Saturday, 25 April 2020

या मार्गानेच जाऊ या


या मार्गानेच जाऊ या.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
९८२२०१०३४९

करोनाने सगळ्यांना दुग्ध्यात पाडले आहे. विशेषतः आरोग्यकर्मींना.
नवी साथ आली म्हणताच देशोदेशीचे वैद्य, हकीम आपापले बटवे घेऊन सरसावले आहेत. बटवेच नाही तर बावटेही आहेत त्यांच्या हातात. त्या त्या देशाला त्या त्या देशीच्या, देशी औषधांचा अभिमान आहे. तेंव्हा आपलंच खरं असं सांगायची एक चढाओढ लागली आहे.
आमच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथापरंपरा, जडीबुटीची जादुई दवा, आता  आपली कमाल दाखवेल,  असे दावे जगभरात केले जात आहेत.
चिन्यांनी नेहमीप्रमाणे इथेही आघाडी घेतली आहे. प्राचीन चिनी उपचार कसे ‘बेश्ट’ आहेत हे ते  सांगत आहेत. त्यांच्या सरकारचाही त्यांना पाठिंबा आहे. ‘चायनिज जर्नल ऑफ इंटीग्रेटेड मेडिसिन’नी करोनाहारक अशा  अर्धा डझन वनस्पति आणि काढे यांची यादीच प्रसिद्ध केली आहे. अर्थात यातल्या कशालाच पुरेसा पुरावा नाहीये. बरीचशी वेडी  आशा आणि काहीशी राजकीय अभिलाषा यामागे आहे.
अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थनी चिन्यांच्या या दाव्याला धू धू  धुतला आहे. वर चिनी औषधात किटकनाशके, घातक रसायने इतकेच काय, पण गुपचूपपणे घातलेली आणि त्यामुळे प्रमाण, मात्रा वगैरे गुलदस्त्यात असलेली;   ‘आधुनिक औषधे’ही असू शकतात असं बजावून सांगितलं  आहे. चिनी  औषधे नेमकी साधक का बाधक ते अजूनही सांगता येत नाही, यांच्याबाबतचा कोणताच  अभ्यास परिपूर्ण नाही, असंही त्यांच्या वेबपेजवर म्हटलं आहे.
करोना रुग्णांच्या संख्येइतकीच चिन्यांची ह्या बाबतीतली  आकडेवारीही संशयास्पद आहे. आपलंच घोडं पुढे दामटण्यात  चीनचे राजकीय हितसंबंध आहेत. ह्याला म्हणतात ‘सॉफ्ट पॉवर’. म्हणजे आपली भाषा, संस्कृति, कला, परंपरा, चित्रपट, वैद्यकी  इत्यादी माध्यमातून परकीयांवर केलेला हा हल्लाच. अर्थात अशी सॉफ्ट पॉवर वॉर्स  सतत चालत असतात. उत्तम चित्रपटांना पुरस्कार झांबीयातही देतच असतील की पण आपले डोळे ‘ऑस्कर’कडे लागलेले असतात. हे अमेरिकन सॉफ्ट पॉवरचं उदाहरण. योगा आणि बॉलीवुड हे भारतीय सॉफ्ट पॉवरचं.
माझ्या आजीसकट,  जगभरच्या आजीबाईंच्या बटव्याप्रमाणेच चिनी आजीचा बटवा आहे. त्यात काही उपयोगी, बराचसा संदिग्ध आणि  काही निरुपयोगी माल भरलेला आहे. म्हणजे गवती चहा प्यायल्यावर सर्दी झालेल्याला ‘बरं’ वाटतं पण त्याने तो ‘बरा’ होत नाही, असा तो प्रकार आहे. बरं वाटणं आणि बरं होणं ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. करोना साथीत तर तो शब्दशः जमीन आस्मानाचा आहे.
प्राचीन चिनी मुनींनी दिलेला  हा समृद्ध वारसा चिनी डॉक्टरांनी जतन केला पाहिजे, त्याचा अभिमान बाळगला पाहिजे, तो  वृद्धिंगत केला पाहिजे, त्यात संशोधन केले पाहिजे, त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे,  वगैरे, वगैरे, वगैरे, चीनचे अध्यक्ष क्षी जिन पिंग  यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. हे सगळं खूप खूप परिचयाचं ऐकल्यासारखं आणि अगदी जवळचं वाटतंय ना? मग आहेच तसं ते.
जगभर सगळे आपापली औषधे सरसावून पुढे येत आहेत. उदाहरणार्थ आपल्या आयुष मंत्रालयाने जानेवारीतच आर्सेनिक अल्बम हे होमिओ औषध  ‘प्रतिबंधक’ म्हणून सुचवलं आहे. ह्या दाव्याशी सुसंगत असा एकही अभ्यास झालेला नसताना हा  दावा करण्यात आला. गंमत म्हणजे २६ मार्चच्या ट्विटमध्ये महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने, ‘कोरोना रोखण्यास कोणत्याही औषधाची शिफारस नाही’ असे स्पष्ट केलेले आहे.  निसर्गोपचारवाले, रेकीवाले, अरोमावाले, कोणीही मागे नाही. अॅकयूपंक्चरवाल्यांकडे तर ‘किडनी आणि फुफ्फुसे  बलदंड करणारी’ ट्रिक आहे. बरेचदा हे दावे पोकळ असतात त्यामुळे निरुपयोगी आणि निरुपद्रवीही असतात. असल्या दाव्यांची चलती असते त्यामागे हेही कारण आहे. पण कधीतरी गणित फसतं.   इराणमध्ये  करोना होऊ नये म्हणून  लोकांनी गावठी दारू प्यायली आणि विषबाधा झाल्याने तब्बल ४४ जणांना प्राणास मुकावे लागले.
मला एड्सच्या साथीची आठवण होते. एड्सवर औषध यायला काही दशके लागली होती. आणि इतका सारा काळ  केरळपासून कॅलिफोर्नियापर्यंत अनेक भोंदुंनी आपापली दुकाने थाटली होती. आज एड्सवर प्रभावी औषध आहे आणि औषधबाजारातील ही सारी भोंदुंची  पाले भूछत्राच्या गतीनी  मिटली आहेत. पण सुरवातीला एड्सच्या भयगंगेत अनेकांनी आपले हात धुवून घेतले. सर्वसंहारक संकट, भयभीत, हतबल जनता, या परिस्थितीचा गैरफायदा घेणारे भोंदू आणि शास्त्रीय औषधांचा उदय होताच त्यांचा होत जाणारा अस्त; हासुद्धा अभ्यासाचा विषय आहे.
ह्या सगळ्यात गंमतीशीर दावा आहे तो ‘प्रतिकारशक्ती वाढवण्याचा’. हे सगळे ‘पूरक आणि पर्यायी औषधोपचार’ प्रतिकारशक्ती वाढवतात म्हणे.  प्रतिकारशक्ती ही जरा ऐसपैस संकल्पना आहे. त्याचे कोणतेही एकच  मापक किंवा एकक नाही. त्यामुळे ती वाढवल्याचा दावा करणे अगदी सोप्पे आहे. तो दावा खोडून काढणे अवघड नाही तर अशक्य आहे. म्हणूनच तर असले दावे केले जातात.  ‘मी  तुमची कल्पनाशक्ती वाढवतो!’, अशा दाव्यासारखा  हा दावा आहे.
मनात आणलंच तर  अगदी साखरेच्या पुड्यासुद्धा प्रतिकारशक्तीवर्धक म्हणून विकता  येतील.  कारण उपाशी माणूस हा सहज आजारी पडतो हे सत्य आहे. ह्या न्यायानी  पाणीसुद्धा प्रतिकारशक्तीवर्धक म्हणता  येईल. कारण शुष्कता आली तर शरीरातल्या अनेक सिस्टिम बिघडतात. त्यात प्रतिकारशक्तीही आली.
प्रतिकारशक्ती सशक्त ठेवायची तर  चौरस आहार, पुरेशी विश्रांती, व्यायाम आणि निर्व्यसनी रहाणी हे महत्वाचे. प्रतिकारशक्ती वाढवण्याचा, सर्वांनी सरसकट घ्यावा असा,  दुकानात विकत मिळणारा, झटपट फॉर्म्युला नाहीच. पण असे फॉर्म्युले विकणारे मात्र भरपूर आहेत. सार्वजनिक भीतीचा, वापर हे आपला माल खपवण्यासाठी करत असतात.
शिवाय हे उपचार आधुनिक उपचारांच्या सोबतीनी घ्यायचे आहेत अशीही मखलाशी आहे. ही एक चांगली सोय असते. म्हणजे यशाचं पितृत्व स्वतःकडे ठेवून अपयशाचं खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडता  येतं. नेहमीप्रमाणेच, ‘फायदा होतो का  नाही हा वाद ठेवा बाजूला, पण निदान तोटा  तर होत नाही ना?’ हा ही लाडका युक्तिवाद आहेच. आधीच जेमतेम असलेला पैसा अशा अनिश्चित आणि प्रसंगी तापदायक  उपचारात घालवणे हा तोटाच आहे. योग्य उपचारांपासून परावृत्त होणे हा तोटाच आहे. उपचार चालू आहेत ह्या भ्रमात रहाणे हा तोटाच आहे. पण या साऱ्याला राजमान्यता, समाजमान्यता आणि माध्यममान्यता मिळणे अधिक धोकादायक आहे.
आमच्याकडे हा आजार बरे करणारे औषध नाही, असं फक्त आधुनिक औषधोपचारवाले म्हणत आहेत. आहे त्या सामुग्रीनिशी ते लढत आहेत. तोंडाला ‘मुसक्या’ बांधून, आधुनिक ‘घोंगड्या’ (रक्षाकवच) पांघरून,  रोज आले किती? तपासले किती? बरे  किती? वारले किती? वगैरे आकडेवारी जाहीर करत आहेत. यशापयशाचा लेखाजोखा मांडत आहेत.  संशोधन जारी आहे. तुमचा  काय अनुभव, आमचा काय अनुभव; तुमचं कुठे चुकलं, आमचं  कुठे चुकलं;  अशी देवघेव चालू आहे. अमुक करा,  तमुक नको असे सल्ले दिले-घेतले जात आहेत. चुका दुरुस्त केल्या जात आहेत.    
ह्या अशा अभ्यासातून आणि काटेकोर नियोजनातून देवीचे निर्मूलन झाले, पोलिओ पळून गेला, नारू नाहीसा झाला, एड्स आवाक्यात आला  आणि कुष्ठरोग, गोवर, निघायच्या वाटेवर आहेत. तेंव्हा हाच मार्ग खरा. पूर्वग्रहविरहित, अभिनिवेशरहित, अशा ह्या मार्गानेच जाऊ या.  

