Friday, 26 November 2021

नरनिवृत्ती

 

 

नरनिवृत्ती

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

९८२२०१०३४९

 

१९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन. महिला दिनाचे हे नर रूप. बालदिन बालांसाठी आणि फादर्स डे फादरांसाठी. पण जे बालही नाहीत आणि फादरही नाहीत अशा पुरूषांचे काय? असा विचार या मागे होता. त्रिनीदादच्या जेरोम तिलकसिंग यांनी १९९९ पासून हा जरा जोमाने सुरू केला.  १९ नोव्हेंबरच का? तर हा ह्या जेरोम तिलकसिंग यांच्या वडिलांचा वाढदिवस म्हणून! आणि हो, १९८९ साली, याच दिवशी, त्यांच्या देशाच्या फुटबॉल टीमच्या वर्ल्ड कपसाठीच्या निवडीमुळे  सारा देश एकवटला होता!! दिवसाची निवड ही अशी तद्दन पुरुषी निकषांवर आणि  पुरुषसुलभ गांभीर्याने   झालेली आहे.  आता हा  पुरुष दिनाचा संसर्ग पसरू लागला आहे. उत्सवी भारतीयांच्या ‘दिन दिन दिवाळीत’ आणखी एका उत्सवाची भर.

या वर्षी स्त्रीपुरुष सौहार्द अशी थीम आहे. सौहार्द म्हणजे मैत्रभाव वाढायचा तर समानधर्मा भेटायला हवा. स्त्रीधर्म(!) आणि पुरुषधर्म यात साम्यस्थळे शोधायला हवीत. म्हणून हा लेखन प्रपंच.

मेनोपॉज म्हणजे काय हे सर्वज्ञात आहे. सर्वश्रुत तरी आहेच आहे. ते नाही का, वाढत्या वयात बायकांची पाळी जाते मग त्यांना काय काय व्हायला लागतं. भर थंडीत घाम फुटण्यापासून ते अंगभर गरम वाफा जाणवण्यापर्यंत किंवा नैराश्यापासून ते डोके फिरण्यापर्यंत! ह्याचं मुख्य कारण स्त्रीबीजग्रंथीतून होणारा स्त्रीरसांचा (Female sex hormones) निर्झर आटणे आणि मुख्य परिणाम म्हणजे जनन क्षमता संपणे.

पुरुषांचेही वय वाढते. पुरुषरस  निवळतात. पण जनन क्षमता अचानक संपत बिंपत  नाही. थोडी मंदावते. पण अखेरपर्यंत  तेवत रहाते.  म्हणूनच जराजर्जर पुरुष बाप झाल्याच्या बातम्या, आपल्याला अधूनमधून वाचायला मिळतात.  एरवीही स्त्रीबीज निर्मिती महिन्यातून एकदा, तर पुरुषबीज निर्मिती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. शनिवारी हाफ डे, हनुमान जयंतीला सुट्टी वगैरे भानगड नाही.

पण वय  वाढल्यावर, पुरुषरस (Androgens) निवळल्यावर; पुरुषांना नाही का काही त्रास होत? होतो ना. वय वाढलं की पुरुषांत देखील अनेक बदल दिसायला लागतात. शारीरिक आणि बौद्धिक थकवा, नैराश्य, चिडचिडेपणा, विस्मरण, स्नायू रोडावणे, पोट सुटणे, केस विरळ होणे, कामेच्छा कमी होणे, ताठरता मिळमिळीत होणे वगैरे. लिंगवैदूंच्या जाहिरातीच्या भाषेत सांगायचं तर,   ‘पूर्वीचा जोम आणि जोश’ आता रहात नाही. कमीअधिक प्रमाणात सर्वांनाच हे अनुभव येत असले तरी सुमारे २ ते ५ % पुरुषांत त्रासदायक प्रमाणात ही लक्षणे दिसतात.  

बायकांचे एक बरं  आहे, पाळी बंद होणे, हे ऋतूनिवृत्तीचे वय झाल्याचे, एक व्यवच्छेदक लक्षण आहे.  एक पूर्णविराम.  पुरुषांच्यामध्ये असा पूर्णविराम आढळत नाही.  स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह, मधूनच प्रश्नचिन्ह असं करत करत वाक्य जारी  रहातं.  ते संपतच नाही.  

पण महिलांमध्ये जसा मेनोपॉज (ऋतूनिवृत्ती) तसा पुरुषांमध्ये  अँड्रॉपॉज (नरनिवृत्ती) असतो का? किंवा का असू नये? किंवा असणारच की! अशी चर्चा सतत चालू असते. पण अँड्रॉपॉजची नेमकी आणि सर्वमान्य व्याख्या अजूनही नाही. मुळात अँड्रॉपॉज असा शब्द वापरावा; का त्याला अन्य काही नाव द्यावं, हेही अजून ठरलेले नाही. काहींच्या मते तर  अँड्रॉपॉज हा शब्द निव्वळ मेनोपॉजला  खुन्नस म्हणून काढला आहे! तर काही म्हणतात, मेनोपॉजच्या मानानी अँड्रॉपॉज हा अघळपघळ प्रकार असल्याने त्याकडे फारसे गांभीर्याने कुणी पहातच नाही. गरीब बिच्चाऱ्या पुरुषांना कुढत कुढत, मन मारून जगावं लागतं.

जे बदल होतात ते वयानुरूप होतात?, वाढत्या स्ट्रेसमुळे होतात?, जाडगुलेपणामुळे होतात?, का सोबतच्या डायबिटीसमुळे?, का  इतर  औषधांमुळे? का फक्त आणि फक्त नरनिवृत्तीमुळे आहेत? हा गुंता अजून सुटलेला नाही.

