Tuesday, 27 December 2022

सर्व पॅथी समभावाचा अविष्कार

सर्व-पॅथी-समभावाचा आविष्कार 
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 

डॉक्टरांची कमतरता आणि भारतीयांची तोळामासा तबियत, अशा दोन्ही बिमारींवर शर्तीली दवा म्हणून आधुनिक आणि ‘आयुष’ अशी एकत्रित, जहाल मात्रा योजायचे सरकारने ठरवले आहे. नव्या धोरणानुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात वगैरे, आधुनिक अधिक ‘आयुष’ अशी संयुक्त उपचार केंद्रे असणार आहेत. पण या बेरजेच्या औषध-कारणाने रुग्णहीत साधणार आहे का?  
इथे पॅथीपॅथीचे डॉक्टर एकाच रुग्णावर संगनमताने उपचार करतील! ह्या असल्या प्रकाराचा काही पूर्वानुभव आहे का? दोन पॅथी उपचाराने दुप्पट फायदा होतो का? असे अभ्यास झाले आहेत का? त्यातून काय साध्य झाले? या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. असं केल्यामुळे दोन्हीकडील उत्तम तेवढे आपल्या पदरात पडेल; आपोआपच आपण सुवर्णमध्याला पोहोचू, अशी भावना आहे. पण दरवेळी सुवर्ण हे मध्यावरच असेल असं नाही. ते एका टोकालाही असू शकतं. 
यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. 
‘आयुष’ या निव्वळ पारंपरिक पद्धती नव्हेत, निव्वळ पूरकही नव्हेत तर पर्यायी उपचार पद्धती आहेत. ‘आयुष’वाल्यांचा असा पक्का दावा आहे. पर्यायी पद्धती म्हणजे नुसत्या वेगळ्या नावाची औषध देणाऱ्या पद्धती नव्हेत तर संपूर्ण शरीररचना, कार्य, आजारांची उत्पत्ती, स्थिती आणि लय, उपचार, त्यांचा प्रभाव आणि त्यांची परिणीती याबाबत त्यांचं काही वेगळं म्हणणं आहे. निव्वळ कल्प किंवा साबूदाण्यासारख्या गोळ्या किंवा शरबत-ए-आजम म्हणजे ‘आयुष’ नाही. प्रत्येक ‘आयुष’ पद्धती म्हणजे जगण्याकडे बघण्याचा एक सर्वांगीण, परिपूर्ण, दैवी विचार आहे. तेंव्हा त्यांच्या क्षमतांबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. मग आता त्यांची सांगड आधुनिक वैद्यकीशी का बरं घालायची आहे? असा असंगाशी संग केल्याने हे सारे तेज निष्प्रभ वगैरे होणार नाही का? खरंतर अशा संगतीने स्व-सामर्थ्याचा गंड कुरवाळला जाईल, एवढेच. अर्थात, कुणी सांगावे, नाठाळ अलॉपॅथीला वठणीवर आणायचा अंतस्थ हेतु असू शकेल.  
पण अलॉपॅथीला दूषणे देतच यातील बहुतेकांचा व्यावसायिक डोलारा उभा आहे. अलॉपॅथीमुळे जगणे नरकासमान झाले असल्याचे सांगणाऱ्या जाहिरातीही एका औषधकंपनीनी दिल्या होत्या. कंपनीचे जाऊ द्या, अलॉपॅथीशी सलगी करणाऱ्या होमिओ डॉक्टरास ‘कुलुंगी कुत्रा’ (Mongreal) म्हणावे अशी अधिकृत शिफारस आहे. होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमातील मूळ ग्रंथात आहे. मग आता संयुक्त दवाखान्यात कोणी, कुणाला, काय म्हणावे बरे? 
शिवाय ‘आयुष’मध्येच भेदाभेद आहेत. ‘आयुष’ म्हणजे आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी; अशी, आधुनिक वैद्यकी वगळता ‘इतर सर्वांची’ वळलेली मोळी आहे. मायजम्स, व्हायटल फोर्स, डायनामायझेशन वगैरे होमिओपॅथीची खासियत आहे; अल् अनसीर, अल् अखलात, अल् मिजाज वगैरे सप्तघटक युनानीची मिरास आहे; दोष, प्राण, धातू वगैरे आयुर्वेदाच्या संहितांत सांगितले आहे. पण या संकल्पनांच्या व्याख्या आणि व्याप्ती अस्पष्ट आहे. एका पॅथीचा मेळ दुसरीशी नाही. एवढेच नाही तर, काहींना जंतूशास्त्र अमान्य आहे, काहींना पुनर्जन्म मान्य आहे, काहींना प्राचीनत्व हाच पुरेसा पुरावा वाटतो तर काहींच्या प्रवर्तकाला साक्षात देवाचा मान आहे. हे सगळं खरं का खोटं?, रास्त का गैर?, वैज्ञानिक का छद्मवैज्ञानिक?; हे मुद्देच नाहीत. जे आहे ते जनतेच्या तंदुरुस्तीसाठी दुरुस्त आहे, हे गृहीत आहे. 
या विभिन्न दृष्टीकोनांचा मेळ अलॉपॅथीशी कसा घालणार? कोणत्याही बड्या इस्पितळात अनेक डॉक्टर एकाच पेशंटची तपासणी करतात. पण हे सारे त्या देहाच्या चलनवलनाबाबत समान समजूत बाळगून असतात. त्यांच्या चिकित्सेमध्ये अर्थातच एक सुसूत्रता असते. त्याचं काय? उदा: कविळीकडे पहाण्याचा प्रत्येक पॅथीचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. युनानी पद्धतीनुसार कावीळ खिलत-ए-सफरा किंवा सौदाच्या प्रादुर्भावाने होते तर आधुनिक वैद्यकीनुसार रक्त-दोष, लिव्हर-दोष अशी कारणे असू शकतात. संयुक्त-क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णाच्या तपासण्या कोण, का आणि कोणत्या प्रकारच्या करणार? दोन तज्ञांचे मतभेद झाले तर काय? यात पेशंटच्या मताला किंमत किती? कोणाचे औषध द्यायचे हे कसे ठरवणार? 
शेवटी कोणतं औषध घ्यायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या व्यक्ती-स्वातंत्र्यात आम्ही ढवळाढवळ केलेली नाही. आम्ही पर्याय उपलब्ध करून देतो आहोत, असा युक्तिवाद सरकार करू शकेल. 
पण आम्ही ‘आयुष’-ज्ञान मंडित असलो तरी येनकेन प्रकारेन आम्हाला आधुनिक औषधे वापरण्याची मुभा द्यावी अशी ‘आयुष’ संघटनांची उरफाटी पण रितसर मागणी आहे. विद्यमान सरकारने ही मागणी मान्य करण्याचा चंग बांधला आहे. याला प्रामाण्य पुरवण्यासाठी की काय, आता ‘आयुष’ अभ्यासक्रमात आधुनिक औषधशास्त्र आणि एमबीबीएस अभ्यासक्रमात ‘आयुष’ घुसवले गेले आहे. नीम हकीम तयार करणाऱ्या या निर्णयापाठोपाठ ही संयुक्त दवाखाने काढण्याची मखलाशी करण्यात येत आहे. सर्व-पॅथी-समभावाचा हा लोकशाही आविष्कार आहे. 
बॉलीवूड मसालापटात प्रत्येक धर्माचं एकेक पात्र असावं, तसं हे आहे. तितकेच बेगडी, तितकेच दिखाऊ आणि तितकेच प्रभावहीन.    

प्रथम प्रसिद्धी
दैनिक लोकमत
28 डिसेंबर 2022

Saturday, 17 December 2022

असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठे?

