Wednesday, 16 February 2022

शपथ वहा!

शपथ वहा!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. 

डॉक्टर होताना इतकी वर्ष हिप्पॉक्रेट्सची शपथ दिली जायची. नव्या प्रस्तावानुसार आता चरक मुनींच्या नावाने शपथ घ्यावी लागणार आहे. 
 यामुळे काही गोटात अस्वस्थता पसरली आहे.  खरंतर असा बदल होणार हे योग्यच म्हटलं पाहिजे. अशा तऱ्हेने परंपरेचा आणि पूर्वजांच्या गौरवीकरणाचा  समाजाला नेहमीच आनंद आणि अभिमान वाटत असतो.  पण नाव जरी चरकाचे असले  तरी ज्या मूल्यांशी डॉक्टरने निष्ठा वहायच्या आहेत ती मूल्ये  मात्र आधुनिक असावीत असं सुचवावंसं वाटतं. 
मि. हिपोक्रेटेस  आपले  चुलत आजोबा. श्री. चरक मुनी मात्र थेट आजोबा.  हिप्पोक्रेट्स आजोबांची आणि  आपली जानपहचान ब्रिटिशांमार्फत झाली. त्यांनी आणलेले ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान  पसरत गेलं.  हे ज्ञान आत्मसात करण्याच्या पद्धती; म्हणजे कॉलेज, विद्यापीठ, पदवी  आणि पदवीदान समारंभ हे सगळं त्यानीच तर  इथे इंजेक्ट केलं. त्यांना घालवल्यानंतर आपल्या मुळांचा शोध नेकीने सुरू झाला.  तो अजूनही सुरूच आहे.  त्यालाच आलेला हा एक फुटवा. खरंतर कोर्टातले काळे डगले, मिलिटरी बँडची गाणी, सेनेचे युनिफॉर्म-टोप्या-बाजूबंद, लोकसभेत अध्यक्षांचा  ‘द आयेज हॅव इट’चा त्रिवार जप; अशी  सगळी वसाहतवादाची उरलीसुरली चिन्हे आहेत.  हीदेखील जायला हवीत. कालांतराने जातीलच. 
नव्या ज्ञानाच्या प्रकाशात आज  हिप्पोक्रेट्सची कित्येक वचने गैरलागू आहेत. चरकाचीही तीच गत आहे.  त्याला इलाज नाही.  ही मंडळी बुद्धीमान आणि प्रतिभावंत होती  पण त्यांना त्यांच्या काळाच्या मर्यादा होत्याच. प्रामाणिकपणे सांगायचं तर हिप्पोक्रेट्स किंवा चरकापासून अखंड वैज्ञानिक परंपरा अशी काही दाखवता येत नाही. युरोपातही अंधार युग उगवलं होतं आणि आयुरोग्यात प्रगती साधायची, ज्ञाननिर्मिती करण्याची, ‘विज्ञान’ नावाची काहीतरी युक्ती आहे, हा शोध आपल्याला ब्रिटिशांच्या मार्फतच लागला. स्वातंत्र्याच्या सुमारास केवळ ३७  वर्षे असलेले भारतीयांचे  सरासरी आयुर्मान आज ६७ वर्ष झालं आहे.  हे झालं ते आधुनिक विज्ञानाची विज्ञानाची कास धरल्यामुळे. ही किमया हिप्पोक्रेट्सच्या वैद्यकीची नाही आणि चरकाच्याही नाही. त्यामुळे जर शपथच घ्यायची  असेल तर ती विज्ञानाच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या या नावाने घ्यायला हवी.  
अशा संस्कृती-निरपेक्ष, देश-निरपेक्ष, कालसुसंगत शपथांचे पाठ  उपलब्ध आहेत. संपूर्ण पारदर्शकता, पेशंटचा उपचारातील निर्णयांमध्ये सहभाग, पेशंटचे अधिकार, वर्ण-वंश-धर्म-जात-लैंगिकता वगैरे  भेदांना तिलांजली  ही तुलनेने आधुनिक मूल्य त्यात अंतर्भूत आहेत. अशी अकरा मार्गदर्शक सूत्रांची एक यादी आज डॉक्टर होताना नॅशनल मेडिकल कौन्सिलतर्फे दिली जाते आणि ती पाळणे अपेक्षित आहे. वर्ल्ड मेडिकल असोसिएशचा जिनेव्हा पाठ हाही असाच एक नमूना.
कर्मकांडाच्या नावाने कितीही बोटे मोडली तरी त्यातून माणसाची सुटका नाही.  वैद्यकीय क्षेत्रात, पांढरा कोट घालणे, दिवा हातात धरून शपथ वहाणे. पदवीदान समारंभातील त्या मिरवणुका, ते झगे, त्या गोंड्याच्या टोप्या, ते टोप्या उडवणे, त्याचे फोटो जिकडे तिकडे शेयर करणे;  हे सगळं कर्मकांडच  म्हणता येईल. पण  हे अर्थहीन नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, एक एक पायरी चढताना, एक एक उंबरा ओलांडून जाताना, आनंद, अभिनंदन, अभिमान, उत्सव,  जबाबदारीचा स्वीकार हे  सगळं दर्शवणाऱ्या या अर्थपूर्ण सामाजिक कृती आहेत. 
प्रश्न आहे धर्मनिरपेक्ष देशांत धर्मनिरपेक्ष कर्मकांडे निर्माण करण्याचा. ब्रिटिश  प्रथा, परंपरा आणि कर्मकांड  यांचे एक बरं आहे. ह्यांना ‘हिंदू’ असं लेबल लावता  येत नाही. त्यामुळे आपोआपच सेक्युलर ठरतात, जास्त स्वीकारार्ह  ठरतात. त्या मानाने इथल्या मातीत उगवलेली कोणतीही कृती सहजच ‘हिंदू’ आणि म्हणून विकृती ठरवता येते. चरक आणि त्याची संहीता, भले ती आता  कितीही अशास्त्रीय ठरो, आपला वारसा आहे. हा आपल्या देशाने नाही जपायचा तर कोणी? तसे चरक आजोबा पाक आणि बांगलादेशालाही प्यार हवेत पण तिथे तर हे अशक्य आहे. मग आपली जबाबदारी मोठीच आहे म्हणायचे. 
असा काही प्रस्ताव आहे म्हटल्यावर त्याबद्दल आत्ताच चर्चा सुरू झाली आहे.  नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या वेबसाईटवर मला त्याचे डिटेल्स सापडले नाहीत. पण सोशल मीडियावर काही शक्यता  फिरताहेत.  बरोबरीने भगवेकरण, संघाचा हात वगैरे नेहमीचे तळतळाटही फिरताहेत.  काहीं नमुन्यांत ‘द्विज’  असा शब्द आहे आणि कोणी त्याचा जातीय  अर्थ काढू नये म्हणून, चांदणी टाकून, तळटीपेमध्ये त्याचा खुलासाही  आहे. या शपथेत नेमके काय असणार आहे त्याचा थांगपत्ता मला तरी लागलेला नाही.  पण काहीही माहीत नसताना चर्वीतचर्वण  करणे हाच तर सोशल मिडीयाचा फंडा आहे. 
काही वैद्यांच्या मते,  चरक शपथ वगैरे काही घेतल्याचे त्यांना आठवतही  नाहीये. मूळ संहितेत शपथ वगैरे काही प्रकारच नाहीये. डॉक्टरच्या आणि पेशंटच्याही  नीतिमत्तेबद्दल, बरीच वचने या लिखाणामध्ये इतस्ततः विखुरलेली आहेत. उदा: ‘मैत्री कारूण्यं आर्तेषु शक्ये प्रितीः उपेक्षणं । प्रकृतिस्थेषु भुतेषु वैद्यवृत्तिः चतुर्विधा ।। (च. सू. 9/26)’ वैद्य मैत्रभावी, कारुण्यमूर्ती, साध्य आजाराबद्दल आस्था असणारा आणि असाध्य रोग्यांत भावनीक गुंतवणूक टाळणारा असावा; अशा वैद्यवृत्ती सांगितल्या आहेत.  अशी वचने एकत्र करून शपथवजा मजकूर तयार केलेला दिसतो; असंही  काहींनी सांगितलं. थोडक्यात एका कर्मकांडासाठी सुसंगत वचने वेचण्यात आलेली आहेत. हरकत नाही. हिप्पॉक्रेट्सच्या शपथेतही कालौघात बरेच बदल झालेले आहेत.  मुळात अपोलो, हायजिया, पॅनॅशिया वगैरे ग्रीक पंचायतानाला नमन करून सुरू होणारी शपथ,  काही पाठभेदात नुसतेच ‘हे देवा’ असं म्हणून सुरू होते, तर काहींत सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून सुरू होते. मूळ शपथेत गर्भपाताला आणि दयामरणाला स्पष्ट नकार होता.  नव्या रूपात हा पुरेसा अस्पष्ट किंवा पार नष्ट  करण्यात आला आहे! 
हिप्पॉक्रेट्स असेलही पाश्चिमात्य. पण सामान्यपणे ‘अॅलॉपॅथी’ म्हणवले जाणारे आधुनिक वैद्यक, हे ना पाश्चिमात्य आहे पौर्वात्य. हे तर दशदिशांतील देशादेशांतून, इतिहासातून  आणि संस्कृतींतून   उगवलेल्या; अनेक कल्पनांच्या, युक्त्या-प्रयुक्त्यांच्या, औषधोपचारांच्या, शल्यतंत्रांच्या आणि कौशल्यांच्या मंथनातून निघालेले नवनीत आहे.  आणि हेच त्याचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. सुरवातीला पाश्चिमात्य संस्कृतीत आणि प्रामुख्याने  ख्रिश्चन जनांत आधुनिक वैद्यकीने उचल खाल्ली हे निश्चित, पण आज हे शास्त्र  कोणा एका दिशेला, देशाला, धर्माला किंवा संस्कृतीला बांधील नाही. ह्याला ‘वेस्टर्न फॅड’ म्हणून हिणवणारे, ह्या ज्ञानातील देशा-परदेशातील भारतीयांच्या योगदानाचा उपमर्द करत असतात. 
शेवटी ‘हिप्पोक्रेट्सच्या-शप्पथ’ म्हटलं काय किंवा ‘चरका-शप्पथ’ म्हटलं काय; ती शपथ काय सांगते आणि  किती तळमळीने पाळली  जाते, हा कळीचा मुद्दा आहे. नाव हे परांपरेशी नाते सांगण्यासाठी आणि गाभा हा आधुनिकतेशी नाते सांगण्यासाठी असावा एवढीच अपेक्षा. 

