धरा-ज्वर आणि मानव रोगजर्जर
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई
सर्व ऋतुंची नावे ‘ळा’ ने संपतात आणि म्हणून, वर्षातून निदान तीनदा, ‘आला उन्हाळा/पावसाळा/हिवाळा; आरोग्य सांभाळा’ असा यमक जुळवत मथळा देता येतो. आरोग्याचा आणि हवामानाचा संबंध एवढाच नाहीये! तो अधिक सखोल आणि जटील आहे. धरा-ज्वर आणि परिणामी हवामान बदलाची हवा असताना तो समजावून घेणे आवश्यक आहे.
जास्तीजास्त इतके आणि कमीतकमी इतके अशा हवामानाच्या एका अरुंद पट्ट्यामध्येच आपण, आपली पिकं, आपले पाळीव प्राणी, आपले रोगजंतू, आपले मित्रजंतू, गुरंढोरं जगात असतो; नव्हे जगू शकतो. सुसह्य हवामानाच्या ह्या दोन काठांमध्येच मानवी जीवनाचा आणि संस्कृतीचा प्रवाह वाहू शकतो. याला म्हणतात गोल्डीलॉक्स झोन. गोल्डीलॉक्सची लोककथा प्रसिद्ध आहे. अस्वलांच्या गुहेत शिरलेली ही गोड मुलगी; पाहते तो काय एक बेड खूप मोठं, एक खूप छोटं आणि एक मात्र ‘जस्ट राइट’. एका बाउल मधलं पॉरिज खूप गरम, एकातील खूप गार आणि एक मात्र ‘जस्ट राइट’. वातावरणाचे तापमान (आणि इतरही अनेक घटक) हे असे ‘जस्ट राईट’ असावे लागतात. जेंव्हा गोष्टी ‘जस्ट राईट’ असतात तेंव्हाच आपण सर्वाधिक सुखासमाधानाने नांदू शकतो.
ही मर्यादा ओलांडली गेली की साऱ्या रचनेवर ताण येतो. दुष्काळ पडतात, पूर येतात, पिकं जातात, कुपोषण, उपासमार होते; अशी भुकी कंगाल प्रजा रोगराईला बळी पडते. ही रोगराई सुद्धा विलक्षण असते. नव्या वातावरणाला साजेसे नवे जंतु पसरतात. आपला त्यांचा आधी सामना झालेला नाही, तेंव्हा असे अपरिचित आजार झपाट्याने पसरतात. डास, माशा, पिसवा, उंदीर अशांची प्रजा वाढते आणि मलेरीया, कॉलरा, प्लेग सारखे चिरपरिचित आजारही पसरू लागतात. नैसर्गिक उत्पातांच्या पाठोपाठ बेघरांचे, बेकारांचे, अनाथांचे, निराधारांचे तांडे शहरांच्या दिशेने निघतात. मनोरुग्णांची संख्या वाढते.
‘हेल्थ इज वेल्थ’; तेंव्हा रोगिष्ट प्रजा समृद्धी निर्माण करू शकत नाही. मग दैन्य आणि दारिद्र्य पसरतं. दरिद्री देश उत्तम आरोग्य व्यवस्था उभारू शकत नाही; कारण ‘हेल्थ इज वेल्थ’ इतकेच, ‘वेल्थ इज हेल्थ’ हे ही खरेच आहे. जे विकल असतात त्यांचा आधी बळी जातो आणि इतरांचे कालांतराने प्राण जरी नाही तरी त्राण तरी जातातच. हा सारा उत्पात केवळ माणसापुरता सीमित नाही. ऋतुचक्राचा आस उडाल्यावर सारी सृष्टीच डळमळली तर त्यात आश्चर्य नाही. सृष्टीत आपण कस्पटासमान, तेंव्हा जग पुनरपि सावरण्याची आपली क्षमता तशी मर्यादित.
