Friday, 28 January 2022

अंगावरून जास्त जाणे

 

अंगावरून जास्त जाणे

डॉ. शंतनू अभ्यंकर

 

पाळीच्या वेळेला नेमका किती स्त्राव होतो हे काही नेमकेपणाने मोजता येत नाही त्यामुळे जो स्त्राव त्रासदायक वाटतो तो अति प्रमाणात समजणे अशी ढोबळ व्याख्या मनाशी धरायला हरकत नाही.  शेवटी पाळी येणे हे  जर का नैसर्गिक, प्रकृत, म्हणजे आरोग्याचे लक्षण असेल; तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तिचा अडथळा ठरता कामा नये. वेदनेमुळे किंवा अति रक्तस्त्रावामुळे जर तुमच्या कामात अडथळा येत असेल, तर काही न काहीतरी तपासणी आणि उपचार करण्याची निश्चितच  गरज आहे.

तासातासाला घडी बदलावी लागणे, आठवड्याभरापेक्षा जास्त दिवस अंगावरून जाणे, पॅड बदलायला  रात्री उठावे लागणे, दोन सायकल्समध्ये जातच राहणे आणि अंगातलं रक्त कमी झाल्यामुळे, दम लागणे, निरुत्साह वाटणे ही सगळी त्रास सूचक लक्षणे.

 

नियमितपणे पाळी येते त्या वेळेला होर्मोन्सच्या छत्राखाली अस्तर योग्य पद्धतीने वाढतं आणि ठराविक कालावधीनंतर एकसाथ सगळं अस्तर बाहेर पडून जातं. अस्तर संपूर्णपणे तयार होणं आणि संपूर्णपणे बाहेर पडणं महत्वाचं  आहे.  तरच मोजक्या दिवसांमध्ये ब्लीडींग थांबतं.  पण समजा होर्मोन्समध्ये असंतुलन असेल तर एकीकडचे अस्तर पडेपर्यंत दुसरीकडं निर्माण होत राहतं आणि मग ते पडेपर्यंत पुन्हा पहिल्या ठिकाणी नव्याने अस्तर निर्माण होतं आणि मग खूप प्रमाणात आणि खूप दिवस रक्तस्त्राव होत राहतो.

काही वेळेला स्त्रीबीज निर्माण होत नाही किंवा उशिरा निर्माण होते आणि मग अतिरिक्त, जाडच्या जाड अस्तर तयार होतं.  परिणामी पाळीच्या वेळेला खूप रक्तस्राव होतो.

तांबी  बसवली असेल, गर्भपिशवीला फायब्रॉइच्या गाठी असतील,  किंवा आत मोड यावेत अशा गाठी आल्या असतील (Polyp), पिशवीचे अस्तर खोलवर  गर्भपिशवीत शिरून तिथे बारीक गाठी झाल्या असतील (Adenomyosis) तरीही जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. कधी कधी प्रेग्नन्सी राहिलेली समजलेलंच नसतं आणि त्यातून उद्भवलेला रक्तस्त्राव पेशंट,  ‘पाळीचं जास्त जातंय’ या सदरात घालतात. कॅन्सर ही तर एक सर्वज्ञात कुशंका आहेच. कधी कधी  रक्त साकळण्यात त्रुटी,  अतिरक्तस्त्रावाच्या रूपाने आपलं अस्तित्व प्रथम दाखवून देतात. हृद्यविकारासाठी रक्त पातळ होण्याची औषधे चालू असणे किंवा  ब्रेस्ट कॅन्सरसाठीची काही औषधे चालू असतील तरीही अतिरक्तस्त्राव संभवतो. अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात.

निदान होण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. शरीरांतर्गत तपासणी, पॅप स्मिअर, सोनोग्राफी, दुर्बिणीतून तपासणी, क्युरेटिंग अशा तपासण्यांचा वापर करून नेमके निदान केलं जातं.

उपचारांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वय आणि इतर बाबी लक्षात घेऊन सुयोग्य उपचार ठरवले जातात. ब्लीडिंग कमी व्हायच्या गोळ्या, गर्भनिरोधक गोळ्या, एलएनजी आययुएस, क्युरेटिंग, पिशवी काढून टाकणे  असे काही पर्याय आहेत.

एलएनजी आययुएस (LNG IUS) हे नाव आहे एका गोळीचं. ही   तांबीसारखी गर्भपिशवीच्या आत बसवली जाते. सुमारे पाच ते सात वर्ष तिथे हळूहळू औषध पाझरत रहाते.  याने पिशवीचे अस्तर पातळ राहते आणि रक्तस्त्राव कमी होतो. जिथे काम तिथेच औषध पोहोचत असल्याने शरीरावर इतरत्र दुष्परिणाम संभवत नाहीत.  सुमारे ८०% पेशंटमध्ये उत्तम परिणाम दिसतो.

क्युरेटींग, शास्त्रीय नाव  डायलेटेशन आणि क्युरेटाज, म्हणजे पेशंटच्या भाषेत ‘कुरटेशन’.  ही सर्वात कॉमन तपासणी आणि/किंवा उपचार. यांनी तीन गोष्टी साधतात. क्युरेटिंग केल्याने ब्लिडींग लगेच थांबते,  अस्तराचा तुकडा तपासायला मिळतो. त्यामुळे नेमक्या काय कारणाने बिल्डींग होत होतं, हे समजतं. नवीन येणारे अस्तर हे एकसाथ निर्माण होते आणि एकसाथ गळून पडते. म्हणूनच बरेचदा क्युरेटिंग हाच उपचार सुद्धा ठरतो.

 

ब्लीडिंग होतं ते अस्तरातून. त्यामुळे हे अस्तर नष्ट करण्याचे वेगवेगळे मार्ग डॉक्टरांनी चोखाळून बघितले आहेत.  अस्तर खरवडून काढणे (क्युरेटींग), खरवडून काढता काढता लाईटचा शेक देऊन मुळापासून  जाळून टाकणे, गर्भपिशवीत फुगा फुगवून त्यात गरम पाणी सोडून अस्तर नष्ट करणे वगैरे. मूळ करणानुसार यातील काही वेळोवेळी सुचवले जातात.

आपल्याकडे सर्रास वापरला जाणारा उपचार म्हणजे पिशवी काढून टाकणे. प्रत्येक वेळी हा आदर्श उपचार असतोच असं नाही पण प्राप्त परिस्थितीमध्ये अन्य पर्याय स्वीकारणं पेशंटला आणि डॉक्टरनाही जड जातं.  पिशवी काढणे हा कायमस्वरूपी इलाज समजला जातो. पिशवी  न काढता केलेल्या उपचारांतील  अनिश्चितता, वारंवार दवाखान्यात जाणे, पुन्हा पुन्हा होणारा खर्च, हे गरीब पेशंटला मानवत नाही. परवडत तर  नाहीच नाही.  ही सगळी परवड टाळण्यासाठी मग पिशवी काढण्याचा, एक घाव दोन तुकडे छापाचा,  निर्णय घेतला जातो.

स्त्रीचे काम म्हणजे फक्त मुले काढणे, असा दृष्टीकोन असेल तर पिशवी म्हणजे निव्वळ गर्भनिर्मितीचा अवयव उरतो. मग तेवढे काम झाले की पिशवी म्हणजे फक्त पाळी आणि कटकटी. मग उडवून टाकली पिशवी तर हरकत काय? हा अनिष्ट  दृष्टीकोन बरीच अरिष्ट घेऊन येतो.

अवेळी आणि अनावश्यक ऑपरेशन करण्याचे अनेक तोटे आहेत. एका ओळीत सांगायचं तर याने म्हातारपण लवकर येतं. हाडे ठिसूळ होणे, ब्लडप्रेशर, हृदयविकार वगैरे मागे लागतात. ऑपरेशन झाल्या झाल्या लगेच  काही हे होत नाही.  त्यामुळे या गोष्टींशी ऑपरेशनचा संबंध जोडला जात नाही एवढंच. 

