Wednesday, 20 March 2024

फार्मा कंपन्यांचे मार्केटिंग आणि डॉक्टरांचा मोह

 

फार्मा कंपन्यांचे मार्केटिंग आणि डॉक्टरांचा मोह

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

नुकतीच भारत सरकारने औषधांच्या मार्केटिंगबद्दल संहिता (UCPMP2024) जारी केली आहे. २०१५च्या अशाच संहितेची ही ताजी आवृत्ती. आधीची संहिता ‘ऐच्छिक’ होती, म्हणजे दातपडक्या वाघोबासारखी. आता ‘ऐच्छिक’ हा शब्द काढण्यात आला आहे. मात्र ‘बंधनकारक’ हा शब्द घालण्यात आलेला नाही! सध्या ही संहिता पाळण्याची ‘विनंती’ आहे. फक्त औषध निर्मात्यांनाच नाही तर आता  वैद्यकीय उपकरण निर्मात्यांनाही ही लागू आहे. देखरेखीसाठी प्रत्येक कंपनी वा संघटनेने अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत तक्रारींची दखल घ्यायची आहे.

संहिता तशी ऐसपैस आहे. औषध कंपनीच्या प्रतिनिधींनी कसे वागावे; उदा: अन्य कंपन्यांची नालस्ती करू नये; हेही ती सांगते.  नमुन्याला म्हणून द्यायच्या औषधांवरही बरीच बंधने आहेत. एकावेळी तीन पेशंटपुरती, अशी वर्षभरात, जास्तीजास्त १२ फ्री सॅम्पल्स देता येतील. ‘फ्री सॅम्पल्सवर बंदी आहे पण राजकीय देणग्यांवर नाही!’, अशीही उपरोधिक पोस्टही फिरत आहे. औषधांची भलामण करताना पाळावयाची पथ्ये सविस्तर दिलेली आहेत. परिणामकारकता आणि सुरक्षितता याबाबतची माहिती नेमकी आणि पुरावाधिष्ठित असावी ही अपेक्षा आहे. सहपरिणामांचा उल्लेख आवश्यक आहे. ‘सेफ’, ‘न्यू’, ‘खात्रीशीर’, वगैरे विशेषणांचा वापर कधी करावा हेही सांगितले आहे.  दुर्दैवाने पर्यायी, पारंपारिक वा पूरक औषधोपचारवाले अशा बंधनातून मुक्त आहेत. ते वाट्टेल ते दावे करू शकतात, नव्हे करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या,  रामदेवबाबांच्या जाहिरातीबाबतीतल्या, ताज्या निकालाने हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच ताजी संहिता आयुष प्रणालींना लागू असावी अशी अपेक्षा आहे पण त्याबाबत अद्याप  स्पष्टता नाही.

अशी बंधने उपकारक आहेत.    अशा बंधनांमुळे  आधुनिक वैद्यकीच्या वारूला लगाम घातला जातो.  अन्यथा औषध कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी फार्मकॉलॉजीचे प्रोफेसर असल्याचा आव आणतात, पण चुकीचेच  काही डॉक्टरांच्या माथी मारू पाहतात.  हा अनुभव अनेक डॉक्टरांना येतो. सजग डॉक्टर अशा भुलथापांना बधत नाही. पण असे, न बधणारे, इंडस्ट्रीच्या भाषेत ‘टफ नट्स’, फोडण्यासाठी अनेक तऱ्हेचे अडकित्ते वापरले जातात. म्हणजे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपात काही पोहोचवलं जातं.

संहितेनुसार डॉक्टरांना कोणत्याही स्वरूपात (वस्तु, निवास, प्रवास खर्च, वगैरे) ‘भेटी’ देणे अमान्य आहे. सल्ला फी, संशोधन फी, कॉन्फरन्ससाठी अनुदान हे सारं अपेक्षित चौकटीत असणं, नोंदणं आणि दाखवणं आवश्यक आहे. संशोधनावर बंदी नाही मात्र तेही नोंदणीकृत असावं. त्या नावाखाली लाचखोरी नसावी.

पण इतकंही काही देण्याची गरज नसते.   

