Wednesday, 30 June 2021

विज्ञान म्हणजे काय? लेखांक ७ वैज्ञानिक पद्धत

 

विज्ञान म्हणजे काय?

लेखांक ७

वैज्ञानिक पद्धत  

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

जितका अचाट दावा, तितका बेफाट पुरावा हवाच की; नाही का? विज्ञानानी पुराव्याचे देखील एक विज्ञान विकसित केले आहे. एखादे विधान, कल्पना, दावा हे  खरे की खोटे हे तपासण्याच्या पद्धती आहेत.

यात अनेक युक्त्या वापरल्या जातात.

दोन भिन्न परिस्थितीची तुलना ही एक  मुख्य युक्ति आहे.  उदाहरणार्थ अ हे औषध चांगलं आहे का ब?, असा प्रश्न असेल तर काही आजारी माणसांना अ आणि काहींना ब; असं औषध देऊन दोन गटांची तुलना केली जाते.

असं सांगतात की एक शास्त्रज्ञ महाशय इतके काटेकोर होते की रोज ते  फक्त उजव्या बाजूचेच दात घासायचे. दात घासल्याने काही फायदा होतो का हे तपासण्यासाठी त्यांनी आपल्याच निम्या  दातांची तुलना उरलेल्या निम्या दातांशी करायचे ठरवले होते!

वैज्ञानिक बरेचदा प्रयोग रचतात. उदाहरणार्थ पाऱ्याचा उत्कलन बिंदु किती? असा प्रश्न असेल तर शास्त्रज्ञ काय करतात? ते  पारा घेतात आणि उकळतात. ज्या क्षणी उकळायला लागतो त्या क्षणी त्याचे तापमान मोजतात. नोंदवून ठेवतात. असं बरेचदा करतात. अनेक जणांकडून, अनेक प्रयोगशाळात तपासणी केली जाते. प्रत्येक वेळी येणारे निरीक्षण नीट नोंदवून ठेवले जाते.

पाऱ्याचा उत्कलन बिंदु ३६५.७से इतका आहे. पण आश्चर्य म्हणजे दरवेळी प्रयोग केला की तो नेमका ३६५.७से इतकाच भरेल असं नाही. अनेक कारणानी आपले निरीक्षण या तापमानाच्या किंचित वर किंवा खाली असू शकते. तापमान नोंदणाऱ्यांकडून बारीकसारिक चुका होऊ शकतात. तापमापकात काही दोष असू शकतात. घेतलेल्या पाऱ्यात काही भेसळ असू शकते.  त्या ठिकाणचा वायूभार (वातावरणीय दाब) कमी अधिक असू शकतो.  म्हणून अनेक वेळा, अनेक व्यक्तींनी, अनेक प्रयोगशाळांत, प्रमाणित वातावरणात,  तोच प्रयोग, पुनःपुन्हा  करण्याला महत्व आहे. मग या सगळ्या निरीक्षणांचा अभ्यास करून त्यांची सरासरी काढली जाते.

थोडक्यात आपल्याकडून मोजणीत कोणतीही त्रुटी राहू नये, कोणतीही चूक राहू नये, अगदी काटेकोर आणि सुयोग्य तपासणी व्हावी अशी दक्षता घेतली जाते. आपण कुठे कुठे चुकू शकतो, कुठे कुठे घोटाळा  होऊ शकतो याचा आगाऊ विचार करून वैज्ञानिक ह्या सगळ्या चुका टाळण्याचा प्रयत्न करत असतात.  

विज्ञानाची युक्ति वापरुन कोणत्याही प्रश्नाचा शोध घेता येतो. झाडे अमुक एका  रंगाच्या प्रकाशात अधिक वाढतात का? ध्वनि प्रदूषणाचे काय दुष्परिणाम होतात? तारे चमचम का करतात? आकाश निळे का दिसते? अशा कोणत्याही प्रश्नाचा वेध आपण ही युक्ति वापरुन घेऊ शकतो.

अगदी तुमच्या मनीमाऊला गोल आकाराची बिस्किटे आवडतात का चौकोनी? याही प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधू शकाल. ‘माझ्या मनीमाऊला गोल बिस्किटे आवडत नाहीत’; असं एक वाक्य तुम्ही मनात धरायचं. मग तुम्ही प्रयोग रचायला    सुरवात करायची. पण हे वाटतं तितकं सोप्पं नाही.

मनीला एक दिवस गोल आणि एक दिवस चौकोनी बिस्किटे देऊन ती कोणती बिस्किटे अधिक खाते हे मोजता येईल. पण रोज तीची भूक वेगवेगळी असणार. एके   दिवशी तिनी आधीच एखादा उंदीर मटकावला असेल तर ती बिस्किटे कमीच खाईल. आपले निरीक्षण चुकेल. आपला प्रयोग फसेल.  

यावर असं करता  येईल की दोन बशा शेजारी शेजारी ठेवायच्या.   एका बशीत गोल आणि एक बशीत चौकोनी बिस्किटे ठेवायची. कोणती जास्त खाते ते बघायचं. पण समजा  तिनी दोन्ही बशांकडे नीट न पहाता जी बशी जवळ आहे त्यातल्या बिस्किटांचा फडशा पाडला तर?  

म्हणजे एकाच बशीत दोन्ही प्रकारची बिस्किटे ठेवायला हवीत. तीही फक्त आकार वेगवेगळा असेल अशी. बाकी रंग, वास, चव, जाडी  अगदी समान हवं. ही बिस्किटे बशीत ठेवताना आधी एक प्रकारची बिस्किटे आणि त्यावर दुसरी असं करून चालणार नाही. बिस्किटांची चांगली सरमिसळ असली पाहिजे. म्हणजे जर मनीला गोल बिस्किटे अधिक आवडत असतील तर ती आपोआपच त्यातून शोधून शोधून गोल बिस्किटे खाईल. शिवाय हा प्रयोग बरेचदा करायला हवा. आठ दहा दिवस तरी नक्कीच. शिवाय सर्व दिवशी एकाच प्रकारची बिस्किटे हवीत. आज क्रीमची, उद्या ग्लुकोज, परवा  घरी केलेली,  असं करून चालणार नाही.  

