Saturday, 19 December 2020

इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात? एका अवैज्ञानिक कल्पनेची वैज्ञानिक चिकीत्सा

 

इतकी शहाणीसुरती माणसं मुळी  देवच का मानतात?

एका  अवैज्ञानिक कल्पनेची वैज्ञानिक चिकीत्सा

 

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी लग्नच का करतात?’, असा प्रश्न ‘लेकुरे उदंड झाली’,  या नाटकात एका जोडप्याला पडलेला असतो. अर्थात यांचे रीतसर लग्न झालेलेच  असते. याच चालीवर, ‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी  देवच का मानतात?’, असा प्रश्न विचारता  येईल.

आस्तिकांच्या मते  देव आहेच, आपले अस्तित्व तो विविध लीलांनी दाखवून देत असतो आणि नास्तिकांच्या  मते देवाचे अस्तित्व सिद्ध करता  आलेले नाही सबब तो नाहीच.  तेंव्हा देव आहे का नाही ह्याची चर्चा फारशी उद्बोधक ठरणार नाही.

पण देव मानणारे, ‘असे कसे काय बुवा देव मानतात?’ ह्या प्रश्नाचा शास्त्रीय मागोवा बरंच काही शिकवून जाईल. अशा काही मागोव्यांचा हा मागोवा. आधुनिक काळात मानसविद्येमध्ये महत्वपूर्ण संशोधन झाले आहे आणि या प्रश्नाच्या उत्तराची निदान रूपरेषा आता स्पष्ट आहे.

जगातील यच्चयावत धर्मकल्पनांमध्ये विलक्षण साम्य आढळून येतं. आढळणारच; कारण  यच्चयावत देव-दानव नरे निर्मिलेलेच आहेत. माणसाच्या मन-मेंदूचीच ही करामत. या सर्व-धर्म-समभावांची ही छोटीशी जंत्री. अतीनैसर्गिक शक्तींवर विश्वास. सचेतन आणि अचेतन  शक्तींवर  विश्वास. मरणोत्तर घटिताबद्दल दावे. ‘आपले’(धर्मबांधव) आणि ‘इतर’, असा सरासर भेद आणि इतरांप्रती दुष्टावा. नित्य आणि नैमित्तिक कर्मकांडे. स्वप्नांचा, शकुनांचा  अर्थ लावणारे ठोकताळे.  नृत्य आणि संगीत.  काही शब्द आणि काही  अन्नपदार्थांवर बंधने. पावित्र्य-अपावित्र्य, सोवळे-ओवळे अशा कल्पना, विभूति-शरणता, धार्मिक आणि म्हणून नैतिक अशा  जबाबदाऱ्या, आपोआप होणारी दैवी  शिक्षा आणि बक्षिसी, वगैरे, वगैरे.

इतकी सारी साम्य आहेत म्हटल्यावर ज्या मनात आणि समाजमनात  धर्म उगम पावला त्यांचाही अभ्यास आलाच. त्यातही बरीच साम्यस्थळे गवसली आहेत.  

भावनाप्रधान माणसं अधिक देवभोळी आणि विवेकप्रधान, विचार करणारी माणसं, अधिक नास्तिक असल्याचं आढळून आलं आहे. एकलकोंडी, समाजापासून तुटलेली माणसं, अनिश्चिततेच्या गर्तेतील माणसं, मृत्यू समोर दिसत असलेली माणसं; देवात सोबत शोधतात, आधार शोधतात. छुपी नास्तिक किंवा ‘भोंदू आस्तिक’  मंडळीही  असतात. आसपासची इतकी सगळी प्रजा आस्तिक असताना आपले नास्तिकपण मिरवणे सोपे नसते. फायद्याचे तर नसतेच नसते. बरेचदा तोट्याचेच असते. तेंव्हा मनातून नास्तिक आणि तोंडदेखले आस्तिक असतात.  मानसिकतेबरोबर सामाजिक रचनेचाही भाग येतो.  उत्तम सामाजिक, आर्थिक, मानवविकास निर्देशांक असलेल्या देशी, नास्तिकांचे प्रमाण जास्त असते. समृद्ध, सर्वार्थी अर्थव्यवस्था असलेल्या देशात नास्तिक जास्त. इथे अस्मानी संकट आलं तर सुलतान मदतीला येईल अशी सोय असते. मग आपोआपच आभाळातल्या बापावरचे अवलंबित्व कमी होते.

पण या सगळ्याला ओलांडून जाणारे,  देवकल्पनेची उत्क्रांती मांडणारे,   काही संशोधन आता पुढे येते आहे.

उत्क्रांतीच्या ओघात आपले कपी वा मानवरुपी पूर्वज देव मानत नसावेत. मग नेमक्या कोणत्या टप्प्यावर हा देव नामक किडा माणसाच्या मेंदूत शिरला असावा बरे? ही कल्पना सर्व खंडात, सर्व संस्कृतीत आढळते. तेंव्हा भाषेचे प्रारूप जसे माणसाच्या मेंदूत आदिम काळापासून कोरले गेले आहे तसेच देव-धर्माचा एक तयार कोनाडा, एखादं मखर, काही रूपरेषा, मेंदूत आदिम काळापासून आहेच की काय?

  मेंदूत निश्चित असे  ‘देवाचे केंद्र’ (God Centre), ‘चेतापेशींची खास वीण’ (Network) किंवा (तीर्थ)‘क्षेत्र’ (God Area) नाहीये. इतर अनेक कार्यांसाठी कार्यरत असणाऱ्या अनेक   यंत्रणा,  देवाधर्माचं करताना उद्दीपित होतात. या यंत्रणा देवकल्पनेच्याही आधीच्या आहेत. यांच्याच पायऱ्या करून, देवाचे देव्हारे सजवले गेले आहेत. म्हणजे देव,  हा तर करायला गेलो एक आणि झाले भलतेच, असा प्रकार आहे. इतर व्यवहारांसाठी म्हणून जी  कौशल्ये, उत्क्रांत झाली; त्यांचा उपयोग देवकल्पना, धर्मभावना वगैरे रुजायला झाला.

हे काहीसं लिहिण्या-वाचण्यासारखं किंवा संगीतासारखं  आहे. मेंदूत लिहिणे-वाचणे  उपजत नाहीये. भाषा (व्याकरणाचे प्रारूप) आहे, दृष्टी आहे, चिन्हांची समज आहे आणि बोटांच्या नेमक्या हालचाली उपजत आहेत. या साऱ्यांचा उपयोग इतर अनेक गोष्टींसाठी होतो म्हणून ह्या उपजत आहेत. माणसाने आपलं डोकं वापरुन ह्या कौशल्यांचा वापर करून लिहिणे-वाचणे ही भलतीच गोष्ट  शोधून काढली आहे. भाषेतील स्वर आणि व्यंजनांची  नादमय रचना करून, सुरवातीला हृदयाशी ठेका जुळवत, संगीत ही भलतीच गोष्ट शोधून काढली.

तसेच मुळात समाज-धारणा करणारी, लोकव्यवहार सुलभ करणारी, मनरचना देव-धर्म धार्जिणी ठरली आणि देवाधर्माचं तण माजलं असं ताजं संशोधन सांगतं.  देव-कल्पनेचं  बीज तरारून फुटेल अशी  मेंदूच्या कार्याची मऊसर रचना उत्क्रांत झाली. तेंव्हा ही  कशी  उत्पन्न झाली?, कोणत्या औत्क्रांतिक ताण्याबाण्यातून उत्पन्न झाली?, ह्याचा शोध उद्बोधक ठरेल.

 

मेंदूतील औत्क्रांतिक कोरीवकाम

गवतात खसखस ऐकू आली तर आपल्या भटक्या पूर्वजांच्या मनात दोन शक्यता चमकायच्या, गवतात कोणी जनावर तर नाही? वाघ? का नुसतीच वाऱ्याची सळसळ? जर वाघ समजून लांबची वाट धरली आणि तिथे वाघोबा नसेलच तर थोडे सावध, थोडे दुरून निघून जाण्याने, फारसं काही बिघडलं नाही. पण जर वाघ असताना, वाघ नाही असं समजलं तर? तर मग जीवावर बेतेल ना! मग वाघोबा तुमचा चट्टामट्टा करेल, तुम्ही उत्क्रांतीच्या स्पर्धेतून बाद. तुमचा वंशखंड. वाघ आहे हा गैरविश्वास (श्रद्धा) आपलं फारसं काही बिघडवत नाही पण वाघ नाही असा फाजील विश्वास जीवावर बेततो. आपल्या  पूर्वजांच्या लाखो वर्षाच्या अतूट साखळीचे आपण वारसदार. आपले पूर्वज सावधपणे वागले, नसलेल्या  वाघोबालासुद्धा घाबरले,  म्हणून आपण आहोत. थोडक्यात आपण सारे, अतीसावध, सतत वाघोबा शोधणाऱ्या, मेंदूंचे वारस (Hyperactive Agency Detection) आहोत. त्यामुळेच जिथेतिथे, ज्यातत्यात आपण वाघोबा शोधत असतो. निसर्गात वाघोबा क्वचित आणि वाऱ्याची सळसळ अधिक. पण आपल्या मेंदूला निरनिराळी टिंब जोडून वाघोबाचं संगतवार  चित्र जुळवायची खोड आहे.

भासणारी चित्रसंगती  हेच सत्य असं आपला मेंदू मानून चालतो. आपण प्रत्येकवेळी सत्यान्वेषी विचार करत नाही. बहुतेक श्रद्धांमागे माणसाचे हे संगती-शोधक, संगती-रत मन आहे. ह्याच मनानी, मनानी लावलेल्या सावध संगतीने  तर आपण आजवर तगलो आहोत, वाघापासून वाचलो आहोत.   

