Saturday, 5 September 2020

पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्

 

पुनरपि  जननं, पुनरपि  मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

 

(सदरहू लेखात खालील पारिभाषिक संज्ञा वापरल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी मूळ इंग्रजी शब्द कंसात दिले आहेत. 

·        नरवानर Humans and Nonhuman Primates

·        नर Human male

·        नारी Human female

·        वानर Nonhuman Primates

·        माकड Monkeys

·        कपी Apes)

 

 

 

पुनरपि  जननं, पुनरपि  मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्; असं करत करत, चौऱ्यांशी लक्ष योनीतून प्रवास केल्यावर मनुष्यजन्म प्राप्त होतो म्हणतात. पण जन्ममृत्यूचं हे  चक्र नसून ही  साखळी आहे; जननी आणि जठर काळाच्या ओघात जैसे थे राहिलेलं नाही; बदलत, बदलत गेलंय असं उत्क्रांतीशास्त्र सांगतं. मानवी शरीर, त्याची अचंबित करणारी  रचना आणि आश्चर्यमुग्ध करणारे  कार्य  म्हणजे ह्या साखळीचा कित्येक पिढ्यांचा वारसा आहे. मनुष्यमात्रांच्या पृथ्वीवरील आगमनापूर्वी, काही लक्ष नव्हे, तर काही कोटी जीव इथे नांदून  गेले आहेत. मागे, मागे, मागे जात राहिलो तर आपला वंश पहिल्यावाहिल्या सजीवापाशी पोहोचेल. पण इतकं मागे जाण्याऐवजी, इह संसारे आगमनाचा मानवी जन्मसोहळा इतका दुस्तर का?, माणसाच्या माद्या का आणि कशा वितात?; हे समजण्यासाठी थोडेसेच मागे गेलो तरी चालेल.

वरच्या वाक्यातले  ‘माणसाच्या माद्या’ आणि ‘वितात’ हे शब्दप्रयोग तुम्हाला धक्कादायक किंवा असभ्य वाटतील पण वस्तुनिष्ठपणे विचार केला तर दोन्ही अगदी बरोबर आणि रास्त आहेत.

मनुष्य हा प्राणीच आहे आणि आपले खाणे, जुगणे, रतणे,  प्रसवणे इतकेच काय वागणेही उत्क्रांतीचीच देन आहे. मनुष्याला  पुनरुत्पादनासाठी फुटवे फुटत नाहीत (Asexual Reproduction) ते लैंगिक फलनातूनच (Sexual Reproduction) साधले जाते. माणसाला  अंडी घालताच (Oviparity) येणार नाहीत. थेट पिल्लांना जन्म देणं (Viviparity) हेच मानवी  औत्क्रांतिक भागधेय आणि हो माणूस हा  स-स्तन प्राणी. त्यामुळे पिल्लांना अंगावर पाजणे आणि तेही फक्त माद्यांनी, हे तर मस्टच. याबरोबर संप्रेरके (Hormones),  सरपटणाऱ्या  (सरीसृप, Reptiles) पूर्वजांकडून; वार (Placenta), पिल्लावणाऱ्या (Viviparous) पूर्वजांकडून आणि जननमार्ग नर-वानर पितरांकडून आपल्याला वारसाहक्कानी प्राप्त आहे. या उत्क्रांती मंथनातूनच  द्वीपाद चाल, मोजकी संतती, पिल्लांचा निगुतीने सांभाळ, ‘रक्त-मूल’ अशा   प्रकारची वार  आणि   मोठाच्या मोठा मेंदू ही वैशिष्ठ्ये  तयार झाली आहेत. (Hemochorial म्हणजे रक्त-मूल प्रकारच्या वारेत, आईच्या रक्तात बाळाच्या वारेची मुळे तरंगत असतात. आई आणि बाळाच्या रक्ता दरम्यान फक्त  तीनच  पदरांचा पापुद्रा असतो)

