संयत तपस्वी
|| डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
कामशास्त्रासारखा स्फोटक विषय अतिशय संयतपणे हाताळत विपुल लेखनातून या विषयाचे विविध पैलू मराठीजनांसमोर आणणारे डॉ. विठ्ठल प्रभू यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या कार्याचे नेमकेपण अधोरेखित करणारा लेख..
डॉ. विठ्ठल प्रभू यांचे नुकतेच निधन झाले. तब्बल नऊ दशकांचे निरामय आरोग्य त्यांना लाभले. ‘निरामय कामजीवन’चे लेखक हीच त्यांची ओळख. तशी पस्तीसएक पुस्तके त्यांच्या नावे जमा आहेत, पण हे पुस्तक खास. ‘निरामय कामजीवन’ची पहिली आवृत्ती आली तब्बल ३७ वर्षांपूर्वी- १९८२ च्या पाडव्याला. माझ्या हातात आज ३४ वी आवृत्ती आहे आणि आजही हे पुस्तक तितकेच प्रभावी आणि उपयुक्त आहे. आवृत्तीगणिक डॉ. प्रभूंनी यात प्रयत्नपूर्वक आणि अभ्यासपूर्वक भर घातली आहे. त्यामुळेच आजही हे पुस्तक ताजे, टवटवीत आहे. इतक्या वर्षांत कितीतरी बदल झाले. एड्ससारखे आजार आले, स्त्रीवादी काम-दृष्टिकोन आला, नवीनवी गर्भनिरोधक साधने आली, व्हायग्रासारखे बहुचर्चित औषध आले, पिवळ्या कव्हरातले पोर्न हातातल्या मोबाइलमध्ये अवतरले आणि या साऱ्याबरोबर नवे गैरसमज, नव्या अंधश्रद्धा आणि नवे शोषकही आले. नवे आले, पण जुने नामशेष नाही झाले. डॉ. प्रभूंनी हे सारे यथायोग्य स्वरूपात आणि शब्दांत त्यांच्या पुस्तकात आणले. अतिशय अनुरूप आणि सभ्य भाषा ही त्यांच्या लिखाणाची खासियत. कितीतरी शब्दांना समर्पक आणि सहज रुळलेले मराठी शब्द नाहीत. पण डॉ. प्रभू लिहीत राहिले. शब्द आणि पिढय़ा घडवीत राहिले.
या पुस्तकाला लाभलेली डॉ. भा. नी. पुरंदरेंची पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना अजूनही प्रस्तुत आहे. यात ‘कामजीवन’ हा विषय शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमाचा भाग असावा अशी आजही अमान्य असलेली मागणी आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार लाभला. कामविज्ञानाला राजमान्यता मिळाली, पण ते तेवढेच. इतकी वर्ष झाली, तरीही ही मागणी कृतीत काही उतरलेली नाही. या विषयावर अहवाल देणाऱ्या सरकारी समितीत डॉ. प्रभू होते. सकारात्मक अहवालही दिला गेला, पण महाराष्ट्राच्या विधानसभेने तो एकमताने नाकारला!