प्रथम प्रसिद्धी
महाराष्ट्र टाइम्स, २४ एप्रिल २०२०


Wednesday, 22 April 2020

केल्याने भाषांतर


केल्याने भाषांतर....
डॉ. शंतनू अभ्यंकर

भाषांतर हा  तसा जोखमीचा खेळ.  कधी   अर्थाचा अनर्थ घडेल हे सांगता येत नाही.
आता हेच बघा ना, मराठीत प्रसिद्ध झालेलं पहिलं पुस्तक म्हणजे डॉ. विलियम केरी लिखित, ‘मराठी भाषेचे व्याकरण’(१८०५). मग लगेचच आलं ‘मराठी  बायबल’ (१८०७). म्हणजे मराठी पुस्तक व्यवहाराला चक्क भाषांतरित पुस्तकानेच सुरवात झाली की. पण हे बायबल वाचलं की सारखं अडखळायला होतं. बायबल आणि मराठी व्याकरण यांचा सांधा काही जुळलेला नाही.   बायबल हा देवाचा शब्द, त्यामुळे त्यात बदल असंभव. त्यामुळे बायबलची भाषांतरे म्हणजे शब्दाला प्रतिशब्द अशा पद्धतीने केलेली. 
त्यामुळे ‘नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. मत्तय 5:10-12
किंवा
 ‘परंतु तुझ्या भावना पुराच्या अनावर व बेबंद लाटांप्रमाणे आहे; तू माझा मुलांमध्ये श्रेष्ठ किंवा सर्वात अधिक महत्वाचा मुलगा होणार नाहीस कारण तू आपल्या बापाच्या एका बायकोपाशी जाऊन निजलास; तू आपल्या बापाच्या अंथरुणाचा आदर करुन मान राखला नाहीस.’ अशी वाक्ये सर्रास आढळतात. ही मायबोली नसून ही तर खास बाय(बल)बोली झाली.  शब्दशः भाषांतर फसतं ते इथे. या भानगडीत  Minister Of External Affairsचं भाषांतर ‘बाहेरच्या भानगडीचा मंत्री’ असंही होऊ शकतं.
भाषा म्हणजे निव्वळ अर्थवाही शब्द नसतात. त्या त्या भाषेबरोबर त्या त्या भाषीकांची, प्रदेशांची संस्कृति येते, श्रद्धा-अंधश्रद्धा येतात, लोककथा आणि पुराणांचे दाखले  येतात. प्रत्यय, क्रियापदांची विशिष्ठ ठेवण  येते आणि बरंच काही येतं. आपण वाचतो आणि वाचलेलं आपल्याला आवडतं, भावतं ते त्यात हे सगळं असतं म्हणून. बँकेच्या लोनची, घराच्या खरेदी-विक्रीची, निरनिराळ्या इंन्स्यूरन्स स्कीमची कागदपत्रही कुठल्यातरी भाषेतच असतात. पण ती इतकी रटाळ असतात की वाचवत नाहीत. बरेचदा तर न वाचताच आपण सही ठोकतो त्यांवर. ललित लेखनाचं असं नसतं आणि म्हणूनच ललित लेखन  भाषांतरायला आणखी कठीण. कोर्टाच्या निकालाचं भाषांतर सहज शक्य आहे. पण तुकारामाच्या अभंगाचं कितीतरी अवघड.
दोन्ही भाषांवर प्रभुत्व असल्याशिवाय भाषांतर अशक्य. उत्तम भाषांतर जमण्यासाठी दोन्ही भाषांतील काव्यसृष्टीचा व्यासंगही  मला महत्वाचा वाटतो. मुळात कमीत कमी  शब्दात अफाट आशय मांडायची कवितेची शक्ती काही औरच. त्यातही यमक-अनुप्रास साधत, हे केलेलं  असतं.  त्यामुळे कवितेचा अभ्यास असेल तर भाषांतर सरस उतरते असं वाटते.
 दोन्ही संस्कृतींची जाण  नसेल तर तो डोलारा  डळमळीत रहाणार.  त्यातही एका भारतीय भाषेतून, दुसऱ्या  भारतीय भाषेत भाषांतर सोपे.  कारण मुळात भाषांत अंतर कमी, संस्कृति बरीचशी  समान. पण दूरस्थ  भाषेतून आपल्या भाषेत आणणे किंवा उलटे,  अगदी कठीण.
मूळ  लेखकाच्या समग्र लिखाणाशी, विचार प्रकृतीशी परिचय असल्याशिवाय ते प्रामाणिक होणार नाही. त्यामुळे जे पुस्तक भाषांतरायचे आहे तेवढेच वाचून भागत नाही त्या लेखकाचे इतरही लिखाण वाचलेले असावे लागते. त्याची शैली अगदी गाढ परिचयाची असावी लागते. किती गाढ? इतकी गाढ, की तुम्हाला त्या शैलीचे विडंबनही जमले पाहिजे! कारण विडंबन म्हणजे विदूषकी चाळे नव्हेत. एक उत्कृष्ट निर्मितीला दिलेली ती तितक्याच तोलामोलाची दाद आहे. (वाचा ‘झेंडूची फुले’बद्दल पुलंचे निरीक्षण ) ही तर विरुद्ध भक्ती. तुम्हाला विडंबन जमलं तर त्या लेखकाचे भाषांतर जमलेच म्हणून समजा. 
जशी लेखकाची असते तशी प्रत्येक भाषांतरकाराचीही एक शैली असते. एखाद्या कलाकृतीची एकापेक्षा अधिक भाषांतरे शक्य आहेत आणि ती सर्वच्या सर्व उत्तम असू शकतात. ‘मेघदूता’ची, ‘गीते’ची  अशी कित्येक समश्लोकी भाषांतरे आहेतच की. 
त्यातही मराठीतून इंग्लिशमध्ये भाषांतर करणे हे थोडे सोपे आहे. इंग्लिशचे शब्दसामर्थ्य जबरदस्त आहे. विविध अर्थछटांचे शब्द तिथे आहेत, पारिभाषिक शब्दसंपदा तर विपुल आहे. त्यामुळे मराठीतून इंग्रजीत जाताना, हा शब्द? का तो शब्द? असा प्रश्न पडतो. मात्र इंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना शब्द शोधावे किंवा घडवावे लागतात किंवा मूळ इंग्रजी कायम ठेवावे लागतात.  
‘व्हाय इज सेक्स फन?’ या जारेड डायमंड यांच्या पुस्तकाचा मराठी भावानुवाद, ‘संभोग का सुखाचा?’ या नावाने मी  केला  आहे. त्या पुस्तकातील प्रस्तावनेत ह्या शाब्दिक अडचणीबद्दल काही निरीक्षणे मी मांडली आहेत. ती खाली उद्धृत करत आहे.
