Monday, 28 October 2019

दु:ख पहाता जवापाडे। सुख पर्वताएवढे।


दु:ख पहाता जवापाडे।  सुख पर्वताएवढे।
स्टीफन पिंकर कृत ‘एनलाईटनमेंट  नाऊ’ या पुस्तकाचा परिचय.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.


‘सूख पहाता जवापाडे  दु:ख पर्वताएवढे’, असं तुकारामबुवांनी म्हटलेलंच आहे. जगात ‘सुख थोडे दुख फार’, हा लोकप्रिय समज. पण पिंकर त्याच्या नव्या ‘एनलाईटनमेंट  नाऊ’ या पुस्तकात म्हणतो, ‘दु:ख पहाता जवापाडे,  सुख पर्वताएवढे’!  त्याच्यामते हे जग झक्कपैकी सुधारत चाललं आहे, चक्क ज्ञानोदय झाला  आहे, उत्तरोत्तर प्रगती होते आहे, असं तो ठामपणे सांगतो. माणसाच्या जरतारी आयुष्याचे वस्त्र आता अंगभर  सुखाच्या  शंभर धाग्यांनी विणले आहे, दु:खाच्या एका  धाग्याची किनार तेवढी आहे.  पिंकर सांगतो ज्ञानयुगाचा आजचा अवतार बाळसेदार आहे आणि बाळाचे भविष्य उज्वल आहे; असा आत्यंतिक आशावादी सूर तो धरून आहे.   त्याच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ आकडेवारीही  तो  सादर करतो. ‘बेटर एंजल्स ऑफ अवर टाइम्स’ ह्या त्याच्या, यापूर्वीच्या पुस्तकात तर अशी आकडेवारी हारीने सापडेल.
स्टीफन पिंकर हे विचारविश्वातील एक भारदस्त नाव. मुळात भाषा हा याच्या अभ्यासाचा विषय, पण इतिहास, उत्क्रांती आणि एकूणच मानवी समाज यानेही त्याला भुरळ घातलेली. त्याचं ताजं पुस्तक याची साक्ष देतं. ‘एनलाईटनमेंट नाऊ’ (आजचे ज्ञानयुग) , हा  चांगला पाचशेच्यावर पाने असलेला जाडजूड ग्रंथ आहे; आणि जगात ‘दु:ख थोडे, सुख फार’, असं पटवून देणारा  आहे. अर्थात असं पटवून देणारा आहे, का पटवू  पहाणारा आहे हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. 
पिंकर म्हणतो, समजा, ज्या  वृत्तपत्राचा अंक दर  पन्नास वर्षांनी निघतो, अशा एका  वृत्तपत्राचे तुम्ही  संपादक आहात आणि आता  उद्याचा अंकाचा  मथळा तुम्हाला ठरवायचा  आहे; तर तुम्ही गेल्या अर्धशतकातील सर्वात महत्वाची बातमी कोणती ठरवाल? काय मथळा निवडाल? चंद्रावर पाऊल? देवीचे निर्मूलन? पोलिओचे  उच्चाटन? घटती गरीबी आणि भूक? संगणक क्रांती? का इराणचे युद्ध? काश्मीर? तापमानवाढ? का आणखी काही? अर्थातच काही तरी चांगलं घडल्याची बातमी तुम्ही पहिली  द्याल, हीच शक्यता जास्त. 
नुसतीच प्रगती होत आहे एवढेच प्रतिपादून तो थांबत नाही तर ही घडण्यासाठी ज्या  गोष्टी कारणीभूत झाल्या त्याही मांडतो. त्याच्या मते, विज्ञान, विवेकवाद, उदारमतवाद आणि मानवतावाद ही ह्या प्रगतीची चाके आहेत. ह्या साऱ्यांच्या परिणामी एक सुष्टचक्र  फिरू लागले आहे. या चाकांना तेलपाणी करत राहिलं की हे सुष्टचक्र अव्याहतपणे सुरू राहील असा ठाम विश्वास देतो पिंकर.
आपला भवताल समजावून घ्यायला माणूस आता, परंपरा, श्रुतीस्मृतिपुराणोक्त वचने, संतवचने, साक्षात्कार, ग्रंथप्रमाण्य, गूढविद्या; हे  असलं काही वापरत नाही. सतराव्या शतकातील विचारमंथनाचे हे  नवनीत. दिसतं तसं आणि  तेवढंच नसतं, आपल्या पूर्वजांच्या मतापेक्षाही तर्कबुद्धीने विश्वाची संगती नीट लावता  येते, हे या विचारधारेचे भक्कम मूळ. विज्ञान, विवेकवाद, उदारमतवाद आणि मानवतावाद हीच आज आपली विश्लेषणाची आयुधे आहेत. विज्ञानाची; गृहीतक मांडणे, ते वस्तुस्थितीशी ताडून पहाणे आणि त्यानुसार ते  ग्राह्य वा त्याज्य ठरवणे; ही पद्धती तर आदर्शच.
मानवतावाद म्हणजे विज्ञान आणि विवेकाच्या  संयोगाने उमललेलं तत्वज्ञान. मानवतावादाची नीतीमूल्ये विवेक आणि विज्ञानावर पोसली गेलेली. मानवतावाद   स्त्री-पुरुष असा लिंगभेद, गोरे-काळे असा वंशभेद, अव्यंग-सव्यंग असा शारीरभेद, असे सारेच भेद संपुष्टात आणतो. कैदी, गुन्हेगार, बालके, रोगिष्ट, समलैंगिक इतकेच काय पण अन्य सजीव;  अशा साऱ्यांच्या हक्काची  जाणीव आणि त्यांचा सारासार विचार यात अनुस्यूत आहे. ह्या पूर्वीच्या कोणत्याही तत्वज्ञानाने वा मानव हितकारी असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या धर्माने, असले काही सांगितलेले नाही.  फक्त आपल्या टोळीचे, आपल्या जातीचे, आपल्या वंशाचे, देशाचे, वर्णाचे, हित पाहते, जोपासते अशी नीतीकल्पना सांगितली आहे. त्यापायी  इतरांना पीडा पोहोचवण्याचे अधिकार सांगितले आहेत; द्वेष, पीडा, हिंसा  यांना चक्क संस्थात्मक रूप दिले आहे. आताची नीतीकल्पना अधिक उन्नत, अधिक उदार, अधिक उदात्त नाही का? ही प्रगती नाही का?   

