Wednesday, 30 March 2022

एकटा (प्रस्तावना)

 

एकटा

प्रस्तावना

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

रधों म्हणजेच र. धों. अर्थात रघुनाथ धोंडो कर्वे.  ह्या अवलिया, उपेक्षित, विचारवंत, आचारवंत  आणि एकांड्या शिलेदारावर, एक वाचनीय पुस्तक श्री. उमेश सूर्यवंशी यांनी अत्यंत कळकळीने लिहिलं आहे.  त्याला ‘एकटा’ हे सार्थ आणि समर्पक नाव दिलं आहे. सुमारे शतकभरापूर्वी होऊन गेलेल्या एका माणसाची तळमळ पाहून, आपल्या कार्याप्रतीची निष्ठा पाहून, एका भारावलेल्या अवस्थेत त्यांनी हे लिखाण केले आहे.  

डॉ. य. दि. फडके, डॉ. आनंद देशमुख आणि इतरांनी, रधोंवर भरपूर काम करून ठेवले आहे आहे.  विशेषत: डॉ. अनंत देशमुख यांनी  आठ खंडांमध्ये समग्र रधों  आपल्यापुढे मांडले  आहेत.  ह्या पुस्तकाची जातकुळी जरा  वेगळी आहे. जन्म, बालपण, शिक्षण, कर्तृत्व, मृत्यू अशा रूढ चाकोरीतून हे पुस्तक जात नाही. एक वेगळा आकृतिबंध यासाठी लेखकाने निवडला आहे नाही छोट्या छोट्या लेखांमधून त्या व्यक्तीच्या कार्याचा परिचय, रसग्रहण आणि मूल्यमापन येथे आहे.

कार्याप्रती असीम निष्ठा हे रघुनाथरावांचे वैशिष्ट्य. एक वेळ वैयक्तिक जीवनात काही हानी झाली तरी चालेल पण सार्वजनिक संस्थांमध्ये हिशोब चोख असले पाहिजेत हे तत्व रधों स्वतः जगले.  वैयक्तिक तोशीस  सोसून त्यांनी समाजाचा आणि ‘समाजस्वास्थ्य’चा  संसार कवडीकवडी करून उभा केला. हा द्रष्टा  शब्दश: अखेरपर्यन्त कार्यरत होता. सरकार खटले भरत असतानाच रधोंचा  मृत्यू झाला.  तयार असलेला ‘समाजस्वास्थ्य’चा अखेरचा अंक  त्यांच्या मृत्युनंतर वितरित झाला. त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारने कुटुंब नियोजन हे राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारलं. आज ह्या धोरणामुळे भारताचा एनआरआर (जोडप्यास होणारी सरासरी मुले) २.१ आहे! लोकसंख्या वाढ आता स्थिरावली आहे. लोकसंख्येची राक्षसी वाढ हा आज गहन प्रश्न राहिलेला नाही. ही वाट आपल्याला रधोंनी  दाखवून दिलेली  आहे.  मात्र ह्याची कृतज्ञ जाणीव अभावानेच दिसते. महाराष्ट्रातील स्त्रीआरोग्य आणि प्रसूतीशास्त्रज्ञ म्हणवणारे सुद्धा, जेंव्हा ‘कोण रधों?’, असा प्रश्न करतात, तेंव्हा काळजाला क्लेश होतात.

संततीनियमनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांच्या मार्गात अनेक अडथळे होते. वैद्यकीय पदवी नसणे हा प्रमुख. त्यामुळे कुटुंब नियोजनाची साधने आयात करण्यासाठीचा परवाना त्यांना नाकारण्यात आला.  व्यवसाय करणे त्यांना कायदेशीररित्या शक्यच  नव्हते.  पण त्यांचे विचार सरकारने आणि समाजाने त्यांच्या मृत्यूपश्चात  होईना स्वीकारले आणि त्यांना जणू काव्यात्म न्याय मिळाला.

नव्या वाचकांना रधोंचे मूळ लिखाण वाचणे अवघड जाते. त्यातली भाषा आणि संदर्भ आता जुने झाले आहेत.  पण आपल्या टिपण्ण्यातून लेखकाने हा प्रश्न सोडवला आहे. विचार, त्यांचे तात्कालिक आणि सद्यस्थितील  परिणाम याबद्दल लेखकाचे भाष्य वाचनीय आहे.  त्यातून आपल्याला रधों अधिकाधिक कळत जातात. आधी लेखक एखाद्या  तत्कालीन अथवा सद्य सामाजिक प्रश्नावर काही भाष्य करतो.  मग र. धों. कर्व्यांच्या लिखाणाच्या आधारे, त्या प्रश्नावर कर्वे यांचे काय मत होते, हे समजावून सांगतो आणि मग त्यांच्या मतावर स्वतःची मल्लीनाथी देतो. रधोंची मते, विचार तेंव्हा तर काळाच्या पुढे होतेच पण ते आजही काळाच्या पुढे वाटावेत असे आहेत.

एखाद्या ग्रंथाचे प्राचीनत्व किंवा तो ग्रंथ संस्कृतमध्ये असणे याचा अर्थ तो प्रमाण मानता येतो, असे होत नाही.  म्हणूनच आयुर्वेदाच्या संदर्भात आपल्या परंपरेकडे बघण्याची दृष्टी अभिनिवेशरहित आणि वैज्ञानिक असली पाहिजे हे कर्वे नोंदवतात. लैंगिक शिक्षण हा शिक्षणाचा भाग असावा, हे त्यांचे मत आजही अंमलात आलेले नाही. लहान मुलांकडून करून घेतल्या जाणाऱ्या कामूक नृत्याबद्दल त्यांनी  आक्षेप नोंदविला आहे. विवाहित स्त्री आपल्या जोडीदारावर बलात्काराचा आरोप करू शकत नाही तर वेश्या करू शकते, असा भेदक आणि रोखठोक मुद्दा त्यांनी मांडला आहे. नग्न संघ स्थापन करण्याची त्यांची कल्पना देखील अशीच एक जहाल आणि आजही टोकाची म्हणत येईल अशी आहे. त्यामुळेच  त्यांचे महत्त्व समजावून घ्यायला लेखकाची  मोठीच मदत होते. एखाद्या अंधार्या गुहेमधील शिल्प, कोणा मार्गदर्शकाने हातातील मशालीने उजळून दाखवावीत, तसं इथे घडतं.

‘आपण चरित्र किंवा आत्मचरित्र वाचत नाही, कारण लेखक जर चरित्रनायकाच्या प्रेमात असेल तर त्याच्या गुणांचे भारंभार वर्णन तेवढं केलं जातं आणि अवगुण  झाकले जातात’, असं मत, रधोंनीच नोंदवून ठेवले आहे.  या इशारावजा मताशी लेखकाने  इमान राखले आहे.  लेखक जरी कर्वे यांचा आदर करत असला, त्यांची बरीचशी मते लेखकाला मान्य असली,  तरी कर्वेंच्या लिखाणातल्या, वागण्यातल्या, विचारातल्या चुका आणि विसंगती, लेखकाने तितक्याच जळजळीतपणे  दाखवून दिल्या  आहेत. इथे आंधळी नव्हे तर  डोळस भक्ती  आहे आणि म्हणूनच या भक्तीतून  खरीखुरी विवेक-शक्ती प्राप्त होण्याची शक्यता इथे दिसते.

   जे बुद्धीला पटेल तेच करायचे हे रघुनाथरावांच्या जीवनाचे श्रेयस होते.  बिहारच्या भूकंपाचा आणि अस्पृश्यतेचा गांधींनी जोडलेला संबंध किंवा लोकसंख्या नियंत्रणासाठी गांधींनी सुचवलेला संयमाचा मार्ग हास्यास्पदच  होता.  रधोंनी  त्याचा यथास्थित समाचार घेतला. समाजमान्य अशा अनेक व्यक्तींवर ते वेळोवेळी तुटून पडले.  हे असे प्रसंग लेखकाने आपल्या शैलीमध्ये शब्दबद्ध केले आहेत त्यामुळे या लिखाणाची खुमारी वाढते.  

कर्वे हे सतत काही ना काही तरी वाद अंगावर ओढवून घेण्यात जणू पटाईत होते. माणसे अजातशत्रु, जगन्मित्र वगैरे असतात. पण रधों ‘अजातमित्र’ आणि ‘जगन्शत्रू’  होते. पण असे असले तरी त्यांची सत्याची असलेली कळकळ आणि असत्याबद्दलची चीडच  यातून दिसून येते, हे सूर्यवंशी साधार स्पष्ट करतात.

समाजसुधारकांचे काम क्रांतिकारकांनी इतकंच जोखमीचे आणि त्रासाचे आहे. मात्र  क्रांतिकारकांना समाजाची सहानुभूती मिळते, तर समाजसुधारकांना समाजाचे शेणगोटे खावे लागतात. रधोंचीही काही वेगळी अवस्था नव्हती, हे लेखक उत्तमरित्या अधोरेखित करतो.  ते वाचून आपण विमनस्क होतो.

सूर्यवंशींनी बहुतेक ठिकाणी रघुनाथरावांचा उल्लेख, रघुनाथाने असे  केले, तसे केले, असा एकेरीत  केला आहे.  आपल्या आदर्शाप्रती असलेला अतीव आदरच यातून दिसून येतो.  आदरापोटी अहोजाहो म्हटलं जातं पण आत्यंतिक आदरापोटी अरेतुरेच म्हटलं जातं.  हे भाषिक वैशिष्ठ्य इथे अगदी लोभस दिसतंय. कारण हे पुस्तक निव्वळ चरित्र नाही. रधोंचे  विचार अंगी बाणवण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.  वाचकांपर्यंत देखील विवेकवादी, विज्ञाननिष्ठ, रोखठोक विचार विचारसरणी पोहोचावी,  आपापल्या परीने प्रत्येकाने रधों व्हावे,  ही लेखकाची तळमळ इथे  पानोपानी प्रत्ययास येते.

