Thursday, 20 December 2018

जोडीदाराची विवेकी निवड आणि लैंगिकता


जोडीदाराची विवेकी निवड आणि लैंगिकता.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. (सातारा)

अंनिसच्या उपक्रमानिमित्त खास टिपण.


जोडीदाराची विवेकी निवड करताना इतर सर्व बाबींप्रमाणे शारीरिक संबंध आणि त्या बद्दलची एकमेकांची मते, कल, आवड-निवड हे माहित असेल तर विवेक राबवणं सोपं जाईल नाही का? पण हे मुळी माहितंच नसतं आणि माहीत होणंही शक्य नसतं. अशी सत्य माहिती हवी असेल तर एकच मार्ग आहे लग्नाआधीच काही काळ प्रत्यक्ष प्रचीती घेणे! अर्थात हा मार्ग मान्य होणे शक्य नाही. ओशो रजनीश यांनी अशी ‘ट्रायल’ विवाहाची कल्पना मांडली आहे, असो. अव्यवहार्य कल्पनांची इतकी चर्चा पुरे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सेक्ससाठी दोन मांड्यांमधील  अवयव हवेतच पण काम क्रीडा ही दोन मांड्यामधल्या अवयवांच्या जोरावर केली जाणारी क्रिया नसून, दोन कानांच्यामधल्या अवयव तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे आपला मेंदू. मेंदू हा सगळ्यात महत्वाचा काम अवयव आहे. तुमचा तुमच्या लैंगिकतेकडे तुमच्या जोडीदाराच्या लैंगिकतेकडे पहाण्याचा दृष्टीकोन महत्वाचा.
स्त्री पुरुषांच्या कामभावनेमध्ये अनेक फरक आहेत पण कळीचा फरक हा की, स्त्री ही प्रत्यक्ष संभोगापेक्षा  प्रेम भावनेला अधिक भुलते तर पुरुषाचे सारे लक्ष संभोगावर केंद्रित असते. ‘नाही प्रेमभावना तर नाही संभोग’ हे जणू स्त्रीचे ब्रीदवाक्य असते तर, ‘नाही संभोग तर नाही प्रेमभावना’, हे पुरुषाचे.
प्रथम रात्री संभोग झालाच पाहिजे आणि तो  आनंददायीही असलाच पाहिजे असा कित्येकांचा गैराग्रह असतो, नव्हे तसे आपोआपच होत असतं असाच गैरसमज असतो. असं काही नसतं. पहिली रात्र ही सिनेमा, नाटकात, काव्यात वर्णन करतात तशी गुलाबी गुलाबी असतेच असं नाही. किंबहुना बहुदा नसतेच. लग्नसमारंभाचा शारीरिक मानसिक ताण आणि थकवा, नव्यानेच झालेली ओळख आणि ‘देख’, एखाद्या पूर्णतः परक्या व्यक्तीसमोर विवस्त्र होण्याचा संकोच, शरीराबद्दल घोर अज्ञान आणि गैरसमज, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांचे सद्हेतूने दिलेले पण निव्वळ स्व-ज्ञानाधारित सल्ले, असे सगळे घटक एकत्र आल्यावर दुसरे काय होणार? खरंतर लग्नाआधीच मानवी शरीर, शरीरसंबंध आणि पुनरुत्पादनाची क्रिया याबद्दल किमान  माहिती असणे, ती मिळवणे गरजेचे आहे. आपल्याकडे अशी माहिती फक्त पोर्न व्हिडीओ बघून प्राप्त झालेली असते. बॉलीवूडचा सिनेमा बघून, त्यानुसार स्वतःचा संसार बेतण्याइतकंच हे मूर्खपणाचं आहे.
शरीरसंबंध जमणे आणि त्याचा आनंद उपभोगता येणं हे एक कला आहे, एक कौशल्य आहे आणि इतर कलाकौशल्यांसारखेच हे ही शिकावे लागते. थोडा वेळ लागतो, चुका  होतात. पहिल्याच प्रयत्नात सगळं जमेलच असे नाही, जमले तरी ते उत्तम आणि अत्युत्कृष्ट असेलच असे नाही. तेंव्हा असं जरी झाले तरी खट्टू होण्याचं कारण नाही. कामक्रीडा हा एक खेळ आहे. तुम्ही नव्याने टेबलटेनिस खेळायला गेलात तर पहिल्याच दिवशी तुम्हाला कदाचित सर्व्हिससुद्धा जमणार नाही.
