शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी (गोष्ट ५)
चंद्र खाली पडला तर?
डॉ. शंतनू अभ्यंकर
रोज रात्री नवी गोष्ट कुठून आणायची असा प्रश्न शास्त्रज्ञ आजीला कधी पडलाच नाही. रामायण, महाभारत, पंचतंत्र अशा कितीतरी कथा होत्याच, शिवाय ज्या दिवशी काहीच सुचायचं नाही त्या दिवशी, झंप्या, भुपी आणि आजी एक मस्त खेळ खेळायचे. ह्या खेळाचं नाव, ‘जर का’!
खेळ अगदी सोपा होता. जर का असं झालं तर काय होईल?, जर तसं झालं तर काय होईल? असे प्रश्न झंप्यानी किंवा भुपीनी विचारायचे आणि मग शास्त्रज्ञ आजीनी कल्पना लढवून त्यांची उत्तरे द्यायची. झंप्या आणि भुपीचा हा अत्यंत आवडीचा खेळ होता.
त्या रात्री असंच झालं. मे महिन्याची सुट्टी होती. तिघेही झोपायला गच्चीवर होते. क्रिकेट खेळून झंप्या दमून आला होता. आज त्यांच्या टीमची पहिली डे-नाईट मॅच झाली होती आणि झंप्यानी सिक्सर मारून ती जिंकली होती. त्याने मारलेला बॉल सीमारेषेच्या पार तर गेलाच, पण तो नेमका कुठे गेला तो सापडलाच नाही! बॉल हरवण्याएवढा मोठ्ठा सिक्स मारल्याबद्दल ज्याने त्याने झंप्याचे कौतुक केले होते आणि तो कौतुकात न्हाऊन निघाला होता.
आताही अंथरूणांत पडल्या पडल्या चंद्राचा वाटोळा गोळा बघून झंप्याला आपला बॉल आणि तो सिक्स आठवला आणि झंप्याने पहीला बंपर टाकला; ‘आजी, खूप म्हणजे, खूप म्हणजे, खूप म्हणजे, खूपच जोरात सिक्स मारला तर काय होईल?’
‘अरे जोरात मारला तरी बॉल परत जमिनीवर येतोच; मग कितीही जोरात सिक्सर मारा. पण जितक्या जोरात माराल तितका तो बॉल लांब जाईल. बॅटच्या दणक्याने बॉल लांब जायला लागतो त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने तो खालीही खेचला जात असतो. म्हणून तर बॉल कमानदार मार्गाने, वळणदार प्रवास करून, जमीनीला टेकतो. पण भुपे तू सांग, समजा झंप्यानी क्षितिजापलीकडे जाण्याइतका इतका जोरदार आणि उंच फटका मारला तर?’
क्षितिजापलीकडे बॉल मारला तर नेमकं काय होईल हे काही भुपीला सांगता येईना.
‘अगं, पृथ्वीला वळसा घालून तो बॉल परत मागून घेऊन डोक्यावर आदळेल झंप्याच्या!!’ आजी हसत म्हणाली.
पुढे मारलेला बॉल मागून येऊन डोक्यावर आपटणार हे ऐकून भुपीला मोठी गंमत वाटली. तो बॉल नेमका कसा लागेल हे झंप्याला नीट कळावं या उदात्त हेतूने तिनी त्याला एक टप्पल मारून दाखवली!!
आजीनी तिला दटावलं आणि ती पुढे सांगू लागली, ‘अर्थात ही सगळी जर-तरची बात झाली. प्रत्यक्षात वाटेतल्या अडथळ्यांमुळे, हवेमुळे, तो बॉल असा येऊ शकत नाही. पण याहीपेक्षा उंच आणि जोरात बॉल मारला तर तो पृथ्वीभोवती सतत गोल-गोल फिरत राहील!’
‘तो चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आहे तसा?’ भुपी.