ह्या पुस्तकाला  जनमानसात स्थान मिळो आणि ही  तळमळ सत्कारणी लागो ह्या सदिच्छा.

 

डॉ. शंतनू अभ्यंकर


प्रतींसाठी 

लेखक संपर्क

उमेश सूर्यवंशी 

९९२२७८४०६५  


 

 

Saturday, 26 March 2022

हॅपी बर्थडे व्हायग्रा

हॅप्पी बर्थडे व्हायग्रा!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
२७ मार्च १९९८ रोजी व्हायग्राला अमेरिकन एफडीएची मान्यता मिळाली. २७ मार्च २०२२ रोजी व्हायग्राला चोवीसावे संपून पंचविसावे लागेल आणि व्हायग्राबरोबर लहानाचा मोठा झालेला पुरुषवर्ग पन्नाशी गाठेल... त्या निमित्त..
व्हायग्रा! बस् नाम ही काफी है. ही इवलीशी गोळी निळी, तिच्या लीळा वर्णू किती! ही तर स्टारपदाला पोहोचलेली जगप्रसिद्ध गुटिका. या गुटिकेचा महिमा माहीत नाही असा विरळाच. ही मदनशलाका कशासाठी असते, हिचे सेवन करताच काय होतं, हे तर जगजाहीर आहे. या व्हायग्रावर विनोद आहेत, चित्र आहेत, व्यंगचित्र आहेत, कवने आहेत, कटाव आहेत, फटके आहेत..! ताजमहालच्या चित्राखाली ‘Via Agra’ किंवा ‘Man’s greatest erection for woman’ असं छापलेला टीशर्ट घेतल्याशिवाय आग्रयातून बाहेर सोडत नाहीत म्हणे. एकूणच व्हायग्राच्या आगमनापासून जणू लोकोत्सव सुरू आहे.
पुरुषाच्या कामक्रीडेत कामोत्तेजन, लिंगोत्थापन आणि वीर्यपतन अशा तीन पायऱ्या. पण कामोत्तेजना प्राप्त झाली म्हणून लिंग उत्थापीत होईलच असं नाही आणि लिंगोत्थान झाले म्हणजे ते स्खलन समय येता कामास येईलच असेही नाही. कामोत्तेजीत झालेल्या पुरुषाच्या, निद्रिस्त लिंगाला या गोळीने जागृती येते. बसल्या बसल्या घेतली गोळी आणि आली ताठरता असं होत नाही. कामोत्तेजना आवश्यक आहे.
अशी कशी काय बुवा ताठरता येते? आणि कामोत्तेजना झाल्यावरच येते हे कसे काय?
लिंगाला ताठरता येणे ही तर साधी द्रव-अभियांत्रिकीची किमया. अगदी सोपे उदाहरण म्हणजे काकडी-फुग्यात पाणी भरलं तर तो फुगतो आणि पाणी काढलं की तो लुळा पडतो. शीश्नामध्ये कॉरपस कॅव्हर्नोसम नावाचे रक्त वाहिन्यांच्या दाट जाळयांनी बनलेले, टोल नाक्यावर मिळणाऱ्या बॉबीच्या आकाराचे, दोन फुगे असतात. लिंगाला ताठरता येते ती तिथे रक्त साठल्यामुळे आणि ताठरता जाते ती तिथून रक्त हटल्यामुळे. शरीरातील इतर अवयवयांप्रमाणेच धमन्यांतून (Artery) येथे रक्त येतं आणि अर्थातच नीलांमधून (Veins) ते निघून जातं.
लिंग ताठर नसतं त्यावेळेला तेथील धमन्या आकुंचन पावलेल्या असतात. त्यामुळे हे फुगे आणि पर्यायाने लिंग शिथिल पडलेलं असतं. कामोद्दीपन होतं त्यावेळेला धमन्या मोठ्या होतात. बॉबी आकाराच्या, नलिकांच्या जाळ्यात, रक्त भरून साठून राहतं. लिंगाला ताठरता येते. रक्तवाहिन्या पुरेशा प्रसरण पावल्या नाहीत तर लिंगाला पुरेशी ताठरता येणार नाही.
लिंग-दौर्बल्यासाठी मधुमेह, रक्तदाब, कॉलेस्टेरॉल, स्थौल्य, मद्य, असे नेहमीचे शत्रू तर कारणीभूत असतातच, पण याखेरीच पार्कीनसनस्, पेरोंनीज डिसीज, मणक्याला इजा, काही औषधे, अशी इतर अनेक कारणे संभवतात. पण हे ज्ञान तसे अलिकडचे. पूर्वी लिंगाला ताठरता न येणे हा मुख्यत्वे मानसिक आजार आहे असं समजलं जायचं. त्यामुळे उपचार म्हणून मानसोपचार सुचवले जात. पण मानसोपचार तर निव्वळ उपचार ठरत होते! ते बऱ्यापैकी निरुपयोगीच होते.
मनोदौर्बल्यामुळे लिंगदौर्बल्य येते या गैरसमजावर पहिला कोंडीफोडू घाला घातला तो डॉ. गाईल्स ब्रिण्डले यांनी. अमेरिकन यूरोलॉजी असोसिएशनच्या, 1983 सालच्या सभेपूर्वी, डॉ. ब्रिण्डले यांनी फेंटोलमाईनचे इंजेक्शन स्वतःच्या शिश्नात टोचून घेतले आणि हे महाशय स्टेजवर चक्क दिगंबरावस्थेत उभे राहिले. त्या औषधाच्या प्रभावाने तरारून उठलेले त्यांचे लिंग पाहून सर्व उपस्थितांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. मनस्थिती कितीही पडेल असो लिंगस्थिती चढेल असणे शक्य आहे, हे त्यांनी प्रत्यक्षदर्शी पुराव्यानिशी सिद्ध केले. त्यांचे हे संशोधन त्यांनी मानसोपचारशास्त्राला वाहिलेल्या नियतकालिकातच प्रसिद्ध केले. असो, पण त्यांच्या या नाट्यमय थिल्लरपणावर जाऊ नका. डॉ. गाईल्स ब्रिण्डले हे अतिशय बुद्धिमान संशोधक आणि संगीतज्ञ आहेत. अंधाना दिसावे म्हणून आणि मूत्र-नियंत्रणावर त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे.
प्रश्न असा आहे की हे घडले कसे? आपल्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. हृदयामध्ये खास हृदयाच्या तालावर नाचणारे स्नायू असतात. हाता-पायामध्ये आपली आज्ञा पाळणारे स्नायू असतात. आतड्यांमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये, मेंदूची आज्ञा पाळणारे स्नायू असतात. रक्तवाहिन्यांतील स्नायू शिथिल झाले की रक्तवाहिन्यांचा व्यास वाढतो. त्या त्या अवयवातील रक्त पुरवठा वाढतो. फेंटोलमाईनमुळे डॉ. गाईल्स ब्रिण्डलेंच्या लिंगातील रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या, आणि लिंगाला ताठरता आली. धमन्या प्रसरण होण्याबरोबर तिथून रक्त वाहून नेणाऱ्या नीला बारीक होणेही आवश्यक आहे, हा तोपर्यंतचा समज त्यांनी गैर ठरवला.
मग हे उपचार सर्रास होऊ लागले. ताठरता येत नाही? घ्या इंजेक्शन आणि व्हा सुरू. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत! पण हा गुप्तांग-दंश काही फारसा सुखावह नव्हता. एकतर फेंटोलमाईनचा दंश होताच तात्काळ ताठरता यायची. कामोत्तेजना असो वा नसो लिंग आपले सावधान! त्यामुळे इंजेक्शनचा सोपस्कार अगदी ऐनवेळी, ‘टॅम्प्लीज’ म्हणत पार पाडवा लागायचा. शिवाय वीर्यपतन झाले तरी फेंटोलमाईनचा परिणाम संपेपर्यंत शीश्न मुळी हुश्शच म्हणायचे नाही. ही आगंतुक ताठरता कधी त्रासदायक ठरायची.
हे सगळं टाळणारे औषध बनवायचे तर शरीरात रक्तवाहिन्यांवर हुकूमत गाजवणारा नैसर्गिक हुकूमशहा कोण ह्याच शोध घेणे आवश्यक होते. डॉ. गाईल्स ब्रिण्डलेंनी त्यांचे नग्न सत्य जगासमोर ठेवताच, हा कळीचा रेणु शोधण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. साधारण एकाच वेळी तीन शास्त्रज्ञ-गटांनी हे रती-रहस्य शोधून काढले. हा होता, नायट्रिक ऑक्साईड. ‘सायन्स’ या साप्ताहिकाने तर 1992चे संवत्सर रसायन (Molecule of the year) म्हणून याचा गौरव केला.
व्हायग्राने इंजेक्शनची सगळी अडचण सहज दूर केली. सगळी क्रिया फारच सुलभ केली. गोळीमुळे येणारी ताठरता निव्वळ कामोद्दीपन झाल्यानंतरच येते आणि कामोद्दीपन सरताच ओसरते. पण हे कसं काय? गोळीचा परिणाम फक्त लिंगाच्या रक्तवाहीन्यांवरच होतो. इतरत्र नाही. हे तरी कसं काय?
ही गोळी नेमकी पोपटाच्या डोळ्याचाच कसा वेध घेते?
मुळात आपल्या शरीरात हृदय नावाचा एकच पंप असतो आणि तो ठराविक दाबाने रक्त पंपत असतो. पण शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची रक्ताची गरज ही सतत बदलत असते. तुम्ही मॅरेथॉन पळायला लागलात तर पायाकडे अधिक रक्त जायला हवं. तुम्ही भरपेट जेवल्यानंतर पचनसंस्थेकडे रक्त जायला हवं. हे सगळं होण्यासाठी काही गुंतागुंतीची रचना कार्यरत असते. मेंदूतून निघणाऱ्या नसांतून (Nerves) त्या त्या अवयवाच्या रक्तवाहिनीला संदेश जातात. हा संदेश पोहोचला की या नसा नायट्रीक ऑक्साईड निर्माण करून रक्तवाहिन्यांच्या आसपास सोडतात. नायट्रीक ऑक्साईड कृपेकरून, सीजीएमपी हा रासायनिक संदेश सुटतो आणि ‘रिलॅक्स!’ असं सांगणारा हा संदेश पोहोचताच रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात. हे संदेसवा पोहोचवण्याचे काम होताच हे सीजीएमपी, पिडीई या विकर (Enzyme) रसायनाद्वारे नष्ट केले जाते. जोवर मेंदूकडून संदेश येत आहेत तोवर सीजीएमपी तयार होत राहते. रक्तप्रवाह वाढत राहतो. एकदा मेंदूकडून येणारे संदेश बंद झाले की सीजीएमपीची निर्मिती थांबते आणि उरलेला सीजीएमपी पिडीईतर्फे नष्ट होताच रक्तप्रवाह कमी होतो. कामूक भावना दाटून आल्या की नेमके हेच सगळे होते. लिंगाच्या नसा नायट्रिक ऑक्साईड स्त्रवतात, सीजीएमपी मार्फत रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि लिंगाची काकडी फुगते.