हां, तर मी काय सांगत होतो, माणसाच्या माद्या वितात त्या काही विशिष्ठ पद्धतीने. माणसाचं  (Humans) आणि माकडांचं (Monkeys) नातं डार्वींननी  स्पष्ट केलेलंच आहे. आपण चुलत भावंड आहोत. म्हणजे माकडापासून माणूस उत्क्रांत झाला असं नाही.  तर जसे आपले आणि आपल्या चुलत भावंडांचे  आजोबा एकच होते तसे माणसाचे आणि माकडाचे पूर्वज एकच होते. पण माकडांपासून फारकत घेतल्यावर माणसाच्या फांदीला गोरीला,  चिम्पॅंजी अशा कपिकुळाच्या फांद्या फुटल्या. (चित्र क्र  १)  माणसाच्या होमो या प्रजातीत (Genus) इतरही काही भाईबंध होते. होमो हॅबिलीस, होमो निअंडरथॅलेसीस इत्यादि. पण हे ‘इतर सगळे’ काळाच्या उदरात लुप्त झाले. वंशखंड झाला त्यांचा. माणूस, होमो सेपीएन, तेवढा  टिकला. नुसता टिकलाच नाही तर निसर्गाच्या नाकावर  टिच्चून त्याचा वंश फुलला, फळला, फळफळला. सारी पृथ्वी त्यानी पादाक्रांत केली आणि कमाल म्हणजे ह्या साऱ्याची तीव्र जाणीव, जिज्ञासा त्यात  उत्क्रांत झाली. आसपासच्या  सृष्टीसोबतच    स्वतःकडे इतक्या कुतुहलाने  आणि कौतुकाने पहाणारा  मनुष्य एवढा एकच  प्राणी. 

हां, तर मी काय सांगत होतो, मानवी माद्या वितात त्यांची काही खासियत आहे. एक तर माणसांत बाळंतपण खूपच अवघड आहे, वेळ खाऊ आहे, शक्तिपात करणारे आहे. इतके की कुणाच्या मदतीविना, कोणी ‘सोडवल्या’विना माणसाच्या मादया सुखरूप वितील अशी शक्यता कमी. नारींच्या मानानी माकडी, वानरी आणि कपी माद्या सहज वितात.  हे असं आहे आणि हे असंच आहे ह्याला काही जीवशास्त्रीय, औत्क्रांतिक  कारणे आहेत.

माणसाच्या मादया वितात तेंव्हा  पिल्लाचा प्रवास मादीच्या जननमार्गातून,  एका  अरुंद बोगद्यातून होतो.  आपल्यापैकी सीझरने जन्मा घातलेले वगळता, सर्वांना हा प्रवास करावा लागला आहे. हा प्रवास अगदी अद्वितीय आहे. जननमार्ग म्हणजे योनिमार्ग. योनि म्हणजे जणू भरपूर ताणता येईल अशी इलॅस्टिकची नळी आहे. (चित्र क्र २) हिच्या आतल्या टोकाला गर्भाशय आहे आणि बाहेरच्या टोकाशी बाह्यांग. कमरेच्या हाडांच्या कडीतून योनीमार्गाची ही नळी    आरपार जात असल्याने,  ताणले जाण्याला अर्थात कमरेच्या हाडांची मर्यादा आहे. योनीमार्ग ताणला जात असल्याने हाडांच्या कडीच्या आतील माप हेच जननमार्गाचे माप.  हीच्या मागच्या बाजूला माकड हाड आहे. हे सुमारे सहा इंच लांब आणि पुढच्या बाजूचे हाड जेमतेम दीड इंचाचे. (चित्र क्र ३) पण हा प्रवास पिल्लाचं  अंग पिळवटून टाकणारा आहे. पिळवटून म्हणजे शब्दश: पिळवटून टाकणारा. ह्याचे कारण म्हणजे हा बोगदा सरळसोट नाही. त्याला थोडा पीळ आहे. उभ्या आणि आडव्या अश्या दोन्ही अक्षांवर पीळ आहे.  ह्या वळणानुसार बाळाचा प्रवास व्हावा लागतो. मूलत: ह्या बोगद्यात शिरायची जागा लांबटगोल  असते. हा लंबगोल पुढूनमागे चपटा असतो आणि बाजूबाजूला ताणलेला. बाहेर यायची जागाही (बाह्यांग) लंबगोल असते; पण ही बाजूबाजूने चेपलेली असते आणि पुढून मागे चांगली ताणलेली असते. म्हणजेच ह्या बोगद्याचा लांबट व्यास काटकोनात (९०) वळलेला असतो. शिवाय या बोगद्याच्या प्रवेशाचे तोंड आणि एक्झिटचे तोंड समोरासमोर नसतात. आत शिरताना पार्श्वदिशेला, माकडहाडाच्या दिशेला,  जाणारा मार्ग आतल्याआत  ५५त वळून,  बाहेर पडताना पुढच्या दिशेला तोंड करुन  असतो.  म्हणजे  बाळाचे मुटकुळे ह्या अरुंद घाटमार्गातून (उभ्या अक्षात) नव्वद अंशातून पिळून आणि (आडव्या अक्षात)  पंचावन्न अंशातून वळून यायला पाहीजे. (चित्र क्र ४) बाळ कळेगणिक खाली, खाली, आणि शेवटी बाहयांगातून बाहेर ढकलले जाते. पण वाटेत इतके आळोखेपिळोखे  द्यायचे म्हणजे मामला अवघड होणारच.