ज्ञानयुगाचा उगम
इसवी सन 1000 ते 1800 पर्यन्त जगात सर्वत्र जैसे थे परिस्थिति राहिलेली दिसते. असलीच तर समृद्धीची बेटे होती. समृद्धी ही सार्वत्रिक, जगद्व्यापी बाब नव्हती.  पण छपाईमुळे भलताच फरक पडला. युरोपभर आणि वसाहतींमध्ये माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण सुरू झाली. ज्ञान आणि माहिती प्रथमच स्वस्त झाली, सामान्यांच्या आवाक्यात आली. औद्योगिक क्रांतीच्या आधी फळफळलेलं एकमेव असं  हे छपाईचे क्षेत्र. युरोपात क्रुसेड्सची (धर्मयुद्धांची) आठवण ताजी होती. त्यातील निष्फळ  नरसंहार निराश करणारा  होता. हे आता पुनः नको अशी भावना स्वार होती. असे अनेक घटक होते. त्यातून सतराव्या शतकात ‘एज ऑफ रीसन’, तर्क-विवेकाचं युग, विज्ञानयुग  अवतरलं. औद्योगिक क्रांती झाली.   त्यातूनच पुढे  हे ज्ञानयुग (एज ऑफ एनलाइटनमेंट) साध्य  झालं. 
माणसाची खरी प्रगती झाली ती त्याच्या मेंदूच्या अफाट शक्यतांमुळे. शेती, पशूपालन, भाषा, लिपी आणि काय काय शोधलं मेंदुनी या. धर्म, तत्वज्ञान, कला, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था ही देखिल या मेंदूचीच करामत. इतकंच काय पण उच्चार स्वातंत्र्य, मानवी हक्क, आणि परस्पर  सहकार्यावर आधारित राजकीय व्यवस्था ही देखील मानवी मेंदूचीच करामत.
‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति’ असं म्हटलं आहे पण पिंकर सांगतो, जगाच्या कल्याणा संस्थांच्या विभूति.  प्रगत आणि प्रगतिशील  राज्यसंस्था, अर्थसंस्था, न्यायसंस्था यांनीही प्रगतीला हातभार लावलेला आहे. पोलिओच्या लसीचा   शोध महत्वाचा खरंच पण ही लस सर्वदूर पोहोचवण्यात जागतिक आरोग्य संघटना, देशोदेशीची सरकारे, रोटरी क्लब, बिल गेट्स फाउंडेशन सारख्या संस्था यांचेही योगदान आहेच की.


... मग प्रगती दिसत का नाही?
इतकं सगळं भलं घडतय तर मग ते आपल्याला जाणवत कसं नाही? पिंकर काहीही म्हणत असला तरी आसपास सर्वत्र दु:ख, दैन्य, नैराश्य माजलेलं दिसतंय की आपल्याला, त्याचं काय? पिंकर समजावतो, माध्यमं नाकारात्मकतेवर पोसली जातात. आपला भवताल आपल्याला कळतो तो मुख्यत्वे बातम्यांमुळे आणि बातम्या ही गोष्टच मुळी भल्यापेक्षा बुऱ्यावर पोसली जाणारी आहे. सारं काही आलबेल आहे, यात बातमीमूल्य काहीच नाही. त्यामुळे भलं ठेवतात झाकून आणि बुरं पहातात वाकून. बुऱ्याचे   तेवढे चर्वीतचर्वण अखंड चालू रहाते. दुःख, दैन्य, दारिद्र्य, नीच-अधम कृत्ये हीच बातम्यांचे विषय असतात. याच चष्म्यातून आपण जगाकडे पहातो. जे आपल्याला दाखवलं जातं तेवढेच जग आहे अशी समजूत करून बसतो. जगात कुठे ना कुठे, काही ना काही, वाईट घडतंच. तेंव्हा वार्ता विघ्नाची सदैव हाजिर असणारच. एकूणच जग अधिकाधिक वाईट होत आहे असा समज दृढ केला जातो. खरंतर  वैयक्तिकरित्या माणूस आज अधिक सुरक्षित, अधिक  सुपोषित, अधिक सुस्थितीत आहे, पण सतत खून, बलात्कार, युद्ध, मारामारी यांच्याच बातम्या आपल्यावर आदळत असल्याने आपली विचारशक्ती भ्रमित झाली आहे.
जरा शांत चित्तानी पेपरच्या मथळ्यांपेक्षा आकडेवारीवर नजर  टाकली तर या भ्रमाचा निरास होईल. प्रगतीच्या अनेक परी आणि अनेक पदर तो दाखवतो. आयू, आरोग्य, असमानता,  आतंक, पर्यावरण, युद्ध, सुरक्षा, लोकशाही व्यवस्था, सामानाधिकार, ज्ञान, जीवनशैली, आनंद  असे सुखाचे, प्रगतीचे  दीड-डझन निकष आणि अनुरूप आकडेवारी तो सादर करतो  आणि प्रत्येक रकान्यात विज्ञान, विवेक, मानवता, यांचा जय होत असून प्रगतीच होते आहे हे दाखवून देतो.

प्रगतीच प्रगती
भौतिक प्रगती तर ठायी ठायी दिसतेच आहे. जगात आज भुकेने आणि कुपोषणाने मरतात त्याहीपेक्षा जास्त माणसे अति-पोषणाने मरतात. उपासमारीची समस्या असण्यापेक्षा ही बरी.  उपासमारी अजूनही आहे, पण ती युद्धग्रस्त अथवा अतिदुर्गम  अशा प्रदेशात आहे. दुष्काळ, साथी  आणि माणसे किडयामुंग्यांसारखी मरणे हा आता इतिहास आहे. साथीच्या आजारापेक्षा अधिक माणसे आज वृद्धापकाळाने मरतात.  आहार आणि आरोग्य यांचा थेट संबंध आयुर्मानाशी असतो. मानवी सरासरी आयुर्मान आता 71 वर्ष आहे, पूर्वी बहुतेक काळ ते 30 वर्षाच्या आसपासच  होतं.   साक्षरता प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पण युद्ध आटली आहेत! युद्धात मरणाऱ्यांपेक्षा आत्महत्या करणाऱ्यांची संख्या आज अधिक भरते.  किरकोळ चोऱ्यामाऱ्या, खूनदरोडे  कमी झाले आहेत. हे सगळं आकडेवारीनिशी सिद्ध करतो पिंकर. दरोडे आणि खूनखराबा मध्ययुगापासून उतरणीला लागला होता. पण आधुनिक युगात व्यावसायिक पोलिसदले आली, फौजदारी न्यायालये आली आणि आता तर डिजिटल पोलीसिंगमुळे गुन्हेगार गुन्हा करू धजत नाहीत. शिक्षाही आता पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. हात पाय कलम करणे, हत्तीच्या पायी देणे, चाबकाचे फटके हे प्रकार तर जवळपास बंदच झाले आहेत. शिक्षा आता पूर्वीपेक्षा  सौम्य आहेत.   गुन्ह्याच्या, पापाच्या प्रमाणात आहेत. किरकोळ गुन्ह्यासाठी कडक शिक्षा फर्मावली तर गुन्हेगार उलटा विचार करतात. लूटमार केली तरी फासावर जाणार आहोत मग नुसतंच लुटण्यापेक्षा  थेट मारूनच टाकू ना! आणि मग निव्वळ एकच खून  का, साक्षीदारांनाही यमसदनी  पाठवू, जे  व्हायचे ते होईल.  किरकोळ गुन्ह्याला कडक शिक्षा हे विपरीत प्रोत्साहन ठरते, ते असे.  