असला कुणी नास्तिक तर बिघडलं कुठे?
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
‘बोल रे बोल! तू नास्तिक आहेस का?’, असा प्रश्न विचारत जेंव्हा जल्पकांच्या झुंडी एखाद्या राजकीय नेत्याच्या मागे लागतात तेंव्हा आम्हां नास्तिकांना चार्वाकापासूनचे पूर्वज आठवतात. ‘होय, आहे मी नास्तिक.’ असं म्हणण्याची सोय, चार्वाक, जैन आणि बुद्ध परंपरा सांगणाऱ्या आपल्या देशात ओसरत चालली आहे. राजकारण धुरंधरांना आणि समाजधुरीणांना ती तशी नव्हतीच. पण सामान्यांची तरी राहावी, म्हणून की काय, आज पुण्यात ब्राइट्सतर्फे नास्तिक मेळावा होत आहे. या निमित्त ‘आम्हाला समजावून घ्या’ एवढेच नास्तिकांचे मागणे आहे.
आस्तिक-नास्तिक हा वाद सनातन आहे. ‘विज्ञान आणि अध्यात्म हे आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत’, असं कंठरवाने सांगणारा, आणि श्रोत्यांतील दोन्ही पक्षांच्या टाळ्या घेणारा, एक वर्ग असतो. ह्यांचा उत्साह लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाच्या वरताण असतो. धर्म आणि विज्ञान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे खरंच. पण त्या समान महत्त्वाच्या, समान आवाक्याच्या, समतुल्य वकुबाने सृष्टीचा अर्थ लावणाऱ्या आहेत, असे कावेबाज गृहीतक यामागे आहे. उभय पक्षांनी आपापली क्षेत्रे राखावीत असं ठरलं तरी प्रत्यक्षात धर्मशास्त्र, आपली मर्यादा सोडून, सतत सृष्टीची रीती (पाप वाढल्याने कोव्हिड आला), नीती (गरोदरपणी ग्रहण पाळावे )वगैरेबाबत चोंबडेपणा करत असते.
धर्मक्षेत्राने कुरुक्षेत्रावर आक्रमण केल्याची तर कितीतरी उदाहरणे आहेत. धर्म प्रसारासाठी तलवार हाती धरा, खुशाल नरसंहार करा, असे मुळी कनवाळू देवाचे स्पष्ट आदेशच आहेत. ते आदेश शिरसावंद्य मानणारेही आहेत. नास्तिक बिचारे मवाळ आणि पापभीरु असतात. त्यांनी कुणाला पाव देऊन, शाळा-दवाखान्याच्या व्यूहात भुलवून बाटवलेले नाही. ‘होताय नास्तिक का उपटू डोळे?, काढू नखे? आणि करू तुमची खांडोळी?’ अशा आविर्भावात कोण्या नास्तिकाने मतप्रसार केल्याची इतिहासात नोंद नाही. पोलपॉट, स्टॅलिन वगैरें नास्तिकांनी अत्याचार केले, पण त्यामागे नास्तिकत्वाचा प्रचार हे कारण नव्हते. तेंव्हा हिंसेच्या एका महत्वाच्या सार्वत्रिक, सर्वव्यापी प्रेरणेपासून नास्तिक दूर आहेत. तरीही नास्तिक नापसंत आहेत.
नास्तिक मंडळी एकूणच जगापासून दूर आणि जगण्यापासून फटकून वागणारी, रागीट, भावनाशून्य, कोरडी वगैरे असतात अशी जनभावना आहे. वास्तविक इतर जनतेत जे स्वभावदोष आढळतात तेच कमीअधिक प्रमाणात नास्तिकांत आढळतात. खरंतर आसपासच्या बहुसंख्य, आग्रही आस्तिक समाजात, नास्तिकांची कुचंबणाच होत असते. घरगुती अथवा सार्वजनिक धार्मिक कार्यात त्यांना बरेचदा मन मारून सामील व्हावे लागते. पण लक्षात कोण घेतो.
नास्तिक आढयतेखोर आणि उर्मट असतात असाही अपसमज दिसतो. बहुतेकदा भांडण हे धर्माला काही कळतं का नाही यावर होतं. धर्माचे राहू द्या. शाळेत दोन मुलींत भूगोलाबद्दल भांडण आहे असं समजा. आता मला सांगा, ज्ञानाच्या या शाखेत, ‘मला सर्व सत्य समजले आहे, सर्व ज्ञान झाले आहे’ असं म्हणणारी उद्दाम; का ‘मला सर्व समजलेले नाही’ असं म्हणणारी? अर्थातच अज्ञानाची शक्यता मान्य असणारी विनम्र आहे हे उघड आहे. मग सृष्टीच्या रीतीपासून ते समाजाच्या नीतीपर्यन्त अंतिम सत्य गवसल्याचा दावा करणारे उर्मट? का हा दावा धाडसाचा आहे असं म्हणणारे? विज्ञान असं मानतं की अंतिम सत्य अशी काही भानगड नसते. आसपासच्या सृष्टीचे सत्यतर ज्ञान करून घेण्याचा एक प्रयत्न म्हणजे विज्ञान. हयात अहंकार कुठे आला. हा तर विनम्रभाव आहे. नास्तिक उर्मट वाटतात कारण ते लोकांच्या श्रद्धा निर्वेधपणे स्वीकारत नाहीत. अर्थातच नि:शंक मनाने जिथे लीनमात्र व्हायचे अशा श्रद्धास्थानाबद्दल थोडीशी शंका देखील ज्वालाग्राही ठरते. पण कालच्या कित्येक श्रद्धा या आजच्या अंधश्रद्धा आहेत आणि ही जाणीव ही सतत शंका आणि प्रश्न विचारण्याचा परिपाक आहे.
नास्तिक अरसिक, भावनाशून्य आणि कोरडे असतात असाही एक समज आहे. हा तर सगळ्यात हास्यास्पद गैरसमज. आज रोजी महाराष्ट्रातले सर्वात प्रसिद्ध नास्तिक म्हणजे पु. ल. देशपांडे आणि डॉ. श्रीराम लागू. आता यांच्या रासिकतेची आणि सर्जनशीलतेची तरफदारी करणारा मी कोण? काव्य-शास्त्र-विनोदाचा आस्वाद घेण्यात नास्तिक अजिबात कमी पडत नाहीत. ‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात’, यातील सखीचे हात हाडामासांचेच आहेत, पण ते चांदण्याचे भासतात आणि विकता विकता त्यांनी बाजारात विकायला आणलेला सूर्य, तो ‘तो’ नव्हे हे नास्तिकांनाही कळतं. मोहक आणि दाहक असे भाव त्यांनाही जाणवतात. शेवटी शब्दार्थ किंवा लक्ष्यार्थ, कधी लक्षात घ्यायचा याचंही (भाषा)शास्त्र असतंय ते! तेवढं नास्तिकांना कळतं.
नास्तिकांना नितीमूल्यांची चाड नसते असाही एक गोड गैरसमज आहे. नास्तिकता दुराचार शिकवत नाही. नास्तिकता हाच दुराचार अशी बहुतेक धर्मात मांडणी असते ती गोष्ट वेगळी. तशी ती परधर्म हा दुराचार अशीही असते. पण नास्तिकांची नीतीमूल्ये सदसद्विवेकातून आणि कायद्यातून येतात. आस्तिक नाव धर्मग्रंथाचे घेतात पण त्यातील सोयीचा तेवढाच भाग आत्मसात करतात. बारकाईने विचार केला तर असं लक्षात येईल की तंतोतंत आपापल्या धर्मग्रंथानुसार जगणे कोणालाच शक्य नाही आणि त्यातील ग्राह्य तत्वे उमगण्यासाठी आणि आचरण्यासाठी धर्मग्रंथांची आवश्यकता नाही. विद्यमान नीतीमूल्ये थेट धर्मग्रंथातून आलेली नसतात. धर्मग्रंथ जणू एक प्रचंड शोरूम आहे आणि कालमान-समाज-प्रकृतीनुसार सारे समाज त्यातून हवे ते वेचून घेत असतात.
नास्तिकांना जगणे निरर्थक, हेतूशून्य वाटत असते अशीही आस्तिक भावना आहे. या विश्वाचा ना कोणी निर्माता आहे ना त्राता. सभोवतीचा हा सारा खेळ कोण्या विशिष्ठ हेतूने आहे असंही नाही. नास्तिकांची अशी रोखठोक भूमिका असते; हे खरं. पण ‘को हम्?’ ‘या असण्याचा हेतु काय?’ असे सुंदर प्रश्न मानवी मनाला पडतातच. ‘हीच्यहाइकर्स गाईड टु द गॅलॅक्सी’ मधे दोन आंतर-आकाशगंगीय तत्वज्ञ, ‘डीप थॉट’ नावाच्या महासंगणकापुढे काही प्रश्न ठेवतात.