आणखी एक भानगड असते. बाळाचे डोके चेंडू सारखे गोल गरगरीत नसते. ते अंडाकार, निमुळते असते. हे डोक्याचे अंडे निमुळत्या दिशेने बाहेर येणे सुकर. अंडे आडवे आले तर दुष्कर.  जर बाळ नतमस्तक (Flexed) असेल तर  हनुवटी छातीशी आणि  नाकाचा शेंडा त्याच्या पायाच्या दिशेला राहील.  अंडाकृती डोक्याचे मागच्या टाळूचे निमुळते टोक  जननमार्गत शिरेल. जर बाळानी मान वर केली तर परिस्थिति बिनसेल. जन्मापासूनच  मान वर करून न पहाणे किती महत्वाचे आहे पहा!!

वानरींचा (Nonhuman Primates) जननमार्ग हा नारींच्या मानानी सरळसोट असतो. (थोडासा एका दिशेने चेपलेला) वानरीसूतांचे डोकेही त्यात  सहज बसेल असे (जर्रा चेपलेले) असते.  बाकी एकूणच ऐसपैस जागा असल्याने चिंपांझीणी वगैरे झटक्यात बाळंत होतात. बाळ सुळकन् बाहेर येते. वेळही बराच कमी लागतो. वेदनाही कमी होत असाव्यात. तोंडातून सहसा ब्र सुद्धा निघत नाही. फार किंचाळलं वगैरे तर ती मादी आणि पिले कोणाच्या तरी भक्ष्यस्थानी पडायची शक्यता जास्त. त्यामुळे उत्क्रांती दरम्यान सहनशक्ती  आणि सुकर प्रसूती असं दोन्ही घडत गेलं.  

नारींत  आणि वानरींत मूल जन्मताना डोक्याकडून बाहेर येते. पायाळू होणे, म्हणजे डोक्याऐवजी आधी पाय किंवा ढुंगण पुढे येणे.    दोघींतही, बाळाला  आणि बाळंतीणीला, हे  त्रासदायक ठरते. कुठेही, कधीही,  प्रवेश करताना आधी ढुंगण पुढे करणे असभ्यच की!! शिवाय मानवी पिल्लू जन्मतः आईच्या गुदद्वाराकडे तोंड करुन  जन्माला येतं. बाकी ओरांगउटांग, मार्मोसेट, बबून अशा बहुतेक  वानरींत उलटं  असतं. पिल्लू आईच्या मूत्रमार्गाकडे तोंड करुन  बाहेर येतं. थोडक्यात वानरी, प्रसूत होताना, खाली वाकून  आपल्या पिल्लाचं तोंड पाहू शकतात. नारींना हे ‘मुहं दिखाई’चं सुख नाही. पण याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे वानरी आपल्या आपण बाळाच्या डोक्याला आधार देऊन प्रसंगी  ते धरून  बाहेर ओढून घेऊ शकतात. ह्या अवस्थेत आधार दिल्यास बाळाचे डोके अधिकाधिक नतमस्तक होते. त्याचा निमुळता भाग योनीमुखाशी येतो.  नारी असं करू शकत नाहीत. (चित्र क्र ५) तसा प्रयत्न केलाच तर अंडाकार डोक्याचा निमुळता भाग पुढे येण्याऐवजी रुंद भाग पुढे येईल. बाळाने  ‘मान वर केली’ (Extended Neck) असा अर्थ होईल. बाह्यांगाला मोठीच इजा  होईल.