प्रथम प्रसिद्धी
दैनिक सकाळ
16 फेब्रुवारी 2022

Wednesday, 2 February 2022

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

 

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

(पोट हा शब्द या लेखात जठर (Stomach) आणि  ग्रहणी  (Duodenum, आतडयाचा सुरवातीचा भाग) या दोन्ही अर्थानी  वापरला आहे. सामान्यांना कदाचित काही फरक पडणार नाही पण डॉक्टर वाचकांसाठी हा खुलासा केलेला आहे.)

अल्सर.

‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’, अशी नुसती भासमान जाणीव नाही तर जणू धगधगत्या यज्ञकुंडाचा साक्षात अनुभव घडावा असा हा आजार.

पोटाचा अल्सर हा आजार जंतुजन्य असल्याचा जगावेगळा शोध  लावल्याबद्दल  डॉ. बेरी मार्शल आणि डॉ.  रॉबिन वॉरेन या ऑस्ट्रेलियन डॉक्टरांना 2005 सालचा वैद्यकीचा  नोबेल पुरस्कार मिळाला.  त्यामुळे आता अॅसिडिटीवरच्या औषधां बरोबर, प्रतिजैविके देऊन अल्सर बरा केला जातो. अल्सर म्हणजे आतल्या आत पोटाच्या अस्तराला झालेली जखम. यासाठी काचा किंवा ब्लेड खाण्याची गरज नसते.  अनेक रासायनिक पदार्थ पोटाला जखमी करू शकतात.

