कोव्हिडच्या साथीने दिलेले धडे
डॉ. शंतनु अभ्यंकर
संसर्गजन्य आजार आपल्या सोबत होते, आहेत आणि रहाणार. या आजारांसाठी प्रतिबंधक उपाय हे निश्चितच स्वस्त पडतात. पण या उपायांचे फायदे सहज दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. काल गाड्यावरचे चायनीज खाल्ले, जुलाब झाले, त्याच्या सलाईनचे तीन हजार खर्च झाले; असा हिशोब आपण सहज काढतो. पण लहानपणापासून शुद्ध पाणी प्यायल्याने न झालेल्या जुलाबाचे तीस हजार वाचले, असा विचार आपण करत नाही. त्यामुळे प्रतिबंधक उपयांचं कौतुक नसतं कुणाला.
दरवेळी प्रतिबंध शक्य नसला तरी साथीचा वेळीच मुकाबला करायला शिकणं आवश्यक आहे. कोव्हिडची साथ आली. या साथीनी भल्याभल्यांची, अगदी महासत्तांचीही जिरवली. सगळ्यांना चांगलाच धडा शिकायला मिळाला. सगळ्यात मोठा धडा मिळाला तो आरोग्यव्यवस्थेला. आता पुढे काय? पुन्हा असं होऊ नये म्हणून काय करायचं? कुठे चुकलं? याहून बरं आणि भलं काही शक्य होतं का? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत.
लोकलज्जेपायी आपल्याला टिबी किंवा महारोग झाल्याचं लोक लपवून ठेवायचे आणि त्यातून अधिकच नुकसान व्हायचं. तसंच आता काही देश साथ पसरल्याचं लपवून ठेवतात. तात्कालिक आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे केलं जातं पण यातून भलतीच आपत्ति उभी राहते. त्यामुळे सत्यकथन ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. जग आता जवळ आलं आहे. त्यामुळे साथीही सहज जगद्व्यापी होत आहेत. त्यामुळे उपायही सर्व पृथ्वी व्यापून उरणारे हवेत.
मुळात कित्येक देशांकडून मुकाबला सुरू करायला उशीर झाला. व्हायरस चांगला फैलावल्यावर मगच त्याला फैलावर घ्यायचं सुचलं. झटपट आणि मोठ्या प्रमाणावर तपासण्या, संपर्क-मागोवा (Contact Tracing), आरोग्यसेवा, अतिदक्षता सेवा, आरोग्य शिक्षण, वगैरे उभारण्यासाठी बरीच झटापट करावी लागली. बरीच मनुष्य आणि वित्तहानी पदरी आली. तेंव्हा तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या यंत्रणा उभारणे आता गरजेचे आहे.
अशा आजारात संपर्कातील व्यक्तींचा माग काढणे आवश्यक ठरते. एचआयव्ही, टिबी, रेझिस्टंट इन्फेक्शन, वगैरे बाबतीतही हे आवश्यक असते. हे कसे करायचे ह्याची जाण त्यामुळे आहेच. पण कोव्हिडसारख्या आजारात हीच गोष्ट विद्युतगतीनी करावी, तरच आपली धडगत आहे. मग अशी ऐनवेळी गती घेण्यापेक्षा, सततच गतीनी काम केलं तर बिघडलं कुठे? संपर्क-माग काढण्यासाठी मोबाइल लोकेशनद्वारे, क्रेडिट कार्डच्या वापराद्वारे, आरोग्यसेतु अॅपद्वारे माहिती जमवली गेली. अशा पद्धतीने माहिती गोळा करत गेलं तर इतकी प्रचंड महिती गोळा होते की तिचे अर्थवाही विश्लेषण हे एक वेगळेच तंत्र कौशल्य आहे. बिग डेटा आणि त्याचा अर्थबोध हे नव्या युगात कळीचे आहेत.
पण जुन्या युगापासूनच साथरोगशास्त्र असं एक वेगळं शास्त्र आहे. पण त्याला वलय नाही. आवडीने ह्या क्षेत्राकडे कोणी वळत नाही. हयात करियर करण्यासारखं काही नाही अशी डॉक्टरी भावना आहे. ही किती चुकीची आहे ते आता लक्षात घेतले जाईल आणि एक आव्हानात्मक क्षेत्र म्हणून इकडे अधिकाधिक विद्यार्थी आकर्षित होतील असं दिसतं. सार्वजनिक आरोग्यक्षेत्राचा गाडा हा अशा तज्ञांनी हाकणे हेच उत्तम ठरणार.