लिंगदौर्बल्याची अनेक कारणे आहेत. पैकी आपल्याला जमेल का ही भीती, शारीरिक-मानसिक ताण तणाव आणि वाढते वय, ही प्रमुख. वय वाढलं की मेंदूकडून संदेश तर येत राहतात, नायट्रिक ऑक्साइडही तयार होते पण सीजीएमपी पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाही. व्हायग्राने हा प्रश्न मोठ्या हिकमतीने सोडवला आहे. जर लिंगाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढायचा असेल तर तीन पर्याय आहेत. नायट्रिक ऑक्साइड वाढेल असं काहीतरी करणे, सीजीएमपी वाढेल असं काहीतरी करणे किंवा सीजीएमपी लवकर नष्ट होणार नाही असे काहीतरी करणे. व्हायग्रामुळे तिसरी गोष्ट घडते. व्हायग्रा सीजीएमपी-संहारक अशा पिडीईचे कार्य रोखून धरते. जेणेकरून सीजीएमपी साठून राहते आणि लिंग ताठून रहाते.
गंमत अशी की पिडीई शरीरात सर्वत्र आहे पण व्हायग्रा नेमक्या लिंगातील पिडीईलाच लगाम घालते. कारण पिडीई जरी सर्वत्र असले तरीही त्याचे अकरा उपप्रकार आहेत. पैकी लिंगामध्ये पाच नंबरचे पीडीई आढळते. व्हायग्रा फक्त या पिडीई-पाचच्या वाट्याला जातं. याचं काम ते बंद पाडते. बस्स, पिडीई-पाच निकामी झालं, की लिंगामधील सीजीएमपी वाढलेले रहाते, लिंगाकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो, लिंगाला उत्तेजना येते, मात्र शरीरात इतरत्र काही उलथापालथ होत नाही. सुमारे चार तासानंतर व्हायग्रा लिव्हर आणि किडनीद्वारे शरीराबाहेर सोडले जाते.
पिडीई-पाच निष्क्रिय करण्यात जे रसायन यशस्वी ठरलं त्याचं शास्त्रीय नाव सिल्डेनाफिल सायट्रेट. ‘व्हायग्रा’ हे त्याचे फायझर कंपनीने केलेले बारसे. शास्त्रीय नावे इतकी क्लिष्ट असतात की त्यांचे सुलभीकरण करावेच लागते. मग बरेचदा निरर्थक शब्दांना नवा अर्थ दिला जातो किंवा औषधाचे कार्य हलकेच सुचवून जाईल असे नाव रचले जाते. उदा: मॉर्फीन हे मॉर्फीअस ह्या निद्रादेवीशी संबंधित नाव. व्हायग्रा ह्या शब्दाला व्हायग्रापूर्वी काही अर्थ नव्हता. ‘व्ही’मुळे व्हीगर, व्हायटालिटी, व्हीरीलिटी असे गुणधर्म सुचवले जातात म्हणे. म्हणजे आपले जाहिरातीतील सुपरिचित जोम, जवानी आणि जननक्षमता. व्हायग्रा हे नाव ‘व्याघ्र’वरुन घेतले आहे असाही उल्लेख नेटावर आहे! पण व्हायग्राच का?, याचे अधिकृत उत्तर उपलब्ध नाही.
सिल्डेनाफिल सायट्रेटला परिणाम आहे, म्हणजे काही ना काही सहपरिणाम असणारच. गुण आहे म्हणजे वाण असणारच. अजिबात सहपरिणाम नाहीत असं सांगत खपवल्या जाणाऱ्या औषधांना, मुळात परिणामच नसतो हे वैद्यकीय सत्य लक्षात ठेवा. जसा पिडीई-पाचवर व्हायग्राचा परिणाम होतो तसाच तो, अल्पप्रमाणात, पिडीई-सहावरसुद्धा होतो. हे पिडीई-सहा, डोळ्याच्या पडद्यामध्ये असतं आणि याचा संबंध रंग-जाणीवेशी असतो. यामुळे सारे जग किंचित निळसर दिसायला लागतं. त्यामुळेच उड्डाणापूर्वी सहा तास वैमानिकांना व्हायग्रा घेऊ नये असं बंधन असतं. काही व्यक्तींना मेंदूतील रक्तप्रवाह वाढल्यामुळे डोकेदुखी जाणवते. हृदयविकारासाठी कधी कधी नायट्रोग्लिसरीनची (सॉरबीट्रेट) गोळी चालू असते. या गोळीमुळे सुद्धा नायट्रिक ऑक्साईड वाढलेलं असतं. त्यात व्हायग्रा घेतली तर ब्लडप्रेशर खूपच कमी होऊ शकते. काहींना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो! पण हार्ट अटॅक वगैरे प्रत्यक्षातल्यापेक्षा सिनेमा आणि सिरीयलमध्ये जास्त येतो. अनेक विनोदी लेखकांनी, या माहितीच्या सुतावरून, आपापल्या पात्रांना ऐनवेळी स्वर्ग गाठायला लावलं आहे. भलत्या वेळी, भलत्या काळी, तन असता भलतीचकडे, अशा अवस्थेतील पात्र गचकलं की श्टोरीला कसा झकास ट्विस्ट मिळतो! डायबिटीस वगैरेच्या निष्काम कर्मयोगी गोळ्यापेक्षा या निळ्यासावळ्या गोळ्या कितीतरी हास्यस्फोटक ठरल्या आहेत.
क्वचित, गंमत म्हणून व्हायग्रा घेणे तापदायक ठरू शकते. गरज नसताना, केवळ गंमत म्हणून, काय होते या जिज्ञासेपोटी, काही तरुण मुलं या गोळीचे सेवन करतात. मात्र पुढे बरेचदा जीव चळतो पण आत्मविश्वास ढळतो आणि गोळी शिवाय भागेनासं होतं. मग नाही गोळी तर आळीमिळी गुपचिळी, अशी अवस्था होते. व्हायग्रामुळे खूप वेळ ताठरता टिकून राहील्याच्या घटना, अगदी क्वचित, पण घडतात. ही ताठरता वेदनादायी देखील असते.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेता व्हायग्रा हे परस्पर घेण्याचे औषध नाही हे लक्षात यावे.
सिल्डेनाफिल सायट्रेट नामे या सुख गुटिकेचा शोध तसा जरा अपघातानेच लागला. फायझरतर्फे सिल्डेनाफिल हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रसरण पाववणारे म्हणून तपासलं जात होतं. त्या परीक्षेत सिल्डेनाफिलला भोपळा मिळाला. सगळेच वैतागले. पण निरुपयोगी म्हणून वासलात लावण्यापूर्वी ते घेतलेल्या मंडळींची माहिती पुन्हा तपासून पाहिली असता, त्यातील बऱ्याच नरांनी कडक, तडक, सहज आणि आनंददायी लिंगोत्थानाचा उल्लेख केलेला आढळला. ही नवी शक्यता लक्षात घेऊन नव्याने अभ्यास केला गेला आणि पुढचा सारा इतिहास घडला.
पण अभ्यास करणे सोपे नव्हते. लोकं बढाईखोर असतात. पुरुष तर जास्तच. ‘या’ बाबतीत तर आणखी जास्त. ‘औषध’ घेतलेले नरपुंगव तर काय दावे करतील याला काही सुमारच नाही. तेंव्हा पुरुष-उवाच आणि वस्तुनिष्ठ तपासणी अशी दोन्ही तंत्र वापरायची ठरली. साधारणपणे रोज झोपेत, रात्रीतून, चार आठ वेळा आपोआप लिंगोत्थान घडते. पहाटे, आपण साखरझोपेत, स्वप्नामधील गावात असतो, तेंव्हा हे विशेष घडते. ‘कारभारी उठलाय रामाच्या पारी, जरा धीर धरा!’ ह्या गाण्यातून दादा कोंडके वस्तुस्थितीच विशद करत होते. असो, तर झोपेतील ताठरता मोजणारे रिजी स्कॅन हे यंत्र वस्तुनिष्ठ माहितीसाठी वापरण्यात आले.
पण खुद्द अमेरिकेत आणि खुद्द फायझर कंपनीत सुद्धा या असल्या ‘वेड्या’ संशोधनाला विरोध झाला होता. बाजारात हे औषध षंढ ठरेल असे कंपनीतील साहेबमजकुरांना वाटत होते. चर्चमधील अश्लीलमार्तंडांनी अनैतिक म्हणून ओरड केली. मोर्चे काढायची धमकी दिली. हे असभ्य औषध मागायला पेशंट आणि लिहायला आम्ही संकोचू, असे डॉक्टरांनी बजावले. पण या साऱ्यावर मात करत, मि. रुने नेल्सन आणि डॉ. साल जिओर्जियानी यांनी चमत्कार घडवला. औषध विपणनाच्या इतिहासात ह्याची नोंद झाली आहे.
सुरवातीला त्यांचे म्हणणे कोणी हे फारसं गांभीर्याने घेतच नव्हते. हाच सगळ्यात मोठा अडथळा होता. पण मुलगी ‘स्थळ’ म्हणून ‘खपवताना’ करतात, तशा अनेक उचापती केल्या त्यांनी. आपण जसे ‘नामर्द’, ‘नपुंसक’ वगैरे शब्द अब्रह्मण्यम् समजतो, वापरायला कचरतो, तसेच तिथेही होते. ‘इंम्पोटंन्स’ ह्या अ-ख्रिस्तण्यम् शब्दाला मग त्यांनी ‘इरेक्टाईल डिसफंक्शन’ असा गोंडस शब्द शोधला. डॉक्टरांच्या कन्सलटिंगमध्ये जाऊन गोळीची माहिती देणारे प्रतिनिधीही लाजत होते. त्यांना तर खणखणीत आवाजात’ ‘इरेक्शन, इरेक्शन, इरेक्शन!’ असा जप करायला लावला त्यांनी. ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ ह्या स्फोटक नाटकाची सुरवात, प्रेक्षकांना, ‘योsssनी’ असं ओरडायला लावून होते, त्याची आठवण झाली मला. गोळी बाजारात उतरवण्यासाठी तीन पर्यायी घोषणा रचून अभ्यासण्यात आल्या. ‘आली रे आली लिंगोथ्थानवाली!’ ही थेट आणि धीट. ‘लिंग दौर्बल्यावर नवा इलाज!’ अशी जरा वैद्यकीय आणि ‘अळीमिळी गुपचिळी काम-गिरी साधे गोळी’ अशी गोळीपणावर भर देणारी. शेवटी तिसरा पर्याय निवडण्यात आला. जाहिरातीत चक्क बॉब डोल झळकले. हे अमेरिकेतले एक मुरलेले खासदार, दुसऱ्या युद्धातील सैनिक, एकेकाळी अध्यक्षपदाचे उमेदवार, प्रोस्टेट कॅन्सरचे पेशंट. वयाच्या ७४ व्या वर्षी ते व्हायग्राच्या जाहिरातीत दिसले. सुटाबुटातले वयोवृद्ध डोल, जेंव्हा आपल्या धीरगंभीर आवाजात, ‘इरेक्टाईल डिसफंक्शनबद्दल बोलायला हिंमत लागते’, असं म्हणतात तेंव्हा त्यातील प्रामाणिकपणा दर्शकांना स्पर्शून जातो. मादक उत्तान आणि अनावृत्त जोडप्यांपेक्षा बॉब डोल अर्थातच अधिक विश्वासार्ह वाटतात. बस्स, पुढे कंपनीला काही विशेष करावंच लागलं नाही. व्हायग्राचे नाणे खणखणीत होते, लोकांचा संकोच गळून पडत होता, व्हायग्रावरचे जोक्स व्हायरल होत होते.... बाजार-देवता प्रसन्न व्हायला अजून काय हवं?