‘मी कोण? माझ्या आयुष्याचा हेतु काय? मी उदया उठून कामाला नाही गेलो तर या ब्रह्मांडात काय असा फरक पडणार आहे?’
साडे सात मिलियन वर्ष विचार करून ‘डीप थॉट’ आज उत्तर देणार असतो. त्या दोघांचे वंशज श्वास रोखून उत्तर ऐकायला सज्ज असतात.. आणि शांत धीरगंभीर आवाजात उत्तर येतं,
‘बेचाळीस!’
‘बेचाळीस? हे काय उत्तर आहे?’
‘बे-चा-ळी-स!!!’
‘साडे सात कोटी वर्षांनी उत्तर काय दिलं, तर म्हणे बेचाळीस! बेचाळीस म्हणजे काय समजायचे आम्ही?’
‘मला असं वाटतं,’ महासंगणक शांतपणे उत्तरला, ‘मुळात प्रश्न काय आहे हेच तुम्हाला समजलेले नाहीये. एकदा प्रश्न नीट समजला की उत्तरही समजेल. पण उत्तर बरोब्बर आहे, बेचाळीस!!’
गोष्टीचा मथितार्थ एवढाच की या प्रश्नाकडे आपल्याला दोन दृष्टीने बघता येते. एकतर असल्या प्रश्नांचीच निरर्थक म्हणून वासलात लावून टाकायची. मग बेचाळीस हे उत्तरही तितकेच निरर्थक, आणि म्हणून बरोब्बर म्हणता येईल!
पण हा ‘को हम्?’चा अनाहत नाद असा पाठलाग सोडणारा नाही. म्हणूनच हे जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी आपले आपणच काही करणे भाग आहे हे नास्तिकांना पटलेले असते. सृष्टीला वा जीवनाला देवाने लपवलेला काही गूढ अर्थ आहे, असं नाही. आपण देऊ तोच आयुष्याचा अर्थ आणि रंग. तगणे आणि प्रसवणे ह्या प्राथमिक जैविक प्रेरणा तर आहेतच पण जगणे कृतार्थ करणाऱ्या इतरही कितीयेक प्रेरणा आहेत. नास्तिक अशा प्रेरणांचा शोध सतत, स्वयंस्फूर्तीने, आणि स्वयंप्रज्ञेने घेत असतात. मुळात या सृष्टीचे काही नियम का आहेत? निर्जीव रसायनांतून सजीव, जाणता जीव कसा निर्माण होतो? ह्या अथांग सृष्टीचा वाटणारा विस्मय आणि असा विस्मय आपल्याला वाटतो ह्याचा विस्मय; ही काही उदाहरणे मात्र. या साऱ्याची संगती लावताना नास्तिक देवाला जमेस धरत नाहीत. अज्ञाताचा आणि गूढाचा आनंदसंग आणि चिकित्सा त्यांना मान्य आहे; पण अज्ञाताची आणि गूढाची उपासना त्यांना अमान्य आहे.
धर्मांच्या मते सृष्टी ही नैसर्गिक आणि अतिनैसर्गिक अशी विभागली गेलेली आहे. आसपासची सृष्टी बिनमहत्वाची/माया असून पारलौकिक जग हेच अंतिम सत्य आहे आणि लौकिक तसेच पारलौकिक जगाचे ज्ञान होण्याचा मार्ग म्हणजे धर्मग्रंथ. आश्चर्य म्हणजे प्रत्येक धर्माचे ज्ञान भिन्न भिन्न आहे. अंतिम सत्यही भिन्न आहे, पापपुण्याच्या कल्पना, स्वर्ग-नरकातील शिक्षा आणि सुखेही भिन्न भिन्न आहेत. एकाचा मेळ दुसऱ्याशी नाही. वर हे सर्व देवानेच लिहून ठेवले आहे म्हणे. जर फुटकळ थापाच ऐकून घ्यायच्या असतील तर मग जगातल्या प्रत्येक सूक्ष्मकणावर एक एक परीराणी बसली आहे आणि ती त्या सूक्ष्मकणाची हालचाल नियंत्रित करते आहे आणि इतर सर्व परीराण्यांशी तिचा सातत्यपूर्ण संपर्क चालू आहे आणि या सगळ्या परीराण्या एकमेकींशी संवाद साधत या सृष्टीची रचना आणि तोल सांभाळत आहेत; असं गृहीत धरल्याने तरी काय फरक पडतो? धर्म आणि धर्मग्रंथ आपल्याला असल्या भाकडकथांवर आंधळा विश्वास ठेवायला शिकवतात.
याउलट नास्तिक विचाराचे अनेक फायदे आहेत.
ही सृष्टी देवाने निर्माण केली आहे या भ्रमात राहण्यापेक्षा, सृष्टीची उत्पत्ती-स्थिती-लय आदी विभ्रम समजावून घेण्यासाठी डोकं वापरण्याची आच निर्माण होते.
एकदा तनाने पंचतत्वात विलीन झाल्यावर आपण मनाने आत्म्याने वगैरे शिल्लक राहत नाही अशी खात्री असल्यामुळे पुढच्या जन्माची तयारी किंवा मागच्या जन्मीचे उतराई असला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे पुण्यसंचय आणि पापक्षय याचीही क्षिति नाही. बराच वेळ, पैसा, दगदग आणि तगमग आपोआपच वाचते.
आयुष्याचं जे काय बरंवाईट करायचंय, जे निर्णय घ्यायचे, त्याला नास्तिक मंडळी स्वतःला जबाबदार समजतात. आयुष्याच्या सारीपटावर मनाजोगे दान पडावे अशी नास्तिकांचीही इच्छा असतेच की. परिस्थिती आणि अनेकानेक ज्ञातअज्ञात, परिहार्य आणि अपरिहार्य घटक त्यांच्याही जीवनावर प्रभाव टाकतच असतात. पण त्यासाठी कोणत्याही परातत्वाची प्रार्थना करायला ते उद्युक्त होत नाहीत. देवाला, देवस्थानाला वा प्रतिनिधींना; दान देत; जणू लाच, अडत, हुंडी, वचनचिठ्ठी, तारण, दलाली, गहाणखत असले व्यवहार करत देवावर हवाला ठेवून नास्तिक स्वतःचे नुकसान करून घेत नाहीत.
खरंतर आपला देव वगळता जगातल्या इतर देवांवर आपली श्रद्धा नसतेच. म्हणजे अल्लाच्या बाबतीत हिंदू माणूस नास्तिक असतो आणि इन्का लोकांच्या देवाचा भारतातल्या सिरियन ख्रिश्चनांस पत्ता नसतो. इन्कांच्या देवाला तरी यांचा पत्ता आहे का ते त्यालाच ठाऊक! ‘इतर सर्व देवांवर आपण का बरं विश्वास ठेवत नाही?’ असा विचार केला, की संस्कार, संस्कृती, सामाजिक दबाव असे घटक लक्षात येऊ लागतात. धर्म आणि धर्मग्रंथातील वैय्यर्थ जाणवायला लागते. सार्वजनिक धर्मपालनाच्या कर्णकटू कोलहलाबद्दल उदासी दाटून येते. आपल्या देवावर आपण का विश्वास ठेवावा, असा प्रश्न पडू लागतो. नास्तिकतेकडे प्रस्थान ठेवले जाते.
पण एकवेळ देव आणि धर्म नाकारता येईल, पण संस्कृती? ती कशी नाकारणार? आणि का नाकारावी? रिचर्ड डॉकिन्ससारखे काही, आपण ‘ख्रिश्चन नास्तिक’ असल्याचे सांगतात. समाजधारणा, सामाजिक अभिसरण, संस्कृती, भाषा, रूढी-परंपरा अशा साऱ्यावर धर्माचा गोड काळीमा झाकोळलेला असतो. मानवी संस्कृतीच्या जळात पाय सोडून बसलेला हा असला देवा-धर्माचा औदुंबर; त्याच्या पानाफांद्यातून खाली ऊनसावली जाळी विणत असते. त्यातील धर्माची कृष्ण छाया वगळून विवेकाचे, बुद्धीप्रामाण्याचे आलोकपान म्हणजे नास्तिक्य.
तेंव्हा असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठे? बरी असतात ही मंडळी.
डॉ शंतनु अभ्यंकर वाई
E-mail
shantanusabhyankar@hotmail.com
Please note the s between my name and family name 