‘रुपांतर करायला सुरवात केली आणि मग एक मजेदार खेळ सुरु झाला. प्रत्येक शास्त्रीय संज्ञेला मराठी प्रतिशब्द शोधणे, तो क्लिष्ट किंवा फारच अपरिचित असेल तर कंसात इंग्रजी शब्द देणे अश्या युक्त्या करत करत मी निघालो होतो. पण या सर्वात थरारक अनुभव होता तो म्हणजे, मराठी भाषेचे शब्दवैभव माझ्या हळू हळू लक्षात यायला लागले. अपेक्षेपेक्षा  फारच कमी शब्दांना मी अडखळलो. शब्द आहेत पण ते वापरात नसल्याने झपाट्याने विस्मृतीत जात आहेत असेही माझ्या लक्षात आले. माझ्या काही परिचितांना मी कच्चा खर्डा वाचायला दिला तर सर्द, पैस, प्रकृत हे शब्द त्यांना माहितच नव्हते. मी चकित झालो. यातली काही मंडळी तर मराठी माध्यमातून शिकलेली होती. जुगणे (समागम), कोंबडीचा वाढा (एकावेळी दिलेली अंडी), मादी माजावर येणे (बीजधारणा झालेली कामोत्सुक मादी), बैल बडवलेला असणे (वृषण बाद केल्याने वांझ बैल) असे शब्द आता फक्त माझ्या ग्रामीण मित्रांच्याच परिचयाचे आहेत. वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे आणि इंग्रजीकरणामुळे आपण आपली शब्दसंपदा गमावून बसत आहोत याची मन विषण्ण करणारी जाणीव मला पुनःपुन्हा होत राहिली. काही नवीन शब्द घडवावे लागले. उदाहरणार्थ Evolution ला उत्क्रांती हा शब्द सर्वमान्य आहे पण Evolutionaryला काय म्हणावे बरे. दरवेळी उत्क्रांती विषयक, उत्क्रांतीबद्दल असे किती वेळा म्हणणार? मग शब्द बनवला ‘औत्क्रांतिक’. उदास, उद्योग किंवा उपचारचे रूप जसे अनुक्रमे औदासिन्य, औद्योगिक किंवा औपचारिक असे होते, तसे हे औत्क्रांतिक. Arbitrary या शब्दाला मी असाच अडखळलो पण विचार करता करता, लिखाणाच्या ओघात, मला कितीतरी शब्द सुचले. असंबद्ध वाट्टेल ते, काहीच्याकाही, अपघाताने निवडलेला, आगापीछा नसलेला, शेंडाबुडखा नसलेला...असे पाच निरनिराळे शब्द मला त्या त्या संदर्भात योजता आले आणि ते तिथे फिट्ट बसले. Strategy हाही असाच चकवा देणारा शब्द. ह्यालाही व्यूह, धोरण, डाव, कावा, पावित्रा, तऱ्हा असे अनेक पर्यायी शब्द मला सापडत गेले. त्या त्या ठिकाणी ते चपखल बसले. Provider Strategy आणि Showoff Strategy याला तर खाऊपिऊ तऱ्हा आणि भावखाऊ तऱ्हा असे गंमतीशीर प्रतिशब्द सापडले.’
शास्त्रीय लिखाणाचा मराठीत  भावानुवाद करताना आणखी एक अडचण येते.  आपल्या संस्कृतीतली, भाषेतली, अध्यात्मिक रूपकं, संत वचनं, देवधर्माच्या कल्पनेनुसार आलेल्या म्हणी, वाक्प्रचार हे वापरावेत तरी मुश्कील आणि न वापरावेत तरी मुश्कील अशी अवस्था अनेकदा  येते. रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रीयालिटि’चा ‘जादुई वास्तव’ हा भावानुवाद केला तेंव्हा ही दुविधा  अनुभवली. मग प्रस्तावनेत मी याचा खास उल्लेख केला.
‘विज्ञान सांगतं की ‘मानवाचे अंती गोत्र एक’, एवढंच नाही तर सजीवांचे अंती गोत्र एक.’ पण हे वाचताच काही (सुजाण) वाचकांनी प्रश्न केला, ‘बघा हं, म्हणजे ते गोत्रंबित्रं  म्हणतात त्याला वैज्ञानिक पाया आहेच की!’ खरं तर ‘मानवाचे अंती गोत्र एक’ ही ओळ विंदा करंदीकरांची. त्याचा आधी संदर्भ देऊन मगच मी ‘सजीवांचे अंती गोत्र एक’, अशी मल्लीनाथी केली, पण गैरसमज व्हायचा तो झालाच. ‘मत्स्यावतार’ ह्या शब्दानीही अशीच  माझी विकेट घेतली. उत्साही वाचकांना मत्स्यावतारात परमेश्वराचा प्रथमावतार अनुस्यूत आहे असं वाटू शकतं. पण मला अभिप्रेत अर्थ आहे, आपले मत्स्य रूपातील पूर्वज. बस्स् एवढाच! हा गुंता सहजी सुटणारा नाही. त्यामुळे असे शब्दप्रयोग वापरावेत का नाहीत हा एक मोठाच संभ्रम ठरला. ह्या शब्दांचा मला अभिप्रेत असलेला अर्थ आणि  वाचकांच्या मनातला अर्थ, यात फार अंतर पडून चालणार नाही, तसं परवडण्यासारखं नाही. असे शब्द, वाक्प्रचार वापरावेत, तर अर्थाचा अनर्थ होण्याची चिंता. न वापरावेत, तर भाषेची लय बिघडते. भाषेचा लहेजा मार खातो. वाचनीयता कमी होते. एकूणच वाचताना ‘गंमत’ येत नाही. हे लिखाण खुमासदार, ललित निबंध न होता, कंटाळवाणा, बोजड प्रबंध होण्याची भीती मला सतावू लागते. इकडे आड आणि तिकडे विहीर. शेवटी अगदी अत्यावश्यक तिथेच असे काही शब्द वापरावेत अशी मी मनाशी खुणगाठ बांधली. पण तरीही दरवेळी स्वताःच्या मनातला अर्थ सांगायला लेखक तिथे असू शकत नाही. अशा शब्द, संकल्पनांची फोड करताना वाचकांनी पुस्तकाचा एकूण सूर, संदर्भ हाही विचारात घ्यायला हवा असं मला सुचवावंसं वाटतं. म्हणजे अशा गफलती कमी होतील.’
भाषांतर, रूपांतर, भावानुवाद असे शब्द वापरले जातात. खरंतर प्रत्येक अनुवाद हा भावानुवादच हवा. मूळ भाव जैसे थे ठेऊन निव्वळ भाषेची वसने तेवढी बदललेली. पण काही वेळा  मूळ  भाव तसाच ठेऊन भाषा आणि  संस्कृतीचाही साज बदलला जातो.  सर्जनशील प्रतिभावंतच हे करू जाणे. मराठीतील अशा प्रयोगाचं सर्वज्ञात उदाहरण म्हणजे ‘ती फुलराणी’.  या बाबतीत ‘ती फुलराणी’ची अरूण  आठल्ये यांनी लिहिलेली प्रस्तावना अभ्यासण्यासारखी आहे. ‘ती फुलराणी’ म्हणजे  अनुवाद नव्हे तर  अनुसर्जन आहे असे त्यांचे म्हणणे. भाषा तर  बदलली  आहेच पण मूळ इंग्रजी सुटाबूटाला अस्सल मराठीचा साज-पेहराव असा काही बेमालूमरित्या चढवलेला आहे की मूळ सुटाचे कापड सोडा, त्याचे सूतही दृष्टीस पडत नाही.