पिंकर आणि अतिआशावाद
पिंकरला अनेकांनी ‘पानग्लोस’ची उपमा दिली आहे. व्हॉलटेअरचे हे पात्र, अति-आशावादी म्हणून प्रसिद्ध आहे.  आपण उत्तमात उत्तम जगात असून आसपास आहे ते उत्तमच आहे असा ठाम विश्वास पानग्लोस बाळगून असतो. पिंकर म्हणतो पानग्लोस कुठला आशावादी, तो तर निराशावादी होता! मी आशावादी आहे.  आहे ते उत्तमात उत्तम आहे अशी पानग्लोसची समजूत होती. मी आहे हे आधीपेक्षा उत्तम आहे असं म्हणतोच पण  हे का उत्तम आहे ह्याचा  अभ्यास केला तर हे अधिक उत्तम होईल, अशी आशा बाळगून आहे. मी विवेकी आशावाद बाळगून आहे. जगात निराशावादी लोकांना, चिंतातुर जंतूंना  उगीचच विचारवंत आणि अधिक प्रगल्भ वगैरे समजलं जातं. त्यामुळे चिंता करणे विश्वाची हा काहींचा बाणा बनतो. पण हे काही खरं नाही.
पण याचा अर्थ, सारे काही आलबेल असून आता स्वस्थ बसावे आणि बसूनी  गिळावे, असा होत नाही. या प्रवासातही अनेक धक्के आपल्या वाट्याला आले आहेत. दुसरे महायुद्ध, आफ्रिकेत एड्सने घातलेला हैदोस आणि इतर कितीतरी. इतिहाची चाल एकरेषीय नसते, सततचे हेलकावे ठरलेले. उत्तरोत्तर प्रगती याचा अर्थ उद्याचा दिवस आजच्यापेक्षा चांगलाच उगवेल असा नाही. दमन, दुष्काळ आणि दुरवस्था ओढवणारच नाही असे नाही. पण कालच्यापेक्षा उद्याचे दमन, दुष्काळ आणि दुरवस्था बरी  असेल असे तो सांगतो. यासाठी  तो आकडेवारीही देतो. आज वंचित, पीडित जनतेचा आवाज दाबणे कालच्यापेक्षा अवघड झाले  आहे. आज दुष्काळ पडला तर जगभरातून मदतीचा ओघ तिथे पोहोचतो.  आजची गरीबीही  कालच्या  गरीबीपेक्षा किती तरी ‘श्रीमंत’ गरीबी आहे... अशी कितीतरी विधाने तो पुराव्यानिशी शाबीत करतो.  

पिंकर आणि पर्यावरणवाद
पिंकरला हे मान्यच आहे की शेतीचा शोध लावल्यापासून ही वसुंधरा माणसाने ओरबाडायला सुरवात केली आहे. औद्योगिक क्रांती  म्हणजे तर कहर आहे, दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिकाधिक बिकट होते आहे आणि अंतिमतः सर्वनाश अटळ आहे. माणूस आणि त्याची प्रगती हाच या भुईला  भार आहे. आपण पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास  केला आहे. हे खरंच  आहे आणि ह्याची जाणीव आपल्याला विविध पर्यावरण चळवळींनी करून दिली आहे. पण पर्यावरणापायी प्रगतीला सरसकट धोपटणे हे काही खरे नाही. आधुनिक विवेकी पर्यावरणवादाचा तो पुरस्कार करतो. पर्यावरणाचा ऱ्हास ही   आपल्या प्रचंड प्रगतीची किंमत आहे. दुप्पट आयूर्मान, गुलामीतून मुक्तता, स्त्रियांची चुलीपासून सुटका, मुलांची शेतीकामातून शाळेत रवानगी, या साऱ्याच्या बदल्यात आपण पर्यावरणाला  हानी पोहोचवली आहे. याला इलाज नाही. घर संपूर्णतः केरमुक्त ठेवायचं  तर त्यात होणारी श्रमाची आणि वेळेची गुंतवणूक आपल्याला परवडणारच नाही. त्यामुळे थोडाफार कचरा आपण चालवून घेतो. तसंच हे. पर्यावरण अमूल्य आहेच पण मानवी प्रगतीला, संपन्नतेला  काही किंमत आहेच की. जेनेटिकली बदल केलेल्या पिकांना केलेला विरोध, हा म्हणूनच आंधळा विरोध ठरतो. अधिक उत्पन्न देणारी, कीटकरोधक शक्ति असलेली आणि कमी खतं लागणारी अशी वाणं आवश्यक आहेत. जे जे नैसर्गिक ते ते आपोआपच चांगलं आणि जे जे मानवनिर्मित ते ते आपोआपच हानीकारक ही विभागणी फारच प्राथमिक, बालिश आणि काहीशी हास्यास्पद आहे. उलट नवपर्यावरणवाद हे जाणून आहे की समृद्धी असेल तर पर्यावरणही समृद्ध असते. वीजेचंच ज्याला अप्रूप तो समाज वाट्टेल त्या पर्यावरणीय किमतीला ती घेणारच. वीज मुबलक उपलब्ध झाली की मग पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा विचार येतो. त्यामुळेच जगात जिथे दारिद्रय नांदतं तिथे पर्यावरण जास्त खराब आहे. निव्वळ श्रीमंतांनी आपली घाण त्यांच्यावर ढकलली आहे असं नाहीये. हवेचे किंवा पाण्याचे प्रदूषण काही निर्यात करता येत नाही. गरीबाघरी सर्वात प्रदूषित असते ती स्वयंपाकघरातील धूर भरली हवा आणि  पिण्याचे पाणी. 
पृथ्वीचे तापमान वाढते आहे आणि अशा वेळी सर्वात स्वच्छ आणि प्रचंड ऊर्जा पुरवणारा  स्त्रोत म्हणजे अणुऊर्जा. स्वस्त आणि प्रचंड ऊर्जा वापरून युरोप अमेरिकेने प्रगती केली. आता भारत आणि चीनसारखे देश, आम्हालाही अशी संधी  हवी, ऐनवेळी तापमानवाढीचं  निमित्त काढून आमची संधी  हिरावून घेणारे, आम्हाला शहाजोगपणे शहाणपणा  शिकवणारे, तुम्ही कोण असं विचारत आहेत. अणुऊर्जा स्वस्त आणि शुद्ध आहे पण अणुअपघाताची कृष्णछाया आपले मन व्यापून टाकते. चेर्नोबिल, फुकुशिमा हे आघात ताजे आहेत. पण एकूण हिशोब केला तर औष्णिक वीजकेंद्रातून होणाऱ्या रोजच्या प्रदूषणाशी तुलना करता हे अपघात परवडले म्हणायचे. अपघातात माणसे अचानक आणि मोठ्या प्रमाणावर मरतात, अपघातात नुकसान अचानक आणि मोठ्या प्रमाणावर होते; पण याचा अर्थ एरवी ते होत नसते असे नाही. कोळशाच्या धुरातून होणाऱ्या प्रदूषणातून, ऊर्जेच्या आभावामुळे होणाऱ्या संधिहननातून,  क्षणोक्षणी शेकडो  लोक बाधित होत असतात. फक्त त्यांची हेडलाईन होत नाही, एवढंच. हे सगळं  विचारात घेतलं  तर कोळशाच्या ज्वलनातून ऊर्जा मिळवण्यापेक्षा अणुऊर्जेचा जुगार अधिक फायद्याचा आहे.