बरचसं पुरुषत्व  टेस्टोस्टेरोन ह्या पुरुषरसाशी निगडीत असतं. टेस्टोस्टेरॉनचा उगम वृषणामधल्या (Testes) लेडीग  पेशींमधला.   वयाबरोबर या कमी होतात. यांना मेंदूकडून येणारे प्रोत्साहनपर संदेश कमी होतात. ह्या संदेशांना प्रतिसाद अशक्त होतो. त्यामुळे टेस्टोस्टेरोन  कमी निर्माण होतो. इतकंच काय,  वयाबरोबर शरीराकडून  टेस्टोस्टेरोनला मिळणारा प्रतिसादही कमी कमी  होत जातो. शरीरसुद्धा, आज वेड्या पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, असं काहीतरी म्हणत असतं.

टेस्टोस्टेरोन  बद्ध (९८%)  आणि मुक्त (२%) अशा दोन्ही अवस्थांत आढळतो. पैकी बद्ध तो निरुपयोगी.  मुक्त तेवढा उपयोगी.  हा मुक्त टेस्टोस्टेरॉन आणि त्याची इतर काही कार्यप्रवण (जैवोपलब्ध Bioavailable)  रूपे  महत्वाची  आहेत.  वयाबरोबर मुक्त टेस्टोस्टेरोनमध्ये वार्षिक १% घट होत रहाते. काही औषधांचा सहपरिणाम म्हणून आणि   वाढत्या वयाशी संबंधित निरनिराळ्या आजारांमध्येही  मुक्त टेस्टोस्टेरोन कमी होतो. पैकी आटोकाट प्रयत्नाने’ आवर्जून आटोक्यात ठेवावा असा घटक म्हणजे, पोटाचा वाढत घेर.

पण अमुक इतक्या प्रमाणात टेस्टोस्टेरोन घटलं  म्हणून तमुक लक्षणे उद्भवली असा एकास एक परिणाम इथे दिसत नाही. त्यामुळे नेमकं संशोधनही जिकिरीचे आहे.

जर का टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे इतकं  सगळं  होत असेल तर ती कमतरता भरून काढणारी तारुण्याची  गुटिका असायला हवी. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर, नरनिवृत्तीच्या  तक्रारी घेऊन येणाऱ्या, प्रत्येक पुरुषाला सहजपणे हातावर टेकवता येईल, अशी गुटिका नाहीये.  ज्यांचं  अगदीच अडलं  आहे अशांना प्रायोगिक तत्त्वावर, साधक-बाधक विचार करून, टेस्टोस्टेरोन देता येतं.  थेट टेस्टोस्टेरोनच्या गोळ्या विशेष उपयोगी पडत नाहीत.  गोळीतले टेस्टोस्टेरोन शरीरात पोचायच्या आधी लिव्हरमध्ये खाल्लास केले जाते. असं होऊ नये म्हणून काही खास प्रकार वापरावे लागतात. इंजेक्शन,  जेल आणि पॅच (चिकटपट्टी) अशा स्वरूपामध्येही  हे उपलब्ध आहे. पण या साऱ्याच्या सुयोग्य डोसबाबत  आणि सुयोग्य कालावधीबाबत  अजूनही संदिग्धता आहे. आधी ते  काही कालावधी पुरतं देऊन, त्यानंतर त्याचे परिणाम आणि सहरिणाम पहात पहात, आवश्यकतेनुसार ते चालू ठेवायचे आहे. उदाहरणार्थ  प्रोस्टेट वाढणे आणि प्रोस्टेटचा   कॅन्सर देखील टेस्टोस्टेरोनशी संबंधित असतो.  त्यामुळे टेस्टोस्टेरोन द्यायचं झालं तर पीएसए आणि इतर तपासण्या करून दमादमाने द्यावे लागते.

टेस्टोस्टेरॉनमुळे चरबीचं प्रमाण कमी होतं,  हिमोग्लोबिन वाढतं (कधी जरा जास्तच वाढतं), स्नायू जरा पिळदार होतात, काही महिने औषधे घेतली तर हाडांची घनताही वाढल्याचे आढळते. एकूणच बरं वाटायला लागतं. कामेच्छासुद्धा वाढते.  पण काम-गिरी  मात्र पूर्ववत होईल असं नाही.  कारण ती बिघडण्यासाठी इतरही अनेक कारणं असतात (डायबेटीस, तंबाखू वगैरे). गरजेनुसार या बरोबर ते जगप्रसिद्ध  व्हायग्राही देता येते.

टेस्टोस्टेरॉनचे असे अनेक इच्छित परिणाम दिसत असले तरी त्याने ईप्सित साध्य होतं का, म्हणजे नरनिवृत्ती सुखावह होते का? ते सरसकट सगळ्यांना द्यावे का? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. यासाठीचा पुरावा तसा लेचापेचा आहे.

थोडक्यात नरनिवृत्ती असतेही आणि नसतेही, त्याला उपचार आहेतही आणि नाहीतही.  मुळात बायकांचे सगळेच गहन आणि गूढ असतं असा समज आहे.  पण पुरुषांची ‘ही’ भानगड अजून भल्याभल्यांना उलगडलेली  नाही.

स्त्री पुरुष सौहार्दासाठी एवढे साम्य सध्या रगड.

जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा.