एखादी भाषा शिकावी तसं हे. आधी मूळाक्षरं, मग जोडाक्षर विरहीत शब्द, मग अवघड शब्द, मग वाक्य... त्या भाषेत खंडकाव्य लिहायचं म्हणाल तर बराच पल्ला गाठावा लागतो. तसंच हे आहे. पहिल्याच रात्री, पहिल्याच प्रयत्नात, लिंगाचा योनीमार्गात प्रवेश झालाच पाहिजे; अमुक इतका वेळ संभोग चाललाच पाहिजे अशा पूर्वनिश्चित निकषांनुसार आपण वागायला बघतो. स्वतःच ठरवलेल्या अनावश्यक मापदंडावर स्वतःला जोखत बसतो. मग काय गोची झालीच म्हणून समजा. संभोग म्हणजे काही एव्हरेस्टवर चढाई नाही की तुम्ही शिखरावर झेंडा गाडलात तरच जिंकलात, अन्यथा आख्खी मोहीम फुका!  आपणच ठरवलेली उदिष्टे साध्य करता आली नाहीत की विषाद दाटून येतो. नैराश्य, चिडचिड, भांडण हे ठरलेले. उलट असा काही गोल, काही एंडपॉईंट ठरवणेच मुळी गैर आहे. नव्यानं रुजू पहाणारं हे नातं, त्याला आपल्या गतीनी वाढू द्यावं, बहरू द्यावं. कोणतीही खास अपेक्षा न ठेवता, समान पातळीवर येऊन एकमेकांच्या शरीराचा आनंद देणे-घेणे शिकायचे आहे, असा विद्यार्थी-भाव जागृत ठेवावा. बाकी आपोआप जमून जाते. त्यातून नाहीच जमले तर मग वैद्यकीय सल्ला घ्यावा. सार्वजनिक मुताऱ्यातून मिरवणाऱ्या, जाहिरातबाज, लिंगवैदूंची मदत मुळीच घेऊ नये.
सेक्सचा स्टॅमिना वाढवण्यासाठी काय करता येईल याही शोधात बरीच मंडळी असतात. कामसौख्य जास्तीजास्त वेळ मिळावं अशी अपेक्षा काही गैर नाही. ताकद वाढवण्यासाठीची बक्कळ औषधे बाजारात आहेत, त्यांचे कर्ते आणि विक्रेते, बक्कळ पैसे मिळवून आहेत;  पण त्यातील एकही औषध सिद्ध झालेले नाही. शक्तीची आणि सुखाची अशी गुटिका मुळी नाहीच्चे; जरी त्या बाटल्यांवर अबलख घोड्याचे चित्र छापले असले तरी. तेंव्हा स्टॅमिना वाढवण्यासाठी एरवी जे आपण करू तेच करणे गरजेचे आहे. निर्व्यसनी असणे, नियमित व्यायाम करणे, योग्य आहार, उल्हसित चित्तवृत्ती हेच कामसुखाचे रहस्य आहे. पोर्नोग्रोफिक फिल्ममध्ये अर्धा-अर्धा तास चालत असले तरी प्रत्यक्षात मानवी संबंध अगदी अल्प काळ टिकतात. ‘लवकर वीर्यपतन होतं’ ही तक्रार ग्राह्य धरायची तर ‘लवकर’ची शास्त्रीय व्याख्या म्हणजे एक मिनिटाच्याही आत वीर्यपतन होणे!! याहून अधिक काळ संभोग समाधी टिकत असेल तर तो संभोग दैवी नसला तरी मानवी खचितच आहे. उगीच खंतावण्यात अर्थ नाही.
सेक्सच्या बाबतीत मुलांनीच पुढाकार घ्यावा, सर्व काही ‘करावं’ अशी अपेक्षा असते. मुळात मुलांत कामेच्छा जास्त असते आणि मुलींचा निव्वळ सहनशील सहभाग असतो, अशीही प्रचलित समजून आहे. हे ही सत्य नव्हे. पुरुषप्रधान व्यवस्थेत या बाबतीत पुढाकार घेणारी, मोकळेपणाने इच्छा, अनिच्छा, व्यक्त करणारी मुलगी ही फारच फॉरवर्ड, ज्यादा, किंवा चवचाल वगैरेही समजली जाते. लिंग संबंधात सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे संवादाचा अभाव. आपल्याला काय हवंहवंसं वाटतं, काय नकोसं वाटतं हे पती पत्नींनी एकमेकाला अगदी मोकळेपणाने आणि स्पष्टपणे सांगायला हवं. कामक्रीडेदरम्यान एरवी नकोसे वाटणारे स्पर्श, दर्प, वेदना हवीहवीशी वाटू लागते, सुखाची ठरू लागते. हे प्रत्येकाच्या बाबतीत, प्रत्येक वेळी  वैविध्यपूर्ण असते. हे जोडीदाराला ‘कळवणे’ म्हणूनच आवश्यक ठरते.