पिंकर आणि डावे उजवे  
डाव्यांच्या आणि उजव्यांच्या खोडी पिंकर बरोब्बर दाखवून देतो. यात तो डावेउजवे करत नाही.   डावे, उजवे असे सारेच कळपानी  रहातात. कोणत्याही नव्या विचाराचा,  समस्यापूर्तीचा, स्वीकार अथवा धिक्कार स्वतंत्रबुद्धीने करत नाहीत. आपल्या मूळ वैचारिक ढाच्याशी काय जुळतंय ह्यावर त्यांची भूमिका ठरते.  विरुद्धार्थी पुरावा ते साफ नाकारतात किंवा त्याकडे डोळेझाक तरी करतात. एवढेच नाही तर ते  विरोधकांचे दानवीकरण करतात. वैचारिकदृष्ट्या निरुपद्रवी निष्कर्ष बरोबर काढतात.  उदा: एखाद्या मलमाचा मुरूमावर उपयोग आहे वा  नाही, हे खालील आकडेवारीवरुन सांगा म्हटले की बरोबर निष्कर्ष काढतात.  पण कोणत्याही राजकीय-सामाजिक-आर्थिक प्रश्नाकडे आपापल्या चष्म्यातून पहातात. ही काही पिंकरने जाताजाता टाकलेली मताची पिंक नाही.  अनेक प्रयोग उद्धृत करून पिंकरने आपला दावा भक्कम केला आहे.  यावर उपाय मात्र अवघड आहे. अशी परिस्थिति आहे, असू शकते,  हे मान्य करणं ही पहिली पायरी. उजव्यांसाठी डाव्यांनी आणि डाव्यांसाठी उजव्यांनी प्रवक्ता म्हणून युक्तिवाद करून पहाणे हा आणखी एक उपाय.  
कोणत्याही धोरणाचे मूल्यमापन निरपेक्षपणे व्हायला हवं. अर्थात जो हेतु आहे तो मुळात साध्य होतोय ना, ही अपेक्षा ठेवलीच पाहिजे, या अपेक्षेच्या प्रकाशात तर धोरण तपासणी व्हायला हवी. आपापल्या इजमचे चष्मे लावून नाही. माणूस मुळात विवेकी प्राणी नाही. त्यामुळे विवेक हे मूल्य शिकावं, शिकवावं, रुजवावं, फुलवावं लागतं. आपोआप ते उगवून येणं अवघडच.

मानव्यविद्यांची  झाडाझडती
एकूणच राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र वगैरे मानव्यविद्यांच्या सध्याच्या अभ्यासपद्धतीबद्दल पिंकर अतिशय असमाधानी  आहे. मानव्यविद्यांचा  अभ्यासही विज्ञानाच्या शिस्तबद्धतेने व्हायला हवा असं त्याचं सांगणे आहे. शब्दबंबाळ, जडजंबाळ, विद्वजड,  गूढ, परिभाषा त्याला मान्य नाही. आधुनिक उदारमतवादी संस्थांप्रती  टोकाचा  दुस्वास  आणि जग उत्तरोत्तर रसातळाला  चाललंय हा जबरदस्त निराशावाद, ही यांची वैचारिक मालमत्ता. मुळात उदारमतवादी विचारांमुळेच मानव्यविद्या बहरल्या आहेत हे यांच्या गावीही नाही. 