भाषांतर करायचं तर मूळ पुस्तक अर्थातच खूपच बारकाईने वाचावे, अभ्यासावे लागते. प्रस्तावनेपासून उपसंहारापर्यंत सगळं.  इथे तुमचा  कस लागतो.  लिखाणातील कित्येक संदर्भ आपण मनातल्या मनातल्या गृहीत धरलेले असतात. त्याबद्दलची पुरेशी स्पष्टता एक सामान्य वाचक म्हणून आपल्याला नसते, आवश्यकही नसते. पण भाषांतर करायचं तर असे कच्चे दुवे राहून चालत नाही. मूळ शब्दाशी आणि शब्दाच्या मुळाशी भिडावं लागतं. प्रसंगी भरपूर संदर्भ शोधावे लागतात. ज्या काळातील लेखन आहे, त्या काळातील, त्या त्या शब्दांचा अर्थ समजावून घ्यावा लागतो.  प्रतिशब्द शोधायला ऑनलाइन कोश, शब्दकोश इत्यादीची खूप खूप मदत होते. ऑनलाइन शब्द कोशात ‘डिसअॅम्बीग्यूएशन’ अशी एक सोय असते. त्या शब्दाचे वेगवेगळ्या संदर्भातील अर्थ इथे दिसतात. उदाहरणार्थ ‘बेंटले’, हे गाडीचे नाव आहे हे तुम्हाला कदाचित माहीत असेल पण ह्या नावाची गावे, गल्ल्या, विद्यापीठ, स्टेशन, शाळा, माणसं, ललित वाङमयातील प्रसिद्ध पात्र आणि इतरही बरंच काही आहे. भाषांतर करायचं तर हे असं सगळं तपासूनच घ्यावं लागतं. किंडल  किंवा प्ले-बुक आवृत्तीचा हा एक फायदा असतो. एखादा शब्द अडला तर निव्वळ स्पर्श करण्याचा अवकाश, त्या शब्दाचा अर्थ आपल्याला सामोरा  येतो. इतकेच काय पण त्याबद्दलचे आंतरजालावरचे, विकीपीडियातले संदर्भदुवे हात जोडून उभे असतात. ह्यामुळे विचक्षण वाचकांचे आणि विशेषतः भाषांतरकारांचे काम अगदी सुलभ होते. छापील पुस्तकाइतकेच ई-पुस्तक उपयोगी ठरते. तेंव्हा अशा दोन्ही आवृत्त्या साथीला असणे उत्तम.
तुमचे तुम्ही कॉम्प्युटरवर थेट टाइप करत असाल तर फारच उत्तम. कारण मग त्यात सहजपणे बदल करता  येतात. आधी वाक्य, मग त्यातही काही शब्द पुढेमागे, मग अख्खा परिच्छेद, मग भाषेची लय साधण्याकरता वाक्यांचा क्रम किंवा सांधेजुळणी बदलणे. म्हणी, वाक्प्रचार  वगैरेंचा वापर हे सगळं वारंवार करून बघता येतं. सगळ्यात सौष्ठवपूर्ण, सुबक, सर्वांगसुंदर अशी रचना प्रयत्नसाध्य असते. हे प्रयत्न हस्तलिखितात करणं अवघड आणि कंटाळवाणे असतं. त्यामुळे थेट टंकलेखन तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे.  
शेवटी भाषांतर हा निसरडाच प्रकार आहे. असं म्हणतात की भाषांतर म्हणजे हातमोजा  घालून प्रेयसीच्या गालावरून हात फिरवण्यासारखं आहे,  कितीही प्रयत्न  केला तरी काही तरी रहातंच.  




Saturday, 18 April 2020

स्केप्टीक डॉट कॉम, एका वेबसाईटची ओळख


स्केप्टीक डॉट कॉम
एका वेबसाईटची ओळख
अज्ञाताचं, अद्भूताचं आणि भूताचं कुतूहल सगळ्यांनाच असतं. काटेकोरपणे अज्ञाताच्या शोधाला लागणाऱ्या आणि अर्थात प्रसंगी आपली हार मान्य करण्याचं धैर्य असणाऱ्या  मंडळींना शास्त्रज्ञ म्हणतात. सर्व प्रश्नांची अंतिम उत्तरं आमच्याकडेच आहेत असा दावा करणाऱ्यांना भोंदू म्हणतात. आधुनिक युगात भोंदू मंडळी विज्ञानाची भाषा बोलतात!! पण विनम्र विज्ञानाची, वैज्ञानिकांची आणि वैज्ञानिक विचारसरणीची आरती गाणारी आणि भोंदू, फसव्या, खोट्या अशा छद्म्मविज्ञानाचा पर्दाफाश करणारी, भन्नाट वेबसाईट म्हणजे http://www.skeptic.com
अफलातून वल्गनांना लगाम, क्रांतिकारी कल्पनांना आणि विज्ञानाला सलाम अशी मूळ भूमिकाच आहे इथली. मुळात skeptic या शब्दाचा अर्थच मुळी शंकेखोर असा आहे. प्रश्न उपस्थित करणं, शंका घेण, सर्वमान्य तत्वांची फेरमांडणी करून नवीन  काही गवसतंय का ते पहाणं, हा मुळी विज्ञानाचा पाया आहे. त्यामुळे skeptic हे नाव समर्पकच म्हटलं पाहिजे.
या साईटवरून आपल्याला ई-स्केप्टीक या नियतकालिकाचं सभासदत्व घेता येतं. सिडी, मासिकं, पुस्तकं वगैरे खरेदी करता येतात. स्केप्टीकतर्फे होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहितीही मिळते. काही गाजलेल्या व्याख्यानांच्या/कार्यक्रमांच्या ध्वनीचित्रफीती ऑनलाईन ऐकायचीही सोय आहे. आपली मतेही अर्थातच आपण साईटकर्त्यांना कळवू शकतो.
मायकल शरमर हे उत्क्रांतीशास्त्राचे जगप्रसिध्द अभ्यासक, प्रचारक, प्रसारक, लेखक, व्याख्याते हेच साईटकर्ते आहेत. उत्क्रांतीशास्त्रासाठी प्रचारक आणि प्रसारक असावे लागतात हे वाचून तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. या साईटवरची बरीचशी पानं उत्क्रांतिवादाचं समर्थन करण्यात आणि मुख्यत्वे विरुद्ध मताचं खंडन करण्यात खर्ची पडली आहेत. युरोप अमेरिकेमध्ये उत्क्रांतीवादाला कडवा विरोध करणारे आणि बायबलमधील विश्वनिर्मिती हेच अंतिम सत्य मानणारे अनेक धर्मांध लोक आहेत. तिथल्या राजकारणात, समाजकारणात याचं मोठं प्रस्थ आहे आणि आपल्या दाव्याच्या पुष्टर्थ्य ही मंडळी वेळोवेळी (त्यांच्यामते शास्त्रीय असे) पुरावे सादर करत असतात. या अशा तथाकथित शास्त्रीय पुराव्यातील पोकळपणा दाखवणारे अनेक लेख या संकेतस्थळावर वाचता येतात.
अमेरिकेत शाळांमध्ये उत्क्रांतिवाद शिकवावा की नाही असा एक वाद कायम खदखदत असतो. एकदा शाळांमध्ये हे असलं पाखंडी उत्क्रांतीशास्त्रं शिकवलं जाऊ नये असा फतवा तिथल्या शाळा बोर्डाने काढला. झालं, एकच खळबळ माजली. शास्त्रज्ञ मंडळी आणि चर्चची शास्त्री मंडळी यांची चांगलीच जुंपली. शेवटी प्रकरण कोर्टात गेलं. प्रसारमाध्यमांना चांगलंच खाद्य मिळालं. संपूर्ण जीवसृष्टी ही प्राथमिक अवस्थेतल्या सजीवांपासून सावकाशपणे उत्क्रांत  होत आली आहे. या उत्क्रांतीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. आजची सजीवांची विविधता हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे आणि माणूस हा देखील एक प्राणीच असून या उत्क्रांतीचंच फलित आहे असा उत्क्रांतीवाद्यांचा दावा. तर अगदी प्रथमावस्थेतील प्राण्यात देखील अत्यंत गुंतागुंतीची जैवरासायनिक रचना असते. केवळ चार रसायनं अपघतानं एकत्र आली म्हणून ते रेणू जीव धरू शकत नाहीत. तेव्हा सजीवांची उपज ही कोण्या बुद्धिवान निर्मिकानं केलेली करामत आहे असं विरोधी पक्षाचं म्हणणं. ही मंडळी यासाठी मोठा मासलेवाईक दाखला देतात. समजा एखाद्या जंबोजेटचे सारे भाग सुटे करून एखाद्या आवारात ठेवले आणि चक्रीवादळासरशी ते एकत्र येऊन जम्बोजेट बनलं असं कुणी सांगितलं तर ते विश्वसनीय वाटेल का? जम्बोजेट सारखी गुंतागुंतीची रचना केवळ वाऱ्यानं घडू शकेल का? निर्मितीवाद्यांचं म्हणणं असं, की वादळानं जम्बोजेट बनणं जसं असंभवनीय आहे, तद्वतच उत्क्रांतीनं सजीवांची निर्मितीही असंभवनीय आहे.
मात्र उत्क्रांतीवाद्यांच्या मते हा सारा त्यांच्या म्हणण्याचा शुद्ध विपर्यास आहे. आलं वारं आणि झालं जम्बोजेट तयार, असा मुळी युक्तीवादच नाहीये. पृथ्वीचं काही कोटी वर्षं असलेलं वय, त्या काळातले भूकवचातले आणि वातावरणातले बदल, प्रयोगशाळेत निर्माण करता आलेली अमिनोआम्ल, ठिकठिकाणी सापडलेले जीवाश्म आणि अव्याहतपणे तयार होणाऱ्या आणि बदलाशी जुळवून न घेता आल्यामुळे नष्ट होणाऱ्या प्रजाती हा सारा उत्क्रांतीच्या बाजुनेचा सज्जड पुरावा आहे. बरीच भवतीनभवती झाल्यावर कोर्टाने अखेर उत्क्रांतीवाद्यांच्या बाजूने निकाल दिला. या साऱ्या प्रकरणाची सविस्तर चर्चा या साईटवर आहे. मोठी रंजक आहे ही चर्चा. धर्मवाद्यांनी केलेली अचाट आणि अफाट विधानं वाचून खूप बरं वाटतं.
बरं अशासाठी की झापडबंद विचार करण्याचा मक्ता काही निव्वळ भारतीयांकडे नाही, त्यात थोडे अमेरिकनही आहेत, ही ती सुखद जाणीव.