सध्या आरोग्यव्यवस्था आयएएस अधिकाऱ्यांकडे आहे. ह्याही साथीत प्रत्येक ‘बाबू’नी आपापल्या समजुतीनुसार निर्णय घेतले. पण जे डॉक्टर होते आणि ‘बाबू’ होते ते उजवे ठरले. बाकीच्यांच्या बऱ्याच चुका, साथ रोग नियंत्रण कायद्याच्या पडद्याआड झाकून राहिल्या. आरोग्यव्यवस्था सांभाळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा हवी अशी जुनीच मागणी आहे. ह्या निमित्ताने त्याकडे गांभीर्याने पाहीले जावे.
नवे नवे साथीचे आजार हे बहुतेकदा प्राण्यांतून माणसात प्रविष्ट होतात. इबोला, सार्स, मर्स, करोना हे सारे असेच; प्राणिज आजार. तेंव्हा ह्या मार्गावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवायला हवी. मानव आणि निसर्गाचा झगडा आदिम आहे. शेती, शिकार, वस्ती, व्यापार, वहातूक वगैरेच्या निमित्तानी, मनुष्य कळत नकळत निसर्गावर आक्रमण करतो आणि मग आक्रसलेल्या अधिवासातील प्राणीसृष्टीचा आणि माणसाचा सामना होतो. आर्थिक धोरणे बदलून, कायदेशीर तरतुदी वापरुन आणि लोकशिक्षणातून हे प्रकार कमी करता येतील. प्राण्यांत वस्तीला असणाऱ्या संभाव्य साथ-जंतूंचीही शिरगणती आणि आणि नोंद व्हायला हवी. ही माहिती सतत अद्ययावत ठेवायला हवी. यातून नवे नवे शत्रू लवकर लक्षात येतील.
नव्या नव्या साथींचे आणखी एक कारण म्हणजे रेझिस्टंट जंतू. अॅंटीबायोटिक्सच्या प्रच्छन्न आणि बेजबाबदार वापरानेही जंतू ‘हुशार’ आणि ‘हुश्शार’ होतात. नेहमीच्या वापरातल्या औषधांना ते दाद देईनासे होतात. त्यांच्यात रेझिस्टन्स निर्माण होतो. मग हे शहाणे झालेले जंतू जोमाने पसरत जातात. साथी येण्यामागे हेही कारण आहे. टिबीचे असे बहुविध औषधांना पुरून उरणारे जंतू सध्या हैदोस घालत आहेत. तेंव्हा अॅंटीबायोटिक्सबद्दल सर्वांकडूनच सबूरी आणि शास्त्रवचनबद्धता अपेक्षित आहे.
कठीण समय येता सरकारी दवाखानाच कामास येतो, हे ही जनतेने पुरेपूर अनुभवले. पण या जनपदध्वंसाने आपली लेचीपेची आरोग्य व्यवस्था उघडी पाडली. दवाखाने कमी, डॉक्टर कमी, परिचारिका वगैरेंचा तर डॉक्टरांपेक्षा अधिक तुटवडा. औषधे आणि सामुग्री कमी आणि कमअस्सल. इंजेक्शन आहेत तर गोळ्या नाहीत, गोळ्या आहेत तर इंजेक्शन नाहीत. धर्म नावाची अफूची गोळी मात्र गल्लोगल्ली उपलब्ध. ग्रामीण भाग बरा म्हणावं अशी शहरांची अवस्था. ही यंत्रणा सुदृढ करायला हवी. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.५% खर्च आरोग्यावर करण्याचा, राष्ट्रीय आरोग्य धोरणातला, संकल्प जल्दीने तडीस नेला पाहिजे. ही व्यवस्था सुधारणे सोपं नाही. भ्रष्टाचाराचा ऑक्टोपस साऱ्या यंत्रणेला विळखा घालून बसला आहे. करोनाचा आजार आता रीतसर करोनाचा बाजार होऊ पहातो आहे.
करोनावर आरोग्यव्यवस्था ओवाळून टाकताना बाकीचे आजार काही सुट्टी घेत नाहीत. करोनाचे हजार मृत्यू वाचवताना, इतरत्र दुर्लक्षाने, तेवढेच जर मरणार असतील तर ही लढाई व्यर्थच म्हणायची. या साथीतही इतर आजारांकडे लक्ष पुरवायला माणसे कमी पडायला लागली. नेमकी आकडेवारी यथावकाश समजेल पण या काळात घरगुती बाळंतपणे वाढली, तेंव्हा मातामृत्यूही वाढले असणार. बाळांची लसीकरणाची वेळ हुकली, तेंव्हा त्यांचीही दुखणी वाढणार. माणसं दवाखान्याला घाबरायला लागली. करोनाभयाने आजार अंगावरच काढला, त्यातून तो वाढला आणि माणूस दगावला; अशाही कथा आणि व्यथा आहेत.