पोटात, म्हणजे खरेतर जठरात (Stomach) आणि ड्युओडीनमला  (ग्रहणी, आतडयाचा सुरवातीचा भाग),  अल्सर होतात ते हरी, वरी आणि करी किंवा  वेल्थ, वाईन आणि वुमन  किंवा रम, रमा आणि  रमी; अशा पापाचारणामुळे होतात अशी सामान्य समजूत आणि वैद्यकीय शिकवणूक होती. स्ट्रेस हेही एक फार वजनदार कारण मानले जायचे. अल्सर हा मुख्यत्वे एक मनोकायिक आजारही  समजला जात   होता. शिवाय एकाच घरी हा  पिढ्यांपिढ्या आढळत होता. तेंव्हा काही जनुकीय कारणेही असावीत अशी अटकळ होती. 

वरील साऱ्या घटकांमुळे पोटातील अॅसिड वाढते आणि परिणामी अल्सर होतो; ही कारणमीमांसा सर्वमान्य होती. तेंव्हा ह्या क्षेत्रात नव्याने काही शोधण्यासारखे शिल्लक नाही अशीच समजूत होती.  सत्याच्या शोधात, ‘अज्ञानापेक्षा ज्ञानाचा आभास हा मोठा अडथळा आहे’ असं  इतिहासकार डॅनियल बुरस्टीन यांनी म्हटले आहे. डॉ. बेरी मार्शल यांनी आपल्या नोबेल-निरुपणातही  हे वाक्य उद्धृत केले आहे.

अॅसिडमुळेच सर्व त्रास आहे, तेंव्हा अॅसिडच  तयार होणार नाही अशी औषधे,  गेली कित्येक दशके वापरात आहेत.  यात मुख्यत्वे आम्ल-निवारक (H2 Receptor Blockers उदा: रॅनटॅक), आम्ल-रोधक (प्रोटॉन पंप इनहीबिटर उदा: ओमेझ), आम्ल-शामक (Antacids, उदा: जेल्यूसील) आणि   ताणनाशक अशी  औषधे अल्सर-रोधक म्हणून गुणकारी ठरली होती.  रॅनटॅक, ओमेझ, जेल्यूसील[1] वगैरे औषधे डॉक-मान्यच नाहीत तर लोकमान्यही आहेत. रोमानोव्ह इतकेच रॅनटॅक, ओल्ड मॉन्क इतकेच ओमेझ आणि जॉनी वॉकर इतकेच जेल्यूसील लोकांच्या ओळखीचे आहे.  मिसोप्रोस्टॉल म्हणूनही एक औषध अॅसिडीटीवर उत्तम म्हणून शोधले गेले होते; पण ते उत्तमरित्या  गर्भपात घडवून आणते असे लक्षात आल्याने सध्या ते त्यासाठी वापरले जाते!!

अल्सरवाल्यांना पोटात प्रचंड जळजळ वगैरे त्रास सुरू व्हायचे. कायम स्वरूपी उपाय नव्हते. वर्षानुवर्षे औषधे घ्यावी लागायची. यातील निव्वळ रॅनटॅकचा खप वर्षाला काही कोटी डॉलरमध्ये होता.  बाकी खडूच्या चवीची पातळ औषधे होती. पण अल्सर खराच बरा  व्हायचा तर महिन्याभरात बादलीभर औषध पिणे गरजेचे होते. ऑपरेशन करून पोटाचा काही भाग कापून काढणे हाही उपाय वापरला जायचा. पण यातून ‘पोट-अपंगत्व’ येऊन, सतत पचनाच्या आणि पोषणाच्या तक्रारी उद्भवायच्या.

1980 सालची गोष्ट.  डॉ. रॉबिन वॉरेन रॉयल पर्थ हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करत होते आणि जठरातल्या  अल्सरमधून त्यांनी काही जंतू वेगळे केले.  हेच मुळी आक्रीत होतं.  जठरात इतके जहाल आम्ल असतं की सहसा  कोणतेही जंतू  तिथे मुक्काम ठोकू शकत नाहीत.

चाणाक्ष वाचकांच्या मनात प्रश्न आलाच असेल, की जर पोटातील हे तेजाब इतके जहाल आहे, जर तिथे जंतूही रहाणे दुरापास्त, जर ते अगदी चिकन-मटणही सहज पचवून टाकतं, तर मग हे आपल्या  पोटालाच कसे नाही पचवत? पोटातल्या अॅसिडनी आणि  तिथल्या पाचकरसांनी पोटालाच  कसे नाही भोक पडत? पडते ना! पोटाच्या अस्तराला वरच्यावर इजा म्हणजेच अल्सर आणि आरपार भोक म्हणजे ‘अल्सर फुटणे’ (Perforation).  

पण सहसा असे घडत नाही. भोक  पडत नाही. कारण पोटाला (आणि आतडयाला) निसर्गत: काही खास संरक्षण लाभलेले आहे. आपणच निर्माण केलेल्या पाचकरसांना तोंड देण्यासाठी जठरामध्ये अल्कधर्मी, चिकट, बायकार्बोनेट आणि प्रोस्टाग्लांडीन्स् युक्त शेंबूड सतत स्त्रवला जातो. अस्तरावर सारवलेल्या शेंबडाच्या या जाडच्या जाड  थरामुळे अस्तराला संरक्षण मिळते.  जठरातील अंतःत्वचाही सतत झडत असते आणि नवीन निर्माण होत असते. अशा रीतीने इजा झालेली त्वचा झडून जात रहाते. हे इतक्या झपाट्याने घडते की दर काही दिवसांनी  संपूर्ण अस्तर  नव्याने निर्माण झालेले असते. गारद झालेल्या सैनिकांची जागा इतरांनी भरून काढावी, तसेच हे. या साऱ्या सीमेवरच्या लढाईसाठी रक्तप्रवाहामार्फत सातत्यानं कुमक पुरवावी  लागते. हा रसद पुरवठाही विनाव्यत्यय अखंड सुरू असावा लागतो.  शिवाय संरक्षणाचे अन्यही प्रकार आहेत. काही स्थानिक संप्रेरके आणि प्रतिकारशक्तीमुळे देखील संरक्षण मिळते. या साऱ्यामुळे आपले पोट स्वतःलाच खाऊन  टाकत नाही आणि तिथे आम्लधर्मी हलाहल असूनही सहसा अल्सर होत नाहीत.