ज्ञानयुगाचे वाटाडे आणि विरोधक
ज्ञानयुगाच्या वाटाड्यातही एकमत नव्हतच. अपेक्षितही नव्हतं. ज्ञानयुग म्हणजे कोणता नवा  पंथ, धर्म वा  एकच एक विचारधारा नाही. एडमंड बर्क तर म्हणतो माणूस हा मुळातच अ‘तर्क्य’ प्राणी आहे. तेंव्हा तर्काधिष्ठित समाजबिमाज घडवण्याची उठाठेव कशाला? उलट काही अविवेकी प्रथापरांपरांमुळेच समाज शाबूत आहे. वरकरणी वृथा वाटणाऱ्या अशा परंपरा जपलेल्याच बऱ्या. पिंकर हे सारं मान्य करतो पण बजावून सांगतो की या ज्ञानमंथनातून जी प्रगतीची  तत्व वर आली ती महत्वाची. बाकी पाण्यावरच्या  तरंगांकडे  आणि बुडबुड्यांकडे लक्ष देण्यात हशील नाही.
ज्ञानयुगाला विरोधही झाला. ज्ञानयुग हे व्यक्तीला महत्व देणारे, तिच्या प्रामाणिकपणावर सदसद्विवेकवर विसंबून रहाणारे आहे. त्यामुळे आपल्या आणि समाजाच्या जडणघडणीसाठी  देवाधर्मावर अवलंबून असणाऱ्यांना, विज्ञानाच्या विचार पद्धतीचं वावडं असणाऱ्यांना,  ज्ञानयुग नकोसं वाटतं.

आजचे चकवे
कित्येक तथ्यांचा यथातथ्य अभ्यासच प्रस्थापित राजकीय वातावरणात होऊ शकत नाही. उदाहरणार्थ बुद्धिमत्ता आनुवंशिक असते, काही जमातीत गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असते किंवा बायका आणि पुरुष हे यांचे करियर आणि घरदार या बाबतचे दृष्टिकोन भिन्न भिन्न असतात; यांचा अभ्यास करणे ‘समानता’ हे मूल्य स्वीकारल्यामुळे अडचणीचे होते. (आपल्याकडचं उदाहरण द्यायचं तर स्त्री अथवा दलित धार्जिण्या  कायद्यांचा गैरवापर होतो का याचा अभ्यास करणं हेच तुम्ही स्त्री अथवा दलित विरोधी असल्याचा पुरावा मानला जातो.)  मग असले अभ्यास केलेच जात नाहीत. मग टोकाची, अतिरेकी, अति उजवी/डावी भूमिका घेणाऱ्यांना रान मोकळं मिळतं. मग ते त्यांच्या सोयीने ह्या प्रश्नांचा ‘अभ्यास’ करतात आणि सोयीचे निष्कर्ष मांडतात. हे व्हायचे नसेल तर कोणतेही विधान व निरीक्षण हे अभ्यासला, आव्हानाला  खुले हवे.
 आणखीही एक असाच बेफाट चकवा आहे. माध्यमे समतोल सादरीकरणाच्या नावाखाली टोकाची मतं मांडणाऱ्या कोंबडयांच्या झुंजी लावतात आणि झेपवणारा टीआरपी बघत टाळ्या पिटत रहातात. अशा प्रकारच्या समतोललाच्या  भानगडीत ज्योतिर्विदां बरोबर ज्योतिषी, मानसतज्ञांच्या सोबतीने मांत्रिक आणि शास्त्रज्ञांबरोबर धर्मज्ञ मांडीला मांडी लावून बसतात.  ह्यात आपण कोणा सवंग, अर्थहीन, तथ्यहीन,  विज्ञानविरोधी, प्रतिगामी विचारसरणीला नकळत प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय हे लक्षात घेतले जात नाही.   


पुस्तकाने काय साधले?
अशा पुस्तकाने मानवी विचारात बदल घडेल काय? पिंकरनी  सांगायचं काम केलं आहे. प्रगती होतच रहाणार असा काही निसर्गनियम नाही. तेव्हा अधोगती ही केंव्हाही शक्यच आहे. प्रगती की अधोगती, हे आपण कशाची, कोणत्या मूल्यांची निवड करतो यावर अवलंबून आहे. सर्वोत्तम निवड कोणती हे त्यानी  सुचवलं आहे. इतिहासाचा अभ्यास करून, आकडेवारीची संगती लावून सुचवलं आहे. आले पिंकरजींच्या मना  तेथे कोणाचे चालेना अशी बात नाहीये.  विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवाद ह्यांच्या इंधनानी प्रगतीची, सुखसमृद्धीची  एक्सप्रेस सुसाट सुटते असं दिसतंय.  अर्थात  प्रगतीचे हे सुष्टचक्र  असंच चालू रहायला हवं  असेल तर योग्य राजकीय, सामाजिक, आर्थिक  व्यवस्था चिरेबंदी रहायला हवी. शेवटी निर्णय समाजधुरीणांनी करायचा आहे. कोणाचं  धुरीणत्व, नेतृत्व पत्करायचं हे आपण  नीट ठरवायला हवं.   ही तर आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी.
अंनिस वार्तापत्र, वार्षिकांक २०१९

  








Wednesday, 23 October 2019

मेल्यायलस, येहोsss!!


मेल्यायलस, येहोsss!!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
महा अनुभव दिवाळी २०१९.

पासपोर्टबरोबर ठेवलेली एक शंभर डॉलरची नोट मधून मधून हातात येते. आणखी एक नोट होती पण तिचा विनियोग कसा करायचा हे स्पष्ट होतं म्हणून ती खर्च झाली. ही उरली. हिच्याबद्दल तुम्हाला काही सुचवता आलं तर बघा. कारण होतं असं की ही हातात आली की मला रूट सिक्स्टी सिक्स वरून, सेलीग्मनला घेऊन जाते. रूट सिक्स्टी सिक्स, अमेरिकेतील हा एक रस्ता. आता म्हातारा झालेला, काहीसा निरुपयोगी, दुर्लक्षित, अडगळीत पडलेला. जेमतेम डागडुजी. पण जेमतेम म्हणली तरी ती अमेरिकन जेमतेम, त्यामुळे प्रवास आजही सुखद. काही लोक तर मुद्दाम या रस्त्याने येतात जातात. थोडं स्मरणरंजनीय, थोडं  ऐतिहासिक वगैरे वाटतं त्यांना. तशा इतिहासाच्या खाणाखुणा आहेतच इथे. जुन्या रस्त्याच्या आसपास, प्रत्येक हॉटेलच्या दारात, गाड्या, घोडे, घोडागाड्या, सायकली, मोटारसायकली असं काय काय मुद्दाम जुनेरं नेसवून मांडून ठेवलेलं. शोरूम मधल्या नव्या कोऱ्या गाडी सोबत काढावेत त्याच उत्साहाने इथेही फोटो काढणारे लोक्स वगैरे आहेतच. सेलीग्मनला तर विशेष. सेलीग्मनच्या आसपास आता या रस्त्याचा अगदी थोडासाच अंश शिल्लक आहे. तो जुना जीर्ण, जुन्या जमान्यातल्या खुणा मिरवणारा भाग, आता ‘जैसे था वैसा है’, म्हणूनच प्रसिद्ध आहे. एके काळी आधुनिक म्हणून चाकाखाली घातलेला हा रस्ता आता, जुनी ठेव म्हणून, जणू प्रदर्शनातली वस्तू म्हणून आहे. यावं, थोडं इकडेतिकडे करावं, खावं, प्यावं, आवारातल्या जुन्या गाड्यात बसून फोटो काढावेत आणि आपल्या वाटेनी निघून जावं. अशा रेट्रो खाऊ-पिऊसाठी आता सेलीग्मन प्रसिद्ध आहे.

