Monday, 26 March 2018

प्रकरण ६ कमी पिकवा पण उत्तम पिकवा ऋतूसमाप्तीची उत्क्रांती


प्रकरण ६
कमी पिकवा पण उत्तम पिकवा
ऋतूसमाप्तीची उत्क्रांती

जारेड डायमंड यांच्या, 'व्हाय सेक्स इज फन?'  या भन्नाट पुस्तकाचा भन्नाट भावानुवाद.


बहुतेक जंगली प्राणी मरेपर्यंत जननक्षम असतात, निदान अगदी उतार वय होईपर्यंत तरी असतातच असतात. पुरुषांचे तसेच आहे. काही पुरुषांची जनन क्षमता वाढत्या वयात अनेक कारणाने कमी होते, काहींची संपते, पण अमुक वयानंतर जननक्षमता संपणारच असा काही सर्वांसाठी नियम नसतो. अनेक वयस्कर पुरुषांना , अगदी चौऱ्याण्णवाव्या वर्षीही मुले झाल्याचा  खात्रीशीर पुरावा आहे.
स्त्रियांत मात्र चाळीशीनंतर जनन क्षमता अचानक मंदावते आणि पुढे दशकभरात ती  पूर्ण संपतेच. अगदी चोपन्न-पंचावन्नाव्या वर्षीही पाळी येत राहिल्याची उदाहरणे आहेत, पण पन्नाशीच्या पुढे मूल राहिल्याची घटना विरळा. आता आधुनिक तंत्रज्ञानाने संप्रेरके आणि कृत्रिम फलनाच्या सहाय्याने हे शक्य झाले आहे. अमेरिकेतील हुट्टेराईट समाजातील लोकं खाऊन पिऊन सुखी आणि कट्टर धार्मिक असतात. ह्यांचा गर्भनिरोधक साधनांना कडवा विरोध. ह्यांच्या बायकांना जैविकदृष्टया शक्य त्या काळात शक्य तेवढी मुले होतात. दोन मुलातील सरासरी अंतर असते दोन वर्षे आणि प्रत्येक बाईला सरासरी मुले होतात अकरा. एकोणपन्नाशीनंतर ह्याही बायका वांझ होतात.



सर्वसामान्यांच्या दृष्टीने पाळी जाणे, ऋतूसमाप्ती, हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग, काहीसा तापदायक, काहीसा हुरहूर लावणारा. पण उत्क्रांतीतज्ञांच्या दृष्टीने मानवातील  ऋतूसमाप्ती हा प्राणी जगतातील एक अपवाद, एक बुचकळ्यात टाकणारी विसंगती. आपलीच जनुके वाहणारी अधिकाधिक संतती साध्य होऊ देतील, अशीच जनुके निसर्गतः निवडली जातात. अशीच संतती जगते, वाचते आणि वाढते. नैसर्गिक निवडीचे हे गाभ्याचे तत्व. मग एखाद्या प्रजातीतील प्रत्येक मादीची प्रजनन क्षमता संपवणारी जनुके, नैसर्गिक निवडीत टिकलीच कशी? सर्व जैविक गुणधर्मात काही जनुकीय उणे-अधिक असते. म्हणजे ऋतूसमाप्ती जरी सर्वच स्त्रियांत असली तरी ऋतूसमाप्तीचे नेमके वय कमी-अधिक असते. भले मनुष्यमात्रात एकदा ऋतूसमाप्ती उत्क्रांत झालीही असेल, पण मग हळू हळू हे वय लांबत जाऊन, हा प्रकार बंदच का नाही पडला? कारण पाळी टिकून राहील अशा महिलांना अधिक संतती होणार, मग त्यांचीही पाळी टिकून राहणार, मग त्यांनाही अधिक संतती होणार..... !
उत्क्रांतीतज्ञांसाठी स्त्रियांतील ऋतूसमाप्ती हे सर्वात गाढ गूढ आहेच, पण  मानवी लैंगिकतेत  ऋतूसमाप्ती हा सर्वात महत्वाचा घटक आहे. मोठा मेंदू आणि ताठ कणा (उत्क्रांतीच्या सर्व पुस्तकात ह्यावर भर असतोच); आपली  गुप्त बीजधारणा आणि निव्वळ सुखासाठी संभोग (पुस्तकात ह्यावर फारसा भर नसतो); या बरोबरच स्त्रीचे होणारे प्रजनन-हनन हाही खास मानवी गुणधर्म. माणसाला कपिंपेक्षा गुणात्मकदृष्टया निराळा, खास माणूस बनवणारा, गुणधर्म.
......


अनेक जीवशास्त्रज्ञ माझ्या ह्या विधानाशी अडखळतील. म्हणतील ऋतूसमाप्तीत न उलगडलेले असे काहीच नाही सबब पुढे चर्चाच नको. त्यांचे आक्षेप साधरण तीन प्रकारचे असतात.
पहिला आक्षेप असा की, ऋतूसमाप्ती हा केवळ वाढत्या मानवी आयुर्मानाचा परिणाम आहे. मागील शतकातील सार्वजनिक आरोग्याची धोरणे वाढत्या आयुर्मानासाठी कारणीभूत आहेत.  दहा हजार वर्षापूर्वीचा  शेतीचा शोधही यासाठी कारणीभूत आहे. उत्क्रांतीच्या ओघात, गेल्या चाळीस हजार वर्षात, माणसाने आत्मसात केलेली जगण्याची आणि तगण्याची कौशल्येही ह्याला कारणीभूत आहेत. ह्या मतानुसार कोट्यवधी वर्षाच्या उत्क्रांती दरम्यान, ‘पाळी गेलेली बाई’ असा काही प्रकारच नव्हता. कारण चाळीशीच्यावर कुणी बाई (वा पुरुष) फारसे जगतच नसत. अर्थातच चाळीशीनंतर ‘काम’काजच नसल्याने स्त्री प्रजनन यंत्रणा चाळीशीतच आपले कार्य आटोपते घेत असे. तसा संदेश (Programmed) जनुकांमध्येच अनुस्यूत झाला. आयुर्मान वाढले ते अगदी अलीकडे. इतके अलीकडे, की वाढत्या आयुर्मानानुसार बदलायला स्त्री प्रजनन संस्थेला अवधीच मिळालेला नाही.
ह्यातली त्रुटी अशी, की पुरुषांची प्रजनन संस्था आणि स्त्री-पुरुषांच्या इतरही सर्व जैविक क्रिया ह्या चाळीशीनंतर कित्येकांत कित्येक दशके कार्यरत रहातात; हे तथ्य इथे दुर्लक्षिले गेले आहे. म्हणजे या इतर सर्व कार्यांनी आपल्या वाढलेल्या आयुर्मानाशी जुळवून घेतले असे गृहीत धरावे लागेल. मग केवळ स्त्री प्रजनन संस्थाच मागे का हे कोडे राहतेच.


पूर्वी पाळी जायच्या वयापर्यंत फारशा स्त्रिया जगतच नसत ह्याचा पुरावा म्हणजे प्राचीन सांगाडयाच्या अभ्यासातून काढलेले त्या व्यक्तीचे मृत्यूसमयीचे वय. हे अंदाज सिद्ध न झालेल्या, काही अशक्य गृहीतकांवर बेतलेले आहेत. उदाः मिळालेला सांगाडा हा त्या काळातल्या तमाम जनतेचा प्रातिनिधिक नमुना आहे किंवा आपण काढतो ते वय अगदी बिनचूक आहे. त्यातही दहा वर्षाच्या मुलीचा सांगाडा आणि पंचविशीतल्या मुलीचा सांगाडा वेगळा ओळखता येतो यात शंकाच नाही. पण चाळीस आणि पंचावन्न वर्षाच्या व्यक्तींचे प्राचीन सांगाडे वेगवेगळे ओळखता येतात याचा पडताळा कोणी दिलेला नाही. प्राचीन आणि अर्वाचीन  सांगाड्यांची तुलनाही अशक्य आहे. आजची आपली जीवनशैली, आहार आणि आजार पूर्वीपेक्षा इतके वेगळे आहेत, की आपली हाडे ही आपल्या पूर्वजांच्या हाडांपेक्षा भिन्न वेगाने बदलतात.
  दुसरा आक्षेप असा की ऋतूनिवृत्ती ही प्राचीनच आहे, पण खास माणसातच आहे असे नाही. बऱ्याच नव्हे तर बहुतेक प्राण्यांची जननक्षमता वाढत्या वयाबरोबर ओसरते. काही सस्तन प्राणी आणि पक्षी वार्धक्यात वांझ झाल्याचे, अनेक प्रजातीत दिसते. प्रयोगशाळांत किंवा प्राणीसंग्रहालयात  राखलेल्या ऱ्हीसस मकाक्वे माकडीणी आणि उंदरीणींचे आयुर्मान त्यांच्या उघड्यावरच्या प्रजेपेक्षा बरेच जास्त असते. उत्तम अन्नपाणी, उत्तमोत्तम औषधपाणी आणि शत्रू नाही कोणी, अशा सुरक्षित वातावरणात आयुर्मान वाढतेच. वय वाढले की जनन क्षमता संपते. त्यामुळे काहींचा आक्षेप असा की हा प्रकार अन्य प्राण्यांत दिसतो तसाच मानव माद्यात दिसतो. कारण काहीही का असेना, इतर प्रजातीतही हे असेच असेल, तर माणसांत काही खास आहे आणि त्याचे काही वेगळे कारण शोधायला हवे असे काही नाही.


पण सुतावरून स्वर्ग गाठण्याची काही गरज नाही. प्राण्यांतही ऋतूसमाप्ती असते असे म्हणायला एखाद्या वयस्कर वांझ मादीचे उदाहरण पुरेसे नाही. पिंजाराबंद प्राण्यांतील प्रौढत्व  कृत्रिम असते. तेंव्हा त्यांच्यातली ऋतूसमाप्तीचे दाखले, ऋतूसमाप्ती सजीव विश्वातील नित्याची रीत आहे, असे दाखवण्यास अपुरे आहेत. ह्यासाठी मुक्त प्राणी-प्रजेतील बऱ्याचशा प्रौढ माद्या वयपरत्वे वांझ होतात आणि पुढे आयुष्याचा बराच काळ असा अ-जननक्षम अवस्थेत घालवतात असे सिद्ध व्हायला हवे.
माणूस नावाचा प्राणी हा निकष पूर्ण करतो पण इतर एखाद दुसऱ्याच प्रजातीत हा प्रकार दिसतो. अशी एक प्रजाती आहे ऑस्ट्रेलियन पिशवीधारी उंदरांची. ह्यातील माद्यांत नव्हे तर  नरांत ‘ऋतूनिवृत्ती’ दिसते. ऑगस्टच्या सुमारास त्यांना जनन-हताशा येते (ते वांझ होतात) आणि पुढे `काही आठवड्यात ते मरतात. प्रजेत उरतात त्या फक्त गर्भार माद्या. ह्या उंदीरमामांचे एकदा जनन-हनन झाल्यावर हे फारच अल्पकाळ जगतात. तेंव्हा हे उंदीर म्हणजे काही खरीखुरी ‘ऋतूनिवृत्ती’ नव्हे. हे तर धमाकेदार पुनरुत्पादनाचे (Semelparity, Bigbang reproduction) उत्तम उदाहरण. आयुष्यात एकदाच सर्व शक्तीनिशी पुनरुत्पादन, की पुढे लवकरच वंध्यत्व आणि मृत्यू. सालमन माशांत आणि सेंच्युरी वृक्षातही हे असे असते. प्राण्यांतील


ऋतूसमाप्तीचे चांगले उदाहरण म्हणजे, पायलट व्हेल मासे. ह्यांच्या माद्यातील बीजग्रंथी तपासल्या तर असे दिसते, की मच्छीमारांनी मारलेल्या एक चतुर्थांश माद्या, ऋतूनिवृत्त असतात. तिशी-चाळीशीच्या दरम्यान त्यांना ऋतूसमाप्ती होते आणि त्या पुढे सरासरी चौदा वर्षे जगतात. काही तर साठीही गाठतात.
ऋतूसमाप्तीच्या बाबतीत माणूस काही एकमेवाद्वितीय नाही. निदान एका तरी व्हेल प्रजातीत ऋतूसमाप्ती दिसते. व्हेलच्या इतर प्रजातीत आणि अन्य प्राण्यांतही अजून शोध घ्यायला हवा. अन्य दीर्घायुषी सस्तन प्रजातीत, वयस्कर पण जननक्षम प्रौढा सर्रास आढळतात. ह्या बाबतीत चिंपांझी, गोरिला, बबून आणि हत्तींचा सखोल अभ्यास झाला आहे. ह्या आणि इतर बहुतेक प्रजातीत ऋतूसमाप्ती हा प्रकार नसतो. उदाहरणार्थ पन्नाशीची हत्तीण ही वयस्करच म्हणायची, कारण पाच टक्के हत्तीच हे वय गाठतात. हिची प्रजनन क्षमता, तरण्याताठ्या हत्तीणीच्या निम्याने कमी असते,  पण असते; संपलेली नसते.
थोडक्यात स्त्रीयांत पाळी जाणे हा प्रकार, इतर  चार प्राण्यांपेक्षा पुरेसा आगळा आहे. माणसातील ह्या गुणाच्या उत्क्रांतीचा शोध घेतलाच पाहिजे. हा काही आपल्याला पायलट व्हेलकडून आलेला वारसा नाही. त्यांचे आणि आपले समान पूर्वज पन्नास कोटी वर्षापूर्वीच विभक्त झाले. शक्यता अशी आहे की सात कोटी वर्षापूर्वी आपले आणि चिंपांझी-गोरीलाचे पूर्वज वेगळे झाले, त्यानंतर हा प्रकार उत्क्रांत झाला असावा; कारण माणसात ऋतूसमाप्ती असते आणि चिंपांझी-गोरीलात नसते (नेहमी तरी नसते).


तिसरा आणि शेवटचा आक्षेप म्हणजे, ऋतूसमाप्ती प्राचीन आहे पण क्वचित उद्भवणारा प्रकार आहे. ह्या टीकाकारांचे म्हणणे असे की आता उत्तर शोधायची गरजच नाही, ऋतूसमाप्तीचे कोडे सुटल्यात जमा आहे. स्त्रीच्या शरीरात जन्मतः बीजांचा काही साठा असतो. ह्यात वयपरत्वे फक्त घट होत जाते, नव्याने बीजनिर्मिती होत नाही. आहे त्यातील दरमहा  एक बीज पिकते आणि फलनासाठी उपलब्ध होते. इतर अनेक तशीच वाळून जातात (Atresia). पन्नाशीपर्यंत बराचसा बीज-साठा संपून जातो. उरला सुरला माल आता अर्धशतकभर जुना असतो. इतकी मोजकी बीजे उरतात, की पिट्युटरी ग्रंथींच्या स्त्रावांना ते प्रतीसादही देत नाहीत (पिट्युटरी स्र्तावांमुळे बीज पिकायला लागते)  की पिट्युटरीला साद ही देत नाहीत (आम्ही पिकतोय असा संदेश बीजांकडून आला की पिट्युटरीचे स्त्राव वाढतात). परिणामी पाळी जाते.
पण ह्या आक्षेपालाही  एक आक्षेप आहे. तो चुकीचा नाहीये पण अपुरा आहे. बीज संपून जाणे हा ऋतूसमाप्तीचे तात्कालिक कारण आहेच, पण मग मुळात चाळीशीतच संपू लागतील इतकी कमी बीजसंख्या का उत्क्रांत झाली? दुप्पट साठा का उत्क्रांत झाला नाही? किंवा ही बीजे दुप्पट काळ टिकतील, अशी का उत्क्रांत झाली नाहीत? हत्तीणीत, बलीन व्हेल मादीत आणि अलबॅट्रॉस पक्षीणीत बीजे चांगली साठीपर्यंत टिकतात. कासवीत तर आणखी कितीतरी दीर्घ काळ टिकतात. मग माणसाच्या माद्यांनीच असे काय घोडे मारलय?