फुकट दिलेल्या  इवल्याशा भेटवस्तूने प्रिस्क्रिप्शनची गंगा आपल्या दिशेने वळवता येते, हे सारेच ओळखून आहेत. ‘मासा पाणी कधी पितो हे ओळखण्याइतकंच सरकारी अधिकारी पैसे कधी खातो हे ओळखणं अवघड आहे’; अशा अर्थाचं  कौटिल्याचं एक वचन आहे. परस्पर संमतीने होणारा आणि परस्पर हिताचा  हा दोघांतील व्यवहार असल्याने, हा ओळखणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळे हे रोखणं तर त्याहून अवघड आहे. अगदी वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने (१९८८) याची दखल घेऊन काही नीतीतत्वे मांडली आहेत. म्हणजे यंत्रणांना अगतिक करणारा हा प्रश्न जागतिक आहे.

साहित्य संमेलनात जशा  काही गहन गंभीर चर्चा असतात आणि बाहेर थोडी जत्राही असते, तशीच वैद्यकीय संमेलनंही असतात. मुख्य हॉलमधे गंभीर चर्चा तर बाहेर भलंथोरलं ट्रेड प्रदर्शन, नवी औषधं, नवी उपकरणं, आणि माहितीपर स्टॉल्स. इथे प्रतिथयश डॉक्टरांचे घोळकेच्या घोळके, स्टॉल मागून स्टॉल मागे टाकत,  तिथे वाटत असलेली कचकड्याची कीचेन, कागदी, कापडी, प्लॅस्टिक किंवा  रेक्सीन  पिशव्या विजयी मुद्रेनं गोळा करत असतात.

  हे वर्णन कुठल्या भारतीय संमेलनाचं आहे असं समजू नका. डॉ. अतुल गवांदे यांच्या ‘कॉम्प्लीकेशन्स’ या पुस्तकांतील  हे वर्णन, चक्क अमेरिकेतल्या सर्जन्स कॉन्फरन्सचं आहे. अर्थात ते इथेही लागू आहे. यांना वैद्यकीय क्षेत्रातील  ‘आउटस्टँडिंग’ आणि ‘स्टॉलवर्टस्’ मंडळी असंही म्हंटलं जातं. हॉलबाहेरील म्हणून  ‘आउटस्टँडिंग’ आणि स्टॉलवरील म्हणून ‘स्टॉलवर्टस्’!

प्लास्टिकच्या पेनापासून ते परदेशी सफरीपर्यंत, ज्याच्या त्याच्या वकबानुसार, कर्तृत्वानुसार ‘आहेर’ केले जातात. काही, ही ऑफर नाकारतात तर काही, ‘नाही तरी कुठलं तरी औषध द्यायचंच  तर या कंपनीचं देऊ, तेवढाच आपलाही फायदा’, असं स्वतःच्या विवेकबुद्धीला समजावून सांगतात. ‘माझा आर्किटेक्ट प्लायवूडवाल्याकडून आणि ट्रॅव्हलएजंट हॉटेलवाल्याकडून पैसे घेतोच की मग मीच काय..’, असाही युक्तिवाद करणारे आहेत.

प्रिस्क्रिप्शन खरडणाऱ्या पेनाचे  विज्ञान, विवेक, आणि अनुभवाचे अधिष्ठान ढळले की वाईट औषधे, अनावश्यक औषधे, अकारण महाग औषधे, निरुपयोगी टॉनिक्स वगैरे लिहून जातात, पेशंटकडून खरेदी केली जातात आणि अर्थातच मलिदा योग्य त्या स्थळी पोहोचतो.

प्रिस्क्रिप्शनची धार आणि शास्त्रीय आधार बोथट होण्याने  पेशंटचा तोटा होतोच पण डॉक्टरांचा सुद्धा फायदाच होतो असं नाही. त्यांच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचतो, त्यांच्या  हेतूबद्दल पेशंटच्या मनात किंतु निर्माण झाला की इतर अनेक प्रश्न गहिरे होतात. म्हणूनच फार्मा-श्रय नाकारून, स्वखर्चाने  संमेलन भरवण्याचे काही यशस्वी प्रयत्न झाले आहेत, होत असतात. काही नियामक संस्था आणि डॉक्टरांच्या संघटनांनी मार्गदर्शक तत्वे,  आचारसंहिता वगैरे जारी केल्या आहेत. पण ही तत्वे  स्वयंस्फूर्तीने आचरणात आणायची आहेत.  कारण  ती अंमलात आणायची तर देखरेख यंत्रणा अगदीच अशक्त आहे. नव्या संहितेत या दिशेने काही पावले टाकलेली आहेत.

