Friday 12 April 2024

हवामान अवधान लेखांक २

लेखांक २ रा

 

आस्मानी आणि सुलतानी

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

व्याजावर जगण्याऐवजी माणसाने निसर्गाच्या मुद्दलालाच हात घातला आहे आणि यामुळे धरा ज्वरामुळे निर्माण होणारे प्रश्न अधिकच बिकट  होत आहेत.

 

आता यातून मार्ग काढायचा, भविष्यकाळाचा वेध घ्यायचा, तर भूतकाळाचा नेटका अभ्यास असायला हवा. नव्या तंत्रज्ञानाने इतिहासाची  आणि प्रागैतिहासाची नवी दालने खुली  केली आहेत. पृथ्वीने कधी आणि किती उन्हाळे, हिवाळे पाहिले आणि तत्कालीन सजीव सृष्टीने या अरिष्टाचा कसा सामना केला, हे आता समजावून घेता येतं. एकच उदाहरण पाहू. माणसाच्या प्रतिकारशक्तीच्या अभ्यासातून, कोणती शस्त्रास्त्र तिला कधी प्राप्त झाली हे शोधता येतं. याचा अर्थ उत्क्रांतीच्या ओघात त्या  त्या काळात ती जीवनोपकारक  ठरली. म्हणजे त्या काळी, त्या शस्त्रांनी घायाळ होणारे शत्रू असतील.  मग हे शत्रू कोणत्या वातावरणात वाढतात बरे? अशा बदलाला तोंड देत जगले कोण? तगले कोण? शेष कोण आणि नामशेष कोण?; असा उलटा विचार  करता येतो. भूतकाळाचा वेध घेता येतो. जे शेष राहिले, ह्या संकटाला पुरून उरले, त्यांचे आपण वंशज.

 

अशा संशोधनातून प्रश्न जरी नीट समजला तरी या  मंथनातून जी उत्तरे येतील ती अमृतमय असतील असं नाही. असे उपाय अमलांत आणणे म्हणजे हलाहल पचवण्यासारखंच. कारण हा निव्वळ शास्त्रीय प्रश्न नाही. त्याला अनेक अर्थ-राजकीय कंगोरे आहेत. आशिया आणि आफ्रिकेतील प्रचंड मोठी  जनता, भरपूर ऊर्जा वापरून वेगाने प्रगती करण्यास आतूर आहे.  ‘पृथ्वीच्या संपत्तीची लूट तुम्ही केली,  आमच्यावर राज्य गाजवून आम्हालाही लुटलंत आणि आता पोट भरल्यावर, ढेकर देऊन, आम्हाला धरा-ज्वराचा धाक घालून, सबूरी शिकवणे हा अप्पलपोटेपणा आहे’, असं त्यांचं पहिल्या जगाला सांगणं आहे.

 

हा प्रश्न कुठल्याही जागतिक युद्धापेक्षाही भीषण त्यापेक्षाही गंभीर आणि सार्वत्रिक परिणाम असणारा आहे. कसं ते इतिहासातील उदाहरणाने  पाहू.

 

सुमारे १८६० साली, सागर आणि धरेवरील तापमान  थार्मोमिटरने नीट नोंदवायला सुरवात झाली. ते वाढते आहे आणि त्याला मानवी कारणे आहेत हे आता स्पष्ट झाले. कॉलराच्या साथीचा मागोवा घेता घेता एल् निनोचा प्रताप स्पष्ट होत गेला. भारतात एल्  निनोच्या (आणि काही घटकांच्या) परिणामी, १८७६ ते १८७८ असे  महादुष्काळ पडले. एल् निनोमुळे आशियाकडेचे बाष्प पूर्व पॅसिफिक प्रदेशात वाहून नेले गेले. पेरू वगैरे देशात अतिवृष्टी तर आशियात अवर्षण अशी परिस्थिती निर्माण झाली.