Tuesday, 14 April 2020

ती बाई आणि ती सभा

ती बाई आणि ती सभा
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

तीला आणली, जेमतेम स्ट्रेचरवर ठेवली आणि ती गेली. गेली म्हणजे मेली. मरणारच होती. ते दिसतच होत. सतत तिला झटके येत होते, तोंडाशी फेस आलेला, जेमतेम श्वास चालू आहे नाही, नाडी तर लागतच नव्हती, प्रचंड सूज सर्वांगावर आणि पोट नऊ महीन्याचं, टम्म फुगलेल. रहायची पार महाबळेश्वरच्या पलीकडे, तापोळ्याच्या जंगलात, कोयनेच्या पाण्यापल्याड. सक्काळी घरी झटके यायला लागले, मग दोन तास डोलीतून जंगलातून पायपीट. तेंव्हा कुठे मंडळी रस्त्याला आली. तिथून तासाभरानी जीप मिळाली. मग जीपनी महाबळेश्वरला. तिथून पाचगणी आणि वाई. म्हणजे घरून निघाल्यापासून सात एक तासांचा प्रवास. 

ती मेली आणि माझ्यामागे कागदपत्र भरायचं काम लागलं. त्याला माझी हरकत नव्हती. असून चालणारही नव्हती. आता त्या बाईचा मृत्यू हा राष्ट्रीय प्रश्न झाला होता. बाळंतपणात मृत्यू म्हणजे तांत्रिक भाषेत ‘माता मृत्यू’. आता त्याची चौकशी होणार, खालपासून वरपर्यंत कागदपत्र जाणार, घोडे नाचणार, चर्चा,  मिटींगा होणार. सकाळी सकाळी माझा मूडच गेला. आता दिवसभर डोक्यात हाच विचार, डोळ्यापुढे हाच चेहरा. कोणताही पेशंट मरणं म्हणजे डॉक्टरला हबकून जायला होतंच पण हे मरण आणखी वेदनादायी. अशी तरणीताठी बाई, निव्वळ वेळेत उपचार नाहीत म्हणून मरते तेंव्हा किती अपुरे आणि रिते वाटायला लागते.  चौथी खेप तिची,  त्यामुळे आता आधीची तीन पोरं पोरकी. काय होणार त्या पोरांचं? 
चार महीने झाले आणि चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला. एक अत्यंत उर्मट आवाज मला बजावत होता, ‘या उद्या मिटींगला अकराला, सायेब बी असणार हैत.’ अकरा ही सगळ्यात गैरसोयीची वेळ. भरल्या ओपीडीतून निघून जावं लागणार. मी वैतागलो. चार दिवस आधी कळवायला काय होतं? अपॉइंटमेंट्स  अॅडजस्ट  केल्या असत्या. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. 

पण वैतागलो तरी मी  चौकशीला हजर राहिलो.  एका बाजूला बरंही वाटत होतं मला. एखाद्या मातेच्या मृत्यूची अशी इथ्यंभूत चौकशी होणं खूप महत्वाचं. अमका अमका दोषी म्हणून जीभ वेंगाडायला  नाही तर मुळात सिस्टीम कुठे  मार खाते हे शोधून काढण्यासाठी. 
वाटेत तीन दवाखान्यात ती  थांबली होती. तिन्ही ठिकाणच्या डॉक्टरांनी तिला तपासली होती. आणि ‘पुढच्या घरी जा’ असं सांगितलं होतं. 
तिचा पोस्टमोर्टेमचा रिपोर्ट अजून बाकी होता. नेहमीप्रमाणे ‘व्हिसेरा प्रीझर्व्हड, ओपिनिअन  रिझर्व्हड’;  असा शेरा तेवढा मारला होता. ही तर नेहमीचीच तऱ्हा. ‘व्हिसेरा प्रिझर्व्हड’ म्हणजे मृतातील सर्व अवयव काढून तपासणीला पाठवले आहेत. चुकून सुद्धा काही तपासायचे बाकी राहू नये, एखादा खून, आजार, विषप्रयोग तपासलाच गेला नाही असं  होऊ नये  किंवा उगीच आपल्यावर काही बालंट येऊ नये, म्हणून ही सरकारी वृत्तीची सावधानता. खरेतर या केसमध्ये असं  करण्याची काहीही गरज नव्हती. ती  का गेली ह्याचं  उत्तर तिच्या एकूण हिस्ट्रीतून मिळतंच होतं. 

गरोदर होती, बीपी वाढले होते, दुर्लक्ष झालं होतं, झटके आले, येतच राहिले, ती गेली! या आजाराला म्हणतात इक्लॅंमशिया; शब्दशः अर्थ तडिताघात! जणू वीज कोसळली.  गरोदरपणात वाढलेल्या बीपीची ही करामत.  एक नाही, दोन नाही, तीन डॉक्टरनी तिला तपासले होते. ते तिघेही  तिथे होते. मी चौथा.  

म्हणजे आता पोस्टमोर्टेम रिपोर्ट आल्यावर पुन्हा सगळी जनता इथे गोळा होणार आणि मग काय तो फायनल रिपोर्ट होणार.  म्हणजे पुन्हा असाच अचानक फोन येणार, अचानक काम बुडवून यावं  लागणार...एकूण सरकारी कारभाराबद्दल मी आणखीनच वैतागलो. इतक्यात सिव्हिल सर्जन फायनल रिपोर्ट घेऊन थोडे उशिरा   येणार असल्याचा निरोप आला. मला हुश्श झालं. 

मग सुरु झाले ‘व्हर्बल पोस्ट मोर्टेम’. तिच्या मृत्यूचे सर्टीफिकीट जरी मी  दिले असले, तरी मी थेट जबाबदार नव्हतो. पण सरकारी यंत्रणा कशी काम करते ते अगदी जवळून पहाण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली.  
सगळ्यांची  उलट तपासणी सुरु झाली. कोणी तिच्या खोपटात गेलं  होतं  का? कोणत्या आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येतं तिचं  गाव? कोणती आशा वर्कर जाणे  अपेक्षित? का नाही गेली? 
जिल्हाधिकारीसाहेब स्वतः डॉक्टर होते. मग आय.ए.एस्. झाले होते.  त्यामुळे त्यांना या प्रश्नाबद्दल विशेष आच होती. त्यांचे प्रश्न नेमके आणि भेदक होते. कुणालाही सांभाळून न घेता आपल्याच यंत्रणेचा पर्दाफाश  करत करत ते एकेक मुद्दा सांगत होते, पुन्हा असं होऊ नये म्हणून आदेशवजा सूचना देत होते. 

एकूणच पाचव्यानंतर तिथली आशा वर्कर  या पेशंटच्या घरी फिरकलीच नव्हती. पेशंटही दवाखान्यात आली नव्हती. आशा बाईंचं म्हणणे असं की, ‘कितीही सांगितलं तरी या वस्तीवरची माणसं अजिबात प्रतिसाद देत नाहीत. पुरुष सगळे दिवसरात्र दारुत तर्र असतात आणि बायकाही दारू गाळण्यात आणि विकण्यात सहभागी असतात. लेडीज एम्.ओ.सुद्धा तिकडे जात नाहीत.   तिथे जायचं  तर  जीवाची, छेडछाडीची भीती वाटते. माझ्या आधीची बाई तर  तिथे अजिबातच गेलेली नव्हती. मी हिचं गरोदरपण रिपोर्ट केलंय, ते बघा!’

तिथल्या उपकेंद्रातल्या बाई डॉक्टरांची पाळी  आली. ‘तुम्ही मुख्यालयात रहात का नाही?’ असा प्रश्न होता. पण रहात जरी असते तरी त्या रात्री मी रजेवरच होते; हे उत्तर होतं.  अचानक काही घरगुती इमर्जन्सीमुळे त्यांना गावी जावं  लागलं होतं. सासऱ्यांच्या मृत्यूदाखल्यापासून वरिष्ठांना केलेल्या फोनकॉलच्या रेकॉर्डिंगपर्यन्त सारे पुरावे त्यांनी आणले होते. 