कितीही संहिता आणल्या तरी प्रामाणिकपणा, पुरावाधिष्ठित वैद्यकीचा अवलंब आणि देखरेखीच्या सशक्त यंत्रणेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

 

प्रथम प्रसिद्धी

दै. लोकमत

संपादकीय पान

२०.०३.२०२४

Monday, 18 March 2024

नश्वर ईश्वर

काही दिसांची 
हिरवी सळसळ
पिवळी पिवळी
पुन्हा पानगळ

अन हर्षाची 
कारंजीशी 
फिरून फुटते 
नवी पालवी

दाराशी हा
नित्य सोहळा
मीही यातला
मी न मोकळा

या तालाशी 
श्वास गुंफला
या चक्राशी 
जीव जुंपला

पर्थिवतेचा 
अर्थच नश्वर
नश्वर मानव
नश्वर ईश्वर

Sunday, 17 March 2024

इरुताई आणि खारुताई

नात इरा हिचं नाव गुंफून रचलेली काविता 

एक होती इरुताई
एक होती खारुताई

म्हणाली इरूताई 
'अगं अगं खारुताई 
कसली तुला इतकी घाई?'

म्हणाली खारुताई, 
' बाई, बाई, बाई, बाई,
सकाळपासून वेळ नाही
काय सांगू इरुताई,
वर खाली, खाली वर,
सगळं आवरून झालं घर.
चार वाजता आज दुपारी
नक्की ये हं माझ्याघरी.'
 
इरु गेली खारूकडे 
खाल्ले गरम भजी वडे 

निघताना मग इरु म्हणे,
'बरं का, खारुताई गडे,
घर आमचं पुण्याकडे...

या एकदा आमच्याकडे'

सुरवंट, फुलपाखरू, मी आणि इरा

माझी चिमुकली नात इराला उद्देशून...

आज सकाळी, बागेमध्ये,
 सुरवंटाचे दर्शन झाले,
 कभीन्न काळा संथ चालीने,
 जाडोबा तो मला विचारे, 

'इरा होती ना, कुठे गेली ती?
 परवा सुद्धा नाही दिसली? 
असती पाहून, जरा बिचकली 
मला; चिमुकली जशी चमकती. 

असती आणखी कुशीत शिरली, 
घाबरलेली, बावरलेली,
थय थय असती आणि नाचली,
तान रड्याची, तार स्वराची.'

गाठ पडली हे सांगीन तिजला
काभिंन्न काळ्या हे सुरवंटा,
मंत्र मनाचा सांगिन तिजला 
हे जाडोबा, हे केसाळा 

 भयभीतीचे क्षणैक सावट,
 जरा मनाला धीट सावरू
 सुरवंटाची भीती कशाला?
 तोच उद्याचे फुलपाखरू

Saturday, 2 March 2024

एक होती इरूमाऊ

 

एक होती इरूमाऊ

तिला झाला शिंखोढेऊ

 

शिंखोढेऊ म्हणजे काय?

खाली डोकं वर पाय

 

आधी येते शिंक फटॅक

मग येतो खोकला खटॅक

 

ढेकर येते ढुरर्र ढुचुक

उचकी  येते उचुक उचुक

 

घरी इरूच्या सगळेच डॉक्टर

मम्मी पप्पा दोघे डॉक्टर

दादा दादी दोघे डॉक्टर

नाना नानी दोघे डॉक्टर

 

पण शिंखोढेऊला औषध

ऊ. ढे.  खो.  शिं.

 

ऊढेखोशिं म्हणजे काय?

ते इरूला ठाऊक नाय

ते डॉक्टर मामाला माहीत

मोहित मामा रहातो वाईत

 

वाईला जाईन

मामाला विचारीन

ग्वाल्हेरला येईन

मग तुम्हाला सांगीन

परंतु रोकडे काही..

 

परंतु रोकडे काही..  

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

 

श्री. रामकृष्ण यादव उर्फ रामदेवबाबा यांचं आणि माझं अगदी घट्ट नातं आहे. गेली काही वर्ष कधी अचंब्याने, कधी अविश्वासाने तर क्वचित आसूयेने मी या ब्रह्मचाऱ्याचे  उटपटांग चाळे न्याहाळत आहे. ज्या विखारी आणि विषारी जाहिरातीवर सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच बंदी घातली त्या बाबतही मी पूर्वी  इथे लिहिले होते. (लोकसत्ता १३.१२.२२) त्यांच्या विपणन कौशल्याला उजव्या हाताने सलाम ठोकत, मला देशद्रोही किंवा धर्मद्रोही ठरवून कोणी लाथ घालेल या भयाने डावा हात गांडीवर ठेऊन मी विचार करू लागतो; इतकी सगळी माणसं इतक्या सगळ्या अशास्त्रीय, छद्मशास्त्रीय, अर्धशास्त्रीय फसव्या दाव्यांना का भुलतात? याचेही काही शास्त्रीय कारण असेलच ना?

