Wednesday, 9 December 2020

इन्शाअल्लाह; नवी कादंबरी

इन्शाअल्लाह; नवी कादंबरी
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

‘इन्शाअल्लाह’ ही अभिराम भडकमकर यांची नवी कादंबरी.
मुसलमानांच्या सामाजिक  प्रश्नांवर भाष्य करणारी ही कादंबरी कोणत्याही एका दिशेने वहात न जाता आपले म्हणणे मांडते.  हे या कादंबरीचे वैशिष्ठ्य. यापूर्वीही, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘देहभान’ वगैरे नाटकातून भडकमकरांनी गुंतागुंतीचे प्रश्न सम्यकपणे हाताळले आहेत. मुस्लिम प्रश्नाबद्दल  अभिनिवेशविरहित विचार अशक्य कोटीतला वाटतो. पण तो शक्य आहे हे लेखकानी दाखवून दिलं आहे. पुरोगामी, कम्युनिस्ट, समाजवादी, परिवर्तनवादी, हिंदुत्ववादी, कट्टर तसेच मवाळ मुसलमान अशा साऱ्यांचे एकाच वेळी दोष दिग्दर्शन करणे सोपे नाही.

कोल्हापूरचे रेल्वे स्टेशन उडवून देण्याच्या कटात काही मुसलमान तरुणांची धरपकड होते. एक संशयित फरार होतो. या पोलीसी प्रकरणापासून सुरु होणारी कादंबरी मुसलमान मोहल्याचं, सामान्य मुसलमानांच्या जीवनाचं,  दर्शन घडवत उलगडत जाते. विविध पात्रांच्या माध्यमातून ह्या प्रश्नाचे विविध पैलू पुढे येतात. जमीला, मुमताज, रफीक, इम्तियाज, शिखरे, मोमीन, नीना, मानव लेले, श्री, अनंता, कय्यूम साहेब, नदीम अशा बऱ्याच पात्रांची भाऊ(आणि बहीण)गर्दी असूनही कोणी गर्दीत हरवलेले नाही. उलट ह्या गर्दीतील पात्रांच्या बुरख्याआड,  गेल्या पन्नासवर्षातील महाराष्ट्राच्या समाजपटलावरील अनेक चेहरे, आपली ओळख पटवत रहातात. पण तरीही  यातील प्रत्येक पात्राला स्वतःची ओळख आहेच. अशा प्रकारच्या वैचारिक अंगाच्या कादंबरीत बरेचदा हरएक पात्राच्या तोंडून लेखकच बोलत रहातो. इथे मात्र सर्व बाजू ताकदीने आल्या आहेत.

झुल्फी हा पोरगा कादंबरीचा नायक. त्याची वैचारिक वाढ, त्याची धडपड, घुसमट, फरफट यातून मुस्लिम विश्वाचा एक छोटासा छेद जणू सूक्ष्मदर्शकाखाली दिसत रहातो. रक्तदान शिबीर, चर्चा मंडळ  चालवणे अशा अत्यंत छोट्या कृतीही मुसलमान मोहल्ल्यात काय काय अडचणी घेऊन येतात याचे प्रत्ययकारी चित्र इथे रेखाटले आहे.  याच्या  चित्रणाने मुसलमान समाजातली ‘सुधारणाच’  किती मागास आहे हे पाहून हबकून जायला होतं.