तिथून निघाल्यावर पेशंटला आणखी एका छोट्या दवाखान्यात नेलं होतं. ते ही डॉक्टर हजर  होते. त्यांनी तर  पेशंटला गाडीतच तपासलं होतं. त्यांनी तिचं बीपीसुद्धा बघितलं नाही असं नातेवाईकांचं सांगणं होतं. ‘बीपी जास्त आहे हे तर  मला नाडी बघूनच समजलं होतं’, असं त्या डॉक्टरांचं म्हणणं होतं. जिल्हाधिकारी प्रश्नार्थक नजरेने  माझ्याकडे बघत होते. ते डॉक्टर पुढे म्हणाले अहो पेशंटची जीसी  (General condition) खूप पुअर होती. बीपी बघण्यासाठी सुद्ध वेळ घालवायची गरज नव्हती. शिवाय बीपी वाढल्यावर आणि झटके आल्यावर द्यायची तातडीची औषधे माझ्याकडे नव्हतीच. मी ती ठेवतच नाही. त्यामुळे मी पेशंट इथ्यंभूत तपासून उपयोग काय? उलट मी तात्काळ  पुढे घेऊन जा हा सल्ला दिला,   ते बघा. 

त्यांचंही म्हणणं काही खोटं नव्हतं. त्यांच्या परीनी  त्यांनी ‘ट्रायएज’ केलं होतं. युद्धभूमीवर जे वाचू शकतात अशा पेशंटवर प्राधान्याने उपचार केले जातात. कुवतीबाहेरच्या पेशंटकडे चक्क दुर्लक्ष केलं जातं. याला म्हणतात ट्रायएज.  असं केलं नाही तर  जे वाचण्याजोगे असतात तेही हातचे जातात. ही केस आपल्या वकूबातली नाही हे ओळखून त्यांनी नकार दिला होता. 

पुढचा दवाखाना तर  बराच बडा होता. तिथे डॉक्टरही  होते. त्यांच्याकडे औषधेही होती. पण त्यांनी प्रथमोपचार म्हणूनही काही केलं नव्हतं. प्रथम देण्याचं इंजेक्शन त्यांच्याकडे होतं.  त्याचा डोसही पाठ होता पण तरीही त्यांनी पेशंटला पुढच्या घरी जा म्हणून पुढे पाठवलं   होतं. साहेब आता वैतागलेले दिसले. इथे बेजबाबदारपणा झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. पण ते डॉक्टर थंड होते. त्यांनी सांगितलं की त्यांच्यापर्यंत  पोहोचेस्तोवर पेशंटची हालत आणखी खराब झाली होती. तिला आता सतत झटके येत होते.  तीने उलटी गिळली होती. छाती घरघरत होती. श्वास जेमतेम चालत होता.  तिला ऊर्ध्व लागला होता.  ती मरणारच हे स्पष्ट दिसत होतं. प्रथमोपचार हे अखेरचेच उपचार ठरणार हे उघड होतं. अशा परिस्थितीत त्यांना कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. त्या वस्तीवरची माणसं वेगळ्याच प्रवृत्तीची होती. मागच्याच आठवड्यात, शेजारच्या दवाखान्यात, पेशंट खडखडीत बरा  होऊनही,  बिलावरुन  वाद घालत,  दवाखाना फोडण्याची भाषा करत, एक छदामही बिल न देता, सरळ  निघून गेले होते. ते म्हणाले, मी इंजेक्शन दिलं असतं तरी ती मेलीच असती.  फक्त माझ्या इंजेक्शनमुळे ती मेली असं म्हणत वस्तीवाल्यांनी माझा दवाखाना फोडला असता. तेंव्हा ना तुमचे पोलिस कामी  आले असते ना तुमचा  कायदा. माझ्यावर, माझ्या दवाखान्यावर हल्ला होणार नाही याची शंभर टक्के खात्री असती तर मी तिचा जीव वाचण्याची शून्य टक्के शक्यता असतानाही इंजेक्शन दिलं असतं. तशी खात्री तुम्ही देऊ शकता का? उलट मी  माझा दवाखाना वाचवला. तुमची तपासणी गेले चार महीने चालू आहे. गेल्या चार महिन्यात मी एकशेसाठ बाळंतपणे सुरक्षितरित्या केली तितक्या बायका मुलांचे प्राण वाचवले, ते बघा.

इतक्यात तिथे सिव्हिल सर्जन आले. डोळे विस्फारत ते रिपोर्ट सांगू लागले... ती अवघडलेली होती हे खरंच  होतं, तिचे बीपी वाढले होते हेही  खरंच होते, तिला झटके आले होते हेही खरंच  होते; पण तिला झटके आले ते बीपी वाढल्याने नाही; तिला झटके आले होते आणि येतच राहिले होते; ते मेंदूत रक्तस्राव झाल्याने!
 ...आणि  मेंदूत रक्तस्राव झाला होता तो डोक्याला  मार लागल्याने!! ...आणि डोक्याला मार लागला होता, कारण नवऱ्यानी तिचे डोकं दगडावर आपटले होते!!!
 ...आणि दगडावर डोके आपटले होते  ते जेवणात मीठ कमी पडले म्हणून!!!

आम्ही सुन्नपणे ऐकत होतो.  

इतक्यात माझा फोन वाजला. दवाखान्यातून फोन होता, झटके येणारी एक प्रेग्नंट  पेशंट आली होती. मी गाडीत बसलो  आणि वेगानी निघालो.