एखादा प्रयोग रचायचा म्हणजे किती गोष्टींचा विचार करावा लागतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल.

येणेप्रमाणे सारी सिद्धता झाल्यावर आठ ते दहा   दिवस तुम्हाला नीट निरीक्षणे करून नोंदवायला हवीत. मनीनं गोल बिस्किटे अधिक खाल्ली का चौकोनी हे आता तुमच्या लक्षात येईल. तुमचे पहिले विधान होते, ‘माझ्या मनीमाऊला गोल बिस्किटे आवडत नाहीत’, हे वाक्य  चूक का बरोबर हे आता तुम्हाला ठरवता येईल.

या साऱ्या छोट्या आणि साध्याश्या प्रयोगात तुम्ही विज्ञानाची एक अत्यंत उपयुक्त पद्धत वापरली आहे.

आधी तुम्ही एक प्रश्न संशोधनासाठी घेतला. (हो! तुम्ही जे केलं ते संशोधनच होतं बरं!!)

हा प्रश्न होता, मांजराची बिस्किटाची आवड बिस्किटांच्या आकारावर अवलंबून असते का?

मग त्या बाबतीत तुम्ही एक विधान मनात धरलंत. ते विधान होतं, ‘माझ्या मनीमाऊला गोल बिस्किटे आवडत नाहीत’.  ह्याला म्हणतात मूळ गृहीतक (Null Hypothesis).

मग हे गृहीतक सत्य की असत्य हे ठरवण्यासाठी तुम्ही प्रयोग (Experiment) केलात. त्यात काहीही त्रुटी राहू नये म्हणून आटोकाट काळजी घेतलीत.

प्रयोगाच्या नोंदींचा (Observations) विचार करून तुम्ही मनीला कोणती बिस्किटे आवडतात हे ठरवले. तीने गोल बिस्किटे जास्त खाल्ली असतील तर तिला गोल बिस्किटे जास्त आवडतात, चौकोनी खाल्ली असतील तर चौकोनी जास्त आवडतात. ह्याला म्हणतात निष्कर्ष (Conclusion) काढणे. ह्या नुसार तुम्ही मूळ गृहीतक सत्य की असत्य हे ठरवू शकता. इतकंच नव्हे तर तुमचा निष्कर्ष बरोबर असेल तर त्यावर आधारित काही भविष्यवाणी तुम्ही खात्रीने करू शकता. उदाहरणार्थ मनीला जर गोल बिस्किटे आवडतात असा निष्कर्ष आला तर घरी आणलेला गोल बिस्किटांचा पुडा लवकर संपेल.  

 

ह्या प्रयोगात आणखीही बऱ्याच खाचाखोचा  आहेत बरं. समजा एकूण १०० बिस्किटांपैकी मनीने  ५१  गोल आणि ४९ चौकोनी बिस्किटे खाल्ली   (५१+४९=१००). ५१ विरुद्ध ४९, असा स्कोअर आला तर काय निष्कर्ष काढाल बरं? ५१ विरुद्ध ४९  म्हणजे सामना जवळजवळ बरोबरीतच सुटला असं म्हणायला हवं, नाही का? स्कोअर मधे किती फरक असला तर तो महत्वाचा (लक्षणीय) मानायचा?    या प्रश्नाचं उत्तर आहे.  पण अवघड आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता येतं ते संख्याशास्त्राच्या मदतीने. अशा फरकाला ‘संख्याशास्त्रीय दृष्ट्या लक्षणीय फरक’ असं म्हणतात.

गृहीतक, प्रयोग, निरीक्षणे आणि ते  गृहीतक  योग्य वा  अयोग्य असा निष्कर्ष ही विज्ञानाची पद्धत आहे. आपणच मनात धरलेलं मूळ गृहीतक हरप्रकारे, हिरीरीनं खोडून काढायचा प्रयत्न करणे ही विज्ञानाची पद्धत आहे. असे सर्व शक्तिनिशी केलेले सर्व प्रयत्न करूनही ते  गृहीतक नाशाबित करता  आलं नाही, तरच ते मान्य केलं जातं. 

अशा पद्धतीने काढलेल्या निष्कर्षाचा आणखी एक फायदा होतो. त्यावर आधारित बिनचूक भविष्यवाणी करता  येते. इथे भविष्यवाणी म्हणजे ज्योतीष नाही हं.

 

क्रिकेटमधील शास्त्रीय भविष्यवाणी.

क्रिकेटमध्ये एलबीडब्लू झाला अथवा नाही हे थर्ड अंपायर मंडळी स्क्रीनवर त्या चेंडूचा संभाव्य प्रवास पाहून ठरवतात. तो चेंडू दांडी गुल करणार होता का नाही ह्याचं नेमकं दर्शन स्क्रीनवर होत असतं. गतीच्या नियमांचा  आधार घेऊनच तर हा प्रकार चालतो. विज्ञानाच्या आधारे केलेली ही भविष्यवाणीच आहे. गतीचे नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम वगैरे अतिशय नेमके आणि बिनचूक आहेत ह्याचा  हा पडताळा. असा पडताळा पहाता  येणं   हे देखील विज्ञान नावाच्या युक्तिचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे.  (व्यवच्छेदक हा जरा अवघड शब्द मी इथे मुद्दाम वापरला आहे. व्यवच्छेदक म्हणजे ज्या शिवाय ही युक्ती अपुरी ठरेल असं लक्षण.)

 

आणखी दोन उदाहरणे

सूर्य आणि ग्रह पृथ्वीभोवती फिरताहेत असं आपण रोजच पहातो. पण शाळेत आपल्याला शिकवतात की हा तर फक्त आभास. प्रत्यक्षात पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. सूर्य पृथ्वीभोवती फिरला काय किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरली काय; आपल्याला सूर्य आपल्याभोवती फिरतोय असंच भासणार नाही का? तेंव्हा कोण कुणाभोवती फिरते आहे हा एक मोठाच गहन प्रश्न होता.