 

प्रथम प्रसिद्धी

लोकरंग पुरवणी लोकसत्ता

२७/११/२०२१

 

 

 

Monday, 1 November 2021

राधिकासांत्वनम्

 

राधिकासांत्वनम्

डॉ. शंतनू अभ्यंकर

 

तंजावरचं मराठी राज्य म्हणजे एक वेगळंच रसायन. इथे मराठी भाषिक राजे, तमिळ भाषिक प्रजेवर राज्य करत होते आणि राज्य व्यवहाराची भाषा होती तेलगू. ह्या असल्या संस्कृती  संकरातून काही निराळेच साहित्य-कला–नृत्य-नाट्य जन्माला आलं.

राजे प्रतापसिंह  (राज्यकाळ १७३०-१७६३) स्वतः काव्य शास्त्र विनोदात रमणारे. कृष्ण मंजिरी, उमा संहिता, पारिजात नाटक  इत्यादि कलाकृतींचे कर्ते. त्यांचा दरबारात  दूरदूरच्या साहित्यिकांची  आणि कलाकारांची  गजबज. छिन्नैया, पोंनीया, शिवनंदम आणि वादिवेळू  हे बंधु ह्या दरबारातले मानकरी. यांनी  कर्नाटक संगीताचा आणि भरतनाट्यमचा पाया रचला.

पण तंजावरची प्रसिद्धी कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका    अशी, काही आज आपल्याला धक्कादायक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध, अभिमानानी मिरवली जाणारी परंपरा होती.  ह्या स्त्रिया ‘शैय्येशू रंभा’ तर होत्याच पण त्यातल्या बऱ्याच   चौदा विद्या  आणि चौसष्ठ कलांमध्ये पारंगत होत्या. ह्या गणिकांनाही  पत  होती, प्रतिष्ठा होती. जमीनी, वर्षासने होती. एकूणच कोणत्याही मंदिराची अथवा राजमंदीराची पत-प्रतिष्ठा तिथे असलेल्या नगरवधूंवर ठरायची. 

तर अशा ह्या काळात राजे प्रतापसिंहांची भोगपत्नी होती; मुद्दूपलनी (१७३०-९०). अनुपम सुंदर, बुद्धिमान, हजरजबाबी, चतुरबुद्धी आणि शृंगारनिपुण अशी ही नारी; बहुभाषा कोविद होती. सात ओळींची, सप्तपदी  अशी स्वतंत्र काव्य रचणारी होती.

तर अशा या मुद्दूपलनीची एक रचना आहे, राधिकासांत्वनम्.

इथे सांत्वन म्हणजे मऱ्हाठी सांत्वन नाही. हे तेलुगू सांत्वन. सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त  आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य आहे. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची  गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या अंतःपुराचीच नाही,  तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते.

या काव्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत.  मुख्य म्हणजे हे एका स्त्रीने लिहिलेले आहे. ही कवयत्री कोणी उच्चकुलीन, उच्चभ्रू,  विदुषी नाही तर चक्क एक गणिका आहे.  आपल्या विहित  कामात ती माहीर आहे.  तिने केलेल्या कामक्रीडेचा वर्णनावरून हे अगदी सहज स्पष्ट होतं.  स्वतःबद्दल तिला अभिमान आहे. सोबत  विलक्षण आत्मविश्वास आहे आणि आश्चर्यचकित करणारा मोकळेपणाने आहे.  कुठलाही आडपडदा न ठेवता, जे सांगायचे ते थेटपणे सांगण्याची तिची धमक आहे.

मराठीमध्ये कोण्या स्त्रीने, इतकं शृंगारीक लिहिलेले माझ्यातरी माहितीत नाही. अठराव्या शतकात नाही, एकोणिसाव्या, विसाव्या आणि एकविसाव्या शतकातही नाही. अश्लीलता  हा प्रांत पुरुषांचा.  अर्थात याचा अर्थ स्त्रियांनी तसे लिहिलंच नसेल, लिहीतच नसतील किंवा लिहिणारच नाहीत असं नाही. बहुतेकदा हे लिखाण, इतरही  साऱ्या भावभावनांच्या  आणि कलांच्या आविष्काराबरोबर, काळाच्या उदरात गडप झालेले असणार.

राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे.  पण राधाकृष्णाची बहुतेक   प्रेमकाव्ये  कितीही  सुंदर, कितीही  उत्तान, शृंगारिक आणि कामूक वर्णनांनी परीप्लुत असली  तरी अखेरीस राधाकृष्णाचे  मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन,  जीवाशिवाची भेट, आत्म्याचे परमात्म्याशी मिलन,   असा काहीतरी शेवट करून एकदम अध्यात्मिक होऊन जातात.  मुद्दूपलनी असला गुळमुळीतपणा अजिबात करत नाही.  कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन, इला,  यांचे नाते अगदी जमिनीवरचे, मानवी, शारीर आणि जैविक आहे, असा तिचा अखेरपर्यंतचा सूर आहे.  ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार तिने केलेला नाही

नमनालाच आजी तंजनायकीच्या प्रसिद्ध गणिका कुळात आपला जन्म झाल्याचं ती सांगते. पुढे  कलाकारी, विद्याव्यासंग, लोकप्रियता याबद्दल तर ती सांगतेच, पण स्वतःचे मोहक सौंदर्य आणि तिनी काही लेखक, कलावंतांना दिलेला उदार आश्रय याबद्दलही सांगते. मग राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू होते.  

राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहे. या काव्यातील पोक्त, कृष्णनूरक्त  राधा,  तरुण्याबांड  कृष्णाचे आणि  तारुण्याने मुसमुसत्या  इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते.  तो येतो. पण डिवचली गेलेली राधा त्याला  मुळी जवळसुद्धा  येऊ देत नाही. त्याला  राधेची आर्जवं करायला लागतात, नाकदुऱ्या   काढायला लागतात, अगदी पायही धरावे लागतात. तरीही राधा त्याला धिक्कारते. चक्क लाथ मारते! मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिचे अंगप्रत्यंग चेतवतो. कामाग्नी भडकून  उठतो आणि दोघांचे मिलन होतं. राधिका सांत्वन सुफळ संपूर्ण होतं.

यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, कामातूर पण तितक्याच  हळव्या आणि हट्टी. इला, प्रथमच हे भोग अनुभवणारी कुमारिका;    तर राधा, अनुभवी, प्रौढ,  प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि इथला कृष्ण; आपला नेहमीचाच, दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जीवाला.  

पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या  आहेत. प्रेम आणि त्याच्या साऱ्या शारीर अविष्कारात बरोबरीने शरीक होणाऱ्या आहेत. आपल्याला जे हवे ते उघडपणे मागून घेणाऱ्या आहेत. तृप्तीची  अनुभूती मोकळेपणानी  व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, कोवळा आणि प्रौढ असे दोघींचे  संभोगानुभव, वीरह, असूया, स्व-पीडन, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही मुद्दूपलनी उलगडून दाखवते आणि दाखवते ते एक स्त्रीच्या नजरेतून दाखवते. हा नजारा  थक्क करणारा  आहे. हे काही अचकट विचकट शिमग्याचं गाणं नाही. अतिशय भावोत्कट आणि कामोत्कट असं रसाळ काव्य आहे.

राधाकृष्ण आणि कृष्णइलाच्या अंगसंगाच्या, अत्यंत सविस्तर, शृंगारिक आणि उत्कट वर्णनासाठी हे काव्य गाजलं. मुद्दूपलनी  हे सारं काव्य शुक मुनि आणि राजा  जनक यांच्या संवादातून मांडते. इतकं थेट आणि इतकं मोकळंढाकळं वर्णन आणि तेही एका बाईनं करणं समाजाला रूचणार नाही हे ओळखून  ही युक्ति योजली आहे की त्या काळातल्या प्रथेला अनुसरून हे लिहिले आहे; हे कळणे अवघड आहे.

ह्या काव्याला महाराजांची, दरबाऱ्यांची, रसिकांची बरीच वाहवा मिळाली. पुढे ब्रिटिश साम्राज्याचा उदय झाला. राजेशाही प्रथापरंपरा काळाच्या पोटात गडप झाल्या.   इतिहासात अशा कित्येक मुद्दूपलनींची   कित्येक काव्य काळाच्या पोटात गडप झाली असतील. तसंच हेही व्हायचे होते.  पण नागरत्नम्मामुळे (१८७८-१९५२) तसं काही झालं नाही.

नागरत्नम्मा ही देखील एका गणिकेचीच मुलगी. म्हैसूरची.   वयाच्या पाचव्याच वर्षी देवदासी म्हणून सोडलेली.  इंग्रजी, संस्कृत वगैरे बरोबरच ती व्हायोलिन आणि नृत्य निपुणही झाली. रसिक आणि संस्थानिकांकडे तिला निमंत्रणे येऊ लागली. बक्कळ पैसा मिळवला तिनी. इतका की इन्कम टॅक्स भरणारी ती पहिली नृत्यांगना!!!

पण एके रात्री तिला दृष्टान्त झाला. त्यागराज ह्या कर्नाटक संगीताच्या महागुरूंच्या स्मृतिसेवेत तीने स्वतःला वाहून घेतले. संन्यस्त जीवन स्वीकारत तीने आपली सारी पुंजी ह्या गुरूंच्या कार्याला, स्मारकाला वाहिली. तिनी नावारूपाला आणलेल्या ‘त्यागराज आराधना’ संगीत महोत्सवात आजही बडेबडे कलाकार आवर्जून आपली सेवा रुजू करत असतात.

तर अशा ह्या नागरत्नम्माच्या वाचनात हे काव्य आलं. श्री व्यंकटनरसू यांनी संपादित केलेली ही पहिली छापील आवृत्ती १८८७ सालची. तिनी  त्याची महती जाणली आणि काळाच्या उदरात गडप होऊ पहाणारे हे माणिक मोठ्या कष्टाने वाचवले. आपल्यासारख्याच एका  गणिकेने लिहिलेले काव्य म्हटल्यावर तिला त्याबद्दल विशेष ममत्व. अव्वल इंग्रजी काळातली ही आवृत्ती अर्धवट तर होतीच पण संस्कृतिरक्षणाच्या दृष्टीने  शुद्धीकरण केलेलीही होती. शुद्धिकरणाच्या या उत्साहात काही महाभागांनी तर मुद्दूपलनी हे स्त्रीवाचक नाम  बदलून मुद्दूपिल्लई असे पुरुषवाचक  केले होते आणि त्यातला शृंगार सुसह्य करून घेतला होता!   

बऱ्याच प्रयत्नानी, १९१० साली, नागरत्नम्मानी हे काव्य मूळ स्वरूपात प्रकाशित केलं. पण अठराव्या शतकात दरबारी मान्यता असलेलं हे काव्य दीडशे वर्षानंतर तेलगू साहित्यविश्वात अश्लील ठरलं.  आता काळ बदलला होता. दीडशे वर्षात  तेलुगु समाजातही अनेक बदल झाले होते.  मुख्य म्हणजे तंजावरचे राज्य ब्रिटीशांना अंकित झालेले होते.  जमाना राणी विक्टोरियाचा होता आणि मंडळी स्वतःकडे  आणि स्वतःच्या संस्कृतीकडे, ब्रिटिश नितीमत्तेचच्या  चष्म्यातून पहात होती. श्लिलअश्लीलतेच्या नव्या कल्पनांचा वावर होता. देवदासी कायद्याचा बोलबाला होता.  देवदासी आणि गणिका हा आता अप्रतिष्ठेचा विषय होता.

