लेखांक ३
कळीकाळाशी नातं
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
होलोसीन नामे युगात, सुमारे ख्रि.पू. ९७०० वर्षांपूर्वी, पृथ्वी हलकेच तापू लागली. हे ही ग्लोबल वॉर्मिंगच पण खूपच संथ आणि नैसर्गिक. उत्तर युरेशियावरची बर्फाची चादर अलगद उत्तरेला ओढली गेली आणि होलोसीन युगाची सुरवात झाली. बर्फाच्या जागी हिरवी कुरणं आणि गवताळ प्रदेश आले. जमीनीने मोकळा श्वास घेतला. म्हणूनच शेती पसरली. मेंढपाळ आणि गुराखी फैलावले. त्यांचे पावे आणि गाणी आली. शेतीने स्थिरता, समृद्धी आणि संस्कृती आली.
भटक्यांना फार पोरं सांभाळताच येत
नाहीत. आता घरचे मांस आणि दूधदुभते आले. पोरं शेळ्यांच्या, गाईच्या दुधावर वाढवता
येऊ लागली. वरचे अन्नही सहज देता येउ लागलं. अंगावरून पोर लवकर सुटल्याने बायकाही
पुन्हा गरोदर राहू लागल्या. लोकसंख्या वाढली. आणखी एक झालं. तान्हेपणी दुधातील
लॅक्टोज पचवणारे विकर (एनझाईम) ‘लॅक्टेज’ शरीरात तयार
होत असतं. प्रौढत्वी हे बंद होऊन जातं. पण शैशव संपूनही, निज शैशवास जपणे ज्यांना जमलं;
म्हणजे ज्यांची ‘लॅक्टेज’ निर्मिती सुरूच राहिली; अशीच प्रजा ह्या बदलत्या दुधाळ आहाराला
तोंड देऊ शकली. अशांचीच संतती फोफावली. दुधातील लॅक्टोज न पचवणारे उत्क्रांतीच्या
स्पर्धेत मागे पडले. चक्क दुधखुळे ठरले ते. पण आजही आपल्या त्या दुधखुळ्या
पूर्वजांचे काही वंशज टिकून आहेत. ह्यांना, दुधाशिवाय आयुष्य कंठणे किंवा बिन
लॅक्टोजवाले कृत्रिम दूध वापरणे एवढे दोनच पर्याय आहेत. ह्यांच्या (आणि पुढे उल्लेख केलेल्या त्या
ग्लुटेन न पचवू शकणाऱ्यांच्या) आढळाचे नकाशे काढले तर? जिथे शेती आणि दूध दुभते पोहोचेल
तिथे या दूधखुळयांची प्रजा कमी कमी होत जाईल. थोडक्यात पृथ्वीच्या कोणत्या भू
भागात शेती कधी पसरली याचाच नकाशा हाती आल्यासारखं झालं की
हे. एक लक्षात घ्या, शेती पसरली म्हणजे
कुदळ फावडं घेऊन शेतकऱ्यांच्या झुंडी विविध दिशांना पसरल्या नाहीत तर ‘शेती’ ही
कल्पना, ही युक्ती, पसरत गेली.
पण आता जे शेतात पिकवता येतं तेच
प्रमुख अन्न झालं. बाकी वनस्पती मागे पडल्या. अन्नातील शिकारीचा हिस्सा घटला. प्रथिने कमी आणि कार्बोदके उदंड झाली. त्यामुळे
आणखी एक झालं. गहू वगैरे धान्यांत ‘ग्लुटेन’ असतं. हे पचवता येणारी उदरेच शेतीवर निर्वाह
करू शकतात. स्वाभाविकच अशीच प्रजा फोफावली. ग्लुटेन हजम न होणारे आजही आहेत.
त्यांना ग्लुटेन युक्त पदार्थ (बार्ली, राय, ओट्स आणि गहू) टाळण्याचा सल्ला दिला
जातो. शेतीमुळे, कंदमुळं शोधून खाताना पोटात शिरणारी जैव विविधता आता
आक्रसली. पोटाचं पचन-सामर्थ्य जरा उणावलंच. यामुळे शेतकरी दादा आणि ताई काही काही जीवनसत्वे, खनिजे आणि अमायनो अॅसिडस
यांच्या बाबतीत कदान्न खाऊ लागले. त्याचा
दुष्परिणाम दात, नजर, चयापचय, हाडे, इन्शुलीन अशा अनेकांगाने झाला.
शेती वरुणराजाच्या मर्जीवर
अवलंबून; त्यामुळे पोटं आता ऋतुचक्राला बांधील झाली. मला नक्की माहीत नाही पण,
‘आली सुगी फुगले गाल गेली सुगी मागचे हाल’ ही म्हण तेंव्हाच्याही भाषेत असणारच
असणार. कडकडीत दुष्काळ आणि बंपर पीक क्वचित घडणार. अभाव आणि उपासमार ही सार्वकालिक
अवस्था. अशा अभावग्रस्त अवस्थेला मानवी शरीर प्रतिसाद देत उत्क्रांत होत होतं. अशा
उत्क्रांतीच्या खुणा आपल्याला आजही दिसतात.
उदा: पीसीओडी
म्हणून एक आजार आहे. ह्यात बायका स्थूल असतात, बीजनिर्मिती क्वचित होते. अशा जाड
आणि अल्प-प्रसवा बायका उत्क्रांतीच्या ओघात टिकल्याच कशा? ह्याचं एक संभाव्य उत्तर
असं; पीसीओडी हा खरंतर ‘आजार’ नव्हे तर ‘शरीर प्रकृती’ म्हणायला हवं. अन्नाची
शाश्वती नव्हती, उपासमार पाचवीलाच पुजली होती तेंव्हा जाड असणं फायद्याचं होतं.
तेवढी चरबी एक दोन दुष्काळ तारून नेत असे.
अशा बायकांना कमी बीज निर्मितीमुळे कमी मुलं होतात. त्यांचे पालन पोषण नीट होत
असल्याने त्यातली जगतही असावीत. हे ही फायद्याचं ठरत असावं. म्हणून अशा शरीर
प्रकृतीच्या बायका त्याकाळी फोफावल्या. उत्क्रांतीच्या शर्यतीत टिकल्या. आज
अभावग्रस्त जीणे संपले आहे. आज आहारात गोडधोड, चरबीयुक्त अन्न तर पूर्वीपेक्षा
खूपच जास्त आहे. त्यामुळे पीसीओडी प्रकृती
आज गुण न ठरता, दोष ठरत आहे. आज पीसीओडीवाल्या बायकांना स्थौल्य आणि वंध्यत्व
भेडसावत असतं; डायबेटीस, ब्लड प्रेशर असे सह-आजार सहज जडतात.
पाहिलंत, कुठे हजारो
वर्षांपूर्वीचा दुष्काळ नावाचा कळीकाळ आणि कुठे आजचा सुकाळ, पण नीट शोधलं आणि नीट
जोडलं तर नातं सापडतं दोघात.
No comments:
Post a Comment