एखाद्या मुलीचे व मुलाचे पूर्वी शरीरसंबंध झाले होते अथवा  नाही हे समजण्याचा कोणताही खात्रीचा मार्ग नाही. त्या व्यक्तीचा शब्द आणि तुमचा विश्वास, बस्स एवढंच. जशी आर्थिक अथवा इतर व्यवहारात फसवणूक होऊ शकते तशी ती लैंगिक व्यवहारातही होऊ शकते. कोणी समलिंगी असूनही घरच्यांच्या दबावापोटी लग्न करतात आणि मग दोघांचीही आयुष्य उध्वस्त होतात. कोणी एकनिष्ठतेचा आव आणतात आणि हा केवळ आव असल्याचं उशिरा लक्षात येतं...किती प्रकार वर्णावेत? प्रेमविवाह असेल, पूर्व-परिचयातून लग्न ठरले असेल, तर हे प्रकार घडण्याची शक्यता कमी, पण शून्य नाहीच. यावर काही प्रतिबंधक उपायही नाही. ‘जोडीदाराची विवेकी निवड’सारख्या उपक्रमातून या प्रश्नांची चर्चा होते, या प्रश्नांची  जाणीव होते, एकमेकांची मते, स्वभाव ‘चहा-कांदेपोहे’ प्रकारापेक्षा जरा अधिक कळतात; त्यामुळे अशा सारखे उपक्रम निकडीचे ठरतात.
थोडक्यात काय, अशा प्रश्नासाठी औषधाची मात्रा शोधण्यापेक्षा माहितीची मात्रा लागू पडते. माहिती मिळण्याचे उत्तम स्रोत म्हणजे, डॉ. विठ्ठल प्रभू यांची पुस्तके. ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकाचा मी आवर्जून उल्लेख करीन. युट्यूबवर माझा चॅनेल आहे. युट्यूबवर जाऊन नुसतं ‘Shantanu Abhyankar  असं टाईप केलं की हा चॅनेल उघडेल. यात एकूणच लैंगिकतेविषयक ३०-३५ व्हिडीओ आहेत. त्यात मी वेळोवेळी भरही घालत असतो. प्रश्न विचारल्यास उत्तरही देत असतो. हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. शेअर करा. योग्य माहिती पोहोचवण्यास मदत करा. पाच महिन्यात याला पाच कोटीहून अधिक हिट्स मिळाले आहेत. हे मी अभिमानाने सांगत नाहीये. उलट या परिस्थितीने मला अस्वस्थ वाटतं. एकूणच आरोग्य व्यवस्थेकडून तरुणांच्या कुतूहलाची योग्य, शास्त्रीय उत्तरे देण्याची किती प्रचंड निकड आहे आणि त्याकडे किती प्रचंड दुर्लक्ष होतंय हेच या आकडेवारीतून स्पष्ट होतंय.





Monday, 17 December 2018

ऐकावं ते नवलच!


ऐकावे ते नवलच
डॉ. शंतनू अभ्यंकर

‘तान्ह्या बाळाला ऐकू येतं का हो?’
‘येतं की! नाही का जर्राsss मोठा आवाज झाला की ते दचकतं?’
हे उत्तर चुकीचे आहे. आणि ‘तान्ह्या बाळाला ऐकू येतं का हो?’ हा प्रश्न  भोंगळ आहे म्हणून उत्तर चुकीचे मिळाले आहे. आपण नेमका प्रश्न विचारला पाहिजे. तो असा की, सगळ्याच तान्ह्या बाळांना ऐकू येतं का? १००%? का जन्मजात श्रवणदोष असतो? असू शकतो?