हा तिसरा आक्षेप अपुरा आहे कारण ‘तात्कालिक कारण’ आणि ‘अंतिम कारण’ याची इथे गफलत झालेली आहे. (तात्कालिक कारण म्हणजे ज्याच्या लगेचच्या परिणामांमुळे एखादी गोष्ट घडते. अंतिम कारण म्हणजे लांबचलांब कार्यकारण साखळीचे अखेरचे टोक. उदाहरणार्थ बायकोची भानगड लक्षात आल्यामुळे नवरोबा तिला सोडून देतात हे तात्कालिक कारण झाले, पण नवऱ्याची असंवेदनशीलता आणि दोघांचे कोणत्याच आवडीनिवडी न जुळणे, ह्यामुळे ती बाई परपुरुषाकडे आकृष्ट झाली असेल, हे झाले अंतिम कारण.) शरीरक्रिया-शास्त्रज्ञ आणि रेण्वीय जीवशास्त्रज्ञ ह्या सापळ्यात नेहमी सापडतात. पण जीवशास्त्र, इतिहास आणि मानवी वर्तनाचा अन्वय लावण्यासाठी ह्या दोन कारणातील भेद लक्षात घेणे जरूरीचे आहे. शरीरक्रिया-शास्त्र आणि रेण्वीय जीवशास्त्र हे निव्वळ तात्कालिक कारणे दाखवून देऊ शकतात. औत्क्रांतिक जीवशास्त्र मात्र अंतिम कारण स्पष्ट करते. एक साधेसेच उदाहरण म्हणजे विषारी बेडूक. हे विषारी असतात याचे तात्कालिक कारण म्हणजे त्यांच्या शरीरात  बाट्राकॉटॉक्सीन हे जहाल विष स्रवत असते. रेण्वीय जीवशास्त्राने शोधलेले या विषाचे नेमके नाव हा खरेतर अप्रस्तुत भाग. हेच का, कोणतेही जहर चालले असते. पण ह्या इवल्याशा, असहाय्य जीवात असे काही संरक्षणाचे साधन उत्क्रांत झाले नसते, तर तो सहजच कुणाचे सावज झाला असता; या साधनाशिवाय तो जगूच शकला नसता, हे झाले अंतिम कारण.


आपण ह्या पुस्तकात वारंवार पहिले आहे की मानवी लैंगिकतेबाबतचे गहन प्रश्न हे औत्क्रांतिक प्रश्न आहेत, अंतिम कारणाबाबत आहेत, तात्कालिक स्पष्टीकरणाबद्दल नाहीत. मैथुन मौजेचे होते कारण बायकांना छुपी बीज धारणा होते आणि त्या सतत कामासक्त असतात. पण हा जगावेगळा कामाचार मुळात उत्क्रांतच का झाला?  पुरुषांना दुग्धग्रंथी असूनही ह्या  क्षमतेचा वापर का उत्क्रांत झाला नाही? हेच ऋतूसमाप्तीबाबतही; पन्नाशी पर्यंत स्त्रीतील बीजे संपुष्टात येतात हे तर अगदी वरवरचे कारण झाले. स्वतःचेच ‘जनन-हरण’ करणारी अशी शरीरयंत्रणा  उत्क्रांत कशी झाली, हे समजावून घेणे हे खरे आव्हान आहे.
.....
स्त्रीजननेंद्रीयांचे वार्धक्य हे एकूणच इतर अवयवांच्या वार्धक्यासोबतच तपासले पाहिजे. आपले डोळे, मूत्रपिंडे (किडनी), हृद्य असे सर्वच अवयव म्हातारे होतात. चार पावसाळे झाले की अवयव जराजर्जर व्हावेत हे काही सर्वच प्राण्यांचे अटळ भागधेय नाही. निदान इतक्या वेगाने निकामी व्हावेत हे तर नाहीच नाही. कासवे, शिंपले यांचे अवयव तर आपल्या पेक्षा कितीतरी जास्त वर्ष बिनबोभाट काम करतात.


शरीरशास्त्राचे अभ्यासक वार्धक्यासाठी एकचएक सर्वसमावेशक कार्यकारणभाव शोधत आहेत. गेल्या काही दशकात चलती आहे, प्रतिकारशक्तीशी निगडीत कारणांची. शिवाय फ्री रॅडीकल, संप्रेरके आणि पेशी विभाजनाच्या दिशेनेही विचार जारी आहे. प्रत्यक्षात मात्र एकदा चाळीशी उलटली की, निव्वळ प्रतिकारशक्ती किंवा फ्री रॅडीकल विरुद्धची यंत्रणाच नाही, तर  हळूहळू सगळेच अवयव मंदावतात, हा सर्वांचाच अनुभव आहे. जरी जगातल्या सहा अब्ज लोकांपेक्षा माझे आयुष्य निवांत आहे आणि मला औषधोपचारही उत्तम मिळतात, तरी मलाही आता साठीत वार्धक्याने गाठले आहेच. ऐकायला थोडे कमी येते. जवळचे दिसत नाही. नाक  आणि जीभ पूर्वीइतकी तेज नाही. एक किडनी बाद आहे. दात झिजले आहेत. हात आखडले आहेत. कुठे लागले-बिगले तर पूर्वीपेक्षा जखमा भरून यायला वेळ खूप लागतो. सारखेच पोटऱ्या दुखायला लागल्यामुळे आता पळणे मी सोडून दिले आहे. नुकतेच कोपराला लागले होते त्यातून मी बऱ्याच काळाने बरा झालो आणि आता बोटाला दुखापत झाली आहे. पुढच्यांना लागलेल्या अनेक ठेचा आता माझ्याही वाट्याला येणार आहेत यात शंकाच नाही. हृदयविकार, बंद रक्तवाहीन्या, लघवीच्या, प्रोस्टेटच्या, गुडघ्याच्या तक्रारी, विस्मरण, कँन्सर...! वार्ध्यक्य म्हणजे अशी सगळी पडझड आहे.
ह्या कंटाळवाण्या वार्धक्यामागचे मूळ कारण समजावून घ्यायचे तर माणसाने निर्मिलेल्या वस्तूंशी तुलना करून पहाता येईल. यंत्राप्रमाणे माणसाच्या शरीराचीही कालांतराने झीज होते. कधी कधी अचनक काही बिघाड होतो. हे होऊ नये म्हणून मशीनची सातत्याने देखभाल करावी लागते. नैसर्गिक निवडीमुळे शरीराची देखभाल आणि दुरुस्ती आपल्या नकळत चालू राहील हे बघितले जाते.


यंत्रांची आणि शरीराची देखभाल दोन प्रकारे होत असते. बिघडलेला भाग दुरुस्त करणे हा एक प्रकार. उदाः गाडीचे पंक्चर काढणे किंवा खूपच खराब असतील तर टायर  किंवा ब्रेक वगैरे बदलणे. आपले शरीरही अशाच प्रकारे बिघाड झाला, की तातडीचे उपाय योजत असते. कुठे कापले तर ती जखम भरून येते हा तर नेहेमीचा अनुभव. पण आपल्या नकळत, अगदी रेण्वीय स्तरावरही, डी.एन.ए.ची दुरुस्ती चालू असते. अनंत हस्ते काम करणारा देखभाल विभाग कायमच कार्यरत असतो.  टायर जसा नवीन बसवता येतो तसेच लिव्हर, किडनी आतडी वगैरेंचा काही भाग नव्याने घडू शकतो (Regeneration). ह्या नवनिर्मितीच्या कामी आपल्यापेक्षा इतर अनेक प्राणी तरबेज आहेत. तारामासा, खेकडे, समुद्र काकडी किंवा पालीत अनुक्रमे हात, पाय, आतडी किंवा शेपूट पुन्हा उगवते. आपणास ही सिद्धी प्राप्त असती तर!
देखभालीचा दुसरा प्रकार म्हणजे, काही मोठा बिघाड व्हायची वाट न बघता सतत आणि आपोआप होणारी बारीक सारीक झीजेची,  मोडतोडीची डागडुजी. उदाः ठरल्या वेळी आपण गाडीचे ऑईल, स्पार्कप्लग, फॅनबेल्ट आणि बॉल बेअरिंग बदलुन टाकतो. तसेच आपल्याला, केस नवीन उगवतात, दर काही दिवसाने आतड्याचे अस्तर बदलेले असते आणि लाल पेशींचे आयुष्य  काही महिने असते, त्यानंतर नव्या लाल पेशी आधीच्यांची जागा घेतात. दात मात्र आयुष्यात एकदाच बदलले जातात. एवढेच काय आपल्या शरीरातील प्रथीनांचा प्रत्येक रेणू हा अदृश्यपणे बदलला जात असतो.


गाडीची देखभाल किती निगुतीने केली आहे, किती खर्च केला आहे, यावर ती किती काळ धावणार हे ठरते. असेच काहीसे आपल्या शरीराबाबतही आहे. नियमित व्यायाम, नियमित वैद्यकीय तपासणी हा जाणीवपूर्वक पार पडलेला भागच नाही तर अदृश्य डागडुजीही महत्वाची. त्वचा काय, किडनी काय किंवा प्रथिने काय, नव्याने घडवायला खूपच जैव-निर्मिक उर्जा लागते (Bio Synthetic Energy). प्राणी प्रजातींनी अशा देखभालीत केलेल्या गुंतवणुकीत खूप तफावत आहे. म्हणूनच त्यांच्या जराजर्जर होण्याच्या वेगातही फरक आहे. अगदी शतकोत्तर जगणारी कासवे आहेत. प्रयोगशाळेतल्या पिंजऱ्यातले उंदीर खाऊनपिऊन सुखी असतात, ना शिकार होण्याचा धोका, ना काही. जनावरांपेक्षाच नाही, तर बहुसंख्य माणसांपेक्षाही त्यांना उत्तम औषधोपचार मिळतात. म्हातारे, गलितगात्र होऊन होऊन ते तिसऱ्या वर्षाच्या आत मरतात. माणसात आणि आपले जवळचे नातेवाईक, कपींतही सर्वांना  वार्धक्य वेगवेगळ्या वेळी गाठते.  सुपोषित, डॉक्टरच्या नजरेखालचे, प्राणीसंग्रहालयातल्या सुरक्षित पिंजऱ्यातले कपी, कशीबशी  साठी  गाठतात. मात्र अमेरिकन गोरे ह्या कपींपेक्षा धोक्याचे आयुष्य जगतात, औषधोपचारही कमी मिळतात, पण पुरुष जगतात अठ्याहत्तर वर्षे आणि बायका त्र्याऐंशी वर्षे.  एपच्या शरीरापेक्षा आपले शरीर कार्यक्षम का? आणि मूषकाशी तुलना करता कासवे कूर्मगतीने म्हातारी  का होतात?


बिघडलेला प्रत्येक अवयव आपण दुरुस्त करत किंवा बदलत सुटलो तर वार्धक्यावर मात करून चिरंजीव होऊ आपण. गुडघे दुखले की खेकड्यांसारखे नवे पाय बनवायचे. वेळोवेळी  ‘हृदय परिवर्तन’ करायचे, ह्त्तींसारखे, आयुष्यात पाच वेळा तरी नवे दात उगवतील असे बघायचे. काही प्राणी, काही भाग तंदुरुस्त ठेवण्यात बरेच लक्ष घालतात, पण कोणीच सर्व अवयवांकडे एकसाथ लक्ष दिलेले नाही आणि वार्धक्य कुणाला चुकलेले नाही.
पुन्हा एकदा गाड्यांच्या उदाहरणाने मुद्दा स्पष्ट व्हावा; देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च हा कळीचा मुद्दा. बहुतेकांकडे पैसे मर्यादित असतात, ते काटकसरीने वापरावे लागतात. जो पर्यंत गाडी दुरुस्त करून करून वापरत राहण्यात आर्थिक शहाणपणा आहे तोवरच आपण त्यात पैसा ओततो. दुरुस्तीचेच बील अवाच्यासव्वा यायला लागले की ती गाडी बाद करून आपण नवी गाडी घेतो. तद्वतच आपल्या जनुकांसमोर शरीर दुरुस्त करत रहाणे किंवा जनुके नव्या शरीरात संक्रमित करणे (मुले होणे) असे दोन पर्याय असतात. गाड्यांच्या किंवा शरीराच्या दुरुस्तीसाठी क्षमता वापरली,  तर नवी गाडी घ्यायला किंवा प्रजननासाठी विशेष काही उरत नाही. त्यामुळे उंदरांसारखे  दुरुस्तीचे सस्त्यात भागत असेल आणि आयुष्य लहानखुरे असेल, तर भारंभार पिल्ले होतात. नाही तर आपण, दुरुस्तीही महागडी आणि आयुष्ये लांबलचक. प्रजननाच्या दृष्टीने आपण उंदरांच्या पासंगालाही पुरणार नाही. दोन वर्षाच्या वितभर आयुष्यात, उंदरी दर दोन महीन्याला विते आणि दरवेळी  तिला पाच पिल्ले होतात.


म्हणजेच नैसर्गिक निवडीतून पुनर्घटन (देखभाल/दुरुस्ती) आणि पुनरुत्पादन यांच्यात तोल साधला जातो, अधिकाधिक जनुके पुढे संक्रमित होतील असे संतुलन साधले जाते. हा संतुलन-बिंदू निरनिराळ्या प्रजातीत निरनिराळा असतो. काहींत दुरुस्तीच्या नावाने आनंदच असतो, त्यामुळे अशा अल्पायुषी प्राण्यात, गात्रे गलित होण्याआधीच, भराभ्भर, भारंभार पिल्ले निर्मिली जातात आणि देह ठेवला जातो. आपल्यासारख्या इतर प्रजाती देखभालीवर दाबून खर्च करतात, शतकभर जगतात आणि या काळात सुमारे डझनभर मुले ‘पिकवू’ शकतात (उदाः हुट्टेराईट बायका). रक्तपिपासू सम्राट मौले सारख्याला हजारभर पोरे होऊ शकतात. पण पोरे पिकवण्याचे  तुमचे (आणि मौलेचेही) कर्तृत्व उंदरांपुढे खूपच खुजे आहे.
.....
‘अपघात आणि अपमृत्यूची जोखीम किती?’, ह्यावर दुरुस्तीतील जैविक गुंतवणुक ठरत असते. हा एक महत्वाचा औत्क्रांतिक निर्देशक आहे. जीवन अगदी निर्विघ्न असतानाचे आयुर्मानही, दुरुस्तीतील जैविक गुंतवणुकीवर ठरत असते. तुम्ही तेहरानमधे टॅक्सी ड्रायव्हर असाल तर महिन्यात एखादा अपघात ठरलेला. मग उगीच पोचे काढायला कशाला पैसे खर्च करा. त्यापेक्षा पैसे साठवून लवकरच नवी टॅक्सी घेतलेली परवडली. असेच सजीवांचे देखील आहे. ज्यांच्या आयुष्यात जिवावरची जोखीम जास्त असे प्राणी देखभाल दुरुस्तीवर खर्च करत बसत नाहीत. पिंजराबंद सुरक्षित वातावरणातही ते लवकर म्हातारे होतात आणि लवकरच जगाचा निरोप घेतात. उघड्यावर उंदरांना शत्रू फार तेंव्हा ‘डागडुजीत कमीतकमी गुंतवणूक करावी’,  हेच यांचे औत्क्रांतिक फर्मान (Evolutionarily Programmed). ‘लवकरच जराजर्जर होऊन डोळे मिटावेत’ हे त्यातील पुढचे कलम. ह्याच आकाराचे पिंजाराबंद पक्षी मात्र दीर्घायुषी असतात, कारण एरवी ते भुर्रकन उडून आपला बचाव करू शकतात. इतर सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा, टणक कवचाचे संरक्षण असलेली कासवे कूर्मगतीने झिजत जातात आणि त्याच आकाराच्या सस्तन प्राण्यांपेक्षा काटेरी संरक्षण असलेले साळिंदर सावकाश म्हातारे होते.