अतीसावध संगती बरोबर प्रत्येक घटीताला कर्ता आणि प्रत्येक कर्त्याला हेतू चिकटवण्याचीही आपल्याला अभिजात खोड आहे (Folk Psychology).  हिसका दिला की फांदी तुटते, झाड हलवले की फळे पडतात, आपल्या हेतुतः केलेल्या कृतीतून काही परिणाम घडतो, हे लक्षात येताच तोच तर्क माणसांनी आसपास सगळ्यालाच लावायला सुरवात केली. हा कर्ता मग कधी प्राणी असतो, कधी   मनुष्यप्राणी असतो वा कधी  निसर्ग असतो. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे कोणीतरी ‘घडवणारा’ आहे आणि  त्या  घडवणाऱ्याचा काहीतरी ‘हेतू’ आहे, अशी समजूत मानवी मनात  दृढ झाली. मग वाऱ्यात वरूण, पावसात इंद्र, जलाशयात अप्सरा आणि वडा-पिंपळावर हडळ सहजच सापडायला लागते. त्यातून वाऱ्या-पावसाची, जळा-पिंपळाची, एकूणच निसर्गाची ‘वागणूक’ इतकी बेभरवशाची, इतकी बेदरकार, की त्यांना कोणतेही नियम किंवा नियमन अशक्य.  तेंव्हा त्यांच्या वागणुकीला ‘त्यांची इच्छा’ हे कारण फिट्ट बसणारे.

गोष्टीरूप पुराव्यावर झटकन विश्वास हा देखील आपल्या संगती–रत मनाचाच छंद. माझ्या काकाचा कॅन्सर होमिओपॅथिने बरा झाला, मंत्राने सापाचे विष उतरले, वास्तूशास्त्राने भरभराट झाली, अशी  विधाने सहज स्वीकारली जातात. संगतींचा सत्यान्वेषी शोध दरवेळी शक्य असतोच असं नाही. भासलेल्या संगतीची सत्यासत्यता पडताळून पहाणारी पद्धत म्हणजे विज्ञान.

तर्कदुष्टतेचं हे पाप फक्त पूर्वजांच्या माथी मारण्यात अर्थ नाही. आजचेही  बरेचसे तसाच विचार करत असतात. सृष्टी सत्असत् शक्तींनी भरलेली आणि भारलेली आहे, झाडापानाफुलाला आणि मानवनिर्मित गोष्टींनाही; ‘मन’ आणि ‘इच्छा’ आहे आणि ह्या साऱ्याची आपल्यावर कृपादृष्टी अथवा वक्रदृष्टी आहे; अशा कल्पना आजही सर्व संस्कृतीत आहेत. काही कृतींनी अथवा पूजा-प्रार्थनेनी, या अचेतन वस्तूंना पाझर फुटतो, त्या आपल्या भल्यासाठी सहाय्यभूत होतात, ही ह्याच विचाराची पुढची कडी. नव्या गाडीला नारळ फोडणे असो वा नव्या कॉम्प्यूटरची पूजा करणे असो, हे सारे प्रकार या चीजांना आपण  स्वतंत्र ‘इच्छा’, ‘मन’ बहाल केल्याचे दर्शवतात.

 

मोठ्या टोळ्या आणि देवकल्पना

सुमारे २,५०,००० वर्षापूर्वी माणूस म्हणावा असा प्राणी या ग्रहावर उत्क्रांत झाला. अगदी परवा परवापर्यंत तो भटक्या शिकारी होता. शे-दीडशेच्या टोळ्या टोळ्यांनी रहात होता. याहून मोठा गट भटकत, शिकारीवर गुजराण करूच शकत नाही. शेतीचा शोध लागला आणि शे-दिडशे  माणसाची टोळी  हजारांची झाली. अर्थात आपल्या कपी पूर्वजांच्या टोळ्यात तर वीस-पंचवीसजणच  असायची. त्या मानानी मानवी टोळ्या मोठ्ठ्याच मोठ्ठ्या म्हणायच्या.  ह्या मोठ्या टोळ्या टिकायच्या आणि तगायच्या तर अंतर्गत सहकार्य अत्यावश्यक ठरते. सहकार्यासाठी काही खास जाणीवा असणे अनिवार्य ठरते. या अशा जाणिवांतून देव कल्पनेचा उगम झाला असावा.

पुढे गावं, शहरं वसली.  आता बरेचसे व्यवहार अनोळखी माणसांत होऊ लागले. छोट्याश्या टोळीत बनेल कोण, लबाड कोण, हे सहज ओळखणं शक्य होतं. तिथल्यातिथे शासन शक्य होतं. पण हजारोंच्या टोळीत हे कसं जमावं बरं? मग युक्त व्यवहारांना संरक्षण देणारे आणि फसवेगिरीला शासन करणारी  अशी  व्यवस्था आणि  असे रखवालदार आले. हे अपुरेच.  तेंव्हा  ‘काल्पनिक रखवालदार’ आले. ह्या रखवालदारांच्या काठीला आवाज नसतो, ह्यांचे कुणालाही ज्ञात न  होणारे  विचित्र नेमानेम असतात.  शिक्षा होते खास, पण ती मृत्युनंतरही असू शकते, पुढच्या जन्मीही असू शकते; अशा अनेक कल्पना आल्या. शपथ देणे, शपथ घेणे, दिव्य करणे, पापपुण्य, त्यांचा संचयाचे  आणि क्षालनाचे अनेकविध मार्ग हे सारे ह्याच कल्पनांचे विलास. नागरी जीवनाबरोबरच, समाजव्यवहार सुरळीत चालू रहायला धर्मकल्पना विकसित झाल्याचं दिसतं.  जगरहाटी चालायची तर सहकार्य वाढेल पण त्याचवेळी  ऐतखाऊ पोसले जाणार नाहीत अशी रचना पुरवणाऱ्या दोन संस्था, धर्मसंस्था आणि राज्यसंस्था. टोळीपासून स्थिर समाज निपजला तशा ह्या दोन्ही संस्था उदयाला आल्या.

धर्मामुळे समाजाच्या संघशक्तीला एक दिशा मिळते. गाव करील ते राव काय करील, या उक्तीचा प्रत्यय धार्मिक (अथवा इतर) संघटनेमुळे वारंवार येतो. एक मन, एक मनगट; असा समाज दिलेली उद्दिष्टे सफल करू शकतो. प्रत्यक्ष देवाजीची इच्छा न मानणाऱ्यास; या, अथवा पुढील, अथवा जन्मोजन्मी शिक्षा; म्हटल्यावर माणसं ऐकतात. शिस्त पाळतात. प्रचंड पिरॅमिड देखील बांधतात.  पण शेवटी धर्मानी दिलेला ‘आदेश’, ‘दिशा’, ‘उद्दिष्ट’, म्हणजे धर्म-धुरीणांच्या दृष्टिकोनाची परिणीती. प्रत्यक्षात कुठलाही देव येऊन कोणताही आदेश देत नाही. तेंव्हा धर्माचार्य जी ठरवतील ती दिशा असाच मामला असतो. काल्पनिक कार्यकारणभावावर बेतलेली, वास्तवाची बूज न राखणारी   ही दिशा अर्थातच चुकू शकते. नव्हे बरेचदा चुकते असाच इतिहासाचा दाखला आहे. 

 

टोळ्या म्हटलं की युद्ध आलीच. धर्माचे युद्धोपयोगी गुण तर आजही उधळले जात आहेत. लढायचं तर अनेक गुणांचा  समुच्चय लागतो. सहकाऱ्यांप्रती निष्ठा, निधडी छाती, विजयाचा विश्वास, शौर्याचा उदोउदो, आपलीच बाजू नीतीची अशी खात्री आणि प्रणार्पणाची तयारी. धर्म हे सगळं सहज जुळवून आणतो. कर्मकांडातून लहानपणापासूनच धर्मसंघटनेला निष्ठा वाहिलेल्या असतात. आपलीच  बाजू धर्माची असल्याचा विश्वास असतो, शत्रू दानव असल्याची खात्री असते, विजयाची खात्री असते आणि धर्मासाठी प्राणाहुती  देणाऱ्यांना स्वर्गसुखाची गॅरंटी असतेच असते.  शत्रूसंगे संगरासाठी धर्म असा  एकोपा पुरवतो. म्हणून तो रूजला, वाढला.  अर्थातच ज्याच्या बुडाशी  धर्मपीठाची गादी, ज्याच्या तोंडाशी धर्मप्रवक्तेपदाचा  माइक, त्याच्या हाती युद्धाचे रणशिंग अशी अवस्था होती आणि काही प्रमाणात  आहे. धर्माधिष्ठित देशात एकदा ‘धर्मयुद्ध’ म्हटलं की प्रश्न बंद होतात. पण धर्मनिरपेक्ष देशात युद्धाच्या अपरिहार्यतेची साधकबाधक चर्चा शक्य आहे.

नागर व्यापार उदीम बहरायचा तर विश्वासार्हता महत्वाची. ती विश्वासार्हता पूर्वी  (आणि काही प्रमाणात  आजही) धर्म बहाल करतो. तुमच्या धर्मबांधवांवर तुमचा  चटकन विश्वास बसतो.  ‘न्यू मराठा खानावळीला’ मराठाच भाजी पुरवतो आणि  ‘अंजुमन इस्लाम’ शाळेचं बांधकाम स्वाभाविकपणेच  मुसलमान कंत्राटदाराला  मिळतं. आंतरधर्मीय विवाह म्हणजे महदाश्चर्याचा दुख:द धक्का. ज्यू, पारशी, मारवाडी, बोहरी इत्यादी  समाज दुरदूरच्या देशी, पूर्वापार  व्यापार करू शकले त्याचं एक कारण धर्मानी दिलेली ही हमी, हा ‘विमा’. आज  विमा आणि विश्वासार्हतेच्या तत्सम साधनांमुळे धर्माचं हे अंग आता दुर्बल झालं आहे. पण संपलेलं नाही.  उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय व्यापारातही,  भ्रातृभावाच्या सिमेंटनी लिंपलेली आणि परभावाच्या काटेरी कुंपणांनी  राखलेली,  ज्यूंची चिरेबंदी धर्मवर्तुळे आहेत.  टोळ्यांनी रहाण्याची आपली आदिम सवय आपल्याला आप-परभाव शिकवून गेली आहे (Kin Psychology). आपला तो जातभाई, धर्मबंधू, देशबांधव. बाकीचे ते परजातीय, परधर्मीय,  काफिर, शत्रु.