   आघाडीच्या लेखक कवींनी  हे काव्य लज्जास्पद आणि स्त्रियांनी वाचण्या-ऐकण्यास अयोग्य ठरवलं. एका  ‘धंदेवालीनी’, ‘बाजारबसवीनी’, ‘वेश्येनी’ लिहिलेलं असल्यामुळे हे लिखाण बदनाम ठरणं अगदी सोपं आणि स्वाभाविक झालं. ‘असल्या’ बाईला कुलीन शालीनता कुठली असायला? मोठा गदारोळ उठला. इतकं उघड आणि इतकं कामूक काव्य आणि तेही एका गणिकेने लिहिलेले म्हटल्यावर अनेकांची माथी भडकली. ‘ह्या असल्या बायका हा असला निर्लज्जपणा करणारच’, असा एकूण सूर होता. मग, ‘पुरुषांनी वाट्टेल ते, वाट्टेल तसं,  लिहिलेले चालते आणि बायकांनी थोडे जरी कामोत्कट  लिहिले तर लगेच ते अश्लील ठरवणारे तुम्ही कोण?’, ‘दोन डझन तथाकथित अश्लील कडव्यांसाठी अख्ख्या कवीतेवर बंदी का?’ असे प्रश्न उपस्थित झाले.    हा सगळा वादाचा घोळ आणि टीकेचा लोळ पहाता इंग्रज सरकारने ह्या (आणि अशाच आठ इतर जुन्या) पुस्तकांवर सरळ  बंदीच घालून टाकली (१९११).

नंतर पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मुख्य म्हणजे स्वातंत्र्य मिळालं.  मद्रास प्रांताचे आणि नवनिर्मित आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री टी. प्रकाशन हे, आपल्या यशवंतरावांसारखेच,  मोठे रसिक आणि जाणकार नेते होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर ही बंदी उठवली आणि म्हणाले, ‘तेलुगू साहित्य हारात मी आज काही तेजस्वी मोती ओवले आहेत.’ 

हे काव्य सगळं जुन्या, संस्कृतप्रचुर  तेलुगूत आहे. तेलुगू प्रबंधकाव्याच्या परंपरेला अनुसरून,  छंदोबद्ध  आणि  वृत्तबद्ध आहे.  मला तेलुगू येत नाही. ह्याचा  इंग्रजी अनुवाद माझ्या वाचनात आला.  संध्या मूलचंदानी यांनी तो  केला आहे (द अपीजमेंट ऑफ राधिका, पेंग्विन प्रकाशन). तो मुक्तछंदात आहे. पण त्यातूनही काव्याची उत्कटता मनाला स्पर्शून जाते आणि माझ्यासारख्या कोणाला हे काव्य इंग्रजीतून मराठीत आणायला भाग पाडते. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे चुलत भाषांतर. तेंव्हा अर्थ आणि आशयाच्या कित्येक गोच्या ह्यात असतीलही. जाणकारांनी त्या जरूर दाखवाव्यात. पण ह्या काव्याचे हे परावर्तित सौंदर्यही बहुत देखणे आहे. इतके की मूळ  काव्य किती भरदार, किती बहारदार, किती रसाळ आणि लालित्यपूर्ण असेल ह्या कल्पनेनीच मी मोहरून गेलो. वेरूळ अजिंठ्याला जावं आणि मानवाचे आणि काळाचे नख लागलेल्या त्या  कलेच्या मूळ रूपाच्या नुसत्या कल्पनेनेच  डोळे भरून  यावेत, तसं झालं मला.

इंग्रजी भाषांतर ओळीला ओळ अशा पद्धतीने केले आहे.  त्यातून आपल्याला अर्थ तर समजतोच  पण बऱ्याच ठिकाणी मूळ शब्द काय असेल हेही ओळखता येते. ‘द स्टीलर  ऑफ हार्टस’, म्हणजे चित्तचोरटा, ‘वन हू वएर्स  द कौस्तुभ जेम’, म्हणजे कौस्तुभधारी, वगैरे वगैरे.  मी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला.  छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर मुळी अठराव्या शतकातील वाटणारच नाही. मूळ  छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही.  मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी  लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार मी करत गेलो. समवृत्त भाषांतर करायचे तर या कामात मदत करणारा  तेलुगू जाणकार हवा.  मला प्रयत्न करूनही असा माणूस  सापडला नाही.  

भाषेचा पोत कसा  असावा याचा विचार करता करता मी ठरवलं की, मुद्दूपलनी तंजावरऐवजी जर पुणे दरबारी असती तर तिने हे काव्य कसे रचले असते; अशी कल्पना करत मी  भाषांतर पूर्ण केलं. फार जुने  शब्द वापरले तर दुर्बोधतेची शक्यता आणि फार नवे वापरले तर काळ-संदर्भ हरवण्याची शक्यता लक्षात घेत, ही तारेवरची कसरत पार पडली. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी  आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली मी वापरल्या. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले. अशा युक्त्या वापरून हे भाषांतर केलेले आहे.

