Tuesday, 4 May 2021

छातीत गाठ येता ..

 

छातीत गाठ येता..

डॉ. शंतनु अभ्यंकर

 

छातीत म्हणजे स्तनात गाठ आढळली की कॅन्सरची कुशंका येते. अशी शंका घेणं योग्यच.   कॅन्सर म्हणजे साक्षात मरणं असं नाहीये. सगळ्याच कॅन्सरनी काही मरण येत नाही. काही संथ कॅन्सर असतात. ते आपले शरीरात वर्षानुवर्ष वस्तीला असतात. माणूस मरतो तो काही वेगळ्याच  कारणांनी. त्याच्या बरोबरच तो कॅन्सरही बापुडा सरणावर जळतो.  काही कॅन्सर बरे करता  येतात. लवकर निदान आणि योग्य उपचार मात्र मस्ट आहेत.

ब्रेस्ट कॅन्सर हा असाच एक. ‘लवकर तपासे, लवकर उपचारे; त्यास आयु आरोग्य लाभे’ गटातील कॅन्सर आहे. स्तन हा अवयव फक्त स्त्रियांत असतो असं आपल्याला वाटतं. पण पुरुषही ‘स-स्तन’ प्राणीच आहेत आणि त्यांच्या खुरट्या स्तनांतही  क्वचित का होईन पण कॅन्सर होतो.

जनुकांत BRCA 1,  BRCA 2  ह्या जीनमध्ये उत्परिवर्तन (Mutation) असेल तर ह्या कॅन्सरची (आणि बीजग्रंथींच्या कॅन्सरची) शक्यता  वाढते. हे उत्परिवर्तन तपासता  येतं. ह्या टेस्ट मध्ये, ब्रेस्ट कॅन्सरची अतीव शक्यता दिसताच, अंजेलीना  ज्योली ह्या प्रख्यात गौरांगनेने, चक्क दोन्ही स्तनच काढून घेतले!! घरांत कुणाला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर त्या घरच्या स्त्रियांनी (आणि खरंतर पुरुषांनी सुद्धा)  ही तपासणी करावी असं म्हणतात. पण ही तपासणी म्हणजे हात दाखवून अवलक्षण! ही  केली तर कॅन्सरची  शक्यता कळते. कळते, पण त्यांनी फार फरक पडतो असं नाही. कारण कॅन्सर होऊच नये असं औषध नाहीये. निव्वळ भीतीपोटी स्तनोच्चाटन अव्यवहार्य आहे.  तेंव्हा ‘लवकर तपासे, लवकर उपचारे; त्यास आयु आरोग्य लाभे’ हाच मंत्र यांनीही जपायचा आहे. लवकर निदान व्हावं म्हणून  इतर चार बायका जे करतात तेच ह्यांनीही करायचं आहे.  ते म्हणजे काय ते आता बघूया.

लवकर निदानासाठी सगळ्या स्त्रियांनी अधून मधून आपली आपण स्तनाची चाचपून  तपासणी करत रहाणे गरजेचे आहे. हे म्हणजे बेस्टच झालं. मुख्य म्हणजे फुकटात झालं. डॉक्टर, त्यांची फी, तपासण्या, त्यांचा खर्च;  वगैरे कटाप.  किंवा मॅमोग्राफी मार्फतही तपासणी करता  येते. ही अधिक नेमकी. नियमित तपासणीचा भाग म्हणून किंवा हाताला गाठ लागते म्हणून ही तपासणी केली जाते.

   असं केलं म्हणजे लहानपणीच कॅन्सरची मानगुट धरता  येईल. तो इकडे तिकडे पसरायच्या  आत काढून टाकता येईल.  रोगमुक्ती शक्य होईल.

स्तनात किंवा काखेत हाताला गाठ लागली, किंवा बोंडशी आत ओढलेली, स्तनाची त्वचा सुजलेली, सुरकुतलेली अशी काही वेगळी दिसायला  लागली, की ह्याचे कारण कॅन्सर तर नाही ना, हे शोधणे ओघानेच आले.  

पहिली पायरी सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी क्वचित एम् आर आय.  

मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा नाजुक  एक्सरे.  नाजुक अशासाठी, की यासाठी क्ष किरणांचा  अत्यल्प मारा केला  जातो. यासाठी स्तन चेपून  धरले जातात आणि एक्सरे निघतो. त्रिमीती क्ष-चित्रही (3D tomosynthesis) शक्य झाले आहे आणि यामुळे तपासणीत अधिक नेमकेपणा आला आहे.   लवकरच ह्या चित्राचा  अन्वयार्थ लावायला कृत्रिम बुद्धिमत्तावाली मशीन वापरली जातील आणि मानवी बुद्धी-सत्ता संपुष्टात येईल! 

 

स्तनाची सोनोग्राफी

इथे  ध्वनीलहरींच्या मदतीनी स्तनाकडे पहिले जाते. जी गाठ लागते आहे ती घन आहे का द्रव युक्त आहे हे इथे झटकयास कळते. पूर्वी हे निदान स्पर्शाने करावे लागायचे. गाठ किती लिबलिबीत आहे, किती घट्ट आहे वगैरे ठोकताळे वापरले जायचे. सारे ठोकताळेच असल्याने बरेचदा चुकायचे. वैद्यकीय ‘प्रतिमासृष्टी’च्या (Medical Imaging Sciences) नव्या नव्या  उन्मेषांनी पेशंटचे जगणे आणि पेशंटला जगवणे दोन्ही कितीतरी सोपं केलं आहे. 

 

गाठीचा नमूना

गाठीचा नमूना घेऊन तपासणे ही पुढील चाचणी. जागेवर भूल देऊन, गाठीचा  सुईच्या अग्राएवढा तुकडा, सुईच्या अग्रानेच काढला जातो; किंवा सुईच्या पोकळीत आलेला तुकडा तपासला जातो.  (FNAC / TRUCUT BIOPSY).    ह्या शितावरून भाताची परीक्षा केली जाते.

 

एकदा कॅन्सर आहे हे ठरले की त्याचा  प्रकार, प्रसार आणि विखार तपासला जातो. उपचार ह्या तीन बाबींवर ठरतात.

 

प्रकार  

ह्यात प्रकार आणि उपप्रकार अनेक आहेत पण उपचाराची तत्व  साधारण सारखीच आहेत.

सिए इन सिटू :-  म्हणजे अजूनही स्वस्थानी असलेला, स्थानबद्ध असलेला, कॅन्सर.

डक्टल कारसिनोमा :- हा दुग्ध वाहिन्यांतील कॅन्सर. हा तसा साधासुधा. त्यातल्यात्यात शहाण्या मुलासारखा.  पसरतो पण उशिरा. फार ऐसपैस नाही पसरत  आणि जरा आस्ते कदम पसरतो. लहान असेल तर गाठ काढून,  शेक देऊन (रेडियोथेरपी) बरा होतो. फार मोठ्ठे ऑपरेशन लागत नाही.  पेशंटच्या भाषेत फार  ‘चिरफाड’ करावी लागत नाही.

पण मोठी गाठ असेल तर स्तन पूर्णतः काढावा लागतो. पुढे पसरला तर नाही ना, हे पहाण्यासाठी काखेतील लिंफ नोड तपासवा  लागतो (सेंटीनल बायोप्सी). 

या कॅन्सरमधील काही भिडू इस्ट्रोजेनच्या जिवावर तगून असतात. ह्या साठीही तपासणी केली जाते. (Receptor study) आणि रिपोर्टनुसार इस्ट्रोजेन विरोधी औषध देऊन पुर्नउद्भव टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करता येतो. हर२  (HER2) तपासणी करुन ट्रास्टूझुमॅब (Herceptin) गटातील औषधे उपयुक्त ठरतील का हे ठरवले जाते.

इन्व्हेसिव्ह कॅन्सर :- म्हणजे पसरलेला आजार.

विखार

कॅन्सरचा ‘विखार’ही (Grade) तपासला जातो. १ म्हणजे धीम्या गतीनी पसरणारे, २ म्हणजे मध्यम आणि ३ म्हणजे जलद  अशी गटवारी आहे.

 प्रसार

अर्थातच कोणत्याही कॅन्सरसाठी हा कळीचा मुद्दा ठरतो. स्थानबद्ध आहे, स्तन-बद्ध आहे का स्तनबाह्य  स्वैर प्रसार आहे, हे समजण्यासाठी विविध तपासण्या (CT, PET, BONE SCAN) केल्या जातात. 