त्यामुळे मनुष्याच्या मादीला बाळंतपणात कोणीतरी दिमतीला  असावं लागतं. डॉक्टर किंवा दाई तरी हवी; किमान आई तरी हवी. त्यामुळे आज माणसाच्या मुली  डिलिव्हरीसाठी माहेरी येतात.  गोरीलाच्या मुली येत नाहीत. सुईण ही अगदी आदीम गरज आहे. वेश्या किंवा वकिली हा  आद्य  व्यवसाय नसून सुईण हा आद्य व्यवसाय आहे.  आदि-मातांची ही गरज आदि-सुईणी पुरवत आल्या आहेत.  त्यांच्या लुडबुडीने काही थोडे भले होत होते. ही लुडबूड उत्क्रांतीधारेत उपकारक ठरत होती. सुईणपण, दाईपण  माणसाच्या वागणुकीत कोरली जात होती.  ‘ज्ञानी राखीजे  अलिप्तता; अवधान दिजे, धरी अपेक्षा; करी कदापी न उपेक्षा, जन्मवेळी’।    (अध्याय १८, ओवी २७)*;  (Masterly inactivity  with watchful expectancy) हे आधुनिक प्रसूतीशास्त्राचे ब्रीद आहे.  पण आदि सुईणींना हे शिकवणार कोण? त्या आपल्या त्यांच्या अंतःप्रेरणेने बायका सोडवत होत्या.

(* ही ओळ माझ्याच, अद्याप एकच ओवी लिहून झालेल्या, आगामी ग्रंथातील आहे. गैरसमज नसावा.)  

कळा वाढाव्यात म्हणून  ह्या पोट चोळतात.  पोटावर दाबून, प्रसंगी पोटावर  स्वार होऊन,  बाळ बाहेर येण्यास मदत करतात.  मूल पायाळू असेल तर ते फिरवण्याचे प्रयोग सुइणींनी केले  आहेत. विविध प्रकारे बाह्यांगमर्दन करून,  तेले लावून जननमार्ग सैल  आणि बुळबुळीत करण्याचे प्रयत्न ज्ञात आहेत. पाणमोट फोडणे, पिशवीचे तोंड  ताणणे, विटप-छेद (बाह्यांग छेदणे, Episiotomy)केलेले आहेत.  प्रसवेशी संग केला असता वीर्यामुळे प्रसूती जलद होते असेही एक प्राचीन निरीक्षण आहे. सुईणींनी ह्यालाही उत्तेजन दिलेले आहे. इतकंच काय,   सर्व आदिम संस्कृतीत उदर-जननाच्या (Caesarean birth) कथा आहेत. बाईला सोडवण्यासाठी केलेत तसे बाळाला ‘रडवण्यासाठी’ ह्या सुईणींनी अनेक उपाय  केले आहेत. बाळाला उलटे धरणे, फटके मारणे, गार/गरम पाण्याचे हबके मारणे,  चोळणे असे अनेक. काही गैर, काही दुरुस्त.

 हे प्रकार शतकानुशतके नव्हे, सहस्त्रानुसहस्त्रके चालू आहेत. अशा प्रकारे  सहजीवाला सहकार्य करायला लावणारं हे अवघड बाळंतपण उत्क्रांतीच्या ओघात निपजलंच कसं?  

उत्क्रांती शास्त्रानुसार इथे सक्षम ते टिकतात. ‘सक्षम’ म्हणजे मोठे होऊन पुढच्या पिढीला जन्म देऊ शकणारे. उत्क्रांतीच्या भाषेत बहुतेकदा ते तेवढेच   सक्षम.  म्हणजे बाळ-बाळंतीण सुखरूप राहतील अशी रचना, अशी क्रिया, अशी वागणूक उत्क्रांती दरम्यान पिढ्यानपिढ्या संक्रमित होत जाणार. ह्याच्या विपरीत रचना, क्रिया, वागणूक असणारे नर-वानर उत्क्रांतीच्या स्पर्धेत बाद ठरणार. त्यांचा वंशखंड होणार. थोडक्यात जी रचना आज दिसत्येय, जी क्रिया आज होत्येय, जी वागणूक आज प्रत्ययास येत्येय; ती तर औत्क्रांतिक पुण्यसंचिताचे नवनीत  म्हणून आहे.  वानरींत एवढी सुलभ असणारी प्रसूतीक्रिया नारींत इतकी अवघड का? तर ही सगळी स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची आणि भलामोठा  मेंदू बाळगण्याची फळं भोगतोय आपण.