मानसिक आरोग्याच्या सेवा कीती तोकड्या आहेत, हेही या साथीनी लक्षात आणून दिलं आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा मानसोपचार तज्ञ, जो पंढरीचा विठोबा, त्याचाच दरवाजा बंद! माणसे घरात कोंडलेली. कामधंदा बंद. चोवीस तास तीच तीच माणसे आसपास. विरंगुळा विसराच, फक्त विवंचना म्हटल्यावर मनःस्वास्थ्य बिघडणार नाही तर काय होणार?
शिवाय जे करोनाने बाधित झाले, जे मृत्यू पावले त्यांच्या आणि नातेवाईकांच्या मनावर तर कायमचे ओरखाडे उठलेले आहेत. प्रेम, आशा, करुणा, आधार, सांत्वन अशा भावनांची जागा, त्रस्त डॉक्टरांशी झालेल्या कोरड्या व्हिडिओ कॉलने कशी बरे घ्यावी? आप्तांच्या प्लॅस्टिक बंद मृतदेहांना, कोणत्याही इतमामाशिवाय मिळणाऱ्या सरकारी भडाग्निने कित्येक मनं होरपळून गेली आहेत. जिवाभावाच्या माणसाला, शेवटच्या आजारात धडपणे मदत करू शकलो नाही हा धक्का पचवणे खूप जड आहे. या आणि अशा अनेकांना मानसोपचार तज्ञांची गरज लागेल. मानसोपचाराभोवतीचे तुच्छतेचे वलय लोकशिक्षणातून भेदावे लागेल. प्राथमिक आरोग्यकेंद्रांद्वारेही मानसोपचार सेवा देता येतील. याकडे लक्ष पुरवले पाहिजे.
पण वाईटात काही चांगलंही आहे. लसीकरणात भारताने भलतीच झेप घेतलेली आहे. लस आली की ती सर्वांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा आपल्याकडे जणू सज्ज आहे. अमेरिकेतल्यासारखा आंधळा लस-विरोध आपल्याकडे अभावानेच आढळतो. (गेल्या तीस वर्षात बाळाला लस द्यायला नकार देणार एकच बाप मला आढळला. तो स्वतः होमिओपॅथी डॉक्टर होता!) हा एक मोठाच फायदा ठरेल अर्थात लस येईल तेंव्हा.
या साथीत होमिओ वगैरे उपचारही चर्चेत आले. रोगावर रामबाण इलाजाचा दावा करणारे, पुरावा विचारताच निरुत्तर झाले. पण यानिमित्ताने रामबाण कशाला म्हणावं?, इम्युनिटी कशाशी खातात?, प्रतिकारशक्ती दुधारी असते म्हणजे काय?, औषधे लसी वगैरेंच्या चाचण्या कशा केल्या जातात?, त्या कीती किचकट असतात वगैरे विषय सामन्यांच्या चर्चेत आले. वैज्ञानिक कसोट्यांवर औषधे, लसी, ज्ञान आणि कौशल्ये वारंवार पारखत रहावी लागतात आणि हाच मार्ग खरा हे जनमानसावर बिंबवले गेले.
या अशुभ काळात काही चांगल्या सवयीही अंगीकारल्या गेल्या. साथ ओसरल्यावरही त्या सोडून देता कामा नयेत. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्ट्या वापरत रहाणेच योग्य. वारंवार हात धुवत रहाणेच उत्तम. शिंकण्या-थुंकण्या-खोकण्याच्या स्वच्छ सवयी सांभाळणेच बरे. शक्यतो टेलीमेडीसिनने उपचार घेता आले तर चांगलेच....आणि हो, ‘या बिमारीपासून बचने के लीये आपली जी ढाल आहे, याने की डॉक्टर, स्वास्थ्य कर्मचारी, इत्यादींना सन्मान आणि पूरा सहयोग देण्याची, ह्या योद्ध्यांची देखभाल करण्याची, (आणि इतक्या दिवसात हा संदेश मराठीत असावा अशी मागणीही न करण्याची) सवय लागली असेल तर तो ही एक फायदाच म्हणायचा. फारच अंधारलेल्या रुग्ण-डॉक्टर/कंपाउंडर संबंधात तेवढीच विश्वासाची, मायेची मिणमिणती पणती. ही पणती जपून ठेवली पहिजे.
दैनिक सकाळ 8 सप्टेंबर 2020
No comments:
Post a Comment