 

तेंव्हा सहजच भुलणाऱ्या  या मानवी मनाचा हा मागोवा.  

 

जादुई रोगमुक्तीची अपेक्षा मानवी मनामध्ये असतेच असते.  दिव्यदृष्टी मिळून आपल्याला गुप्तधन मिळेल अशी सुप्त इच्छा जशी असते, तशीच ही इच्छा. आपल्या लोककथांतून, पुराणांतून  अशा कथा आहेतच. कोड, कुबड, महारोग, अंधत्व, वंध्यत्व असे काय काय  आजार आणि जादुई उपचारांमुळे त्यातून तत्क्षणी मुक्ती. तेंव्हा असं काहीतरी असू शकेल अशीच आपल्या मनाची बैठक असते. साहजीकच आपण अशा दाव्यांकडे सहानुभूतीने पहातो.

 

जे आपल्याला वाटत असतं त्याचे पुरावे आपल्याला आपोआपच आसपास सापडायला लागतात (कन्फर्मेशन बायस).  ही कोणा व्यक्तीची नाही तर एकूणच मानव जातीची मानसिकता आहे. मग अमुक एका उपचाराने गुण येतो म्हटलं की त्याच उपचाराने गुण आलेली माणसं भेटतात, त्याचीच माहिती पेपरात नजरेस येते आणि आपला समज अधिकाधिक घट्ट होतो. गैरसमज रूजण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. वास्तविक भवताल तोच आणि तसाच  असतो आपण  त्यातून आपल्याला हवे ते वेचत असतो. आपण नवीन सेल्टॉस घेतली की लगेच रस्त्यावर कितीतरी सेल्टॉस दिसतात; तसंच हे.

 

प्रस्थापित आरोग्य व्यवस्था, औषध कंपन्या आणि डॉक्टरांनी पेशंटला लुबाडल्याच्या इतक्या सत्यकथा ऐकू येतात की या साऱ्या व्यवस्थेबद्दल एक प्रकारची सूडभावना आणि अविश्वास लोकांच्या मनात असतोच.  या अविश्वासाच्या खतपाण्यावर कृतक वैद्यकीचं तण माजतं. प्रस्थापित व्यवस्था ‘नफा’ एवढे एकच उद्दिष्ट ठेवून काम करते हे एकदा मनावर ठसलं, की पर्यायी औषधवालेसुद्धा नफाच कमवत असतात हे लक्षातच येत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या, राक्षसी प्रचार यंत्रणा वगैरे दोन्हीकडे आहे.

 

लोककथा, अन्न, कपडेलत्ते, करमणूक याप्रमाणेच वैद्यकीय समजुती, उपाय हे सुद्धा आपल्या संस्कृतीचा भाग असतात. जे आपल्या आज्या-पणज्यांनी  आपल्यासाठी केलं ते आपण आपल्या नातवंडा-पंतवंडांसाठी सुचवत असतो, करत असतो.  त्याविषयी आपल्याला विशेष ममत्व असते. म्हणूनच अशा उपचारांबाबत शंका  म्हणजे धर्मद्रोह, देशद्रोह हे ठसवणंही सोपं असतं. परंपरेने चालत आलेले हे उपचार काळाच्या कसोटीवर टिकले आहेत आणि म्हणून ते सुरक्षितच असणारच   अशी आपली घट्ट समजूत असते.  पण खरं सांगायचं तर काळाची अशी काही कसोटी नसतेच. जरा बरोबर, जरा चुकीच्या अशा अनेक गोष्टी काळाच्या कसोटीवर टिकलेल्याच होत्या.  सापाचं विष उतरवणे, मुलांच्या नाळेला शेण लावणे, रजस्वला अपवित्र असते अशी समजूत  हे सगळं काळाच्या कसोटीवर टिकलेलेच आहे, पण चुकीचे आहे.  तेव्हा काळाची कसोटी लावण्यापेक्षा विज्ञानाची कसोटी लावणं अधिक श्रेयस्कर नाही का?

 

आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी टप्प्यावर आजार गाठतोच आणि आजाराच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तो असह्य  आणि असाध्य होतोच. याचा वेग आणि वेदना ही व्यक्तीगणिक वेगळी. पण आशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. जगायची आणि आपल्या सुहृदाला जगवायची उमेद देत राहते.  शिवाय योग्य उपचार आर्थिक आवाक्यात नसतील, कॅन्सर हॉस्पिटल जर लंकेत असेल, तर उपयोग काय? काहीतरी करणं आणि समाधान मानून घेणं, एवढंच तर हातात उरतं.