टोळ्यांत एक सामाजिक उतरंड असते, खालच्यांनी वरच्यांना सलाम ठोकण्याच्या, आदर दाखवण्याच्या तऱ्हा असतात. वरीष्ठांचा अनादर म्हणजे टोळीतून बहिष्कार जणू ठरलेला. नेते, सामाजिक वरिष्ठांचा सन्मान, व्यवस्थेशी बांधिलकी हे सारं यातूनच येतं. ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रमाण्य, बाबा वाक्यं प्रमाणं, हेही यातूनच येतं. आजही घरांघरांतून, शाळाशाळातून, हे मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. लहानपणी असं प्रामाण्य आवश्यक आणि संरक्षक असतं. प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक गोष्ट, पुराव्याने शाबीत करून पहाण्याची गरज नसते. एक सामायिक शहाणपणाचं संचित प्रत्येक समाजापाशी असतं. ते वापरणं नक्कीच परवडतं. पण या सवयीनी  चिकित्सक विचार, जिज्ञासू वृत्ती आणि पुराव्याइतकाच विश्वास ही विचारधारा   रोखली जाते.

चिकित्सक अविश्वासाला धर्मात मुळीच थारा नाही. उपजत मानवी विचारधारेतही  नाही.    आंधळा विश्वास हा मानवी विचारधारेचा वहिवाटीचा मार्ग आहे,   धोपट मार्ग (Default Pathway) आहे. हे धर्माला सोयीचेच आहे. माणूस हा विचारी प्राणी आहे म्हणे. तेंव्हा पुढ्यात आलेल्या माहितीचा तो योग्य शहानिशा करून, खात्री करून, काटेकोर शास्त्रीय निकष लावून; मगच स्वीकार वा नकार ठरतो; असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात जे पुढ्यात येतं त्याकडे आपण आपल्या मगदुरानुसार, मतानुसार, श्रद्धांनुसार, पूर्वग्रहांनुसार बघतो. त्यातले सोयीचे तेवढे स्वीकारतो, आणि त्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद शोधतो. जे गैरसोयीचे असेल त्याकडे दुर्लक्ष तरी करतो किंवा ते तर्कशुद्ध नसल्याचा तर्क लढवतो. (Biases and heuristics) अविश्वास दाखवणे, चिकित्सा करणे,  कष्टसाध्य आहे,  ते शिकावे  लागते.

जन्मजात तर्कदुष्ट  मानवी बुद्धीला शिस्त लावायचं काम विज्ञान करतं.  सिद्धतेच्या प्रमाणात विश्वास ही विज्ञानाची बाजू आणि ‘संशयात्मा विनश्यति’ ही सर्व धर्मांची शिकवण. प्रत्येक बाबतीत शंका घ्या, पुरावा तपासा, असं विज्ञान सांगतं; तर डोळे मिटून आधी विश्वास ठेवा, पुरावा कसला मागता? थेट प्रचीतीच पहा, असं धर्मशास्त्र सांगतं. बहुतेक सत्तांना, अर्थसंस्थांना, सामाजिक संस्थांना, राजकीय विचारांना ही दुसरी पद्धत सोयीची असते. निमूट  स्विकारवादी बरे, शंकेखोर म्हणजे शंकासूर. 

समाजात रहायचं तर दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येण्याला अनन्यसाधारण महत्व आहे (थिअरी ऑफ माइंड). ही कला माणसात उदय पावली आणि माणसाची जमात फळफळली. या कलेतून समोरचा कसा वागेल याचा अंदाज बांधता यायला लागला आणि सामाजिक अभिसरण सुरळीत व्हायला मदत झाली. सामनेवाला हा स्वतंत्र मन, विचार, बुद्धी आणि हेतु असलेला जातभाई आहे ही समज उगवली. अर्थात समोरच्याच्या कृतींमागे हेतू आहे हे ओळखणं तसं सोपं गेलं माणसाला, प्रत्येक गोष्टीला हेतू चिकटवायची खोड माणसाला होतीच!

मनकवडेपणाबरोबरच इतर अनेक गुणांमुळे  देवाधर्माच्या खेळात मानवी मन खिळून रहातं.

शरीर आणि मन असं द्वैत आपण गृहीत धरून चालतो. ही मूळ  धारणा, धर्म द्विगुणित, त्रिगुणीत, अनंतगुणीत करतो. अशरीर आत्मे-परमात्मे, भुते-खेते सर्व धर्मात ठाण मांडून आहेत ती  या मूळ गृहितकाची अपत्ये. पण शरीराशिवाय मनाला स्वतंत्र अस्तित्व नाही अशी विज्ञानाची अद्वैतवादी  शिकवण आहे.

मनुष्याला इतरांच्या वेदनेची जाणीव असते  आणि परपीडेपासून  दुःख होते. शिवाय आजचे मदतरूपी  (सत्)कृत्य, म्हणजे उद्याच्या परतफेडीची पेरणी असते. मी तुला तेंव्हा मदत केली तू आज मला मदत कर, अशी देवघेव असते. अशी देवघेव न्याय्य असावी ह्या अपेक्षेतून न्याय, हक्क, वगैरे जाणीवा  विकसित झाल्या आहेत.

आपल्या मेंदूतील  चेतातंतूंच्या जाळ्यातील विवक्षित भाग समोरच्याच्या हालचालींनुसार उद्दिपीत होतो, असं आता लक्षात आलं आहे. म्हणजे समोरच्याने डावा हात वर केला,  तर माझा डावा  हात नियंत्रित करणाऱ्या चेतापेशी क्षणिक उद्दीपीत होतात आणि समोरच्याचा डावा हात कोणी जोरात पिरगळला तर माझ्याही मेंदूतील वेदनेच्या चेतापेशी  क्षणिक उद्दिपीत होतात. स्वतःत वेदनेचे प्रतिबिंब पाहून, वेदनेला सहवेदनेचा आयाम देणारे हे  दर्पण-चेतातंतू (Mirror Neurons). अनुकंपा, सहानुभूती आणि सहाय्य करण्याची उर्मी इथे उगम पावते.

हेच पहा ना, आफ्रिकेच्या गवताळ सवाना प्रदेशात, कोट्यवधी वर्षापूर्वीचा,  एका होमो इरेक्टस  स्त्रीचा,  सांगडा  सापडला आहे. हिला,  बहुधा कोण्या प्राण्याच्या मांसातून,  अ जीवनसत्वाची विषबाधा झाली असावी. परिणामी सांध्यात रक्तस्त्राव होऊन ती मृत्यूपूर्वी काही महीने तरी जायबंदी असावी. अर्थात काही कोटी वर्षापूर्वी, कोणी जागेवर अन्नपाणी पुरवल्याशिवाय, इतके महीने, कोणी जगूच शकणार नाही. तेंव्हा सोबतचे होमो इरेक्टस तिची सुश्रूषा करत होते खास. थोडक्यात वेदनेला कारुण्याचा प्रतिसाद धर्माने शिकवलेला नाही तो तर माणसाच्या वागणुकीत आधीच वसलेला दिसतो.

सहवेदनेबरोबर सह-सौख्यभावनाही आहे.  सणासुदीला सगळेच खुशीत दिसतात, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर चराचर सृष्टी आनंदाने डोलू लागते वगैरेमागेही हेच दर्पण तंतू आहेत. हा उपजत गुण धर्माच्या  पुरेपूर कामी आला आहे.  

माणसाच्या मनी वसलेले असे अनेक गुण धर्मभावनेला उपयुक्त ठरलेले आहेत. धर्माशी निगडीत, आभास, साक्षात्कार, सृष्टीशी तादात्म्यभाव असे अनेक घटक आधुनिक  मानसाभ्यासाचे विषय आहेत.     

मायकेल परसिंगर याने असं दाखवून दिलं आहे की आपली स्वत्वाची भावना, ‘आपण’ आणि ‘इतर व्यक्ती’ हा भेद करण्याची क्षमता, मेंदूच्या डाव्या आणि उजव्या अशी दोन्ही   टेम्पोरल लोबमध्ये (कानशिलापुढील भाग) असते. जागेपणी  आपण फक्त मेंदूच्या डाव्या भागतील क्षमता वापरत असतो. पण भीती अथवा नैराश्याच्या छायेत, संकटकाळी, गुदमरल्यावर, रक्तशर्करा घटल्यास उजव्या बाजूची क्षमताही बरोबरीने  जागृत होते आणि आपल्या सोबत ‘अन्य कोणीतरी’ आहे असा अनुभव येतो. अगदी अस्साच अनुभव ‘देव टोपडे’ (God Helmet) घालून कृत्रिमरीत्या घेता  येतो.  ‘देव टोपडे’ ही परसिंगरची निर्मिती. हे टोपडे घालून अंधाऱ्या, शांत, खोलीत एकटेच बसायचं, ह्या टोपड्यातील यंत्रणा त्या व्यक्तीच्या मेंदूच्या  उजव्या टेम्पोरल भागाला उद्दिपीत करते आणि त्या बंद खोलीत बरोबर अन्य कोणी असल्याचा भास त्या व्यक्तीला  व्हायला लागतो. मदर मेरीपासून ते मेलेल्या आत्यापर्यंत आणि साईबाबांपासून ते आईबाबांपर्यंत; आपापल्या सुप्त इच्छा अपेक्षांनुसार, कुणाचेही दर्शन होऊ शकते. इतकेच कशाला टेम्पोरल लोब एपिलेप्सीच्या (एक प्रकारचा  अपस्माराचा आजार) पेशंटना अगदी असेच उद्दीपन मिळते आणि अगदी  असाच अनुभव येतो. या मुळे की काय, असे पेशंट बरेचदा आत्यंतिक धार्मिक असतात.   