स्वतःच्या पायावर उभं रहायचं तर खुबे लांबलांब असलेले बरे. मग ते तसे उत्क्रांत झाले. पण मग जननमार्ग मागून पुढे असा अरुंद झाला आणि प्रसूती अवघड झाली. उभ्या देहाच्या  वजनाची मदार आता  माकडहाडाला  पेलावी  लागली.  मग माणसांत माकडहाड जाड, जड आणि ठळक झाले. त्या भानगडीत ते जरा जननमार्गात सरकले आणि प्रसूती अवघड झाली.

त्याच वेळी माणसाचा मेंदूही मोठा मोठा होत होता. शेवटी तो अशा अवस्थेला पोहोचला की आता ह्याहून मोठा झाला तर बाळाचे  डोके जननमार्गतून बाहेर येणेच अशक्य होईल. मग अशी बाळे जन्मालाच येणार नाहीत. ती मरतील. त्यांच्या आयाही अशा अडलेल्या बाळंतपणात मरतील.

मग उत्क्रांतीच्या ओघात यावर अनेक नामी तोडगे निघाले. रिलॅक्सिन ह्या संप्रेरकांच्या प्रेरणेने, माद्यांच्या कमरेचे सांधे किंचित सैल होऊ लागले. कमरेचे कडे किंचित विस्तारू लागले. माणसाच्या  माद्या एकमेकींना, बाळंतपणात कंबर ढिली झाल्याचं सांगतात, ते काही खोटं नाही.    माणसाच्या बाळाचे डोके जन्मसमयी लिबलिबीत राहू लागले. त्यामुळे डोक्याचा आकार अधिकाधिक निमुळता होऊन डोके जननमार्गाबाहेर येते. जन्मतः माणसाच्या पिल्लांची डोकी लांबोळकी, जिरेटोप घातल्यासारखी दिसतात ती  यामुळेच. पुढेही चांगली दीड दोन वर्षाची होईपर्यंत कवटीची हाडे जुळून येत नाहीत. त्यात लिबलिबीत फटी रहातात. हाताला सुद्धा जाणवतात त्या. त्याला टाळू म्हणतात. झपाझप  वाढणाऱ्या मेंदूला  सामावून घ्यायला लवचिक कवटी बेस्ट. जन्मवेळी आईच्या कटीत मोठी कवटी मावूच शकणार नाही. त्यामुळे जन्मानंतर मेंदूची झपाट्याने वाढ (Encephalisation) हा औत्क्रांतिक बदल माणसांत घडून आला, मानववंशात सामावला गेला.

जन्मानंतरही मेंदूची झपाट्याने वाढ झाल्याचे फायदे तोटे दोन्ही झाले. वानरीच्या पिल्लांचा ५० ते ६०% मेंदू जन्मतः तयार असतो. नारीच्या पिल्लांचा जेमतेम २५%. म्हणजे मेंदू दृष्ट्या  माणसाची पिल्लं, पूर्ण दिवसाची पण  ‘अपुऱ्या  वाढीची’ निपजतात (Secondary Altriciality). माकडीच्या किंवा वानरीच्या पिल्लांसारखी ती आपलीआपण आईला बिलगून धरू शकत नाहीत. मुठीत धरायला नारींच्या अंगावर वानरींसारखे केसही नसतात आणि नन्ह्यामुन्न्यांच्या बाळमुठीत तेवढं बळही नसतं. त्यांना सतत अंगाखांद्यावर वागवावं लागतं. पुढेही बराच काळ त्यांना वाढवावं लागतं, पढवावं लागतं, तेंव्हा कुठे ती हाताशी येतात.

