Wednesday 5 May 2021

लस आहे पण सालस आहे का?

लस आहे, पण सालस आहे का? 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

कोणतीही लस म्हणा, औषध म्हणा, सालस असावं अशी आपली सार्थ अपेक्षा असते. त्यांनी त्याचं काम करावं, काम झालं की बाजूला व्हावं. कुणाच्या अध्यात न मध्यात. विशेषतः लस तर सालस असणं अगदी अगत्याचं. कारण लस ही मुळात निरोगी लोकांनी घेण्यासाठी आहे. 

अठरा वर्षावरच्या जनतेला कोव्हिडची लस आता उपलब्ध आहे. ही कितपत सालस आहे याचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळे  ‘लसीचा गरोदरपणात पुरेसा अभ्यास झालेला नाही’, सबब ती गरोदर स्त्रियांना आणि स्तनदा मातांना ‘देऊ नये’, असं  भारत सरकारचे अधिकृत उत्तर आहे. हे खरंच आहे. लशीच्या जन्मालाच जिथे ९ महिने व्हायचेत, तिथे नरजन्मावरचा तिचा असर  अभ्यासणार कुठून?  

पण या क्षेत्रात काम करणारे जगभरचे तज्ञ, भारतातील स्त्रीआरोग्य व प्रसुतीशास्त्र तज्ञांची संघटना,  अशीच जागतिक शिखर संघटना ‘फिगो’, डब्ल्यूएचओ, इत्यादी  सरकारच्या मताशी सहमत नाहीत. जगभरच्या तज्ञ संघटनांचं गर्भिणींना लस दया असंच सांगणं सांगणे आहे. पाळीच्या वेळेला ही लस घेतली तरी चालते. वंध्यत्वासाठी उपचार चालू असतील तरीही लस घेतलेली चालेल.  लस घेण्यापूर्वी आवर्जून प्रेग्नेंसी टेस्ट करण्याची आवश्यकता नाही आणि चुकून लस घेतली गेलीच तरी तेवढ्यासाठी गर्भपात करण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात संभाव्य तोट्यांपेक्षा फायदे अधिक संभवतात सबब  ही लस गरोदर महिलांना (चौथ्या महिन्यानंतर) आणि स्तनदा मातांना उपलब्ध व्हावी अशी साऱ्यांची आग्रहाची शिफारस आहे.

मुळात लसीला मान्यताच मुळी, ‘असाधारण आणि टोकाची परिस्थिती’ लक्षात घेऊन ‘प्रायोगिक तत्वावर’ देण्यात आलेली आहे. लस निघून, गरोदर महिलांना टोचून, त्यांना मुलं होऊन, ती नाकी डोळी नीटस निपजतात की नाही हे पाहायला, किमान नऊ महिने वाट पाहायला हवी आणि पुढे ती नीट वाढतात की नाही हे पाहायला, तितकीच वर्ष वाट पहायला हवी. पण तरीदेखील अशी शिफारस करण्यामागे काही कारणे आहेत. जगात विविध प्रकारे काम करणाऱ्या विविध लसी उपलब्ध आहेत. यातल्या गरोदरपणात कोणत्या चालतात, कोणत्या नाही, हे ज्ञात आहे. यावरून उपलब्ध लसींच्या सुरक्षिततेचा हा अंदाज बांधला आहे.   