उत्तर आहे, काहींना श्रवणदोष, जन्मजात बहिरेपणा, असू शकतो. सुमारे हजारेक बाळांत श्रवणदोषवाली आठदहा बाळं निघतात.  पण ही आठदहा म्हणजे कोणती हे निव्वळ बाळाकडे बघून ओळखता येत नाही. अनुवंशिक आजार, सी.एम.व्ही.  इन्फेक्शन, प्रसूती दरम्यान मूल गुदमरणे, तान्हेपणी तीव्र स्वरुपाची कावीळ, मेनिंजयटीस, कमी दिवसाची बाळे, आईने अनवधानाने घेतलेली काही औषधे, कान फुटणे, कानाला इजा... अशा कशाकशानी तान्हेपणीच बहिरेपणा उद्भवण्याची शक्यता जास्त.  पण यांना शक्यता जास्त म्हणजे बाकीचे यातून सुटले असे नाही. त्यांना बहिरेपणाची शक्यता कमी, पण शून्य नाही. त्यामुळे तपासणी सगळ्यांचीच व्हायला हवी. निव्वळ अति जोखमीच्या,  निवडक बाळांसाठी तपासणी करत बसलं, तर सुमारे ४०% जन्मजात कर्णबधीर मुलं या तपासणीला मुकतील. म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाची तपासणी करायलाच हवी.
का करायला हवी? कारण नाही केली तर जन्मजात बहिरेपणा लक्षात यायला दीड ते दोन वर्ष लागतात. आपलं छकुलं चांगलंच  आहे असा ठाम विश्वास असतो प्रत्येकाला. त्यात काहीतरी न्यून आहे असा विचारसुद्धा नकोसा वाटतो. त्यामुळे,
‘बाळ अजीबात दचकत नाहीये.’
‘कितीही मोठ्ठा आवाज झाला तरी झोप चाळवत नाही याची.’
अशी वाक्यं कानाआड केली जातात. ‘डॉक्टरला दाखवा’ असं सांगणारा व्हिलन ठरतो. अप्रिय आणि क्लेशदायक वास्तवाचा स्विकार नकोसा वाटत असतो. पण ही नकारघंटा आत्मघातकी ठरते. कारण एवढ्या दिवसात बाळाच्या मेंदूत ब्रोकाज एरिया म्हणून जो भाग असतो त्याची वाढ पूर्ण होते. ह्या एरियात आवाजाचा अर्थ लावला जातो, ऐकलेल्या आवाजाची  नक्कल करायची सवय इथे लागते. आपण बोलतो, भाषा शिकतो ते या भागामुळे. पण या भागावर जर आवाजच पोहोचला नाही तर ही क्षमता मुळी निर्माणच होऊ शकत नाही. मूल ऐकू शकत नाही सबब बोलूही शकत नाही. जन्मतः बधीर मुलं, ही मुकीही असतात ते यामुळेच.
एकदा वय वाढल्यावर, ब्रोकाज एरियाची वाढ पूर्ण झाल्यावर, मूक (बधीर) मुलाला बोलायला शिकवणे किती अवघड असते हे मी सांगायला हवं असं नाही. अशा मुलांच्या पालकांच्या  अनेक कथा तुमच्या वाचनात असतील. मूकम् करोति वाचालं, हे पंगुं लंघयते गिरीम् इतकच कठीण.
श्रवण नाही तर वाणी नाही, वाणी नाही तर भाषा नाही, भाषा नाही तर संभाषण नाही, संभाषण नाही तर सामाजिक विकास नाही आणि बौद्धिक विकासही नाही असं दुष्टचक्र चालू होतं. मुळात श्रवणदोष हे एक अदृश्य अपंगत्व आहे. त्यामुळे त्याचं गांभीर्य एरवीही आपल्या लक्षात येत नाही. कोणी पांगळा, थोटा, आंधळा दिसला तर आपोआपच सहानुभूतीचा, मदतीचा हात पुढे होतो. पण बहिरेपणा उघडपणे दिसत नसल्यामुळे पटकन सहानुभूती  किंवा मदत मिळत नाही. उलट अशी माणसं बरेचदा कुचेष्टेची धनी होतात, सिनेमा नाटकात विनोदाच्या जागा यांच्या! (खरंतर पांढऱ्या काठीसारखी काहीतरी सहज नजरेस येईल अशी खूण अशा व्यक्तींनी वापरली पाहिजे.)   
जन्मतः बहिरेपणासाठी तपासणी असते. जन्मतः तिसऱ्या दिवसाच्या आसपास करायची असते. ओएई तिचं नाव. ओएई म्हणजे ओटो अकॉस्टिक एमिशन टेस्ट. अक्षरशः दहा मिनिटाचे काम. इथे इयरफोन सारखी एक बारकी गुंडी बाळाच्या कानाशी लावली जाते. यातून कानात काही ध्वनीलहरी सोडल्या जातात. परिणामी निर्माण होणाऱ्या अंतरकर्णातील विद्युतलहरी या यंत्राद्वारे मोजल्या जातात. साद-प्रतिसादाचा हा खेळ आपल्याला ऐकण्याबद्दल काही सांगून जातो.