पण उदरातील या आम्लधर्मी हलाहलात  डॉ. वॉरेन यांना जंतू सापडले. जंतूंनी माणसाला नेहमीच चकवलं आहे. समुद्रतळाशी असलेल्या ज्वालामुखीच्या मुखाशीही वाढणारे जंतु आहेत. तेंव्हा पोटातील अॅसिडची काय कथा? ह्या  जंतूंमुळेच अल्सर होत असावा अशी जगावेगळी शंका डॉ. वॉरेनना भेडसावू लागली. हे जंतू प्रयोगशाळेत वाढवण्यात त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. ते वाढवताच येणार नाहीत असं वाटत असतानाच, बऱ्याच धीम्या गतीने, पण पठ्ठे वाढताहेत हे लक्षात आलं आणि पुढील संशोधनाला दिशा मिळाली. झालं असं की एरवी दोन दिवसांत  जंतू दिसले नाहीत तर जंतूंच्या कल्चर प्लेट्स (जंतू शेतीच्या ताटल्या) टाकून दिल्या जात. ईस्टरची सुट्टी आली आणि या प्लेट्स चार दिवस तशाच राहिल्या. मंडळी परतून पहातात तो काय, त्यावर आता जंतूंची उगवण स्पष्ट दिसत होती. आधी कॅम्पायलोबॅक्टर गणला गेलेला हा जिवाणू.   ‘हेलिकॉबॅक्टर’ ह्या नव्याच  प्रजातीचा  (Genus) असल्याचे दिसून आले.

या नव्या, जठर  निवासी जंतूचे नाव ठरले,  हेलिकॉबॅक्टर पायलोरी. म्हणजे  एच पायलोरी. म्हणजे मराठीत वेटोळ्या जठरद्वारकर. वेटोळ्या आकाराचा हा जिवाणू, जठराच्या दाराशी (Pylorus) वस्तीला असतो; म्हणून, पुणेकर, वाईकरच्या चालीवर  जठरद्वारकर.    आता त्यावर हजारो शोध निबंध उपलब्ध आहेत.  निव्वळ हेलिकॉबॅक्टर पायलोरीला वाहिलेली एक संशोधनपत्रिका आहे.

एच पायलोरीमध्ये युरीएजच्या मदतीने  अमोनियायुक्त अल्कधर्मी रसायने  निर्माण करण्याची क्षमता असते. या रासायनिक कवचामध्ये हा ॲसिडमध्ये सुखेनैव विहार करू शकतो. युरीएजच्या  अस्तित्वावरुन पोटात  पायलोरी आहे वा नाही हे श्वासावरून ओळखणारी परीक्षाही उपलब्ध आहे.  शिवाय हा त्या शेंबडाच्या जाड दुलईखाली लपून बसतो. इथे अॅसिड पोहोचतच नाही.    जगात निम्या लोकांच्या पोटात हा जंतू आढळतो पण अल्सर जेमतेम 5-10% लोकांना होतो. असं का? हे कोडं  हळूहळू उलगडायला लागले  आहे. या जंतूंमुळे पोटाला सूज येते (Gastritis) आणि पोटातील स्वसंरक्षक भिंत कोसळून पडते. ही भिंत पोखरायला दारू, सिगरेट पित्त (त्यातील बाईल सॉल्ट), वेदनाशामक औषधे आणि  मानसिक ताण असतील तर मग विचारायलाच नको.

जंतूंमुळे आजार होतो आणि जंतू मारणारे औषध आहे, तेंव्हा सगळ्यांच्या पोटातले सगळे जंतू मारून ही पृथ्वी; म्हणजे मानव; नि:पायलोरी करण्याच्या वल्गनाही केल्या गेल्या आहेत. कारण ह्या जंतूची करामत अल्सरवरच  थांबत नाही. अल्सरचे रूपांतर पुढे कॅन्सरमध्येही होऊ शकतं. त्यामुळे अल्सरवर जंतुनाशक उपचार म्हणजे, काही प्रमाणात तरी, कॅन्सर प्रतिबंध!! पण काही प्रमाणातच.

पण दरवेळी अगदी दातओठ खाऊन शत्रूवर तुटून पडायची गरज नसते. वातावरण संपूर्ण  शत्रू-मुक्त करण्याचे तोटेही असतात. खरं तर एच पायलोरी हे मानवाचे जुने स्नेही.  सुमारे पन्नास हजार वर्ष तरी हा सहप्रवास सुरू आहे.  हा जसा  अपकारक आहे तसा उपकारक देखील आहे.

हा म्हणे भूक नियंत्रित करतो. जगभर थैमान घालणाऱ्या जाडेपणाच्या आजाराला ह्याच्या  अनुपस्थितीने हातभार लागतो म्हणे. सतत घशाशी येणे आणि अन्ननलिकेचा कॅन्सर हेही याच्या अनुपस्थितीत वाढतात. तेंव्हा पोटात शिरलेला कली म्हणून ज्याची निर्भत्सना केली, तो आता सोयराही  ठरतो आहे.

हा म्हणे आपल्या प्रतिकारशक्तीला दिशा देतो. हा नसेल तर निरुपद्रवी घटकांविरुद्धही विनाकारण प्रतिकार शक्तीचे अस्त्र उगारले जाते. मग अॅलर्जीचे प्रमाण वाढते.  थोडक्यात सांगायचे तर अॅलर्जी म्हणजे अती-प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती हे दुधारी शस्त्र आहे बरं.  सध्या करोनाच्या बाजारात इम्युनिटी बूस्टरवाल्यांचे मांडव भरून वहात आहेत. ह्यांच्या औषधाने प्रत्यक्षात इम्यूनीटी  बूस्ट होत नाही हे नशिबच म्हणायचे. नाही तर आफतच ओढवली असती!! असो.