हे नियम आपल्याला आणि आपल्या कपीबांधवांनाही लागू आहेत. प्राचीन माणूस जमिनीवर रहायला लागला. अणकुचीदार काठ्या आणि विस्तव एवढीच त्याची संरक्षण सामुग्री. कपिंसारखे झाडावरून पडण्याचा किंवा तिथेच कुणाचे भक्ष्य होण्याचा धोका आता टळला. ह्यामुळे ‘काळ’ थोडा आळसावला, आयुष्य थोडे लांबले. अन्न, औषधे आणि ऐषोआराम आयते मिळणाऱ्या पिंजराबंद कपिंपेक्षा आपण दशकभर तरी जास्त जगतो. सात कोटी वर्षापूर्वी आपली आणि कपिंची फारकत झाली. आपण झाडावरून खाली आलो, आपले पाय जमिनीवर ठरले. हाती लाठ्याकाठ्या, दगडधोंडे आले आणि अग्नी आला. गेल्या सात कोटी वर्षांच्या उत्क्रांती-ओघात आपल्याला शरीर-दुरुस्ती उत्तमप्रकारे अवगत झाली आणि वार्धक्य आणखी संथावले, आपण कपिंपेक्षा जास्त जगू लागलो.
हाच नियम वार्धक्यातील पडझडीला लागू आहे. वय वाढले की एकेक अवयव दगा देऊ लागतात हा तर सार्वत्रिक अनुभव. कटूसत्य हे, की खर्च आणि कार्यक्षमतेचा निसर्गाचा ताळेबंद चोख असतो. सारेच अवयव एकसाथ साथ सोडतील ह्यालाच म्हणायचे उत्तम डिझाईन. बाकी अवयव कोमेजत असताना एखादाच अवयव टवटवीत राखणे हा शक्तीचा अपव्यय आहे. बाकीच्यांची साथ नसेल तर हा एकच कार्यकुशल अवयव आयुष्यभर पुरून उरला, तरी उपयोग काय? तेवढी उर्जा प्रजोत्पाद्नासाठी देता आली तर त्यात अधिक फायदा आहे.
हेच तत्व मानवनिर्मित यंत्रांनाही लागू आहे. स्वस्त आणि मस्त गाड्या बनवणाऱ्या हेन्री फोर्डची एक गोष्ट सांगतात. एके दिवशी त्याने आपल्या काही कर्मचाऱ्यांना भंगाराच्या गोदामात जाऊन तिथल्या फोर्ड कंपनीच्याच ‘मॉडेल टी’ गाड्यांचे उरलेसुरले पार्टस तपासायला सांगितले. परत येऊन मोठ्या नाराजीने ते सांगू लागले की, शिल्लक साऱ्याच भागांची खूप झीज झाली होती, पण त्यातल्या त्यात  किंगपीन मात्र अगदी नव्यासारखी टिकली होती, एवढाच काय तो दिलासा. पण उत्तम घडलेल्या या किंगपिनबद्दल अभिमान वाटण्याऐवजी फोर्ड हळहळला आणि इथून पुढे उगीचच अति-टिकावू, मजबूत पिन्स बनवण्याऐवजी साध्याशा, स्वस्त पिन्स बनवण्याचे त्यानी आदेश दिले.
नैसर्गिक निवडीतून उत्क्रांत झालेले आपल्या शरीराच्या डिझाईनला फोर्डचे हे तत्व तंतोतंत लागू आहे. फक्त एक अपवाद, माणसाचे सर्वच अवयव जवळपास एकसमयावच्छेदे बाद होतात. पुरुषांच्या जनन संस्थेलाही हे तत्व लागू आहे. इथे अचानक बंद होणे नाही. पण हळूहळू कटकटी वाढत जातात. व्यक्तीगणिक कमीअधिक प्रमाणात प्रोस्टेट वाढते, पुंबीजाची संख्या घटते. हेच तत्व प्राण्यांनाही लागू आहे. जंगलात पकडलेल्या प्राण्यांत वार्धक्याच्या खुणा आढळत नाहीत, कारण ‘जरा’ यायच्या आत ‘मरणा’ने गाठलेले असते. शरीर थोडे जरी थकले तरी अपघातात किंवा भक्षकाकरवी मरण ठरलेले. प्रयोगशाळेतल्या किंवा प्राणीसंग्रहालयातल्या पिंजऱ्यात मात्र आपल्यासारखेच प्राणीही कणाकणाने  म्हातारे होतात, सगळे अवयव निकामी होत जातात.


हे अशुभवर्तमान नर-मादी दोघांच्याही जननेंद्रियांना लागू आहे. ऱ्हीसस मकाक्वेच्या माद्यांची बीजे तिशीत संपतात. वयस्कर सशांत फलन होणे दुरापास्त असते. वयस्क हॅमस्टर, उंदीर आणि सशांची, बरीच बीजे सदोष असतात. म्हाताऱ्या हॅमस्टर आणि म्हाताऱ्या सशांत फलित बीजे चांगली रुजत नाहीत. हॅमस्टर, उंदीर आणि सशांची गर्भाशये थकतात, त्यांना वारंवार गर्भपात होतात. माद्यांची जननसंस्था म्हणजे जणू साऱ्या शरीराचे एक छोटेखानी दर्शन. जे जे बिघाड होऊ शकतात ते ते इथे होतात, व्यक्तीगणिक वेळ थोडी पुढे मागे एवढेच.
ह्या फोर्डच्या किंगपिन तत्वाला ढळढळीत अपवाद म्हणजे स्त्रियांतील ऋतूनिवृत्ती. साऱ्या स्त्रियांत, थोड्याच काळात, मृत्युच्या कित्येक दशके आधीच पाळी जाते. अगदी भटक्या समाजातल्या बायकाही पाळी-पल्याड बऱ्याच जगतात. कारण तसे किरकोळ, बीजसाठा संपून जाणे. बीजे वाळण्याचा वेग मंदावे असा एखादा जनुकीय बदल पुरला असता. शरीरशास्त्राच्या दृष्टीने ऋतूनिवृत्ती अटळ नाही. औत्क्रांतिकदृष्ट्याही ती अटळ नाही. मात्र नैसर्गिक निवडीत महिलांत जनन हनन उत्क्रांत झाले आहे. पुरुषांत मात्र नाही. गेल्या काही कोटी वर्षांदरम्यान कधीतरी महिलांच्यात तशी आज्ञावली निसर्गतः कोरली गेली आहे. अर्ध्यावर डाव आला असतानाची ही निवृत्ती आश्चर्यकारक आहे कारण इतर अवयवांना असे झटपट वार्ध्यक्य येत नाही. म्हातारपण येते ते उशिरा, चोरपावलांनी.


……
जितकी अधिक संतती तितके तुम्ही उत्क्रांतीच्या स्पर्धेत पुढे. असे असताना प्रजनन क्षमतातेलाच पूर्णविराम देणाऱ्या ऋतूनिवृत्तीच्या ह्या उरफाट्या धोरणाने, स्त्रीच्या पदरात  अधिक मुले कशी पडतील? ऋतूनिवृत्तीच्या उत्क्रांतीबद्दलच्या कोणताही सिद्धांताने ही  गोष्टी स्पष्ट व्हायला हवी. असे दिसते, की वय वाढेल तसे नव्याने मुलेबाळे होऊ देण्यापेक्षा, आहेत त्याच मुलांकडे लक्ष दिले, होणाऱ्या नातवंडाकडे लक्ष दिले, नातेवाईक सांभाळले तर स्त्रीला  अधिक जनुकीय वारसदार  लाभतात.
ह्यामागील उत्क्रांतीवाचक तर्क अनेक क्रूर तथ्यांवर आधारलेला आहे. पहिले म्हणजे  माणसाचे बाळ, इतर कोणत्याही पशुपेक्षा दीर्घकाळ  पालकावलंबी  असते. चिंपांझीचे बाळ अंगावरचे बंद होता होता आपले आपण अन्न शोधून खाऊ लागते. आपला हात जगन्नाथ. (चिंपांझी ‘हत्यारे’ वापरतात. वारुळात काड्या घालून त्याला चिकटलेल्या मुंग्या खातात किंवा बिया दगडाने फोडून खातात. प्रत्यक्षात चिंपांझीच्या आहारात ह्याचे महत्व अगदी जेमतेम. ह्यात शास्त्रज्ञांनाच रस फार.) बाळ चिंपांझीही लवकरच आपल्या हाताने अन्न मिळवून, खाऊ लागतात. भटकी-शिकारी माणसे मात्र अन्न मिळवतात ते खणायला काठ्या, जाळी, भाले आणि टोपल्या अशी हत्यारे वापरून. बरीचशी अन्न-प्रक्रियाही ह्त्यारांनेच होते (मळणे, कुटणे, चिरणे, इ.) आणि मग अन्न विस्तवावर शिजवले जाते. भक्ष्यकांपासून आपण स्वतःचे रक्षण करतो ते इतर प्राण्यांसारखे दात आणि बळकट स्नायू


वापरून नाही, तर पुन्हा एकदा हत्यारे वापरून. ही हत्यारे करणे तर  बालबुद्धीच्या पलीकडलेच, ही पेलणेही बालशक्ती बाहेरचे. हत्यारे बनवणे आणि वापरणे हे मुले निव्वळ अनुकरणातून शिकत नाहीत. हे भाषेतून शिकवले जाते आणि भाषा यायला मूल किमान दहा वर्षाचे तरी व्हावे लागते.
त्यामुळे बहुतेक मानवी समाजात मूल हाताशी यायला, स्वतंत्रपणे व्यवहार करायला ते निदान तेरा ते वीस वर्षाचे तरी व्हावे लागते. तोपर्यंत ते आई-बापावरच अवलंबून असते. विशेषतः आया ही जबाबदारी पार पडत असल्याने ते आईवर अधिक अवलंबून असते. आई-बाप अन्नपाणी पुरवतात, हत्यारे बनवायला शिकवतात, संरक्षण देतात आणि टोळीत सन्मानाचे स्थानही मिळवून देतात. एखाद्या मुलाने लहानपणीच आई किंवा बाप गमावला तर पूर्वीच्या समाजात त्या मुलाच्या जीवन मरणाचाच प्रश्न उभा ठाकायचा. पालकाने पुर्नविवाह जरी केला तरी, जनुकीय झुंजीत, सावत्रपालकाचे जनुकीय हितसंबंध भिन्नच असणार. अशा परिस्थितीत अनाथ आणि निराधार मुले तर जगण्याची सुतराम शक्यता नाही.
तेंव्हा भरपूर मुलेबाळे असलेली भटक्या-शिकारी समाजातली बाई, जर शेंडेफळ वयात येईपर्यंत जगली नाही, तर तिची तिच्या मुलांतली काही जनुकीय गुंतवणूक वाया जाणार, हे निश्चित. स्त्रीच्या ऋतूसमाप्ती मागचे हे विक्राळ सत्य आणखी एक गोष्ट लक्षात घेतल्यास अक्राळविक्राळ होऊन सामोरे येते. प्रत्येक बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच. म्हणजेच, प्रत्येक


बाळंतपण म्हणजे आधीच्या मुलांना मातृवियोगाचा धोका. इतर प्राणी प्रजातीत हा धोका अगदी किरकोळ असतो. उदाहरणार्थ ४०१ गर्भवती ऱ्हीसस मकाक्वे माकडीणीपैकी केवळ एकीलाच बाळंतपणात जीव गमवावा लागला. माणसांत मात्र हे प्रमाण प्रचंड होते आणि उतार वयात तर भलतेच जास्त होते. विसाव्या शतकातील श्रीमंत पाश्चिमात्य समाजातही चाळीशीनंतर बाळंतपणात जीव जाण्याची शक्यता विशीतल्या बाईच्या सात पट आहे. प्रत्येक बाळ म्हणजे बाळंतपणात जीव जाण्याचा धोका तर आहेच पण स्तनपानामुळे गळून गेल्याने, मुलाचे करता करता थकल्याने आणि खाणारी तोंडे वाढल्यामुळे अधिकच्या श्रमानेही  जीवाचे काही बरे वाईट होऊ शकते.
उतारवयात झालेली मुले जास्त जगतही नाहीत आणि फारशी बाळसेदारही नसतात हे आणखी एक भयाण वास्तव. ह्या वयात गर्भपात, उपजत मृत्यू, कुपोषित अर्भक आणि जनुकीय आजार हे फार. डाऊन् सिंड्रोम हा एक जनुकीय जन्मजात आजार, मतिमंदत्वाचा एक प्रकार. आईचे वय जितके जास्त तितकी ह्याची शक्यता बळावते. तिशीच्या आत दोन हजारात एखाद्या बाळाला हा आजार दिसतो. आईचे  वय पस्तीस ते एकोणचाळीसच्या दरम्यान असेल, तर दर तीनशे बाळात एक मूल असे निपजते. त्रेचाळीस वय असेल तर दर पन्नास मुलांत एक आणि पुढे तर दर दहात एक मूल असे होते.
तेंव्हा जसे  बाईचे वय वाढते तसे तिला अधिक मुलांचे करावे लागते, अधिक काळ करावे लागते; म्हणजे दर बाळंतपणात ही आपली अधिकाधिक गुंतवणूक पणाला लावत असते. वय वाढले की दर गर्भारपणात हिलाही जीवाची जोखीम आणि गर्भालाही मृत्यूची, विकृतीची जोखीम.