सादाला प्रतिसाद मिळाला नाही तर त्याचा अर्थ आतलं सर्किट ड्यामेज आहे असा होतो. पण ही खात्रीची तपासणी नव्हे. ही चाचपणी (Screening Test). मग पुढील तपासणी करावी लागते ही जास्त गुंतागुंतीची, जास्त खर्चिक, पण खात्रीची. पण अर्थात अगदी क्वचित करावी लागणारी. याला म्हणतात बेरा (BERA. Brain Stem Evoked Responce Audiometry).
सहा महिन्याच्या आत नेमके निदान होऊन उपचार सुरु व्हायला हवेत तरच जास्तीजास्त फायदा मिळतो. तान्ह्या मुलातही श्रवणयंत्र बसवता येतं. आई-बाप पुरेसे जागरूक आणि चिकाटीचे असतील तर वाचादोष टाळता येतो. जागरूकता आणि चिकाटी महत्वाची खरीच. कारण श्रवणदोष हा नाही म्हटलं तरी दुर्लक्षितच रहातो, कमीपणाचा मानला जातो. मोठी माणसंसुद्धा चष्मा कौतुकानी मिरवतील पण श्रवणयंत्र घालयाची त्यांना लाज वाटते. थोरांची ही कथा तर पोरांचं (म्हणजे त्यांच्या आईबापांचं) विचारायलाच नको. आता आधुनिक उपचारही उपलब्ध आहेत. कॉक्लीअर इम्प्लांटसारखे उपचार खूप खर्चिक आहेत पण आयुष्यभरच्या पंगुत्वापेक्षा स्वस्तच म्हणायचे. शिवाय निरनिराळ्या सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अगदी मोफत उपचारही होऊ शकतात. पण हे झालं पुढचं. मुळात जन्मतः तपासणीच केली जात नाही. अशा तपासणीची माहितीच नसते. माहिती असली तर तशी सोयच नसते. सोय असली तर तपासण्याची वृत्ती नसते. 

हे झालं बाळाला ऐकू येतय व नाही याच्या तपासणीबद्दल. अर्थात बाळाला ऐकू आलं याचा अर्थ ते तुमचं ऐकेलच असं नाही हं. ते तुमच्या आज्ञेत राहील का नाही हे ओळखणारी तपासणी अजून निघायची आहे.




Tuesday, 4 December 2018

स्तनपान बालकांचा अग्रहक्क.


स्तनपान बालकांचा अग्रहक्क.
डॉ. शंतनू अभ्यंकर
भारतीय समाजाला स्तनपानाचं महत्व पटवून सांगण्याची काही गरज नाही. अनेक बॉलीवूड स्टारांनी आपपली अतिमानवी करतूद ही, पैदा होतेही मां का दूध पिल्यामुळे असल्याचं साफ सांगून टाकलेलं आहे. ते असो, पण अतिमानवी जरी नाही तरी मानवी शक्ती मात्र आईच्या दुधातून प्राप्त होते यात अजिबात अतिशयोक्ती नाही. बाळाची जोमदार, सुदृढ वाढ, त्याची प्रतिकारशक्ती, त्याची बुद्धी, मानसिक आणि भावनिक वाढ इतकंच नाही तर मोठेपणी उद्भवणारे दमा, अॅलर्जी, रक्तदाब या सारखे आजार हे स्तनपानामुळे होत नाहीत हे ही  आता स्पष्ट आहे.
    तेव्हा स्तनपानाला आणि तेही वरचे काहीही न देता, फक्त आणि फक्त अंगावरचे दूध, जास्तीजास्त काळ देण्याला पर्याय नाही.
स्तनाची रचना
          दूध स्त्रवणाऱ्या पेशींचा समूह, पेशी समूहाभोवती स्नायुंच्या पेशी आणि स्तन्य स्तनाग्रापर्यंत आणणाऱ्या १५ ते २० वाहिन्या अशी स्तनाची रचना असते. अगदी स्तनाग्रापर्यंत पोहचण्यापूर्वी या दुग्धवाहिन्या जरा फुगीर बनतात. स्तनाग्राच्या काळ्या भागाखाली हा फुगीर भाग असतो. स्तनाग्रात आणि त्याभोवतीच्या काळ्या भागात भरपूर नसा (Nerves) असतात. त्यामुळे स्तनाग्राला झालेल्या हलक्याश्या स्पर्शाचीही आपल्याला जाणीव होते. स्तनाग्राभोवती बारीक ‘पुरळ’ आलेलं असते. हे ‘पुरळ’ म्हणजे तेल स्त्रवणाऱ्या ग्रंथी होत. यामुळे स्तनाग्र मऊ आणि लवचिक राहतात.