ही गोळी भारतात आली तेंव्हाही ह्या गोळीला अनेक बंदुकांचा सामना करावा लागला. देशापुढे लोकसंख्येचा प्रश्न आ वासून उभा असताना ही भलती अमेरिकन थेरं कशासाठी? त्या उत्शृंखल पण मरतुकड्या पश्चिमात्यांना हे लागणारच. तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण जगत्वंद्य परंपरेचा वारसा सांगणाऱ्या आम्हां तपस्वी, ओजस्वी, तेजस्वी, ऊर्जस्वी, मनस्वी, वीर्यवान भारतीयांना याची गरज काय? अशा अनेक प्रश्नांच्या फैरी झडल्या. पण भारतीय गिऱ्हाइकांनी असल्या प्रश्नांना भीक घातली नाही.
व्हायग्राची तुफानी मागणी आणि त्यातील फायद्याचा वायदा पहाता (सुरवातीची किंमत एका गोळीला 12$), व्हायग्राचे सोंग घेतलेल्या अनेक गोळ्या मार्केटमध्ये आल्या. नेहमीप्रमाणे हर्बल, नॅच्युरल, होलीस्टिक अशी बिरुदे लेवून आल्या. ऑनलाइन विक्रीतला तब्बल ७७% माल बनावट असतो असे एक अभ्यास सांगून गेला. ह्या गोळ्यात रंग, चुना, साबण, फेस पावडर, इतर असंबद्ध औषधे असे काहीही सापडले आहे. पुढे फायझरचे पेटंट संपताच अनेक कंपन्या पुढे आल्या, जेनेरीक व्हायग्राही उपलब्ध झाले, किंमत घटली आणि हा उच्छाद जरा आटोक्यात आला. नक्कल ही धवल यशाला मिळालेली काळी दाद आहे, असं म्हणतात. व्हायग्रा ही आजवर सर्वाधिक नक्कललेली गोळी आहे!!
अर्थात इतक्या मोठ्या यशाला नाव ठेवणारेही असतातच. कंपनीने कोणत्याही नव्या औषधाचा शोध लावला नसून, आपले औषध खपावे म्हणून लिंगदौर्बल्य या नव्या आजाराचा शोध लावला आहे, असेही आरोप झाले आहेत. पण अनेक नरोत्तमांनी दिलेले उत्तमोत्तम शेरे पाहता, हा आरोप कुठल्या कुठे राहतो. निव्वळ जाहिरातीवर आणि सुरुवातीच्या हाईपवर हे औषध काही काळ टिकलं असतं, मात्र गेले पाव शतक असलेली याची व्यापक लोकप्रियता पाहता, पुरुषांच्या एका मोठ्या समस्येवर उतारा मिळालेला आहे हे निश्चित. उलट व्हायग्राच्या या काम-गिरीने अनेक काम-आजार लक्षात आले. पूर्वी हे आजार लक्षातच घेतले जात नव्हते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असे दुखणे हे; आपलेच लिंग आणि आपलेच दौर्बल्य, सांगणार कुणाला? मुळात कुणी तक्रार करत नसलं, तरी शीश्न-शैथिल्य हा व्यापक प्रमाणात आढळणारा, अवसानघातकी आजार आहे हे लक्षात आलं. पौरुषाला आव्हान, स्वाभिमानाला ठेच, मानखंडना, नैराश्य, उसवलेली नाती, असे कितीतरी आयाम आहेत ह्या प्रश्नाला. पण व्हायग्रा आली आणि साऱ्यांना धीट बनवून गेली. अगदी डॉक्टरांना सुद्धा.
व्हायग्राने डॉक्टरांना खडबडून जागे केले. एकूणच लैंगिकता आणि तत्संबंधी आजार हे डॉक्टरांनीसुद्धा संकोचापोटी ऑप्शनला टाकले होते. ह्यासंबंधी माहिती, पुस्तके, संशोधन, सारंच दुर्मिळ होतं. हे जरा फुटकळ, कमअस्सल क्षेत्र समजलं जात होतं. स्त्रीआरोग्य आणि प्रसूतीशास्त्रात एम. डी. करूनही लैंगिकतेबाबत मला फक्त एकच गोष्ट शिकवण्यात आली होती, बलात्काराच्या केसची तपासणी! व्हायग्रात पैसा तर होताच पण पुरुषांच्या (आणि पर्यायाने स्त्रियांच्या सुद्धा) एका अत्यंत महत्वाच्या, सार्वत्रिक, दुर्लक्षित प्रश्नाला या गोळीने उत्तर दिले. ज्यांना समस्या नाही त्यांना काही फरक पडत नाही पण ज्यांना समस्या आहे त्यांना ही गोळी निव्वळ आवश्यकच नव्हे, तर (काम)जीवनावश्यक वाटते.
पण आता संशोधन जोरात सुरू आहे. सिल्डेनाफिलचे नवे नवे उपयोग आता उजेडात येत आहेत. आज अगदी नवजात अर्भकांच्या काही आजारात व्हायग्रा वापरलं जातं आणि आपल्या तान्ह्युल्यासाठी ही चिठ्ठी वाचून, अर्ध्या गूगलने पिवळ्या झालेल्या बापाची वृषणे भाळी पोहोचतात! (गो* क**त जातात).
पण असे अनेक अनपेक्षित धक्के व्हायग्राने दिले आहेत. व्हायग्रामुळे अवैध शिकारी कमी झाल्या! गेंडयाचे शिंग, सीलचे लिंग, वाघाचे फासळे, हत्तीचे सुळे असे अनेक चित्रविचित्र प्राणीज अवयव मदप्रेरक, वाजीकारक, कामाग्नीप्रदीपक म्हणून बाजार-प्रिय आहेत. व्हायग्रामुळे मूळ समस्या बऱ्यापैकी दूर झाली आणि या साऱ्या प्राण्यांची होणारी नाहक शिकार कमी झाली. अफगाण टोळीवाल्यांना लाच म्हणूनही व्हायग्रा कामी आली आहे!! उभ्या उभ्या टवाळी करून टाळी घेणाऱ्या अनेक टकळीबाजांना व्हायग्राने रसद पुरवली आहे!!! पण हे सगळं असलं तरी बायकांवर मात्र व्हायग्रा प्रभाव गाजवू शकलेली नाही. त्यांच्यासाठी फ्लिबेनसेरिन म्हणून खास वामा-व्हायग्रा आहे. पण त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी.
व्हायग्राचे नेत्रदीपक यश पाहून सिल्डेनाफिलसारखी टाडालाफील, व्हर्डनाफिल अशी औषधे बाजारात आली. यांचे कार्य आणि कार्यकारणभाव जवळपास तोच आहे. टाडालाफील भरल्यापोटी घेतली तरी चालते, पंधरा मिनिटातच आपला प्रताप दाखवते आणि शरीरात दीर्घकाळ टिकून राहते. शुक्रवारी रात्री अल्प मद्यपान, स्वल्प धूम्रपान आणि भरपेट खानपान झाल्यावर जरी गोळी घेतली, तरी अख्खा वीकेंड सुखात जातो. यामुळे या गोळीला ‘विकेंडर पिल’ असं लाडाचे नाव आहे. अशा ताज्या दमाच्या, फटकड्या, चवचाल गोळ्यांमुळे व्हायग्राची जवानी जरा ओसरू लागली आहे.
काही गोष्टी मात्र स्पष्ट करायला हव्या सिल्डेनाफिल ही लिंगाचा आकार वाढवणारी गोळी नाही. तसे करण्याचा एकच खात्रीशीर मार्ग आहे. भिंगातून लिंगाकडे बघणे!! सिल्डेनाफिल ही कामोत्तेजक (Aphrodisiac) गुटिका नाही. सिल्डनाफिलने कामेच्छा वाढत नाही. सिल्डनाफिल फक्त तशी सोय करून देते. कवळीमुळे पचन वाढत नाही आणि चष्म्यामुळे वाचन वाढत नाही; फक्त तशी सोय होते. तसेच हे. कामेच्छा भडकेल, कामभावना वाढेल, कामतृप्तीची गॅरंटी देईल, असं औषध जगाच्या पाठीवर नाही. मात्र अशी औषधे विकणारे बरेच आहेत. भले त्यांच्या लेबलवर संभोग समाधी भोगणारे स्त्रीपुरुष असोत, की हत्ती, घोडे, वाघ, सिंह असा सगळा शिकारखाना असो; असे कोणतेही शास्त्रसिद्ध औषध नाही.
मात्र आज ना उद्या अशी गुटिका उपलब्ध होणार हे निश्चित. वय वाढलं की अनेक कारणांनी पहिल्यासारखी मजा मारता येत नाही. तेंव्हा कामेच्छावर्धक, कामसौख्याची गॅरेंटी देणारी गोळी ही मनुष्याला सुखाची आणि कंपनीला पैशाची परमावधी ठरेल; आणि गुटिकाच का? शैय्यासोबत करणारे मानवी आकाराचे, बाहुले आणि बाहुल्या आजही उपलब्ध आहेत. आता यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात येत आहे. तुमच्या स्वप्नातला राजकुमार/री इच्छित रस, रंग, गंध, स्पर्श अशा साऱ्यांसकट तुमच्या अंथरूणात शिरेल. इंद्रियांचा सुखसोहळा अनुभवण्यासाठी तुम्ही त्याला/तिला केंव्हाही कवेत घेऊ शकाल.
या भूतलावर, लिंग, असं नुसतं जाहीरपणे म्हटलं तरी बावचळणारे समाज आहेत, सार्वजनिक लिंगोपासना आचरणारेही आहेत आणि लिंगाला मर्दानगीचे शुभंकर चिन्ह म्हणून मिरवणारेही आहेत. अशा रीतीने शिसारी, अभिषेक-आरती आणि कर्तबगारी या एकाच, बोटभर, मांसल अवयवात सामावली आहे. काम-काननी रमता रमता; काम-मनन करता करता; लैंगिकतेचे शारीर शमन करायचे, का दमन करायचे, का नियमन करायचे हा तर सनातन प्रश्न आहे. व्हायग्राचा शोध लागल्याने हा प्रश्न अधिकच जटिल झाला असावा.
पण हा झाला सांस्कृतिक माहोल. शरीरशास्त्रदृष्ट्या लिंग म्हणजे मूत्र आणि वीर्य विसर्जनाचा मार्ग आणि कामानंद देण्या-घेण्याचा अवयव. पण अनेकांची चालचलन आणि परिणामी चरित्र आणि चारित्र्य व्हायग्रामुळे बदलले आहे; नाईलाजाने निद्रिस्त झालेली लिंगं, समाधीतून संभोगाकडे वळली आहेत एवढे मात्र खरे.
तेंव्हा हॅप्पी बर्थडे व्हायग्रा!! 