प्रथम प्रसिद्धी
लोकसत्ता
लोकरंग पुरवणी
१८.१२.२०२२

Monday, 12 December 2022

'पतंजली'ची जाहिरात आणि 'आम्ही भारताचे लोक'

‘पतंजली’ची जाहिरात आणि आम्ही भारताचे लोक  
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई  

   
रविवारची भली सकाळ. उठलो. चहा सोबत पेपर हातात घेतला आणि सकलज्ञाता, विविधौषधीशिरोमणि, भारतारोग्यत्राता म्हणवणाऱ्या कोणा  जटाधराने दिलेली, ‘अॅलोपॅथीद्वारे पसरवण्यात आलेले असत्य’ अशा मथळ्याची  अर्धे पान  जाहिरात वाचली! झीटच आली. मग सतत फोन वाजायला लागला. आमच्या फार्मकॉलॉजीच्या सरांना हृदयविकाराचा  झटका  आला होता, मेडिसीनचे सर बसल्या जागी आधी अस्वस्थ आणि नंतर अत्यवस्थ झाले होते आणि माझ्या एका परिचित वैद्यांना समोरील धन्वंतरीच्या हातातील अमृतकुंभ उपडा झाल्याचे भास होत होते!
कारण एकच. ‘ती’ जाहिरात. ही जाहिरात हे एक मासलेवाईक उदाहरण फक्त. वास्तविक असा प्रचार सतत चालू असतो. जाहिरातीतील शब्दातून जे सांगण्यात आले आहे ते तर विखारी आहेच पण जे सुचवण्यात आले आहे ते तर अत्यंत विषारी आहे.  
आयुर्वेदात तथ्य किती यावर स्वतंत्र चर्चा व्हायला हवी. पण इथे तो मुद्दाच नाही. फक्त बाबांच्या उच्चार स्वातंत्र्याचा आदर राखत काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत.  
संपूर्ण फार्मा आणि मेडिकल इंडस्ट्री खोटा प्रचार करते आहे असं बाबांचं म्हणणं आहे आणि ही जाहिरात एका फार्मा कंपनीचीच आहे!!! ह्या दोन्हीचा मेळ  कसा घालायचा? जाहिरातीत भलावण केलेली सारी औषधे ‘वैज्ञानिक पुराव्याने’ सिद्ध आहेत म्हणे. म्हणजे कमाल आहे. प्रस्थापित वैज्ञानिक संशोधनाची चार कॉलमी उणीदुणी काढल्यावर पुन्हा विज्ञानाच्याच आणाभाका?   ‘आमचे विज्ञान’ विरुद्ध ‘तुमचे विज्ञान’ असा हा सामना दिसतो. द्वेष, दुफळी, भेद हे आता इथेही शिरलेले दिसतात.

