आहे. अत्यंत
प्रतिकूल परिस्थितीत, अडल्या नडल्याचा बाऊ न करता, आजवर कितीतरी प्राण या
प्राणसख्यानी वाचवले आहेत. ‘खतरों से खेलने का शौक हैं हमें’ हे ह्याचं ब्रीद. एखाद्या
सर्कसपटूलाही लाजवेल अशा चित्तथरारक करामती हा अव्याहतपणे करत असतो.
इतक्या वर्षात हा कधी दमला
नाही, आता कॉल नको असं त्यानी कधी केलं नाही. प्लॅण्ड सर्जरीला शेंड्या लावल्या
त्यानी, पण इमर्जन्सीला कधीच माझा हात सोडला नाही. ही व्यवसायनिष्ठा विरळा. मलाही
हे जमलेलं नाही. ह्याचं पहिलं प्रेम आणि शेवटचं प्रेमही अॅनेस्थेशियाच आहे. बायका
मुलांना फिरायला म्हणून गाडीत बसवलेली खाली उतरवून हा कॉलला येतो. ती ही ह्याच्या
ह्या वागण्याला आता सरावलेली आहेत. प्रत्यक्ष परगावी पोहोचल्यावरच ही आपण ट्रीपला
आलोय असं समजतात. स्वतःची तर इतकी आबाळ करतो, त्या बद्दल माझी बोलणीही खुशीत खातो.
पण यामुळे स्वतःच्या विश्रांतीचा विचार करेल म्हणता? अं हं. अजीबात नाही. आणि
दुसऱ्यानीही तो करायचा नाही.
‘काल फोन का नाही केलास? एस्.एम्.एस्.
का केलास?’ त्याचा प्रश्न.
‘अरे किती उशीर झाला होता,
मला वाटलं तू दमून झोपला असशील. उगीच कशाला तुझी झोपमोड.’ माझा समंजसपणा त्याच्या
व्यवसायनिष्ठेला धक्का पोहोचवतो.
‘झोपबीप काही नाही,
बिनधास्त वाटेल तेव्हा फोन करत जा.’ त्याचा आग्रह.
हे मात्र शब्दशः खरं आहे.
प्राणसख्याला कधीही साद घाला हा आपला हजर. अशावेळी तो श्रीकृष्ण आणि मी द्रौपदी
असतो. असं काही तरी कॉम्प्लीकेशन असत की पार चड्डी सुटायची म्हणजे वस्त्रहरणाचीच
वेळ आलेली असते. रात्री, अपरात्री, उत्तररात्री कधीही फोन करा हा दास मारुती सारखा
सदैव सेवेसी तत्पर. आपल्या बॅगेत भुलीची संजीवन विद्या वागवत उड्डाण करतच येणार.
सर्वोत्तम सर्जन कोण? तर
ज्याच्याकडून अॅनेस्थेटिस्ट स्वतःची किंवा कुटुंबियांची ऑपरेशन करून घेतात तो. अॅनेस्थेटिस्टची
सर्जरी करणं याचा सर्जन लोकांना फार अभिमान वाटतो. बारा दवाखान्याचं पाणी
प्यायलेले असल्यामुळे ही मंडळी सगळं काही जाणून असतात. शेवटी त्या क्षेत्रातल्या ‘पहुंचे
हुए’ आदमीची दाद महत्वाची असतेच. खरंच माझ्या अॅनेस्थेटिस्टचा डॉक्टर होणं हा माझा
सन्मान असेल. ते अर्थात शक्य नाही. कारण मी आहे गायनेकॉलॉजिस्ट. त्याचा डॉक्टर
होणं शक्य नसलं तरी त्याचा पेशंट होणं मात्र मला खचितच आवडेल.
त्याला मी तसं म्ह्टलंय
सुद्धा. अनेकदा म्हटलंय. सर्व शक्ती आणि युक्ती पणाला लावून त्याने एकदा माझ्या
देखत एका पेशंटला अक्षरशः मृत्युच्या दाढेतून खेचून आणलं. आणि हे सारं शांतपणे.
क्षणभरही त्याची तंद्री भंगली नाही की ‘पुढे काय?’ असा त्याला विचार करावा लागला
नाही. सराईतपणे त्यानी रेड्याला नो पार्किंगचा बोर्ड दाखवला, यमाला ‘या पुन्हा!’