दोन दिवस इथेच मुक्काम करून आसपासचा प्रदेश पहायचा प्लॅन ठरला मग. होम स्टे घ्यायचा असंही ठरलं. पहायचं काय, तर तिथल्या नावाहो इंडियन लोकांनी जपलेली त्यांची खास वस्त्रालंकाराची तऱ्हा. त्यांची घरं, दारं, जगणं, झोपड्या, कारागिरी आणि काय काय. हे तर अमेरिकेचे मूळ-निवासी, यांच्याच बापजाद्यांच्या थडग्यावर आजचे इमले उभे आहेत. पण नवी वसाहत वसवायच्या नादात, या मूळ निवासींचे तण उपटून वेळोवेळी लांब भिरकावून दिलेलं. पण तणच ते, ते तिथेही रुजलं. नावाहो झाले की पुढे झायन पार्कचा खडा कडा, ब्राईस कॅनयनच्या खडकांवर निसर्गानी केलेली रंगअदा, मग ग्रँड कॅनियनचा उभा चिरलेला डोंगरदरा, त्यातले कोटी कोटी वर्ष खोल जाणारे खडकांचे स्तर; हे ही बघायचं होतच होतं.

असा इतिहासातच काय पण प्रागैतिहासात डुबकी मारायला उत्सुक मी, सेलीग्मनच्या त्या घरगुती हॉटेलातले वर्तमान पहाताच दचकलो. हॉटेल म्हणजे रस्त्यालगत रेस्टॉरंट, मागे घर. घराच्याच एका भागात टूरीस्टांसाठी खोल्या काढलेल्या. मी दचकलो ते तिथल्या चिंचोळ्या व्हरांड्यात आरामखुर्चीत बसलेल्या म्हातारीला पाहून. ती तिथे जगापासून तुटल्यासारखी; चेहऱ्यावर  रिकामे हसू, त्या हसण्याला ना ओळखीची किनार होती ना विषण्णतेची. विदूषकाच्या चेहऱ्यावरचं डिंकानी डकवलेलं कृत्रिम हास्य जणू. झिंज्याही तशाच विदुषकासारख्या. पांढऱ्या शुभ्र झिंज्या, कृत्रिम वाटाव्यात इतक्या पांढऱ्या. गोरापान, नाकेला, आता रया गेलेला चेहरा. सुजलेले,  ओघळलेले, लोंबते  ओठ आणि थंडगार नजर रोखणारे घारे डोळे, एवढेच नजरेत भरण्यासारखे होते. बाकी शरीर इतके कृश, इतके थकेलेले, की त्या आराम खुर्चीच्या खोलीत पार बुडून गेलेलं. येणाऱ्या प्रत्येकाला पाहताच म्हातारी म्हणते कशी,
‘वेलकम टू सेलीग्मन कॅफे अँड इन्, मेल्यायलस, येहोsss!’

मी काही बोलणार तर दुसऱ्याच क्षणी आजी शून्यात डोळे लावून तंद्रीत गेलेली. असेल इथल्या नावाहो भाषेतले स्वागत, असं समजून मी खोलीकडे वळलो. 

आवरून मी जरा वाचत बसणार तोच रेस्टॉरंटमध्ये जमायचं फर्मान निघालं. उद्यापासून आमचा प्रवास सुरु होणार होता. त्या आजीचा नातू, हॉटेल मालक, राव्हालना पोंकाशे, हाच आमचा गाईड असणार होता. रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच त्यानी आपल्या जगप्रसिद्ध हॉटेलची कथा सांगायला सुरवात केली. त्याचं हॉटेल जगप्रसिद्ध आहे हे ऐकून मी जरा बुचकळ्यात पडलो. त्याच्या जगात असेल बुवा प्रसिद्ध पण माझ्या जगात तर ते अज्ञात होतं; म्हणजे परवा परवा मी गुगलेपर्यंत तरी अज्ञात होतं. त्याच्या आजीनी, यामूनबानी, सुरु केलं होतं हे हॉटेल, १९४८ मध्ये. ही सगळी ‘इंडियन’ फॅमिली. त्यांची  नावं ऐकून मला शंका होतीच. बहुतेक नावाहो इंडियन असावेत.

ज्या रूट सिक्स्टी सिक्सवर हे वसलं होतं त्या रूट सिक्स्टी सिक्सचा जन्म १९२५ सालचा. राव्हालनाच्या त्या भेसूर आजीचा, ‘यामूनबा’चा बर्थडेही त्याच सालचा. आजच्याच दिवशीचा. बापरे, म्हणजे आजी चांगली ९३ वर्षाची  होती तर. मग आजीसाठी केक कापला गेला, ‘हॅपी बर्थडे यामुनबा’ही झालं. भावनाशून्य, तटस्थ नजरेने आजी आपली मिटींमिटी बघत होती. मधूनच अर्थहीन, लहरी हसत होती. तिला अल्झायमर्स झाल्याचं लगेचच लक्षात आलं माझ्या. तो रस्ता म्हणजे जणू आजीचीच चित्तरकथा. चालू जमान्यात दोघही संदर्भहीन. राव्हालना सांगत होता, १९२५ साली अमेरिकाही नव्याने जन्म घेत होती. नव्या आशा, नवी उमेद घेऊन  देशोदेशीची चित्रविचित्र पण हरहुन्नरी माणसं येत होती. कष्टनिष्ठांची मांदियाळी जमत होती. अनंत ध्येयासक्ती आणि अनंत आशा घेऊन आपापले किनारे सोडून कित्येक जहाजं अमेरिकेच्या किनाऱ्यावर दाखल होत होती. हा रस्ता म्हणजे जणू ह्या साऱ्यांच्या आशा, उन्मेषांची भाग्यरेषा. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, शिकागोपासून लॉस एंजल्सपर्यंत जाणारी, लक्ष्मी, संपत्ती, सुबत्ता, संधी दाखवणारी अमेरिकेच्या तळहातावरची धनरेषा. ह्या रस्त्याच्या दुतर्फा मग व्यापार वाढला, मालवहातुक वाढली, कुठल्या फुफाट्यात असलेली गावखेडी अचानक शहरांशी जोडली गेली. व्यापार-उदीम, पैसाआडका, कला-संस्कृती असं सारं घेऊन, अमेरिकेच्या त्या भागात जणू नवीन रक्त सळसळू लागलं. ती पिसाट पश्चिम ह्या रस्त्याने माणसाळली. त्यामुळे हा रस्ता साऱ्यांना प्यारा. कित्येक अमेरिकनांच्या पहिल्यावहिल्या लांबलचक गाड्यातून केलेल्या, पहिल्यावहिल्या लांबलचक सफरी या रस्त्यावरून घडलेल्या. मोठ्ठी गाडी, मोठ्ठ्या आवाजात गाणी; आणि सगळ्यात लोकप्रिय गाणं होतं, ‘गेट युवर किक्स ऑन द रूट सिक्स्टी सिक्स!’ (सिक्स्टी सिक्स नंबरचा, हा रस्ता नशीला.)