          ही दुग्धनिर्मिती व्यवस्था सर्व स्त्रियांमध्ये सारख्याच प्रमाणात असते. स्तनांचा आकार कमी जास्त असतो, तो यांच्यामधील मेदाच्या प्रमाणामुळे. म्हणजेच स्तनांच्या आकार-उकाराचा आणि यशस्वी स्तनपानाचा अर्थाअर्थी संबंध नाही.
          स्तनपानाच्या क्रियेमुळे मातेच्या शरीरात प्रोलॅक्टीन नावाचे संप्रेरक स्त्रवते. बाळ लुचू लागले की, स्तनाग्रापासून मेंदूला प्रोलॅक्टीन सोडण्याबद्दल संदेश जातात आणि मग मेंदूच्या तळाशी असलेल्या पिट्युटरी ग्रंथीतून हे झरू लागते. बाळांनी पिवून पिवून स्तन रिक्त झाले किंवा रात्री-अपरात्री बाळाला पाजलं की प्रोलॅक्टीन आणखी जोरात येतं. दिवसभरात कितीदा आणि किती जोशात बाळ पितं यावर दूध तयार होणं अवलंबून असतं. म्हणूनच कुणाला जुळी असतील तर आपोआपच बराच वेळ आणि दिवसरात्र पाजत रहावं लागतं; आणि दोन्ही बाळांना पुरेल एवढं दुध निश्चित तयार होतं. भरपूर दूध येण्यासाठी बाळाला अधिक वेळा, अधिक काळ आणि विशेषतः रात्री अंगावर घेणं आवश्यक आहे. दूध पिळून काढलं तरी प्रोलॅक्टीनचा प्रवाह वाढू लागतो. (म्हणूनच अंगावरचं दूध बंद करायचं असेल तर दूध पिळून काढून ते ‘संपत’ नाही, उलट जास्त तयार होतं. बाळाला न पाजणे हाच त्यावर उपाय.)
          बाळाला वरचं काहीही दिलं (अगदी एखादा-दुसऱ्यावेळी जरी बाटलीनी पाजलं) तरी बाळ कमी ओढतं आणि प्रोलॅक्टीन कमी होवून दूध आटतं. पाणी, साखरेचे पाणी, मध, कसली कसली चाटणं, काढे, ग्राईप वॉटर, अनेकविध टॉनिके आणि नवजात शिशु आहार वगैरे मुळेही हाच परिणाम होतो. जर काही कारणांनी स्तनांना इजा होवून ते दुखत, ठणकत असतील तरी दूध कमी येतं.
         प्रोलॅक्टीन प्रमाणेच ऑक्सिटोसिन हे संप्रेरकही स्तनपानाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. बाळ पिऊ लागताच मेंदूच्या तळातील पिट्युटरी ग्रंथीतून हेही स्त्रवते. ऑक्सिटोसिनमुळे स्तनातील दुग्धपेशीभोवतीच्या स्नायूपेशी आकुंचन पावतात आणि दूध स्तनाग्रातून सहजी बाहेर पडू लागते. यालाच पान्हा फुटणे असं म्हणतात. बाळ पिऊ लागताच स्तनात आवळल्यासारखं होतं आणि पान्हा फुटण्याच्या या प्रक्रियेमुळेच दुध येतं. बाळ पितं ते नुसतं बाळाच्या ओढण्यामुळे नाही तर आईच्या ‘सोडण्यामुळे’ सुध्दा. कमीत कमी श्रमात आणि कमीत कमी वेळात बाळाला पूर्ण आहार मिळण्यासाठी या दोन्ही क्रिया आवश्यक आहेत.
        आई जर चिंतीत असेल, तिला लाज वाटत असेल अथवा स्तनपानाबाबत नकारात्मक भावना असेल तर या सोडण्याच्या क्रियेत बाधा येते.
        नीट दुग्धपान करता यावं म्हणून निसर्गानंच बाळाला काही अभिजात हालचाली बहाल केल्या आहेत. ‘शोधणे’, ‘ओढणे’ आणि ‘गिळणे’ या त्या तीन हालचाली होत. बाळाच्या तोंडाला आणि गालाला स्तनाग्राचा स्पर्श होताच बाळ त्या दिशेला मान वळवून; ‘आ’ करून शोधाशोध सुरु करते. स्तनाग्र सापडताच ‘चोखण्याची’ हालचाल सुरु करते आणि काही घशात पडतच गिळण्याची क्रिया प्रतिक्षिप्तपणे होत जाते.
