गर्भसंस्कार का पालक
मार्गदर्शन मेळावा?
डॉ. शंतनू
अभ्यंकर, वाई, जि.सातारा. ४१२ ८०३.
मी आहे गायनॅकोलॉजिस्ट, प्रॅक्टिस करतो
एका लहान गावात.
गेली वीस वर्ष मी नियमितपणे माझ्या पेशंट साठी 'पालक मार्गदर्शन मेळावा' घेतो आहे. होणारे आई - बाबा आणि त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांना या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला आमंत्रण असतं.
प्रत्येकवेळी प्रतिसाद अगदी छान असतो. इतकी वर्ष
झाली, मी कटाक्षानी ‘गर्भसंस्कार’ हा शब्द टाळत आलोय. या मागे असणाऱ्या धार्मिक,
अशास्त्रीय, छद्मशास्त्रीय गोष्टींना माझा ठाम विरोध आहे.
नुकताच माझ्या एका मित्रानी माझ्याकडून स्फूर्ती
आणि स्लाइड्स घेऊन असाच कार्यक्रम सुरु केला आणि नाव दिलं, 'गर्भसंस्कार'! मी पडलो चाट. तर म्हणतो कसा, 'अरे, तू आणि मी जे करतो, ते ‘खरे गर्भसंस्कार’, तेव्हा हा शब्द खरं तर आपण वापरायला हवा.'
मी एकदम हे ऐकून कान टवकारले. अरे खरंच
की. ‘गर्भसंस्कार’ म्हणजे मंत्र-तंत्र नव्हे, पूजा-पाठ नव्हे, प्रार्थना नव्हे... ‘गर्भसंस्कार’
म्हणजे आईला, बाबांना, आज्जी-आजोबांना नव्या नात्याची जाण करून देणं, आईच्या अडचणी
समजावून घ्यायला मदत करणं, सुखरूप आणि सुदृढ बाळ व्हावं म्हणून काय-काय करता येईल
याची सविस्तर चर्चा करणं, भीती, गैरसमज अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा-परंपरांची जळमटं
काढून टाकणं, आधुनिक चाचण्या, उपचार रुजवणं...... मग हे सगळं तर मी माझ्या
मांडणीतून गेली वीस वर्ष करतोच आहे. पण ह्या सगळ्याला ‘गर्भसंस्कार’ म्हणायला
कचरतो आहे. मित्राच्या सांगण्यानं मला एक नवी दृष्टी दिली. मी जे शास्त्रशुद्ध,
पुराव्यानुसार बोलतो तेच तर ‘खरे गर्भसंस्कार’.
मी आपला वेडा, ओशाळवाणेपणानी ‘पालक मार्गदर्शन
मेळावा’ असं अत्यंत गद्य शीर्षक वापरत होतो. मॅडच होतो की मी. मित्र म्हणाला, ‘अरे
‘गर्भसंस्कार’ हा आपला गड आहे, आपली जहागीर आहे ती. ती पुन्हा काबीज करायला भीड
कसली. उलट हा शब्द न वापरून तू अशास्त्रीयतेला आपण होऊन जागा करून देतो आहेस.
योग्य गर्भसंस्कार कुठले हे जाणून घेण्यापासून तुझ्या पेशंटना वंचित ठेवतो आहेस.
धिक्कार असो तुझा!’
च्यामारी, मी गेली वीस वर्ष हे इतकं सगळं
करतोय, आणि मलाच माहित नाही. ते काही नाही आता मी देखील ‘गर्भसंस्कार’ हा शब्द
वापरायचं ठरवलं आहे. अगदी उजळ माथ्यानं. एक तर त्यामुळे योग्य, शास्त्रीय, आधुनिक
गर्भसंस्कार म्हणजे काय हे आपोआप अघोरेखीत होईल. पर्यायानी छाछूगिरी कुठली हेही
समजेल.
अर्थात आम्ही ज्या अपेक्षेने आलो होतो, ते
‘हे’ नाहीच, असं काहींना वाटू शकेल. आमची फसवणूक झाली असंही कोणी म्हणू शकेल.
पण आमच्या दृष्टीनी आम्ही जे करतोय तेच
खरे गर्भसंस्कार असं म्हणता येईल.
मागे एकदा चेन्नईत चायनीज मागवल्यावर,
चक्क सांबारात बुचकळून ठेवलेले नूडल्स पुढ्यात आले. हॉटेलवाल्याशी बऱ्याच वेळ
हुज्जत घातल्यावर शांतपणे तो म्हणाला, ‘सर. धिस हॉटेल, धिस चायनीज!’
त्याच चाली वर म्हणता येईल, ‘धिस
हॉस्पिटल, धिस गर्भसंस्कार!!’
“कोण आहे रे तिकडे? ती पाटी ताबडतोब बदला.
माता मार्गदर्शन खोडा आणि लिहा गर्भसंस्कार!... नको नको लिहा शास्त्रीय
गर्भसंस्कार!!...नको नको, आधुनिक
गर्भसंस्कार लिहा!!!!”
काय लिहू? तुम्हीच सुचवा.