हे सगळं सांगताना राव्हालना भरून आलं होतं. त्यानेही लहानपणी मम्मीपप्पा बरोबर या रस्त्याने प्रवास केला होता. पुढे हा रस्ता पुरेना, मग त्याला पर्यायी मार्ग आले. ते ऐटबाज नवे मार्ग, महामार्ग; अधिक सरळ, अधिक गुळगुळीत, अधिक सुविधा, अधिक मज्जा. मग ह्या रस्त्याला कोण विचारतो? हळू हळू बरीचशी ट्रॅफिक आटली. धंदापाणीही आटलं, पुढे जवळपास बंदच झालं. रस्त्याबरोबर ह्याचेही दिवस फिरले. आजोबा वारले. पप्पा आणि मम्मी आकंठ दारूत बुडालेले होतेच. हा आठेक वर्षाचा असताना एके दिवशी ते दोघं हूवर डॅमच्या जलाशयात पोहायला, पार्टीला, गेले आणि दोघंही  पाण्यात बुडून मेले. घरी राहिले ते हे न चालणारं हॉटेल, हा आणि आज्जी. पुढे तो तिथेच रेल्वेत कामाला लागला. पुढे भंगार सामानाचा धंदा सुरु केलान. मग ग्रँडमाच्या  डोक्यात काय आलं कुणास ठाऊक, त्याच भंगारातून तीनी हॉटेल वैचित्र्यपूर्णरित्या  सजवलं. रेल्वेतल्या सिटांची बाकं, गाड्यांच्या टपाची टेबलं, पेट्रोल पंपाच्या  खोकड्यात मुतारी, अशा नामी कल्पना लढवत हे विचित्र रेस्टॉरंट, तिनी नावारूपाला की हो आणलं. ‘जुनं आणि विचित्र’ हेच त्याचं विक्रीच इंगित. हॉटेल भंगारमालातून बनवलंय, हाच प्रसिद्धीचा परीस झाला. पण त्याच्या इतकीच कामी आली, ग्रँडमाची तीक्ष्ण विनोदबुद्धी. या सगळ्या अडगळीत बसल्या बसल्या सोबत होता खोडसाळ विनोदाचा प्रसन्न शिडकावा.

दारावर एका टोकाला ‘पुश’ अशी पाटी आणि विरुद्ध टोकाला भलंथोरलं हँण्डल!  माणसं स्वाभाविकपणे हँण्डल खाटखुट करणार, मग दार उघडत नाही म्हटल्यावर पाटीकडे लक्ष जाणार आणि त्या दिशेने दार ढकलताच अलगदपणे दार उघडणार. ‘आईस्ड टी’ मागितला की ही देणार, थोडासा बर्फ आणि त्यात खोचलेली खेळण्यातली गोल्फची ‘टी’. (गोल्फमध्ये बॉल ठेवायला वापरतात ती छोटी खुंटी. ह्या खुंटीचं नावही ‘टी’), कचरा टाकायला गेलात तर तिथे कचऱ्यात तोंड घालून पसरलेला एक सहा फुटी मृतदेह! पुरुषांच्या मुतारी बाहेर, ‘मेन अॅट वर्क’ अशी ठळक पाटी. पण मुळात मुतारीच्या दारावरच्या पाट्याही अदलाबदली सहज होईल अशा. म्हणजे ‘पुरुषांसाठी’ (मेन) अशी मोठ्ठी पाटी आणि खाली छोटासा बाण, शेजारच्या दाराकडे रोखलेला! ...आणि  त्या दारावर तितकीच मोठ्ठी पाटी ‘महिलांसाठी’ (वुमेन) म्हणून आणि तिथे उलटा बाण!! म्हणजे बाण नजरेतून हुकला तर तुमचा नेम चुकलाच म्हणायचा. शिवाय वेड्यावाकड्या अक्षरात ‘नॉट रीस्पॉन्सिबल फॉर अॅक्सिडेंट्स’ हेही होतंच. ‘स्मॉल कोला’ मागितला की अगदी नैवेद्याच्या ग्लास मधून कोला येणार, गिऱ्हाईक पुरतं बावचळलं अशी खात्री होताच, नेहमीच्या स्मॉल ग्लासातून खिदळत खिदळत खराखुरा कोला येणार. मग तुम्हीही तो खिदळत खिदळत पिणार. सूपच्या चमच्याला भलेथोरले भोक, तर चायनीज स्टिक ना अणकुचीदार टोक. नेमकं काय आणि कसं मागावं ह्या संभ्रमात  समोरचा माणूस पडला की यामूनबा खूष. कुणी ‘शो मी द टॉईलेट’ असं विनवलं की ही बोटभर उंचीची खेळण्यातली टॉईलेट खिशातून काढून दाखवणार, ‘स्ट्रॉ’ मागताच गवत पुढे धरणार. ग्रँडमाची ही आयडिया भलतीच लोकप्रिय झाली. लोक मुद्दाम मुद्दाम यायचे, आपण कसे बनवलो  गेलो याची मजा चाखायचे, खायचे, प्यायचे आणि खुश होऊन जायचे. ते हास्यसंस्कार आजही जारी आहेत.