अनावश्यक असताना  पिशवी काढण्याची  ऑपरेशन टाळायची  असतील, तर पर्यायी उपचारात पेशंटचाही समजूतदार आणि सक्रीय सहभाग असायला हवा. तोपर्यंत ते शक्य नाही.

 

Friday, 14 January 2022

ओव्हेरिअन सिस्ट

 

ओव्हेरिअन सिस्ट

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

भाषेत शब्दांचे  दुर्भिक्ष असेल तर ते त्या भाषिकांना भोवतंच. मराठीतच बघाना, शरीरात कुठल्याही प्रकारच्या अतिरिक्त  वाढीला ‘गाठ’ असा एकच शब्द वापरला जातो.  मग ती साधी गाठ असो, शंकास्पद असो वा  कॅन्सरची. या संदर्भातले अनेक पारिभाषिक शब्द इंग्लिशमध्ये आहेत.  पण हे ज्ञान, ही विद्या, इंग्रजीतच निर्माण झाल्यामुळे असं आहे. मराठी भाषिक सुरुवातीच्या संशोधनात कुठेच नव्हते त्यामुळे तिथे मराठी शब्द येण्याचा प्रश्नच  येत नाही आणि आता संशोधनात जरी असले, तरी मुळात संशोधनाची भाषाच  इंग्लिश झाल्यामुळे तिथे  मराठी भाषिक असूनही काही उपयोग नाही.

आजचा विषय आहे ओव्हेरिअन सिस्ट. ओव्हरी म्हणजे स्त्रीबीज ग्रंथी आणि सिस्ट याचा अर्थ द्रव भरली गाठ. कुठलीही गाठ म्हटलं की पेशंटच्या काळजात चर्रर्र होतं. ही गाठ कॅन्सरची तर नसेल ना, अशी कुशंका मनात डोकावते. मग गाठ, तिचे प्रकार, त्यांची नावे, त्यांचे अर्थ वगैरे सांगता सांगता डॉक्टरांची बरीच दमछाक होते. तऱ्हेतऱ्हेच्या गाठींसाठी  तऱ्हेतऱ्हेचे शब्द आपल्या भाषेत रुळलेले असते तर हे प्रकरण जरा सोपं गेलं असतं. पण गाठ हा एकच शब्द वापरून सारे अर्थ आणि अनर्थ समजावून सांगणे आणि पेशंटने ते समजावून घेणे,  अवघडच जातं.  तरीही आपण प्रयत्न करून पाहू.

बहुतेक सिस्ट निरुपद्रवी असतात. क्वचित  काही तापदायक ठरतात. ओटीपोटात दुखणे, जडजड  वाटणे, ओढ लागणे अशा काही तक्रारी उद्भवू शकतात. क्वचित  तीव्र वेदना, उलट्या, ताप असंही चित्र दिसतं. स्त्रीबीजग्रंथीना देठं असतात. यातून रक्तवाहिन्या गेलेल्या असतात. गाठींच्या ओझ्याने या देठाला पीळ पडला तर रक्तपुरवठा बंद होतो. तीव्र वेदना सुरू होतात. तातडीने ऑपरेशन करून पीळ  सोडवून गाठ काढावी लागते.

 

फॉलीक्युलर सिस्ट आणि ल्युटीअल सिस्ट

दरमहा स्त्रीबीज तयार होताना स्त्रीबीजग्रंथीमध्ये पाण्याच्या अशा गाठी निर्माण होणं आणि त्या फुटणं  हे स्वाभाविक आहे. सुरवातीला  अनेक बीजे फुगत जातात, मग त्यांची टेंगळे बीजग्रंथीवर दिसायला लागतात. यातले एकच कुठलंतरी बरंच वाढतं. याला म्हणतात फॉलीक्युलर सिस्ट.   हे दोन-अडीच सेंटिमीटर झाल्यावर फुटतं. यातून स्त्रीबीज बाहेर पडतं. उरलेल्या रिकाम्या फुग्यात किंचित रक्तस्त्राव साठून राहू शकतो.  याला म्हणतात ल्युटीअल सिस्ट. या दोन्ही गोष्टी नॉर्मल आहेत निसर्गतः या गाठी निर्माण होतात आणि लय पावतात क्वचित कधीतरी त्या जात नाहीत. तरीही, वाट पहाणे किंवा काही महिने गोळ्या देणे, यापलीकडे यासाठी विशेष काही करावे लागत नाही.