पसरताना बहुतेकदा, सुरवातीला,   काखेतल्या लसीका ग्रंथीत कॅन्सरच्या पेशी अडकतात आणि या ग्रंथी फुगतात. तिथे कॅन्सर आहे का हे पहायला प्रत्यक्ष तपासणीच करावी लागते. प्रतिमा,  सूचिका आणि ग्रंथी काढून तपासणे, इथेही  कामी येतात.   हा उंबरा.  इथवर कॅन्सर पोहोचला आहे वा  नाही यावर पुढील बरेच निर्णय ठरतात. इथे कॅन्सर आढळला तर तो हा उंबरा  ओलांडून स्वैर संचार करत असण्याची शक्यता अधिक. अशा स्वैराचारी कॅन्सरशी लढायचं तर निव्वळ स्तनाचे ऑपरेशन करुन भागत नाही.  शरीरात इतरत्र पसरलेल्या पेशींचा नायनाट व्हावा म्हणून औषधे (केमोथेरेपी) द्यावी लागतात.

प्रसाराची व्याप्ती (Stage) TNM  (Tumor, Node, Metastasis) अशा सांकेतिक भाषेत नोंदली जाते. ट्यूमर म्हणजे गाठ केवढी आहे,  नोड म्हणजे लसीका ग्रंथी कितपत तडाख्यात सापडल्या आहेत आणि मेटास्टासिस म्हणजे प्रसार किती दूरवर झाला आहे. १,२,३,४ अशा याच्याही पायऱ्या आहेत.  अर्थातच प्रसार जितका व्यापक तितके भविष्य जाचक. पहिली पायरी म्हणजे जेमतेम २ सेंमीची गाठ आणि कॅन्सर मुक्त लसीका ग्रंथी. दुसरी पायरी म्हणजे पाच सेंमीपर्यंत  गाठ आणि काखेत  कॅन्सर युक्त लसीका ग्रंथी. यापुढची पायरी म्हणजे याहून मोठी गाठ आणि काखेच्या  आसपास इतर लसीका ग्रंथीतही  प्रसार. चौथ्या अवस्थेत कॅन्सर फुफ्फुसे, यकृत, हाडे असा दूर दूर पसरलेला असतो.

उपचार

स्थानबद्ध आणि फार न पसरलेला कॅन्सर असेल तर तर स्तन उच्चाटन  (स्तन काढून टाकणे) आणि स्तन-जतन अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. स्तन-जतन जमले नाही तर स्तन पुनर्घटन (Breast Reconstruction)  जमवता येते. त्या उंबऱ्यावरच्या लसीका ग्रंथीही काढून तपासल्या जातात. (Sentinel Lymph Node Biopsy) पुढे शिल्लक  चुकार पेशी नष्ट करायला  शेक दिला  जातो, केमो थेरपी दिली जाते किंवा संप्रेरक-सदृष औषधे दिली जातात. निवड ही इतर  अनेक घटकांवर ठरते.   

अर्थातच कॅन्सरचा प्रकोप जितका जास्त तितके उपचार आणि सुटका कठीण. आता  कॅन्सर पुन्हा डोके वर काढेल का नाही याचा काही निर्देशांक काढता  येतो. २१ निरनिराळे घटक मोजून (21 gene test Oncotype DX / MAMMAPRINT) ही कुंडली मांडली जाते.  

 

इथे जे लिहिले आहे ते नुसतेच थोडे फार नसून, फार थोडे आहे याच जाणीव मला आहे आपणही बाळगावी ही नम्र विनंती. कॅन्सरबद्दल खूपच काही सांगण्यासारखं आहे. मी इथे  कितीही माहिती लिहिली तरी ती कमीच. कर्कविद्या ही तर वेगळी शाखाच आहे वैद्यकीची. त्यातही आता फक्त ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करणारे  तज्ञ आहेत! म्हणजे मनुष्य पीडेच्या ह्या एवढ्याशा कोपऱ्यातही किती बारकावे असतील बघा.  शिवाय इथे वाचलेले सगळेच्या सगळे,  जसेच्या तसे स्वतःला  किंवा परिचित पेशंटला लागू पडेल असे नाहीच. शेवटी त्या त्या पेशंटचे उपचार त्या त्या डॉक्टरनेच करायचे आहेत.

ह्या लेखातून शिकण्यासारखी एकच गोष्ट. स्वतःची स्वतः स्तन तपासणी कशी करायची हे समजावून घेणे आणि तसे खरोखरच करणे.