चराचर सृष्टीशी एकरूप झाल्याचा अनुभव हा देखील असाच एक साक्षात्कारी अनुभव. ही झपूर्झा अवस्था प्राप्त होते तेंव्हा मेंदूतील फ्रॉन्टल लोब (कपाळा मागील भाग) उद्दिपीत असतो तर वामांगी परायटल लोब (डाव्या कानाच्यावरचा भाग) शांत स्थितीत असतो. हाच तो मेंदूचा भाग ज्यामुळे आपल्याला आपण सृष्टीपासून अलग आहोत ही जाणीव होत असते. आपण कुठे ‘संपतो’ आणि ‘सृष्टी’ कुठे सुरू होते, ते हा भाग आपल्याला सांगत असतो. तळमळीने केलेला  देवाचा धावा, ध्यान-धारणा, नामस्मरण,  भजन-कीर्तन वगैरे सांगीतिक संकेत, मंत्रजप अशा क्रियांनी या वामांगी परायटल लोबला तात्पुरती गुंगी येते, फ्रॉन्टल लोब उद्दिपीत होतो आणि ‘मी’ पण सरते.  

मंत्रचळ (Obsessive compulsive disorder) नावाचा एक आजार आहे. ह्यात ती व्यक्ति अगदी निरर्थक क्रिया वारंवार करत रहाते. सतत हात धुणे, एकच वाक्य बडबडत रहाणे, येरझाऱ्या घालणे असं काहीही. देवाधर्माचे ‘करणे’ या सदराखाली धडधाकट माणसेही असे प्रकार करताना दिसतात.  वारंवार तीच तीच क्रिया केल्याने चिंता, भीती, वगैरे कमी होते आणि धीर,  आत्मविश्वास वाढतो. जप, प्रदक्षिणा वगैरेंनी हाच परिणाम साधला जातो. ‘धर्म हा समाजाचा मंत्रचळ आहे आणि मंत्रचळ हा त्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक धर्म आहे’;  असं फ्रॉइडने म्हणून ठेवले आहे.

भातुकली खेळताना किंवा नाटक पहाताना आपण सारासार विचार क्षणभर हेतुतः बाजूला ठेवतो. पडद्यावरच्या लटक्या जगात ठाकुर खरोखरच थोटा  झाला  आहे,  जय खरोखरच मेला  आहे, गब्बरचे हात जायबंदी झाले आहेत आणि बसंती अन् विरुचा खट्याळ शृंगार पुढे फुलणार आहे असं मानून चालतो आपण. ते विश्व आणि आपलं विश्व अशी मानसिक फारकत शक्य असते आपल्याला. (Decoupled Cognition) स्थळ, काळ, वेळेचा असा हेतुतः विसर, विपर्यास  हा  आपल्या मेंदूचा आणखी एक धर्म-धार्जिणा गुण आहे.

ह्या गुणाचा एरवीही उपयोग होतो आपल्याला. ऑफिस मधली बाचाबाची आपल्याला पुनःपुन्हा आठवते आणि आपण प्रतिवाद तयार ठेवतो. उद्याच्या भिशीबद्दल बायकोला काय थाप मारायची ह्याची उजळणी आपण आजच करून ठेवतो. बॉसशी, बायकोशी, काय आणि कसं बोलायचं ह्याची  तालीम त्यांच्या अनुपस्थितीत करतो आपण. मनातल्या मनात अदृश्य इतरेजनांशी असा  मानसिक संवाद अगदी सहज शक्य आहे आपल्याला. प्रेतात्म्यांशी संवाद, देवात्म्याशी संवाद ही सुद्धा ह्याच गुणाची प्रचिती. लहान मुलं बाहुलीशी, टेडी बेअरशी बोलतात.  देव म्हणजे मोठ्या माणसांचं टेडी बेअरच आहे. दोन व्यक्तीत संवाद होताना मेंदूत जे भाग प्रदीप्त होतात तेच भाग टेडीशी संवाद होतो किंवा देवाची  प्रार्थना केली जाते, तेंव्हाही प्रदीप्त होतात.

आपलेपणाची भावना, ही एक आदीम भावना आहे. या जगात माझं म्हणून कोणी आहे, मला माझे म्हणणारे कोणीतरी आहे या भावनेसाठी (Attachment)  खास सर्किटस आहेत मेंदूत. कित्येक प्रार्थना काकुळतीने करूणाकराला  ‘माझे म्हणा’  अशी आळवणी करतात; कित्येक भक्त, अशी आर्जवे करताना एखाद्या तान्ह्या मुलाने आईकडे ‘घे’ म्हणून  हात पसरावेत तसे मूर्तीकडे किंवा आभाळाकडे हात फैलावतात, ते काही उगीच नाही. माणसं; मृत्यू, गैरसमज किंवा परदेशगमनामुळे हिरावली जाऊ शकतात पण देव कायमचा  सखा, कायमचा  सुहृद. आपलेपणाची ही घट्ट भावनिक गरज, देवाचा स्वीकार सुलभ करते आणि देवाचा त्याग अतिशय दुष्कर करते.

बालपणी नात्यागोत्यांच्या व्यवस्थापनाची शिकवण आपल्याला मिळत असते. पालक, वडीलधारी माणसं, यांच्याकडून अपेक्षा आणि त्यांच्या  जबाबदाऱ्या आपण शिकत असतो. मोठं होता होता इतर नातीही आपण याच कोंदणात बसवत जातो (Transference). नसलेल्या देवाशी असलेले नातेही सर्व धर्मियांनी या कोंदणात बसवलेले दिसते.   त्वमेव माता, पिता त्वमेव, त्वमेव बंधू, सखा त्वमेव; अशी प्रार्थनाही सर्व धर्मात आढळते, ती यामुळेच.  

शुद्धाशुद्धतेच्या, पावित्र्य आणि अपवित्र्याच्या कल्पनांना देखील प्राचीन आयाम आहेत. स्वच्छतेकडे नैसर्गिक ओढा आहे आपला आणि शिसारी, किळस ही भावनाही नैसर्गिक आहे. वातावरण, वर्तन, विचार असं सगळंच पवित्र अथवा किळसवाणं वाटू शकतं आपल्याला.  

धर्म मिथके वास्तवाला किंचित किंचित पीळ देत असतात. किंचित पीळ मानवी मन सहज स्वीकारतं. मनाच्या ह्या गुणामुळे पुराणकथा सहज सत्य मानल्या जातात. अन्यथा पुराणकथा या परिकथाच असतात. तुमचं घर तुमचे इन्कमटॅक्सचे रिटर्न भरेल आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला चहा करून देईल, असं सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. यात घराचं ‘घरपण’ हरवून गेलेलं आहे.  पण वास्तू प्रसन्न होताच   तुम्हाला गुप्तधन सापडेल, यावर चटकन विश्वास बसेल. यात वास्तूची  बरीचशी गुणवैशिष्ठ्ये शाबूत आहेत आणि काही अवास्तव गुण खास चिकटवलेले आहेत.

जी कथा कथांची तीच कथानायक आणि खलनायकांची सुद्धा. सर्व देव, दानव, देवदूत, एकूणच  स्वर्गलोकातील  आणि पाताळलोकातील लोक, म्हणजे मानवाची किंचित सुधारून किंवा बिघडवून घडवलेली आवृत्तीच. एकाच वेळी बऱ्याचशा मानवी आणि काही अतीमानवी गुणांनी युक्त अशी ही पात्रे असतात. ही खातात, पितात, हसतात, रूसतात, झोपतात, कोपतात, दोन बायकांनी कावतात, अगदी तुमच्या आमच्या सारखीच असतात ती. 

ह्या कथानायकांचे वागणे आदर्श असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार आपली वागणूक बेतावी अशी शिकवण दिली जाते पण प्राचीन कथा पुराणांचा आजच्या जगण्याशी थेट संबंध नसतोच. कोणत्याही धर्माचा  कितीही कट्टर माणूस धर्मग्रंथ शब्दश: पाळतच नसतो, पाळूच शकत नाही. नीती थेट धर्मग्रंथातून येत नाही. आजच्या भिंगातून बघत, बघत, धर्मशास्त्रातले सोयीचे ते वेचले  जाते. आजचे धार्मिक  पुराणातली वानगी गरजेनुसार घेतात अथवा सोडून देतात. मग कर्मकांडे प्रचलित सामाजिक नीती-अनीतीच्या कल्पना घट्ट करतात. त्यामुळे पौराणिक कथानकातील विरोधाभास दाखवून,  धर्मभावना फारतर तीळभर ढळते आणि हा ढळ  पळभर टिकतो. विरोधाभास दाखवून देणाऱ्याबद्दल कटुता मात्र मणभर साठते आणि मनभर दाटते.   

पुराणकथांबरोबरच कर्मकांडं हा तर धर्मावर हल्ला करण्यास अत्यंत सोपा, सोयीचा, सर्वात कमकुवत भाग असं नास्तिकांना वाटतं. पण काही कर्मकांडे समाजधारणा  करतात, काही शेतीच्या चक्राशी निगडीत आहेत आणि काही तर चक्क मजेदार आहेत. सोडमुंज होताच, कोणी मुलगी  देत नाही म्हणून मुलाने रुसून, संन्यास घेत, काशीयात्रेला प्रस्थान ठेवणे आणि मामाने  मुलगी देतो म्हणताच परत फिरणे; अशी खेळकर आहेत  काही.

पण वरवर निरर्थक भासणारी ही कर्मकांडं धर्माचा कणा आहेत!  कित्येक कर्मकांडे ही तर  उघड उघड  अविवेकी, निर्बुद्ध आणि निरर्थक भासतात. असतात. पण प्रत्यक्षात अशा कर्मकांडातील सहभाग हा नि:शंक निष्ठा निदर्शक असतो. निष्ठेचे, प्रामाणिक, आचरण्यास कठीण आणि नक्कलण्यास अवघड संकेत समाजव्यवहारासाठी आवश्यक असतात. सर्व कर्मकांडे म्हणजे निष्ठेची आचमने असतात. ऋण काढून साजरे केलेले सण, स्वतःला जाच करून केलेली व्रते, कष्टप्रद तीर्थयात्रा, अव्वाच्या सव्वा दानधर्म, देवाच्या नावाने अंगावर आसूड ओढणे, स्वतःला बगाडाला टांगणे, इत्यादीमुळे सामाजिक पतप्रतिष्ठा, स्विकार, वाढत असतो. उद्यापनाला व्रतार्थीच्या पायाचे तीर्थ घेण्यापर्यंत प्रथा परंपरा आहेत त्या हेच अधोरेखित करतात. अशा सहभागातून हळूहळू इथे प्रश्न विचारायचे नाहीत, हा कुलाचार आहे, सबब असाच चालू ठेवायचा, अशी धारणा गडद केली जाते. माणूस आपोआप त्या त्या कळपात  सामावून जातो. हे सामावणे कळपाला आणि त्या व्यक्तीला सोयीचे असते. स्थलकाल  लंघून, कर्मकांडे धर्मश्रद्धा संक्रमित करतात, फोफावत ठेवतात, तेवत ठेवतात. इथे वाईत   भोंडल्याला ‘मिडल क्लास’ म्हणून नाके मुरडणारी मुलगी वॉशिंग्टनमध्ये गेली की हौसेनी चार सख्या जमवून फेर धरते.  