म्हणत हाकलून दिलं आणि त्या बाईचा जीव वाचवला! आम्ही इतरांनी आशा केव्हाच सोडली
होती पण हा मात्र शेवट पर्यंत लढत होता. शेवटी जिंकलाच. त्याचा तो थक्क करणारा परफॉरर्मंन्स
पाहून मी म्हणालो; ‘मी मरायला लागलो की
तुलाच बोलावीन रे मी. तुझा पेशंट व्हायला मला नक्कीच आवडेल. तुझा डॉक्टर मात्र मला
होता येणार नाही. आम्ही गायनेकॉलॉजिस्ट फक्त तीन प्रकारचे पुरुष तपासतो. तान्हे ‘पुरुष’,
मुलं न होणारे पुरुष, आणि बाह्यांग स्त्रीसारखी पण अंतर्यामी पुरुष असणारे पुरुष (Testicular
Feminisation Syndrome)! तू यातल्या कशातच बसत नाहीस.’
एकदा एके ठिकाणी सर्जनच्या
दुक्कलीनं बरेच कॉम्प्लीकेटेड ऑपरेशन मोठ्या हिकमतीनं पार पाडलं. अर्थात
प्राणसख्याच्या साथीनं. आणि नंतर खुशाल
दोघंच दोघं कोका कोला मागवून पीत बसले. प्राणसख्याला पार विसरूनच गेले. असं काही
झालं की त्याच्या दुखाःला पारावार रहात नाही. कोका कोला बिनमहत्वाचा असतो,
महत्वाचा असतो सन्मान. बरोबरीच्या नात्यानी वागवणं. बऱ्याच पेशंटना आणि
डॉक्टरनासुद्धा अॅनेस्थेटिस्टची आणि अॅनेस्थेशियाची महती माहीतंच नसते. आठ, अठरा,
अडुसष्ठ आणि अठ्ठ्यांशी वर्षाच्या माणसाचं अपेंडिक्सचं ऑपरेशन साधारण सारखंच असतं
पण भूल मात्र निरनिराळ्या प्रकारची.
पण ह्या मुळे अॅनेस्थेशिया
बिनमहत्वाचा समजला जातो. खरं तर जिथे जिथे गाठ प्राणाशी असते तिथे तिथे
अॅनेस्थेटिस्ट हवेतच. नसतील तर मृत्यूची सरशी झालीच म्हणून समजा. आमच्या
अॅनेस्थेशियाच्या सरांचं पहिलंच वाक्य होतं, ‘There may be something called as minor
surgery but there is no such thing as minor anesthesia.’ (‘किरकोळ’ असं काही ऑपरेशन
असत असेल पण ‘किरकोळ अॅनेस्थेशिया’ असा काही प्रकार नसतो.) सदैव जीवनमरणाच्या
झुल्यावर झुलणारे पेशंट आणि त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणारे हे
अॅनेस्थेटिस्ट. कोणतंही ऑपरेशन असो की अॅक्सिडेंटनंतर आचके देणारा रस्त्यावर
पडलेला माणूस असो; असाध्य कॅन्सरशी अखेरची
झुंज देणारा थकला भागला जीव असो की डिलिव्हरीच्या कळांनी बेजार झालेली नवयौवना, अॅनेस्थेटिस्टनी
आपली करामत दाखवताच सगळं सुसह्य होतं. जन्मही सुसह्य आणि मृत्यूही सुसह्य.
मला तर प्रामाणिकपणे वाटतं
की कोणत्याही धर्मानी, धर्मगुरूनी, धर्मग्रंथानी मनुष्यमात्रांचे तापत्रय नष्ट केल्याच्या
कितीही वल्गना केल्या, तरी वेदना मुक्तीचे खरे दूत अॅनेस्थेटिस्टच आहेत. ज्या डॉ. सिम्पसनकडे
ही कल्पना जन्माला घातल्याचं श्रेय जातं, तो एडीनबरोचा. आजही त्याचं घर आपल्याला
आवर्जून दाखवलं जातं. मीही गेलो होतो एडीनबरोला. ते घर मीही पाहीलं. त्या घरापुढे
नतमस्तक होऊन भागणार नव्हतं. नुसतेच हात जोडूनही नाही. लवून कुर्निसातही माझ्या
भावना पोहोचवायला कमीच पडला असता. मग मी आपलं रस्त्यावरच लोटांगण घातलं. माझ्या
लहान मुलालाही नमस्कार करायला लावला. डॉ. सिम्पसनच्या घरासमोर साष्टांग नमस्कार
घालतानाचा आमचा फोटो प्राणसख्याला पाठवला.
साष्टांग नमस्कार घातला त्यावेळी मी मनोमन त्यालाही नमस्कार केलाच होता. एरवी
कितीही मनात आलं तरी लोकसंकोचापायी माझ्या दवाखान्यात मी त्याला साष्टांग नमस्कार
थोडाच घालणार होतो? आणि मी असलं काही केलेलं त्याला थोडंच चालणार होतं? त्या दिवशी
सिम्पसनचिया द्वारी, क्षणभरी साष्टांग प्रणीपात घालून मी प्राणसख्याला प्रणाम
पोहोचवला. भरून पावलो.
या आणि अशाच लिखाणासाठी
माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in