आपले पूर्वज जेंव्हा आफ्रिकेतून स्थलांतर करत दुरदूरचे प्रदेश पादाक्रांत करत होते, तेंव्हा त्यांना नव्या प्रदेशातील, नव्या अन्नावर गुजराण करावी लागत होती. या नव्या अन्नाची अॅलर्जी परवडणारी नव्हती. अशा अटीतटीच्या समयी ह्या एच पायलोरीची संगत उपयुक्त ठरली. आपल्या पोटात शिरून यांनी आपली प्रतिकारशक्ती शांतवली. म्हणूनच आपले पूर्वज, वदनी घेतलेला कवळ सहज हवन  करू शकले, जीवन जीवित्वांत   राखू शकले, नवे नवे अन्न पचवू शकले, जगू शकले, तगू शकले.... आणि ..  आणि .. आणि ..    त्यांना आपण  झालो!! एवढी ह्या जठरद्वारकरांची महती. 

लहानपणी, अस्वच्छतेपायी, बहुतेकदा घरच्याच मंडळींकडून हे जंतू आपल्याला सप्रेम भेट मिळतात. म्हणूनही हा आजार एकाच घरी पिढ्यांपिढ्या आढळत होता.  आता हळूहळू पृथ्वीवर स्वच्छता माजू लागली आहे आणि त्यामुळे ह्याचे प्राबल्य कमीकमी होत आहे. त्यामुळे सध्या हा भिडू कमी माणसांच्या पोटात आढळतो. लहानपणी लागण झाली, की आपण मोठे होईपर्यंत हे जंतू विशेष त्रास देत नाहीत. मोठेपणी ते गॅस्ट्रायटीस, अॅसिडीटी, अल्सर, असा  त्यांचा इंगा  दाखवायला सुरवात करतात. सुदैवाने एकदा एच पायलोरी-मुक्त झालेला माणूस पुन्हा एच पायलोरी-ग्रस्त होत नाही, कारण प्राथमिक लागण ही लहानपणीच सहजशक्य असते. मोठेपणी हे प्रमाण २%हून  कमी आहे.

 अल्सरच्या 80 ते 90% पेशंटमध्ये हे जंतू सापडत होते.  पण सापडत होते याचा अर्थ त्यांच्यामुळे अल्सर होत होता, असा होत नाही.  कोंबडा आरवल्यावर सूर्य उगवतो; पण सूर्य काही कोंबडा आरवल्यामुळे  उगवत  नाही! ‘अ’ नंतर ‘ब’ घडले म्हणजे ‘अ’ मुळे ‘ब’  घडले असे नाही.    हे तर विज्ञानाचे प्राथमिक तत्व. त्यामुळे अल्सरमध्ये जंतु सापडले म्हणजे जंतुंमुळेच अल्सर होतो हे लगेच सिद्ध झाले, असे नाही. अल्सरमध्ये हे जंतू मुक्कामी असतात पण अल्सरला कारणीभूत नसतात, अशीही शक्यता आहेच की. त्यामुळे जंतू आणि अल्सर यांचे कारक (Causative) नाते सिद्ध करणे  हे डॉ. वॉरेन आणि डॉ. मार्शल यांचे वैज्ञानिक कर्तव्य होतं. हे निभावले नाही तर साऱ्यांच्या नाजुक वैज्ञानिक भावनांना धक्का बसणे स्वाभाविक होते. भावनांना धक्का  बसल्याशिवाय  हल्ली कुणी काहीच ऐकून घेत नाही; म्हणून ही शब्दयोजना!

प्रयोगासाठी हे जंतू आता  उंदरात किंवा डुक्करांत  वाढवण्याचे प्रयत्न झाले.  ते फसले. शेवटी सत्यान्वेषी डॉ. बेरी मार्शलनी  स्वतःवरच प्रयोग करायचे  ठरवले! स्वतःवरच प्रयोग करण्याच्या  वेडाचाराची, वैद्यकीला एक देदीप्यमान परंपरा लाभलेली आहे. नवे देशप्रदेश शोधण्याच्या उर्मीपायी अनेकांनी बेधडकपणे तारु समुद्रात लोटली, तसेच हे. डॉ. बेरींनी चक्क या जंतूंचे  कल्चर प्राशन केले! ना  बायकोचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतले, ना हॉस्पिटलच्या प्रयोग-नीतीमत्ता समितीची परवानगी. पण ह्या प्रयोगाच्या बदल्यात त्यांना आणि डॉ. वॉरेनना  नोबेल पारितोषिक मिळाले!!  

डॉ. बेरींनी आधी स्वतःची गॅस्ट्रोस्कोपी (जठर -अंतस्थ पहाणी) करून, आत आधीच जंतू नाहीत ह्याची खात्री केली. मग त्यांनी ते जंतू-द्रावण प्राशन केलं.  काही दिवसातच उलट्या आणि पोटदुखीने ते त्रासून गेले. ह्याचसाठी केला होता  अट्टहास! एरवी हवीहवीशी पोटदुखी बायकांच्या वाट्याला येते. इथे ती डॉ. बेरी भोगत होते.  मग त्यांनी  पुन्हा गॅस्ट्रोस्कोपी करून घेतली. तिथले तुकडे तपासायला पाठवले.  त्यात जंतू, सूज वगैरे रितसर आढळून आले.  मग त्यांनी एच.  पायलोरी नाशक प्रतिजैविके घेतली आणि तक्रारी संपल्या!!

अमुक रोग तमुक जंतूंपासून होतो असे सिद्ध होण्यासाठी डॉ. रॉबर्ट कोख यांनी काही नियम घालून दिले आहेत (१८९०). रोग्यात ते विशिष्ठ जंतू आढळले पाहिजेत.  ते प्रयोगशाळेत वाढवता  आले पाहिजेत. निरोग्याला ह्या  जंतूंचा प्रसाद दिल्यास तो रोगग्रस्त व्हायला हवा आणि आता त्याच्या  शरीरातही ते जंतू सापडले पाहिजेत.   आज सहज, सुबोध आणि कदाचित  बाळबोध वाटणारे हे नियम एकेकाळी जंतूरोगशास्त्राचे दीपस्तंभ ठरले होते. ह्या नियमानुसार डॉ. बेरींचे संशोधन उत्तीर्ण ठरत होते.