 

मानवी मन धर्मकल्पनेला धार्जिणे आहे हे आपण पाहीलंच आहे. पण कर्मकांडातून   आत्मसन्मान, साफल्य, अत्यानंद, काळभय, समर्थ प्रेरणा, वेदना-शमन, तीव्र स्वकीयभाव; असे आत्यंतिक  टोकाचे भावानुभाव उचंबळून येतात. सेरोटोनिन, डोपामीन, एपिनेफ्रीन, नॉर-एपीनेफ्रीन, ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फीन अशी अती भावानुकूल रसायने  मेंदूत स्रवत जातात. अनुभव मालिकांची बेरीज होत नाही, तर चक्क गुणाकार होतो. प्रत्येक घटितामागे कोणी    हेतुधारी कर्ता-करवीता असतो हा तर माणसाचा आदिम  मनगुण. मग  या रसायनांच्या खेळात चल-अचल सृष्टीतील कोणत्याही सोयीच्या घटकाला तन-मन-हेतु वगैरे मानवी गुणांनी मढवले जाते. देवाचे देवत्व असे घट्टमुट्ट होत जाते.

 

कर्मकांडानी आणि प्रार्थनेनी परिस्थितीत बदल होत नसला तरी प्राप्त परिस्थितीला तोंड द्यायला आस्तिकांना  बळ मिळतं. धर्म ही खरोखरच अफूची गोळी आहे. मेंदू वैज्ञानिकांच्या मते कोणत्याही आनंदानुभूतीच्या वेळी, म्हणजे अगदी  संभोगापासून ते  संगीतापर्यंत आणि चॉकलेट पासून ते  गांजासारख्या आनंद-औषधांच्या सेवनादरम्यान   मेंदूतील जे भाग उद्दीपित झालेले दिसतात तेच देवाधर्माचं करतानाही होतात. इतकी लोकं देवाधर्माच्या भजनी लागतात ते काही उगीच नाही. आशा, आधार, सांत्वन, धीर, विश्वास, सुरक्षितता, निश्चितता, विस्मय, विरेचन, मृत्युंजय भावना  आणि अडचणीच्या वेळी सामजिक आधार  अशा सर्व भावभावनांचा  स्त्रोत आहे धर्म.

हे सगळं सोडून उघडं, नागडं, रौद्र, सत्य, ज्याला त्याला दाखवण्याचं कारणच काय?

कारण लवकरच ह्या सकृतदर्शनी साध्या आणि उपयुक्त वाटणाऱ्या कल्पनातून शोषण सुरु होतं. अविवेकी निर्णयांची आणि चुकीच्या आडाख्यांची मालिकाच सुरु होते. उत्साहवर्धक  असतात तशाच हतोत्साही करणाऱ्याही असतात ह्या कल्पना. चुकीच्या मार्गानेही ढकलतात त्या. विशेषतः देव-धर्म ही बाब वैयक्तिक न रहाता सार्वजनिक, राजकीय होते तेंव्हा तर असं होतच होतं.  

व्यक्तिगत धर्मही तापदायक ठरू शकतो. साधी, दानधर्मात रमणारी, कुणाच्या अध्यात न मध्यात, स्वांत:सुखाय देव मानणारी, देवभोळी माणसं; ही व्यक्तिश: चांगलीच असतात. त्यांचा धर्मही वैयक्तिक आणि इतरांना त्रास न देणारा असतो. पण हीच माणसं  त्यांच्या धर्मियांच्या  टोकाच्या धर्मांध  विचारांना आदर आणि प्रतिष्ठा मिळवून देत असतात. धर्म आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत वगैरे तत्वज्ञान ह्याच मंडळींना भावतं. पण असल्या बंडलबाजीमुळे विज्ञानाची समज बोथट होते.

ह्या समजावून घेण्यात तीन संकल्पना महत्वाच्या. हे विश्व निर्हेतुक आहे, ह्याची जडणघडण सुघटित आणि सुरचित वाटत असली तरी ती  निव्वळ अपघात मात्र आहे आणि मीच का? हा प्रश्न बराचसा अप्रस्तुत आहे.    

निर्हेतुक विश्व

इतक्या अफाट, मती गुंग करणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या विश्वाची निर्मिती आपोआप, निर्हेतुकपणे झालेली आहे अशी  विज्ञानाची मांडणी आहे. त्यातही ही मांडणी सध्याची आहे, कदाचित उद्या काही वेगळे प्रत्ययास आले तर ही मांडणी बदलण्यास प्रत्यवाय नाही, अशीही विज्ञानाची मांडणी आहे. थोडक्यात ‘अंतिम सत्य’ वगैरे भानगड विज्ञानाला वर्ज्य आहे.  ही मांडणी, सहसा सगळ्यांना वैफल्यवादी, अर्थशून्य आणि  निराशाजनक वाटते.   इतकी अनिश्चितता आणि निर्हेतुक करामत ज्यांना झेपत नाही ते आस्तिक बनून हरएक  नैसर्गिक अथवा मानवी घटिताला   हेतू आणि कारणे डकवतात आणि  ‘अंतिम सत्य’ सापडल्याची तृप्ती कुरवाळत बसतात.

अपघातमात्र विश्वरचना

विश्वाची रचना कितीही सुघटित आणि सुरचीत वाटली तरी प्रत्यक्षात ही निर्मिती देव कल्पनेविनाही समजावून घेता येते. विश्वरचनेचा संपूर्ण उलगडा झाला नसला तरी देवाची जी सर्वोच्च करामत, जी की सजीव सृष्टी, तिच्या विलासाचा उलगडा बराचसा शक्य झाला आहे.

सजीवांची शरीरे वरवर पहाता कितीही सुबक, सर्वांगसुंदर, सुघटीत आणि सुरचित वाटली तरी उत्क्रांतीचा अभ्यास असं दर्शवतो की उत्क्रांतीच्या अनाहूत ओघात सजीवांच्या शरीररचनेत कित्येक दोष, चुका, कमअस्सल कारागिरी आणि ओबडधोबड घडण उतरलेली आहे. सजीवांची शरीरे ही कोणा बुद्धीवान निर्मिकाच्या परिपूर्ण निर्मितीची सजीव लेणी नसून; निर्बुद्ध  नैसर्गिक निवडीच्या, खळाळत्या प्रवाहाने घडवलेले गोटे मात्र आहेत. ह्यांची गोलाई प्रवाहाने घोटवलेली आहे कोणी सहेतुक घडवलेली नाही.   सजीव शरीरे हा बुद्धिमंत निर्मितीचा पुरावा नसून निर्बुद्ध नैसर्गिक निवडीच्या प्रतापाचा पुरावा आहे. हाच कार्यकारणभाव निर्जीव सृष्टीलाही लागू आहे असा विज्ञानाचा दावा आहे.

मीच का?

जे भोग आपल्या वाट्याला  आले ते आपल्याच वाट्याला का आले? हा तर चिरंतन प्रश्न. चवचाल बायकोपासून ते चमडीच्या कर्करोगापर्यंत कशासाठीही  हा प्रश्न विचारता येतो, विचारला जातो.   याला योगायोग वगळता कोणतेही कारण नाही आणि स्वीकार वगळता कोणताही उपाय नाही.  हे समजावून घेणे अतिशय अस्वस्थ करणारे असले, तरीही अंतिमतः गोलमाल, निरर्थक विचारव्युहातून मुक्तीदायी असते.

पण इतकाही विचार करण्याची गरज नाही. जर देव सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि कनवाळू आहे तर मग दवाखान्यांची गरज काय? आरोग्य विम्याची गरज काय? आस्तिकांनी  सीट बेल्ट लावायची गरज काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करता  येतील. या प्रश्नांना श्रद्धावानांकडे उत्तरेही तयार असतील.  पण सत्य हेच की देवबिव कोणी आपली काळजी घेत नसतो. आपल्या मगदुरानुसार आपल्यालाच ते करावे लागते. पण आस्तिकांना  हे सत्य कळले तरी वळत मात्र नाही. तसं बघायला गेलं तर आपापले देव वगळता अन्य देवतांवर आस्तिकांचा विश्वास नसतो. थोडक्यात ‘त्यांचा देव’ वगळता इतर देवांच्या बाबतीत ते नास्तिकच असतात. अल्लाचा बंदा राम-कृष्णावर विश्वास ठेवत नाही आणि  सच्च्या रामभक्त येशूच्या बापाला जगाचा बाप मानत नाही. अशा हिशोबात  नास्तिकांची संख्या जास्त भरेल!!

दैनंदिन जीवनात धर्माचे स्थान पूर्वीसारखे सर्वव्यापी राहिलेले नाही. देवशरण, दैवशरण,  निष्क्रिय, आंधळ्या, आस्तिकतेपेक्षा; प्रयत्नवादी, क्रियाशील, शोधक, डोळस, नास्तिक विचार उन्नत खराच. विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवादाची कास धरून माणसानी  तूफान प्रगती केली आहे. पण धर्म संपेल का, या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे.  धर्मामागे भगवंताचे अधिष्ठान नसले तरी त्यामागे मानसशास्त्रीय आणि उत्क्रांतीशास्त्रीय  अधिष्ठान आहे. तेंव्हा धर्माला हद्दपार करणे, नजीकच्या भविष्यकाळात तरी,  अशक्य नसले तरी  अवघड आहे, असं वाटतं.