 

‘आता ह्याहून अधिक काहीच करता येणार नाही’ असं पर्यायीवाले  कधीच म्हणत नाहीत.शेचा नंदादीप ते तेवत ठेवतात. अर्थात तेल वातीचा खर्च पेशंटकडूनच घेतात. ज्यांना या  नंदादीपाची ऊब आवडते ते तेल वातीच्या खर्चाची तमा बाळगत नाहीत. आधुनिक वैद्यकीत असं करणं गैर मानलं जातं. आजाराबद्दल सत्य आणि संपूर्ण माहिती मिळणे हा पेशंटचा अधिकार मानला जातो. तेंव्हा खोटी आशा लावण्यापेक्षा वस्तुस्थितीला सामोरे जाण्याचे मार्ग आपण जोडीने धुंडाळू, अशी भूमिका असते. टाइप वन मधुमेह, रक्तदाब किंवा  संधिवाताच्या पेशंटना कायम  औषधे लागतील, त्यांचे काही सहपरीणामही असतील,  असंच सांगितलं जातं; केमोथेरपी अथवा शस्त्रक्रियांपूर्वी साऱ्या फायद्या-तोटयांची सविस्तर माहिती दिली जाते, पूर्वसंमती घेतली जाते आणि हेच योग्य आहे.

 

कधी या साऱ्या विकार वेदनेला काही कारण देता येतं तर कधी नाही. साऱ्याच प्रश्नांची उत्तरं विज्ञानाला ठाऊक नाहीत. मग असल्या अज्ञानी, अर्धवट, अबल विज्ञानापेक्षा साऱ्याच आजारांवर रामबाण उपाय आहेत; कुठलाही कॅन्सर, लकवा, संधीवात, असाध्य रोग हमखास बरा करतो,  अशा छातीठोक गर्जना मोह घालतात. त्या करणारे ज्ञानवंत आणि त्यांचे ज्ञान बलवंत वाटू लागते. मग ईझ्रायलहून मधुमेहाचं अक्सीर औषध आणायला कुणीही सत्तर रुपये सहज देतो.

 

 

आधुनिक औषधे म्हणजे सगळी ‘केमिकल’ आहेत अशी भाषा असते. मित्रों, जगी केमिकल नाही असे काय आहे? हा केमोफोबीया, चिरफाडीचे (हा खास त्यांचा शब्द) भय, ही साईड इफेक्टची भीती जाणीवपूर्वक जोपासली जाते. यावर धंदा पोसला जातो. खरंतर सगळ्याच औषधांचे काही ना काही सहपरिणाम, मग त्यात चांगले वाईट दोन्ही आले, असणारच आणि असतातच. फक्त आधुनिक वैद्यकीत असे परिणाम नोंदवण्याची, अभ्यासण्याची आणि सुसह्य करण्याची शिस्तबद्ध पद्धत आहे.  काही दिव्यौषधींना सहपरिणाम नाहीत असं म्हणणं म्हणजे वाळूत तोंड खुपसून बसण्यासारखं  आहे.  ते मुळी अभ्यासलेच  गेलेले नाहीत हे विधान वस्तुस्थितीला धरून आहे. देणारे भक्तीभावाने औषधे देतात, घेणारेही मनोभावे घेतात. अनेक घोटाळे होत रहातात. विषप्रयोग झालेली मूत्रपिंडे आणि यकृते घेऊन पेशंट पुन्हा येतात, त्यावेळी काळीज विदीर्ण होतं.  असे प्रकार आधुनिक औषधांच्या बाबतीतही संभवतात. पण त्याला काहीतरी पूर्वकल्पना, दादफिर्याद, नोंद, प्रसंगी ते औषध बाजारातून मागे घेणे वगैरे प्रकार आहेत. पर्यायी पॅथींमधे औषध मागे घेतल्याचं एक तरी उदाहरण आहे का? हे तर जाऊच  दे, गरोदर स्त्रीने घेऊ नये, डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही असे एकही औषध नसावे? सगळी औषधे लहान, थोर सगळ्यांना चालतात? हा औषधांचा दिव्य प्रभाव नसून इथे अभ्यासाचा अभाव आहे.  कोणी ‘हे घे औषध’ म्हणून नकळत पाणी जरी दिलं तरी आता काहीतरी इष्ट होणार या आशेने रोग्याला किंचित बरं  वाटायला लागतं. (इष्टाशा अर्थात प्लॅसीबो परिणाम) कुठल्याही औषधाची कामगिरी किमान अशा परिणामापेक्षा तरी  सरस हवी. होमिओपॅथी वगैरे ‘शास्त्रांनी’ ही पायरीही पार केलेली नाही.