पोट, त्यातील जंतू, विविध औषधे, पोटातील युरीएज हे द्रव्य वगैरे बद्दल शतकभर संशोधन चालू होते. ह्या साऱ्याची संगती लावून  डॉ.  रॉबिन वॉरेन आणि डॉ. बेरी मार्शल यांनी आपला मुद्दा सिद्ध केला. असा सगळा पुरावा  सामोरा ठेवल्यावर, हळूहळू वैद्यक विज्ञानाचा त्यांच्यावर विश्वास बसायला लागला.

निव्वळ प्रतिजैविके देऊन जर अल्सर कायमचा  बरा  होणार असेल तर  आपले औषध कोण घेणार?, अशा शंकेने अल्सरची औषधे बनवणाऱ्या कंपन्यांनी या संशोधनावर अघोषित बहिष्कारच घातला. अर्थात प्रतिजैविकेवाल्यांनी हे  संशोधन उचलून धरले हे वेगळे सांगायला नकोच.

पण जंतूंमुळे अल्सर होतो याचा अर्थ तो रम, रमा, रमी, वेदनाशामक औषधे, धूम्रपान, मावा, गुटखा, मानसिक ताणतणाव ह्यामुळे तो होत नाही असा नाही. हे घटक आहेतच, पण त्यांचे महत्व आता कमी झाले आहे. कधीकधी हे जंतु नसतानाही किंवा औषधाने हेलिकोबॅक्टर पायलोरी नेस्तनाबूत करूनही अल्सर आढळतात. ते, ह्या इतर कारणांनी होत असतात. जंतू नसतानाही अल्सर होऊ शकतो पण जंतूंची छावणी पडली असेल तर अधिक तडक आणि कडक आजार  होतो.  आता एच पायलोरीच्या समूळ उच्चाटनासाठी, पाठोपाठ तीन प्रतिजैविके  दिली जातात. परिणामी अल्सरचे प्रमाण खूप घटले आहे. अगदी आपल्याकडेसुद्धा घटले आहे.

ख्रिस्तपूर्व १६७ वर्षापूर्वीच्या एका प्राचीन चिनी देहामध्ये  अल्सरमुळे पोटाला भोक पडल्याचे दिसून आले आहे. ही या आजाराची जगातली पहिली ज्ञात नोंद.  हे सगळे आजार आणि त्यांच्या नोंदी या चिनी, इन्का  किंवा इजिप्तच्या लोकांमध्येच  का असतात? च्यामारी आमच्या पूर्वजांना काय  अल्सर होत नसतील? पण आम्ही पडलो मढी  जाळणारे किंवा पुरणारे. या लोकांप्रमाणे आम्ही आमच्या पूर्वजांचे मुडदे मुरत घातले नाहीत! असो,  वाईट तरी कशाकशाचं  वाटून घ्यायचं?

पुढे जोहान मिकूलिक्स-राडेक्सी (1850-1995) याने अल्सरमुळे पडलेले भोक पहिल्यांदा शिवले म्हणतात.

अल्सरमुळे जठराला आरपार भोक पडू शकतं (अल्सर फुटणे, Perforation).  असं झालं की पोटातला माल आसपासच्या पोकळीत (पेरीटोनियममध्ये) पाझरु लागतो.  यातल्या अॅसिडमुळे सगळीकडे भाजतं आणि  प्रचंड सूज येते.  हा आजार जीवघेणा ठरू शकतो. अचानक पोटात दुखून माणूस काही तासातच गतप्राण होऊ शकतो.  हे सगळं पूर्वी बऱ्याचदा घडायचं. करणी, भानामती, विषप्रयोग, मूठ मारणे  अशा समजुती घट्ट व्हायला हे असे फट् म्हणता जीव घेणारे आजार कारणीभूत ठरले आहेत.

यावर उपाय म्हणजे पोट उघडा, भोक शिवून टाका आणि पोट बंद करा; हे तीन पायऱ्यांचे ऑपरेशन.  पण आजही जेंव्हा हे ऑपरेशन करायची वेळ येते तेंव्हा  डॉक्टरांच्या पुढे अनेक प्रश्न आ वासून उभे असतात.  मुळात ऑपरेशनची गरज आहे का? का औषधावर भागेल?  ऑपरेशन पेशंटला सोसेल का? नुसतेच भोक बुजवायचे का, पोट खोललेच आहे, तर  त्याबरोबर अल्सर पुन्हा  होऊ नये, अशी इतर ऑपरेशनेही करायची? ऑपरेशन करायचे, तर ते पोट खोलून करायचे  का दुर्बिणीतून? असे अनेक प्रश्न.  जर अल्सर फुटून मध्ये बराच काळ गेला असेल तर ऑपरेशन कधीकधी खूप धोकादायक ठरू शकते.  अशावेळी पोटात नळी घालून तेथील  स्त्रावांना  बाहेर वाट काढून देणे आणि सपोर्टीव्ह  औषधे देऊन हरीहरी करत वाट पाहणे हा  (डॉ. टायलर पुरस्कृत) मार्ग तेवढा उरतो. प्रत्यक्षात  कुठल्या पेशंटमध्ये काय करायचं हे ठरवण्यासाठी एक निर्देशांक काढला जातो.  हा तो बोए स्कोअर. पण आता अल्सर फुटणे किंवा तुफान रक्तस्त्राव होणे, अशा क्वचित घडणाऱ्या अपघातामध्येच ऑपरेशन केलं जातं.

आता अल्सरबरोबरच अल्सरसाठीचे  ऑपरेशनही  जवळजवळ इतिहासजमा झाले  आहे. डॉ. बेरींनी ते हलाहल प्यायले. नेमके जंतू सापडले. औषधांनी जंतुंचा खातमा केला. पोटातील संरक्षक यंत्रणा पुन्हा पूर्ववत  झाली. अल्सर कायमचा बरा होऊ लागला. अल्सरशी निगडीत आजारपण, वेदना, गुंतागुंत, ऑपरेशने, असे सारेच  ओहोटीला लागले.

पिढ्या बदलतात तसे ज्ञान आणि तंत्रज्ञानही बदलते.  उपचारही  बदलतात. आजारही बदलतात. आजार बदलतात तसे नवे ज्ञान, नवे तंत्रज्ञान, नवी औषधे जुन्यांना बाद करत जातात. ऑपरेशनेही बाद होतात.  म्हणूनच अल्सर नावाचा जीवघेणा, आयुष्यभराचा, बेभरवशाचा आजार, आज काळाच्या उदरात गडप व्हायच्या मार्गावर आहे. कालाय तस्मै नम:; दुसरे काय?