आपल्याकडे दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. त्यांच्या दोन कार्यपद्धती आहेत. निष्प्राण निष्प्रभ विषाणू वापरलेली  अशी कॉव्हाक्सीन आणि कोव्हिड चे प्रतिजन अन्य निरूपद्रवी व्हायरसच्या मदतीने आपल्या प्रतिकारशक्ती पुढे पेश करणारी, अशी कोव्हीशिल्ड (आणि स्फुटनिक सुद्धा). अशाच कार्यपद्धतीवर बेतलेल्या इतर लसींचा  अनुभव अगदी उत्तम आहे. कोव्हिडच्या या दोन्ही  प्रकारच्या लसींमध्ये सक्षम, कार्यरत, विषाणू नसल्यामुळे लसीमुळेच  कुणाला कोव्हिड  होण्याची शक्यता नाही. वारेतून, दुधातून तो बाळालाही होण्याची शक्यता नाही.  त्यामुळे सुरक्षिततेची संभाव्यता बरीच आहे.  उलट अशी लस आईला दिल्यास तिला   तर कोव्हिडपासून संरक्षण मिळेलच  पण आईच्या प्रतिपिंडांचा अंश वारेवाटे आणि दुधावाटे बाळापर्यंत पोहोचून बाळालाही संरक्षण मिळू शकते.  

गरोदर स्त्रिया नाजूक अवस्थेमध्ये असतात आणि कुठल्याही आजाराचा त्यांना एरवीपेक्षा जास्त त्रास होतो. पहिल्या लाटेतला कोव्हिड विषाणू जरा स्त्रीदाक्षिण्य दाखवत होता. मात्र त्याचा  सध्याचा अवतार गरोदर स्त्रियांना आणि अर्भकांनाही दयामाया दाखवत नाही.   त्यामुळे त्यांना लवकरात लवकर संरक्षण मिळणे  आवश्यक आहे.  लसीमुळे आजाराची तीव्रता निश्चितपणे कमी होते. त्याचबरोबर दीर्घकालीन दुष्परिणामही आपोआपच टाळले जातात. लस-डसलेली प्रत्येक व्यक्ती ही इतर अनेकांना आजारापासून वाचवत असते.  कारण आता या व्यक्तीपासून आजार  पसरू शकत नाही. सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांमध्ये कोव्हीड सर्वात आधी ओसरला हे लक्षात घ्यायला हवा. समाजात जितक्या अधिक व्यक्तींमध्ये विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होईल, तितकं चांगलं मग ती लसीमुळे असो वा आजारामुळे. 

लसीनंतर किरकोळ तक्रारी उद्भवतात. अशा तक्रारी लस अपेक्षित काम करत असल्याचा पुरावा आहे.  गंभीर तक्रारी अत्यंत अपवादात्मक आहेत असं आढळून आले आहे. भारतीय वैद्यक संशोधन संस्थने  प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 100 दश लक्ष लसींमागे मध्ये फक्त 617 लोकांत  गंभीर दुष्परिणाम आढळले. अर्थातच यात गरोदर स्त्रिया नाहीत. लस घेतल्यामुळे गरोदर स्त्रियांना काही विशेष त्रास होईल का,  हा प्रश्न अनुत्तरीत आहे. 

आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तातडीने शोधण्याची गरज आहे. भारतासारख्या प्रचंड देशात होणारे लसीकरण ही खरेतर अशा अभ्यासाची मोठीच संधी आहे. लसीकरणा दरम्यान कधी चुकून, कधी दिवस असल्याचं लपवल्यामुळे, कधी लक्षातच न आल्यामुळे,  निदानच उशिरा झाल्यामुळे, कधी अवांछित गर्भधारणा झाल्यामुळे; लस आणि गर्भधारणा असा समसमा संयोग जुळून येऊ शकतो. नव्हे देशभरात जुळून येणारच.  अशा स्त्रियांत गर्भपात, अकाल प्रसूती, कुपोषित गर्भ,   सव्यंग गर्भ; असं काही घडतय का? आणि जे घडतंय  आहे ते नेहमी पेक्षा जास्त, संख्याशास्त्रीय दृष्ट्या  लक्षणीय प्रमाणात घडतय का, याचा शोध घेण्याची ही नामी संधी आहे. एरवीही अनेक औषधांच्या चाचण्या गरोदरपणी किंवा बाळांवर केल्या जाऊ शकत नाहीत. त्यात अनेक नैतिक प्रश्न गुंतलेले असतात. मग अशाच अपघाताने वापर झालेल्या केसेसचा अभ्यास हळूहळू साचत जातो आणि त्यातून काही निष्कर्ष काढले जातात.  