इंग्रजी भाषांतर मुक्तछंदात असलं तरीही उत्तम आहे. मूळ काव्याशी जितके इमान राखता येईल तितके  भाषांतरकर्तीने राखलेले आहे. पण प्रश्न इमानाचा नाही.  इंग्रजी आणि तेलगू या दोन्ही भाषा दोन भिन्न संस्कृतीतून येतात. ही एक मोठी मर्यादा ठरते.  भाषा आणि संस्कृती या अगदी राधाकृष्णासारख्या एकजीव झालेल्या  असतात.  त्यामुळे तेलुगुमधून इंग्रजीत भाषांतरताना बरंच काही मागे रहातं. त्यामानाने तेलगु आणि मराठी, राधा आणि इलासारख्या आहेत. त्यांच्या प्रेमाचा मूळ सखा, म्हणजे संस्कृत आणि संस्कृती, एकच आहे. त्यामुळे तेलुगुतून इंग्रजीपेक्षा तेलुगूतून मराठीत भाषांतर हे निश्चितच सोपे आहे.  इंग्रजीमध्ये मदनाला ‘लव गॉड’ असा  एकच  शब्द जागोजागी वापरला आहे.  मदनाला कितीतरी सुंदर शब्द आहेत.  कामदेव आहे, रतिदेव  आहे,  रतिकांत आहे, मंन्मथ  आहे,  स्मर, कंदर्प, मनसीजा आहे. इतके सारे शब्द आणि त्याबरोबर येणारे अर्थ इंग्रजीत कसे यावे बरे? तीच गोष्ट हत्ती किंवा कमळ अशा शब्दांबद्दल.  हत्ती आणि कमळाला तेलुगू, मराठी, संस्कृतात; एकूणच भारतीय भाषांत कितीतरी सुंदर, अर्थवाही,  समानार्थी शब्द आहेत. इंग्लिशमध्ये एलिफंट आणि लोटस, एवढ्यावरच भागवावं लागतं. सगळेच शब्द अर्थाचे आणि संदर्भांचे एक गाठोडे बरोबर घेऊन येतात. उग्रदेव म्हणजेही शंकर आणि भोलेनाथ म्हणजेही शंकरच; पण दोन्ही शब्दातून मनात उभ्या रहाणाऱ्या  प्रतिमा किती भिन्न आहेत. ही प्रतिमासृष्टी परक्या भाषेत घेऊन जाणे अशक्यच.

तर अशा या हटके काव्याच्या, हटके भावानुवादाचा मासला, खास ‘चौफेर’च्या वाचकांसाठी, त्यांची दिवाळी (आंबट)गोड व्हावी म्हणून. 

 

ह्या अत्यंत उत्कट काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते.  

 

थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी,

शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही.

आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे;

का  हरी कटाक्ष पुरे,  चमकाया नयनदले?

आणि तिची कायाही, सौदामिनी माया-ही,

म्हणून घननिळ्याठायी,  अंगांगी भिनली ही. 

आणि तिची सानपदे, कलिकांचे जणू झुबके,

म्हणून श्याम स्पर्शाने, मोहरले, फुलले ते.

आणि तिची वक्षस्थळे, नसती जर गिरिशिखरे,

साहिती कैसे प्रहार, केले जे कृष्ण बळे?

 

मग षोडशा इलेचं वर्णन येतं.

 

कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना;

सलज्जा, मृगनयना, गच्च मिरवी  स्तनांना;

यौनजंघा, कृशकटीही; चाल वक्री, गाली लाली;

मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही

 

नुकत्याच वयात आलेल्या इलेला मोठ्यांच्या जगाबद्दल, स्वाभाविकच, विलक्षण कुतूहल आहे. अशा अल्लड वयात तीही कृष्णावर भाळते आणि तिच्या मनात कृष्णप्रेमाची कारंजी  उसळून येतात.

 

लपंडावी  डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला.  

शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता.

नदीकिनारी साधून मौका,  इला झोंबते हरीच्या अंगा.

सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर.

सख्यांस कौतुक सखिचे नवथर!

उधळून यौवन, धीट, खोडकर!!

इला भाळली श्री कृष्णावर!

 

कृष्ण आणि राधेचं  काय काय  चाललंय हे तिच्या नजरेतून सुटत नाही. सतत ती स्वतःची तुलना राधेशी करत रहाते.

 

गच्च कलशसे  उरोज, राधा, जेंव्हा अर्पी राक्षसदमना;

न्यूनपणाची होऊन बाधा,  मनी खंतावे उगाच इला.

ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा;

दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला,

शेजघरी ने कृष्णा, राधा;

म्हणे ‘आले मी’, इला बाला!!

मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!

 

राधा छोटी इला  मोठी होण्याची आतुरतेने वाट पहाते आहे. तिनी इलेला खास खुराक चालू केला आहे. तारुण्याच्या एकेक खुणा दिसायला लागताच राधा आनंदून जाते.

 

कधी म्हणे विनोदे राधा, 

‘ही मला सवत होई का?’

पण पाहताच इलेला,

उरी उधाण ये मायेला,  

कुस्करी मग वारंवार,

चुंबीते गोबरे गाल.

 

‘ही मला सवत होई का?’; राधेच्या मनातला हा खेळकर  संदेह खरंतर पुढे काय घडणार आहे ह्याचा सूचना देतो. पहिल्याच प्रसंगात पुढील नाटकाचा अर्क सांगून टाकायचा, पण पुढचा खेळच इतका रसरशीत मांडायचा  की रसिकाचे चित्त मुळी  विचलितच  होणार नाही, हा तर भल्या भल्या साहित्यिकांचा आवडीचा खेळ. असा चित्तवेधक खेळ मुद्दूपलनी पानोपानी मांडत जाते. इलेला ऋतुप्राप्ती  होते..