‘हो. मुळात पृथ्वी चंद्राला सतत आपल्या बाजूला ओढत असते. पण चंद्र इतक्या वेगाने पुढे जातो आहे की, तो पृथ्वीकडे येतच नाही. तो वेगानं पुढे पुढे जात रहातो. पृथ्वीकडे येणे आणि पुढे जाणे या खेचाखेचीत तो पुढे दूर कुठेतरी अंतराळातही जात नाही आणि तो पृथ्वीवरही पडत नाही. त्याच्या कक्षेमध्ये (ऑर्बिट) फिरत राहतो!’
‘पण आला कुठून चंद्र?’ भुपी.
‘..आणि त्याला असा परफेक्ट स्ट्रोक कुणी मारला?’ झंप्या.
‘त्या चंद्र नावाच्या दगडमातीच्या गोळ्याला नेमका कोणत्या कारणाने, कसा आणि कधी असा फटका बसला, हे काही आपल्याला माहित नाही. पण अगदी नेमकी गती आणि दिशा मिळाली आहे त्याला. सध्या तो आपला पृथ्वीभोवती फेऱ्या मारतो आहे.’ आजी.
‘पण समजा, चंद्र खाली पडला तर?’ झंप्या.
‘तू नको काळजी करू, झंप्या. नाही पडणार तो. मी सांगितलंय त्याला!’ भुपीने पुन्हा खोडी काढली.
‘मी नाही काळजी करत. पण चंद्र खरंच पडला तर मी नील आर्मस्ट्रॉंगच्या पायच्या ठशाजवळ उभा राहून सेल्फी घेईन आणि सगळ्यांना पाठवीन!!’ झंप्याने आपला प्लॅन सांगितला.
‘मस्त कल्पना आहे; पण चंद्र जर खरंच खाली पडायला लागला ना, तर हाहाकार माजेल पृथ्वीवरती! सेल्फी बिल्फी विसरा झकासराव. चंद्र पृथ्वीकडे आला तर काय काय होईल याची कल्पना लढवू या आपण. हीच आजची गोष्ट. पण ही गोष्ट सांगताना मी चंद्रासाठी दरवेळी नवीन शब्द वापरीन! चालेल?’
‘म्हणजे?’ झंप्या.
‘म्हणजे दरवेळी चंद्र असं नाही म्हणणार. कधी ‘शशी’ म्हणीन कधी ‘सोम’.’
‘सोम म्हणजे चंद्र? म्हणजे सोमवार मधला सोम?’ झंप्या.
‘हो रे, चंद्राला खूप वेगवेगळी आणि सुंदर नावे आहेत!!’ आजी.
‘हो चालेल. घे तू वेगळी वेगळी नावे’ दोघे म्हणाले.
‘ ‘शशी’ पृथ्वीवर पडायचा तर त्याचा फिरण्याचा वेग कमी व्हायला हवा. वेग कमी झाला की ‘सोम’ पृथ्वीकडे यायला लागेल आणि पृथ्वीभोवती गिरक्या घेताs, घेताss, घेताsss, तो नागाच्या वेटोळ्यासारखा मार्ग घेत, अधिकाधिक जवळ येईल. ‘शशांक’ आणि आपल्यामध्ये बरंच अंतर आहे. तेंव्हा इथे पोहोचायला त्याला जवळजवळ वर्षभराचा कालावधी लागेल.’
‘बापरे! म्हणजे आज चंद्र मागवला, तर वर्षभराने येणार?’ झंप्या.
‘मागवला काय रे झंप्या? मागवायला चंद्र म्हणजे काय पिझ्झा आहे का?’ भुपी.
‘भुपे, मला सांग, ‘चांदोमामा’मुळे पृथ्वीवर अगदी रोज घडते अशी गोष्ट कोणती?’
‘चांदणे!’ भुपी.
‘नाही.’ आजी.
‘मुळीच नाही, अमावस्येला कुठे असते चांदणे?’ झंप्या ठामपणे म्हणाला.
‘हां!!! आलं मला, भरती ओहोटी!!’