नास्तिकांनी धर्माचा दुस्वास आणि धार्मिकांचा  उपहास करण्याऐवजी दोहोंचा  अभ्यास केला पाहिजे एवढं मात्र खरं. 

 

प्रथम प्रसिद्धी:- नवभारत डिसेंबर २०२०

 

 

काही संदर्भग्रंथ :-

Why We Believe In God(S)

J. Anderson Thomson

 

In Gods We Trust

Scott Atran

 

Religion Explained

Pascal Boyer

 

The Skeptic’s Guide to the Universe

Steven Novella

 

The Faith Instinct

Nicholas Wade

 

A History of God

Karen Armstrong

न भूतो, पण भविष्यवती!!

 

न भूतो, पण भविष्यवती!!

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई  

 

करोनाने सगळ्या जगाला टेकीस आणले आहे. नाकातोंडाला मुसकी आली. ओंजळीत शुद्धोदकाचे तीर्थ आले  (Sanitizer).  अखंड हरताळ आले. भरवशाचे आधुनिक वैद्यक चक्क चाचपडू लागलेले पाहून, अक्सीर इलाजाचे छातीठोक  दावे करणारे   छद्मोपचार उदंड झाले.  आपण करोनाचा  असा अनेकांगांनी सामना केला  आहे.

पण आता लसीच्या निमित्ताने प्रथमच काही आशेचा किरण दिसायला लागला आहे. ब्रिटनच्या मार्गरेट कीनन ह्या नव्वदीच्या वृद्धेला लसीचा पहिला डोस देण्यात आला. शक्यता अशी आहे की ह्या आजीबाई विज्ञानाच्या इतिहासात अमर होतील, बहुतेक. कारण त्यांना दिली गेली आहे ती एम् आरएनए प्रकारची लस.   

करोनाविरुद्ध संभाव्य प्रतिबंध  म्हणून नव्वद एक प्रकारच्या लसी शर्यतीत आहेत. हे तसं नेहमीचेच.  कोणतेही नवे औषध शोधायला गेलं की अनेक संभाव्य उमेदवार, मी मी म्हणत हात वर करतात. मग परीक्षेअंती  या साऱ्यातून सर्वात सुयोग्य उमेदवाराची सरशी होते.

 

व्हायरस करतात तरी काय?

शरीरात शिरताच, व्हायरसच्या अंगावरील प्रथिन-काटे (Spike proteins), कपड्याला चिकटगुंडा चिकटावा, तसे आपल्या पेशींना चिकटतात. मग व्हायरस पेशींत शिरतात. तिथल्या निर्मितीप्रक्रियेचे अपहरण करतात आणि आपल्या पेशींना, त्यांचे नेहमीचे काम सोडून, अधिक व्हायरस निर्माण करायला उद्युक्त करतात. व्हायरसची पिल्ले मग पेशीतून बाहेर पडतात आणि अन्य पेशींत हाच कार्यक्रम उरकू लागतात.  

अर्थात इतकं सगळं होईपर्यंत आपलं शरीर काही गप्प बसत नाही. आपल्या पेशी (Antigen presenting cells) मग व्हायरसना  पकडून त्यांचा योग्य तो भाग ‘टी हेल्पर पेशीं’ना सादर करतात. चवताळलेल्या टी पेशी, मग व्हायरसने घर केलेल्या पेशी संपवून टाकतात. बी पेशी व्हायरसविरुद्ध रासायनिक अस्त्र (Antibodies) डागतात. बहुतेकदा आपला विजय होतो. लढाई संपते.  या साऱ्याचा  लेखाजोखा भावी संदर्भासाठी प्रतिकारशक्तीच्या स्मरणात नोंदला (Memory cells) जातो. यदाकदाचित पुनः जर या व्हायरसने काही आगळीक केलीच तर सहाजिकच आपला प्रतिसाद अधिक जलद, अधिक जोरकस आणि अधिक प्रभावी  असतो.

 

लस म्हणजे काय?

लस देणे म्हणजे ह्या आपल्या प्रतिकारशक्तीला  प्रशिक्षित करणे. हे करण्याचे अनेक मार्ग आहेत.

ह्यासाठी प्रत्यक्ष व्हायरसऐवजी प्रतिकारशक्तीला त्याचे अशक्त रूप तेवढे  नजर केले जाते. तापवून किंवा काही रसायने वापरुन किंवा व्हायरसची गुणसुत्रे विस्कटून तो अशक्त करता  येतो. ही शेवटची युक्ती वापरून कोडाजेनीक्स-सीरमची लस पुण्यात  बनत आहे.

किंवा दुसऱ्याच एखाद्या व्हायरसद्वारे (Viral vector) शत्रू-व्हायरसची, म्हणजे इथे करोनाची, नेमकी गुणसुत्रे प्रतिकारशक्तीला   नजर केली जातात. उदाहरणार्थ इबोला विरुद्धच्या अशा लसीत गोवराचा अशक्त केलेला   व्हायरस वापरला आहे. हा  पेशींत शिरून प्रसवतो देखील.  त्यामुळे लसीचा परिणाम बराच  वाढतो आणि बराच काळ  टिकतोही.

 किंवा व्हायरसच्या अंगावरची अनन्य प्रथिने नजर केली जातात. करोनाच्या चित्रातले ते अतिपरिचित काटे म्हणजे एक प्रकारची प्रथिनेच आहेत. त्यांच्या सोबतच्या एम्-प्रथिनांवरही  प्रयोग चालू आहेत. अशा प्रकारच्या  लसींच्या बरोबरीने   काही (प्रतिकार)शक्तीवर्धके (Adjuvants) द्यावी लागतात. त्याशिवाय त्यांचा अपेक्षित परिणाम दिसत नाही.  

व्हायरस म्हणजे बाहेर प्रथिनांचे फोलपट आणि आत डीएनए किंवा आरएनएचा दाणा, अशी रचना असते. अनेक लसींत निव्वळ प्रथिनांचे फोलपट (Virus like particle)  सादर करूनच काम भागते. 

किंवा फोलपटाऐवजी प्रतिकारशक्तीला त्यातील फक्त डीएनए अथवा आरएनए नजर केले जातात. डीएनए इलेक्ट्रॉपोरेशनने  (विजेने छिद्रे पाडून)  आणि आरएनए मेदावगुंठीत (Lipid coat) स्वरूपात पेशींत सोडता येतो.     हे डीएनए किंवा आरएनएचे रेणु आपल्या पेशीत शिरतात.  आपल्याच पेशींतील यंत्रणा वापरुन तिथेच पिल्लावतात. त्यांचे  अधिकाधिक  रेणु तयार होतात. ते प्रतिकारशक्तीच्या नजरेस पडताच प्रतिबंधक शस्त्रास्त्रे निर्माण होतात. आपण म्हणतो ह्या लसीने प्रतिकारशक्ती निर्माण झाली बरं का.

 

एम् आरएनए लस

ह्यातल्याच एम् आरएनए (Messenger RNA) ह्या प्रकारच्या लसीने सध्या वैद्यकविश्वात खळबळ माजवली आहे.  एम् आरएनए लसीचा हा पहिलाच प्रयोग आहे.  फायझर, मॉडर्ना वगैरे कंपन्यांनी ही  विकसित केली आहे.

हे एम् आरएनए आपल्या पेशींपेशींत असतातच. अमुक एक प्रथिन  बनवा, अशा   निरोपाच्या चिठ्ठ्या,  आपल्या डीएनएकडून प्रथिन निर्मितीकेंद्राकडे (Ribosomeकडे) घेऊन जाणारे हे क्षणभंगुर  निरोपे.  कीनन आज्जींना टोचलेली  लस म्हणजे एक निरोपाची चिठ्ठीच  आहे. ह्यावर, ‘करोनाची अमुक अमुक प्रथिने बनवा’, असा निरोप लिहिलेला आहे. हुकुमाचा ताबेदार रायबोसोम, तो हुकूम पेशींपेशींत अंमलात आणणार आहे. करोनाची काही प्रथिने निर्माण होणार आहेत. ही प्रथिने म्हणजे संपूर्ण करोना व्हायरस नव्हे.  करोनाची झलक मात्र आहे. पण चवताळून उठायला, प्रतिरोधक शस्त्रे-अस्त्रे तयार करायला तेवढे पुरते. तेंव्हा  ही दृष्टीस पडताच आजींची प्रतिकारशक्ती प्रतिबंधक शस्त्रास्त्रे निर्माण करणार आहे!

थेट आपल्या प्रथिन निर्मिती यंत्रणेलाच  आदेश देणारा  असा निरोप्या शरीरात सोडायचा म्हणजे जरा धोक्याचंच वाटतं,  नाही का? काही दगाफटका झाला तर? पण अशी भीती अनाठायी आहे. हा निरोप आणि तो निरोप्या  ह्यांना मर्यादित आयुष्य आहे. क्षणभंगुर आहेत ते. काम झाले की ती चिठ्ठी फाडून टाकली जाते, निरोप्या नष्ट केला जातो.

अशा प्रकारच्या लसी आधीच आल्या असत्या पण आपल्या  प्रतिकारशक्तीचे पहारे चुकवून आत शिरेल असा एम् आरएनए, त्याला पांघरायला घोंगडी (Delivery vehicle), वगैरे  बनवणे आजवर शक्य झाले नव्हते. आता करोना कृपेकरून हे शक्य झालं आहे. ह्या एम् आरएनएत,  ध चा मा करून, हे शक्य झाले आहे. युरीडीनच्या (Uridine) जागी छद्मयुरीडीन (Pseudo Uridine)ची योजना केलेला एम् आरएनए, आपल्या  प्रतिकारशक्तीचे पहारे चुकवून बिनबोभाट  आत शिरू शकतो.    

