डॉक्टर, मला थायरॉईड आहे!
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
“डॉक्टर, मला थायरॉईड आहे!”
“त्यात काय, मला पण आहे!!”
माझ्या दवाखान्यात घडणारा हा नेहमीचा संवाद.
थायरॉईड नावाची ग्रंथी सर्वांनाच असते. ती असल्याशिवाय जीवन अशक्य. तेंव्हा ‘मला थायरॉईड आहे’, ह्या विधानाला काही अर्थ नाही. मला डोके आहे, हृदय आहे, तसंच हे. खरंतर पेशंटला म्हणायचं असतं, मला थायरॉईडचा विकार आहे.
थायरॉईड ही ग्रंथी आणि थायरॉक्झीन हे त्या पासून स्त्रवणारे संप्रेरक (हॉरमोन). टी 3 आणि टी 4 हे त्याचे दोन प्रकार. ह्या ग्रंथीतून हे रक्तात मिसळते. शरीरात सर्वदूर जाते आणि सर्वदूर आपला प्रभाव दाखवते. मुख्यत्वे शरीरातल्या ऊर्जा वापराशी या संप्रेरकाचा थेट संबंध येतो. त्यामुळे ह्यात काही बिघाड झाला की सर्वदूर परिणाम दिसतात. बिघाड काहीही असू शकतो. म्हणजे थायरॉईडचा स्त्राव अती होणे किंवा कमी होणे. दोन्ही शक्य आहे. दोन्ही तापदायक आहे. अती झालं की त्याला म्हणतात हायपर-थायरॉईडीझम आणि अल्प झालं की हायपो-थायरॉईडीझम.
थायरॉईड स्त्राव निर्माण होण्यासाठी लागतं आयोडीन. बाळासाठी आणि आईसाठी असं मिळून दिवसाला 250 मिलिग्रॅम लागतं. दूध, अंडी, मांस, मच्छी ह्यात भरपूर असतं ते. शिवाय आता आपल्याकडे मीठ मिळतं, तेही ‘आयोडीन युक्त’ असतं. हे आयोडीन युक्त मिठाचं धोरण, आहारातील आयोडीन कमतरेविरुद्ध एक महत्वाचं पाऊल आहे.
थायरॉईडच्या आजारचे निदान नेहमीच शारीरिक तपासणी आणि रक्त तपासणी करुन केले जाते.
स्त्रियांच्या आरोग्यातही ह्या थायरॉईडच्या अनारोग्याला महत्व आहे. सगळंच सांगायचं म्हटलं तर निव्वळ त्यावरच लेखमाला लिहावी लागेल. तेंव्हा इथे थायरॉईड आणि गरोदरपण ह्याबद्दलचीच माहिती बघू या.
थायरॉईडचा विकार असेल तर गरोदरपणात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. तेंव्हा वेळोवेळी थायरॉईडची तपासणी (TFT) करण्याला पर्याय नाही.
गर्भावस्थेत या थायरॉईडच्या छत्रछायेत गर्भाची वाढ होत असते. पहिले तीन महीने तर बाळाच्या थायरॉईड ग्रंथी कार्यरत नसतात. त्यामुळे बाळ, वारेतून मिळणाऱ्या आईच्या थायरॉईड स्रावावरच संपूर्णतः अवलंबून असते. १२ आठवडयादरम्यान बाळाची ग्रंथी कार्यरत होते पण पूर्ण क्षमतेनी काम करायला पाचवा महिना उजाडतो. तेंव्हा आईच्या ग्रंथीचे काम सुरवातीपासूनच योग्य सुरू असणे अतिशय महत्वाचे आहे.
हायपर-थायरॉईडीझम
थायरॉईडचं प्रमाण वाढलं, की आईमध्ये धडधड, हाताला कंप सुटणे आणि वजन पुरेसे न वाढणे अशी लक्षणे दिसतात. हा प्रकार बहुतेकदा शरीरात थायरॉईडला उचकवणारी प्रतिपिंड (Antibodies) निर्माण झाल्यामुळे होतो. हा तर आपल्या प्रतिकारशक्तीचा प्रताप. ह्याला म्हणतात ग्रेव्हस् चा आजार. ‘ग्रेव्हस्’ म्हणजे कबर किंवा गंभीर ह्या अर्थी नाही हं. रॉबर्ट ग्रेव्हस् ह्या आयरीश डॉक्टरने हा प्रथम वर्णीला म्हणून त्याला हे नाव दिलं आहे.