थोडक्यात, सूर्य आणि इतर ग्रह  पृथ्वीभोवती फिरत आहेत  असं एक गृहीतक होतं.  पृथ्वी आणि सर्व ग्रह  सूर्याभोवती फिरत आहेत; असं दुसरं गृहीतक होतं. यातलं कोणतं तरी एकच खरं होतं. मग ग्रहांच्या हालचालींचा अभ्यास केला गेला. त्यात असं लक्षात आलं की सूर्य स्थिर आहे असं गृहीत धरलं तर गणितं, अधिक नेमकी येतात. पंचांग, ग्रहणे, ग्रहगती अधिक नेमकेपणानी सांगता  येते. ग्रहांच्या स्थितीवरून जहाजांचे स्थान निश्चित करता  येते. समुद्रभ्रमण सुलभ होते.   या उलट  पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरतोय असं गृहीत धरलं तर गणित किचकट तर होतंच पण उत्तरेही मोघम येतात. त्यामुळे ज्या गृहीतकानी बिनचूक भविष्यवाणी शक्य झाली ते बरोबर असणार अशी अटकळ बांधली गेली. सूर्य स्थिर आणि बाकी मंडळी त्या भोवती फेर धरून आहेत हे मान्य झालं.  सूर्य स्थिर असल्याचे इतर पुरावे आपल्याला नंतर स्पष्ट झाले.   

या लेखमालेतील चौथ्या लेखांकात मेंडेलिव्हच्या आवर्तसारीणीबद्दल मी लिहिले होते. या तक्त्यात सर्व मूलद्रव्ये त्यांच्या गुणधर्मानुसार संगतवार मांडली आहेत. मेंडेलिव्हच्या काळी (१८६९) सर्व मूलद्रव्ये ठाऊक नव्हती. अज्ञात रसायनांच्या जागा त्याने मोकळ्या ठेवल्या आणि त्या रिक्त जागांवरील रसायनांचे गुणधर्मही त्यांनी आधीच वर्तवून ठेवले. पुढे जेंव्हा या अज्ञात मूलद्रव्यांचा शोध लागला, तेंव्हा त्यांचे गुणधर्म, मेंडेलिव्हच्या भाकीताशी, तंतोतंत जुळत असल्याचे आढळले. भाकीत बिनचूक आल्याने मेंडेलिव्हने मांडलेली रचना शास्त्रशुद्ध असल्याचे सिद्ध झाले.

 

थोडक्यात वैज्ञानिक पद्धत म्हणजे;    

·       गृहीतक मनात धरणे (Null Hypothesis)

·       प्रयोग (Experiment)

·       निरीक्षणे (Observations)

·       निष्कर्ष (Conclusion)

·       त्यानुसार मूळ गृहीतकाचा स्वीकार अथवा  नकार.

·       तुमचे मूळ गृहीतक बरोबर ठरले तर त्यावर आधारित भविष्यवाणी तुम्ही खात्रीने करू शकता.

·       आणि तुमचे मूळ गृहीतक जर चूक ठरलं तर नाउमेद न होता; ‘नवे गृहीतक नवा प्रयोग’, हा विज्ञानाचा खेळ खेळायला तुम्ही पुन्हा तैय्यार असता!!

 

पूर्वप्रसिद्धी

किशोर मासिक

जुलै २०२१

 

 

 

Monday, 28 June 2021

डबल, ट्रिपल आणि क्वाड्रूपल

 

डबल, ट्रिपल आणि क्वाड्रूपल

डॉ. शंतनु अभ्यंकर

 

डबल शब्द आपल्या अगदी परिचयाचा आहे. डबलडेक्कर, डबल फिल्टर, डबल मज्जा वगैरे. ट्रिपलचा आणि आपला संबंधही  अगदी बालपणापासून, म्हणजे ट्रिपल-पोलिओ मधल्या ट्रिपल पासून  सुरू होतो. त्यामानाने क्वाड्रूपल हा लांबच्या चुलत्या इतका दूरस्थ. पण आजकाल दिवस राहिले रे राहिले,  की या शब्दांशी संबंध येतो. कारण  डबल मार्कर, ट्रिपल मार्कर, क्वाड्रूपल मार्कर अशा तपासण्या आता उपलब्ध आहेत.

नव्या पाहुण्याची चाहूल लागताच आनंदलहरींबरोबर एक चिंतेचा तरंगही उमटत असतो. कोणी उघडपणे तसं म्हणत नाही; पण सारं काही सुखरूप पर पडेल ना?, बाळ-बाळंतीण निरोगी, सुखरूप असेल ना?, अशा शंका मन कुरतडत असतात. जगातील कोणतीच टेस्ट आणि कोणताच डॉक्टर बाळ बाळांतीण  संपूर्ण निरोगी आहेत आणि रहातील; असं छातीठोकपणे सांगू शकत नाही. बाळ-बाळंतीण १००% सुखरूप आहेत का?, या प्रश्नाचं प्रामाणिक आणि सार्वकालिक उत्तर, ‘सांगता  येत नाही’, हेच आहे.  मात्र बाळ अथवा बाळंतिणीला अवाजवी धोका आहे का?, ह्या प्रश्नाचं उत्तर काढता येतं. दरवेळी डॉक्टर तेच करत असतात. या नव्या नव्या तपासण्यांमुळे ह्या  उत्तरात  अधिक नेमकेपणा आला आहे. डबल मार्कर, ट्रिपल मार्कर, क्वाड्रूपल मार्कर तपासण्या या अशा आश्वस्त करणाऱ्या तपासण्या आहेत. पण बरेचदा हयाबद्दल अर्धवट माहिती असल्यामुळे, आश्वस्त होण्याऐवजी पेशंट अस्वस्थच जास्त होतात. म्हणून हा लेखनप्रपंच.