मेंदू जसा जन्मानंतर वाढतो तशाच माणसातील अनेक गुंतागुंतीच्या जैवरासायनिक क्रिया, प्रतिकारशक्ती, वगैरेही ‘अपुऱ्या वाढीच्या’ असतात, कच्च्या असतात. जन्मानंतर त्या सावकाश आणि यथावकाश पिकतात. विविध अवयव सक्षम असण्याच्या दृष्टीने विचार केला  तर माणसाच्या बाळाला अजून तीन ते सहा महीने गर्भवास हवा, असा निष्कर्ष निघतो. आपल्या  निएनडर्थल भगिनींत एक वर्षाची गर्भावस्था असायची. पण मेंदू मोठा मोठा होत गेल्याने माणसांत  नवव्या महिन्यातच प्रसूती आणि पुढे परावलंबी पण झपाट्याने वाढ असा सुवर्णमध्य उत्क्रांत झाला आहे.  कसा ते पाहू या.

असं बघा; खरंतर आई आणि बाळ यांच्यात निम्मीच  गुणसूत्र समान असतात. म्हणजेच आई आणि बाळ ही जनुकीय दृष्ट्या भिन्न भिन्न जीव असतात. त्यांचे रक्तगटही बरेचदा भिन्न असतात.  भिन्न व्यक्तीचे रक्त, त्वचा, अवयव असं काही आपलं शरीर सहजासहजी स्वीकारत नाही. सहसा अशा परकीय पेशींचा नायनाट करण्याची यंत्रणा अगदी चोखपणे आपलं काम बजावत असते. यालाच प्रतिकारशक्ती म्हणतात. मग हा परका जीव  आईच्या उदरात रुजतोच कसा? वाढतोच कसा? मूळ  धरायच्या आत समूळ उच्चाटन व्हायचं, तिथे  भरण, पोषण, पालन, संवर्धन कसं होतं? या प्रश्नाला अनेक उत्तरे आहेत.

कल्पना करा  की आईची  प्रतिकारशक्ती बाळाचे ‘वेगळे’, आईला   ‘परके’ असे रेणु, म्हणजे मुख्यत्वे प्रथिने, पाहू शकते. अशी रेणु/प्रथिने  नजरेस पडली  की ती त्यांचा नायनाट करणार. म्हणजे गर्भपात होणार. आईच्या  प्रतिकारशक्तीची दृष्ट लागू नये म्हणून बाळाला अनेक पातळ्यांवर  संरक्षण असते. त्यातील एक महत्वाचा अवयव  म्हणजे वार. ह्या वारेतून बाळाला हवे ते पोहोचवले जाते आणि नको ते परत घेतले जाते. वारेत आई आणि बाळाचे रक्त आमनेसामने येतं; पण एकमेकांत मिसळत नाही.  रक्त वेगवेगळं  ठेवणारा  पापुद्रा अनेक पदरी  असतो.  अश्वकुळातील (Genus Equus)  प्राण्यांत  हा सहा  पदरी असतो (Epitheliochorial Placenta). त्यामुळे मातेच्या प्रतिकारशक्तीच्या अपरोक्ष बाळ सुखेनैव  वाढत असतं. त्या  तट्टाला मोठेपणी लागणारी बरीचशी प्रथिन-सामुग्रीही गर्भावस्थेतच प्राप्त होते.

माणसांत असं नसतं. माणसांत वारेचा  हा पापुद्रा अगदी पातळ, म्हणजे  तीनच पदरी (Hemochorial) असतो. त्यामुळे आईच्या प्रतिकारशक्तीच्या डोळ्यावर येणार नाहीत एवढीच आणि अशीच  प्रथिने  माणसाच्या  बाळात असतात. पचन, चलनवलन, संरक्षण इत्यादीसाठी लागणारी संपूर्ण सामुग्री जन्मानंतर  यथावकाश निर्माण होते. कारण ह्या निर्मिती दरम्यान बाळाचे अनन्य असे रेणु निर्माण होतात. ते जर आईच्या प्रतिकारशक्तीच्या नजरेस पडले तर आफतच.    त्यामुळे माणसाचे बाळ जन्मतः  खूपच हतबल असतं. घोड्याचं बाळ जवळपास घोडा म्हणूनच जन्माला येतं पण माणसाच्या बाळाचा ‘एवढा मोठा घोडा’ व्हायला बराच  वेळ  लागतो.