डॉ. प्रभूंनी लैंगिकता शिक्षणाचा सतत आग्रह धरला आणि कृतीतून तो दाखवूनही दिला. त्यांची पुस्तके, त्यांचे रेडिओवरील कार्यक्रम याची साक्ष आहेत. शेवटी कामजीवन म्हणजे निव्वळ संभोग नाही. लैंगिकता म्हणजे निव्वळ मैथुन नाही. लैंगिकता तर भाषा, वाचा, व्यवहार आणि जीवनदृष्टी व्यापून असते. हे लक्षात घेऊन डॉ. प्रभूंनी तसे लिखाण केले. लैंगिक शिक्षण म्हणजे ‘हे डॉक्टर आता तरुण मुला-मुलींना मानवी संभोगाची सचित्र माहिती सांगणार आणि मोठाच गहजब उडणार’ अशी सांभाळ-काळजी काळजात बाळगणाऱ्या समाजाच्या सगळ्या शंकांना उत्तरे दिली. लोक विचारत, ‘प्राण्यांना कोण शिकवते?’ डॉ. प्रभू सांगत, ‘प्राण्यांची लैंगिकता ही सीझनने बद्ध असते, माणसाची लैंगिकता ही रीझनने, कायद्याने, नीतीने, रीतीने.. त्यामुळे शिक्षण हवेच.’ लोक म्हणत, ‘पाण्यात पडले की पोहायला येतेच की?’ डॉ. प्रभू म्हणत, ‘बरोबर, पण गटांगळ्या खात शिकायचे की तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली- निवड तुमची.’ दबक्या आवाजात प्रश्न येई, ‘हे ऐकून मुलांना आमच्याबद्दल काय वाटेल?’ मिश्कीलपणे उत्तर येई, ‘काय वाटायचंय? निसर्गाचा एक नियम म्हणून हे शिकवायचे आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला मुले तुम्हाला जबाबदार धरतात का?’ बावरलेला कुणी विचारी, ‘हे असले काही शिकवले, की मुले ते सगळे प्रयोग करून बघतील.. मग?’ शांत, विचारी उत्तर येई, ‘या वयात उत्सुकता असतेच आणि प्रयोग चालतातच. आपल्या महाकाव्यातही हे आहेच. उलट शिक्षणाने जबाबदार वर्तन वाढीस लागते. प्रयोगशीलतेला, फाजील कुतूहलाला वळण लागते. शिक्षणाने तरुण बिघडतील असे म्हणणे म्हणजे भाषा शिकवली तर मुले फक्त शिव्याच शिकतील असे म्हणण्यासारखे आहे. उलट भाषेवर छान प्रभुत्व असेल तर एकही शिवी न देता तोच परिणाम साधता येतो!’ या आणि अशा शंकांना डॉ. प्रभू चिकाटीने उत्तरे देत राहिले.
या विषयावर काही माहितीपर दृकश्राव्य मुद्रणं करावीत असा विचार होता. मार्गदर्शनासाठी मी त्यांच्याकडे गेलो. सहस्राहूनही अधिक पौर्णिमा पाहिलेला हा तपस्वी खुल्या दिलाने माझे स्वागत करता झाला. आपल्या ज्ञानाचे आणि संदर्भग्रंथांचे भांडार खुले केले त्यांनी. गेले काही महिने अशी यूटय़ूब वाहिनी सुरू आहे आणि आजमितीस त्यास पाच कोटी ऐंशी लाखांवर हिट्स मिळाले आहेत. पण हे सांगताना अभिमानाहूनही खेद अधिक वाटतो. कारण अशा शास्त्रीय माहितीची किती गरज आहे आणि ती पोहोचवण्यात आम्ही डॉक्टर किती कमी पडतो, याची विषण्ण करणारी जाणीव होते मला.
काही वृत्तपत्रांच्या रविवार आवृत्त्या अशी माहिती मिरवत असतात. पण या आडून स्वत:चीच जाहिरात जास्त केलेली असते. शास्त्रीय माहिती दुय्यम आणि आत्मगौरव जास्त अशी स्थिती असते. डॉ. प्रभूंनी असला प्रकार टाळला. अत्यंत सुसंस्कृतपणे, संयतपणे त्यांनी
र. धों. कर्वेची पताका पुढे नेली. प्रचंड वाचन, अभ्यास, काव्य-नाटय़-विनोदाची उत्तम जाण असणारा हा मर्मज्ञ रसिक एक आनंदयात्री होता. जयवंत दळवी, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे अशा भाषाप्रभूंशी त्यांचा स्नेह होता. त्यामुळेच की काय, कामशास्त्रासारखा स्फोटक विषय असूनही त्यांची लेखणी कधीही चळली नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांनी आपली लेखणी चालवली आणि अनेकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवले. याच भावनेतून ते ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’शी जोडले गेले. इथल्याच सहकाऱ्यांबरोबर त्यांनी पुढे ‘काऊन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अॅण्ड पेरेंटहुड (इंटरनॅशनल)’ ही संस्था सुरू केली. उत्सुक डॉक्टरांसाठी अभ्यासक्रम, परिषदा, नियतकालिक असे मोठे काम उभे केले. या त्यांच्या कामानिमित्त याच संस्थेने २००२ साली द गोल्डन लॅम्प पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. असे इतरही अनेक पुरस्कार त्यांच्या वाटय़ाला आले.