बरेचदा अन्य काही कारणाने सोनोग्राफी केली जाते आणि त्यात ही ‘गाठ’ असल्याचं वाचून पेशंट अस्वस्थ झालेली असते. पण असल्या गाठींचा त्रास पेशंटपेक्षा डॉक्टरना अधिक होतो. कारण, गाठ म्हणजे कॅन्सर, हे समीकरण  डोक्यात फिट्ट घेऊन आलेल्या पेशंटला, ‘काही विशेष नाही’, हे निदान पटत नाही. उलट प्रॉब्लेम नाही असं सांगणाऱ्या डॉक्टरमध्येच प्रॉब्लेम आहे अशी त्यांना शंका येते. मग गूगल, सेकंड ओपिनिअन वगैरे सोपस्कार पार पडून ही शंका निवळते किंवा चिघळते.  

 

डर्मोइड सिस्ट

ज्यापासून शरीरातील कोणतीही पेशी बनू शकेल अशा सर्व-संभव-पेशी स्त्रीबीजग्रंथीमध्ये  असतात.  या पेशीपासून  कधीकधी गाठी उद्भवतात. यांना म्हणतात डर्मोइड सिस्ट.  या गाठींमध्ये त्वचा, केस, दात, थायरॉईड, अशा कुठल्याही प्रकारचे ओबडधोबड अवयव आढळतात. वैज्ञानिक संशोधन होण्यापूर्वी ह्या गाठीतले  हे अक्राळविक्राळ अवयव पाहून ही काहीतरी सैतानी बाधा आहे असा समज रूढ होता. डर्मोइड सिस्टमधून कॅन्सर क्वचितच होतो पण सिस्ट आकाराने वाढू शकतात, त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे ते काढून टाकणे  केव्हाही चांगले.

 

सिस्टअॅडीनोमा

सिस्टअॅडीनोमा या प्रकारच्या गाठीत चिकट पाणीदार  द्रव भरलेला असतो. यातूनही कॅन्सर क्वचितच होतो. पण कधी या आकाराने  प्रचंड वाढलेल्या दिसतात.  आदिवासी, दुर्गम भागात राहणाऱ्या महिला वर्षानुवर्ष अशा गाठी पोटात बाळगून असतात. पोट चांगलं, नऊ काय, नव्वद महिन्याचे  असल्यासारखं फुगलेलं असतं. अतिशय किरकोळ शरीरयष्टीची बाई आणि टम्म फुगलेलं पोट. बाईला गाठ आहे का गाठीला बाई फुटली आहे असा प्रश्न पडावा, असं चित्र असतं. कधीतरी वैद्यकीय सेवेची आणि त्यांची गाठ पडते. मोठ्या हिकमतीनी गाठ काढली जाते. त्या परात  भरून उतू जाणाऱ्या, १२-१५ किलो वजनाच्या गरगरीत गाठीसोबत डॉक्टरचमूचं  फोटो सेशन पार पडतं.

खरंतर वर्षानुवर्ष गाठ पोटात बाळगण्याचा अनवस्था प्रसंग ओढवणे, हे व्यवस्थेची दुरवस्था दर्शवत असतं. दुरवस्था ही खरी बातमी असते. पण पेपरात मात्र पराक्रमी डॉक्टरांचा आणि गाठीच्या शिकारीचा फोटो झळकतो.

 

एन्डोमेट्रीओमा

गर्भपिशवीच्या अस्तराच्या पेशी कधीकधी बीजग्रंथीपाशी  वाढतात.  मासिक पाळीच्या वेळी तिथे रक्तस्त्राव सुद्धा होतो. मग ही रक्ताची पुटकुळी वाढत वाढत जाते. हळूहळू चांगली मोठी गाठ निर्माण होऊ शकते. यातलं रक्त अगदी काळं काळं पडलेलं असतं. डार्क  चॉकलेटइतकं काळं. म्हणून याला म्हणतात चॉकलेट् सिस्ट. या प्रकारच्या गाठी कधी कधी आतल्याआत  फुटतात आणि तीव्र वेदना घेऊन पेशंट दवाखान्यात येते.