हे शक्य होतंय हे पाहून शास्त्रज्ञ मोहरून गेले आहेत.  कारण हीच युक्ति वापरुन उद्या इतरही अनेक लसी बनवता येतील. करोनाच्या जागी कोणी नवा कर्दनकाळ उभा ठाकला, तर ही  झटपट, स्वस्त, सुरक्षित आणि सोपी युक्ति वापरुन नवी लस बनवता येईल. भविष्यातील साथीच्या   संभाव्य व्हायरसविरुद्ध आधीच लसीची बेगमी करता  येईल. ‘सर्दी जुकाम से परेशान’ होण्याऐवजी कदाचित  लसच येईल. कदाचित  कॅन्सररोधक संदेश धाडता  येतील. कदाचित पार्किनसन्स, अल्झायमर्स   आटोक्यात आणता  येईल.  कदाचित २०२० हे वर्ष इतिहासात करोनाच्या  अशुभ कहराचे वर्ष म्हणून नोंदले जाईलच पण कदाचित  एम् आरएनए लसीच्या शुभारंभाचे वर्ष म्हणूनही नोंदले जाईल.  

म्हणूनच, न भूतो, पण नक्कीच भविष्यवती अशा ह्या लसीचे हार्दिक स्वागत.

 

 

प्रथम प्रसिद्धी दैनिक सकाळ १९/१२/२०२०

 

   

Wednesday, 9 December 2020

इन्शाअल्लाह; नवी कादंबरी

इन्शाअल्लाह; नवी कादंबरी
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

‘इन्शाअल्लाह’ ही अभिराम भडकमकर यांची नवी कादंबरी.
मुसलमानांच्या सामाजिक  प्रश्नांवर भाष्य करणारी ही कादंबरी कोणत्याही एका दिशेने वहात न जाता आपले म्हणणे मांडते.  हे या कादंबरीचे वैशिष्ठ्य. यापूर्वीही, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘देहभान’ वगैरे नाटकातून भडकमकरांनी गुंतागुंतीचे प्रश्न सम्यकपणे हाताळले आहेत. मुस्लिम प्रश्नाबद्दल  अभिनिवेशविरहित विचार अशक्य कोटीतला वाटतो. पण तो शक्य आहे हे लेखकानी दाखवून दिलं आहे. पुरोगामी, कम्युनिस्ट, समाजवादी, परिवर्तनवादी, हिंदुत्ववादी, कट्टर तसेच मवाळ मुसलमान अशा साऱ्यांचे एकाच वेळी दोष दिग्दर्शन करणे सोपे नाही.

कोल्हापूरचे रेल्वे स्टेशन उडवून देण्याच्या कटात काही मुसलमान तरुणांची धरपकड होते. एक संशयित फरार होतो. या पोलीसी प्रकरणापासून सुरु होणारी कादंबरी मुसलमान मोहल्याचं, सामान्य मुसलमानांच्या जीवनाचं,  दर्शन घडवत उलगडत जाते. विविध पात्रांच्या माध्यमातून ह्या प्रश्नाचे विविध पैलू पुढे येतात. जमीला, मुमताज, रफीक, इम्तियाज, शिखरे, मोमीन, नीना, मानव लेले, श्री, अनंता, कय्यूम साहेब, नदीम अशा बऱ्याच पात्रांची भाऊ(आणि बहीण)गर्दी असूनही कोणी गर्दीत हरवलेले नाही. उलट ह्या गर्दीतील पात्रांच्या बुरख्याआड,  गेल्या पन्नासवर्षातील महाराष्ट्राच्या समाजपटलावरील अनेक चेहरे, आपली ओळख पटवत रहातात. पण तरीही  यातील प्रत्येक पात्राला स्वतःची ओळख आहेच. अशा प्रकारच्या वैचारिक अंगाच्या कादंबरीत बरेचदा हरएक पात्राच्या तोंडून लेखकच बोलत रहातो. इथे मात्र सर्व बाजू ताकदीने आल्या आहेत.

झुल्फी हा पोरगा कादंबरीचा नायक. त्याची वैचारिक वाढ, त्याची धडपड, घुसमट, फरफट यातून मुस्लिम विश्वाचा एक छोटासा छेद जणू सूक्ष्मदर्शकाखाली दिसत रहातो. रक्तदान शिबीर, चर्चा मंडळ  चालवणे अशा अत्यंत छोट्या कृतीही मुसलमान मोहल्ल्यात काय काय अडचणी घेऊन येतात याचे प्रत्ययकारी चित्र इथे रेखाटले आहे.  याच्या  चित्रणाने मुसलमान समाजातली ‘सुधारणाच’  किती मागास आहे हे पाहून हबकून जायला होतं.

पळता पळता धपकन पड्या, दही बी  सांड्या, गाडगा भी फुट्या;  अशा छापाच्या  बागवानी बोलीत बहुतेक पात्रे बोलतात.  ‘ तूच रांड आचींगी, मेरेको बोलतीस व्हय गे? तंगडीच तोडूंगी, उंडगी साली..’ अशी   कोल्हापुरी फोडणी आहेच.  मराठी, उर्दू, हिन्दी अशी ही मिश्र बोली. बरीच शिक्षित पात्रेही घरी अशी आणि दारी शुद्ध मराठी बोलतात. मदरशातील/उर्दूतील शिक्षणाने कोल्हापुरात असूनही मातीशी, भाषेशी नाळ जुळत नाही. दारिद्र्य, बेकारी ह्यामागे हेही एक कारण आहेच.  बरेचदा पात्रे सुरवात ह्या बोलीत करतात. मग पूर्णविराम येतो आणि मग लेखक पात्राला काय  म्हणायचंय हे शुद्ध मराठीत सांगतो. बोली भाषेच्या मर्यादा इथे लक्षात येतात. उपलब्ध शब्दसंपदेत नेमकेपणानी, गांभीर्यपूर्वक  काही मांडणे अवघड असल्याने ही युक्ति योजली असावी.

कादंबरीतले बारीकसारिक तपशील जागोजागी दाद घेऊन जातात. साहित्य संमेलनाध्यक्षांचे ‘ठरीव’ भाषण; मोर्चाला जमणारे पुरोगामी, त्यांची नावे, वेष, गाणी, झकास जमून आलं आहे. रफीकजींचे देहदानानंतरचे वर्णन काळजाचा ठाव घेतं. नाटककार भडकमकरही अधूनमधून भेटतात. मिनाजला सांगून आलेलं स्थळ, बिजवराचं म्हणून नाकारलं जातं, या प्रसंगाचं चित्रण तर थेट नाटकात शोभावं असंच आहे.

कट्टरतेमुळे तोटेच तोटे होतात हे खरं असलं तरी काही फायदाही असतो. अभेद्य एकजूट, परधर्मीयांवर दहशत, ‘धार्मिक’ असे लेबल असलेली कोणतीही चीज प्रश्नांच्या, आव्हानाच्या आपोआपच पल्याड असणे; असे त्यातील काही. हे फायदे मिळावेत म्हणून कट्टरतेला कट्टरता हेच उत्तर आहे असे मानणारा मोठा हिंदू वर्ग आहे. याचेही चित्रण आहे. मिळमिळीत धर्मनिरपेक्षतेपेक्षा ढळढळीत हिंदुत्व बरे, म्हणणाऱ्यांना काय आणि कसं  उत्तर द्यायचं असा इथल्या पुरोगामी चळवळीपुढील एक प्रमुख गुंता  आहे. रोहित, श्री, अनंता आणि लेले  यांच्यामार्फत तो नीटस मांडला आहे.

कोणत्याही धर्मात सुधारणा करू जाण्याऱ्याला छळणारी  एक सनातन दुविधाही आहे.   देवाधर्माशी उभा दावा मांडावा तर तुमचं कोणीच ऐकून घेणार नाही. समाजाला समजावून घेत घेत, त्याच्या गतीनी, सावकाश   समजावत जावं म्हटलं तर धार्मिक सुधारणांची कासवगती कधी गजगती सुद्धा होणार नाही.  शिवाय तडजोड म्हणून मानलेल्या  ‘स्विकारार्ह’ धर्माआडून धार्मिक कट्टरता कधी आपलं  भेसूर  रुपडं दावेल याचा नेम  नाही. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, असा हा तिढा आहे. हा पेच लेखकाने सुंदर मांडला आहे.

सारेच संभावीत आहेत एवढंच म्हणून लेखक थांबतो. प्रत्येकानेच आपली भूमिका  विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवाद यावर घासून पुसून घेतली तर ती अधिक लखलखीत होईल असं लेखक सुचवतो; पण स्पष्ट आणि नेमक्या शब्दात म्हणत मात्र नाही. हे काम लेखकानी वाचकांवर सोडलं आहे. असं आपलं मला वाटतं.

बाकी  इतर वाचकांना आणि लेखकाला अगदी अस्संच वाटतं का, ते  अल्ला जाने.