प्रथम प्रसिद्धी 
लोकसत्ता 
लोकरंग पुरवणी 
27 मार्च 2022

Monday, 7 March 2022

एका हातपंपाची गोष्ट.

 

एका हातपंपाची गोष्ट.  

डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई.

 

कॉलरा शब्द ऐकलाय तुम्ही, पण कॉलऱ्याचा पेशंट काही ज्येष्ठ मंडळी वगळता नक्कीच नसेल पहिला. पंढरपूरला, आषाढी कार्तिकी भक्तजन येऊन चंद्रभागेमध्ये स्नान आणि इतरही नित्यकर्म उरकत असत. त्यामुळे वारी बरोबर तिथे   कॉलऱ्याची फेरी ठरलेली. अनेक विष्णूदास  भूवैकुंठी थेट  वैकुंठवासी व्हायचे. 

लाखोंनी माणसं दगावायची कॉलऱ्याने त्याकाळची गोष्ट आहे ही. इये मायदेशीची नाही पण खुद्द इंग्लंडातील, लंडनमधील. लंडनला कॉलरा फार. दर काही दिवसांनी साथी येणार, माणस जाणार, हा क्रम  ठरलेला. आजही जगात कॉलराग्रस्त आहेत. आपल्यापासून दूर आहेत, पण आहेत.

गोष्ट आहे जॉन स्नो या इंग्लंडातील डॉक्टरची. १८३१, १८४८ आणि १८५३ अशा तीन महाभयंकर  साथी  आल्या लंडनला तेंव्हाची. म्हणजे आपल्याकडे १८१८ला पेशवाई बुडाली आणि १८५७ला ‘बंड’ झालं त्या दरम्यानची.  कॉलरा कशामुळे होतो हे माहितच नव्हतं तेंव्हाची. काही म्हणायचे हा ‘कोंटेजिऑन’चा प्रताप, काही  म्हणायचे ‘ह्युमर्स’चा प्रताप, काही म्हणायचे हा ‘मायाझम’चा प्रताप किंवा रोग्याशी थेट संपर्काचा प्रताप.  पण मायाझम म्हणजे नेमके काय हे कोणालाच नीट सांगता येत नव्हतं. मायाझम म्हणजे आजारकारक घटक, मग यात मानसिक, शारीरिक, अनुवंशिक घटकांपासून ते  अशुद्ध हवापाण्यापर्यंत असे  काहीही येत असे. 

पण स्नो साहेबांचं म्हणण असं की जर हा अशुद्ध हवेमुळे असेल तर आधी खोकला, धाप अशी लक्षणे दिसायला हवीत. पण आजार  तर सुरु होतो, उलट्या, जुलाब अशा त्रासनी. तेंव्हा अशुद्ध हवेच काही खरं नाही गड्या.

बराच अभ्यास करून त्यानी कॉलरा  बहुधा पाण्यातून पसरत असावा असा कयास बांधला. विशेष कोणी मनावर घेतलं नाही पण ह्यानी नेटानी अभ्यास जरी ठेवला.

लंडनच्या पाणी पुरवठ्याचा त्यांनी अभ्यास केला. पाणी पुरवठा  कंपन्या थेट थेम्स मधून पाणी उचलून नळांनी पुरवत होत्या. त्यांची क्षेत्रे ठरलेली होती. त्यातही प्रवाहाच्या खालच्या भागातून पाणी उचलणाऱ्या कंपनीचे ग्राहक जास्त आजारी पडत होते. डॉ. स्नोंचा अंदाज असा की याचे  कारण त्यांचे पाणी वरच्यांच्या सांडपाण्यांमुळे अधिक दषित होत होते.

पाणीपुरवठ्याची आणखीही एक तऱ्हा होती.   अख्या लंडनभर सार्वजनिक  विहिरींवर हातपंप बसवलेले होते आणि त्या त्या भागाला त्या त्या विहिरीतून पाणी पुरवले जात होते.

१८५३ साली ब्रॉड स्ट्रीटवर कॉलराचा उद्रेक झाला. तिथल्या हातपंपाच पाणी डॉ. स्नोनी तपासलं पण अर्थातच काहीही शोध लागला नाही. मग त्यांनी घरोघरी जाऊन माहिती गोळा केली. आठवड्याभरात ८३ लोकं दगावली होती आणि त्या सर्व घरी  ब्रॉडस्ट्रीटच्या पंपावरून  पाणी भरल जात होत. नगरपित्यासमोर त्यानी हा विषय लावून धरला. हातपंप बंद करणे म्हणजे लोकक्षोभ  ओढवून घेणे. हे कोणालाच नको होतं. शेवटी जरा नाखुशीनेच त्यांनी तो पंप बंद ठेवायचा निर्णय घेतला... आणि कॉलरा झपाट्यानी ओसरला. 