एकुणात वयस्कर मातेला, जोखमीच्या मानानी हाती विशेष काही लागत नाही. मानवीतील ऋतूनिवृत्तीला हे ही घटक कारणीभूत असतील. यातील विरोधाभास असा की ऋतूनिवृत्तीमुळे मानवीला मुले कदाचित कमी होतील, पण होतील त्यातील अधिकाधिक हाती येतील. होतील कमी पण मिळतील जास्त! पुरुष बाळंतपणात मरत नाहीत, संभोगामुळे क्वचितच मरतात आणि आयांसारखे मुलांचे करता करता झिजून जात नाहीत, ह्या तीन कठोर सत्यांमुळे पुरुषांत नैसर्गिक निवडीद्वारे जनन-निवृत्ती उत्क्रांत झालेली नाही.
समजा एखादी म्हातारी पाळी न जाता गर्भार राहिली आणि बाळंतपणात किंवा मुलांचे करता करता मेली तर तिची मुले एवढेच तिचे तिचे नुकसान नाहीये. कारण या वयापर्यंत तिला नातवंडेही झाली असणार आणि नातवंडे ही देखील काही प्रमाणात तिची गुंतवणूक आहेच. मुलांना आई मिळणे हे जितके महत्वाचे तितकेच नातवंडांना आजी मिळणेही महत्वाचे.
पाळी गेलेल्या प्रौढेच्या ह्या विस्तारित भूमिकेचा शोध ख्रिस्तीन हॉकेसने घेतला आहे. ह्याच त्या ख्रिस्तीन हॉकेस, ज्यांच्या संशोधनाच्या आधारे आपण ‘पुरुष काय कामाचे?’चे उत्तर पाचव्या प्रकरणात बघितले. टांझानियातील हाझ्दांच्या विविध वयाच्या बायकांना दिवसभराच्या  जंगलफेरीतून काय काय गवसते याचा अभ्यास हॉकेस आणि सहकाऱ्यांनी केला. कंदमुळे, मध आणि फळे गोळा करण्यासाठी  सर्वाधिक वेळ द्यायच्या त्या म्हाताऱ्या बायका. ह्या कष्टाळू हाझ्दा आज्या


दिवसभरात सात सात तास हिंडायच्या. त्यांच्यातील नवपरिणिता जेमतेम तीन तास तर लेकुरवाळ्या जेमतेम साडेचार तास हे काम करायच्या.  अपेक्षेप्रमाणे, वयाने  आणि अनुभवाने वरचढ असल्याने  मुलींपेक्षा बायका जास्त अन्न गोळा करायच्या. पण बायकांइतकेच अन्न आज्याही जमवायच्या. त्यांना वेळ भरपूर आणि कार्यक्षमता बायकांइतकीच. स्वतःला लागायचे थोडेथोडकेच, पोरेही मोठी झालेली, तरीही त्या बरेच काही गोळा करून आणायच्या. 
त्या हझ्दा म्हाताऱ्या हे ज्यादाचे अन्न घरी मुला-नातवंडात वाटत असत, असे निरीक्षण हॉकेस आणि सहकाऱ्यांनी नोंदवले आहे. अन्नाचे हाडामांसाच्या माणसात रुपांतर करायचे तर स्वतः गर्भ पोसण्यापेक्षा मुले नातवंडे पोसलेली बरी. हे अन्नदान कितीतरी अधिक लाभदायी. मुळात वयाप्रमाणे म्हातारीची जनन क्षमता घटणार, पण त्याचवेळी तिच्या पोटच्या तरण्याबांड मुलांची  आणि तरण्याताठ्या मुलींची जननक्षमता टिपेला पोहोचलेली असणार. सहाजिकच जुन्या जमान्यातल्या या


म्हाताऱ्यांचा उतार वयातला प्रजननातला  सहभाग काही फक्त अन्नदानापुरता मर्यादित नाही. नातवंडे सांभाळायचे काम तर आजीचेच, त्यामुळे तरुणांना मोकळीक, सबब आजीमुळे तरुणांना आजीचाच जनुक-अंश घेऊन येणारी अधिक मुले पिकवायची संधी. शिवाय आजीच्या सामाजिक स्थानाचा फायदा जसा मुलांना तसा नातवंडाना देखील.
समजा आपण देव किंवा डार्विन आहोत आणि म्हाताऱ्या बायकांची जनन क्षमता ठेवायची का काढायची, असे ठरवायचे झाले तर याच्या फायद्या तोट्याचा हिशोब मांडावा लागेल. एका रकान्यात फायदे आणि दुसऱ्यात तोटे. पाळी गेल्यामुळे ‘न झालेली संतती’ हा तोटा. प्रसूतीदरम्यानचे आणि उतार वयात पोरवड्याचे करता करतानाचे  ‘मरण टळले’ हा फायदा. स्वतःच्या मुलांचे आणि नातवंडांचे केल्याने ती जगतात वाचतात. फायद्याचे प्रमाण हे अनेक बारकाव्यांवर अवलंबून आहे. बाळंतपणात मृत्यूची शक्यता किती? वयानुरूप ही जोखीम किती वाढते? मुलेबाळे आणि बालसंगोपनाचा भार  नसताना, त्या त्या वयात मृत्यूचे प्रमाण किती? पाळी जाण्यापूर्वी जनन क्षमता किती वेगाने घटते? पाळी गेली नाही तर वाढत्या वयात जननक्षमता किती प्रमाणात टिकेल? प्रत्येक समाजात हे घटक भिन्न भिन्न असतील आणि त्यांचा नेमका अंदाज घेणे सोपे नाही. आतापर्यंत दोन घटकांची मी चर्चा केली, नातवंडातील गुंतवणूक आणि मुलांमधली थेट गुंतवणूक सांभाळणे. पाळी गेली की हे करायला वेळ मिळतो, पण पाळी गेली की पुढे स्वतःला मुलेही होत नाहीत. मुले-नातवंडे संभाळण्यातल्या फायद्याने, संतती संभव थांबण्यातला तोटा भरून निघतो का? मानववंशशास्त्रज्ञांच्या मते हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
.....


ऋतूसमाप्तीचा आणखी एक सद्गुण आहे. इथे फारसे कुणी लक्ष घातलेले नाही. हा म्हणजे, चार पावसाळे जास्त पाहिलेल्या मंडळींना निरक्षर समाजात, संपूर्ण टोळीत असलेले विलक्षण महत्व. मानवाच्या उत्पत्ती पासून ते इ.पू.३३०० च्या सुमारास मेसोपोटेमियात लिपीचा शोध लागेपर्यंत, सारा समाज असाच तर होता. जेनेटिक्सचे ग्रंथ सांगतात की वृद्धापकाळी शरीराला हानिकारक ठरतील अशी जनुके आपल्यात असतातच. ही नैसर्गिक निवडीच्या चाळणीतून सुटतात. कारण सरळ आहे. नैसर्गिक निवड ही पुनरुत्पादनाच्या संदर्भात होत असते आणि वृद्धापकाळी पुनरुत्पादन क्षमता थंडावलेली असते. माझ्या मते माणूस आणि अन्य प्राण्यांतील एक महत्वाचा भेद इथे दुर्लक्षिला जातो आहे. ब्रम्हचारी साधू सोडला तर कोणीही मानवप्राणी कधीच पुनरुत्पादन क्षमता गमावून बसत नाही! पुनरुत्पादन म्हणजे स्वतःची जनुके असणाऱ्या पुढच्या पिढीला, पुनरुत्पादनासाठी सहाय्य आणि संरक्षण असाही अर्थ होतो. पाळी गेलेल्या बायका असे सहाय्य आणि संरक्षण पुरवत असतात. उद्या एखादी ओरांग उटांगीण पाळी जाईपर्यंत जगलीच, तर तिनी मात्र पुनरुत्पादनाची क्षमता गमावली आहे असे मी बेलाशक म्हणीन. कारण लेकुरवाळी ओरांग उटांगीण वगळता सारे ओरांग उटांग एकेकटे रहातात. तेंव्हा तिनी पुढच्या पिढीला सहाय्यभूत होण्याचा प्रश्नच नाही.


आधुनिक साक्षर समाजात अती वयस्कर माणसे निरुपयोगी ठरत जातात. वृद्धांची अशी अडगळ होणे हा त्यांच्यापुढे आणि अन्य समाजापुढे मोठाच प्रश्न आहे.   आज आपल्याला बरीचशी माहिती मिळते ती लिखाण, रेडीओ आणि टीव्हीतून. कोणे एके काळी माणसे नुसती  वृद्धच नाही तर ज्ञानवृद्ध आणि अनुभवसमृद्ध असायची हे आपल्या कल्पनेतसुद्धा येत नाही.
आता हेच पहा ना, मी पक्षी-परिसरशास्त्राचा अभ्यास आरंभला आहे.  न्यू गिनी आणि नजीकची वायव्वेची बेटे मी पालथी घातली आहेत. इथल्या निरक्षर, निव्वळ दगडाची हत्यारे वापरणाऱ्या, कंद-मुळे आणि शिकारीवर गुजराण करणाऱ्या लोकांत मी राहतो. पशु-पक्ष्यांची, झाडांची त्यांच्या भाषेतली नावे आणि या बद्दलची त्यांना ठाऊक असलेली माहिती मी त्यांना सतत विचारत असतो. ह्यांच्याकडे ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना आहे. हजारो पशुपक्ष्यांची, झाडावेलींची  नावे, त्यांचा परिसर, सवयी आणि उपयोग त्यांना तोंडपाठ! हे सारे भलतेच महत्वाचे कारण झाडा-प्राण्यांपासूनच अन्न मिळणार, घर बांधायला सामान मिळणार, औषधे मिळणार.
कोणत्याही दुर्मिळ पक्ष्याची माहिती हवी असो, एखादा म्हाताराच ती  खात्रीने  सांगणार, हे मी वारंवार अनुभवले आहे. शेवटी त्यांनाही निरुत्तर करणारा प्रश्न आला की ते म्हणणार,


‘त्या अमक्या म्हाताऱ्याला/म्हातारीला विचारा’. मग कुठल्याश्या झोपडीत ती व्यक्ती असणार, दृष्टी अधू, तोंडाचे बोळके, धड चालताही येत नाही आणि कुटल्याशिवाय काही खाता येत नाही. पण ही व्यक्ती म्हणजे त्यांचा ज्ञानकोश. लिखाणाचा पत्ता नसल्यामुळे स्थानिक परिस्थितीबद्दल म्हाताऱ्याला इतर कुणाहीपेक्षा अधिक माहिती. जुन्या घटनांचे स्मरण त्यालाच. दुर्मिळ पक्ष्यांचे नाव आणि वर्णनही बिनचूक.
त्याच्या ज्ञानसंचयावर साऱ्या टोळीच्या अस्तित्वाची भिस्त. मी १९७६ साली सोलोमन द्वीपसमुहातील रेनेल बेटांवर गेलो होतो. प्रशांत महासागरातील वायव्वेकडील वादळवेड्या समुद्रातील ही बेटे. पक्षी कोणत्या बिया, फळे खातात असे विचारताच तिथल्या स्थानिकांनी डझनभर वनस्पतींची त्यांच्या भाषेतली नावे सांगितली. प्रत्येक झाडाची फळे कोणत्या पाखरांना, कोणत्या वटवाघळांना पसंत ते सांगितले आणि आपण ती फळे खाणे योग्य आहे का हेही सांगीतले. ह्या फलाहाराचे तीन प्रकार होते; अजिबात खात नाहीत अशी फळे, नेहमी खातात अशी फळे आणि उपासमार झाली तरच खावीत अशी फळे. उपासमार म्हणजे हंगीकेंगीच्या वेळी झाली तशी. हंगीकेंगी हा प्रकार मला अनोळखी होता. पुढे खुलासा झाला की हे  १९१०च्या सुमारास झालेल्या सर्वात भीषण वादळाचे स्थानिक भाषेतील नाव होते. ह्या वादळाने संपूर्ण जंगल


झोपवले, बागा उद्ध्वस्त केल्या आणि साऱ्यांची उपासमार केली. लोकांना मिळतील त्या जंगली फळांवर गुजराण करावी लागली. कोणती फळे, विषारी कोणती बिनविषारी आणि कोणाचे विष काय केल्याने निष्प्रभ होते हे ज्ञान आता उपयोगी आले.
माझ्या तरुण रेनेली गाईडना मी याबद्दल खोदून खोदून विचारताच ते मला एका झोपडीत घेऊन गेले.  तिथल्या अंधाराला डोळे सरावल्यानंतर कोपऱ्यातली, अशक्त, जागचे हलताही न येणारी  म्हातारी मला दिसली. ती म्हातारी म्हणजे ते वादळ अनुभवलेली  शेवटची व्यक्ती. पुन्हा बागेत काही उगवेपर्यंत जंगलातले काय खावे काय नाही, हे तिनी प्रत्यक्ष पाहिलेले. ती सांगत होती, हंगीकेंगीच्या वेळी ती खूप लहान होती. अजून लग्नाचीही नव्हती. मी रेनेलला १९७६ला गेलो होतो. वादळ धडकले होते सहासष्ठ वर्षापूर्वी, १९१०च्या सुमारास.  म्हणजे आजी ऐंशी वर्षाची तरी असावी. त्या वादळानंतर ती वाचली, ते अशाच कोणा वृद्धाला पूर्वीच्या वादळातल्या तगून रहाण्याच्या क्लृप्त्या ठाऊक होत्या म्हणून. आता वादळ झालेच तर ह्या जमातीचे जिणे सर्वस्वी तिच्या स्मृतींवर अवलंबून होते आणि स्मरण अगदी तल्लख होते तिचे.
अशा किती कथा म्हणून सांगाव्यात. भटकत आणि शिकार करत जगायचे म्हणजे, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’. सगळ्यांचाच जीव जाईल अशा आपत्ती किंवा लढाया मधून मधून घडणार. छोट्या टोळ्यांत सगळेच सगेसोयरे. पिकल्या केसांचा पोक्त सल्ला निव्वळ मुला-नातवंडांनाच जगायला मदत करतो असे नाही तर त्या पिकल्या पानाचा जनुक-अंश वहाणाऱ्या  इतरही शेकडो लोकांना त्याची मदत होते.




हंगीकेंगीसारख्या संकटाच्या आणि संकटमोचनाच्या आठवणी बाळगणारी बुजुर्ग माणसे ज्या समाजात असतील तो समाज टिकण्याची शक्यता अधिक. अशी माणसे नसतील तो समाज संपण्याची शक्यता अधिक. पुरुषांना ना बाळंतपण, ना स्तनपान, ना त्यातले धोके आणि ना त्यात पिळवटून निघणे. त्यामुळे त्यांना जनन हनन हा प्रकार नाही. त्यांना धोके नाहीत, सबब  जनन हननामुळे मिळणारे संरक्षण उत्क्रांत झालेले नाही. ज्या म्हाताऱ्या बायका जननक्षम राहायच्या त्या बाळंतपण आणि बालसंगोपनात खपायच्या. अर्थातच त्यांचा वंश उत्क्रांतीच्या स्पर्धेतून हळूहळू बाहेर फेकला जायचा. अशी ज्ञानवृद्ध म्हातारी मेली की हंगीकेंगी सारख्या संकटात त्या टोळीचा निभाव लागायचा नाही. मग सारी टोळीच संपायची. वंशखंडच व्हायचा. झपाट्याने प्रतिकूल होत जाणाऱ्या परिस्थितीत, जास्तीच्या एखाद दोन मुलांसाठी ही भलतीच जनुकीय किंमत झाली. म्हातारीच्या अनुभवाचे, स्मृतींचे संचित हे समाजाला महत्वाचे होते. यामुळेही ऋतूनिवृत्ती उत्क्रांत झाली असे मला वाटते.
.......