गरोदरपणात स्त्रीची प्रतिकारशक्ती किंचित क्षीण झालेली असते. त्यामुळे हा प्रताप थोडा थंडावतो देखील. पण नंतर पुन्हा हा आजार उचल खातो. ह्याच्या या असल्या बेभरवशाच्या वागण्यामुळे वारंवार तपासणीला पर्याय नाही.
थायरॉईड स्त्राव वाढण्यामागे खास गरोदरपणाशी संबंधितही एक कारण आहे. गरोदरपणात वारेतून एचसीजी हे द्रव्य स्रवत असतं. ह्याच अगदी पूरच येतो म्हणा ना. गर्भसंवर्धनाचे सुरवातीचे काम ह्या द्रव्याचे. मग हा पूर ओसरतो. पण तो पर्यंत ह्या एचसीजीमुळे थायरॉईड ग्रंथीचा स्त्राव वाढतो. मग पेशंटला खूप उलट्या वगैरेचा त्रास होतो. तेंव्हा उलट्या जास्त होत असतील, वजन घटत असेल तर थायरॉईड स्त्राव वाढल्याची शंका घ्यावी. तीन महिन्यानंतर एचसीजीचा पूर ओसरतो आणि उलट्याही थांबतात.
अगदी क्वचित थायरॉईड स्थित एखादी गाठ जास्त स्त्राव निर्माण करण्याचा उद्योग करत असते. पण हे अगदी क्वचित. तेंव्हा ते जाऊ दे.
औषधोपचार न घेतल्यास थायरॉईडच्या दुखण्याचे गर्भावर आणि गर्भिणीवर दुष्परिणाम होतातच. गर्भपात, कमी दिवसाची प्रसूती, अशक्त मूल, बाळंतवात (पीआयएच) असे काही काही होते. टोकाच्या केसेसमध्ये काही अधिक गंभीर प्रकारही (थायरॉईड स्टॉर्म) घडतात.
ग्रेव्हस् च्या आजारात बाळावर थेट परिणामही संभवतो. ज्या प्रतिपिंडामुळे ग्रंथीचे स्राव वाढतात ती प्रतीपिंडे वारेतून बाळापर्यंत पोहोचू शकतात. मग बाळाची ग्रंथीही जास्त स्राव निर्माण करते. क्वचित तिचा आकारही वाढतो. त्याहून क्वचित, काही बाळात हा तापदायक ठरेल इतका वाढतो. बाळाची वारंवार सोनोग्राफी करुन, त्याची ग्रंथी तर वाढलेली नाही ना, हे तपासले जाते. ह्या आजारावर उपचार म्हणू कधी कधी आईची ही अति कामसू ग्रंथी ऑपरेशन अथवा किरणोत्सर्गी औषधाने निकामी केली जाते. मग आईला बरे वाटते. पण तिच्या शरीरातील प्रतीपिंडे कायमच असतात. ती बाळात जाऊन तिथे वरील लोच्या करू शकतातच. तेंव्हा अशा रोगमुक्त स्त्रियांत देखील, बाळाची वारंवार सोनोग्राफी करुन, त्याची ग्रंथी तर वाढलेली नाही ना, हे पहिले जाते.
बाळात जर ही ग्रंथी अती स्त्राव निर्माण करू लागली तर बाळाच्या नाडीचा वेग वाढतो, कधी याचा हृदयावर ताण येतो, टाळू लवकर भरते, बाळ अशक्त आणि किरकिरे बनते; असे अनेक परिणाम दिसतात. जर ग्रंथीचा ग्रंथोबा झाला तर बाळाला श्वास घ्यायला अडथळा येऊ लागतो.
उपचार
सौम्य आजाराला काहीही उपचार लागत नाहीत. उलट्या जास्त झाल्या तर प्रसंगोपात सलाईन लावावे लागते. शिवाय थायरॉईड विरुद्धची प्रतीपिंडे सापडली तर गोळ्या घ्याव्या लागतात. ह्यामुळे थायरॉईडचा स्राव मर्यादित रहातो आणि बाळाकडेही अति प्रमाणात जात नाही.
हायपो-थायरॉईडिझम
याउलट जर स्त्राव कमी असेल तरीही त्रास होतो. नीट संतुलन साधलेलं असावं लागतं.