 

ह्या तपासण्या करण्याचा काही विशिष्ठ कालावधी ठरलेला आहे. ११ ते १४ आठवडे आणि/अथवा १५ ते २१ आठवड्या दरम्यान ह्यातील विविध टेस्ट करता येतात. आधी अथवा नंतर नाही.

 आईचे वय, वजन, ऊंची, आधीच्या अपत्यांची माहिती,  सोनोग्राफीत दिसणाऱ्या काही खाणाखुणा आणि आईच्या रक्तातील काही घटकांचा एकत्रित विचार केला जातो. आईच्या रक्तातील दोन (PAPP-A, hCG); तीन (AFP, E3, hCG) किंवा चार (AFP, E3, hCG आणि  Inhibin-A) घटक मोजले जातात. यावरूनच ह्या तपासण्यांना डबल, ट्रिपल, क्वाड्रूपल मार्कर असे नाव पडले आहे.  

यातून आई  आणि बाळाबद्दल काही भविष्य वर्तवण्याचा प्रयत्न असतो.  पण या साऱ्या घटकांतील नातेसंबंध इतका गुंतागुंतीचा आहे की हे सारे संगणकाच्या मदतीनेच शक्य आहे.  यातून, आईचे बीपी वाढण्याची शक्यता, बाळाचे वजन कमी असण्याची शक्यता, बाळांत  दोष असण्याची शक्यता वगैरे  वर्तवली जाते. प्रत्यक्षात ह्या गोष्टी घडणार आहेत वा  नाहीत असं नेमकं उत्तर मिळत नाही.

 उदाहरणार्थ, ‘बाळाच्या गुणसूत्रात दोष असू शकेल’, असं उत्तर आलं, तर तसा दोष खरोखरच आहे का, हे शोधायला बाळाच्या पेशी तपासाव्या लागतात. यासाठी बाळाभोवतीचे पाणी काढावे लागते (गर्भजलपरीक्षा, Amniocentesis) किंवा वारेचा तुकडा तपासायला घ्यावा लागतो (Chorionic  Villus Sampling).

म्हणजे हे कॉलेस्टेरॉल तपासल्यासारखे आहे. कॉलेस्टेरॉल वाढले म्हणजे लगेच काही तुम्हाला हार्ट अटॅक येत नाही, कदाचित कधीच येणार नाही, पण येण्याची शक्यता बरीच जास्त असते. या नवनव्या तपासण्या  शक्याशक्यतेच्या भाषेत बोलतात. ही भाषा सामान्यतः अपरिचित आणि वैतागवाणी असते.

 आपल्याला एक वाईट खोड असते. आपण डॉक्टरकडे जायचं, डॉक्टर आपल्याला तपासणार आणि सांगणार, तुम्हाला बी.पी आहे अथवा नाही; तुम्हाला शुगर आहे वा नाही. ह्या असल्या उत्तरांची आपल्याला सवय. तुम्हाला मतीमंद मूल होण्याची शक्यता ‘दोनशे छत्तीसात  एक’ एवढी आहे; किंवा ‘पस्तीसात एक’ एवढी आहे; हे असलं काही आपल्या पचनी पडत नाही. डबल, ट्रिपल वा क्वाड्रुपल मार्करचा रिपोर्ट हा असा शक्याशक्यतेच्या भाषेत येतो.

असला ‘नरो वा  कुंजरो वा’ रिपोर्ट पुढे नर का  कुंजर हे ठरल्याशिवाय काय कामाचा? पण नर का कुंजर हे ठरवणं खार्चीक असतं. जरा  धोक्याचंही  असतं.  म्हणून मग अधिक नेमक्या आणि महाग चाचणीची (Confirmatory test) गरज आहे का, हे सांगणारी अशी ‘चाचपणी’ (Screening Test)   आधी केली जाते. ह्या चाचपणीत ज्यांना अवाजवी धोका असल्याचं लक्षात येतं अशांसाठी पुढील तपासणी केली जाते.  ह्या चाचपणीतून बाळातील काही जनुकीय आजार आणि काही शारीरिक दोषांबद्दल इशारा मिळतो. बाळ सुपोषित असेल का?, आईचे बीपी पुढे वाढेल का?, अशा काही भविष्यातील धोक्यांचे इशारे मिळतात. बाळाचा मणका उघडा असणे, डाऊन्स सिंड्रोम (एक प्रकारचे मतीमंदत्व) वगैरेच्या  ९० ते ९५ % केसेस यातून ओळखता  येतात.  

अल्फाफीटोप्रोटीन, इस्ट्रीओल, एचसीजी आणि इनहीबिन ए अशा भारदस्त नावाचे पदार्थ यात तपासले जातात. बाळ  आणि वार याद्वारे निर्माण होणारी ही द्रव्ये, बाळाच्या आणि वारेच्या तब्बेतीबद्दल आपल्याला काही सुचवू शकतात.

उदाहरणार्थ अल्फाफीटोप्रोटीन अपेक्षेपेक्षा जास्त असेल तर बाळाचा मणका उघडा असण्याची शक्यता जास्त. अल्फाफीटोप्रोटीन कमी असेल तर बाळाला डाऊन्स सिंड्रोम असण्याची शक्यता जास्त. ह्याच सोबत इस्ट्रीओल कमी, पण एचसीजी आणि इनहीबिन ए वाढलेले, असा डाव पडला तर डाऊन्स सिंड्रोमची  ही शक्यता आणखी जास्त.

जर रिपोर्ट नॉर्मल/निगेटिव्ह  आला तर त्याचा अर्थ बाळाला आजार असण्याची  शक्यता इतकी कमी आहे की अधिक तपासण्या करण्याची गरज नाही. ही शक्यता शून्य मात्र नाही.