दूध पिताना बाळ स्तनाग्र आणि भोवतीचा काळा भाग चांगला तोंडात आत ओढून घेते. इतका की ब्लालच्या तोंडात स्त्नाग्राची एक लांबोडकी नळी तयार होते. हिच्या टोकातून येणाऱ्या दुधाच्या धारा थेट बाळाच्या घशात पडतात. जीभेची पुढेमागे हालचाल करत, टाळं आणि जीभ यांच्यामध्ये स्तनाग्र पिळून पिळून बाळ दूध ओढून घेते. हे सारं व्यवस्थित होण्यासाठी बाळाला योग्य रीतीने अंगावर घेणं महत्वाचं आहे. यासाठी आईनं अगदी आरामात, पाठीला किंचित बाक काढून बसायला हवे. (अपवादात्मक परिस्थितीत झोपूनही पाजता येतं) बाळानं टोकापाशीचा काळा भाग पूर्णतः तोंडात धरला पाहिजे आणि तरीही श्वासासाठी बाळाचं नाक मोकळं रहायला हवं.
स्तनपान म्हणजे मायलेकरांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना. यासाठी अगदी गरोदरपणातचं तयारी करणं महत्वाचं आहे. उदा. स्तनांची बोंडं काही वेळा आत ओढलेली असतात, ती हलकेच चोळून बाहेर ओढणं महत्वाचं आहे. बाळ जन्मतःच त्याला अर्ध्या तासाच्या आत पाजावं असं आधुनिक प्रसुतीशास्त्र सांगतं. हे शक्य नसेल तर निदान १२ तासाच्या आत तरी पाजावंच. कारण पहिल्या १२ तासाच्या दुधात जास्तीत जास्त जंतुविनाशक प्रतिपिंडे असतात.
बाळ-बाळंतीण सुखरूप असतील तर बाळाला आईच्या कुशीतच विसावू देणं उत्तम. पाश्चात्यांचं आंधळं अनुकरण करणारी काही पंचतारांकित इस्पितळं तान्हुल्यांना खास विभागात ठेवतात आणि प्रसंगोपात स्तनपानासाठी आईजवळ देतात. हे सर्वस्वी अयोग्य आहे. सुदैवानं ही पद्धत आता लोप पावत आहे. कारण पाश्चात्यांनी आपलं डोळस अनुकरण करून बाळ बाळंतीणीजवळ ठेवायला सुरुवात केली आहे.
        काही संशोधकांनी स्तनपानाची वेळापत्रकंही तयार केली होती. पण काळ-वेळ पाळेल ते बाळ कसलं? कालांतराने ही वेळापत्रकही मोडीत निघाली. ‘बाळाला हवं तेव्हा पाजावं, हवं तेवढं पाजावं आणि त्याला हवं तेवढा वेळ पाजावं’ हाच निसर्गनियम आहे आणि तोच आपण पाळला पाहिजे. सुरुवातीला तान्ही बाळंही थोडा त्रास देवून बघतात, सारखं पिण्यापासून ते पिणं सोडण्यापर्यंत खोड्या काढतात. पण सुमारे २ आठवड्यात व्यवस्थित बस्तान बसतं. वेळाही थोड्याबहुत ठरून जातात. २४ तासात सुमारे ८ ते १२ वेळा अंगावर घेतलं तरी पुरतं. मोठ्यांप्रमाणे तान्ह्यांनाही स्वभाव असतो. दारुड्यांसारखंच बाळांचंही असतं. काही बाळं गटागट पितात तर काही घुटके घेत घेत.  तेव्हा बाळ आपणहून दूर होईपर्यंत पाजणं महत्वाचं.
पण काहीवेळा बाळाला अर्धवट दूर करावं लागतं. याचंही विशिष्ट तंत्र आहे. बाळ पीत असताना त्याला ओढून दूर करू नये. तर स्तनाच्या बाजूनी हलकेच आपली करंगळी बाळाच्या तोंडात सरकवावी. बाळाच्या तोंडात हवा शिरली की त्यानं दिलेली ओढ नाहीशी होते, आणि बाळाला सहज दूर करता येतं. बाळ ओढून दूर केलं तर स्तनाग्रांना इजा पोहचते.
