Saturday, 20 April 2024

लेखांक ४. साथी जुन्या आणि नव्या

लेखांक ४

साथी जुन्या आणि नव्या

 

डॉ शंतनु अभ्यंकर वाई

 

शेती पाठोपाठ वाडी आली. वस्ती आली. सांडपाणी, उकीरडे, हागणदारी आणि डबकी आली. माणसं दाटीवाटीने रहायला लागली. गुरंढोरं, कोंबड्या, कुत्री, गाय-बैल आले. परडी आली, खुराडी आली, गोठे आले, गोमाशा आणि गोचीड आली. पिसवा, उंदीर आणि कीड आली.

अधिकचे पिकू लागल्यावर ते विकू लागण्यासाठी देवाणघेवाण, व्यापार उदीम, बाजार हाट आले. माणसं लांब लांब प्रवास करू लागली. मोठी मोठी शहरे वसली.  अनोळखी प्रदेश आणि प्रजेच्या संपर्कात येऊ लागली. जंत आणि जंतूंनाही नवे  प्रदेश आणि प्रजा मिळाली आणि एरवी अशक्य असणारा आजाराचा नवाच प्रकार जन्मां आला. ह्याला म्हणतात साथीचे आजार. अल्प आणि विरळ लोकवस्तीत साथीचे आजार पसरायला फारशी  माणसेच नसतात. साथीच्या आजारांचे निव्वळ स्थानिक तरंग उठतात, त्यांच्या लाटा होऊच शकत नाहीत. पिनवर्म, सालमोनेला (विषमज्वर) आणि स्टॅफीलोकॉकस ह्यांचा प्रवास व्यक्ती ते व्यक्ती होत होता पण हे आजार तेंव्हा साथीत रूपांतरीत होऊ शकले नाहीत. 

आणखीही एक गडबड झाली. शिकार आणि ती फाडून खाणे यामुळे अनेक प्राणी आणि त्यांच्या अंगाखांद्यावरचे परोपजीवी यांच्याशी माणसाचा संपर्क येतच होता. पण ही ओझरती भेट बहुदा संपर्कापुरतीच ठरायची. संसर्ग क्वचितच व्हायचा. टेप वर्म, लिव्हर फ्ल्यूक, त्रिपॅनोसोम  वगैरे जंत आणि जंतू प्राण्यांकडून माणसांत येत. पण एका व्यक्तीकडून दुसरीकडे ते थेटपणे संक्रमित होत नव्हते. त्यामुळे भटक्या शिकारी मानवात साथी नव्हत्या.

पण पाळीव प्राणी आले आणि त्यांच्या निकट  साहचर्यामुळे  कित्येक व्हायरस, बॅक्टीरिया आणि परोपजीवी जीव जंतूंना माणूस नावाचे नवे घर मिळाले. देवी (आता अवतार समाप्त), गोवर, कांजीण्या  ह्यांचे पूर्वज फक्त प्राण्यांतच मुक्कामी असायचे. टुणकन उडी मारून ते मनुष्य प्राण्यांत शिरले, चांगले मुरले आणि आता परतीचं नाव नाही. इथे जरी ‘टुणकन उडी’ म्हटलं असलं तरी ते गंमत म्हणून.  प्रत्यक्षात असं नव्या प्राण्यांत घर करायचं तर अत्यंत गुंतागुंतीचे अडथळे, बरेचसे योगायोगाने पार करावे लागतात. अशा मुशाफिरीतला गोवर हा बहुतेक  पहीला. गो-वंशातील आणि मानवातील क्षयरोगातही खूप साम्य आहे पण मूळ दुखणं कोणत्या बाजूला होतं हे नक्की नाही. अजूनही हा प्रकार सुरूच आहे. एडस्, सार्स, आणि अगदी अलीकडे  कोव्हिड ह्यांच्या बाबतीत ही चर्चा आपण वाचलीच असेल.

जंतुंप्रमाणेच जंतही माणसाबरोबर उत्क्रांत झाले आहेत. अगदी ६२०० वर्षापूर्वीच्या अवशेषांतही फ्लॅट वर्म (शिस्टोसोमा) नावाचा जंत आढळला आहे. माणूस-गोगलगाय-महिषवंश-माणूस असं त्या काहींचं गुंतगुंतीचं जीवनचक्र आहे. म्हशी, रेडे वगैरे पाळायला लागल्याशिवाय हे चक्र फिरत राहाण्याइतका निकटचा संपर्क शक्य नाही. हवामानाबरोबर शेती पसरली, कालवे पसरले तसा हा आजारही पसरला असं दिसतं.

खरंतर हे जंत, जंतू वगैरेंना आपली काही पडलेली नसते. ते बिचारे अन्न, संरक्षण आणि प्रजननासाठी सोयीची जागा शोधात येतात. या पैकी व्हायरस लोकांना तर अन्न पाणीही लागत नाही. पेशीत प्रवेश करून, तिथलंच मटेरीयल वापरुन ते पिल्लावतात. यातली बरीचशी मंडळी आली-गेली तरी आपल्याला त्याचा पत्ता लागत नाही. आपल्याला आजार होतात, बहुतेक लक्षणे उद्भवतात ती यांच्या असण्यामुळे नाही, आपल्याला तक्रारी उद्भवतात त्या  आपली प्रतिकारशक्ती यांच्याविरुद्ध उभा  दावा  पुकारते म्हणून. ताप, सूज, वेदना, लाली,  खाज, पुरळ, लसीका ग्रंथी सुजणे आणि एकूणच रोगट  अवयवाचा कार्यनाश होणे हे सगळे ह्या लढाईचे परिणाम. हे जीवनावश्यक असलं तरी दरवेळी उपयोगी ठरतंच असं नाही. कधीतरी अती प्रतिकार, अती सूज, अती कार्यनाश हा आपल्याच नाशाला कारणीभूत होतो.  कोव्हिडमुळे झालेले बरेचसे मृत्यू हे प्रतिकारशक्ती मोकाट सुटल्याने (सायटोकाईन स्टॉर्म) झालेले आहेत. तथाकथित इम्यूनिटी बूस्टर्स  विकून आपल्या तुंबड्या भरणाऱ्यांच्या औषधाने, प्रत्यक्षात इम्यूनिटी वाढतच नव्हती हे बरेच झाले म्हणायचे. नाहीतर या (राज)वैद्याच्या औषधाने, धनाबरोबर आणखीही अनेकांचे प्राण गेले असते आणि तो खरोखरच यमराज सहोदर  ठरला असता.

कोव्हिड मूळचा वटवाघूळतला जंतू. तो माणसांत संक्रमित झाला आणि हाहाकार उडाला.  बदलत्या वातावरणात उडणारे, पळणारे, पोहणारे, सरपटणारे अनेक जीव आपलं घरटं हलवतील, स्थलांतराचे मार्ग बदलतील, विणीचे हंगाम बदलतील.   नवनवे  जंतू, नवनव्या जनतेच्या संपर्कात येतील. बरेचसे हल्ले आपण परतवून लावू पण काही लढाया जंतूही जिंकतील. नव्या नव्या साथी येतच रहातील. अगदी धरा जरी तापली नाही, घरटी जरी हलली नाहीत, तरीही हे होईलच. पण धरा ज्वराने हे सारं खूप वेगे वेगे होईल, सारं अपूर्व, अनपेक्षित, अकल्पित असेल. 


दैनिक सकाळ 

शुक्रवार 

१९.०४.२०२४


No comments:

Post a Comment