 

 

प्रथम प्रसिद्धी

अनुभव

फेब्रुवरी २०२२



[1] रॅनटॅक, ओमेझ, जेल्यूसील :-  ही शास्त्रीय नावे नसून बाजारातील नावे आहेत. ती अधिक परिचित म्हणून इथे ती वापरली आहेत.   

Tuesday, 1 February 2022

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी भाग २ भुते आहेत असे का वाटते?

 

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी भाग २ 

भुते आहेत असे का वाटते?

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

दुसऱ्या दिवशी कधी एकदा रात्र होते आणि गूगल आज्जी पुढे गोष्ट सांगते असं झालं होतं दोघांना. आदल्या दिवशी प्रॉमिस केल्याप्रमाणे ती आज, भुते का दिसतात, ते सांगणार होती.

सगळे अंथरूणात  शिरताच आजीने दिवा बंद केला. पण झंप्या जाम  घाबरला. ‘आजी, दिवा  असू दे.’ तो ओरडला.

‘का रे?’

‘भूपी अंधाराला घाबरते!’

आजी लागली हसायला. ‘हो का? मग तीनी  सांगितलं की लावीन मी  पुन्हा. आता भुतं का दिसतात ते ऐक.’  आज्जी सांगू लागली, ‘भुतं काय जगभर आहेत.  जिथे माणसं तिथे भुतं.  दोन हजार वर्षापूर्वी भुतांचे उल्लेख आहेत, दोनशे वर्षापूर्वीचे आहेत, दोन वर्षांपूर्वीचे आहेत आणि दोन दिवसापूर्वीच भूत पाहिल्याचं  सांगणारी माणसे आहेत! भारतात आहेत, आशियात   आहेत, अमेरिकेत आहेत, सगळीकडे आहेत.’

‘तेच तर मी म्हणत होतो. इतक्या सगळ्यांना भुतं दिसतात आणि तू म्हणतेस ती नसतातच. सांग आता, इतक्या सगळ्या माणसांना भूत दिसतं ते कसं?’ झंप्या  तावतावाने म्हणाला.

‘तूच मला सांग, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे साऱ्यांना दिसतंच ना?’ आजी शांतपणे म्हणाली. ‘पण ते खरं आहे का? नाही! म्हणजे खूप जणांना वाटलं म्हणून ते खरं असं नाही म्हणता येणार.’

झंप्या विचारात पडला.  ‘मग सांग ना, भुतं का दिसतात?’

‘भूतं  आपल्या मनात असतात!’

‘मनात; पण मन कुठे असतं?’ भुपीने विचारले. ‘आमच्या पुस्तकात हार्ट आहे, स्टमक आहे, बोन्स आहेत पण मन नाही कुठे दाखवलेलं.’

आजी म्हणाली, ‘अगं मन म्हणजे कुठलाही अवयव नाही. मेंदूच्या अनेक कामांपैकी काही कामांना मन म्हणतात.  विचार करणे,  कल्पना लढवणे, आनंद, दुःख अशा भावना समजणे,  आठवण काढणे, अशी अनेक कामे आपला मेंदू करत असतो. ही कामे म्हणजे मन. मन नावाचा अवयव काही दाखवता येत नाही. जठर, यकृत, आतडी हे दाखवता येतात ‘पचन’ दाखवता येत नाही. तसंच हे.  पण पचनाचे परिणाम आपल्याला दिसतात. म्हणजे आज भेळ खाल्ली, बिर्याणी खाल्ली, की दुसर्‍या दिवशी त्याचे परिणाम दुसर्‍या टोकाने बाहेर पडतात!’

झंप्या आता खुसुखूसू हसू लागला. हा मुद्दा त्याला लगेचच पटला. तो म्हणतो कसा,

‘आणि आज्जी, अपचनाचे तर जास्तच परिणाम दिसतात!’

झंप्याला आता जोरदार हसू फुटलं. ढुस्sss , ढुर्रsss असे आवाज काढून त्यानी मनसोक्त हसून घेतलं.  शेवटी भुपीने टप्पल मारून त्याला गप्प केलं आणि आजी पुढे सांगू लागली,

‘आत गेलेला पदार्थ आणि बाहेर येणारा पदार्थ यातील फरक तुम्हाला माहीतच आहे. हे सगळे पचनाचे कार्य. तसेच मनाचे आहे. मन दिसलं नाही तरी  मनाचे  कार्य आपण अनुभवू शकतो. मनामुळेच  उत्क्रांतीसारख्या किंवा हॅरी पॉटर सारख्या अफाट कल्पना माणसाला सुचतात.’

‘अगं ते सगळं ठीक आहे ग आजी, पण भुतं का नसतात?’ झंप्या अधीरतेने विचारू लागला.

‘अरे मनाला काही चित्रविचित्र भास होतात आणि मग लोकांना वाटतं आपल्याला भूत दिसले.’ आजी.

भुपीला हे विशेष पटलं नाही. ती म्हणाली, ‘माझी एक मैत्रीण हिमालयात ट्रेकला गेली होती. तिथे ती एकटीच मागे राहिली. पुढच्यांना गाठायला म्हणून ती भराभर चालू  लागली. ती चुकून लांबच्या वाटेने जात राहिली.  खूप दमली, खूप भूक लागली होती तिला. शेवटी तर तिला असं वाटायला लागलं की आपल्यामागे मागे कोणी तरी येतंय. मागे वळून पहीलं तर कोणीच नाही! पण सतत सोबत कोणीतरी आहे असं मात्र तिला जाणवत राहिलं. आता हे भूत नाही  तर काय?’