बाळ-बाळंतीण सुखरूप असतात तेव्हा हे सगळं सहज जुळून येतं. पण काही वेळा एखादं कुणी आजारी पडतं आणि सारं चित्रं पालटतं. कमी वजनाची, कमी दिवसाची मुलं नीट ओढू शकत नाहीत. आईला नागीण, एड्स किंवा हिपॅटायटीस बी वगैरेची लागण असेल तर बाळालाही लागण होवू शकते. अशावेळी तज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं. तान्हेपणीच ज्यांना मातृवियोग सहन करावा लागतो. त्यांच्यासाठी ‘ओली दाई’ ठेवण्याची पद्धत असते. एड्सच्या या जमान्यात स्तनपानामुळे बाळाला काही आजार होण्याची शक्यता लक्षात घेवून आता रक्तपेढ्यांसारखी, दुग्धपेढ्यांची कल्पना प्रत्यक्षात येऊ पहात आहे.
योग्य स्थितीत स्तनपान करणारं बाळ कसं ओळखावं?
योग्य स्थितीत स्तनपान करणाऱ्या बाळानं
१.             मोठा ‘आ’ वासलेला असतो.
२.             त्याचा खालचा ओठ बाहेर दुमडलेला असतो.
३.             हनुवटी स्तनाला टेकलेली असते.
४.             गाल चांगले फुगीर दिसतात.
५.             स्तनाचा काळा भाग जवळ जवळ दिसत नाही.
६.             बाळ प्यायचं थांबत आणि पुन्हा पिऊ लागतं.
७.             बाळाचा घुटके घेण्याचा आवाज येतो.
८.             हा सारा कार्यक्रम शांत चित्तानं चाललेला असतो.
९.             आईला दुखणं, खुपणं वगैरे काहीही त्रास जाणवत नाही.
बाळ पित नसेल तर...............
१.             बाळ आजारी नाही याची खात्री करा.
२.             दिवसा अगर रात्री बाळ रडताच लगेच अंगावर घ्या.
३.             बाळ पिता पिता झोपल्यास त्याला कानामागे गुदगुल्या करून हलकेच जागं करा.
४.             अंगावरच्या शिवाय ‘वरचं’ काही देवू नका.

बाळ वारंवार पीत असेल तर...........
      तासाभरापेक्षाही लवकर लवकर बाळाला घ्यावं लागतं असेल तर बहुदा प्रत्येकवेळी बाळाला पोटभर दूध ओढता येत नसावं. बाळाला एका वेळी एक बाजू रिकामी होईपर्यंत त्याच बाजूला पाजणे महत्वाचे आहे. जे दूध येते त्यात सुरवातीच्या दुधात पाणी अधिक असते. त्यामुळे आधी बाळाची ठाण तेवढी भागते. नंतरच्या दुधात अन्न असते. त्याने भूक भागते. जर बाळाला थोडावेळ एका बाजूला आनिनात्र थोडावेळ दुसऱ्या बाजूला पाजलं तर बाळ सुरुवातीला येणारं ‘तहान दूध’ पीतं मात्र नंतर येणार ‘भूक दूध’ पीतच नाही. ते लगेच ठणाणा करायला लागतं. मग आईच्या आहाराला किंवा दृष्ट लाग्ण्याला बोल लावले जातात. यासाठी.......
१.             बाळाला अंगावर पाजण्याचं योग्य तंत्र समजावून घ्या.
२.             एक बाजू पूर्ण रिक्त झाल्यावर मगच दुसऱ्या बाजूला घ्या.
३.             बाळाने आपणहून सोडेपर्यंत त्याला पाजत रहा.
नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत अपुरी रजा ही एक अडचण असू शकते. अशांनी..........
१.             शक्य तर सहा महिने पर्यंत रजा घ्यावी.
२.             शक्यतितके दिवस निव्वळ स्तनपान द्यावं.
३.             चौथ्या महिन्यानंतर ‘वरचा’ आहार सुरु करावा.
४.             कामावर रुजू झाल्यावर –
                                                                                                   i.          अगदी घराबाहेर पडण्यापूर्वी.
                                                                                                 ii.           घरी परत आल्या आल्या.
                                                                                               iii.           रात्री झोपण्यापूर्वी.
                                                                                               iv.          अधून मधून रात्रीही स्तनपान द्यावं.
५.          सुट्टीच्या दिवशी मुलाला जास्त वेळा घ्यावं.
६.          आई नसताना बाळाला पाजण्यासाठी अंगावरचं दूध पिळून काढून ठेवता येतं. बाहेर ठेवल्यास ८ तास आणि फ्रीजमध्ये २४ तासांपर्यंत हे टिकतं. मात्र हे पाजताना बोंडलं, वाटी, चमचा पूर्णतः निर्जंतुक हवा. बाटली वापरू नये. बाळाला निरसं दुधचं पाजावं. दूध गरम करू नये अथवा उकळू नये.