 

आणि अचानक, पण वेळेवर,

ऋतुप्राप्तीची सुटे वावटळ. 

त्या वादळवाऱ्याच्या संगे,

वाहून गेले भोळे शैशव.

 

आणि उमलत्या शरीराबद्दल वर्णन येते..

 

वक्षस्थळे अशी उत्तुंग,

लज्जित हो शैल शृंग.    

वाढता उभार गच्च,

इला; स्तंभित! सलज्ज. 

मानसरोवरी फुलल्या;

वर्खलिप्त जुळ्या  कळ्या.

 

मग इलेचा नहाण विधी केला जातो.  त्याचे सविस्तर वर्णन येते. पाठोपाठ इला आणि कृष्णाच्या लग्नाचंही वर्णन येते. अर्थात हे वर्णन आपल्याला परिचित असेच आहे. इला-माधवाच्या सोहळ्याला दिपवतील असे ‘उत्सव बहू थोर होत’, आपण आसपास पहातो आणि अनुभवतो आहोतच. कृष्णाला लग्नासाठी नटवणाऱ्य गोपीनचे वर्ण वाचून एक मात्र नक्की समजते, पार्लरवाल्या  बायकांचा धंदा तेंव्हाही तेजीत होता आणि अगदी ‘नरवर कृष्णासमान’ही  तेंव्हा उत्साहानी  नटत होते!

पण लग्नानंतर राधा इलेला जो उपदेश देते आणि कृष्णाला जो ढोस देते तो मात्र बहारदार आहे. मधुचंद्राची रात्र आहे. ह्याला ‘शोभिनी’  असा तेलुगू शब्द आहे, म्हणे. ह्या मानानी मऱ्हाठी मधुचंद्र म्हणजे अगदी बीजगणितातील समीकरण आहे; हनी+मून=मधू+चंद्र!! ग्रामीण भागात याला  ‘सोळक’ असा एक शब्द प्रचलित आहे, म्हणजे होता. पण ते असो. राधा इलेला काय सांगते हे महत्वाचं आहे.

 

‘प्रेमिक जेंव्हा दे आलिंगन

साधून घेई उरोज मर्दन,

तो गालीचे घेता  चुंबन,

लाज, फिरव तू मान, तरीपण,

ओठां देतां ओठ हो निक्षण[1].  

 

जेंव्हा होईल मैथुन मंथन

स्पंदनास तू दे प्रतिस्पंदन

 

कामश्रमे तो थकला जर, तर;

बेलाशक  हो आरुढ त्यावर.

 

दे विश्वास अन् दे प्रोत्साहन.

जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम

काम निपुण तो प्रेमिक उत्तम,

दे, कोमल तन, कोमल दे मन,

प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’

 

आणि इतकं सगळं सांगून वर ती म्हणते,

 

‘उगीच बोलले बाई मी तर  

मनी जाणीसी सारे तू तर.

‘प्रेमा नाही नियम, सीमा,

कामगुरूंचा[2] हा सांगावा.’

 

इलेस बोलून इतुके राधा

म्हणे, ‘आवर जा, आली घटिका.

जा सामोरी  रतीभोगाला.

शुभस्य शीघ्रम्, उशीर कशाला?’

 

आणि मग ती कृष्णाला दटावते. राधा कृष्णाची मामी आहे. त्याला सीनियर आहे आणि ‘कृष्णानुभवी’ तर आहेच आहे. इलेबाबत ती हळवी आहे. हे सगळं तिच्या बोलण्यातून जाणवतं.

 

‘मुक्या कळ्यांसम उरोज नाजुक,

माझ्या छातीसम ना साजूक,

नको नखांचा व्रण निळानिळा,

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

‘ओठ तिचे पालवी कोवळी,

माझे तर ते घट्ट पोवळी,

चावा घ्या चिमणीचा कवळा

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

‘मांड्या सोपासम केळीच्या,

तुझ्या कुस्तीने माझ्या भरल्या,

जपून तिच्या अंगाशी खेळा,

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

‘कठोर कांचन माझी काया,

लता जणू ती, तनू  कोमला,

धिटाई हळू, बुजेल इला,

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

‘ती नच मी अन् मी नच ती,

रतीक्रीडेला ती नवखी,

मातबर तुम्ही; ती बाला, 

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

पुन्हा एकदा सगळं बोलल्यावर राधा म्हणते..

 

‘तुम्हास ठाऊक कामिनी तन मन, 

कशास सांगू उगाच मी मग?

प्रीत प्रवीण हे रंगनायका;

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

कशाला सांगू म्हणाली तरी तिच्या सूचना काही संपत नाहीत..

 

‘स्पर्श असू दे मृदुल मुलायम,

झोंबाझोंबी नको आज तर. 

घे जीव्हेने  ओठही स्पर्शून,

चावाचावी नको आज तर.’

 

‘घे गालांचे चुंबन अलगद,

बोचरी आठवण नको आज तर. 

तट्ट स्तनाग्रे, स्पर्शे अलगद,

कळ्या चुरडणे नको आज तर.’

 

‘ओढून  घेई मिठीत सैलसर,

गच्च आवळणे नको आज तर. 

हळू कुरवाळून घे सांभाळून,

जोराजोरी नको आज तर.’

 

आणि पुन्हा एकदा शेवटी, ‘मी उगीचच बाई बोलले’ हे आहेच!

 

‘कशी बाई मी, काय बोलते?

प्रणयपटूला प्रेम शिकवते?

जे जाणीसी तू, मीही जाणते

काममंथना, बंधन नसते!