आधुनिक औषधांनी लोकांचे जीवन नरकासमान बनवले आहे असा सलामीचा दावा आहे.  आपले जीवन पूर्वीपेक्षा खरोखरच नरकासमान झाले आहे का? आरोग्यसेवांची आणि लसी, पाणी, संडास वगैरेची उपलब्धता, सरासरी आयुर्मान, माता मृत्यू, अर्भक मृत्यू, पर्यावरण असे आरोग्यमान वर्तवणारे सुमारे दोन डझन निकष आहेत. या साऱ्या निकषांवर आपण प्रगतीच केलेली दिसते. ती पुरेशी नाही, संथ आहे वगैरे आक्षेप असू शकतील पण आपण नरकात पोहोचलो आहोत हा दावा जरा अतिच होतोय, आणि त्यामुळे हसूही  येतंय.
लोकांना नेहमीच तुम्ही किती रंजलेले, गांजलेले, गरीब बिच्चारे, असा सूर आवडतो. गुरूंनी ही गोष्ट नेमकी हेरली आहे. म्हणूनच त्यांनी, तुमचे जीवन नरकासमान इथून  सुरूवात  केली आहे. म्हणजे आपोआपच हे तारणहार.  ज्योतिषी जसे, ‘तू दिलाचा  चांगला पण दुनिया वाईट बघ..’ अशी सुरवात करून गिऱ्हाइक खिशात घालतात तद्वतच हे.  
पुढे अॅलोपॅथी सरसकट खलनायक असून आपली औषधे निर्धोक असल्याचे म्हटले आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की आयुर्वेदिक औषधे बाजारात येण्यापूर्वी सुरक्षा, परिणामकारकता वगैरे कोणत्याही चाचण्या आवश्यक नसतात! केवळ पारंपारिक वापर हा इष्ट पुरावा मानला जातो.  म्हणजे ही एक आंधळी कोशिंबीरच आहे. अशा परिस्थितीत तर असे बेधडक दावे करणे अधिकच धोक्याचे आहे.  
पण अॅलोपॅथी आणि साइडइफेक्ट हे शब्द  आता शाहू-फुले-आंबेडकर यांच्याइतके जोडशब्द म्हणून रूढ करण्यात अन्य पॅथीय यशस्वी झाले आहेत. प्रत्येक औषधाला, मग त्याच्या भाळी कोणत्याही पॅथीचा टिळा लावला तरी, काही ना काही सहरिणाम असतातच. सगळेच सहपरिणाम दुष्ट नसतात.  (काही सुष्टही असतात.) प्रामाणिकपणे त्याची नोंद करणे, कारणे शोधणे आणि त्यावर उतारे शोधणे हे अॅलोपॅथीत सतत चालू असतं. औषध बाजारात येण्यापूर्वी आणि  नंतरही निरंतरपणे असा पहारा राखला जातो. म्हणूनच काही वेळा, दुष्परिणाम लक्षात येताच, औषधे माघारी घेतली जातात (रीकॉल).  असा प्रकार अन्य पॅथीमध्ये घडत नाही कारण अशी व्यवस्थाच नाही. हे चांगले का वाईट?  दुष्परिणाम नाहीत असं
सांगितलं जातं त्या मागील सत्य हे की ते तपासलेलेच नाहीत. त्यांची नोंद ठेवायची काहीही व्यवस्थाच  नाही. म्हणूनच परिणामकारकता आणि सुरक्षितता या दोन्ही बाबतीत आधुनिक औषधे कित्येक पायऱ्या वरचढ आहेत.  
जाहिरातीतील, ‘…टाईप वन डायबेटीजच्या रुग्णांना नॉन डायबेटीक केले आहे.’; ‘बीपी आणि बीपी कॉम्प्लिकेशन्सच्या समस्यांना संपूर्णपणे बरे केले आहे.’ वगैरे विधाने वाचून माझ्या गुरुवर्यांनी अंथरूण धरले. असले बेफाट दावे किती जबाबदारीने आणि किती अफाट पुराव्यानिशी करावे लागतील याची त्यांना पूर्ण जाणीव असल्याचा हा परिणाम. या सदृश दावे कोणी आधुनिक वैद्यक करूच धजणार नाही आणि केलेच तर त्याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज अॅक्टचा बडगा आहेच.  हा बडगा खरेतर या महाशयांनाही आहेच.  पण पुरेसे घी असेल तर बडग्याची तमा कोण बाळगतो?  
पण या मावेच्या मइंदाची सगळ्यात मोठी फत्ते म्हणजे  विज्ञाननिष्ठ उपचारांबाबत त्यांनी पेरलेला संशयकल्लोळ. इयागोलाही लाजवेल अशा सफाईने हे काम साधले आहे.  असल्या जाहिरातींना भुलून लोकं स्वतःच्या जीवरक्षक उपचारांकडे संशयाने पाहायला लागतात.  काही उपचार सोडून देतात आणि होतील त्या परिणामांना कवटाळतात. भयगंडाने पछाडलेले असे अनेक रोगी अनुभवास येतात. विज्ञाननिष्ठ, योग्य, प्रभावी, सुरक्षित उपचारपासून ते स्वतःला वंचित ठेवतात किंवा असे उपचार घेण्यास उशीर करतात. जणू पाणी असूनही तहानेने मरण पत्करतात! ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’चा हा साईड इफेक्टच नव्हे का?   याला जबाबदार कोण?    
असाध्य आणि प्राणघातक आजार बरे करतो, असाही दावा आहे. अगदी याच शब्दात आहे.  अशा आजारांच्या यादीत हार्ट ब्लॉकेज नावाचाही आजार आहे. ‘हार्ट ब्लॉकेज’ असा कोणता आजारच नाही. हा सामान्य भाषेतला ओबडधोबड शब्द आहे. यात अनेक आजार बसू शकतात, कोरोनरी व्हेसलमध्ये अडथळा, हृदयात रक्ताची गुठळी, हृदयाच्या स्पंदन-तंत्रामध्ये दोष असे अनेक. म्हणजे तज्ञांनी नेमके समजायचे काय? उत्तर असे की हे तज्ञांसाठी नसून अज्ञांसाठीच
आहे. संभाव्य गिऱ्हाइकांसाठी आहे. ज्याने त्याने आपल्या सोयीने अर्थ काढायचा आहे.  
भोंगळ भाषा हे इथले ब्रह्मास्त्र आहे. विरोधकांना नामोहरम करण्याची ही खाशी युक्ति आहे. सुसंबद्ध बोलण्याचा काही प्रतिवाद शक्य आहे. असंबद्ध बरळणे असेल तर वाद कसा घालणार? शिवाय इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या आजारांबद्दल इतके बेधडक दावे केले आहेत की वाचून मती गुंग होऊन जाते. प्रतिवादाला सुरवात कोठून करावी असा प्रश्न पडतो.  
आजारांचे वर्गीकरण साध्य आणि असाध्य अशा दोनच पक्षात करणे हा आणखी एक बुद्धीभ्रम. काही आजार साध्य असतात काही प्राणघातक असतात पण बरेचसे अधलेमधले असतात. डायबेटीस, ब्लड प्रेशर, गुडघ्याची झीज  हे यातले सर्वपरिचित. ह्यांना क्रोनिक मॅनेजेबल डिसीज म्हणतात.  
पण बाबांना असाध्य या शब्दाचा मोठा मजेदार अर्थ अभिप्रेत आहे. जे आजार औषधाच्या एका फटक्यात वठणीवर येत नाहीत ते सारे असाध्य.  औषधे घेत राहायला लागणे  हा अॅलोपॅथीचा मोठाच दुर्गुण आहे म्हणे.  हे अजबच आहे. तिसाव्या वर्षी डायबेटीस झालेला माणूस पूर्वी दहाच वर्षे जगत असे. आज तो सत्तरीपर्यंत सुखात जगतो. औषध घेत आणि जगण्याचा मनमुराद  आनंद घेत जगतो. समजा सत्तरीत त्याच्या किडन्या गारद झाल्या आणि हा मेला! मग आता चाळीशीतच निकामी होणारी किडनी जर औषधमात्रेमान सत्तरीपर्यंत तग धरत असेल तर हे यश म्हणायचे का अपयश? अहो किडनीच ती. जन्माला आली म्हणजे ती कधी ना कधी तरी मरणारच. पण आजचे मरण उद्यावर ढकलता आले हे काय कमी आहे? शेवटी आजचे मरण उद्यावर ढकलणे आणि तोवरचे जीवन सुसह्य करणे, हेच तर वैद्यकीचे ध्येय आहे. मग हे आजारपण साध्य होण्यासाठी किडनीला अमृत पाजणे अपेक्षित आहे काय? आणि असली रामबाण  गुटी  बाबाच्या बटव्यात तरी आहे काय?  
हा लांबवलेला पल्ला व्यर्थ म्हणायचा का? याला ‘ड्रग्जने जीवन नरकसमान होणे’, ‘लो इमयुनिटी होणे’, ‘आजार समूळ न जाणे’, ‘कायमस्वरूपी
उपाय नसणे’ असं शेलक्या शब्दात हिणवायचं का?  आणि हे सगळे आपल्याकडे आहे हा बाबाचा दावा खरा  म्हणायचा की निव्वळ पोकळ वल्गना?  
अशा प्रचारामुळे आयुर्वेदाचे तरी भले होते काय? तर नाही. बहुसंख्य वैद्य या साऱ्या प्रकारावर नाखुषच आहेत. प्रचार आणि प्रसार होतो तो औषध कंपनीचा.  काही शक्यता उरी बाळगून असलेल्या प्राचीन औषध परंपरेचे फक्त हंसे आणि थिल्लरीकरण होते.  
असे भडक, आक्रमक आणि छातीठोक दावे, त्यावर कफनीचे कवच आणि रुद्राक्षाची कुंडले! मग पॅथीचा पंथ बनतो. रुग्णाईत भक्त होतात. धन्वंतरींच्या हाती आता जलौका आणि अमृतकुंभ नव्हे तर त्रिशूळ आणि हलाहल दिसायला लागते. अफूची गोळी हीच ज्यांचा धर्म आहे अशांनी धर्माची अफूगोळी  व्यवसायात घोळली की चढणारी नशा औरच. अशा नशेत विज्ञान आणि विवेकाचा बळी जाणार हे ठरलेले. हे वेळीच रोखायला  हवे.  तरच ‘आम्ही भारताचे लोक’ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे खरे पाइक ठरू.  


पूर्वप्रसिद्धी 
लोकसत्ता
13.12.2022

Saturday, 3 December 2022

भगीरथाचे पुत्र

 

भगीरथाचे पुत्र  

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

वैद्यकशास्त्रात नेहमी नवीन नवीन शोध लागतच असतात. शस्त्रक्रियेच्या पद्धती बदलतात, अवजारे बदलतात, यंत्र बदलतात, तंत्र बदलतात आणि उपचार अधिकाधिक तंत्रशुद्ध, अधिकाधिक बेतशुद्ध, अधिकाधिक सुरक्षित आणि अधिकाधिक खात्रीशीर बनत जातात. प्रत्येक उपचारात आणि शस्त्रक्रियेमध्ये शतकांनुशतके सुधारणा होतच आहे, पण इतर अनेक क्षेत्रातील प्रगतीप्रमाणेच गेल्या काही दशकातील  प्रगतीचा झपाटा  आश्चर्यमुग्ध करणारा आहे.