डॉ. स्नोंनी  शोध चालू ठेवला. त्यांना एकूण १९७ कॉलराग्रस्त  आढळले. सगळे हाच  पंप वापरणारे. पंपाच्या विहिरीत शेजारची गटारगंगा झिरपत असल्याचेही आढळले. त्याहून महत्वाचं म्हणजे शेजारील स्वतंत्र पाणीपुरवठा असलेले, कॉलरापासून बचावलेलेही आढळले.  ही सगळी माहिती त्यांनी लंडनच्या  नकाशावर भरली; आणि कारण आणि परिणाम यांचे अटळ नाते ठळकपणे दिसून आले. ब्रॉड स्ट्रीटच्या पंपक्षेत्रात कॉलराग्रस्त लाल ठिपके आणि   आजूबाजूचा नकाशा मोकळा.

ह्या नकाशाने आरोग्याकडे, विशेषतः सार्वजनिक आरोग्याकडे बघण्याची नवी दिशा दाखवली. मुळात आरोग्याला,  ‘वैयक्तिक आरोग्य’  आणि ‘सार्वजनिक आरोग्य’ असे भिन्न आयाम आहेत हे दाखवून दिलं. कॉलराचे संक्रमण  कसं होत असावं  याचा एक वेगळाच मार्ग ह्या नकाशात दिसला. ब्रॉड स्ट्रीट पंप विरुद्ध इतर पंपाचे  पाणी पिणाऱ्या गल्ल्या, असा भिन्न परिस्थितीतील समूहांचा  तौलनिक अभ्यास नकाशात  होता. जलप्रदूषणाने कॉलरा होतो याची खात्रीच  तो नकाशा देत होता.

पुढे बरीच उलथापालथ झाली. लुई पाश्चरने जंतूबाधेचा सिद्धांत मांडला (१८७३), टीबी (१८८२), टायफॉईड (१८८०), कॉलरा (१८८३) असे अनेक जंतू एकामागोमाग एक शोधले गेले. हळूहळू एपीडेमिओलॉजी असे नवे शास्त्र उदयाला आले. करोंना वगैरे साथी आल्या की ह्या शास्त्राची जरा चर्चा होते. एरवी अडगळीत गेलेल्या ह्या विषयाला  जरा झळाळी येते. खरंतर हा ही विषय अतिशय आव्हानात्मक आणि सगळ्या समाजावर  अनेकांगी परिणाम करणारा. पण सर्जरी किंवा मेडिसीनचा थेट रुग्णसेवेचा सुवर्णस्पर्श ह्या विषयाला नाही.       एखाद्या गुंतागुंतीच्या कॅंन्सरवर शस्त्रक्रिया जितकी कठीण तितकेच जगभर फोफावणाऱ्या, करोनासारख्या साथीचा, सार्वजनिक मुकाबलाही कठीण. जगभरातून देवी निर्मुलन करणे, पोलिओ हद्दपार करणे, ही  असली  जटील कामं ह्या शास्त्राच्या मदतीनी केली जातात.  इतकच काय पण स्थूलपणा, डायबेटीस, रक्तदाब, रस्ते अपघात हे देखील ‘साथीचे’ आजार आहेत आणि हे प्रश्न सोडवायलाही हे शास्त्र मदत करतं. मलेरियाची साथ यायला माणशी किती डास लागतात ते कॉलराच्या साथीत किती सार्वजनिक संडास लागतात असे अनेक अनेक गद्य, रुक्ष, वरवर पहाता बिनमहत्वाचे वाटणारे प्रश्न हे शास्त्र सोडवते. 

कॉलऱ्याची साथ आली. लंडन मनपाने पंपाचे हॅंडल काढून टाकले. पंप बंद झाला आणि पंप  बंद करताच खरोखरच कॉलरा ओसरला. इतिहास आणि परंपराप्रेमी ब्रिटननी आजही जॉन स्नो आणि त्या पंपाच्या आठवणी जपल्या आहेत. आजही तो पंप आपल्याला बघायला मिळतो. दरवर्षी जॉन स्नो स्मृत्यर्थ  या क्षेत्रातल्या दिग्गजांची व्याख्याने होतात. ह्या व्याख्यानमालेचे नावच मुळी पंप हॅंडल लेक्चर्स. या व्याख्यानाची सुरवात पंपाचे हॅंडल काढून होते आणि शेवटी पुनः एकदा ते हॅंडल जागच्या जागी बसवण्यात येतं. सार्वजनिक आरोग्यातील काही आव्हानांवर आम्ही मात केली असली तरी अजूनही बरीच शिल्लक आहेत, नवी सामोरी येत आहेत याची ही प्रतीकात्मक जाणीव.

 

 

प्रथम प्रसिद्धी

अनुभव

मार्च २०२२

 

 

 

 

Saturday, 5 March 2022

खारट, अगदी अश्रूं इतकंच खारट..!

 

खारट, अगदी अश्रूं इतकंच खारट..!

डॉ. शंतनू अभ्यंकर

 

विरह  वेदनेनी व्याकूळ  होऊन कित्येक हिन्दी, उर्दू शायरांनी ‘आंसू पी पी के’ जीव जगवला आहे.  पण नेमक्या  ह्या अश्रूंइतक्याच खारट   पाण्यानी कित्येकांचे प्राण वाचवले आहेत आणि कित्येक आयाबायांच्या डोळ्यातील पाणी  थोपवले आहे.  ह्या पाण्याचं नाव जलसंजीवनी.

 

**************************************

 

कॉलरा आपल्या आसपास नाही आता. जवळपास संपल्यातच जमा आहे तो. म्हणजे अगदी निर्मूलन वगैरे नाहीये झालेलं त्याचं. पण त्याचं नसणं हे जगातल्या बहुसंख्यजणांच्या अंगवळणी पडलंय. दूरदेशी गेलेल्या नातेवाईकाला हळूहळू आपण बेदखल करावं तसं. पण कोणे  एके काळी कॉलरा हा काळ म्हणून उभा होता. वर्षानुवर्षे  खेड्यापाड्यात, लंडन-न्यूयॉर्कमध्ये किंवा आषाढी-कार्तिकीला पंढरपूरला भक्तजनांसह  कॉलऱ्याची वारीही ठरलेली. भूवैकुंठीचे अनेक भक्तजन थेट वैकुंठी  धाडायचं काम कॉलरा करत असे. पालखीबरोबर साथ येत असे, पसरत असे आणि ओसरत असे. माणसं सगळी निरवानीरव करूनच  तीर्थयात्रेला निघायची ते काही उगीच नाही.

कॉलराच्या साथीत सहजी  बळी जायचा  तो लहानग्यांचा. जबरदस्त जुलाब असतील तर निम्मी पोरं कोमेजून  दगावतात.  पण स्तनपानाचा आग्रह, लसीकरण, पोषक आहार वगैरेमुळे लहानगे अधिक टवटवीत झाले आणि ओ.आर.एस्.मुळे कॉलराचे कंबरडेच मोडले. हे ओ.आर.एस्. म्हणजे ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन. उत्तम मराठी प्रतिशब्द आहे, जलसंजीवनी. साखर, मीठ घातलेलं हे संजीवक तीर्थ किती खारट असावं लागतं? तर अगदी अश्रूं इतकं खारट!

कॉलऱ्यात जुलाब होतात. पण कॉलऱ्यातच नाही तर एकूणच जुलाबावर, अत्यंत गुणकारी ठरलेली ही युक्ती  आहे. ‘जुलाबावर गुणकारी, साखर मीठ पाणी’ किंवा ‘जुलाब होता बाळराजा, साखर मीठ पाणी पाजा’ अशी घोषवाक्य तुम्ही सरकारी इमारतींवर येताजाता, नाईलाजाने, वाचली असतील.  इतक्या किरकोळ युक्तीचा हा साधासोपा आग्रह म्हणजे वृथा फुगवलेला फुगा आहे असंही तुम्हाला वाटून गेलं असेल. पण आजवर काही कोटी जीव या युक्तीने वाचले आहेत. ही इतकी सोपी युक्ती आपल्या किंवा अन्य कुणाच्या बापजादयांच्या लक्षात कशी आली नाही हे एक कोडंच आहे. पण नाही लक्षात आली खरी. मंडळी याच्यासारखी अन्य काही द्रावणे वापरत होती पण ह्या तीर्थाची ताकद  काही औरच.  अगदी अलीकडे म्हणजे साठ-सत्तरच्या दशकात ह्या मंतरलेल्या पाण्याचा शोध लागला.

तत्पूर्वी(१९५३), कोलकात्यात, डॉ. हेमेंद्रनाथ चटर्जींनी   कॉलरात तोंडावाटे साखर, मीठ आणि पाणी  देऊन जुलाब  आटोक्यात आणले होते. १८६ पेशंटपैकी, पैकीच्यापैकी बरेही  झाले. ‘लॅन्सेट’ या भारदस्त ब्रिटिश संशोधनपत्रात त्यांनी आपले निष्कर्ष  प्रसिद्धही केले. पण ह्या अभ्यासात तोंडावाटे औषध न दिलेल्यांचे, म्हणजे सलाईनवाल्यांचे, (म्हणजे कंट्रोल ग्रुप) काय झाले,  याचा उल्लेख नव्हता आणि  आतबाहेर पाणी किती गेलं किती आलं, वगैरे  सविस्तर अभ्यास नव्हता. त्यामुळे हा  अभ्यास कमअस्सल  ठरला. ह्या पाण्यात त्यांनी काही वनस्पतीही घातल्या होत्या, त्यामुळे नेमका गुण कशाचा  हाही  प्रश्न होता. एका नुकत्याच स्वातंत्र्यप्राप्त वसाहतीतील, काळ्याबेंद्रया माणसाची ही कल्पना कोणीच फारशी  गांभीर्याने घेतली  नाही. आपल्याकडे सलाईन असताना असल्या गावठी, मागास उपायांची कशाला पत्रास ठेवा असाच विचार त्यांनी केला असणार. बगदादमध्ये, १९६६साली, अन्य संशोधनाशी अगदीच अपरिचित असलेल्या, डॉ. क्वाईस अल अक्वातींनी  साखर, मीठ, पाण्याची युक्ती, स्वयंस्फूर्तीने,  यशस्वीपणे वापरली. पण हाही गडी, ‘नाही चिरा, नाही पणती’ असाच राहिला. असे अनेक असतील, अनाम हुतात्मे काही युद्धांतच असतात असे नाही. संशोधनातही असतात.