 

सिस्टसाठी तपासणी आणि निदान

शारीरिक तपासणी, प्रेग्नेंसी टेस्ट, सोनोग्राफी आणि गरज पडल्यास लाप्रोस्कॉपी करावी लागते. कॅन्सरची शक्यता लक्षात घेऊन सीए१२१ ही तपासणी करतात. यातून निदान होत नाही पण शंका किती घ्यावी याचा काही अंदाज येतो.

 

उपचार

कोणत्या प्रकारची गाठ आहे यावर उपचार अवलंबून आहेत.  काहीही न करणे, म्हणजे  ‘तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे’, हासुद्धा उपचार ठरू शकतो कारण वर सांगितल्याप्रमाणे यातल्या काही गाठी कालांतरानी आपोआपच विरून जातात.

बरेचदा गर्भनिरोधक गोळ्या काही महिन्यांसाठी दिल्या जातात.

आकाराने मोठ्या असलेल्या, वाढत चाललेल्या, शंकास्पद दिसणाऱ्या, अशा प्रकारच्या गाठी थेट ऑपरेशननीच काढाव्यात असा सल्ला दिला जातो.  फक्त गाठ; किंवा स्त्रीबीजग्रंथी आणि गाठ; किंवा गाठ, बीजग्रंथी आणि पिशवी असं सगळंच काढावे लागू शकते.

काहीही झालं, डोळ्याला कितीही  साधी वाटली तरी काढलेली प्रत्येक गाठ ही  तपासून घेतलीच पाहिजे (Histopathology). पण बरेचदा पैसे वाचवण्याच्या भानगडीत; दिसायला सगळं चांगलं दिसतंय  ना? तुम्हाला काही वाटत नाही ना? मग कशाला उगीच तपासायचं? असा युक्तिवाद केला जातो. हा घातक ठरू शकतो. शरीरातून काढलेला प्रत्येक अवयव/तुकडा हा सूक्ष्मदर्शकाखाली तपासला गेलाच पाहिजे.

ह्या तपासणीत त्या गाठीच्या स्वरूपाचं अंतिम निदान होतं. पुढील उपचारांची स्पष्ट दिशा मिळते.

 

प्रतिबंध 

गर्भनिरोधक गोळ्यांनी काही प्रकारच्या गाठी टळतात पण  गाठी अजिबातच होऊ नयेत असे कोणतेच प्रतिबंधक  उपचार नाहीत.

 

नियमित तपासणी

पोटात चांगली ऐसपैस जागा असते.  त्यामुळे गाठी चांगल्या मोठ्या झाल्याशिवाय सहसा काहीच लक्षणे आढळत नाहीत. त्यामुळे वार्षिक शारीरिक तपासणीत सोनोग्राफी करून एकदा बीजग्रंथींची हालहवाल विचारून घेणे चांगले.

Sunday, 2 January 2022

मी एक मुंगी, तू एक मुंगी..

 

मी एक मुंगी, तू एक मुंगी..

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

मुंग्यांचे विलक्षण अभ्यासक, जणू ‘पिपिलिका (मुंगी) पुरुष’, असे  एडवर्ड ओ. विल्सन गेले. रविवारी,  सव्वीस तारखेला, वयाच्या ९२व्या वर्षी त्यांचं निधन झालं. एडवर्ड ओ. विल्सन हे एक जगप्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ.