Saturday, 4 April 2020

अमल्या


अमल्या
डॉ. शंतनू अभ्यंकर

तुमच्याशी कोणतेही साम्य नसलेला असा कोणी मित्र आहे तुमचा? माझा आहे. अमल्या त्याचं  नाव. म्हणजे अर्थात नाव अमोल आहे पण आता मित्र म्हटल्यावर अमल्या! कुठल्याशा नाटकाच्या प्रॅक्टिसला हे  तरतरीत, तरणंताठं,  पोरगं  आलं; रंगमंचावर काही फार उजेड पडला नाही त्याचा, पण दोस्ती होऊन गेली. ती अगदी घट्ट झाली ती त्याच्या हॉटेलातल्या  मिसळीचा पहिला  घास घेतला तेंव्हा. दीर्घकाळ जिभेवर  रेंगळणारी चव आणि  व्यसन लागेल असा झटका.  मिसळ कसली अंमली पदार्थच तो. मिसळही अंमली आणि अमल्याही अंमली. सक्काळच्या पहिल्याच गिऱ्हाइकाला फडका मारून बसायचा इशारा करता करता अमल्या म्हणणार, ‘जरा गाडीची किल्ली द्या  की, कोपऱ्यावर जाऊन पाव घेऊन आलोच.’ हे गिऱ्हाइक म्हणजे अमल्याचाच कोणी मित्र असणार. पाव,  फरसाण,  कांदा,   चहा पावडर, दूध  अशा याच्या फेऱ्या चालू. अमल्याला गाड्यांचा तोटा  नाही. सगळ्या जगाशी याची मैत्री. तशी ती माझ्याशीही झाली.  का झाली, का टिकली, हे आता फारसं आठवतही नाही.   
मी  कुठेही परगावी  जाणार असलो, मग ते  भाषणाला  असो वा  ऑपरेशनला, बरोबर अमल्या हवाच. रोज संध्याकाळी निवांत कॉफी प्यायला सोबत अमल्या हवाच. नवीन हॉटेल ट्राय करायला किंवा नुसत्याच चकाट्या पिटायला बरोबर अमल्या हवाच.
तो माझ्यापेक्षा वयानी खूप लहान आहे.   मी पदव्युत्तर पदवी प्राप्त आणि काय काय; हा दहावी नापास. लक्ष्मी आणि सरस्वतीचा माझ्यावर वरदहस्त तर  या सवतींनी अमल्याला सावत्रपणाची वागणूक दिलेली. दोघीही  अमल्याघरी रिक्तहस्ते पोहोचलेल्या. मी दिवसरात्र दवाखान्यात. हा आठच्या ठोक्याला उठणार आणी कसंबसं नऊला हॉटेल उघडणार.  जेमतेम दोन तीन  तासात ह्याची मिसळ संपणार मग ‘मिसळ  संपली’ अशी पाटी, हार घालून लावणार आणि दुकानाच्या फळ्या लावून आत  अमल्या डाराडूर. 
अमल्या म्हणजे भारी काम. हॉटेलचं  नाव ‘मिसळ सम्राट’, त्यामुळे अमल्या अर्थात प्रिन्स. त्यातून पूर्वी कधीतरी घराण्यात सरदारकी होती म्हणे. त्यामुळे रक्तात सळसळ फार.   पण प्रिन्स साहेबांच्या हॉटेलात प्रिन्सच मालक, प्रिन्सच पोऱ्या, प्रिन्सच वेटर आणि प्रिन्सच स्वयंपाकी. गिऱ्हाइक आलं की टेबल पुसत बनियन-बरम्युडाधारी, प्रिन्स विचारणार,
‘काय पाहिजे साहेब?’
‘काय काय आहे?’
हा प्रश्न गैरलागू आहे, हे नेहमीच्या गिऱ्हाईकांना माहीत आहे. पण साहेब नवीन.
हा, ‘आजचे ताजे पदार्थ’ लिहिलेल्या गंजक्या बोर्डाकडे  बोट दाखवणार. आपणच उत्तर देणं, अमल्याच्या खानदानी शिष्टाचारात बसत नाही. शिवाय मिसळीच्या तर्रीचा घमघमाट आसमंतात भरून  असताना, असला प्रश्नच बावळट आहे, असं अमल्याचं ठाम मत आहे.  बोर्डावर  चहा, कॉफीपासून सुरु होणारी यादी, शेव, चिवडा, फरसाण,  मिसळ, ब. वडा च., ब. वडा सां., मे. वडा च., मे. वडा सां., सा. वडा च.,  अशी वळणे घेत घेत  पेढे, बुं. लाडू, बे. लाडू, र. लाडू करत  डिं.  लाडूला संपणार. हॉटेल, त्याची अवस्था; अमल्या, त्याची अवस्था;  काउंटरवरच्या बरण्यातील अनुपस्थित पदार्थ आणि जे हजर असतील त्यांची अवस्था बघता गिऱ्हाइक अर्थात मिसळच निवडणार. माझ्यासारखा चौकस बुद्धीचा कुणी विचारणार,
‘अमल्या, फक्त मिसळ सोडता तुझ्याकडे जर काही नाहीच्चे तर  एवढी लांबलचक पाटी कशाला?’
अमल्याच्या थिअरीप्रमाणे, हॉटेल आणि पाटी दोन्ही वडीलोपार्जित आहे. त्यामुळे त्यात बदल अशक्य.  शिवाय जरी फक्त मिसळच मिळत असली तरी गिऱ्हाइकाला इतके सारे पदार्थ ‘न निवडण्याचे सुख’ मिळत असतं. आपण आपल्याला जे हवे ते  खाल्ले, हा भाव महत्वाचा. जोपर्यंत तुम्ही मिसळीशिवाय दुसरे काही मागत नाही तोपर्यंत तुम्हाला निवडीचे भरपूर स्वातंत्र्य आहे! हेन्री फोर्ड तरी दुसरं काय म्हणाला होता म्हणा? ‘जोपर्यन्त गिऱ्हाइकाला काळी  गाडी हवी आहे तोपर्यंत  त्याने कोणताही रंग निवडावा.’
आमल्याच्या हॉटेलात सतत एकपात्री प्रयोग चालू आसतो. खणखणीत आवाजात अमल्या विचारणार,
‘काय पाहिजे साहेब?’
मग साहेब म्हणणार, ‘दोन मिसळ’.   
मग हा आत बघत ओरडणार, ‘ए दोन मिसळ भर  सायबांना, कांदा बारीक, तर्री अलग, लिंबू दोन फाकया दे  रे, आणि सायबांना पाव साईडचा देऊ नको.’
मग स्वतःच पार्टिशनआड जाऊन दोन मिसळ भरणार, कांदा  बारीक टाकणार, तर्री वेगळी घेणार, लिंबू दोन फाकया आणि पाव घेणार आणि सायबापुढे ठेवणार. इतक्यात आधीच्या गिऱ्हाइकाचं बिल घ्यायची वेळ झालेली असणार. मग तिथूनच अमल्या ओरडणार, ‘दोन आदमी, पंच्याहत्तर घे रे, त्यांच्या पिच्छू तीन आदमी, एकशे तेवीस घ्यायचे.’ मग स्वतःच जाऊन पैसे घेऊन सायबाकडे गोड हसत, ‘काय साहेब, आवडली ना मिसळ?’, अशी सलगी साधत अमल्या एकशे तेवीसवाल्यांकडे वळणार.
आपली पसंद इतकी ओळखून असणारा टपरीवाला बघून सायबांना भरून  येतं. त्यांना  वाटतं की आपली ही खास खातीरदारी आहे. पण अमल्याला ओळखून असणाऱ्या आम्हां  मित्रांना यातली मेख ठाऊक आहे. मुळात अमल्याकडे कांदा बारीकच चिरलेला असतो, तर्री अलगच दिली जाते, तो तिखट जाळ  रस्सा असा काही भाजतो की  दोन फाकया लिंबू तरी लागतेच लागते.  आणि पावाचे म्हणाल तर  साइडचे पाव अमल्यांनी आधीच बाजूला ठेवलेले असतात, ब्रम्हयोगिनीला   द्यायला. ब्रम्हयोगिनी ही अमल्याची कुत्री आहे. कोणी कितीही  हाड्  केलं तरी ही उलटून भू सुद्धा करत नाही. सदैव मौन व्रत असल्याने अमल्याने तिचं नाव ब्रम्हयोगिनी ठेवलं आहे.  इतकी मितभाषी कुत्री मी तरी  कधीच पहिली नाहीये. ह्यानी ब्रम्हयोगिनीला पाळली बिळली नाहीये.  तिनीच स्वतःला पाळून घेतलं आहे. ती  आपली तिथे असते. अमल्या देईल ते मुकाट  खाते.  त्याच्याच पायाशी बसते. सतत तिच्या चेहऱ्यावर  ‘चिंता करिते विश्वाची’ असे भाव असतात. अमल्याच्या चेहऱ्यावर बरोब्बर विरुद्ध;  ‘विश्व चिंता करी माझी!’ 
हे मात्र अगदी खरं आहे. अमल्याला कशाशीच पडलेली नसते.  वयाचा फायदा घेत मी  अमल्याला आणखी पैसे मिळवण्याचे, हॉटेल सुधारण्याचे,  मार्ग सुचवत असतो. पदार्थ वाढव, जास्त वेळ हॉटेल उघड, बशा, चमचे नवीन आण, बेसिन बांधून घे, वेटर ठेव, अशा  कित्येक क्रांतिकारी कल्पना. पण इतक्या वर्षात अमल्यानी यातील एकही अंमलात आणलेली नाही.  आपलं  इतकं उत्तम चाललेलं असताना हा आपला सन्मित्र इतक्या वेडगळ आणि आत्मघातकी कल्पना का सुचवतोय? असा त्याचा रिस्पॉन्स असतो.
या गल्लीपासून त्या गल्लीपर्यंत   असा अमल्याचा वडीलोपार्जित वाडा, मागे आड, चिंचेचं झाड आणि रस्त्यापर्यंत जाणारी अडनेडी वाट. ह्या चिंचेखाली आमल्याच्या हॉटेलचं खोपट. रस्त्यावरून आत हॉटेल असल्याचा कसलाही सुगावा लागत नाही. रस्त्यापासून हॉटेलपर्यंत  येण्यासाठी दुस्तर मार्ग पार करायचा. गटारावरची लपकती  फळी, मग कुंपणाची   तुटलेली काटेरी तार, मग चिंचेच्या पाचोळयाचे ढीग आणि  मग निद्रिस्त ब्रम्हयोगिनी; इतके अडथळे पार केल्यावर हॉटेल लागतं.   अमल्याच्या हॉटेलला  दारेखिडक्या नाहीत. दोन फळ्या आहेत, पण त्याही नावालाच. अमल्या जागेवर आणि जागा असला तर  हॉटेल चालू.  तो जागेवर आणि/किंवा जागा नसला तर  हॉटेल बंद.  त्याच्या मैत्रीसारखेच त्याचे हॉटेलही मनमोकळे आणि तनमोकळेही आहे. कारण काउंटर, बाके, टेबलं  इत्यादीही  जेमतेमच आहे, नाही.