 

मात्र या आस्मानीने घडलेली उपासमार आणि रोगराई सुलतानीने शतगुणीत झाली. वसाहतवादी, नफेखोर, शोषक ब्रिटिश शासनकर्त्यांची भूमिका माल्थस विचारांनी भारलेली होती. दुष्काळ ही तर भूईला भार झालेली प्रजा कमी करून संतुलन साधणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे, असा त्यांचा दृष्टीकोन होता. ‘धान्य निर्मितीच्या वेगापेक्षा भारतीयांची प्रजा वेगानी वाढत्येय’, (तेंव्हा दोष जनतेचा आहे), हे व्हाईसरॉय लॉर्ड लिटन यांचे उद्गार. त्यामुळे  इथल्या जनतेची अन्नान्न दशा झालेली असताना इथले धान्य ब्रिटनला निर्यात होत राहिले. चार शितं तरी मिळतात म्हणून सरकारी कामांवर जणू भुतंच, अशी खंगलेली, कंगाल माणसं राबू लागली. पुरुषांस, दिवसांस एक पौंड धान्य आणि एक आणा असा दर होता. बायका पोरांना म्हाताऱ्यांना  आणखी कमी होता.  एल् निनोचा फेरा उलटून, पुन्हा पाऊस पडून, प्रजेच्या तोंडी काही पडेपर्यंत, उपासमारीनं आणि प्लेग, कॉलरा वगैरे रोगराईनी कोट्यवधी बळी घेतले.

 

ही सुलतानी निव्वळ वसाहतींतच नाही तर खुद्द इंग्लंडच्या घटक राज्यांतही थैमान घालत होती.   आयर्लंडवर इंग्लंडची सुलतानी होती तेंव्हा बटाटा युरोपात आला (१५९०) आणि  गरीबाघरचा घास झाला. ‘द पोटॅटो इटर्स’ हे व्हॅन गॉंचे चित्र प्रसिद्धच आहे.  पुढे बटाट्यावर बुरशी पडून पीकं गेली (१८४६-४९)  आणि कोट्यवधी  आयरीश माणसे दुष्काळाचा घास झाली. गोरगरीब उपाशी तर मेलेच पण अस्वच्छतेने उवांची बजबजपुरी माजली आणि कित्येक टायफसने मेले; उरलेसुरले कॉलराला बळी पडले. त्यात धनी इंग्लंडने आयर्लंडमधील  धान्याच्या निर्यातीला मोकळीक देऊन, मक्याच्या आयातीवर बंदी घातल्याने (कॉर्न लॉ) परिस्थिती आणखी चिघळली.

 

दुष्काळ अनेकांचा पोषणकर्ताही ठरतो. या महादुष्काळानंतर मलूल प्रांतांवर अधिराज्य गाजवण्यासाठी वसाहतखोरांनी पुन्हा हुंकार भरला.  चहा, कॉफी, उस आणि रबराच्या मळ्यांवर राबायला मजूर सस्यात मिळाले म्हणून  जगभरचे मळेवाले खुश झाले.     पाद्रीही खुश झाले. येशूच्या कळपात वळवायला त्यांना अनाथ मुलं, नाडलेली प्रजा आयतीच  मिळाली. त्यांनी नेटीवांसाठी इस्पितळे उभारली. अनेक ठिकाणी आधुनिक वैद्यकीशी स्थानिकांची ही पहिली ओळख ठरली.   पुढे त्यातूनच  माहिती संकलन आणि संशोधनाची सुरवात झाली. सेवाभावी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्व वाढत गेले. लहान मोठे सावकार खुश झाले. त्यांचे  पाश  जनांच्या गळा पडले आणि बलाढ्य देशांचे पाश गुलाम देशांच्या गळा पडले. धनको आणि ऋणको देशांतील तफावत वाढली. थोडक्यात एल् निनोच्या एका फटक्यानी चक्क  ‘तिसऱ्या जगाची’ निर्मिती झाली.

 

म्हणूनच आस्मानी बरोबरच सुलतानीचा अभ्यासही हवा.

 

 दै. सकाळ 

१२.४.२४

No comments:

Post a Comment