 

मात्र दावे मोठ्ठे मोठ्ठे केले जातात आणि पेशंटची खुशीपत्रे, खुशी चलचित्रे, कोणी बडयांनी केलेली भलामण पुरावा म्हणून दाखवतात. कुठल्याश शकुंतलाबाईंना कुठलंसं मलम लावून मांडी घालून बसता यायला लागलं हा शास्त्रीय पुरावा ठरत नाही. पण असल्या भावकथांना पेशंट भुलतात, काय काय ऑनलाईन मागवतात आणि गंडतात. करून बघायला काय हरकत आहे?, घेऊन बघायला काय हरकत आहे?, जाऊन बघायला काय हरकत आहे?, तोटा तर नाही ना? अशा प्रकारचे युक्तिवाद करत माणसं करून, घेऊन आणि जाऊन बघतात. न जाणो गुण येणारच असेल तर आपणच गेलो नाही असं नको व्हायला, अशी त्यांची मानसिकता असते. यातूनही  यांचं फावतं. वास्तविक सगळं करून, बघून अभ्यासून मगच औषध बाजारात यायला हवं. करून बघण्याची जबाबदारी पेशंटची नाही आणि काही प्रयोग करून बघायचे असतील तर रीतसर परवानगी, संमती वगैरे असायला हवी.  

 

बाबांच्या औषधीनी भरतभूची प्रकृती सुधारणार असेल तर छानच, फक्त त्या औषधीचे रोकडे मूळ सामर्थ्य दाखवावे लागेल एवढेच.


प्रथम प्रसिद्धी 

लोकसत्ता 

लोकरंग पुरवणी 

रविवार ०३.०३.२०२४ 

पोषिता, शोषिता आणि आता

 

पोषिता, शोषिता आणि आता..

 

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

सरोगसी, सिर्फ नाम ही काफी है. अनेकानेक नैतिक पेचांना जन्म देणारे, कायदे कानून बदलायला आणि बनवायला लावणारे, कित्येक सिरियल्सना खाद्य पुरवणारे हे तंत्रज्ञान.  स्त्रीबीज एकीचे, पुरुष बीज एकाचे, त्यांचे फलन होणार लॅबमध्ये, एखाद्या पेट्रीडिश मधे, मग एकाच्या दोन, दोनाच्या चार अशा त्या पेशी वाढत जाणार. थोडी वाढ झाली की एका बारीक नळीतून हे गर्भ सोडले जाणार गर्भाशयात.  पण जैविक नाते असलेल्या आईच्या नाही, तर भाड्याच्या गर्भाशयात. ह्या गर्भाशयाची मालकीण ती, सरोगेट मदर. ती निव्वळ पोशिंदी. उद्या बाळ झालं, नाळ कापली की ह्या पोषिता मातेचा संबंध खलास. उदया सकाळी दुसऱ्या वाटा दुज्या गावचा वारा. अर्थात या सेवेबद्दल रग्गड पैसे मिळणार. खाऊपिऊ घातलं जाणार, न्हाऊ माखू घातलं जाणार. सगळी काळजी घेतली जाणार. पण शारीरिक त्रास काही एकाचा दुसऱ्याला अंगावर घेता येत नाही. तो जिचा तिलाच भोगावा लागतो. तो तेवढा सोसायचा.