हॉटेलच्या बाकड्यावर बसताच मुख्य दृश्य म्हणजे कांद्याची चाळ आणि चिरलेला पुदिना. कांदा  हा आमल्याच्या मिसळीतील अविभाज्य भाग. कांद्याच्या भावाप्रमाणे कमीजास्त न होणारा. एकदा ‘कांदा  चार्ज अलग पडेल’ अशी पाटी लावली त्यानी, पण मग दुपारपर्यंत ओशाळवाणे होऊन स्वतःची स्वतःच काढून टाकली. कांदा आणि त्याबरोबर पुदिना. अमल्याच्या मिसळीला अजोड स्वाद देणारी ही जोडी.   
पण मिसळीला खरा रंग चढतो तो अमल्याच्या गप्पांनी. हा ‘सरदार’ त्यामुळे सगळ्या गप्पा ऐतिहासिक भाषेत. ह्याच्या हॉटेलात ‘मावळे’ जमतात, हा पाव आणायला ‘कूच’ करतो, ‘तलवारीने’ कांद्याची ‘खांडोळी’ होते, मिसळ ‘तबकातून’ पुढ्यात येते आणि ‘अग्निवेदी’वर रस्सा उकळत असतो. पण      ह्यापेक्षा जास्त रंग चढतो तो अमल्याच्या आणि  त्याच्या बायकोच्या वादावादीनी. अमल्या कडक हिंदुत्वनिष्ठ, कट्टर शिवसैनिक आणि बायको कट्टर भाजपवासी. बॉर्न इन रा.स्व.सं.  अँड ब्रॉट अप इन भाजप म्हणाना. त्यामुळे राजकारणातील हेलकाव्यानुसार यांची संसारनौका हेलकावे खाणार. तिकडे सेनेत आणि कमळाबाईत धुसफूस सुरू  झाली की इकडे अमल्याच्या हॉटेलमध्ये भांड्यांचे आवाज येतात. तिकडे दिल्लीश्वर ‘मातोश्री’च्या पायऱ्या चढले की इकडे अमल्याला, सासऱ्याचा इन्सल्ट केल्याचा प्लेटोनिक आनंद मिळतो. कधी ‘सामना’तील टोकदार अग्रलेख कमळाबाईंच्या जिव्हारी लागतो, मग त्यादिवशी अमल्याच्या हातात नवटाक दारुसाठीसुद्धा पैसे पडणं मुश्किल. कोणत्याही फुटकळ निवडणुकीत सेनेचा विजय झाला की अमल्या रातोरात गलमिश्या फुटल्यासारखा फुरफुरू लागतो आणि पराजय झाला की खांदे पाडून सपासप गनीम कापावा तसा कांदे कापतो. तिकडे  युती तुटली की इकडेही अबोला असतो आणि तिकडे  युतीची घोषणा झाली की इकडेही दिलजमाई होते. त्याला मुलगा झाला, तोसुद्धा युतीच्या काळात. त्याचं  नावही जहाल हिंदुत्ववादी आहे, रुद्र. हे कार्टंही अमल्याइतकंच लाघवी आहे.  पण इतकं  खोडसाळ आहे की   याचं नाव रौद्रभीषण असायला हवं होतं.  पण गोंडस आहे पोरगं. बापावर गेलंय.
अमल्याही  देखणा आहे. उंच, गोरापान, घारे डोळे, कानात भिकबाळी, गालावर चक्क  खळी पडते त्याच्या. हे वर्णन तो  दारूत अडकायच्या पूर्वीचं आहे.  अमल्याला दोन व्यसनं. दारू आणि ढोल. पैकी ढोल हे अमल्याचं पहिलं  व्यसन.  आसपासच्या यात्रा, जत्रा उत्सव असं काहीही असलं तरी ढोल पथकात अमल्या हवाच.
रिंगणात मधोमध उभा राहून तालात ढोल वाजवत तो इतरांना खाणाखुणा करत तासंतास वाजवू शकतो. दोन तीन ‘रुमाली’ (राऊंड) तर  तो सहज पिटतो. सगळं वादन झाल्यावर ‘झाडणी’ (सर्व तालचक्रांची दहा मिनिटात वाजवलेली समरी) वाजवायचा मानही अमल्याचा.   पण काहीही म्हणा अमल्याला रंगात येऊन ढोल वाजवताना पहाणं हा एक सुंदर अनुभव आहे. फेटा, गळ्यात उपरणे, गुलालात रंगलेला सुरवार झब्बा, घामाने निथळलेला चेहरा, मान  वर  करून, तो प्रचंड ढोल पेलत त्यानी एकदा ठेका धरला की ब्रम्हानंदी टाळी लागलेली असते.  अर्थात या शक्तीमागे गुटख्याची गोळी आणि तीर्थोदकाची पुण्याई असते हे काय वेगळं सांगायला हवं?
अमल्या आणि त्याच्या दारूबद्दल मी काय सांगू? आधी माणूस दारू संपवतो, मग दारू माणसाला संपवते; दुर्दैवाचे दशावतार; संसाराची धूळधाण; आयुष्याची राखरांगोळी असे सगळे वाक्प्रचार वापरुन तुम्हीच मनातल्या मनात चित्र रंगवा. एक तर  हे चित्र सर्वपरिचित आहे आणि अमल्याबद्दल हे असं लिहिणंही मला क्लेशदायक आहे. 
मी  डॉक्टर, त्यातून जवळचा  मित्र. त्यामुळे ह्यातून मार्ग काढायला मीच. पण ह्यातून मार्ग काढणे किती अवघड आहे ते मला माहीतच होते. हरतऱ्हेने प्रयत्न  करूनही काही फरक पडेना. दारू प्यायल्याने त्रास.  मग त्याची औषधे.  दारू सोडणे. मग दारू  सोडल्याने त्रास.  मग त्याची औषधे. मग तो त्रास सोसवत नाही म्हणून पुनः दारू; असं दुष्टचक्र चालू झाले. अमल्याची सारी रयाच गेली. आधीच यथातथा असलेली परिस्थिति रसातळाला गेली. त्याची परिस्थिती  मला माहीत होतीच. मग मिसळीचे पैसे मी त्याच्या हातात ठेवायचो नाही. पाकीटच त्याच्या हातात द्यायचो. तो पैसे काढून घ्यायचा पाकीट परत करायचा. त्यांनी किती घेतले ह्याचा  मी हिशोब ठेवला नाही, त्यांनीही नाही. हा सगळा मैत्रीचा मामला होता.  
पण दारुनी त्याला पूर्ण पोखरला. मग कमळाबाई पदर खोचून घट्ट उभ्या राहील्या. हॉटेल चालूच राहील हे पाहिलं. नवऱ्याची खंगणारी तब्बेत सावरली. पण हरप्रकारे प्रयत्न करूनही हे नतद्रष्ट व्यसन काही सुटेना. एकेदिवशी आम्ही सगळ्यांनी मिळून कट रचला. त्याला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायचा चंग बांधला. गाडी आली.  पण अमल्या बधेना.  गाडीत चढेना.  कसंतरी दादापूता  करून, बरंच इमोशनल ब्लॅकमेलिंग करून, त्याला  मी गाडीत घातला. मैत्रीच्या इतक्या शपथा, बॉलीवूडच्या अख्या इतिहासात कोणी घातल्या नसतील.  पण गाडी स्टार्ट नाही झाली, तोच तो म्हणतो कसा, ‘माझे दोन शर्ट वरच्या कपाटात राहिलेत, ते घ्यायचेत मला.’  
सारे गप्प. साऱ्या कुटुंबावर तात्काळ शोककळा पसरली. इतका जमवून आणलेला बेत  फिस्कटणार असं सगळ्यांना वाटायला लागलं. एकदा  गेलेला अमल्या परत कसला येतोय? तो जाणार तो  वरच्या खोलीतून, पत्र्यावरून, पलीकडच्या गल्लीतून,   थेट गुत्त्यावर. हे नाटक तर  आधी कितीतरी वेळा  घडलं होतं. सगळे माझ्याकडे बघू लागले. मला काय वाटलं कोणास ठाऊक, पण त्याला मी म्हटलं,  ‘जा! आण, माझा  विश्वास आहे तुझ्यावर.’ अमल्या गेला. पण खरोखरच शर्ट घेऊन परत आला. रीतसर केंद्रात दाखल झाला. परत  आला तो सुधारून आला. अल्कोहोलिक अॅनॉनिमसच्या स्थानिक मीटिंगला  जाऊ लागला. दारूपासून लांब राहू लागला. श्रावणाच्या कहाणीत शेवटी जसं सगळं सुफळ संपूर्ण होतं ना, तसं झालं त्याचं.
आज मिसळीवर ताव मारून झाल्यावर,  मी पाकीट त्याच्याकडे दिलं. त्यांनी ते उघडलं. एकदा त्याच्या पैशाच्या ड्रॅावरवरुन  ओवाळलं.  ड्रॅावरमधल्या बचाकभर नोटा घेऊन माझ्या पाकिटात कोंबून मला परत दिलं. मग अचानक गळ्यात पडून तो रडायला लागला. उमाळ्याचा पहिला  भर  ओसरल्यावर तो म्हणाला, ‘डॉक्टर, आज माझा ‘बड्डे’ आहे.’
‘आज कसा  रे?’
‘आज मी व्यसनमुक्त  होऊन एक वर्ष झालं. हा माझ्या पुनर्जन्मच की, तुमच्यामुळे मिळालेला. त्यादिवशी मी शर्ट घेऊन परत येईन असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण तुम्ही म्हणालात ‘विश्वास आहे तुझ्यावर’; बस्स डॉक्टर तुमच्या त्या एका शब्दाखातर मी परत आलो आणि शेवटी त्या व्यसनातून सुटलो.’
माझ्या छोटा मित्र आज कितीतरी मोठा झाला होता.