आपल्या जनुकीय सग्यासोयऱ्यांसोबत गटागटाने रहाणारा मनुष्य, एवढा एकच प्राणी नाही. पिढ्यापिढ्यांचे संचित (निव्वळ जनुकीय भाषेत नाही तर) संस्कृतिचिंन्हांतून (भाषा, लिपी, इ.) संक्रमित केले जाते आणि म्हणून मानवजात टिकून आहे. पण असे करणाराही माणूस एकटा नाही. व्हेल मासे अतिशय बुद्धिमान असतात आणि त्यांच्यात गुंतागुंतीची समाजरचना असते, काही सांस्कृतिक परंपरा देखील असतात, हे आपल्या आत्ताआत्ता लक्षात येऊ लागले आहे. हम्पबॅक व्हेलची गाणी हे ह्याचे उत्तम उदाहरण. ‘ऋतूनिवृत्ती’ असणारे पायलट व्हेल हे असेच दुसरे उदाहरण. माणसाच्या भटक्या टोळ्यांप्रमाणेच पायलट व्हेलही टोळ्यांनी रहातात. एका टोळीत पन्नास ते अडीचशे व्हेल असतात. टोळीतले सगळे व्हेल एकमेकाचे सगेसोयरेच असतात असे जनुकीय तपासण्यात आढळले आहे. आपली टोळी सोडून दुसऱ्या टोळीत कोणी जात नाही. टोळीतल्या बऱ्याच माद्या ‘पाळी गेलेल्या’ असतात. पायलट व्हेलमधील प्रसूती बायकांइतकी जीव-जोखमीची नसेलही, पण उतारवयातील  बाळंतपण आणि बालसंगोपन जीवावरच उठत असेल आणि म्हणून पायलट व्हेल मध्ये ऋतूनिवृत्ती उत्क्रांत झाली असेल.
नैसर्गिक अवस्थेत नेमक्या किती टक्के माद्याचे जनन हनन होते हे आपल्याला ठाऊक नसलेल्या अनेक सामाजिक प्राणी प्रजाती आहेत. यात चिंपांझी आहेत, बोनोबो आहेत, आफ्रिकी आणि आशियाई हत्ती आहेत, किलर व्हेल आहेत. ह्यातल्या बहुतेक प्रजातीतील इतके प्राणी माणसाच्या हावरटपणाला


बळी पडत आहेत, की ऋतूनिवृत्ती नावाचा काही प्रकार घडतो की नाही हेही शोधण्याची संधी आपण गमावून बसलो आहोत. सध्या किलर व्हेल वर अभ्यास नेटाने जारी आहे. किलर व्हेल आणि इतर महाकाय सामाजिक प्राण्यांचे सामाजिक व्यवहार साधारण आपल्या सारखेच आहेत. त्यामुळे उद्या ह्या प्रजातीतही ऋतूनिवृत्तीच्या फेऱ्यामुळे, ‘कमी पिकवा पण उत्तम पिकवा’ असे काही उत्क्रांत झालेले आढळले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

प्रकरण ७ जाहिरातबाजीतील सत्य शरीर संकेतांची उत्क्रांती


प्रकरण ७
जाहिरातबाजीतील सत्य
शरीर संकेतांची उत्क्रांती

जारेड डायमंड यांच्या व्हाय इज सेक्स फन ? या बहारदार पुस्तकाचे तितकेच बहारदार मराठी रुपांतर 


मिस्टर आर्ट आणि मिसेस ज्युडी स्मिथ, हे पतीपत्नी (नावे बदलली आहेत), माझ्या चांगल्या परिचयाचे. नुकतेच त्यांच्या वैवाहिक जीवनात मोठ्ठ वादळ येऊन गेले. दोघांचीही बाहेर बरीच लफडी होती, शेवटी लग्न मोडले. काही काळानी मुलांचा वगैरे विचार करून दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मनातल्या, नात्यातल्या जुन्या जखमा हळूहळू भरून येत होत्या. आता पुन्हा विश्वासघात करायचा नाही असे दोघांनी एकमेकांना वचन दिले होते. पण खोल कुठेतरी संशय आणि कडवटपणा होताच.
ह्याच मनःस्थितीत, कामानिमित्त चार सहा दिवसाच्या दौऱ्यावर असताना, एकदा भल्या सकाळी आर्टने घरी फोन केला. खर्जातल्या पुरुषी आवाजात ‘हॅलो’ ऐकताच आर्टच्या तोंडातून शब्द फुटेना. मनात शंकांचे मोहोळ. (काय बरे असेल? राँग नंबर? आपल्या घरी हा ‘पुरुष’ कोण?) काय बोलावे हे त्याला कळेना. कसाबसा तो पुटपुटला,
‘मिसेस. स्मिथ आहेत का?’
‘ती वरती बेडरूममध्ये चेंज करत्येय.’ त्याचे रोखठोक उत्तर.
क्षणात आर्टच्या मनात क्षोभ पेटला. त्याचे मन आक्रोश करू लागले, ‘तिच्या भानगडी सुरु झाल्या पुन्हा! माझ्याच बेडमध्ये कुठल्यातरी भडव्याबरोबर झोपली होती!! तो तर फोनही घेतोय बिनधास्त.’ आपण घरी गेलोय, त्या भडव्याचा खून करून ज्युडीचे डोके भिंतीवर आपटतोय, अशी चित्रे त्याच्या नजरेसमोरून झरझर सरकू लागली. अजूनही त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता, कसाबसा त्यानी पुढचा प्रश्न केला,
‘पण... तुम्ही.. कोण?’


पलीकडून आवंढा गिळल्याचा आवाज आला आणि तो आवाज किलबिलला,
‘डॅडी, मला नाही ओळखलेत?’
नुकताच आवाज फुटायला लागलेला, आर्ट आणि ज्युडीचा, तो चौदा वर्षाचा छोकरा होता. आर्ट गलबलला; सुटकेचा सुस्कारा, आनंदकल्लोळ आणि डोळा पाणी, असे सगळे एकदम अनुभवले त्यानी.
आर्टची ही कहाणी ऐकताना माझ्या पुन्हा एकदा लक्षात आले की आपण माणसे, विवेकी विचार करणारी एकमात्र प्रजाती आपली, पण आपण अजूनही जनावरांच्याच उपजत वर्तन सूत्रात गुंतलो आहोत. आवाजाची पट्टी थोडीशी बदलते आणि चार नेहमीचेच शब्द कानावर येतात; पण तत्क्षणी पलीकडून बोलणाऱ्याची ‘कोणीतरी दगाबाज प्रतिस्पर्धी’ अशी प्रतिमा पुसून, ‘निरागस मुलाची’ प्रतिमा उभी रहाते. तत्क्षणी आर्ट खुनशी कोपातून ममताळू बापात बदलतो. एरवी  उथळ, वरवरच्या वाटतील अशा संकेतांनुसार आपल्या मनात टोकाच्या प्रतिमा उभ्या रहातात; पोर वा थोर, कुरूप वा सुस्वरूप, अशक्त वा सशक्त. आर्टच्या कथेत जीवशास्त्रज्ञांना दिसते, ती संकेतांची अफाट क्षमता. संकेत; झटकन काही सुचवून जाईल असा इशारा. एरवी हा इशारा तसा शुल्लक, पण आता त्याला जीवशास्त्रीय बाजाचे, गंभीर आणि गुंतागुंतीचे, अनेक अर्थ  चिकटलेत; जसे की वय, लिंग, कामभावना, कामेच्छा, आक्रमकता किंवा नातेसंबंध. प्राण्यांच्या संवादात संकेत अत्यावश्यक. संवाद ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचे वर्तन स्वतःला किंवा परस्परांना अनुकूल व्हावे असा प्रयत्न करतो. किरकोळ शक्ती लागणाऱ्या एका किरकोळ इशाऱ्यासरशी  (घशातून काढलेला गुरगुरण्याचा आवाज) संपूर्ण शक्तिपात घडेल असे वर्तन घडून येऊ शकते (जीवावर उदार होऊन शत्रूवर केलेला जीवघेणा हल्ला).


मानवात आणि अन्य प्राण्यांत संकेत रुजले ते नैसर्गिक निवडीतून. कल्पना करा एकाच प्रजातीचे दोन प्राणी, आकारात समतुल्य आणि बळात तुल्यबळ. एकच काहीतरी गोष्ट दोघांनाही हवी आहे. त्यासाठी दोघे समोरासमोर उभे ठाकले आहेत. आपल्या शक्तीचा अंदाज दुसऱ्याला यावा आणि झुंजीचा निकाल काय लागणार हे आधीच स्पष्ट व्हावे, असे इशारे देणे दोघांनाही फायद्याचे ठरणार आहे. झुंज टाळल्याने जो कमताकद आहे त्याची संभाव्य इजा वा मृत्यूतून सुटका होईल आणि जो ताकदवान आहे त्याची शक्ती वाचेल, जोखीम टळेल.
प्राण्यांत हे संकेत रूजले तरी कसे? उत्क्रांत कसे झाले? त्यांचा नेमका अर्थ काय? संकेत, म्हणजे अगदी वाट्टेल ते इशारे, का ह्यांना काही सखोल अर्थ आहे? ह्यांची  विश्वासार्हता वाढावी, ह्यात फसवणूक नसावी, हे कसे साधले जाते? मानवी शरीर-संकेत, विशेषतः काम-संकेतांचा विचार आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी प्राणीसृष्टीतील संकेतांचा लेखाजोखा मांडू या; कारण  प्राण्यांत जे आणि जसे प्रयोग शक्य आहेत, तसे मानवात नाहीत. प्राणीशास्त्रज्ञांना ह्या संकेतांचे आकलन झाले, ते प्राण्यांवर काही शस्त्रक्रीया करून, शारीरिक बदल घडवून, नियंत्रित चाचण्या केल्यामुळे. अर्थात काही मनुष्ये प्लॅस्टिक सर्जरीने स्वतःत शारीरिक बदल करवून घेतातही, पण ह्याला काही सुनियोजित, सुनियंत्रित चाचणी म्हणता येणार नाही.
.....


प्राणी अनेक माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधतात. आपल्याला अगदी परिचित आहेत ते आवाज. जोडीदाराला घातलेली सुस्वर साद किंवा आपआपले क्षेत्र जाहीर करण्यासाठीचा कर्कश्य कलकलाट किंवा एकमेकाला भक्षकाच्या आगमनाची धोक्याची सूचना. असेच प्राण्यांचे हावभाव, हेही कितीतरी परिचयाचे. श्वानप्रेमींना माहितीच आहे की कान उभारलेला,  शेपूट फेंदारलेला आणि पाठीवरचे केस ताठ उभे असलेला कुत्रा, हल्ला करण्याच्या बेतात असतो आणि कान, शेपूट आणि पाठीवरचे केस पाडून असलेला कुत्रा मवाळ आणि आपले ऐकण्यातला असतो. आपले क्षेत्र आखण्यासाठी अनेक सस्तन प्राणी आपल्या सीमेवर वास सोडतात. (कुत्री खांबापाशी पाय वर करून लघवीचा दर्प तिथे सोडत असतात) आणि मुंग्या अन्नापाशी जाणारा मार्ग वासाने एकमेकीला  आखून देतात. आपल्याला अपरिचित आणि न जाणवणारे असेही काही इशारे आहेत, उदाः काही मासे विद्युत तरंग सोडतात.  
हे सारे इशारे इच्छेनुसार  तात्काळ चालू बंद होणारे, पण शरीररचनेत कायम अथवा बराच काळ  अंतर्भूत झालेले अनेक संकेत, अनेक प्रकारचे संदेश देत असतात. पक्ष्यांच्या पिसाऱ्यात लिंगनिहाय फरक असतो. गोरिला आणि ओरांग-उटांगची डोकी, नर मादीत वेगवेगळ्या आकाराची असतात. चौथ्या प्रकरणात चर्चिल्याप्रमाणे, अनेक प्रायमेटच्या माद्या बीज निर्मितीची जाहिरात म्हणून, लालभडक बूड मिरवतात.  वयात येताच नर गोरिलाच्या पाठीवर सोनेरी केसांची नक्षी उमटते. पक्ष्यांची पिल्ले वयात येण्यापूर्वी काही वेगळीच पिसे बाळगून असतात. हेरिंग-गल पक्ष्यांत तर वयाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षी वेगवेगळा आणि चौथ्या वर्षाच्या पुढे आणखी वेगळा पिसारा फुटतो.


प्राण्यांच्या संकेतांचा अभ्यास करायचा तर प्राण्यांत काही बदल करून किंवा वेगवेगळे संकेत देणारी बाहुली बनवून करता येतो. उदाहरणार्थ नरांना वाटणारे मादीचे शारीर आकर्षण, हे मादीच्या विशिष्ठ अवयवांवर केंद्रित असते. माणसात तर असतेच असते, नाही का? जणू ह्याच मुद्दयाचे प्रात्यक्षिक, अशा एका प्रयोगात, लांब शेपटीवाल्या विडोबर्ड नरांच्या शेपट्या आलटूनपालटून लांब आणि लांड्या करण्यात आल्या. ह्या आफ्रिकन पक्ष्यांत म्हणे, नराच्या सुमारे सोळा इंच लांबचलांब शेपटीवर, मादी फिदा होत असते. ज्या नरांची शेपूट कापून सहा इंच करण्यात आली, त्यांना कोणी मादी फुंकून विचारीना आणि पिसे चिकटवून ज्यांची शेपूट सव्वीस इंचापर्यंत वाढवली गेली, त्यांना कोणी मादी मोकळे सोडेना. हेरिंग-गलची नवजात पिल्ले आईबाबांच्या चोचीखालच्या तांबड्या ठिपक्यावर चोच मारतात आणि ह्या इशाऱ्यासरशी ते गल, आपल्या पोटातला घास ओठावर आणून पिल्लांना भरवतात. लाल ठिपक्यावर चोच मारली की पालक घास भरवतात हे ठीकच; पण चोचीच्या आकाराच्या कोणत्याही वस्तूवर लाल ठिपका दिसला रे दिसला, की पिलांना आपोआपच चोच मारायची हुक्की येते, हेही खरे. लाल ठिपकेवाल्या कृत्रिम चोचीला, बिन ठिपकेवाल्या कृत्रिम चोचीपेक्षा चौपट वेळा टिपले जाते. इतर रंगांना लालपेक्षा अर्ध्याच वेळा टिपले जाते. शेवटचे उदाहरण युरोपिअन ग्रेट टिट पक्ष्याचे बघू या. ह्यांच्यात छातीवरचा काळा पट्टा, टीटचे सामाजिक स्थान दर्शवतो. रिमोट कंट्रोलचे टीटचे मॉडेल वापरून अनेक अभ्यास केले गेले. दाणे टिपायला येणारे खरे टिट पक्षी, मॉडेलवरचा पट्टा स्वतःच्या पट्ट्यापेक्षा रुंद असेल तर दबकत, सरळ मागे फिरत.
शेपटीची लांबी, चोचीवरचा रंगाचा ठिपका किंवा काळ्या पट्ट्याची रुंदी अशा काहीच्या काही गोष्टींमुळे वर्तनात इतका टोकाचा फरक पडतो याचे आश्चर्य वाटते आपल्याला. ही अशी वागणूक उत्क्रांत तरी कशी झाली? अगदी ग्रेट टिट सारख्या ग्रेट टिटने, निव्वळ दुसऱ्या पक्ष्याचा रुंद पट्टा पहातच अन्नापासून पळ का काढावा?  
…..