बदलत्या शल्यवास्तवाचं आपल्या डोळ्यादेखत घडलेलं उदाहरण म्हणजे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया. माझी पणजी होती. रोज पार्थिवाची पूजा करायची. मातीची शंकराची पिंड करून पूजा झाल्यानंतर ती विसर्जित केली जायची. आपल्या  अधू डोळ्यांनी ती हे कसंबसं उरकायची. हळूहळू हेही जमेना. ठार आंधळी झाली ती. दिवसरात्र डोळ्यापुढे मिट्ट काळोख. मग एक डॉक्टर घरी बोलावले गेले. त्यांनी ऑपरेशनचं साहित्य घरच्या चुलीवर उकळून मागितलं. पणजीच्या डोक्याशी बसून घरच्या घरीच तो मोतीबिंदू त्यांनी काढून टाकला. तो काढताच पणजीच्या नजरेसमोर जगाचा रंगमंच उजळला. त्यांनी भलंमोठ्ठ  बँडेज बांधलं. डोकं अजिबात हलू नये म्हणून दोन्ही बाजूला वाळूच्या पिशव्या ठेवल्या. चार दिवस पणजी त्याच अवस्थेत.  बँडेज काढल्यानंतर तिला लख्ख दिसायला लागलं. लख्ख म्हणजे १९४७ सालातले लख्ख. सुई-दोरा ओवायला वगैरे नाहीच दिसायचं, चार पाच फुटापर्यंत, हिंडाफिरायला दिसायचं. स्पष्ट दिसायसाठी तो जाड जाड भिंगाचा जड जड चष्मा घालावा लागायचा. डोळ्यातील अपारदर्शक झालेले भिंग काढले होते पण त्याजागी दुसरे बसवण्याचे तंत्र तेंव्हा नव्हते. निर्भिंग नजर ही इतपतच असते. पण तरीही हा विशेष आनंदाचा प्रसंग. कारण यापूर्वी हाच प्रकार दुसऱ्या डोळ्यासाठी करून झाला होता, पण काहीतरी बिनसलं होतं आणि तो डोळा कायमचा गेला.

याउलट आज कोणी ठार आंधळे होण्याची वाट पहात नाही. मोतीबिंदूची सुरवात आहे म्हणताच पेशंट दवाखान्यात जातात. डोळ्यात थेंब टाकले जातात. काही मिलीमीटर छिद्रातून मोतीबिंदू काढून टाकला जातो. त्या जागी कृत्रिम भिंग बसवले जाते आणि स्पामध्ये जाऊन मसाज घेऊन यावं, अशा उल्हसित चित्रवृत्ती घेऊन माणसं घरी परततात. ऑपरेशन म्हणजे अक्षरशः पंधरा-वीस मिनिटांचा खेळ. अत्याधुनिक भिंगारोपणामुळे (Multifocal lens) वाचायला, लॅपटॉप, टीव्ही, सिनेमा, रस्त्यावरची गंमत असं सारं चष्मा न लावता दिसतं. जुने चष्मे अडगळीत जातात. ऐंशी वर्षाची म्हातारी आणि नजर जणू  वय सोळा, असा प्रकार. ऑपरेशन कसलं, नजरबंदीचा खेळच जणू. ही नेत्रदीपक करतूद पाहून असं वाटतं की डॉक्टरनी अजून मन  लावून प्रयत्न केले, तर या माणसाला गुप्तधन सुद्धा दिसेल! 

डोळ्यातील मूळ भिंग हे काचेचे नसतं. ते असतं स्फटिकाचे. हे स्फटिक भिंग एका पारदर्शक पाकिटात ठेवल्यासारखे असते. हे लवचिक भिंग आवश्यकतेनुसार जवळचे पाहण्यासाठी फुगीर आणि लांबचे पाहण्यासाठी पातळ होत असते. याच्या कडा ताणून किंवा सैलावून भिंगाचा आकार बदलण्याची सोय असते. मोतीबिंदू होतो म्हणजे या भिंगातील स्फटिक अपारदर्शक व्हायला लागतात. मोतीबिंदू ‘पूर्ण पिकला’ की बुबुळात मोतिया रंगाचा मणी लांबूनसुद्धा दिसतो. भिंगाचे जे पाकीट असतं ते सहसा अपारदर्शक होत नाही. याच्यातले स्फटिक मात्र अपारदर्शक होतात. पाकिटासकट (वेष्टित) मोतीबिंदू  काढणे किंवा पाकीट जैसे थे ठेवून, फक्त (अवेष्टित) मोतीबिंदू काढणे, हे शस्त्रक्रियेचे दोन प्रकार.

वयानुरूप  किंवा क्वचित इतर कारणांनी भिंग अपारदर्शक व्हायला लागते. याला इलाज नाही, कोणतेही औषध नाही, ही एक नैसर्गिक क्रिया आहे, ती थांबवता येत नाही.  हे भिंग अपारदर्शक व्हायला लागलं की कमी दिसायला लागतं. नजर पुरेशी अधू झाली की ऑपरेशनचा निर्णय घेतला जातो. वर म्हटल्याप्रमाणे, ‘पुरेशी अधू’ म्हणजे किती, याची व्याख्या शतकभरामध्ये बदलत आलेली आहे आणि त्यामुळे ऑपरेशनचं वेळापत्रकही बदलत आलेले आहे.

फार फार पूर्वी मोतीबिंदू बाहेर काढण्याऐवजी आतल्या आत डोळ्यात ढकलला जायचा (कौचींग, Couching). शुश्रुतानेही याचे वर्णन केलेले आहे. श्वेतमंडल (डोळ्याचा पांढरा भाग, Sclera) आणि कृष्णमंडल (बुबुळ, Cornea) यांच्या सीमेवर एक दैवकृत छिद्र असतं, अशी त्याची कल्पना. त्यातून एक शलाका (जाड सुई) आत सरकवून एका धक्क्यासरशी तो मोतीबिंदू आत ढकलला जायचा. भूल नव्हतीच, तेंव्हा हे काम झटपट उरकावं लागायचं. पण अशी कुशल मंडळी होती. पारावर पेशंटच्या पुढ्यात उकिडवं बसून, गप्पा मारता मारता, डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर हा कार्यभाग उरकला जायचा!  नंतर ना चष्मा, ना कृत्रिम भिंग; तेंव्हा या शस्त्रक्रियेचा उपयोग मर्यादितच. पण मुळात आयुष्यमानच जिथे जेमतेम तीस-चाळीस वर्षं होतं तिथे मोतीबिंदू हा क्वचित दिसणारा प्रश्न असणार. पण या प्रकारात यश तसे यथातथाच. दृष्टी अडवणारा हा मणी दूर झाल्यामुळे तात्काळ दिसू लागायचं, पण आत पडलेला मोतीबिंदू बरेचदा तापदायक ठरायचा, त्याची रिएक्शन यायची, निर्जंतुक पद्धत न वापरल्यामुळे सर्रास इन्फेक्शन व्हायचं आणि पुढे काही दिवसात तो डोळा, कायमचा मिटायचा. कायमचे अंधत्व विरुद्ध कामचलावू दिसण्याची शक्यता, असा हा जुगार होता. खेड्यापाड्यात क्वचित आजही असा प्रकार केलेली मंडळी दिसतात.