आधी कायद्याने सशुल्क, म्हणजे पैसे घेऊन पोषिता माता म्हणून काम करणं वैध होतं. मामला थेट जननाशी म्हणजे पौरुषाशी, स्त्रीत्वाशी, पूर्वज ऋणमुक्तीशी, वारस मिळण्याशी आणि वारस आपल्या रक्ताचा असण्याशी  जोडलेला. अत्यंत उच्च तांत्रिक  सफाई आवश्यक. खर्च तर बक्कळ. नफाही बक्कळ. अर्थातच एक मोठा उद्योग भरभराटीला आला. २०१२ पर्यंत वार्षिक २ बिलियन डॉलर्सची उलाढाल होऊ लागली. परदेशवासियांसाठी सुलभ आणि त्यांना किरकोळ वाटतील असे दर, सैलसर कायदे आणि गरीबाघरच्या मुबलक पोषिता ही पर्वणीच ठरली. भरपूर परकीय चलन कमावलं आपण. दिल्लीच्या एका  मॅडमची ओळखच मुळी  ‘सरोगसी क्वीन’ म्हणून होती. काही ठिकाणी दवाखान्यालगतच सरोगेट मंम्यांसाठी हॉस्टेल्स होती. ह्या मंम्या गरजू असायच्या. भरपूर पैसे मिळायचे म्हणूनच ह्या मार्गाला यायच्या. दिवस जायचे, दिवस गेल्यावरचे दिवसही मजेत जायचे(?) आणि कुटुंबाचे भले व्हायचे(?). अशी विन-विन, सर्वतारक(?) परिस्थिती. काही तर दोन दोन, तीन तीन, चार चार वेळा सुद्धा प्रसवायच्या! प्रसंगी युटेरस भाड्याने देण्याबरोबरच या आपली अंडीही (ओव्हम डोनेशन) विकायच्या, आपल्यातून प्रसवलेल्या लेकराची आया म्हणून काम करायच्या, त्यांची दूध-आई व्हायच्या. याचेही पैसे मिळायचे. हे सगळं आपल्या स्वतःच्या मुलांसाठीच करायच्या त्या.

पण तरीही काही गोच्या होत्याच. मूल, मूळ देशी नेताना  इथले आणि तिथले कायदे मिळून एक जंजाळ तयार व्हायचं आणि आता ह्या त्रिशंकू बाळाचं करायचं काय आणि कुणी, असा प्रश्न तयार व्हायचा. बीजे कोणा दात्याची वापरली असतील तर ते मूल आई बापाच्या रूपा वर्णाचं कुठून असायला? मग ते मूल  न घेताच आईबाप निघून जायचे. काही तारे तारकांनी निव्वळ स्वतःच्या/पत्नीच्या शरीर सौंदर्याला तोषीश  नको म्हणून पोषिता वापरुन अपत्ये जन्मवली. त्यांच्या ह्या शृंगारवर्धक  उपद्व्यापाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

पण या साऱ्या भानगडीत पोषिता मातांच्या आरोग्याचे काय? त्यांच्या होणाऱ्या शोषणाचं, त्यांच्या नंतरच्या आयुष्याचं काय? ह्याची उत्तरे द्यायला कोणीच बांधील नाही. ह्या साऱ्या प्रकारात एजंट होते, कमिशन होतं आणि म्हणूनच जी जी म्हणून दुष्कृत्ये कल्पिता येतील ती ती घडत असावीत असंच वातावरण होतं.

शेवटी सरकारने कायदा आणला आणि शिस्त आणली. जी पोषिता असेल तिचीच बीजे आता वापरता येणार नाहीत. नव्या कायद्याने पोषिता माता म्हणून गर्भाशय, निव्वळ परोपकाराच्या भावनेने आणि म्हणूनच पूर्णतः नि:शुल्क उपलब्ध करायचे आहे.  हीच गोष्ट बीज दाते आणि बीज दात्रींना लागू आहे. त्यांचेही दान निरपेक्ष असायला हवं. कोणत्याही प्रकारचा रोख अथवा वस्तु/वास्तुरूप व्यवहार बेकायदा आहे. अदृश्य व्यवहार होत असतीलही पण हे थोडंसं हुंडाबंदीच्या कायद्यासारखं आहे. कायदाही आहे आणि हुंडाही आहे.  त्यांचे त्यांचे युटेरस वापरता येत नसेल तर घटस्फोटीता आणि विधवांनाही, हा कायदा पोषिता-सेवा वापरण्याची परवानगी देतो आणि दात्याचे पुरुषबीज वापरण्याचीही मुभा देतो.  

नव्या कायद्याने नॅशनल, राज्य आणि जिल्हा बोर्ड अस्तित्वात आले. पावलापावलाला त्यांची परवानगी आली. पुनरुत्पादनाचा वैयक्तिक हक्क, नैतिक तिढे, अपत्याची  भविष्यातील सोय आणि पोषितेचे शोषण वगैरे लक्षात घेऊन नवे नियम आले. प्रत्येक पायरीवर सविस्तर नोंदी, पुरावे, प्रत्येक गर्भाची  नोंद आणि मागोवा आवश्यक झाला.  लॅबचं रीतसर ऑडिट आलं. कायदेशीर करारमदार, त्यांचे नोटरायझेशन आवश्यक झाले. बीजदात्रीचा, पोषितेचा विमा आवश्यक झाला. होणाऱ्या संततीच्या कायदेशीर पालकत्वाबद्दलची, राष्ट्रीयत्वाबद्दलची   संदिग्धता संपुष्टात आली. मूल पालकांच्या स्वाधीन करायचं काम कोर्टामार्फत होऊ लागलं. 