मुळात शेपटीची लांबी, चोचीवरच्या ठिपक्याचा रंग किंवा काळ्या पट्ट्याची रुंदी इतक्या शुल्लक गोष्टींमुळे वर्तनात इतका टोकाचा फरक पडावा ना? अशी प्राणी वैशिष्ठ्ये उत्क्रांतच कशी झाली? एखाद्या टिटसारख्या टिटनी, निव्वळ आपल्यापेक्षा रुंद पट्टेवाला दिसला म्हणून अन्नापासून माघार का घ्यावी? रुंद काळ्या पट्ट्यात असे काय आहे की त्याचा अर्थ  धमक आणि धमकी असा दोन्ही होतो?  असे वाटेल की एखादा कमअस्सल ग्रेट टिट, निव्वळ रुंद पट्ट्याच्या जनुकीय जोरावर फुकट बाजी मारून जाईल की. मग अशी फसगत सार्वत्रिक होऊन ही संकेत चिन्हे अर्थहीन का होत नाहीत?
ह्या प्रश्नांना सध्या एकचएक उत्तर नाही, संकेताप्रमाणे आणि प्रजातीप्रमाणे उत्तरे वेगवेगळी आहेत आणि त्यावर जीवशास्त्रात बरीच भवती न भवती चालू आहे. कामूक शारीरिक संकेतांच्या संदर्भात आपण ह्या प्रश्नांचा विचार करू या. असे संकेत म्हणजे, संभाव्य जोडीदाराला खुणावण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी किंवा संभाव्य स्पर्धकावर छाप पाडण्यासाठी उपयुक्त असे शरीराचे भाग.  हे नर किंवा मादी, कोणा एकाच्याच अंगात असतात. विरुद्ध लिंगी प्राण्यात नसतात. या संकेतांचा उलगडा करू पाहणारे तीन निरनिराळे सिद्धांत आहेत, प्रारूपे (Models) आहेत.


ब्रिटीश जनुकज्ञ सर रोनाल्ड फिशर यांचे आहे ‘चक्रवाढ निवड प्रारूप’ (Runaway Selection Model. यालाच बेलगाम किंवा उत्शृंखल प्रारूप असेही म्हणता येईल). स्त्रिया आणि अन्य प्राण्यांच्या माद्यांपुढे,  जोडीदार म्हणून कोणाला निवडावे हा मोठाच प्रश्न असतो. आपल्या संततीत उत्तम जनुके हवीत तर  नरही तसाच हवा. बायकांना ठाऊक आहे, की हे कर्मकठीण आहे. नराची जनुके कशी आहेत हे जोखण्याचा कोणताही थेट मार्ग उपलब्ध नाही. समजा जगण्याच्या लढाईत इतरांपेक्षा थोडीफार बढत मिळेल, अशा कोणत्यातरी चित्तवेधक शारीर गुणावर (उदाः मोराचा पिसारा) भाळून, त्याच नराची निवड करण्याचे जनुकीय वर्तन (Genetically Programmed) मादीत उत्क्रांत झाले आहे. अशा, मादीला मादक वाटणाऱ्या नरांना, दुहेरी फायदा होईल. त्यांच्याकडे जास्त माद्या आकर्षित होतील आणि त्यांची जनुके अधिक संततीत पोहोचतील. अशा नरांवर लट्टू होणाऱ्या माद्यांचाही फायदा होईल; त्यांच्या मुलग्यांत हा मादी-प्रिय गुण उतरेल. मोठेपणी ह्या मुलांकडेही अधिक माद्या आकर्षित होतील.
अशा तऱ्हेने चक्रवाढ न्यायाने निवड घडत राहील. नरांत तो भाग जितका लक्षवेधक तितकी मादी पटवणे सुकर. त्यामुळे उत्क्रांती दरम्यान तो भाग आकाराने वाढत जाईल. दुसरीकडे ह्या भागाने आकर्षित होणाऱ्या माद्यांची संख्याही वाढत जाईल.  पिढ्यांपिढ्या हा भाग आकारानी वाढेल किंवा अधिकाधिक नजरेत भरेल. हे इतक्या टोकाला जाईल की शेवटी त्या भागाचे, जगण्याला पूरक असे मूळ रूप पार लोप पावेल. उदाहरणार्थ किंचित लांब शेपूट असेल तर उड्डाण सोपे होईल. पण मोराच्या लांबच लांब पिसाऱ्याचा उडण्याला उपयोग शून्य. अशी चक्रवाढ उत्क्रांती, (बेलगाम किंवा उत्शृंखल वाढ) शेवटी जेंव्हा ह्या पिसाऱ्याचा, जगायला अडथळा व्हायला लागेल तेंव्हाच थांबेल.



इझ्रायली जीवशास्त्रज्ञ अमोत्झ झाहाव्ही आपल्या सिद्धांतात नेमका हाच मुद्दा पकडतात. बरेचदा हे काम-शकुन सांगणारे भाग इतके अस्ताव्यस्त आणि डोळ्यावर येणारे असतात की जगण्याला तारक ठरण्याऐवजी ते मारक ठरतात. मोराचा पिसारा किंवा विडोबर्डची शेपूट ह्यांचा जगायला तर थेट उपयोग नाहीच उलट अडथळाच जास्त. जड, जाड आणि लांबच लांब पिसाऱ्यामुळे, दाट झाडोऱ्यातून वाट काढणे मुश्कील, उडणे मुश्कील, उड्डाण केलेच तर हवेत तरंगणे मुश्कील आणि भक्षकांपासून सुटणेही मुश्कील.  बॉवर पक्ष्याचा सोनेरी प्रणय-तुरा इतका मोठा, भडक आणि लक्षवेधी असतो की भक्षकांचे लक्ष वेधले जातेच. शिवाय असा तुरा किंवा पिसारा निर्माण करणे महागात पडते, प्राण्याची बरीच उर्जा नाहक खर्च होते. झाहाव्हींच्या मते हे अनावश्यक लोढणे घेऊन बडेजाव मिरवणे ही एका तऱ्हेने, नराने केलेली, जाहिरात आहे. ‘ह्या लोढण्यासकट मी जगतो आहे, ह्या सकट मी तगतो आहे, म्हणजेच माझी जनुके बाकी बाबतीत किती उत्तम असतील ते बघा’, असे सांगणे आहे. नराचा हा नखरा बघून मादीला खात्री वाटते, की निव्वळ पिसारे मोठे आणि लक्षण खोटे अशी बनवेगिरी इथे नाही. निव्वळ मोठ्ठ्या पिसाऱ्याच्या जनुकीय वारसा आहे पण प्रत्यक्षात नर  कमअस्सल आहे असा प्रकार नाही. जर मुळात तो अस्सल नसता तर हा पिसारा बनवून, तो बाळगत जगणे त्याला अशक्यच असते.
कित्येकदा माणसाची वागणूकही झाहाव्हींच्या ‘लोढणे सिद्धांताशी’ मिळतीजुळती असते, हे तुमच्या लक्षात आले असेल. ‘मी लय पैशेवाला हाय, माझ्या संगट झोप म्हंज्ये मग लग्नाचं बगू’, अशी ऐट कोणीही मिरवू शकतो. ही बतावणीही असू शकते. पण याबरोबर हिऱ्याच्या अंगठ्या घालणारा, सोन्याच्या साखळ्या मिरवणारा आणि महागड्या गाड्या उडवणारा असेल तर तो खरा. काही कॉलेजकुमार परीक्षेच्या आदल्या रात्री पार्टीत रमतात. त्यांना दाखवायचे असते की, ‘कोणीही पुस्तकी किडा अभ्यास करून मार्क मिळवेल पण पार्टीचे लोढणे गळ्यात घेऊन, अभ्यास न करता, नंबर काढू शकतो, तो मीच.’


काम संकेतांचा उरलेला सिद्धांत मांडला आहे, अॅस्ट्रीक कोड्रिक-ब्राऊन आणि जेम्स ब्राऊन या अमेरिकन शास्त्रज्ञांनी. ह्याचे नाव आहे, ‘प्रामाणिक जाहिरात सिद्धांत’. झाहाव्हीच्या मांडणीप्रमाणे आणि फिशरच्या मांडणी विरुद्ध अशी ब्राऊन द्वयीची मांडणी आहे. प्राण्यांचे महागडे, बडेजावी दिखावे म्हणजे उत्तमाची प्रामणिक जाहिरात असते कारण कोणा ऐऱ्यागैऱ्याला हे परवडणारच नाही, यावर ब्राऊन मंडळींचा जोर आहे. झाहाव्ही हा  बडेजाव जगण्याला अडचणीचा मानतो तर ब्राऊन याला थेट जगण्याला किंवा जगण्यास सहाय्यभूत गुणांना पूरक समजतो. अशी जाहिरात म्हणजे तर दुहेरी खात्री. हा नेत्रदीपक थाटमाट अस्सलांनाच परवडतो आणि हा तुम्हाला अधिक अस्सलही ठरवतो.
नर काळवीटांची शिंगे म्हणजे कॅल्शियम, फॉस्फेट आणि उर्जेची केवढी तरी गुंतवणूक. पण तरीही ही दर मोसमात वाढतात आणि नंतर गळून पडतात. तरुण, धष्टपुष्ट, निरोगी, कळपात वर्चस्व असलेल्या नरोत्तमांनाच ही चैन परवडू शकते. म्हणजेच डौलदार शिंगे ही माद्यांच्या दृष्टीने नर उत्तम असल्याची ग्वाहीच. दरवर्षी, जुनी टाकून, नवी कोरी पोर्श गाडी घेणारा प्रियकर जसा निश्चितच गर्भश्रीमंत,  तसेच हे. पण पोर्श सांगत नाहीत असा एक शकुन ही शिंगे सांगत असतात. पोर्शमुळे भविष्यात समृद्धी वाढेलच असे नाही. पण शिंगे म्हणजे पुढे प्रतिस्पर्धी नरांना हरवून,  भक्षकांना पिटाळून, उत्तम कुरणे चरण्याची खात्री.
......


प्राण्यांच्या प्रणय संकेतांची उत्क्रांती समजावणाऱ्या ह्या तीन सिद्धांतांपैकी मानवी कामाचाराला कोणता लागू होतो का, ते आता तपासून पाहू. पण मुळात मानवी शरीरात असे काही  कामसंकेत आहेत का? परस्परांचे वय, प्रतिष्ठा, पत, जनुकीय प्रतवारी आणि संभाव्य सहचराचे मूल्य जोखण्यासाठी; इकडे लाल ठिपका, तिकडे रुंद पट्टा असले सांकेतिक जनुकीय बिल्ले; हे निर्बुद्ध प्राण्यांनाच गरजेचे आहेत असेच तुम्हाला वाटेल. कोणत्याही प्राण्यापेक्षा आपली तर्कबुद्धी तल्लख, मेंदू मोठ्ठा. त्यातून वाणीच्या अनन्य देणगीमुळे आपण कितीतरी माहिती, कितीतरी नेमकेपणाने एकमेकांपर्यंत पोहोचवू शकतो. निव्वळ एकमेकांशी बोलून आपण एकमेकांचे वय आणि पत जाणू शकतो; मग लाल ठिपक्यांची आणि काळ्या पट्ट्यांची गरजच काय? आपले वय २७ असून, आपण  देशातल्या तिसऱ्या नंबरच्या बँकेच्या उपाध्यक्षांचे द्वितीय सचिव आहोत आणि  वर्षाला  सव्वालाख डॉलर पगार आहे, अशी माहिती कोणता प्राणी कोणा अन्य प्राण्याला देतो बरे? आपले प्रियकर आणि सहचर निवडण्यापूर्वी, प्रणयाराधनाच्या काळात परस्परांच्या अनेक परीक्षाच जणू घेतल्या जातात. यातून संभाव्य साथीदाराची पालकत्वातली गती, नात्याबाबतची नीती आणि जनुकेच तर तपासली जातात, नाही का?


उत्तर सरळ आहे! आपणही विडोबर्डच्या शेपटाइतक्या  किंवा बॉवर पक्ष्याच्या तुऱ्याइतक्याच असंबद्ध कामसंकेतांवर विसंबून असतो. चेहरा, वास, केसांचा रंग, दाढी आणि उरोज हे काही मानवी कामसंकेत आहेत. धर्म, अर्थ अन् काम जीवनासाठी, तसेच मुलांचा सहपालक म्हणून जन्मभराचा जोडीदार निवडताना, हे संकेत आपल्याला; लांब शेपटीइतके हास्यास्पद का वाटत नाहीत? आपल्या संकेत-भाषेत फसवणुकीला वावच नाही असे जर आपल्याला वाटत असेल,  तर मग इतकी मंडळी चेहऱ्याला मेकअप, केसांना कलप किंवा स्तनवृद्धी शस्त्रक्रिया का बरे करून घेतात? आपली निवड म्हणे चतुराईची आणि काळजीपूर्वक केलेली असते; मग एखाद्या अनोळखी घोळक्यात शिरताच आपल्याला कोण ‘आकर्षक’ वाटते आणि कोण नाही हे तात्काळ मनात येते; हा अनुभव सार्वत्रिक का? हा असतो सेक्स अपीलचा परिणाम. सेक्स अपील म्हणजे जाणता-अजाणता, अशा सर्व काम संकेतांची गोळाबेरीज. अमेरिकेत आज घटस्फोटाचे प्रमाण ५०% आहे; म्हणजे जोडीदार निवडीचे आपले प्रयत्न निम्म्या वेळा फसतात अशी कबुलीच नाही का? अल्बॅट्रॉस आणि इतर अनेक जोडीने रहाणाऱ्या प्राण्यांत ‘घटस्फोटाचे’ प्रमाण कितीतरी कमी आहे. सुबुद्ध मानवाच्या आणि निर्बुद्ध प्राण्यांच्या बुद्धीचा हा पंचनामा!
खरेतर इतर प्राण्यांप्रमाणे आपणातही वय, लिंग, प्रजनन-पत  आणि आपली प्रत दाखवणारे अनेक काम संकेत उत्क्रांत झाले आहेत. ह्या आणि अशा संकेत-गुणांना ठरीव प्रतिसादही (Programmed Reponses) उत्क्रांत झाले आहेत. काखेत आणि जांघेत केस येणे हा वयात आल्याचा संकेत आहे. पुरुषात दाढी आणि शरीरावर अन्यत्र केस उगवतात, आवाज फुटतो हे इतर गुण दिसतात. ह्या बदलांना आपला प्रतिसाद, हा गलच्या पिल्लाने लाल ठीपक्याला दिलेल्या प्रतिसादाइतकाच, अगदी ठरीव आणि प्रसंगी नाट्यपूर्ण असतो हे ह्या


प्रकरणाच्या सुरवातीच्या प्रसंगात आपण पाहीलेच.  मानवाच्या माद्यांत वयात येताच स्तनाची वाढ होते. जनन शक्य असल्याची ही एक खूणच. पुढे वय वाढले, की उतरत्या प्रजनन शक्तीची आणि वाढत्या शहाणपणाची जाणीव, ही पांढऱ्या केसातून होत असते. सुडौल, प्रमाणबद्ध आणि पिळदार शरीर ही पुरुषाच्या तब्बेतीची खूण तर आवश्यक तिथे आवश्यक गोलाई ही स्त्रीच्या रसरशीतपणाची. वयात आल्याच्या आणि तब्बेतीत असल्याच्या याच खाणाखुणांनी आपण सहचर आणि प्रियकर निवडतो. वेगवेगळ्या समाजात स्त्री-पुरुषांनी ही  संकेत चिन्हे मिरवण्यात आणि स्त्री-पुरुषांच्या आवडीनिवडीत, थोडे कमीअधिक असते एवढेच. उदाहरणार्थ पुरुषांच्या दाढीत आणि  केसाळपणात जगभर फरक आहेत. महिलांच्या स्तनाच्या आकारात, गोलाईत, आणि स्तनाग्राच्या आकारात अन् रंगात भौगोलिक फरक आहेत. हे शरीर-अलंकार म्हणजे आपले लाल ठिपके आणि काळे पट्टेच आहेत. शिवाय स्त्रियांचे स्तन, हे जसे कामचिन्ह आणि दुग्धग्रंथी अशी दुहेरी कामगिरी बजावतात, तसे पुरुषात शिस्नाचे असते काय? आपण हे नंतर पहाणार आहोत.
.....