रिपोर्ट पॉझीटिव्ह,  म्हणजे आजाराची ‘अवाजवी’ शक्यता दर्शवणारा, आला तर अधिक तपासण्या करून आजार खरोखरच आहे का नाही ह्याची खात्री करून घेणे उत्तम. या अधिकच्या तपासण्या म्हणजे, वर म्हटल्याप्रमाणे, गर्भजलपरीक्षा किंवा वारेचा तुकडा तपासणे (कोरीऑन व्हीलस सॅमप्लींग). शंभरातल्या पाच एक जणींना  अशा तपासण्या कराव्या लागतात आणि त्यातल्या एखाददुसरीच्याच  बाळाचा मणका दुभंगलेला अथवा डाऊन्स निघतो.

आता दोन-तीन हजार रुपयांना पडणारा  हा  तपासणीचा खेळ खेळायचा का? ते तपासणे, रिपोर्टची वाट पहाणे, तो हातात पडल्यावरही विशेष उलगडा न होणे, पुन्हा पुढील तपासण्या कराव्या लागणे, त्यांच्या रिपोर्टची वाट पहाणे.. हे सगळं सगळं खूप मानसिक द्वंद्व निर्माण करणारं असतं. ज्यांना परवडतं त्यांच्या दृष्टीनी उत्तर जरा सोप्पं असतं. ज्याना हे सारं आर्थिकदृष्ट्या तापदायक असतं, त्यांना कुठून या फंदात पडलो असंही वाटू शकतं. पण  शेवटी हा जिचा तिचा  प्रश्न.

पस्तीशीच्या पुढे वय असेल, आधीची संतती सदोष असेल किंवा  डायबेटीस असेल तर  अशी तपासणी नक्की करावी.  परवडत असेल तर वरील काही नसतानाही  अशी तपासणी जरूर करावी.  कारण शेवटी पोरं होणार दोन नाही तर तीन; ती जितकी सुदृढ तितके चांगलेच की.

पण पेशंटची मानसिकता अशी नसते. बरेचदा रिपोर्ट नॉर्मलच येतो.  रिपोर्ट नॉर्मल आला तर, अनावश्यक टेस्ट करायला लावली, ‘आमाला उगाच भ्या सांगितलं’, घाबरवलं;  असा आरोप केला जातो. टेस्ट केली नाही आणि काही बिघडलं तर   गुगलज्ञानमंडित पंडिता, ‘टेस्ट का टाळली?’ असा सवाल करतात. म्हणजे काहीही केलं तरी डॉक्टरच चूक ठरतो.    

यामुळे डॉक्टरही बुचकळ्यात पडलेले असतात. समृद्ध समाजात या टेस्ट सर्रास केल्या जातात. प्रश्न आपण पामरांनी, पै पै जपून वापरावी लागणाऱ्या मंडळींनी, त्यांच्या किती कच्छपी लागायचं हा आहे. आता दुधानी न पोळताही ताक फुंकून  फुंकून पिण्याचा जमाना आहे. तेंव्हा कोणीही डॉक्टर या टेस्ट करा किंवा करू नका, असे थेट उत्तर देत नाहीत. ‘या टेस्ट कराव्यात अशी इंग्लंड-अमेरिकेत शिफारस आहे, सबब तुम्ही काय ते ठरवा’ असं सांगतात.  

म्हणूनच अशा टेस्ट कराव्यात का नाही हा निर्णय डॉक्टरांशी चर्चा करून प्रत्येकीनी स्वतःच्या जबाबदारीवर,  घ्यायचा आहे. हा माहितीपर लेख म्हणजे ही जबाबदारी समजावून सांगण्याचा एक प्रयत्न आहे. हा लेख आता तुम्ही वाचला आहे, आता तुम्ही डॉक्टरांशी बोला आणि ठरवा.

 

प्रथम प्रसिद्धी

लोकमत, सखी पुरवणी  

२९/६/२०२१

 

Tuesday, 15 June 2021

डॉक्टर, मला थायरॉईड आहे!

    डॉक्टर, मला थायरॉईड आहे!

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.