 

सजीवांची सामाजिक वर्तणूक आणि उत्क्रांतिवाद यांचं नातं विशद करणारे  मूलभूत संशोधन त्यांनी केले.  त्यामुळेच त्यांना ‘डार्विनचे निसर्गदत्त वारसदार’ असं बिरूद लावलं जायचं. यातले  बहुतेक संशोधन चक्क मुंग्यांबद्दल होते.  शरीरातून विशिष्ट वास सोडून मुंग्या एकमेकींशी संवाद साधतात, हा त्यांचाच  शोध. मुंग्या, त्यांचे समाज आणि त्याचे  अन्य सामाजिक प्राण्यांशी असलेले  नाते  त्यांनी उलगडून दाखवले.  ‘सामाजिक जीवशास्त्र’ अशी एक नवीनच ज्ञानशाखा यातून उदयाला आली. अगदी मानवी समाजाची जडणघडण सुद्धा मुंग्यांच्या अभ्यासातून उलगडते हे त्यांनी दाखवून दिले. सारे पृष्ठवंशीय प्राणी नष्ट झाले तर जगाचं फारसं काही बिघडणार नाही पण अपृष्ठवंशीय प्राणी नष्ट झाले तर पृष्ठवंशीय प्राण्यांचे काही खरं नाही; ही समज त्यांनी दिली.

 

माणसाच्या शरीररचनेचेच नाही तर त्याच्या मनाच्या रचनेचे आणि सामाजिक वर्तनाचे उलगडे उत्क्रांतीशास्त्रात दडलेले आहेत. जगण्याच्या शर्यतीत सबळ तेवढे तगतात हा सिद्धांत प्रसिद्धच  आहे. यानुसार प्रत्येक जण, इतर प्रत्येकाचा शत्रूच ठरतो! प्रत्यक्षात मात्र  जो तो  फक्त व्यक्तिगत स्वार्थ साधतो आहे, असे  वर्तन दिसत नाही. माणसातही नाही आणि अन्य प्राण्यातही नाही.  

 

आपल्या लेकराबाळांसाठी जीवाला जीव देणारे प्राणी आहेत.  सग्यासोयऱ्यांसाठी सोसणारे आहेत.    (जीवशास्त्रातल्या आणि समाजातल्यासुद्धा) जातीसाठी माती खाणारे आहेत.   राणीमाशीच्या सेवेसी आयुष्य वाहून नपुंसकत्व पत्करणाऱ्या कामकरी मधमाश्या  आहेत आणि जनुकीय वारसदार  (पुनरुत्पादन) अशक्य असूनही समलिंगी संबंध पिढ्यानपिढ्या टिकून आहेत! नेमका कोणता जनुकीय स्वार्थ हे असले प्रकार उत्क्रांत होऊ देतो?; हा गहन प्रश्न आहे.

स्वतः जगण्यात, जुगण्यात आणि फळवण्यात जनुकीय स्वार्थ आहेच. यामुळेच जे आहेत ते सारे तगून आहेत (Individual selection).  पण सग्यासोयऱ्यांना मदत करण्यातही जनुकीय स्वार्थ आहे. त्यामुळे असे कुटुंबवत्सलही तगून आहेत (Kin selection). समूह तगावा  म्हणून, समष्टीसाठी बलिदान देण्यातही  जनुकीय स्वार्थ आहे. त्यामुळे मोहरा इरेला  पडला तरी समूह तगून रहातो (Group selection) आणि ‘बलिदानाची जनुकीय परंपरा’ उत्क्रांत होते.  नैसर्गिक निवड ही अशी विविध पातळ्यांवर प्रभाव गाजवत असते.

 

व्यक्ति का समष्टी?, हा झगडा जसा माणसाच्या वागणुकीत दिसतो तसा त्याच्या पदरी आलेल्या  जनुकीय दानातही दिसतो. तो  निसर्गातही  दिसतो. इतकंच कशाला, तसा झगडा उत्क्रांती अभ्यासकांतही दिसतो!! विल्सन समष्टीवाले.