आजही किती तरी मुले, मुली, स्त्री, पुरुष काहीना काही आणि काहीच्या काही शंका घेऊन येतात. कामसमस्यांपैकी ८० टक्के समस्यांना माहितीचा डोस पुरतो. औषध लागतच नाही. पण लिंगाचा आकार वाढवण्यासाठी, ‘सेक्सची पॉवर’ वाढवण्यासाठी, पूर्वायुष्यातील झालेली चूक सुधारण्यासाठी, हस्तमैथुनाचे दुष्परिणाम घालवण्यासाठी ‘शर्तीली दवा’ विकणारे ठायी ठायी ठाण मांडून बसले आहेत. मेंदूत अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीची जळमटे असलेली जनता यांच्या जाळ्यात अलगद सापडते आहे आणि अक्षरश: नागवली जाते आहे. यात दोष खरे तर तज्ज्ञ डॉक्टरांचा आहे. आम्ही खुलेपणाने बोलत नाही, योग्य आणि शास्त्रीय माहिती पोहोचवत नाही, म्हणून या लिंगवैदूंचे फावते. ही एक मोठीच गरज डॉ. प्रभूंनी त्यांच्यापरीने भरून काढली.
कामसमस्या हा आम्हा डॉक्टरांच्या दृष्टीने दुय्यम विषय. कॉलेजमध्ये याची ओळख शून्य टक्के. बलात्कारपीडिता कशी तपासावी; याशिवाय कोणतीही कामसमस्या, अगदी स्त्रीआरोग्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातही अंतर्भूत नव्हती आणि आजही नाही. एकलव्य होऊन अभ्यास करणे हाच उपाय. असले रुग्ण येतात, पण असतात अगदी गांगरून गेलेले. मुळात कोणाकडे जावे या दुविधेत पडलेले. स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, गुप्तरोगतज्ज्ञ की सार्वजनिक मुताऱ्यांत जाहिराती लावणारे स्वयंघोषित लिंगवैदू? शिवाय येणारे रुग्ण चाचरत बोलणार, नुसतेच घुटमळणार, भलतेच काहीतरी सांगणार. काय बोलावे, कोणत्या शब्दांत आपले गाऱ्हाणे मांडावे, हीच त्यांची एक मोठी समस्या. कोणते शब्द अश्लील समजले जातील आणि कोणते शिष्टसंमत, हा मनात गोंधळ. संकोच जितका रुग्णाला वाटतो तितकाच डॉक्टरांनाही वाटत असतो. पुरेसा वेळ तर नसतोच. मग डॉ. प्रभूंचे ‘निरामय कामजीवन’ हे पुस्तक मी त्यांना वाचायला द्यायला लागलो. दोघांनीही संपूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय माझ्याकडे यायचं नाही, असे सांगायला लागलो आणि हे पुस्तक रामबाण ठरू लागले. सुमारे ८० टक्के लोकांना पुन्हा माझ्याकडे येण्याची गरजच पडायची नाही. जे यायचे त्यांच्या मनातली भीती संपलेली असायची. समस्या मांडायला नेमके पारिभाषिक शब्द त्यांना पुस्तक वाचून मिळालेले असायचे. मलाही सारे काही ग-म-भ-न-पासून सुरू करावे लागायचे नाही. काही किमान शास्त्रीय पूर्वज्ञान बोलताना गृहीत धरता यायचे. हे पुस्तक केवळ पुस्तक नसून ‘औषधी पुस्तक’ आहे हे माझ्या लक्षात आले! पुढे काही निमित्ताने डॉ. प्रभूंचे माझ्या दवाखान्यातही येणे झाले. मी चक्क त्यांना दारातच साष्टांग नमस्कार घातला. विठ्ठलाचे पायी माथा टेकल्याचे समाधान लाभले! एखाद्या नव्या औषधाच्या शोधाइतकीच त्यांची कामगिरी वंदनीय होती.
मात्र, आजही त्यांच्याप्रति माझी आणि समाजाची आदरभावना पूर्णत: व्यक्त झालेली नाही असेच वाटते. आजही कामजीवन निरामय नाही, आजही लैंगिकता शिक्षणाची हेळसांड चालूच आहे, आजही आदरांजली वाहताना ओंजळ रिकामीच आहे याची अस्वस्थ जाणीव राहीलच राहील.
(लेखक स्त्रीआरोग्य आणि प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ आहेत.)
shantanusabhyankar@hotmail.com