अशाच खाणाखुणांचा अभ्यास प्राण्यांत करायचा तर प्रयोग योजता येतात. विडोबर्डची शेपूट छाटुन किंवा गलच्या ठिपक्याचा रंग बदलून अभ्यास करता येतो. कायदेशीर  आणि नैतिक बंधनांमुळे माणसात असे प्रयोग शक्य नाहीत. शिवाय या बाबतीतले आपले घट्ट पूर्वग्रह, तीव्र भावना, संस्कृतिक वैविध्य, संस्कारानुरूप बदलणाऱ्या  वैयक्तिक आवडीनिवडी, साजशृंगार, हे सारे मानवी काम संकेतांच्या, वस्तुनिष्ठ मूल्यमापनाच्या आड येते. पण ह्या वैविध्यामुळे, साजशृंगारामुळे, अगदी काटेकोर नसला तरी निश्चितच अभ्यासण्याजोगा असा  प्रयोग आपोआपच घडत असतो. माणसात, पुरुषांचे पिळदार स्नायू, स्त्रीच्या शरीराची गोलाई आणि दोघांच्या चेहऱ्याचे सौंदर्य असे तीन तरी काम संकेत ब्राऊन द्वयीच्या, ‘प्रांजळ जाहिरात’ सिद्धांताला पुष्टी देतात असे मला वाटते.
पुरुषांच्या पिळदार स्नायुंमुळे स्त्रियावर छाप पडतेच पण इतर पुरुषांवरही पडते. व्यावसायिक शरीरसौष्ठवपटूचे, ‘दणकट दंडस्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग, कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग’, असे  शरीर काहींना किळसवाणे वाटते. पण एकुणात बायकांना काटकुळ्या पुरुषांपेक्षा घोटीव, सुघटित पुरुष अधिक आकर्षक वाटतात. पुरुषही इतर पुरुषांची शरीरप्रकृती संकेत म्हणून ‘वाचत’ असतात. हातघाईची वेळ आली तर माघार घ्यायची का लढत द्यायची हे ठरवत असतात. मी आणि माझी पत्नी ज्या जिमला जातो तिथे अँडी


म्हणून एक बलदंड आणि धिप्पाड प्रशिक्षक आहे. तो व्यायाम करायला लागला की आपोआप सर्व स्त्री-पुरुषांच्या नजरा त्याच्याकडे वळतात. व्यायाम कसा करायचा हे दाखवताना तो स्वतः त्या मशीनवर व्यायाम करून दाखवतो आणि अंगावर हात ठेवायला लावून नेमका कुठला स्नायू हलतोय हे दाखवतो. अर्थात शिकवण्याची ही रीत योग्यच आहे यात शंकाच नाही, पण या कृतीने समोरचा भारावून  जाताच  अँडीला मनातल्या मनात अगदी गुदगुल्या होतात.
जिथे आजही मशीनऐवजी माणूसच सारी कामे करतो अशा समाजात, पिळदार शरीर हे निश्चितच तो पुरुष, पुरुषोत्तम असल्याचा संकेत आहे. काळवीटाच्या शिंगांसारखेच हे. दंडशक्तीचा उपयोग अन्न आणायला होतो, घर बांधायला होतो, शत्रू पळवायला होतो. शिंगे तर फक्त झुंजीत कामी येतात, माणसाचे स्नायू ग्रामीण समाजात तर इतर अनेक भूमिका बजावतात. भरदार शरीर कमावण्यासाठी आणि राखण्यासाठी, लागणारी प्रथिने मिळवायची तर इतरही अनेक सद्गुण असावे लागतात. कलप लावून वगैरे तारुण्याची सगळी सोंगे आणता येतात, पण  दंडा-मांड्यातल्या बेटकुळ्यांचे सोंग आणता येत नाही. अर्थातच अन्य स्त्री-पुरुषांवर छाप पडावी एवढ्याचसाठी पुरुषांत स्नायू उत्क्रांत झालेले नाहीत. बॉवरबर्डचा तुरा हा निव्वळ तिच्यावर इम्प मारण्यासाठी. स्नायूंचे तसे नाही. स्नायू पिळदार बनले ते कष्ट करता यावेत म्हणून. नंतर स्त्रिया त्याकडे एक विश्वासार्ह संकेत म्हणून पहायला शिकल्या किंवा त्या तशा उत्क्रांत झाल्या.


सुंदर चेहरा हाही असाच एक विश्वासार्ह संकेत. शरीरसंपदेप्रमाणे ह्या मागचे कारण मात्र तितकेसे सरळ नाही. जरा विचार केलात, तर आपला लैंगिक आप्त-भाव आणि सामाजिक मैत्र-भाव आपल्या दिसण्यावर किती प्रचंड प्रमाणात अवलंबून आहे, हे पाहून तुम्हाला अचंबा वाटेल. कुणी म्हणेल सौंदर्याचा आणि उत्तम जनुकांचा, उत्तम पालक असण्याचा किंवा उत्तम शिकारी असण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. चेहरा हा आरोग्याचा आणि वयाचा आरसा आहे. जुन्या जमान्यात, विद्रूप, वेडावाकडा चेहरा म्हणजे, कसल्या ना  कसल्या जंतूंची किंवा जंतांची बाधा असल्याचा, स्वतःला सांभाळण्याचीही कुवत नसल्याचा, सार्वत्रिक बोभाटाच. विसाव्या शतकात प्लॅस्टिक सर्जरीचा शोध लागेपर्यंत, देखणा चेहरा हा खरोखरच उत्तम आरोग्याचा प्रांजळ संकेत होता. ‘देखणे जे चेहरे ते प्रांजळाचे आरसे’ अशीच परिस्थिती होती.
खऱ्याखुऱ्या संकेतांपैकी आता राहिला स्त्री शरीराचा टंच उभार, चरबीमुळे आलेली शरीराची गोलाई. स्तनपान आणि बालसंगोपन हा अगदी शक्तिपात घडवणारा प्रकार असतो आणि आई कुपोषित असेल तर दुध आटते. पूर्वी, दुध पावडरी आणि पाळीव दुभती जनावरे नव्हती तेंव्हा, आईचे दुध आटले तर ते पोर मेलेच म्हणायचे. म्हणूनच अंगाने भरलेली बाई, म्हणजे पुरुषाच्या दृष्टीने पोरे पोसण्याची रास्त खात्री. म्हणजेच योग्य तेवढ्याच चरबीची बाई पुरुषांनी निवडली पाहिजे. खूप बारीक असेल तर दुध आटणार आणि खूप जाड असेल तर हलायला त्रास, अन्न गोळा करायला त्रास आणि डायबेटीस वगैरेनी अपमृत्यू.


शरीरात सगळीकडे समप्रमाणात पसरलेली असेल तर चरबी किती आहे हे कळणे अवघड, म्हणूनच सहज नजरेस येतील अशा काही ठिकाणी चरबीचे साठे दिसतात. जमातीगणिक  चरबीचे प्रमाण आणि जागा बदलते पण सर्वच मानव जमातीत उरोज आणि नितंबात चरबीचा साठा असतोच असतो. दक्षिण आफ्रिकेतल्या सॅन जमातीत (बुशमेन आणि होटनटोट) आणि अंदमान बेटांवरील स्त्रियांच्या कुल्ल्यांवर जरा जास्तच चरबी असते. (ह्याला म्हणतात Steatopygia). जगभरच्या पुरुषांना स्त्रियांच्या उरोजात, नितंबात (Hips) आणि कुल्ल्यात काम-संकेत दिसत असतो. यातूनच आधुनिक समाजात, कृतक, फसवे संकेत देणाऱ्या स्तनवृद्धी शत्रक्रियेचे पेव फुटले आहे. अर्थात यावर असा आक्षेप घेतला जाऊ शकतो, की काही पुरुष, बाई सुपोषित आहे, खात्यापित्या घरची आहे, असे दर्शवणाऱ्या चरबीला भुलत नाहीत. शिवाय सौंदर्याचे फॅशनी आदर्शही दरवर्षी बदलत असतात, अति-नाजूक ते अति-साजूक असे हेलकावे खात असतात. ते काहीही असले तरी सर्वसाधारण पुरुष कशात रस घेतात हे स्पष्ट आहे.
कल्पना करा की आपणच निर्मिक आहोत, किंवा डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे नैसर्गिक निवड आपणच करत आहोत आणि एक सहज दिसणारा काम-संकेत म्हणून स्त्री-शरीरावर चरबी कुठे असावी हे ठरवण्याची आपल्याला मुभा आहे. हात-पाय सुरवातीलाच बाद, कारण जड हाताने काम अवघड आणि जड पायाने चाल अवघड. म्हणजे हालचालींना अडसर होऊ नये म्हणून धडावरच कुठेतरी चरबी साठवावी लागणार. वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणाप्रमाणे तीन जागी (स्तन, नितंब, कुल्ले), कमीअधिक प्रमाणात चरबीचे संकेत-साठे दिसतात. प्रश्न असा पडतो, की ही तीन ठिकाणे, उत्क्रांती दरम्यान सर्वस्वी अपघाताने निवडली गेली


आहेत का? अन्य ठिकाणी, म्हणजे समजा पोटावर किंवा पाठीवर चरबी असलेली लोकं का बरे नाहीत? स्तनांवर किंवा कुल्ल्यांवर चरबी असते, तसे पोटावर चरबीचे दोन गोळे असते तरी हालचालीत काही विशेष फरक पडला नसता. जगभरात स्त्रियांच्या स्तनातच चरबीचे साठे उत्क्रांत झाले आहेत. मग स्तनातील चरबीवरून  बाईच्या स्तनपान क्षमतेबाबत पुरुषाला  थेट संकेत मिळत असावा का? काही शास्त्रज्ञांनी असे सुचवले आहे की गच्च, उभार स्तन हा उत्तम पोषणाचा सत्यवचनी संकेत आहेच  पण दुग्धनिर्मितीक्षमतेचा असत्य संकेतही आहे. असत्य अशासाठी की दूध निर्माण होते ते दुग्धग्रंथीत, चरबीत नाही. ह्याच पद्धतीने असे सुचवण्यात आले आहे की कुल्ल्यांवरील चरबी म्हणजे आरोग्याचा सत्य संकेत आणि ऐसपैस जननमार्ग असल्याचा असत्य संकेत. (असत्य, कारण खरोखरचा  रुंद जननमार्ग म्हणजे निर्धोक, इजारहीत प्रसूती पण मेदयुक्त कुल्ले म्हणजे रुंद जननमार्ग नाही)
.....
स्त्री शरीराच्या निसर्गदत्त काम-अलंकरणाला औत्क्रांतिक महत्व असू शकते, ह्या माझ्या  गृहितकाला इथे अनेक आक्षेप मला अपेक्षित आहेत. कोणी कसाही अर्थ लावला तरी स्त्री आपल्या शरीरावर काम-संकेत धारण करून असते आणि पुरुष त्यात विशेष रस घेतात, हे तर निर्विवाद तथ्य आहे. ह्या बाबतीत माणसाच्या माद्याही


अन्य प्रायमेट माद्यांसारख्याच आहेत. माणसे अनेक नरमाद्यांच्या एकत्रित टोळ्यांत रहातात. माणसासारखीच चिंपांझी, बोनोबो आणि मकाक्वे माकडे टोळीने रहातात. त्यांच्याही माद्या (आणि नर) कामालंकृत असतात. या उलट, गिब्बन माद्या आणि जोडीजोडीनेच नांदणाऱ्या अन्य प्रायमेट माद्यांना, फारसे कामालंकरण नसते किंवा अजिबातच नसते. ह्याचा अर्थ असा की नरासाठी जर माद्यांना आपापसात झगडावे लागत असेल, उदाः टोळीत सदैव नर-माद्या समोरासमोर येणारच, तर आणि फक्त तरच माद्यांत कामालंकरण उत्क्रांत होते. इथे अधिकाधिक आकर्षक बनण्याची, त्यांच्यात सततची औत्क्रांतिक स्पर्धा असते. सतत अशी स्पर्धा करावी लागत नाही, अशा माद्यांत  हे महागडे कामालंकरण अनावश्यक ठरते.
मनुष्यासह बहुतेक प्राणी प्रजातीत नराच्या कामालंकरणाचे औत्क्रांतिक महत्व निर्विवाद आहे, कारण नर हे माद्यांसाठी झगडत असतातच. पण स्त्रियांत पुरुषांसाठी स्पर्धा असते आणि त्यास्तव त्यांच्यात कामालंकरण उत्क्रांत झाले आहे ह्या मांडणीला तज्ञांनी तीन आक्षेप घेतले आहेत. एक : पूर्वीच्या काळात ९५% स्त्रियांचे विवाह झालेले असत. म्हणजेच मागेल तिला वर मिळतो आहे. स्पर्धेचा प्रश्नच नाही. एक महिला शास्त्रज्ञ सांगत होती, ‘सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको’, त्यातला प्रकार. प्रत्येक कुरूप बाईला कोणीतरी कुरूप पुरुष भेटतोच.


पण हे म्हणणे अर्धसत्य आहे. सुंदर, आकर्षक दिसण्यासाठी नट्टापट्टा आणि सौंदर्यवृद्धी शस्त्रक्रीयेत स्त्रिया किती मनापासून रमतात ते बघा. पुरुषांच्याही जनुकीय गुणसंपदेत, धनसंपदेत आणि पालक कौशल्यात भरपूर  फरक असतो. जरी प्रत्येक बाईला कोणी ना कोणी नवरा मिळतो, तरी चांगला नवरा थोड्याच बायकांना प्राप्त होतो. ह्या थोड्या गुणसंपन्न पुरुषांसाठी स्त्रियांत जोरदार चढाओढ असतेच. काही पुरुष शास्त्रज्ञांना माहीत नसले, तरी प्रत्येक बाईला हे गुज ठाऊक आहे.
दुसरा आक्षेप असा की पूर्वी पुरुषांनाही, कामालंकरण वा अन्य गुण पारखून, बायको निवडण्याची संधी नव्हती. भावकीतले मोठेच लग्न ठरवत असत आणि बरेचदा निवड ही राजकीय लागेबांधे घट्ट करण्याच्या दृष्टीने होत असे. मी काम करतो त्या न्यू गिनीत बाईची किंमत हे तिचे दिसणे, तिचे आरोग्य आणि मातृत्वाच्या तयारीनुसार ठरते. मुलगी कामाकर्षक आहे वा नाही याबाबत मुलाच्या मताला किंमत नसली, तरी जी ज्येष्ठ मंडळी मुलगी पसंत करतात ती स्वतःची मते लक्षात घेतातच. शिवाय ‘बाहेर’ संबंध ठेवताना, त्या स्त्रीचे सौंदर्य लक्षात घेतले जातेच. जिथे पुरुषांना पत्नी निवडण्याचे स्वातंत्र्य नाही अशा समाजात, अनौरस संतती कितीतरी अधिक प्रमाणात दिसते. घटस्फोट अथवा पत्नीच्या मृत्यूनंतर पुनर्विवाह सर्रास आढळतात. या वेळी मात्र पुरुषांना निवडीचे अधिक स्वातंत्र्य असते.