पळता पळता धपकन पड्या, दही बी  सांड्या, गाडगा भी फुट्या;  अशा छापाच्या  बागवानी बोलीत बहुतेक पात्रे बोलतात.  ‘ तूच रांड आचींगी, मेरेको बोलतीस व्हय गे? तंगडीच तोडूंगी, उंडगी साली..’ अशी   कोल्हापुरी फोडणी आहेच.  मराठी, उर्दू, हिन्दी अशी ही मिश्र बोली. बरीच शिक्षित पात्रेही घरी अशी आणि दारी शुद्ध मराठी बोलतात. मदरशातील/उर्दूतील शिक्षणाने कोल्हापुरात असूनही मातीशी, भाषेशी नाळ जुळत नाही. दारिद्र्य, बेकारी ह्यामागे हेही एक कारण आहेच.  बरेचदा पात्रे सुरवात ह्या बोलीत करतात. मग पूर्णविराम येतो आणि मग लेखक पात्राला काय  म्हणायचंय हे शुद्ध मराठीत सांगतो. बोली भाषेच्या मर्यादा इथे लक्षात येतात. उपलब्ध शब्दसंपदेत नेमकेपणानी, गांभीर्यपूर्वक  काही मांडणे अवघड असल्याने ही युक्ति योजली असावी.

कादंबरीतले बारीकसारिक तपशील जागोजागी दाद घेऊन जातात. साहित्य संमेलनाध्यक्षांचे ‘ठरीव’ भाषण; मोर्चाला जमणारे पुरोगामी, त्यांची नावे, वेष, गाणी, झकास जमून आलं आहे. रफीकजींचे देहदानानंतरचे वर्णन काळजाचा ठाव घेतं. नाटककार भडकमकरही अधूनमधून भेटतात. मिनाजला सांगून आलेलं स्थळ, बिजवराचं म्हणून नाकारलं जातं, या प्रसंगाचं चित्रण तर थेट नाटकात शोभावं असंच आहे.

कट्टरतेमुळे तोटेच तोटे होतात हे खरं असलं तरी काही फायदाही असतो. अभेद्य एकजूट, परधर्मीयांवर दहशत, ‘धार्मिक’ असे लेबल असलेली कोणतीही चीज प्रश्नांच्या, आव्हानाच्या आपोआपच पल्याड असणे; असे त्यातील काही. हे फायदे मिळावेत म्हणून कट्टरतेला कट्टरता हेच उत्तर आहे असे मानणारा मोठा हिंदू वर्ग आहे. याचेही चित्रण आहे. मिळमिळीत धर्मनिरपेक्षतेपेक्षा ढळढळीत हिंदुत्व बरे, म्हणणाऱ्यांना काय आणि कसं  उत्तर द्यायचं असा इथल्या पुरोगामी चळवळीपुढील एक प्रमुख गुंता  आहे. रोहित, श्री, अनंता आणि लेले  यांच्यामार्फत तो नीटस मांडला आहे.

कोणत्याही धर्मात सुधारणा करू जाण्याऱ्याला छळणारी  एक सनातन दुविधाही आहे.   देवाधर्माशी उभा दावा मांडावा तर तुमचं कोणीच ऐकून घेणार नाही. समाजाला समजावून घेत घेत, त्याच्या गतीनी, सावकाश   समजावत जावं म्हटलं तर धार्मिक सुधारणांची कासवगती कधी गजगती सुद्धा होणार नाही.  शिवाय तडजोड म्हणून मानलेल्या  ‘स्विकारार्ह’ धर्माआडून धार्मिक कट्टरता कधी आपलं  भेसूर  रुपडं दावेल याचा नेम  नाही. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, असा हा तिढा आहे. हा पेच लेखकाने सुंदर मांडला आहे.

सारेच संभावीत आहेत एवढंच म्हणून लेखक थांबतो. प्रत्येकानेच आपली भूमिका  विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवाद यावर घासून पुसून घेतली तर ती अधिक लखलखीत होईल असं लेखक सुचवतो; पण स्पष्ट आणि नेमक्या शब्दात म्हणत मात्र नाही. हे काम लेखकानी वाचकांवर सोडलं आहे. असं आपलं मला वाटतं.

बाकी  इतर वाचकांना आणि लेखकाला अगदी अस्संच वाटतं का, ते  अल्ला जाने.

2 comments:

  1. नेटके व तंतोतंत वर्णन करणारी समीक्षा.

    ReplyDelete
  2. कादंबरी वाचण्यासाठी उत्सुक आहे.

    ReplyDelete