Monday, 9 November 2020

२०३० सालचा दवाखाना

 २०३० सालचा दवाखाना

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
शंभर वर्षापूर्वी दवाखाने कसे होते? इतिहासात आपल्याला ही माहिती नक्की मिळेल. पण शंभर वर्षानंतर दवाखाने कसे असतील? आजार कोणते असतील? डॉक्टर कसे तपासतील?
आज नव्यानव्या तपासण्यांमुळे आजार लवकर लक्षात येत आहेत. नवी नवी औषधे निर्माण केली जात आहेत. पण याच बरोबर नवेनवे आजारही येत आहेत. त्यामुळे शंभर वर्षानंतरचे भविष्य सांगणं अतिशय कठीण आहे.
करोनाची साथ, संगणक आणि इंटरनेटमुळे शाळा कितीतरी बदलली. फक्त सहा महिन्यांत, हा हा म्हणता हा बदल घडला. अशी काही आपली शाळा असेल याची तुम्ही कल्पना तरी केली होतीत का? त्यामुळे शंभर कशाला, अगदी दहा वर्षानंतर काय परिस्थिति असेल, याचा अचूक अंदाज करणे अवघड आहे. पण आपण प्रयत्न करून पाहूया. नुसतेच कल्पनेचे पतंग उडवण्यापेक्षा नीट विचार करून अंदाज बांधूया.
करोनाचंच उदाहरण घेऊ या ना. ताप, थंडी, खोकला असं काही व्हायला लागलं की माणसं दवाखान्यात जातात. रक्त तपासून, सिटी स्कॅन वगैरे काढून निदान केलं जातं आणि मग उपचार सुरू होतात. कधीकधी माणसं, घरीच, बोटाला मशीन लावून स्वतःचं स्वतःच ऑक्सीजन मोजतात. बरेचदा घरीच बरी होतात.
निदान, उपचार, प्रतिबंध अशा आजाराच्या प्रत्येक पायरीवर येत्या दहा वर्षात प्रचंड बदल होऊ शकतात.
आरोग्य-कंकण
मनगटावर बांधलेले घड्याळासारखे यंत्र (आरोग्य-कंकण) तुमच्या शरीरातील अनेक गोष्टी मोजू शकेल. काही औषधांचे रक्तातील प्रमाणही ते सांगू शकेल. मग गरजेप्रमाणे आता अमुक अमुक डोस घ्या असंही ते सांगू शकेल. मग ही माहिती ते यंत्र तुमच्या आणि डॉक्टरांच्या मोबाईलला पाठवेल. मोबाईलचा आणि तुमचा चांगलाच परिचय आहे. काही घोटाळा असला तर मोबाईलमध्ये धोक्याची घंटा वाजेल.
मोबाईल वाचेल तुमचे मन
इतकंच काय तुम्ही मोबाईलमध्ये काय बघताय, काय ‘टाईपताय’ ह्यावर मोबाईल लक्ष ठेवेल. यावरून तो तुमच्या मानसिकतेचा अंदाज बांधेल. (तुमच्या लक्षात आलं का? टाइप+करताय = टाइपताय; असा एक नवीनच शब्द वापरला आहे इथे.) कोणी अगदी निराश असेल, कोणाला अति भीती वाटत असेल; तर तुमचा मोबाईल तुमच्या डॉक्टरांना कळवेल. मग ते तुम्हाला बोलावून उपचार सांगू शकतील.
घरबसल्या तपासण्या
दहा वर्षानंतर तुम्हाला बऱ्याचशा तपासण्या घरबसल्या करता येतील. तुमच्या रक्तातील साखर, हिमोग्लोबीन, कॉलेस्टेरॉल आणि इतर अनेक घटक दंडात बसवलेल्या एका बारीक ‘चिप’द्वारे (चिप म्हणजे अगदी नखाएवढा कॉम्प्युटर) सतत मोजले जातील. त्यातील बदल सतत नोंदवले जातील. ही माहिती सतत डॉक्टरांच्या कॉम्प्युटरकडे आपोआप पाठवली जाईल. यावरून तुम्हाला काही होऊ लागायच्या आतच कॉम्प्युटर धोक्याचा इशारा देईल. मुळात जित्याजागत्या डॉक्टरकडे जायची फारशी वेळच येणार नाही. चिप, मोबाईल, कॉम्प्युटर हे त्रिकुट परस्पर बरेच औषधोपचार करू शकेल.
अशा चिपमुळे कोट्यवधी लोकांची माहिती जमा होईल आणि या डोंगराएवढ्या माहितीतून अनेक नवेनवे शोध लागतील. या माहितीचा उपयोग शिकवणारे, विदाविज्ञान, असे एक नवेच शास्त्र आता उदयाला येत आहे. डॉक्टरांइतकेच याही क्षेत्रातील तज्ञ आवश्यक असतील.
प्रतिमाविज्ञानात विलक्षण झेप
सोनोग्राफीत आईच्या पोटातील बाळ दिसू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे. सोनोग्राफी, एक्सरे, एमआरआय, सिटी स्कॅन, अशा तपासण्याद्वारे आपल्याला माणसाच्या शरीरात डोकावता येतं. ह्या साऱ्याला प्रतिमाविज्ञान म्हणतात. आज ह्या तपासण्यातून ज्या प्रतिमा निर्माण होतात त्यांचा अर्थ लावायला डॉक्टर असावा लागतो. येत्या दशकात हे काम संपूर्णपणे कॉम्प्युटर करेल. डॉक्टरपेक्षा उत्तम करेल. बिनचूक करेल. झटपट करेल. दिवसरात्र करेल.
पोटाच्या, आतडयाच्या आतल्या त्वचेला काही आजार असतील तर ते डोळ्याला दिसणे महामुश्किल असते. आता एक गोळी मिळते. त्यात सूक्ष्म कॅमेरा असतो. ही गोळी खायची. मग ती अन्न नलिका, जठर, आतडे असा प्रवास करत संडासवाटे बाहेर पडते. या सर्व प्रवासात ती आसपासचे फोटो काढत रहाते. आत काय काय बिघडलं आहे हे आपण त्या फोटोतून शोधून काढू शकतो.
ऑर्डरप्रमाणे अवयव बनवून मिळतील
माणसाला आता कृत्रिम गुडघा, खुबा वगैरे बसवता येतो. मोतीबिंदू झाला तर नवे भिंग बसवता येते. हे अवयव तयार कपड्यासारखे काही ठराविक मापाचे मिळतात. पण ‘त्रिमिती छपाई’च्या नव्या तंत्राने हे अवयव आता नेमक्या मापाचे बनवता येतील. अगदी तंतोतंत माप.
पण किडनी, हृदय, कातडी वगैरे अवयव, एकाचे दुसऱ्याला बसवावे लागतात. नव्या युगात हे अवयव चक्क कारखान्यात बनवता येतील आणि गरजेप्रमाणे माणसात बसवता येतील. बिघडलेले यकृत (Liver), इंन्सुलिन न निर्माण करणारे स्वादुपिंड (Pancreas), झिजून नष्ट झालेली सांध्यातील कुर्चा (Cartilage) सरळ ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतील.
प्रतिकारशक्तीवर सखोल संशोधन
आपल्या शरीरात जंतू शिरले की ही प्रतिकारशक्ती काम करू लागते. जंतूंना मारून टाकते. बाहेरून जसे जंतू आपल्या शरीरावर हल्ला करतात तशाच आपल्या शरीरातील काही पेशी रोज नियम मोडून वेड्यावाकड्या वाढायला लागतात. प्रतिकारशक्ती, अशा पेशी नष्ट करते. कधीकधी हे काम नीट होत नाही. मग अशा वेड्यावाकड्या, बेशिस्त पेशी सतत वाढत रहातात. त्यांची गाठ बनते. आपण या आजाराला कॅन्सर (कर्करोग) म्हणतो. या क्षेत्रातील संशोधनामुळे प्रतिकारशक्तीची शक्ती वाढेल. कॅन्सरचे उपचार पूर्णपणे बदलून जातील. बरेचसे कॅन्सर टाळता येतील. काही बरे करता येतील.
प्रतिकारशक्ती ही दुधारी तलवार आहे. मांजरी जशी कधी कधी आपलीच पिल्ले खाते तशी प्रतिकारशक्ती कधी कधी आपल्याच चांगल्या पेशीही नष्ट करते. प्रतिकारशक्तीबद्दल आपली समज वाढली की ती कमी-जास्त करता येईल. दमा, संधिवात असे अनेक आजार प्रतिकारशक्ती नियंत्रित करून बरे करता येतील.
जनुकीय औषधोपचार
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत तीच गुणसुत्रांची लड असते पण प्रत्येक पेशी काही विशिष्ठ काम करत असते. याचं कारण प्रत्येक पेशीत आवश्यक तेवढीच गुणसुत्रे ‘चालू’ केली जातात. कोणती गुणसुत्रे चालू आहेत, कोणती बंद आहेत हे लवकरच समजू शकेल. पेशींची वागणूक आपल्याला अगदी स्पष्ट कळेल. गरजेप्रमाणे गुणसुत्रे ‘चालू’- ‘बंद’ करणारी किल्ली आपण बनवलेली असेल. त्यामुळे गुणसूत्रात काही दोष असेल तर तोही दुरुस्त करता येईल. याला म्हणतात जीन एडिटिंग (Gene editing). महाराष्ट्रात, विदर्भात सिकल सेल अॅनिमिया नावाचा आजार आढळतो. यात पेशंटच्या शरीरातील रक्त कमीच रहाते. सिकल सेल सारखे आजार मग चक्क बरे करता येतील.
मेंदूच्या अंतरंगात डोकावता येईल
मेंदूचे कार्य आपल्याला बरेचसे अज्ञात आहे. येत्या दशकात प्रतिमाविज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला मेंदूचे कार्य ‘पहाता’ येईल. म्हणजे आज जसे आपल्याला सोनोग्राफीत धपापणारे हृदय दिसते तसे उद्या चिंताग्रस्त, आनंदी अथवा मत्सरी मेंदू दिसेल. मेंदूचा कोणता भाग निष्क्रिय आहे ते दिसेल. भ्रमिष्टपणा, पक्षाघात वगैरे आजारांचे अचूक उपचार शक्य होतील.
ड्रोन पोहोचवतील औषधे
युद्धभूमीवर, भूकंप, वादळ वगैरे आपत्ती आल्यावर झटपट औषधोपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात. लग्नात कॅमेरे लावून उंचावरून शूटिंग करायला वापरली जाणारी ड्रोन विमाने अशा दुर्गम ठिकाणी औषधे नेऊन पोहोचवतील, रक्त नेऊन पोहोचवतील. तिथल्या पेशंटचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मोठ्या लॅबोरेटरीला पोहोचवतील. ‘कठीण समय येता ड्रोन कामास येतो’; अशी नवी कविताही कोणी नवा वामनपंडित लिहील.
नव्या लसी
येत्या दहा वर्षात काही लसीही येतील. एच आय व्ही एड्स वर लस् येईल. फ्ल्यू वर येईल. आणि हो, येत्या वर्षभरात करोनावर लसही निघेल... किंवा करोना खूप कमी होईल. मग शाळा पुन्हा सुरू होईल, पुन्हा मामाच्या गावाला जाता येईल, सहली, स्नेहसंमेलने, वक्तृत्व स्पर्धा पुन्हा सुरू होतील. ही माहिती वाचून एखाद्या स्पर्धेत तुमच्या भारी भाषणाला बक्षीससुद्धा मिळेल!
पूर्व प्रसिद्धी 'किशोर' दिवाळी २०२०