‘बरोब्बर. त्या ‘निशापती’च्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राचे पाणी हेलकावे खाते. पाण्याची पातळी कमी-जास्त होते. ह्यालाच आपण ओहोटी आणि भरती म्हणतो. हा ‘इंदू’ जवळ यायला लागला की पहिल्या महिन्यामध्ये काही विशेष फरक जाणवणार नाही आपल्याला. ‘चांदोबा’ जरा उजळ दिसायला लागेल आणि भरती-ओहोटीच्या लाटा मोठ्या होतील. पण साधारण महिन्याभरातच त्याने निम्मे अंतर काटले असेल आणि आता भरतीच्या लाटा उंचच उंच उठतील. समुद्राकाठची सर्व घरेदारे, दुकाने, उद्योगधंदे हे अक्षरशः वाहून जातील.’
‘पण आजी इतकं सगळं पाणी येणार कुठून?’ झंप्या.
‘अॅ हे रे! भरती म्हणजे काही समुद्रात नवीन पाणी येत नाही काही. ज्या भागात ओहोटी होईल, तिथले हे पाणी असेल.’ भुपीने बरोबर सांगितले.
‘हो, म्हणजे ओहोटीच्या ठिकाणी समुद्र आणखी आणखी मागे मागे सरकेल. त्या किनाऱ्याचा समुद्रतळ उघडा पडेल. तिथले जीवजंतू, मासे, प्रवाळ, वनस्पती यांचा कधी नव्हे ते हवेशी आणि सूर्यप्रकाशाची थेट संपर्क येईल. हे सहन न झाल्यामुळे पाण्याखालच्या या जीवसृष्टीचा जीव जवळपास संपून जाईल!!’ आजी सांगत होती आणि नातवंडांचे डोळे विस्फारले जात होते.
‘दुसऱ्या महिन्यात तो ‘मयंक’, दोन-तृतीयांश अंतर पार करून अधिक नजीक आला असेल.’
‘माझ्या वर्गात आहे एक मयंक! आता मी उद्या त्याला त्याच्याच नावाचा अर्थ सांगणार.’ झंप्या.
‘गप्प बस की, सांग गं आजी, काय होईल पुढे?’ भुपी वैतागून म्हणाली.
‘भरती-ओहोटीच्या या प्रचंड हेलकाव्यांमुळे समुद्री वाहतूक, बंदरे सगळी बंद. ती पूर्ण निरूपयोगी ठरतील. आंतरराष्ट्रीय संपर्क यंत्रणा ही समुद्रतळाच्या केबल्सच्या जाळ्यातून काम करत असते. उंच लाटांमुळे या केबलला काही झाले नाही तरी काठावरच्या यंत्रणा ठप्प झाल्या असतील. तिथली सगळी व्यवस्था कोलमडून पडलेली असेल. समुद्रमार्गे होणारी अन्नधान्याची आयात थंडावेल. समुद्रकिनारी असलेल्या अणुवीज केंद्रे, ऑइल रिफायनरी बंद पडतील. बहुतेक भागात लाईट जातील. अन्न आणि इंधनाचा तुटवडा जाणवायला लागेल.’
‘बाप रे! चंद्र नाही जवळ आला तरी चालेल!!’ झंप्या म्हणाला.
पोर्णिमेची रात्र होती. चंद्र नुकताच उगवला होता. गच्चीत झकास चांदणे पडले होते. त्या चंद्रावरच्या सशाकडे पहाताना झंप्याचे काळीज मात्र सशासारखे लकलकत होते.