तर जल संजीवनीच्या शोधाचे हे रामायण. किंवा ह्या शोधाचे हे महाभारतच म्हणा ना; कारण हया कथेत सुष्ट आणि दुष्ट अशी दुही नाहीये.  माणसाच्या माणूसपणाचे अनेक पैलू दडले आहेत. महाभारतासारखीच ही कथाही स्वार्थाची, परमार्थाची आणि सर्वार्थाची आहे. काळे-गोरे, पूर्व-पश्चिम असे भेद दर्शवणारी आहे. उच्च तंत्रज्ञान, त्यावरची मक्तेदारी आणि पारंपरिक शहाणपण याचं द्वंद्व दाखवणारी आहे.

हे सगळं संशोधन झालं ढाक्यात आणि कोलकात्यात, अमेरिकी संशोधन संस्थांच्या छत्राखाली. यापूर्वी उपचारात महत्वाचं स्थान होतं ते ग्लुकोज-सलाईनला. ह्याचा  प्रभावी वापर सुरू झाला तो 1920 च्या आसपास. हा उपचार कल्पनेबाहेर यशस्वी ठरत होता. ह्यात काय आणि किती शरीरात जातंय याची नेमकी गणती शक्य होती. हा मोठाच फायदा होता. ग्लुकोज म्हणजे एक प्रकारची साखरच आणि ‘सलाईन’चा तर  अर्थच मुळी खारट  पाणी. म्हणजे शिरेवाटे दिले जायचे तेही साखर, मीठ पाणीच होते.  मग सलाईनवर बरेच संशोधन होऊ लागलं. वेगळवेगळ्या  तऱ्हेचं सलाईन, थोडं हे असलेलं, थोडं ते असलेलं; थोडं अमुक नसलेलं, थोडं तमुक नसलेलं. पण शेवटी सलाईन ते सलाईन, ते शरीरात शिरवण्यासाठी सुई, नळी आणि बाटली एवढं किमान हवं. हे सगळं निर्जंतुक हवं. खाट, इस्पितळ, डॉक्टर आणि नर्सबाई  असेल तर उत्तमच.  एकेका पेशंटला डझनभर   सलाईनच्या  बाटल्या लागायच्या. शंभर वर्षापूर्वीचा  काळ डोळ्यापुढे आणा म्हणजे हे काय दिव्य होतं हे लक्षात येईल. ज्यांना खरी गरज, ज्यांच्या घरीदारी कॉलराची महामारी, अशा तिसऱ्या जगातल्या, खेड्यांपाड्यातल्या, निर्वासित छावणीतल्या, झोपडपट्टीतल्या पेशंटपर्यन्त हा उपचार पोहोचवणे अशक्यच होते. त्यांनी आपलं सुकून मरून जायचं. सुरकुतलेली त्वचा, डोळे खोल, जिभेला शोष, लघवी बंद, धाप लागलेली, नाडी जेमतेम, हातापायात वांब, अशी अगदी मरणप्राय स्थिति  काही तासात ओढवणार  आणि लवकरच मृत्यूनेच यातून सुटका होणार. 

तेंव्हा सलाईनपेक्षा  तोंडावाटे काही औषध देणे खूपच सोयीचं  आणि सोपं  ठरणार होतं. पण जुलाब झाल्यावर पोटाला ‘विश्रांती’ हवी अशीही एक कल्पना डॉक्टर-मानसात चांगली घट्ट रुतून बसली होती. त्यामुळे उपास, लंघन महत्वाचं होतं.  सहाजिकच होतं ते. आतडेच जर आजारी आहे तर त्याला विश्रांती द्यायची  का पचनाचं काम? आजारी अवयवाला कामाला जुंपणे अयोग्यच नाही का? पोटात काहीही दिलं की बरेचदा जुलाब वाढायचेच.  मुळात कॉलराच्या पेशंटला सुरवातीला जबरदस्त उलट्या होत असतात. अशा पेशंटला काही दिलं तर उलट्या वाढायच्या. शोष नष्ट होईल इतकं सारं पाणी पेशंट  पिऊ शकेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती.  तेंव्हा उपास  हा तर्कशुद्ध उपाय होता आणि तोंडावाटे उपचार तर्कदुष्ट.

जुलाबात आतड्याला सूज येते. ज्या अस्तरातून (श्लेष्मल त्वचा, Mucosa), एरवी पाणी आणि जीवनावश्यक अन्नघटक शोषून घेतले जातात तिथे आता गंगा उलटी वहायला लागते. पाणी आणि क्षार बाहेर, म्हणजे आतडयाच्या पोकळीत, ओतले जातात. तोंडावाटे काही दिलं तर उलटी तरी होते किंवा जुलाब आणखीनच वाढतात किंवा दोन्ही होते. पुढे जुलाब होतात तेंव्हा पोटात नेमकी काय गडबड होते, जुलाबावाटे जे बाहेर पडतं त्यात असतं तरी कायकाय, यावर संशोधन झालं (डॅनियल डॅरो, १९४९)  आणि उपचार अधिक शास्त्रशुद्ध झाले. जुलाबावाटे होणारा सोडियम, पोटॅशियम आणि ग्लुकोजचा पात, हाच  घात ठरतो. मग सलाईनमधून हे सगळं देण्याचा प्रयत्न सुरू झाला.  जे गळतंय तेच भरून काढायला हवं हे तर उघड होतं. जेवढं बाहेर पडतंय, जे बाहेर पडतंय, ते तेवढयाच  प्रमाणात भरून निघायला हवं. कमी नाही आणि जास्त नाही. ह्या माहितीचा उपयोग सलाईन यथायोग्य करण्यासाठी झाला. हे संशोधन झालं पहिल्या जगात. तिसऱ्या जगातले सलाईनलाही मोताद पेशंट त्यांच्या नजरेसमोर नव्हतेच. जे आपण शिरेवाटे देतोय तेच तोंडावाटेही देऊन पहायला हवं हे लक्षात यायला  बराच काळ लागला.

कॉलऱ्याचे स्वल्पविरामासारखे दिसणारे जंतू (व्हीब्रियो कॉलरा) आतडयाच्या पृष्ठभागावर घर करतात.  तिथून काही जहरीली रसायनं सोडतात. परिणामी शरीरातील पाणी आणि क्षार बदाबदा आतडयाच्या पोकळीत उतरतात आणि जुलाब होतात. आतडयातून पाणी झरते पण त्याच वेळी पाणी शोषून घ्यायची क्रियासुद्धा चालू असते. ह्या क्रियांचे संतुलन ढळलेले असते. साखर, मीठ आणि पाणी असा समसमा संयोग जुळून येताच बाहेर जाणाऱ्या पाण्यापेक्षा आत शिरणारे पाणी वाढते. शुष्कता कमी होते. पण हे सगळं घडायचं तर साखर, मीठ आणि पाणी योग्य प्रमाणातच  असावं लागतं.

साखर, मीठ पाण्याचे नेमके माप माहीत नसल्यामुळे असली सरबते बनवण्याचे सुरवातीचे प्रयत्न, प्रयत्नांच्याच पातळीवर राहिले. फार फार तर लंघन आणि पूर्णाहार ह्याच्या मधली पायरी म्हणून त्यांचा उपयोग केला जाई. सलाईनला पर्याय म्हणून, जवळपास  परिपूर्ण उपचार म्हणून,  ह्यांचा विचार शक्य नव्हता.

आतडयात ग्लुकोज  शोषले जाते ते सोडियमचे  बोट धरून (रिक्लीस, क्वास्टेल आणि क्रेन). ग्लुकोज साथीला असेल तर तिप्पट सोडियम शोषले जाते.  नुसतेच ग्लुकोज दिले किंवा  नुसतेच सोडियम (म्हणजे सोडियम क्लोराईड, मीठ) दिले किंवा नुसतेच पाणी दिले तर ते तितकेसे उपयोगी ठरु शकत नाही. ग्लुकोज आणि सोडियम ही जोडगळी पक्की असते. सुरवातीला असं वाटत होतं की जुलाबात ही जोडगळी फुटते. ‘सोडियम पंप’ अशी काही यंत्रणा आतडयाच्या अंतःत्वचेत असते. हा पंप जुलाबात निकामी होतो अशी प्रचलित समजूत होती. पुढे संशोधनाने ही समजूत मिथ्या ठरली. तीव्र जुलाबातही साखर-मीठाची जोडी आणि त्यांची आतडयातून शरीरात  आवक शाबूत असते असे दिसून आले (फिशर आणि पार्सन). म्हणजे जलसंजीवनीत ग्लुकोज असते ते भुकेसाठी नाही, तर  सोडियम आत शिरावे म्हणून.