“डॉक्टर, मला थायरॉईड आहे!”
“त्यात काय, मला पण आहे!!”
माझ्या दवाखान्यात घडणारा हा नेहमीचा संवाद.
थायरॉईड नावाची ग्रंथी सर्वांनाच असते. ती असल्याशिवाय जीवन अशक्य. तेंव्हा ‘मला थायरॉईड आहे’, ह्या विधानाला काही अर्थ नाही. मला डोके आहे, हृदय आहे, तसंच हे. खरंतर पेशंटला म्हणायचं असतं, मला थायरॉईडचा विकार आहे.
थायरॉईड ही ग्रंथी आणि थायरॉक्झीन हे त्या पासून स्त्रवणारे संप्रेरक (हॉरमोन). टी 3 आणि टी 4 हे त्याचे दोन प्रकार. ह्या ग्रंथीतून हे रक्तात मिसळते. शरीरात सर्वदूर जाते आणि सर्वदूर आपला प्रभाव दाखवते. मुख्यत्वे शरीरातल्या ऊर्जा वापराशी या संप्रेरकाचा थेट संबंध येतो. त्यामुळे ह्यात काही बिघाड झाला की सर्वदूर परिणाम दिसतात. बिघाड काहीही असू शकतो. म्हणजे थायरॉईडचा स्त्राव अती होणे किंवा कमी होणे. दोन्ही शक्य आहे. दोन्ही तापदायक आहे. अती झालं की त्याला म्हणतात हायपर-थायरॉईडीझम आणि अल्प झालं की हायपो-थायरॉईडीझम.
थायरॉईड स्त्राव निर्माण होण्यासाठी लागतं आयोडीन. बाळासाठी आणि आईसाठी असं मिळून दिवसाला 250 मिलिग्रॅम लागतं. दूध, अंडी, मांस, मच्छी ह्यात भरपूर असतं ते. शिवाय आता आपल्याकडे मीठ मिळतं, तेही ‘आयोडीन युक्त’ असतं. हे आयोडीन युक्त मिठाचं धोरण, आहारातील आयोडीन कमतरेविरुद्ध एक महत्वाचं पाऊल आहे.
थायरॉईडच्या आजारचे निदान नेहमीच शारीरिक तपासणी आणि रक्त तपासणी करुन केले जाते.
स्त्रियांच्या आरोग्यातही ह्या थायरॉईडच्या अनारोग्याला महत्व आहे. सगळंच सांगायचं म्हटलं तर निव्वळ त्यावरच लेखमाला लिहावी लागेल. तेंव्हा इथे थायरॉईड आणि गरोदरपण ह्याबद्दलचीच माहिती बघू या.
थायरॉईडचा विकार असेल तर गरोदरपणात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. तेंव्हा वेळोवेळी थायरॉईडची तपासणी (TFT) करण्याला पर्याय नाही.
गर्भावस्थेत या थायरॉईडच्या छत्रछायेत गर्भाची वाढ होत असते. पहिले तीन महीने तर बाळाच्या थायरॉईड ग्रंथी कार्यरत नसतात. त्यामुळे बाळ, वारेतून मिळणाऱ्या आईच्या थायरॉईड स्रावावरच संपूर्णतः अवलंबून असते. १२ आठवडयादरम्यान बाळाची ग्रंथी कार्यरत होते पण पूर्ण क्षमतेनी काम करायला पाचवा महिना उजाडतो. तेंव्हा आईच्या ग्रंथीचे काम सुरवातीपासूनच योग्य सुरू असणे अतिशय महत्वाचे आहे.
हायपर-थायरॉईडीझम
थायरॉईडचं प्रमाण वाढलं, की आईमध्ये धडधड, हाताला कंप सुटणे आणि वजन पुरेसे न वाढणे अशी लक्षणे दिसतात. हा प्रकार बहुतेकदा शरीरात थायरॉईडला उचकवणारी प्रतिपिंड (Antibodies) निर्माण झाल्यामुळे होतो. हा तर आपल्या प्रतिकारशक्तीचा प्रताप. ह्याला म्हणतात ग्रेव्हस् चा आजार. ‘ग्रेव्हस्’ म्हणजे कबर किंवा गंभीर ह्या अर्थी नाही हं. रॉबर्ट ग्रेव्हस् ह्या आयरीश डॉक्टरने हा प्रथम वर्णीला म्हणून त्याला हे नाव दिलं आहे.
गरोदरपणात स्त्रीची प्रतिकारशक्ती किंचित क्षीण झालेली असते. त्यामुळे हा प्रताप थोडा थंडावतो देखील. पण नंतर पुन्हा हा आजार उचल खातो. ह्याच्या या असल्या बेभरवशाच्या वागण्यामुळे वारंवार तपासणीला पर्याय नाही.
थायरॉईड स्त्राव वाढण्यामागे खास गरोदरपणाशी संबंधितही एक कारण आहे. गरोदरपणात वारेतून एचसीजी हे द्रव्य स्रवत असतं. ह्याच अगदी पूरच येतो म्हणा ना. गर्भसंवर्धनाचे सुरवातीचे काम ह्या द्रव्याचे. मग हा पूर ओसरतो. पण तो पर्यंत ह्या एचसीजीमुळे थायरॉईड ग्रंथीचा स्त्राव वाढतो. मग पेशंटला खूप उलट्या वगैरेचा त्रास होतो. तेंव्हा उलट्या जास्त होत असतील, वजन घटत असेल तर थायरॉईड स्त्राव वाढल्याची शंका घ्यावी. तीन महिन्यानंतर एचसीजीचा पूर ओसरतो आणि उलट्याही थांबतात.
अगदी क्वचित थायरॉईड स्थित एखादी गाठ जास्त स्त्राव निर्माण करण्याचा उद्योग करत असते. पण हे अगदी क्वचित. तेंव्हा ते जाऊ दे.
औषधोपचार न घेतल्यास थायरॉईडच्या दुखण्याचे गर्भावर आणि गर्भिणीवर दुष्परिणाम होतातच. गर्भपात, कमी दिवसाची प्रसूती, अशक्त मूल, बाळंतवात (पीआयएच) असे काही काही होते. टोकाच्या केसेसमध्ये काही अधिक गंभीर प्रकारही (थायरॉईड स्टॉर्म) घडतात.
ग्रेव्हस् च्या आजारात बाळावर थेट परिणामही संभवतो. ज्या प्रतिपिंडामुळे ग्रंथीचे स्राव वाढतात ती प्रतीपिंडे वारेतून बाळापर्यंत पोहोचू शकतात. मग बाळाची ग्रंथीही जास्त स्राव निर्माण करते. क्वचित तिचा आकारही वाढतो. त्याहून क्वचित, काही बाळात हा तापदायक ठरेल इतका वाढतो. बाळाची वारंवार सोनोग्राफी करुन, त्याची ग्रंथी तर वाढलेली नाही ना, हे तपासले जाते. ह्या आजारावर उपचार म्हणू कधी कधी आईची ही अति कामसू ग्रंथी ऑपरेशन अथवा किरणोत्सर्गी औषधाने निकामी केली जाते. मग आईला बरे वाटते. पण तिच्या शरीरातील प्रतीपिंडे कायमच असतात. ती बाळात जाऊन तिथे वरील लोच्या करू शकतातच. तेंव्हा अशा रोगमुक्त स्त्रियांत देखील, बाळाची वारंवार सोनोग्राफी करुन, त्याची ग्रंथी तर वाढलेली नाही ना, हे पहिले जाते.
बाळात जर ही ग्रंथी अती स्त्राव निर्माण करू लागली तर बाळाच्या नाडीचा वेग वाढतो, कधी याचा हृदयावर ताण येतो, टाळू लवकर भरते, बाळ अशक्त आणि किरकिरे बनते; असे अनेक परिणाम दिसतात. जर ग्रंथीचा ग्रंथोबा झाला तर बाळाला श्वास घ्यायला अडथळा येऊ लागतो.
उपचार
सौम्य आजाराला काहीही उपचार लागत नाहीत. उलट्या जास्त झाल्या तर प्रसंगोपात सलाईन लावावे लागते. शिवाय थायरॉईड विरुद्धची प्रतीपिंडे सापडली तर गोळ्या घ्याव्या लागतात. ह्यामुळे थायरॉईडचा स्राव मर्यादित रहातो आणि बाळाकडेही अति प्रमाणात जात नाही.
हायपो-थायरॉईडिझम
याउलट जर स्त्राव कमी असेल तरीही त्रास होतो. नीट संतुलन साधलेलं असावं लागतं.
कमी स्त्राव हा हशीमोटोचा आजार. हाही प्रतिकारशक्ती कृपेकरूनच होतो. इथे थायरॉईड विरोधी प्रतीपिंडे थायरॉईडच्या पेशींचा नाश करतात आणि ग्रंथीचे कार्य मंदावते. ग्रंथीचे कार्य मंदावते आणि ती बाईही एकदम ‘मंदा’ होते!
तिच्या चेहऱ्यावर सदैव खुदाई खिन्नता पसरलेली दिसते. तिचा जीवनरस जणू संपून जातो, हालचाली संथावतात, कशात मन लागत नाही, प्रचंड थकवा येतो, पायात गोळे येतात, बद्धकोष्ठता होते, डोंगराची हवा गार नसतानाही हिची ‘सोसना गारवा’ अशी तक्रार असते.
खूपच कमी थायरॉईड असेल तर रक्तक्षय (Anemia), गर्भपात, अशक्त मूल, बाळंतवात (पीआयएच) वगैरे प्रकार घडतात. इतरही काही अघटित घडू शकतं. तेंव्हा कमी थायरॉईडसाठी गोळ्या चालू असतील तर त्या दिवस राहिल्यावर बंद करू नयेत. उलट डॉक्टरी सल्ल्याने डोस अॅडजस्ट करुन घ्यावा.
उपचार
गोळ्या अगदी स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी आहेत. आईसाठी आणि बाळासाठीही आवश्यक आहेत. थायरॉईड हॉरमोनच्या (Levothyroxine) गोळ्या मिळतात. त्या नियमित घ्याव्या लागतात. सकाळी, उठल्याउठल्या, उपाशीपोटी संपूर्ण डोस घ्यायचा आहे. अन्य औषधांसोबत (उदा: लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या) या गोळ्या घेऊ नयेत. हयात टी 4 नावाचे संप्रेरक असतं. ह्याचा महिमा काय वर्णावा? हे बाळाच्या मेंदुपर्यंत अगदी सुरवातीपासून पोहोचू शकतं. हे तर अतिशय महत्वाचं. पण बाजारात थेट प्राण्यांच्या थायरॉईड ग्रंथींपासून निर्मिलेले ‘थायरॉईडवरचे औषध’ उपलब्ध आहे. हयात टी 4 आणि टी 3 अशी सरमिसळ असते. बाळाच्या मेंदूच्या वाढीच्या दृष्टीने यातले टी 3 अगदीच कुचकामी आणि टी 4 ची मात्रा अगदीच कमी. तेंव्हा हे असले औषध घेऊ नये.
प्रसूतीपश्चात थायरॉईड विकार
बरेचदा प्रसूतिनंतर थायरॉईडचं काम आधी अधिक आणि नंतर कमी झालेलं आढळतं (Postpartum Thyroiditis). हाही आपल्या प्रतिकारशक्तीचा प्रताप. सर्व पेशंटमध्ये या दोन्ही अवस्था दिसतात असं नाही. सुमारे तीन महीने अधिक थायरॉईड ही अवस्था टिकते. तक्रारी विशेष नसतात. विशेष असल्या तरच हृदय गती कमी होण्याची औषधे द्यावी लागतात. काही केसेसमध्ये स्त्राव कमी होण्याची औषधे द्यावी लागतात. पुढे स्त्राव कमी पडू लागतो. मग तो वाढायची औषधे सुरु करावी लागतात. स्त्राव कमी पडला की वर उल्लेखल्याप्रमाणे पेशंटची ‘मंदा’ होते. बरेचदा पेशंटला नैराश्य आलेलं आहे असाही समज होऊ शकतो. योग्य तपासण्यांनी योग्य निदान होते. वेगवेगळ्या अवस्थेनुसार तक्रारी बदलतात आणि उपचारही बदलतात. बहुतेक स्त्रियांत सुमारे वर्षभरात परिस्थिती पूर्ववत होते काहींत मात्र कायम औषधे चालूच ठेवावी लागतात.
तर अशी ही कंठग्रंथी थायरॉईड. मलाही आहे, तुम्हालाही आहे. हिचे कार्य निर्वेध चालो हीच सदिच्छा.
पूर्व प्रसिद्धी
लोकमत सखी पुरवणी
१५/६/२०२१
मंजिरी जोशी वैद्य, Ravi Bhamre and 2 others