मीलनात रत होता दोघे,

माझी मसलत कोण ऐकते?’

 

 

पण वरपांगी पोंक्त सल्ले देणारी राधा पुढच्याच क्षणी खिन्न होते. कृष्णाचा विरह तिला वेढून टाकतो. कृष्णाचे आणि  इलेचे आता काय चालले असेल, हे सतत तिच्या मनात येत रहाते.

 

अतापावेतो.. 

असेल त्याला अंकित झाली

सोडून लज्जा झाली मोकळी

असेल बोलत अस्फुट काही

कवेत  त्याच्या भ्रांत न राही

अतापावेतो.. 

मिठीत दाटली असेल काया

अंगांगाला स्पर्श अन्, माया

शिकवून सारी असतील झाली

तिला गुपिते मी जपलेली

अतापावेतो.. 

 

पण तिकडे मात्र इला अजून सावरलेली नाही.

 

भेदरली, परी  धीट असे  ती

बुजलेली, परी बेपर्वाही

अखंड बडबड, मधून मौनही

मिटल्या दिठी, कधी नजर थेटही

शरीरी उमटे गोड शिरशिरी

विसंगतींची सोज्वळ मूर्ती 

शरीरसुखाची कधी परिपूर्ती?

 

शेवटी शरीर सुखाची परिपूर्ती होते. दुसऱ्या दिवशी राधा येते आणि इलेचा अवतार पाहून कृष्णाला खडसावते, हे इथे काळेनिळे कसे झाले? केस इतके कसे गुंतले? हा सगळा तुझ्या द्वाडपणाचा  आणि तुझ्याच दांडगाईचा परिणाम, दुसरं काय? वर म्हणते..

 

नाही कशी मुळी लाज

हवी मजा, वरती माज

पुरूषांचे नीत्य  काज

बाईच्या मनीची आस

कोणी ना पुसे त्यास

 

अर्थातच ह्या लटक्या रागाचा आणि विशेषतः शेवटच्या दोन ओळींचा अर्थ कृष्ण झटक्यात लक्षात घेतो. इथे तिथे काळेनिळे आणि गुंतलेले केस हीच राधाबाईंच्या मनीची आस  आहे हे जाणून..

 

लागट लाडीक बोल  बोलती

खट्याळ खोड्या सतत चालती

अधीर स्पर्श अन् मीठी घट्टशी 

मल्लयुद्ध जणू  परस्परांशी

 

फुलले डोळे, कान तापले

मांड्यांचे आवर्तन चाले

सहज समागम तनमन डोले

स्मित फुलते कधी हास्य खळाळे

 

लटका तंटा, नकार लटके

असे सुखांती मीलन घडले

राधा हरी एकरूप झाले

 

पण इतकं सगळं झालं तरी, ‘काल रातीला काय घडलं?’ हा प्रश्न राधेला अजूनही सतावतो आहे. स्त्री-नीतीला  अनुसरून आडवळणाने प्रश्न येतो..

 

 

‘सांगा ना मज सारे काही

काल रात्री जे घडले नाही!’

साळसुदसा सवाल येई.

 

कूटनीतीचा कृष्ण शिरोमणी

सालसभावे उत्तर देई,

‘तू अनुभवी, तू मोठी राधीके

रंगी प्रितीच्या रंगू, ये प्रिये!

उगाच चर्चा व्यर्थ कशाला?

ये फुलवी मम  अंगांगला.’

 

‘प्रीतम तू तर झपाटलेला

पुरती मोहित दिसते इला.

तिनी केले का सुस्तगतीने

जे झाले ना काल रातीला?’

 

कृष्ण उत्तर देत नाही. जे घडलेच नाही असं प्रश्नकर्तीचेच म्हणणे आहे, तर उत्तराचा सवाल येतोच कुठे? पण राधाही सवाल सोडत नाही. शेवटी ती थेटच विचारते आणि कृष्ण अर्थातच इलेची निंदा करून स्वतःला सोडवून घेतो.  

 

‘नाही, पण तू सांग मला आधी,

तिला कितीदा चुंबला हरी?’

‘नाही राधीके इतुके आठवत

चव ओठांची कडवट, कडवट’

 

‘उरोज  असशील घट्ट  दाबले’

‘कुठले? ते तर इवलेइवले’

 

‘मांड्या मस्त  मजेच्या होत्या?’

‘कांड्या, त्या तर, सांगितले ना?’

 

‘सुंदर तनु का घेतली वेढुन?’

‘छे! वेलीसम होती लपेटून’

 

‘चेतवी कशी ती सर्वांगाला?

झाले का सुख तुला अन् तिला?

तिचा गुलामही असशील झाला?’

‘कुठले ती तर नवखी प्रांजला

तिला न माहीत अ-भोग लीला!’

 

‘तिला भोगता तृप्ती  पावला?’

‘नव्यात नाही जुन्यात जी मजा;

कुठे ती बाला? कुठे कौशला?’

 

आणि इथे साहित्य, संगीत, नृत्य निपुणा; बाळकृष्णानुग्रहप्राप्त; ताताचार्य  आशीर्वादप्राप्त आणि सोन्यामोत्याच्या अनेक ऊंची भेटी देणारे, तंजावर नृपति  राजा  प्रतापसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली;    मुद्दूपलनी विरचीत,   ‘राधिका सांत्वनम्’  नामे  शृंगारप्रबंधाचा प्रथमाध्याय समाप्त होतो.

 

 

प्रथम प्रसिद्धी

चौफेर

दिवाळी अंक २०२१

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



[1] चुंबन

[2] वात्सायन