 

स्तनांची तपासणी

स्वतःची स्वतः तपासणी करायची सवय लावून घ्यायला हवी. आपले स्तन हे नेमके हाताला जाणवतात तरी कसे याचा परिचय असायला  हवा. तरच शंकास्पद काही सापडेल.

अनेक कारणांनी स्तनाचा स्पर्श, आकार, उकार, आणि उभार बदलतो. कॅन्सर क्वचित असतो हे ही लक्षात ठेवलं पाहिजे. सापडली गाठ की लावला डोक्याला हात, मारली फतकल आणि काढला गळा; असं होणार असेल तर पुढे वाचूच  नका! नाही तर भित्या पाठी  ब्रम्हराक्षस अशी गत  व्हायची.

गाठ लागली की पुढे काहीना काही तपासणी केल्याशिवाय नेमके निदान होणार नाही. सोनोग्राफी, मॅमोग्राफी, प्रसंगी नमूना तपासणी वगैरे करावे लागू शकते. हयात काही आठवड्याचा काळ लागू शकतो.  दरम्यान बेचैनी, चिंता, काळजी वगैरे  ग्रासून टाकू शकते आणि हे सर्व नॉर्मल आले की उगीचच ह्यात पडलो अशी हताशाही  वाटू शकते. तेंव्हा सावधान! पण जगभरचा अनुभव असं सांगतो की कॅन्सरच्या शंकेची सुरवात ही बरेचदा त्या स्त्रीला स्वतःलाच आढळलेल्या गाठीपासून होते आणि ‘लवकर तपासे, लवकर उपचारे; त्यास आयु आरोग्य लाभे’ हा मंत्र आपण वर पहिलाच आहे. म्हणून हा लेखनप्रपंच. 

पहिली पायरी, स्तनाच्या गाठीकडे फक्त पहाणे. आरशासमोर उभे राहून दोन्ही स्तन समान दिसताहेत ना, त्यांचा आकार, उकार, उभार  समसमान आहे ना, कुठे अनाठायी सुरकुत्या, सूज, खळगा वगैरे तर दिसत नाही ना,  हे नीट पहायचं आहे. दोन्ही निपलही न्याहाळायची आहेत. हात बाजूला सोडून, कर  कटेवर असं उभं राहून, हात डोक्यावर धरून; कमरे वर डोक्यावर हाताने दाब देत असताना; असं विविध अवस्थात तपासायचं आहे.   

पुढची पायरी म्हणजे प्रत्यक्ष हात लावून तपासणी. इथे महत्वाची गोष्ट अशी की तपासणी हातच्या तळव्याने करायची आहे. चिमटीत धरून जर स्तनाची गाठ दाबून पहिली तर तीत गाठीच गाठी आहेत  असं जाणवेल. हे नॉर्मल आहे. चपट्या हाताला लागेल ती गाठ महत्वाची, फक्त चिमटीत लागते आणि तळव्याला नाही ती बिन महत्वाची. अशी तपासणी अंघोळीच्या वेळी साबणानी  हात बुळबुळीत असताना करणं सगळ्यात सोप्पं. उताणे झोपूनही, स्तनाची गाठ पसरट होते आणि  अशी तपासणी सोपी होते. पाळीच्या आसपास स्तन हुळहुळे होतात, तेंव्हा असा काळही टाळावा.

स्तनाचे चार भाग कल्पून, एकेका चतकोरावर, तळवे गोल गोल फिरवून तपासणी करावी. आधी हलकेच आणि मग नीट दाब देऊन तपासणी करावी. चारही चतकोर झाले की मध्यापासून सुरू करत पुनः गोल गोल तपासत कडेपर्यंत जावे.  वेळ लागला तरी चालेल पण नीट तपासणे महत्वाचे आहे.   

काही वावगं आढळलं तर पुढील तपासणी महत्वाची आहे. पुढे सुयोग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळणार असतील तरच ह्या कृतीला काही अर्थ आहे. पण  इथेच मेख आहे. हे वाचून चाचपणी तर अनेक जणी  करतील पण पुढील शास्त्रीय आणि खिशाला परवडतील असे औषधोपचार अजूनही सहज सोपे नाहीत हे वास्तव आहे.  असो. त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी.

No comments:

Post a Comment