Monday, 7 June 2021

सारखं छातीत दुखतंय

 

सारखं छातीत दुखतंय

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

बऱ्याच बायकांना सारखं ‘छातीत’, म्हणजे स्तनाच्या गाठीत, दुखत असतं. बरं दुखतंय म्हटलं आणि विशेषतः छातीत दुखतंय म्हटलं  की  बहुतेक बायकांना एकच आजार आठवतो, कॅन्सर!! मग त्या सैरभैर  होतात. कुठेही खुट्ट वाजलं की छातीत धस्स होण्याची सवय असतेच काहींना. महत्वाचा मुद्दा एवढाच की, दुखणारी गाठ सहसा (९५% वेळा) कॅन्सरची नसते कारण कॅन्सरची गाठ सहसा दुखत नाही!!

अशाच एक बाई रात्रभर नवऱ्याला त्रास द्यायच्या. बाहेर काही वाजलं, कुत्रं जरा  भुंकलं, वाऱ्यानी पत्रा  जरी वाजला, तरी त्यांचं आपलं एकच टुमणं; ‘अहो ऐकलंत का, बाहेर काहीतरी आवाज येतोय.  जाऊन बघा बरं.  चोरा चिलटाचं लई भ्या सांगतात आजकाल!’ रात्र रात्र खेटे घालून नवरा वैतागला. म्हणाला, ‘अगं चोर काय वाजत गाजत येणारेत व्हय? येडी कुठची.’