पण ह्या निव्वळ तीनपदरी वारेचा एक मोठाच फायदा असतो. गर्भावस्थेत मेंदूच्या जलद वाढीसाठी त्याला सतत  ग्लुकोजचा खुराक लागतो. ही ग्लुकोजची रसद पुरवायची तर त्याला अशी पातळ वारच हवी. सहा पदरी वारेतून मिळणाऱ्या ग्लुकोजवर, माणसाच्या मेंदूएवढा मेंदू, पोसलाच जाणार नाही.  म्हणजे बलिष्ठ मेंदू आणि  हतबल, परावलंबी, प्रदीर्घ, शैशव हे माणसाच्या बाळाचे औत्क्रांतिक प्रारब्ध आहे.  

अर्थात जन्मानंतरही मेंदूला ग्लुकोजचा खुराक लागतोच. तो आता स्तन्य देऊन पुरवावा लागतो. ह्या स्तन्यातील घटकही प्राण्यागणिक बदलत जातात. सील, डॉल्फिन वगैरेंच्या  पिल्लांत मेंदूची बरीचशी वाढ गर्भावस्थेतच पूर्ण झालेली असते. त्यांच्या दुधात साखर (दुग्धशर्करा Lactose)   जवळपास  नसतेच. माणसाचा मेंदू जन्मोत्तरही उत्तरोत्तर  वाढणारा.  त्याला भूक फार. त्यामुळे माणसाच्या मादयांच्या दुधात दुग्धशर्करा (Lactose) भरपूर.  शर्करा हे इन्स्टंट फूड आहे तर चरबी हे  साठवून वापरता येईल असे अन्न आहे. पिल्ले सतत आसपास असणाऱ्या माणसाच्या माद्या शर्करायुक्त दूध स्त्रवतात. जरा भुकेजली की यांची पिल्ले लगेच लुचतात.   पिल्लांना सोडून लांब लांब जाणाऱ्या, सिंहिणी, हरिणी वगैरे  चरबीयुक्त दूध स्रवतात. आई पुन्हा परत येईपर्यंत त्यांची भूक भागली पाहिजे ना.  व्हेलच्या पिल्लांना ऊब राखायला भरपूर चरबीची गरज असते. व्हेलीणीच्या दुधात निम्मी चरबी असते. म्हणजे साय किती निघेल ते बघा!!

जन्मानंतर माणसाचा ‘माते-बाहेरचा-गर्भवास’ (Exterogestation) सुरू  होतो. आईला ह्याची मोठीच किंमत चुकवावी लागते. वारेतून पोसण्यापेक्षा स्तन्यावर बाळ पोसणे तसे ‘अवघड’ आणि ‘महाग’ असते. पण हा वरवर आतबट्याचा वाटणारा   सौदा अंतिमतः फायद्यात पडतो. कारण     गर्भाशयात जे शक्य नसते ते इथे सुरू होते. गर्भस्थ जीव आता समाजस्थ होतो. मेंदू  इथे दुधावर पोसला  जातो तसा  आसपासच्या पर्यावरणावरही  पोसला  जातो.  वास, स्पर्श, दृष्टी आणि श्रवण अशा माध्यमातून; आई, बाबा, समाज यांच्या सान्निध्यातून,  शिकत शिकत शेवटी माणसाचे पिल्लू भाषावधानी बनतं. उत्क्रांतीचं संचित ते बरोबर घेऊन आलेलं असतं; त्याला आता संस्कृतीचं संचित प्राप्त होणार असतं.

वानरी म्हणजे सुलभ प्रसूती आणि सबल पिल्लू.  नारी म्हणजे अवघड बाळंतपण आणि अनघड पिल्लू. पण नारीचे पिल्लू आपल्या मेंदूच्या बळावर आज पृथ्वी व्यापून, सृष्टी समजावून घेत आहे. वानरीचे पिल्लू पिढ्यानपिढ्या जैसे थे  आहे.   

जीव सृष्टीतील सारेच जीव तसे एकमेवाद्वितीय. पण आपली मादी विते, म्हणजे त्यामागे इतके सगळे घडते, ही जाणीव, हे कौतुक, फक्त मनुष्यालाच प्राप्त होऊ शकते. सृष्टीतील काही अणुरेणू एकत्र  आले आणि तुम्हांआम्हां  हा मनुष्यदेह प्राप्त झाला. मग दुर्मिळ असा हा मनुष्यजन्म, पुनर्जन्माच्या पारलौकिक विवंचनेत वाया घालवायचा, का हे  सृष्टीचे कौतुक जाणण्यासाठी सार्थकी लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.  

 


No comments:

Post a comment