 

मुंग्या आणि माणसे मोठ्या हिकमतीने अतिशय गुंतागुंतीच्या सहजीवी समाजरचना  उभारतात. या अशा प्राण्यांनी आधी वारुळे, पोळी आणि घरे बांधली. मग त्याच्या व्यवस्थापनासाठी श्रमविभागणी आली आणि त्यातून गुंतगुंतीची समजरचना उभी राहिली.  भूतलावर जेमतेम दोन डझन प्राण्यांत अशी समाजरचना उत्क्रांतली  आहे. पैकी माणसाचा पृथ्वी-विजय तर दिसतोच आहे पण मुंग्याही काही कमी नाहीत. एका पारड्यात मुंग्या घातल्या आणि दुसऱ्यात  इतर सर्व कीटक घातले, तरी मुंग्यांचेच पारडे जड ठरेल, इतक्या सर्वव्यापी आहेत त्या.

 

विल्सन सांगायचे, दैवी म्हणावं असं तंत्रज्ञान पण मध्ययुगीन संस्थात्मक रचना आणि अश्मयुगीन भावभावना घेऊन आपण जगतो आहोत.  हीच आजची मानववंशाची गोची आहे. वर्णभेद, समस्तांना ग्रासणाऱ्या पर्यावरणसंहारासारख्या विषयावर असहकार, इतकेच काय पण धर्मसंस्थेचा अविचल पगडा; ही सारी ह्या गोचीची लक्षणे आहेत. नीट पर्याय निवडले तरच  मानववंशाला भविष्य आहे. लोकसंख्या नियंत्रण, परिसंस्था संवर्धन आणि पर्यावरण सुसंगत रहाणी  हे ते उत्तम पर्याय.

 

व्यक्ति का समष्टी या जनुकीय झगड्यातून माणसाचे वर्तन घडते. स्वार्थ, परोपकार, इज्जत, कर्तव्य, हौतात्म्य अशी वर्तन-वैशिष्ठ्ये; भाषा, कला, धर्म अशा मानव्य-विद्या इतकेच काय साक्षात संस्कृतीचा मूळचाची झरा, आहे जनुकीय खरा; अशी त्यांची मांडणी आहे. जनुके आणि संस्कृती एकमेकांचे बोट धरून उत्क्रांत झाली आहेत.

 

म्हणूनच माणसाच्या कर्तृत्वाचे मोजमाप करायचे झाले तर ते तंत्रज्ञानाने नव्हे तर चित्र, शिल्प, संगीत, साहित्य, तत्वज्ञान अशा  मानव्यविद्यांच्या ‘सुसंस्कृत’ मापाने करावे लागेल; असं त्यांचे मत.  परग्रहवासीयांना आपल्या विज्ञानाचे मुळीच कौतुक असणार नाही. कारण ते आपल्यापर्यंत पोहोचले याचाच अर्थ ते कितीतरी प्रगत असणार. त्यांना कौतुक असेल ते मानवाच्या कलाविष्काराचे. या विद्या हाच मानवजातीचा खरा चेहरा होय.

 

ते नुसतेच वाचीवीर नव्हते तर कृतिशील होते. अनेक जैववैविध्य संवर्धन संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.  धर्माचरण आप-परभाव जागवत असते पण त्याच वेळी करुणा, परोपकार आणि सहकार्यही घट्ट करत असते.  तेंव्हा विज्ञान आणि धर्मकल्पना यांची सांगड घालून जैविक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येईल, असा विचार त्यांनी The Creation: An Appeal To Save Life On Earth (2006) या आपल्या पुस्तकातून मांडला.

 

जनसामान्यांना आपल्या क्षेत्राची ओळख व्हावी म्हणून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली.  त्यातल्या दोन पुस्तकांना, On Human Nature (1979) आणि The Ants (1991) यांना,  मानाचा पुलित्झर पुरस्कार देखील मिळाला. Letters to a Young Scientist हे त्यांचं पुस्तक अनेक भावी वैज्ञानिकांना स्फूर्तिदायी आणि मार्गदर्शक ठरले आहे.

 

म्हणूनच मुंगीचे महाभारत अभ्यासणाऱ्या आणि ‘मी एक मुंगी तू एक मुंगी’, ही मर्ढेकरांची प्रतिमा जणू शास्त्रशुद्धरित्या सिद्ध करणाऱ्या ह्या वैज्ञानिकाला भावपूर्ण आदरांजली.