पण खेड्यापाड्यात कशाला जगातल्या एका मोठ्या देशाच्या, सर्वोच्च हुकुमशहासाठीही कौचींग केले गेले असे इतिहास सांगतो. जीन-पी-शु म्हणजे चिनी भाषेत कौचींग. हे तंत्र भारतातून सिल्क रूट मार्गे चीनमध्ये पोहोचलं. एक प्रकारचे अक्यूपंक्चरच की हे; म्हणून लोकप्रियही झालं. १९११ साली चिनी प्रजासत्ताकाची स्थापना होताच पाश्चात्य वैद्यकीला सरकारी पाठींबा मिळाला. कौचींगचे तंत्र मागे पडलं. वेष्टित मोतीबिंदू काढण्याची पद्धत स्वीकारली गेली. मात्र  माओ झे डोंगचे राज्य येताच (१९४९) चित्र पालटले. माओ हा चीनचा सर्वेसर्वा. सत्तेवर येताच त्यानी  पारंपारिक चिनी वैद्यकीला पाठींबा दिला. अगदी जीन-पी-शु नेही पुन्हा जोर धरला. पुढे दस्तुरखुद्द चेअरमन माओ यांनाच झाला की मोतीबिंदू. माओच्या डोळ्याला हात लावण्याची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. पण सही करायलाही दिसेना. लोकं कागद वाचून दाखवत, पण त्यावर विश्वास कसा ठेवायचा? माओचे आधुनिक पद्धतीने  ऑपरेशन करावे की जीन-पी-शु करावे, हा मोठा गहन प्रश्न. शेवटी बीजिंगमधले मोतीबिंदूवाले भिकारी गोळा केले गेले. निम्मे जीन-पी-शु आणि निम्मे ऑपरेशनने उपचारिले गेले. आश्चर्य म्हणजे चक्क कौचींगचे तंत्र वरचढ असल्याचे ठरले! (किंवा ठरवले गेले) आणि माओचा मोतीबिंदू कौचींगनी आत ढकलण्यात  आला!! चिन्यांच्या मते यातील सर्वात अविश्वसनीय भाग बीजिंगमध्ये भिकारी सापडले हा आहे!!!

 झ्या़क दाव्हिएल्,  या फ्रेंच डॉक्टरने १७४७ साली डोळा उघडून, भिंगाच्या पाकीटाचा शिंपला उघडून, त्यातील मौक्तिक काढून टाकण्याची शस्त्रक्रिया प्रथम केल्याची नोंद आहे. त्याच्या ५०% पेशंटना दिसू लागलं म्हणे. संपूर्ण भिंग आत ढकलून देण्याच्या बेभरवशाच्या आणि धोकादायक पद्धतीपेक्षा ही पद्धत खूपच यशस्वी ठरली. पुढे जवळपास शतकभर ही द्धत वापरात होती.

याच सुमारास तंजावरचे राज्यकर्ते सरफोजीराजे  भोसले (दुसरे), (राज्यकाळ १७९८ ते १८३२),  यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा बारकाईने अभ्यास केला होता.  राजे सरफोजी स्वतः डोळ्याच्या शस्त्रक्रिया करत असत. मोतीबिंदूसाठी शुश्रुताचीच पद्धत (Couching) वापरली जात होती. डोळ्याची सूज उतरावी म्हणून जळवा लावल्याचेही उल्लेख आहेत. विविध नेत्रविकारांच्या ४४ पेशंटच्या नोंदी आणि १८  चित्र तिथल्या सरस्वती महाल ग्रंथालयामधील हस्तलिखितांत  सापडली आहेत.  सहा नोंदी मोडी लिपीमध्ये तर बाकीच्या इंग्रजीत आहेत. त्यांनी तेथे धन्वंतरी महाल नावाने इस्पितळ उघडले होते. आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी पद्धतीचे उपचार तिथे उपलब्ध होते. डॉ. मॅकबीन हा विलायती (इंग्लिश) डॉक्टर तिथे कामाला होता. टी. एस. अमृतलिंगम पिल्लई  हा वैद्यही तिथे होता. 

पुढे एकोणिसाव्या शतकात पाकीट उघडून मोती काढण्याऐवजी, पाकिटासकट सगळेच भिंग काढून घ्यायची पद्धत विकसित झाली. सॅम्युअल शार्क याने १७५३ साली पाकिटासकट भिंग काढून दाखवले. हे भिंग डोळ्याबाहेर ढकलण्यासाठी अनेक तंत्र वापरात होती.  अंगठ्याने दाब देणे, खास चिमट्याने पकडणे, वगैरे वगैरे. पुढे एका छोट्या कांडीचे टोक भिंगाला टेकवलं जाई, या कांडीतून अतीशीत असा नायट्रस ऑक्साइड वायू खेळवलेला असे. या कांडीच्या गार टोकाला तो मोतीबिंदू घट्ट चिकटून बसे आणि मग तो अलगद ओढून बाहेर काढला जाई (क्रायो पद्धत). पुढे फेकोइमल्सीफीकेशनसाठी प्रसिद्ध पावलेले डॉ. चार्ल्स केलमन यांचीच ही युक्ती.

भुलीचे आणि निर्जंतुकीकरणाचे तंत्र सुधारल्यानंतर ही पद्धत अतिशय सोपी, सुरक्षित आणि म्हणून लोकप्रिय ठरली. पण या पद्धतीचे काही तोटे होते. पाकिटासकट (वेष्टित) भिंग काढले जात असल्यामुळे काही गुंतागुंत उद्भवत असे. या पद्धतीचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे ते भिंग काढायला मोठाच्या मोठा छेद घ्यावा लागे. गाडीचे बॉनेट उघडावे तसे बुबुळ ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कापून उघडून धरले जाई. मग ते टाके घालून बंद केले जाई. हे टाके कमी जास्त घट्ट बसत आणि बुबुळ (Cornea) वेडेवाकडे ओढले जाई. कॉर्निया हा खूप महत्त्वाचा अवयव आहे. स्वच्छ, सम-फुगीर, बिन सुरकुतलेला कॉर्निया असेल, तर नजर चांगली राहते.  पण या पद्धतीत ते वेडेवाकडे  ताणले  गेल्यामुळे नजरही कुठे स्वच्छ तर कुठे अंधुक होऊन जाई.

शल्यक्रियेत झालेल्या तांत्रिक प्रगतीमुळे आता पुन्हा एकदा पाकीट जागेवर ठेवून, आतला मोती तेवढा काढण्याची पद्धत वापरली जाते (अवेष्टीत). आता मोत्याएवढा मोठा छेद घ्यावा लागत नाही.  आता तो मोती विरघळवता  येतो. जेमतेम दोन-तीन मिलीमीटरचा छेद घेऊन काम भागतं. छोटा छेद म्हटल्यावर टाके कमी किंवा नाहीतच. त्यामुळे कॉर्निया वेडावाकडा होण्याची शक्यता कमी. त्यामुळे नंतर नजरही स्वच्छ. याला म्हणतात फेको इमल्सीफिकेशन. लाडाचं नाव फेको.  डॉ. चार्ल्स केलमन  यांनी हे तंत्र अमेरिकेत विकसित केले (१९६७). केलमन निव्वळ डॉक्टरकीत रमणारे  नव्हते. गाण्याबजावण्यात त्यांना विलक्षण रस होता. टीव्ही शो, गाणे, ब्रॉडवेवर संगीतीकांची, नृत्य नाटयांची निर्मिती असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांचे. आवाजाच्या दुनियेच्या या दोस्ताला आवाजाचा वापर करून डोळ्यातील मोती, चूर करण्याची युक्ति सुचली. हेच ते फेको इमल्सीफिकेशन. इथे श्रवणातीत (आपल्याला ऐकू येऊ शकत नाहीत अशा) ध्वनिलहरींचा वापर केला जातो.   

ही पद्धत अतिशय नाविन्यपूर्ण आहे. कोणतीही नवीन गोष्ट शिकायला कष्ट, वेळ आणि चुकांची आहुती द्यावी लागते. हे करायला, त्याकाळी बहुसंख्य प्रस्थापित डॉक्टर नाखुष होते. त्यामुळे या तंत्राविरुद्ध लगेच मोठा गदारोळ उठला. ‘फेको को फेको’ अशी व्याख्यानेही होत असत. आपल्याकडेसुद्धा. पण हा झाला इतिहास. या सगळ्या मतमतांतरातून आज हे तंत्र सर्वोत्तम म्हणून सार्वत्रिकरित्या  विद्यमान झाले आहे.

