Monday, 3 May 2021

विज्ञान म्हणजे काय? कोणताही दावा तपासता येईल असा हवा लेखांक ५

 

विज्ञान म्हणजे काय?

कोणताही दावा तपासता येईल असा हवा

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

लेखांक ५  

एखाद्या प्रश्नाचं खरं उत्तर माहीत नसेल तर, माहीत नाही असं मान्य करावं. चुकीचे, खोटे कारण कधीही चिकटवू नये.  

खरंखुरं   उत्तर शोधून काढायची विज्ञानाची एक पद्धत आहे. समजा, वर्गाबाहेर झगझगीत प्रकाश आहे;  तर तो कशामुळे आहे ह्याच्या अनेक कल्पना वर्गात बसून लढवता  येतील.  कुणी म्हणेल हा  सूर्यप्रकाश आहे, कुणी म्हणेल चंद्रप्रकाश आहे कोणी म्हणेल विजेचा दिवा  आहे तर कोणी म्हणेल हजारो काजवे एकत्र चमकत आहेत!!! ही सर्व त्या उजेडची संभाव्य कारणे आहेत. बाहेर जाऊन बघताच आभाळात सूर्य तळपत असताना दिसेल आणि उजेडचे योग्य कारण समजेल.  इतर कारणे अर्थातच बाद ठरतील.

सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, विजेचा प्रकाश आणि हजारो काजवे; ही त्या प्रकाशाची संभाव्य कारणे झाली.

अशी आणखी कितीतरी कारणे सुचवता  येतील. बाहेर परग्रहावरुन एक यान आले आहे आणि त्याचे हे लाइट आहेत असंही दावा करता  येईल.  पण असे दावे करताना विज्ञानाची एक अट असते. हे दावे तपासण्याजोगे  असावेत. उगाच मनाला येईल ते ठोकून देण्यात काही अर्थ नाही. ही अट खूप महत्वाची आहे.

 

आता हेच बघा ना, एकदा माझा मित्र मला सांगायला लागला की घरात त्याच्या खोलीत त्याने एक वाघाएवढा  डायनॉसोर पाळला आहे. आता हे खरंच की थाप हे शोधून काढायचं झालं तर खोलीत जाणं आलं. मग गेलो मी खोलीत.  पहातो तर काय तिथे डायनॉसोर नाहीच.

मग हा म्हणतो कसा, ‘तो डायनॉसोर अदृश्य आहे.’

मी त्याची लबाडी लगेच ओळखली.

त्याला  म्हटलं, ‘ठीक आहे. आपण जमिनीवर थोडं पीठ आणून पसरूया. त्याच्या पावलांचे ठसे तर दिसतील.’

यावर तो म्हणाला, ‘माझा डायनॉसोर तर हवेत उडतो!’

अरे लबाडा! पण मीही काही  कमी नव्हतो. 

मी त्याला म्हणालो, ‘ठीक आहे. आपण छताला, खोलीभर, पताकांच्या माळा लावू. तुझा डायनॉसोर उडता उडता हवा हलेल, मग पताका हलतील.’

यावर त्याने त्याच्या डायनॉसोरची नवीनच लीला ऐकवली.

तो म्हणाला, ‘हा डायनॉसोर इच्छाधारी, मायावी  डायनॉसोर आहे. मनात येताच तो चिलटाइतका बारीक होतो.’  

थोडक्यात डायनॉसोरबद्दलचे त्याचे म्हणणे तपासताच येणार नाही असे दावे तो करू लागला. डायनॉसोर आहे असं माझा मित्र म्हणत होता. तेंव्हा डायनॉसोर असल्याचा पुरावा देण्याची जबाबदारी त्याची होती. पुरावा तपासता  येईल असा असावा अशी विज्ञानाची अट आहे. तपासताच येणार नाहीत  अशा गोष्टी तो पुरावा म्हणून सांगत होता. अशा गोष्टी  पुरावा कशा म्हणता  येतील? ही तर चक्क लोणकढी थाप झाली.

मी असं म्हणताच तो म्हणतो कसा, ‘ठीक आहे मग खोलीत डायनॉसोर नाही, असं तू सिद्ध कर  बघू!’

आता मात्र कमाल झाली. कोणतीही गोष्ट आहे हे सिद्ध करता येईल पण एखादी चीज नाही हे कसं सिद्ध करणार बुवा?

शेवटी त्या मित्राची युक्ति मी त्याच्यावरच उलटवायची ठरवलं. त्याला म्हणालो, ‘मी कालच आकाशात एक कुकर सोडलाय!’

‘क्काय?’ तो किंचाळला.

‘मी कालच आकाशात एक कुकर सोडलाय!’ मी शांतपणे म्हणालो. ‘तो आता पृथ्वीभोवती घिरट्या घालतो आहे!’

‘म्हणजे उपग्रह घिरट्या घालतो तसा?’

‘हो, तसा.’

‘कशावरून?’

‘ते तू काढ शोधून. पण माझा कुकर डोळ्याला दिसत नाही, कोणत्याही दुर्बिणीतून दिसत नाही, पण तो आहे.’

‘कशावरून?’

‘तुझ्या पाळीव डायनॉसोर सारखाच तो. डायनॉसोर जसा तू म्हणतोस म्हणून आहे, तसाच हा कुकर. मी म्हणतो म्हणून तो आहे! बाकी पुरावा बिरावा मारो गोली!!’

आता मात्र माझा मित्र लायनीवर आला. त्याची युक्ति मी त्याच्यावरच उलटवली हे लक्षात येताच खो खो हसू लागला.

कोणताही दावा, कारण, कार्यकारणभाव, पुरावा, तपासता येण्याजोगा असावा हे विज्ञानाचं तत्व त्याला आता चांगलं लक्षात राहील.

 

पूर्व प्रसिद्धी किशोर मे २०२१

  

 

No comments:

Post a Comment