यावर परिस्थिती  आणखी चिघळली. आता त्या बाई, ‘बराच वेळ  झाला, कुठेही  खुट्ट सुद्धा वाजलं नाही,’ म्हणून नवऱ्याला उठवतात.

तेंव्हा कॅन्सरची गाठ सहसा दुखत नाही’ हे वाचून, ‘सध्या काहीच दुखत खुपत  नाहीये, सबब कॅन्सर असणार’, असा निष्कर्ष मात्र कृपया काढू नका!  

स्तनात वेदना उद्भवण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यातील बहुतेक किरकोळ, साधीशी आहेत.

पाळीच्या चक्रातील संप्रेरकांतील (हॉर्मोनस्) असंतुलन हे एक कॉमन कारण आहे. हा त्रासही चक्रीय असतो आणि दोन्ही बाजूला होतो.   पाळीच्या आधी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन वाढतात, यामुळे स्तन फुगतात, आणि दुखतात. दोन बोटांनी  चाचपून पहिलं की बारीक बारीक, गाठी गाठी लागतात. काखेजवळच्या भागात आणि कधीकधी काखेत वेदना जाणवतात.   पाळी येताच हा त्रास बंद होतो. सह्य असेल तर हा त्रास म्हणजे कोणताही मोठा आजार मानला जात नाही. एका  नैसर्गिक क्रियेची व्यक्तीगणिक बदलणारी ठेवण, एवढाच त्याचा अर्थ. त्यात काळजी करण्यासारखं काही नाही.  

गरोदरपणाच्या  सुरवातीलाही  हा प्रकार आढळतो. सुरवातीला तीन महीने   स्तन हुळहुळे झाल्याचं बऱ्याच पेशंट सांगतात. यालाही काही उपचार लागत नाही. लागलेच तर दारू, सिगरेट, कॉफी, बंद; मीठ कमी आणि लागली  तर एखादी वेदनाशामक गोळी; एवढेच उपचार पुरतात. आपल्याकडे तसंही बायका दारू-सिगरेटच्या फंदात विशेष नसतात.     

काहींना गर्भनिरोधक गोळ्यांनी किंवा वयस्कर स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या इसट्रोजेनच्या गोळ्यांनी त्रास होतो. मानसिक आजारासाठीची काही औषधे (क्लोरप्रोमॅझीन), हृदयविकारावरील काही औषधेही  (मूत्र-विरेचक, मिथीलडोपा अथवा डिजिटॅलीस)  स्तनशूल निर्माण करतात. ह्या गोळ्यांचं स्वरूप बदललं की त्रास थांबतो.

कधीतरी पूर्वीच्या शस्त्रक्रियांचे व्रण दुखत रहातात. कधी   स्तनाच्या गाठीला कळत नकळत मार लागतो आणि जागा दुखायला लागते; सुजते, लाल होते, काळीनिळी  होते.   टेबलाचा कोपरा किंवा  लहान मुलाचा धक्का लागलेला असतो.  कधी मोठ्या मुलाचाही लागलेला असतो!  इतरत्र मुका  मार लागल्यावर जे उपचार केले जातात तेच  इथेही लागू पडतात.

योग्य मापाची अंतरवस्त्रे नसतील तरीही कधी स्तनाची गाठ दुखू शकते. विशेषतः व्यायाम करताना, सतत काम करताना, जर योग्य मापाचे कपडे नसतील तर स्तनांना आधार देणाऱ्या लीगामेंट्सवर ताण येतो आणि वेदना होतात.

काही स्त्रियांच्या मध्ये स्तनाचा आकार अव्वाच्यासव्वा वाढतो आणि स्तनांबरोबर मान, खांदे वगैरेही ह्या भाराने भरून  येतात.  

कधी कधी फासळ्या, तिथले स्नायू वगैरेत काही सूज असते, इजा  असते आणि वेदना मात्र स्तनात आहे असा समज झालेला असतो. नीट शारीरिक तपासणी केली की हा फरक स्पष्ट होतो आणि योग्य ते उपचार करता येतात.  फासळ्यांत मऊ (कूर्चा, Cartilage) आणि कडक (हाड) असे भाग असतात. वयात येताना यांच्या सीमारेषेवर सूज येते. यातही बरेचदा स्तन दुखतोय असा गैरसमज होऊ शकतो.

कधी कधी स्तनांत हाताला टमटमीत गाठ लागते. एखादा पाण्यानी टम्म फुगलेला फुगा असावा, अशी. असल्या गाठी कसल्या आहेत याचा शोध घेण्यासाठी सोनोग्राफी, मॅमोग्राफी (स्तनाचा एक्सरे) आणि गाठीतील पाणी काढून तपासले जाते. बरेचदा पाणी काढून भागते. निदनही होते आणि उपचारही. वेगळं काही करावंच लागत नाही.

इतक्या सगळ्या साध्यासुध्या गाठींची माहिती वाचल्यावर तुमच्या मनात आपोआपच प्रश्न आला असेल, ‘मग कॅन्सरची शंका कधी घ्यायची?’

दुखणारी गाठ सहसा (९५% वेळा) कॅन्सरची नसते कारण कॅन्सरची गाठ सहसा दुखत नाही!! कॅन्सरची गाठ चांगली कडक लागते, बटाट्यासारखी. पण बटाट्यासारखी  गोलमटोल आणि एकसंघ जाणवण्याऐवजी वेडीवाकडी, कडा अस्पष्ट असलेली  आणि पसरट लागते. पातळ गोधडीखाली आल्याची फणी चाचपावी, अशी.   गाठीवरील त्वचा बरेचदा आक्रसलेली आढळते. या बरोबर काखेतही हाताला  गाठी जाणवतात किंवा तपासणीत आढळतात. ही सारी कॅन्सरची दुष्चिन्हे    

अर्थात वेदना असो वा नसो प्रत्येक गाठ नीट तपासून मगच काय तो निष्कर्ष काढला पाहिजे.