आज डोळ्यात थेंब टाकून डोळ्याची बाहुली मोठी केली जाते. मग डोळ्यात थेंब टाकून  भूल दिली जाते. आता सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहात एक मिलिमीटरचे छिद्र पाडले जाते. त्यातून डोळ्यात जेली भरली जाते. आता डोळा टम्म फुगलेला राहतो. मग 1.8 मीमीचा आणखी एक छेद घेतला जातो. हा छेद मुद्दाम तिरपा-तिरपा घेतल्यामुळे, काम होताच आपोआपच बंद होतो आणि मिटून रहातो. टाके लागत नाहीत. आता मोतीबिंदूच्या पाकिटाला एक गोल खिडकी पाडली जाते. या खिडकीतून फेको इमल्सीफिकेशन करणाऱ्या मशीनची कांडी आत सरकवली जाते. यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींच्या कंपनांमुळे मोतीबिंदूच्या ठिकऱ्याठिकऱ्या  होतात. हे तुकडे या कांडीतील सूक्ष्म छिद्रातूनच शोषून घेतले जातात. पाकिटाच्या त्या निवळशंख मखरात आता कृत्रिम भिंगाची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

कृत्रिम भिंगामुळे ही शस्त्रक्रिया म्हणजे एक समृद्ध अनुभव ठरतो. कृत्रिम भिंगाचा शोध सर हरॉल्ड रिडले  यांचा. दुसऱ्या महायुद्धातील गॉर्डन क्लीव्हर या  वायुसैनिकाच्या डोळ्यात विमानाच्या काचेचे तुकडे घुसलेले होते. ही ‘काच’ काचेची नसून खास प्लास्टिकची होती. सहसा कोणत्याही परक्या वस्तूविरुद्ध आपले शरीर पेटून उठते. लगेच त्या भागात सूज येते. मात्र या तुकड्यांचा काहीही त्रास त्या सैनिकाला जाणवत नव्हता. यावरून अशा प्रकारचे प्लास्टिक (पीएमएमए पॉलीमेथीलमेथाअॅक्रीलेट) वापरून भिंग बनवता येईल अशी कल्पना सुचली. अर्थातच कल्पना आणि ती प्रत्यक्षात आणणे यामध्ये अनंत अडचणी होत्या. भिंग पाकीटासकट (वेष्टित) काढायचे तंत्र तेंव्हा वापरात होते. कृत्रिम भिंग नेमकं कुठे बसवायचं, कसं बसवायचं, ते स्थिर राहील यासाठी काय करायचं, असे अनेक प्रश्न होते. प्रयोग, अनुभव आणि तांत्रिक सुधारणांच्या झपाट्यामुळे अतिशय उपयुक्त सुरक्षित आणि आपले स्थान अढळ  राखणारी भिंगे निर्माण झाली आहेत.

आता भिंगाला अगदी सुरक्षित आणि नैसर्गिक जागा म्हणजे त्याची मूळ जागा; हे लक्षात घेऊन पाकीटात बसतील अशी भिंगे वापरली जातात. त्यामुळे पाकीटाला धक्का न लावता आतला मोतीबिंदू तेवढा काढला जातो. त्या रिकाम्या पाकीटात सध्याची भिंग अंग चोरून आत शिरतात (Foldable lens) आणि आत गेल्यानंतर आपल्या स्थानी विस्तार पावतात. जवळचे आणि लांबचेही दाखवणारी भिंगे, कोर्नियाच्या घडीवर कुरघोडी करणारी भिंगे (Astigmatic correction), अशी अत्याधुनिक भिंगे आता उपलब्ध आहेत. इतकेच काय, पण भिंग नेमकं किती पॉवरचे हवं हे मापून त्यानुसार भिंग वापरले जाते. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने डोळ्यात बसवलेल्या भिंगाची शक्ती आणि क्षमता बाहेरून ऍडजेस्ट करता येईल असेही  तंत्र विकसित होते आहे.

पण कितीही भारी भारी तंत्र विकसित केली तरी जर ती गरजुंपर्यंत पोहोचलीच नाहीत तर उपयोग काय? याबाबतीत आपली कामगिरी पुढारलेल्या देशांना साजेशी आहे. सरकार, भारतीय डॉक्टर आणि अनेक स्वयंसेवी संस्था यांची ही मर्दुमकी. 

आज मदुराईतील अरविंद नेत्रालयाने घालून दिलेली पद्धत जगभर आदर्शवत ठरली आहे. डॉ. गोविंदप्पा वेंकटस्वामी हे त्याचे प्रणेते.  हे मुळात स्त्रीआरोग्यतज्ञ पण संधीवातामुळे त्यांना प्रसूती वगैरेला लागणारे शक्तीचे प्रयोग झेपेनात. मग ते नेत्रविशारद झाले आणि निवृत्तीनंतर त्यांनी अंधत्व निवारणाला वाहून घेतले. योगी अरविंदांच्या नावे त्यांनी अकरा खाटांचा छोटा दवाखाना सुरु केला (१९७६). आज हे संशोधन, शिक्षण आणि सेवा यासाठी जगातले एक मोठे केंद्र आहे. हेन्री फोर्डने जे गाड्यांच्या निर्मितीत केले, ते त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रीयेसाठी केले. चक्क असेम्बली लाईनच्या तत्वावर काम सुरु केले.  गावोगावी शिबिरे, शेकडो पेशंट, शिस्तबद्ध तपासणी, त्यांना केंद्रात घेऊन जाण्यासाठी आणि सोडण्यासाठी वहाने, पाठोपाठ शेकडो शस्त्रक्रिया असा हा उपक्रम. बिले भरणारे आणि फुकट असे दोन्ही प्रकारचे पेशंट; पण सेवेचा दर्जा तोच आणि आदबही तीच. मोतीबिंदूचा कारखाना काढावा अशा प्रमाणात काम, त्यामुळे किंमत कमी. अल्पमोलात   उत्कृष्ट दर्जा हे जणू  त्यांच्या कामाचे लक्षणगीत.

एकूणच डॉ. गोविंदप्पा वेंकटस्वामी यांचे प्रयत्न विलक्षण यशस्वी ठरले. तामिळनाडू/अरविंद  मॉडेल म्हणून जगभर नावाजले गेले.  त्यांच्या आधी डॉ. एम.सी.मोदी यांनी देखील अशा पद्धतीचा ओनामा घालून दिला होता. उत्तम कार्य केले होते. मात्र अरविंद नेत्रालयाचा कारभार अधिक आधुनिक, शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध होता. त्यांच्याही एक पाऊल पुढे जात, हैद्राबादला डॉ. जी.एन. राव यांनी, एल.व्ही.प्रसाद आय हॉस्पिटलमार्फत, निव्वळ मोतीबिंदू नव्हे तर डोळ्यांच्या हरतऱ्हेच्या विकारांवरील उपचार समाजाच्या तळागाळात पोहोचवले.   प्राथमिक तपासणी (व्हिजन सेंटर), संदर्भ सेवा, सातत्यपूर्ण सेवा ही यांची वैशिष्ठ्ये. आता तर सॉफ्टवेअरच्या मदतीने या साऱ्या सेवा एकमेकांशी जोडलेल्या आहेत.

यापासून स्फूर्ती घेऊन भारतभर अशा अनेक सेवा-संस्था उभ्या राहील्या आहेत. सेवा आणि गरजू यांच्यातली दरी हा वैद्यक विश्वात सतत चिंतेचा विषय आहे. म्हणूनच राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम (१९७६) आखला गेला. असा कार्यक्रम राबवणारा भारत हा जगातला पहिला देश. वीस कलमी कार्यक्रमात याचा अंतर्भाव होता. त्याकाळी १.३४% जनता उपचार असूनही अंध होती. आज भारतात उपचार असूनही अंध राहिलेला माणूस क्वचितच आढळतो. (०.३ ते ०.४%).

शल्यतंत्र विकसित करणारे तर महान आहेतच पण भगीरथ प्रयत्नाने पृथ्वीवर आणलेली ही गंगा तहानलेल्याच्या मुखी पोहोचवणारेही भगीरथाचे पुत्रच म्हणायला हवेत, नाही का? 



पूर्वप्रसिद्धी 

महा अनुभव 

डिसेंबर २०२२