आज आपल्याकडे लसीकरणाचे दुष्परिणाम नोंदवण्याची सोय आहे. सरकारी आहे तसेच औषध कंपन्यांनीही करून दिलेली आहे. पण इथे मामला वेगळा आहे. यासाठी गर्भधारणा आणि लसीकरण असा योग जुळून आलेल्या स्त्रियांची माहिती, राष्ट्रीय स्तरावर गोळा करण्यासाठी, एखादी राष्ट्रीय नोंदणी व्यवस्था (Registry) असायला हवी. यावर डॉक्टरनी नियमित आणि संपूर्ण माहिती भरायला हवी. नऊ महिने आणि पुढे ठरेल त्या प्रोटोकोलप्रमाणे, अनेक वर्ष भरायला हवी.  ह्या नोंदींचा फॉलोअप, ठेवणे विश्लेषण करणे, वगैरे यथाकाल व्हायला हवं. मोठं किचकट, कटकटीचं, वेळखाऊ आणि कंटाळवाणे काम आहे हे. पण आवश्यक आहे.  अशी नोंदणी व्यवस्था देश पातळीवर उभारली तर उत्तमच पण राज्य पातळीवरही हे करणे शक्य आहे. शिवाय सरकारही करून दाखवणारं आहे! डॉक्टरांच्या संघटनांनाही हे शक्य आहे. 

पण कोणतीही गोष्ट सरकारी खात्याला कळवायची म्हटलं की डॉक्टरांच्या पोटात गोळा येतो. कारण असं काही आपण कळवलं तर; लस दिलीच का?, आधी कळलं नाही का? आता काही झालं तर जबाबदार कोण?  त्या बाईनी नुकसान भरपाई मागितली तर कोण देणार? असे अनेक प्रश्न सरकारी डोक्यात येणार असा पूर्वानुभव. 

आणि कोणतीही माहिती विचारायची तर  सरकारी पोटातही गोळा येतो. छोटासाच येतो, पण येतो. माहितीच्या गोपनीयतेच काय? आता त्या स्त्रीमुक्तीवाल्या काय म्हणतील? मानवी हक्कवाले आयोगाकडे गेले तर? असे अनेक प्रश्न त्यांनाही भेडसावत असतात. पण मुळात कोणाला दोष द्यायला, बळीचा बकरा बनवायला ही नोदणी व्यवस्था नाही, तर लसीकरणादरम्यान आपोआप घडणाऱ्या प्रयोगाचे निष्कर्ष काढणे, त्यातून मार्गदर्शन प्राप्त करणे हा हेतू आहे, हे स्वच्छपणे पुढे आलं पाहिजे. 

अशाच नोंदणी व्यवस्थेचा वापर करून अमेरिकनांनी लस सालस असल्याचा निर्वाळा दोन संशोधनपत्रिकांतून  दिला आहे. (NEJM २१.४.२१ आणि AJOG १०.३.२१) असल्या देशांचा निषेध करावा तेवढा थोडाच. म्हणजे इथे अहोरात्र कष्ट करायचे भारतीय पुरुषांनी, बाळंतपणाच्या खस्ता खायच्या भारतीय बायकांनी, जगात सगळ्यात जास्त मुलं होणार आम्हाला आणि अभ्यासात मात्र हे पुढे! बहुत ना इंन्साफी है ये!! सरकार आणि संशोधकहो अशी व्यवस्था तत्काळ उभारा. आपली लस सालस आहे का ते तपासा. नाहीतर हा सल सारखा टोचत राहील. 

   
पूर्वप्रसिद्धी 
म. टा. 
६.५.२०२१

No comments:

Post a Comment