गूगल आजीने दीर्घ श्वास घेतला आणि ती सांगू लागली, ‘हा देखील आपल्या मेंदूचा  खेळ. उंच पर्वतावर जाणाऱ्या माणसांना असा अनुभव बरेचदा येतो. ध्रुवप्रदेशात जाणारी माणसं, एकेकटी समुद्रप्रवास करणारी माणसं, इतकंच काय, जीवावर उदार होऊन मॅरेथॉन धावणारी  माणसं अशा बऱ्याच जणांना असा खास अनुभव येतो.  आपल्या आसपास, आपल्या सोबत कोणीतरी आहे असा अनुभव आल्याचे ते सांगतात.  अती थंडी,  थकवा, भीती, झोपेचा अभाव ह्यामुळे असं होतं. आजूबाजूचं वातावरण अतिशय एकसूरी असेल तरी  असं होतं. हिमालयात तुझ्या मैत्रिणीला नुसता एकच एक, बर्फाचा पांढरा  रंग दिसत होता. आपल्या आसपास माणसं असण्याची आपल्याला सवय असते.  त्यामुळे बराच काळ एकांतवास पदरी आला तर मेंदू आपल्याला आपोआप, आसपास माणसं भासवायला लागतो.  आपण पुन्हा माणसात यावं अशी तीव्र इच्छा, अडचणीतल्या  त्या व्यक्तीला होत असते.  त्यामुळे माणसं आहेतच हा भास आपला मेंदू स्वीकारतो. सारं निर्मनुष्य आहे, या प्रत्यक्षातल्या स्थितीवर, ही समजूत मग  मात करते.’

‘असेल गं, पण ती मैत्रीण तर सांगत होती की मरतानासुद्धा सगळ्यांना स्वर्ग दिसतो. काही माणसं मरता मरता वाचतात.  त्यांनी तसं सांगितलेलं आहे. एक शास्त्रज्ञ अशा खूप माणसांना भेटला. त्यानी पुस्तक पण लिहिले आहे म्हणे.

‘बरोबर आहे. अशी मरता-मरता वाचलेली माणसे बरेचदा आपण स्वर्गात जाऊन आल्याचे सांगतात.  चित्रविचित्र प्रकाश, चेहरे, पारदर्शक माणसं असं काय काय दिसल्याचे अगदी छातीठोकपणे सांगतात.  पण ही माणसे पूर्णवेळ हॉस्पिटलमध्ये असतात, त्यांच्या अंथरुणातच असतात. तऱ्हेतऱ्हेची यंत्रे,  इंजेक्शने, ऑपरेशन वगैरे उपचार  चालू असतात. कशीबशी ती  वाचतात. पण वाचतात म्हणजे काय? मुळात ती ठार मेलेलीच नसतात. मेंदूत वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी केंद्रे असतात.  अर्थातच आजारी झालेला किंवा मार लागलेला मेंदू ज्यावेळी बरा होत असतो,  त्यावेळी मेंदूतील चेहरे ओळखण्याची, उजेड लक्षात येण्याची, ध्वनि ऐकण्याची अशी केंद्रे  वेडीवाकडी उद्दीपित होतात. मग अशी माणसं हे अनुभव आल्याचे, स्वर्ग दिसल्याचे सांगतात.  त्यांचे अनुभव हे खरेच असतात.  ती खोटं बोलत नाहीत.  पण ते त्यांच्यापुरते खरे असतात.  हे अनुभव म्हणजे मेंदूने  निर्माण केलेले भास मात्र. या  आभासी विश्वात सारे काही खरोखरच घडल्यासारखी भावना असते. प्रत्यक्षात तसं काही घडलेलंच नसतं.’

 ‘मेंदूला इजा झाली, डोळ्याला इजा झाली तरीदेखील तऱ्हेतऱ्हेचे भास होतात.  माणसांच्या चेहेऱ्यांच्या जागी चित्रविचित्र अवयव दिसतात, कार्टून्स दिसतात, काहीही दिसते.’

 ‘जेव्हा असे  भास होतात तेव्हा शास्त्रज्ञांनी मेंदूचे फोटो काढलेले आहेत. त्यात कायकाय  बदल होतात याचा अभ्यास नेकीने जारी आहे.’

‘नेकीने जारी आहे म्हणजे?’ झंप्या

‘प्रामाणिकपणे सुरू आहे.’ आजी झंप्याकडे  कौतुकाने पहात उद्गारली.  झंप्याचा हा गुण तिला फार प्रिय होता. काहीही अडलं की तो थेट प्रश्न विचारून लगेच शंकासमाधान करून घ्यायचा. आजी पुढे सांगू लागली, ‘मेंदूच्या कोणत्या भागात इजा झाली की  कोणते भास होतात हे आता आपल्याला माहिती होऊ लागलं आहे’

‘पण मग आजी, मेंदूचे ते भाग कृत्रिमरित्या उद्दिपित केले तरीही भुते, स्वर्ग वगैरे दिसायला हवेत?’ भुपी.   

‘होतात नं. अॅट्रोपीन नावाचे औषध आहे.  ते घेतलं की आपण तरंगतोय, उडतोय असे भास होतात. किटामीन  म्हणून औषध आहे.  या औषधाने देखील आपला देह जागेवर आहे आणि आपण मात्र त्यापासून दूर भटकत आहोत असे भास होतात. अंफीटामीन म्हणून औषध आहेत.  यांनी जुन्या जुन्या आठवणी जाग्या होतात आपण अगदी लहान झालो  आहोत  असं वाटायला लागतं.’

‘आज्जी हे खूपच विचित्र आहे गं. मी उदया  माझ्या मैत्रिणींना हे शास्त्रीय कारण सांगितलं ना, तर त्यांना हे मुळीच पटणार नाही.’ भुपी.

 ‘हो आणि भूत पाहिलेले माझे तीन मित्र आहेत. ते तर मला वेड्यात काढतील.’ झंप्या

‘अगदी बरोबर. नाहीच पटणार. ह्यालाही शास्त्रीय कारण आहे!’

‘क्काय? शास्त्रीय कारण? यालाही शास्त्रीय कारण आहे?’ भुपी.

‘हो आहे.’, आजी ठामपणे म्हणाली.

‘पण ते कोणते, ते आता उदया सांगीन. झोपा  आता.’

 

आजीने आज नेमके काय सांगितले ह्यावर विचार करत आणि उद्या  कोणते गुपित उलगडणार ह्याची कल्पना करत,  दोघे झोपी गेले.

 

प्रथम प्रसिद्धी

किशोर मासिक

फेब्रुवारी २०२२