कमी स्त्राव हा हशीमोटोचा आजार. हाही प्रतिकारशक्ती कृपेकरूनच होतो. इथे थायरॉईड विरोधी प्रतीपिंडे थायरॉईडच्या पेशींचा नाश करतात आणि ग्रंथीचे कार्य मंदावते. ग्रंथीचे कार्य मंदावते आणि ती बाईही एकदम ‘मंदा’ होते!
तिच्या चेहऱ्यावर सदैव खुदाई खिन्नता पसरलेली दिसते. तिचा जीवनरस जणू संपून जातो, हालचाली संथावतात, कशात मन लागत नाही, प्रचंड थकवा येतो, पायात गोळे येतात, बद्धकोष्ठता होते, डोंगराची हवा गार नसतानाही हिची ‘सोसना गारवा’ अशी तक्रार असते.
खूपच कमी थायरॉईड असेल तर रक्तक्षय (Anemia), गर्भपात, अशक्त मूल, बाळंतवात (पीआयएच) वगैरे प्रकार घडतात. इतरही काही अघटित घडू शकतं. तेंव्हा कमी थायरॉईडसाठी गोळ्या चालू असतील तर त्या दिवस राहिल्यावर बंद करू नयेत. उलट डॉक्टरी सल्ल्याने डोस अॅडजस्ट करुन घ्यावा.
उपचार
गोळ्या अगदी स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी आहेत. आईसाठी आणि बाळासाठीही आवश्यक आहेत. थायरॉईड हॉरमोनच्या (Levothyroxine) गोळ्या मिळतात. त्या नियमित घ्याव्या लागतात. सकाळी, उठल्याउठल्या, उपाशीपोटी संपूर्ण डोस घ्यायचा आहे. अन्य औषधांसोबत (उदा: लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या) या गोळ्या घेऊ नयेत. हयात टी 4 नावाचे संप्रेरक असतं. ह्याचा महिमा काय वर्णावा? हे बाळाच्या मेंदुपर्यंत अगदी सुरवातीपासून पोहोचू शकतं. हे तर अतिशय महत्वाचं. पण बाजारात थेट प्राण्यांच्या थायरॉईड ग्रंथींपासून निर्मिलेले ‘थायरॉईडवरचे औषध’ उपलब्ध आहे. हयात टी 4 आणि टी 3 अशी सरमिसळ असते. बाळाच्या मेंदूच्या वाढीच्या दृष्टीने यातले टी 3 अगदीच कुचकामी आणि टी 4 ची मात्रा अगदीच कमी. तेंव्हा हे असले औषध घेऊ नये.
प्रसूतीपश्चात थायरॉईड विकार
बरेचदा प्रसूतिनंतर थायरॉईडचं काम आधी अधिक आणि नंतर कमी झालेलं आढळतं (Postpartum Thyroiditis). हाही आपल्या प्रतिकारशक्तीचा प्रताप. सर्व पेशंटमध्ये या दोन्ही अवस्था दिसतात असं नाही. सुमारे तीन महीने अधिक थायरॉईड ही अवस्था टिकते. तक्रारी विशेष नसतात. विशेष असल्या तरच हृदय गती कमी होण्याची औषधे द्यावी लागतात. काही केसेसमध्ये स्त्राव कमी होण्याची औषधे द्यावी लागतात. पुढे स्त्राव कमी पडू लागतो. मग तो वाढायची औषधे सुरु करावी लागतात. स्त्राव कमी पडला की वर उल्लेखल्याप्रमाणे पेशंटची ‘मंदा’ होते. बरेचदा पेशंटला नैराश्य आलेलं आहे असाही समज होऊ शकतो. योग्य तपासण्यांनी योग्य निदान होते. वेगवेगळ्या अवस्थेनुसार तक्रारी बदलतात आणि उपचारही बदलतात. बहुतेक स्त्रियांत सुमारे वर्षभरात परिस्थिती पूर्ववत होते काहींत मात्र कायम औषधे चालूच ठेवावी लागतात.
तर अशी ही कंठग्रंथी थायरॉईड. मलाही आहे, तुम्हालाही आहे. हिचे कार्य निर्वेध चालो हीच सदिच्छा.
पूर्व प्रसिद्धी
लोकमत सखी पुरवणी
१५/६/२०२१
No comments:
Post a Comment