पोषिता माता वापरण्याचा पर्यायही विवाहित आणि नि:संतान  जोडप्यांपुरताच मर्यादित झाला.  पोषिता म्हणून विवाहित, आपले आधीचे मूल असलेली, सग्यासोयऱ्यातीलच स्त्री चालेल अशी अट आली. धंदेवाईक पोषितांना रोखण्यासाठी ही तरतूद.  ही अट पाळणं अतिशय मुश्किल आहे. आधीच गोतावळे आक्रसत आहेत. लोकं एकवेळ किडनी देतील पण पोषिता म्हणून तयार होणे अगदी अवघड. ज्यांच्या घरी ह्या पुण्यकर्मात सहभागी व्हायला कोणीच तयार नाही त्यांनी काय करायचं हा प्रश्नच आहे.

पोषिता मातेत सोडला जाणारा गर्भ निव्वळ पालकांच्या बीजापासूनचा असावा असाही नियम होता. बीज दान स्वीकारायला बंदी होती. एका युटेरस आणि बीजग्रंथीही नसलेल्या बाईला सरोगसीची गरज पडली. बीज दानावर तर बंदी होती. मग मामला कोर्टात गेला. इतरही  अनेक कारणांनी अनेक खटली मजल दरमजल करत कोर्टात पोहोचली. कोर्टाने लक्ष घातले आणि नुकताच स्त्री वा पुरुष असे कोणते तरी एक बीज दात्याकडूनचे चालेल असा महत्वपूर्ण बदल या नियमात झाला आहे. या बदलाने अनेकांना दिलासा मिळेल.  काहीतरी गंभीर घोटाळा असतो म्हणून तर या टप्याशी येतात जोडपी. निर्बीज अवस्था हाही तो घोटाळा असू शकतो. एकच का, खरं तर सबळ वैद्यकीय कारण  असेल तर दोन्ही बीजेही दात्याकडून घ्यायला अडसर कशाला? कोणताही कायद्यात काही त्रुटी असतातच. मग यावरून खटके उडतात, खटले उभे रहातात, न्याय निर्णयातून कायदेकानून तावून सुलाखून निघतात. हा कायदाही ह्या प्रक्रियेतून जात आहे. कालांतराने दोन्हीही बीजे दात्याकडून घेतलेली चालतील असा बदल व्हावा अशी अपेक्षा.

असं जरी झालं तरी नव्या नियम अटींमुळे सरोगसी आणि एकूणच वंध्यत्वाचे अत्याधुनिक औषधोपचार सामान्यांना आणखी दुरापास्त झाले. आधीच महाग असलेल्या उपचारांची किंमतही आता वाढली आहे. पूर्वी एका बीज दात्याची/दात्रीची बीजे अनेकांना वापरली जात. आता एकास एक आणि तेही फक्त एकदाच  असा नियम आहे. मुळातच केंद्रे कमी  असल्यामुळे एक प्रकारची मक्तेदारी आहे. नव्या  नियमांमुळे लहान गावातील काही केंद्रे बंद पडली.  आमच्या गाव-खेड्यातल्या अशा जोडप्यांनी आता जायचं कुठे?

वंध्यत्व हा फक्त वैयक्तिक प्रश्न नाही. ही सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या आहे. आपल्या लेखी मात्र अती मुले होणे हीच तेवढी समस्या आहे आणि कुटुंब नियोजन हा उपाय आहे.  खरंतर  मूल  न होण्याने अनेक कौटुंबिक, सामाजिक अन्याय अत्याचार होतात. हीन वागणूक सहन करावी लागते. बाहेरख्यालीपणा, व्यसने, कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोट अशा अनेक समस्या थेट वंध्यत्वाशी निगडीत असू शकतात.

पण पूर्वीचा हा दृष्टीकोन आता बदलतो आहे. नुकतीच हिंगोलीच्या  शासकीय जिल्हा रुग्णालयात आणि सर्व  सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात  टेस्ट ट्यूब बेबी सेवा सुरू होणार असल्याची  सुवार्ता आली आहे. मुंबईच्या कामा हॉस्पिटल मध्येही केंद्र उभे रहाते आहे.

या नव्या संकल्पाबद्दल संबंधितांचे अभिनंदन.  

 

 

प्रथम प्रसिद्धी

महाराष्ट्र टाइम्स

संवाद पुरवणी

रविवार ०३.०३.२०२४