उरलेला आक्षेप असा की सौंदर्याच्या मापदंडांवर संस्कृतीचा प्रभाव असतो. काळानुसार हे बदलत रहातात. शिवाय प्रत्येकाची वैयक्तिक आवडनिवड असतेच. शिडशिडीत बांधा हा आज आदर्श असेल उद्या कदचित नसेल आणि काही पुरुषांना तो कायमच आवडत असेल. पण हा आक्षेप म्हणजे निव्वळ कुरकुर आहे, मूळ निष्कर्ष अबाधित आहे : सर्व ठिकाणच्या, सर्व काळातल्या पुरुषांना सुडौल आणि सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया आवडतात.
.......
पिळदार पुरुष, सुंदर रूप आणि योग्य तिथे टंच असणारी बाई असे मानवी काम-संकेत; ‘कामसंकेत  म्हणजे विश्वासार्ह जाहिरातबाजीच’; ह्या संकल्पनेशी मिळतेजुळते आहेत. पण प्राण्यांच्या बाबतीत आपण बघितले तसे, काही संकेत काही वेगळ्याच संकल्पनांशी जुळतील. उदाहरणार्थ काखेत आणि जांघेत केस उगवणे, हा वयात आल्याचा एक खात्रीचा पण आगापिछा नसलेला संकेत उत्क्रांत झाला आहे. बलदंड शरीर, देखणा चेहरा किंवा गच्च छातीप्रमाणे या केसांत कोणताही खोलवरचा अर्थ दडलेला नाही. केस उगवण्यासाठी शरीराला विशेष तोशीश नाही की तगण्याला किंवा स्तनपानाला त्यांचा काही उपयोग नाही. अन्नाविना तुमचे शरीर तोळामासा होईल, चेहऱ्याची रया जाईल पण शष्प (झाटे) काही


गळून पडणार नाहीत. किरकोळ, कुरूप पुरुष आणि किरकोळ, कुरूप बायकाही काखेत केस बाळगून असतात. दाढी, सर्वांगावर लव आणि खर्जातला आवाज हे  पुरुष वयात आल्याचे संकेत आणि पांढरे केस हा दोघांतही वय गेल्याचा संकेत; ह्यांनाही काही सखोल अर्थ नाही. गलच्या चोचीवरच्या लाल ठिपक्यासारखे आणि प्राण्यांतल्या इतरही अनेक संकेतांसारखे हे मानवी संकेतही, स्वस्त आणि शेंडा-बुडखा नसलेले संकेत. अशा प्रकारे संकेत ठरू शकतील अशा कितीतरी खाणाखुणाची आपण कल्पना करू शकतो.
फिशरच्या  चक्रवाढ निवड प्रारुपाचे किंवा झाहाव्हीच्या  लोढणे प्रारूपाचे उदाहरण ठरेल असा काही मानवी काम संकेत आहे का? वरवर पहाता विडोबर्डच्या सोळा इंची शेपटीसारखा काही अतिरंजित काम संकेत आपण वागवतो आहोत असे आपल्याला वाटणारच नाही. पण विचारांती असा एक अवयव पुरुषांत असतो असे मला वाटते, तो म्हणजे पुरुषाचे लिंग. कोणी म्हणेल, लिंग हा काही कामसंकेत नव्हे तर लिंग म्हणजे केवळ प्रजनन संस्थेचा एक कार्यकुशल भाग आहे. पण हा काही फारसा गंभीर आक्षेप नाही. स्त्रियांचे स्तन कामसंकेत आणि प्रजनन-अवयव, अशा दोन्ही भूमिका पार पाडतच असतात की. आपल्या कपीबांधवांशी आपली तुलना केली, की मानवी  लिंगाची अनावश्यक लांबी लगेच लक्षात येईल. पण ही अनावश्यक लांबी कदाचित एक आवश्यक काम संकेत असू शकेल. गोरिला आणि ओरांग-उटांग माणसाच्या मानानी असतात भले दांडगे पण गोरिलाच्या ताठर शिस्नाची लांबी सव्वा इंच भरते, ओरांगउटांगच्या ताठर लिंगाची लांबी दीड इंच भरते तर माणसाच्या ताठर शिस्नाची लांबी भरते सहा इंच.


ही ज्यादाची वाढ  म्हणजे अनावश्यक चैन म्हणायची काय? एक विरोधी सूर असा की, लांब लिंगाची ही सोय, मानवाच्या अनेकानेक संभोग-आसनांना सोयीची म्हणून झाली असावी. पण  दीड इंचाचेच शिश्न असूनही ओरांग-उटांग  आपल्यापेक्षा कितीतरी किचकट काम-कसरती, चक्क झाडाला लटकत करत असतात. लांब शिश्नामुळे संभोगाचा कालावधी वाढतो म्हणता? ओरांग-उटांग त्याही बाबतीत आपल्या पुढे आहेत. (त्यांचा संभोग सरासरी पंधरा मिनिटे चालतो, अमेरिकी पुरुषाचा सरासरी चार मिनिटे)
नुसत्या औत्क्रांतिक तर्काने संतुष्ट होण्यापेक्षा, पुरुष स्वतःचे लिंग स्वतः कसे सजवतात हे पाहिल्यास, मोठ्ठे लिंग हा काम-संकेत असल्याचा सुगावा लागतो. न्यू गिनीतील पुरुष आपले शिश्न एका सजवलेल्या पिशवीत घालतात. आपण ह्या पिशवीला शिश्न-गवसणी म्हणूया (Phallocarp). लाल भडक किंवा पिवळी धमक अशी ही गवसणी चांगली चार फूट लांब आणि चार इंच रुंद असते. टोकाशी पानाफुलांनी व दागिन्यांनी शृंगारलेली असते. गेल्या वर्षी, स्टार पर्वतावर, केटेंगबान जमातीत, असे गवसणी घातलेले पुरुष मी पहिल्यांदा पहिले. तोवर मी त्यांच्या ह्या प्रथेबद्दल बरेच काही ऐकले होते. गवसणीचा वापर नेमका कसा करतात आणि तिचा उपयोग काय ह्याची मला उत्सुकता होती. हे पुरुष सततच ही गवसणी घालून होते. प्रत्येकाकडे अनेक प्रकारच्या गवसण्या होत्या. आकार वेगळा, सजावट वेगळी आणि लिंगोथ्थानासाठीचा कोन वेगळा. आपल्या मूड प्रमाणे आपण सकाळी


घालयला शर्ट निवडावा, तशी ही मंडळी गवसणी निवडून घालतात. हे का घालता असे विचारताच केटेंगबानचे उत्तर होते, ‘गवसणी नाही घातली तर ते किती उघडेनागडे आणि असभ्य दिसेल’. मी उडालोच. शिश्न-गवसणी वगळता अंगावर चिंधी सुद्धा नव्हती त्यांच्या. अगदी वृषणकोशही बाहेर लोंबत  होते. माझ्या पाश्चिमात्य दृष्टीला गवसणी असूनही ते नागडेच तर दिसत होते.
परिणामी शिश्न-गवसणी म्हणजे आपले ताठर लिंग केवढे असावे ही सुप्त इच्छा  दर्शवणारे एक लटके लिंगच. मानवी लिंगाच्या लांबीच्या उत्क्रांतीला योनीच्या लांबीची मर्यादा होती. शिश्न गवसणी म्हणजे ह्या प्रत्यक्षातल्या मर्यादेवर मात करता आली असती, तर काय झाले असते याची झलक. विडोबर्डच्या शेपटीपेक्षाही हा भडक संकेत. प्रत्यक्षातले लिंग ह्या गवसणीपेक्षा इवलेसेच पण आपल्या कपी पूर्वजांपेक्षा बरेच मोठे. त्यातल्या त्यात चिंपांझीचे शिश्न आपल्याशी मिळतेजुळते,  आपल्यासारखेच वाढत्या मापाने उत्क्रांत पावलेले. शिश्नाची उत्क्रांती फिशरच्या चक्रवाढ प्रारूपाप्रमाणे झाली असावी. आजच्या गोरिला किंवा ओरांग-उटांगप्रमाणेच आपल्या कपी पूर्वजांत, लिंगाची लांबी दीड इंचच असावी. इथून मानवी शिश्नाची बेलगाम वाढ झाली. लांब लिंग हे तो नर, अधिक मर्दानी, अधिक पुरुषी असल्याचा संकेत होता.  शेवटी जेंव्हा अती लांब मापाची लिंगे, योनीला आडमाप ठरू लागली तेंव्हा आपोआपच त्यांची वाढ थांबली.


मानवी शिश्न हे झाहाव्हीच्या लोढणे प्रारुपाचेही उदाहरण ठरावे. लांब लिंग म्हणजे तसा महागडा आणि मालकालाच जरा डोईजड अवयव. मोराच्या पिसाऱ्याच्या मानानी शिश्न अगदीच किरकोळ आहे हे मान्य. पण एवढेच मांस मेंदूसाठी वापरले गेले असते तर ह्या मोठ्या मेंदूवाल्या पुरुषाला कितीतरी फायदे झाले असते. म्हणजे कमावलेल्या मोठ्या शिश्नाची किंमत ही गमावलेल्या मेंदूची किंमत आहे. शेवटी उपलब्ध निर्मितीक्षम उर्जा मर्यादित आहे आणि एक अवयव घडवायचा तर दुसरीकडे काही कमतरता जाणवणार हे उघड आहे. परिणामी पुरुष भाव खात असतो, ‘मी इतका चलाख आणि वरचढ आहे की मला आता आणखी मोठ्या मेंदूची गरज नाही. आता ज्यादाची निर्मिती क्षमता मी लिंगावर उधळू शकतो. असा आतबट्याचा व्यवहार मला परवडतो.’
शिश्नाची ही मर्दानी  फुशारकी कुणासाठी असते या बाबत मात्र मतभेद आहेत. बहुतेक पुरुषांना वाटेल की बायका शिश्नावर भाळतात. पण बायका सांगतात की त्यांना पुरुषांचे बाकी काम-सौष्ठव  कामूक वाटते. लिंगाचे दर्शन तसे अनाकर्षकच असते. शिश्नाच्या आकाराने खरे हरखतात आणि दबकतात ते पुरुषच. पुरुषांच्या सार्वजनिक स्नानगृहात नुसत्या नजरेनेच एकमेकांच्या ‘मापांचा’ अंदाज लावला जातो.
काही स्त्रियांना मोठ्या आकाराचे  शिश्न बघताच कामोत्तेजना मिळत असेल. किंवा  संभोगाच्या वेळी मोठ्या लिंगामुळे योनीमार्गाचे आणि शिष्निकेचे (Clitoris) सुखद मर्दन होत असेल. पण  तरीही आपल्या युक्तिवादात पुरुष किंवा स्त्री असा एकच पर्याय आहे असे समजायचे कारण नाही. शिश्न-संकेत कोणा एकासाठीच असेल असे नाही.
प्राण्यांच्या अभ्यासात, लैंगिक अलंकरणाला दुहेरी हेतू असल्याचे अनेकवार दिसून आले


आहे. विरुद्धलिंगी जोडीदाराला भुलवणे आणि समलिंगी स्पर्धकांवर वर्चस्व गाजवणे. इतर अनेक बाबींप्रमाणे, ह्या बाबतीतही आपण पृष्ठवंशीय प्राण्यांच्या उत्क्रांतीचा कोट्यानुकोटी वर्षांचा वारसा चालवत आहोत. ही ‘समृद्ध अडगळ’ आपल्या लैंगिकतेत पक्की भिनली आहे. आपली  भाषा,  आपल्या कला आणि आपली संस्कृती ही आपली अगदी अलीकडची झेप. आपल्या भाषेनी, कलेनी आणि संस्कृतीनी ह्या समृद्ध अडगळीवर एक झिरझिरीत पडदा धरला आहे. पण ही समृद्ध अडगळ पूर्णांशाने झाकली गेलेली नाही.
शिश्नाचा आकार ही काम-निशाणी आहे का?, आणि असल्यास ह्या काम-निशाणीचा निशाणा कोण?, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. म्हणूनच या पुस्तकाची सांगता करायला हा विषय मला अगदी यथार्थ वाटतो. मानवी कामाचाराच्या उत्क्रांतीवाचक अभ्यासाचे महत्व, त्यातील मौज आणि खाचखळगे हा पुस्तकातील कळीचा मुद्दा इथे ठळकपणे येतो. शिश्नाचे कार्य हा निव्वळ शरीरशास्त्राशी संबंधित प्रश्न नाही. त्यामुळे द्रव-दाब प्रणालीच्या (Hydrolics) जैव-यांत्रिक (Bio-Mechanical) प्रयोगांनी तो सुटणाराही नाही. शिश्नाचे कार्य हा औत्क्रांतिक प्रश्नही आहे. गेल्या सात ते नऊ कोटी वर्षात मानवी लिंगाची लांबी चौपट वाढली आहे. ह्या वाढीचे काल-सुसंगत आणि कार्य-सुसंगत कारण आपल्याला हवे आहे. फक्त स्त्रियांनाच दुध का येते, बीजधारणा छुपी का, पुरुष काय कामाचे आणि ऋतूसमाप्तीबद्दल उत्तरे शोधताना आपण नैसर्गिक निवडीची किमया पहिली. लिंगाच्या लांबीतली ऐतिहासिक वाढ  आणि एवढे लांबलचक लिंग  आजही टिकणे, ह्यामागे नैसर्गिक निवडीची प्रक्रिया काय हे आपण अभ्यासले पाहिजे.


शिश्न-कार्याने पुस्तकाची अखेर करणे हे उचित आहे ह्याचे आणखी एक कारण म्हणजे शीश्नाच्या कार्यात काही रहस्यमय असेल असे आपल्याला वाटतच नाही. मूत्र-विसर्जन, वीर्य-स्खलन आणि संभोगसमयी योनी-शिश्निका मर्दन ही लिंगाची कामे तर कोणीही सांगेल. पण तौलनिक अभ्यास आपल्याला शिकवतो, की अनेक प्राण्यांत ही सारी कामे आपल्यापेक्षा लहान लिंगे बिनबोभाट करत असतात. लिंगासारखे असे भपकेबाज अवयव विविध कारणाने उत्क्रांत होतात. ही कारणे समजावून घेण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न जारी आहे. पाहिलत ना, अगदी सुपरिचित आणि  कार्य अगदी उघड असलेला काम-अवयव, उत्क्रांतीवाचक प्रश्नांनी आपल्याला कसा दुग्ध्यात पाडतो ते.