‘अरे हे तर काहीच नाही, समुद्रापासून लांब राहणाऱ्या मंडळींचीही यातून सुटका नाही.’ आजी आणखी रसभरीत वर्णन करू लागली. ‘नद्यांच्या मुखातून भरतीचे पाणी आत आत शिरायला लागणार. जितकी मोठी भरती तितके खोलवर पाणी शिरणार. नद्या जाऊन समुद्राला मिळतात, इथे समुद्रच येऊन जणू नदीला मिळेल; आणि नद्यांना उलटे पूर येतील. हे खारं पाणी आसपासची शेतीवाडी, विहरी यांत घुसेल. हे खारं पाणी जमिनीत मुरल्यामुळे पिके तगणार नाहीत. जमीन कायमची नापीक होऊन जाईल. तिसऱ्या महिन्यात तो ‘रजनीनाथ’ इतका जवळ येईल की आपल्या सॅटेलाइटसवर त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होईल. सगळे सॅटेलाइट त्यांचे त्यांचे ऑर्बिट सोडून इकडेतिकडे फेकले जातील. पृथ्वीवर हाहाकार माजेल. अजून पडलं नसलं तर् आता इंटरनेट बंद पडेल. ’
‘बापरे, म्हणजे ऑनलाइन गेम्सपण बंद!!’ झंप्या हसत म्हणाला.
‘भरतीच्या लाटा आता शंभर शंभर मीटर उंच होतील आणि ओहोटीच्या वेळी पाणी तितकंच खाली उतरेल. तो ‘सुधांशू’ आणखी जवळ येताच, इतकावेळ फक्त समुद्रावर दिसणारा त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम, आता पृथ्वीच्या कवचावरही जाणवायला लागेल.’
‘म्हणजे? जमीनीला भरती ओहोटी येणार?’ भुपीने विचारले.
‘अगदी तसेच नाही, पण थोडेफार तसेच. जमीन काही पाण्याइतकी लवचिक नसते. पण पृथ्वीचे कवच चंद्राच्या दिशेला थोडं थोडं खेचले जाईल. अर्थातच ‘हादरली ही धरती’ असा परिणाम होईल. प्रचंड प्रमाणात भूकंप होतील. पृथ्वीच्या कवचाला भेगा पडल्या की त्याखालील तप्त लाव्हा वेगाने बाहेर पडेल. पृथ्वीवर ठिकठिकाणी ज्वालामुखी आग ओकू लागतील. त्यातील धूळ, धूर, राख वगैरेमुळे वातावरण काळवंडून जाईल. चंद्राचा गोल गरगरीत वाटोळा गोळा, सगळ्या सजीवसृष्टीचा वाट्टोळं करून टाकेल!! शिवाय समुद्रातलं कोट्यवधी टन पाणी सतत हिंदकळल्यामुळे काय होईल?’
‘बापरे, अजून काय व्हायचे बाकी आहे आता?’ झंप्या जरा रडवेला झाला. ह्या सर्वनाशाची कल्पनाही त्याला कशीशीच वाटत होती.
‘पृथ्वीवर भरतीच्या बाजूला या पाण्याचे वजन पडेल. ओहोटीच्या आली की पुन्हा एकदा हा भार हलका होईल. हे ओझं आता पृथ्वीच्या दुसऱ्या भागातील कवचाला सोसावे लागेल. पाण्याचा प्रचंड हातोडा, पृथ्वीच्या कवचाला, जणू सगळीकडून सतत ठोकतोय, असा हा परिणाम असेल. पृथ्वीचे कवच लवकरच तडकेल! आणखी प्रचंड भूकंप होतील.’
चंद्र आता आणखी वर चढला होता. त्याच्या शीतल, अमृतमय चांदण्यात, झाडे रुपेरी झाली होती. झंप्या आणि भुपी मात्र चंद्राइतकेच मोठ्ठे डोळे करून त्याच्याकडे पहात होते. आपल्याबरोबर खेळताना भागणारा, लिंबोणीच्या झाडामागे लपणारा हा चांदोबा मामाच्या चिरेबंदी वाड्यावर तूप रोटी खायला न आलेलाच बरा; असं भुपीला वाटून गेलं.
आजीचे वर्णन सुरूच होतं आणि त्यात अजूनही चंद्राची नवी नवी नावे ती वापरत होती.
‘साधारण सात महिन्यांनी तो ‘सुधाकर’ पृथ्वीला 24 तासात एक फेरी घालू लागेल. आता भरतीओहोटी होण्याऐवजी त्या ‘कलाधरा’च्या दिशेला कायमची भरती आणि अन्यत्र कायमची ओहोटी असा प्रकार होईल.’