पण हे सगळं संशोधन प्रत्यक्षात वापरलं गेलं ते १९६०साली फिलिपाईन्समधल्या साथीत. पण हे अजाणता झालं.   इथे डॉ.  फिलिप्सनी पेशंटना साखर, मीठ, पाणी दिलं पण त्यांना वरील संशोधनाची कल्पना नव्हती. असती तर साखर आणि  मीठ त्यांनी आवश्यकतेपेक्षा तिप्पट प्रमाणात घातलंच नसतं. सुरवातीच्या मोजक्या पेशंटमध्ये त्यांना अगदी  नाट्यमय परिणाम दिसला पण लवकरच ह्या प्रयत्नांचा शोकांत शेवट झाला. चुकीच्या साखर-मीठाच्या प्रमाणामुळे काही लोकं दगावली सुद्धा. जुलाबासाठी तोंडावाटे उपचारांवर  संशोधन,  हा प्रकार जरा मागेच पडला मग. सगळेच जरा दबकून पावले टाकू लागले. पण ग्लुकोज आणि पाणी जुलाबातही आतडयातून शोषले जातच असते असा प्रत्यक्ष पडताळा मात्र यातून प्राप्त झाला.  

हे अपयश पाहून सचार, हिर्शहॉर्न  आणि फिलिप्स या ढाक्याच्या  केंद्रातील  शास्त्रज्ञात अनेक वाद झडले. इतक्यात प्रयोग करावेत का नाहीत इथपासून  मतभेद होते.  पण प्रतिवर्षीप्रमाणे  साथ आली (१९६६) आणि सलाईनचा तुटवडा निर्माण झाला. आता पर्यायच नव्हता. गरज हीच शोधाची जननी ठरली.  मग बिचकत बिचकत सुरवातीला आठच पेशंटवर प्रयोग केले गेले. तोंडावाटे ग्लुकोज आणि पाणी दिलं  तर जुलाब कमी होतात, नुसतेच पाणी दिलं तर नाही हे अखेर सिद्ध झालं. पण हे संशोधन प्रत्यक्षात पेशंटपर्यन्त पोहोचवणे हे अत्यंत आव्हानात्मक होतं. मुळात ग्लुकोज आणि पाणी  दिलं  गेलं होतं ते नाकातून पोटात नळी घालून. कारण नेमकं किती द्रावण  आत गेलं हे काटेकोरपणे मोजायचे होते. नळीवाटे दिले गेले तितके ग्लुकोज आणि पाणी, कोणी आजारी माणूस आपण होऊन   पिऊ शकेल का?, हीच पहिली शंका होती. ह्या बरोबर धोका नको म्हणून सलाईनही चालू होतंच. म्हणजे नेमका कशाचा आणि  किती फायदा झाला हेही गुलदस्त्यात होतं. १९६७ साली कोलकात्यातील जॉन हॉपकीन्स सेंटरने असेच प्रयोग केले आणि आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले. कोलकातावाल्यांनी उपचारात बरेच बदल केले होते. त्यांनी जुलाबाच्या प्रमाणात, मोजून मापून साखर-मीठ पाणी दिले होते.  प्रमाण बदलून बदलून सर्वोत्तम प्रमाण शोधले होते. त्यांचे  काही पेशंट तर फक्त साखर, मीठ, पाण्यावर बिनासलाईनचे  तगले  होते. जर हे खरोखरच आवाक्यात आलं तर एक मोठाच प्रश्न मिटणार होता. इतक्यात बांगलादेशात (तत्कालीन पूर्व पाकिस्तान), चितगाओला पुनः कॉलऱ्याची साथ आली. तासाला लीटरभर या वेगाने तिथल्या पेशंटला साखर, मीठ, पाणी नळीतून देण्यात आलं पण अपयशच पदरी आलं. ह्या अभ्यासाचे निष्कर्ष तपासताना ठराविक प्रमाणात पाणी देण्याऐवजी जुलाबाच्या प्रमाणात ते दिलं  गेलं तर अधिक फायदा होईल हे लक्षात आलं. खेडूत, अशिक्षित लोकांना नेमकं  पाणी किती द्यावं  हे समजणार नाही, सबब सब घोडे बार टक्के या न्यायाने आधीचा प्रयोग रचला गेला  होता. आता ही त्रुटि दूर करायचं  ठरलं. ढाक्यात आणि मतलब बझारला साथ आली. तिथे  अत्यंत अत्यवस्थ पेशंटना सलाईन आणि प्यायला  जलसंजीवनी; असा प्रयोग सुरू झाला.  काय आश्चर्य; सलाईनची  गरजच मुळी ८०%नी कमी झाली. (डेव्हिड नलिन, रिचर्ड कॅश.)

यश टप्यात आलं आणि ढाक्का विरुद्ध कोलकाता असा सामना सुरू झाला. एकमेकांचे सहकारी आता  स्पर्धक झाले.   आधी यशाची आणि अपयशाची माहिती मुक्तपणे दिली घेतली जात होती आता जरा हातचे राखून व्यवहार व्हायला लागले. कोलकात्यात साथ यायची पावसाळ्यात आणि ढाक्यात हिवाळ्यात. यामुळेही अभ्यास पुढेमागे व्हायचे. उंदरा-मांजराचा हा खेळ.

पण इतक्यात परिस्थितीने वेगळेच वळण घेतले.  बांगलादेशात स्वातंत्र्ययुद्ध सुरू झालं. पाकिस्तानची शकले झाली. बांगलादेशचा जन्म झाला. ह्या संजीवन तीर्थाची जी गंगोत्री, ती  ढाक्याची कॉलरा रिसर्च लॅबोरेटरीच  अडचणीत आली. पण भारतात संशोधन आणि वापर होत राहिला. निर्वासितांच्या छावण्या म्हणजे कॉलराचे माहेरघर. अशा बजबजपुरीत, साधनांचा आणि संसाधनांचा दुष्काळ असताना कोलकात्यात डॉ. दिलीप महालनोबिस यांनी जलसंजीवनी वापरुन कित्येक प्राण वाचवले. इथे लक्ष ठेवायला पुरेसे डॉक्टर नव्हते, त्यामुळे इथे थेट पेशंटच्या  घरातलेच सगळं बघत होते. नाकात नळीबिळी भानगड शक्यच नव्हती. जलसंजीवनी थेट प्यायची होती.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील जलसंजीवनी संजीवक ठरत होती. म्हणूनच युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना वगैरेचं तिकडे लक्ष गेलं. डेटा जमा होत राहिला, जगभर मान्यता आणि मानमरातब वाढत राहिला. पुढे कॉलरात तसेच इतर जुलाबातही; थोरांत आणि पोरांतही; जलसंजीवनी प्राणदायी असल्याचं दिसून आलं. अमेरिकेतल्या ‘अपाशे इंडियन्स’ (अमेरिकेतील मूळनिवासी टोळी) मध्येही ट्रायल झाली. हिर्शहॉर्ननीच हा प्रयोग केला. तिथे अर्थात कॉलरा नव्हता पण इतर प्रकारचे जुलाब होतेच.  झकासच परिणाम दिसले.

किती द्यायचं हा प्रश्नही निकालात निघाला. उत्तर आलं, जितकं पेशंटला प्यावंसं  वाटेल तितकं. सलाईन अति दिलं तर पेशंट मरु शकतो. त्यामुळे सलाईनला देखभाल फार. जलसंजीवनी कोणी  अति पिऊच शकत नाही. अगदी एक  महिन्याच्या बाळालाही ही उपजत जाण  असते.   जलसंजीवनी जणू स्वयं-नियंत्रित. हा तर निसर्गाचा नीर-क्षार-विवेक. आता हेच बघा ना; काही वेळा फक्त पाण्याचे जुलाब होतात. क्षार बाहेर पडत नाहीत. अशा वेळी पेशंटला तहान  लागते ती फक्त  पाण्याची. खारे पाणी पेशंटला नकोसे वाटते. अशावेळी मीठाचा आग्रह न धरता पेशंटची पाण्याची मागणी तेवढी पुरवली पाहिजे.  

सत्तरच्या दशकात जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने तिसऱ्या जगात मोठ्याप्रमाणावर जलसंजीवनीचा सांगावा  दिला. दोन ग्लास पाण्याला (५०० मिली), मूठभर साखर आणि तीन बोटांची चिमूट मीठ.  असा अगदी    घरगुती फॉर्म्युला; एखाद्या केसांची चांदी झालेल्या आजीनं  सांगावा तसा. अभावितपणे एक शांततापूर्ण क्रांतीच झाली जणू.

जगानी डोक्यावर घेऊनही अमेरिकेत या उपचारांकडे जरा अनादरानेच पहिलं जातं. सगळा  भर सलाईनवर असतो. त्यात आर्थिक हितसंबंध आहेतच पण इतक्या साध्याभोळ्या उपचारांबद्दलचा अहंमन्य  आकसही आहे. एकूण आव असा, की ही तर  कुठल्यातरी दरिद्री देशातल्या, दरिद्री जनतेसाठी, शोधून काढलेली, जडीबुटीची, घरगुती पद्धत. कदाचित मागास अपाशे इंडियन पोरांना याची गरज असेलही पण  अत्याधुनिक पंचतारांकित हॉस्पिटलातल्या भारी भारी अमेरिकेन पेशंटना याची काय  गरज?

जलसंजीवनी हा उपचार आहे. शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छता, शौचालय ही आरोग्याची गुरुकिल्ली खरीच पण ही किल्ली बनवायला वेळ लागतो. तंवर ज्यांना जुलाब होतील त्यांना उपचार द्यावेच लागतात. म्हणूनच  मग   जलसंजीवनीच्या मंतरलेल्या पाण्याने, कोपलेल्या पोटाची उदकशांत  साधली जाते.

 

पूर्वप्रसिद्धी

अनुभव

मार्च २०२२