हे भविष्याचे कल्पना चित्र नाही. हे आपल्या आसपास, संथपणे पण निश्चितपणे घडते आहे. पृथ्वीचा पारा चढतोय हे आता अटळ सत्य आहे.
पृथ्वीचे तापमान जर सतत गार, गरम होतच असतं तर आत्ताचा तापही या निसर्गचक्राचा भाग असेल, हा तापही चढेल आणि उतरेल, मागील तापातून माणूस जगला वाचला त्याअर्थी याही तापातून निभावून जाईल अशी भाबडी आशा काहींना असते. पण हा धरा-ज्वर वेगळा आहे. पूर्वीच्या तापाशी तुलना करता, एकविसाव्या शतकाच्या अखेरीस चांगला तीन चार डिग्री सेल्सियसने पारा चढेल, असा अंदाज आहे. पृथ्वी चांगली जख्ख म्हातारी आहे. वीस तीस मिलियन वर्षांचा इतिहास आहे तिला पण ती अशी तापाने फणफणल्याची नोंद तिच्या जुन्या केसपेपरवर आढळत नाही. पूर्वीही हिमयुगांची आवर्तने झाली आहेत आणि दरम्यानच्या काळात वसुंधरा तापली होतीच; पण इतकी नाही. इतकंच नाही तर हा पारा झपाट्याने चढेल ही देखील गंभीर गोष्ट आहे. पूर्वीही पृथ्वीला ताप आला होता पण इतक्या झपाट्याने तो वाढला नव्हता. पारा वेगेवेगे वाढल्यामुळे वाढत्या तापमानाशी जुळवून घेणं कित्येक जीवमात्रांना अशक्य होईल.
ह्याला जबाबदार आहोत आपण, मनुष्य जात. माणसाला अग्नीचा शोध लागला, पुढे शेती, औद्योगिक क्रांती अशी माणसाची ऊर्जेची भूक वाढतच गेली आणि कळत नकळत वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड सोडला जाऊ लागला. तापमान वाढीत याचा मोठा वाटा आहे. मनुष्यहस्ते घडलेल्या या पापाचं माप म्हणजे वातावरणातील कर्बवायू प्रमाणात पूर्वीपेक्षा सुमारे 40%नी वाढ. आपण जणू पृथ्वीला कर्बवायूची आणि कसली कसली गोधडी लपेटून, सूर्याची उष्णता इथेच राहील अशी व्यवस्था केली आहे.
माणसाच्या वावराचा, नैसर्गिक संसाधनांच्या वापराचा ठसा अधिकाधिक खोल, रुंद आणि गडद होतो आहे. पृथ्वीच्या जीवनातलं सद्य युग म्हणजे होलोसीन युग. ११,७०० वर्षापूर्वी सुरू झालेले हे नूतनतम युग. होलोसीन युगाकडून, जेमतेम 200 वर्षांमध्ये, आपली वाटचाल ‘अँथ्रोपोसीन’ युगाकडे व्हायला लागली आहे. अँथ्रोपोसीन म्हणजे मनुष्यमात्रांचे युग, छे, छे, हे तर ‘मात्र मनुष्य’ युग. इथे केवळ एकाच प्राण्याचे अधिराज्य आहे. आज भूतलावरील पृष्ठवंशीय प्राण्यांत 98% वाटा माणूस आणि त्याच्या पाळीव प्राण्यांचा आहे, म्हणजे बघा. ‘विपुलाच पृथ्वी’च्या देण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक आपण पहिल्यांदा ओरबाडून घेतलं ते 1980 च्या सुमारास. तेव्हापासून हे रोज सुरू आहे. व्याजावर जगण्याऐवजी माणसाने निसर्गाच्या मुद्दलालाच हात घातला आहे.
पुढील काही लेखांकात ह्याचे आरोग्यविषयक परिणाम आपण पाहणार आहोत.
दै.सकाळ
५एप्रिल २०२४