‘आजी, चंद्र इतका जवळ आल्यामुळे त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो आपल्याला ओढून त्याच्याकडे घेईल का?’ झंप्याने एक तिरकस शंका काढली.
‘नाही रे, तसं काही होणार नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा चंद्राचे गुरुत्वाकर्षण खूप कमी आहे. त्यामुळे आपण सगळे पृथ्वीवरच राहू.’
‘आजी, पकडलं तुला!’ झंप्या.
‘काय झालं?’
‘चंद्र म्हणालीस; चंद्राचे नवीन नाव नाही घेतलंस!’ झंप्या.
‘खरंच की! तर मी काय सांगत होते, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा त्या ‘हिमांशू’चे गुरुत्वाकर्षण खूप कमी आहे. आपण सगळे पृथ्वीवरच राहू. पण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आता तो ‘चांदवा’देखील पृथ्वीच्या दिशेने खेचला जाऊन लंबगोल होईल! तिथे आता प्रचंड चंद्रकंप होतील.’
‘चंद्रकंप? हां, हां; भू-कंप सारखा चंद्र-कंप!! आलं लक्षात.’ भुपी म्हणाली.
‘वर्ष अखेरीस पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण इतके असेल की त्या ‘मृगांका’ला एकसंध ठेवणारे त्याचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आता निरुपयोगी ठरेल. त्याच्या पार ठिकऱ्या ठिकऱ्या होतील. त्याचे तुकडे आणि त्यातील दगड, माती, खडक, शिळा असा चंद्राचा कुस्करा पृथ्वीभोवती एक मोठे रिंगण धरील. शनीच्या भोवती असतात तशी त्या भुग्याची कडी, पृथ्वीभोवती काही काळ फेर धरतील. पण कालांतराने हा सगळा माल पृथ्वीकडे झेपावेल. बराचसा वातावरणातून प्रवास करताना जळून खाक होईल. कोणी जगले वाचले असतील तर म्हणतील, उल्कापात होतोय बरं! भंगलेल्या चंद्राचे मोठे मोठे तुकडे मात्र पृथ्वीवर बरसत रहातील आणि ठिकठिकाणी आणखी उत्पात घडवतील.’ आजी क्षणभर थांबली. गच्चीवर आता एक विचित्र शांतता पसरली. झंप्या आणि भुपी जरा कावरेबावरे झाल्याचे आजीला जाणवले. एक दीर्घ उसासा सोडत ती म्हणाली, ‘आकाशात आता ‘अमृतरश्मी’, म्हणजे चंद्र नावाची काही चीजच अस्तित्वात नसेल!’ आजीचा आवाज जरा कापरा झाला.
नकळतपणे दोघांचे डोळे पाणावले. आजीलाही जरा भरून आलं. झंप्याला तर हुंदकाच फुटला. त्याच्या डोळ्यातून खळ्ळकन पाणी आलं. त्याचे डोळे पुसत, त्याला जवळ घेत आजी म्हणाली, ‘अरे, खरं नाही काही असं होणार. तुम्हाला गोष्टी आवडतात ना, म्हणून कल्पनेनेच काय होईल याचे मी फक्त चित्र रंगवले. जाऊ दे; पुढे काय होईल हे सांगणे अवघड आहे; पण लवकरच वातावरण जरा स्थिरावेल. समुद्राचे डचमळणे कायमचे थांबेल. आता भरती ओहोटी असणार नाही. खोल गुहांमध्ये, डोंगरकपाऱ्यात दडून राहिलेली माणसं कदाचित वाचतील. ती पुन्हा एकदा माणसाचं राज्य निर्माण करायचा प्रयत्न करायला लागतील!! अशीच एखादी आजी गोष्ट सांगायला लागेल. तिची नातवंडे तिला विचारतील,
आजी चंद्र म्हणजे काय गं? मग ती सांगेल,
आमच्या लहानपणी आम्हां सगळ्यांचा एक जीवाभावाचा सखा होता. तो आभाळात राहायचा....’
किशोर मे २०२२
No comments:
Post a Comment