प्रवासात राव्हालना तक्रार करत होता; ‘यामुनबा स्पीक्स सम इंडिअन लँग्वेज, आय कांट फॉलो. शी स्पीक्स इंग्लिश नो मोर!’ वय वाढल तसं साठीतच ग्रँडमाला अल्झायमर्सनी घेरलं. अब्द शब्द बोलणारी बडबडी ग्रँडमा शब्द शब्द करत इंग्रजी भाषाच विसरली! चार दोन जुजबी शब्दांपलीकडे तिला काही म्हणजे काही बोलता येईना. तिच्या लहानपणापासून अवगत असलेली कुठलीतरी इंडीयन भाषा तेवढी ती बोलत होती. अल्झायमरमध्ये हे असंही होऊ शकतं. ताजी स्मृति विस्मृतीत जाते आणि कळीकाळी मनात नोंदल्या गेलेल्या, गोंदल्या गेलेल्या, मनतळातल्या आठवणी, शब्द, भाषा, तेवढ्या शिल्लक रहातात. पूर्वायुष्यात आणि वर्तमानात एक दुभंग खडा होतो. ग्रँडमाची इंडियन भाषा राव्हालनाच्या पप्पाला येत होती. पण राव्हालनाला येत नव्हती. तो ती शिकलाच नव्हता. ग्रँडमा मागे लागायची, पप्पा मागे लागायचा, पण राव्हालनानी हे भाषा प्रकरण काही मनावर घेतलं नव्हतं. पण त्याची खंत त्याला आत्ता जाणवत होती. ग्रँडमा इंग्लिश विसरल्यामुळे आणि तिची इंडियन भाषा ह्याला न उमजल्यामुळे दोघांचा संवादच बंद झाला होता. ग्रँडमा म्हणे काय काय बडबडत रहायची, तासनतास बरळत रहायची. पण ह्याच्या कानांना ते अगम्य. अर्थात तिच्या भाषेत तरी त्याला काही अर्थ होता, की म्हातारपणातली ती भ्रमिष्ट बडबड होती, माहीत नाही. पण राव्हालनाला वाटायचं ही काही तरी गुपित सांगत असेल, मरणापूर्वी काही घबाड योग असेल.

मग चार दिवस ठिकठिकाणी जाणं झालं. ब्राईस कॅनयनच्या त्या पातळखोल दरीतून उगवलेल्या  महाकाय शिळा स्तंभांपुढे मी उभा होतो. निसर्गतः साकारलेले उंचच उंच सुळके. अगदी शिडशिडीत. असं वाटावं की जरा जोरात वारं आलं तर तोल जाईल त्यांचा. उन्हं उतरत होती आणि ते स्तंभ क्षणाक्षणाला आपलं रूप पालटत होते. कधी त्यांच्यात मला गगनाला गवसणी घालणारे सूर्यमंदिराचे कळस दिसत होते तर कशी शापित यक्ष किन्नर. नर, जनावर तर हरेक स्तंभात जणू लपून राहिले होते. खऱ्याखुऱ्या आकाराला कल्पनेचा परीसस्पर्श व्हायचा अवकाश की खांबातून नर-नारी, सिंह-नरसिंह, यक्ष-किन्नर, राक्षस-अप्सरा, शिळाश्वापद, असं काहीही प्रकट व्हायचं. पळभरात सूर्य आणखी कलला की तत्क्षणी अंतर्धान पावायचं. त्या दगडांचे रंग, कोणी एकावर एक लगोरी रचावी तशी त्यांची रचना, त्यांना पडलेल्या खिडक्या सर्व चकित आणि भयचकीत करणारं होतं. त्या नावाहो इंडियन्सच्या पूर्वजांनी ह्यात भूत, प्रेत, आत्मे, प्रेतात्मे आणि परमात्मे शोधले ते काही उगीच नाही. हे स्तब्ध चित्र बघून मीही शिळास्तब्ध झालो होतो. निसर्गाशी मूक संवाद चालू होता. खोल दरीत दूर नावाहो वस्ती दिसत होती. ढोलांचा आवाज घुमत होता. राव्हालना सांगत होता, इथल्या नावाहोना नव्यानी वसाहत केलेल्या युरोपीयनांनी हाकलून दिलं होतं. १८६२ ची गोष्ट. सगळ्यांना गुरांचा कळप हकलावा तसं हाकलत हाकलत लांबवर नेऊन सोडण्यात आलं. पोटुश्या बाईलाही सोडलं नाही. ती पाय ओढत चालत होती, सबब तिला तिथल्या तिथे गोळी की हो घातली!  पण माणसं लांब हाकलली तरी त्यांची ओढाळ मनं फिरून इथेच येत होती. पण आता सारेच पक्के अमेरिकन झाले आहेत. सारी त्या एकाच येशूच्या बापाची कोकरे झाली आहेत. एका प्रचंड इस्त्रीने सारे कसे एकसपाट केले आहे. भाषा संपली, संस्कृती संपली, त्यातले अर्थ आणि बोध दोन्हीही लोपले. एवढच काय, नवस बोलायला, फेडायला, कुठल्या कपारीत लपलेल्या पूर्वज देवाला पुजायला, आता मूळ देव वगैरे काही उरलंच नाहीये. लोकांबरोबर देवही परांगदा झाले की.  

त्या नावाहो संस्कृतीचं प्रदर्शन आणि विक्री तिथे शेजारच्या दुकानात चालू होतीच. त्यांच्या कपड्यालत्यावर, भांडयापातेल्यावर, घरादारावर कसली कसली चिन्हं होती; भरलेली, कोरलेली, रंगवलेली, आखलेली; पण त्यांचा अर्थ आज कुणालाच सांगता येत नव्हता. सारं काही गूढ. आज त्यांच्या लेखीही ती निव्वळ ‘इंडियन डीझाइन्स’ होती. पण त्यांना दणकून बाजारमूल्य होतं, बस्स इतकंच. पण ती विक्रीसाठी मांडलेली अर्थहीन संस्कृती बघून, मानवी जीवनाचं वेगळच दर्शन मला झालं. सारखी मला यामूनबा आठवत राहिली.  तिचा आणि नातवाचा संवाद तुटला होता, संस्कृतीचा सांधा निखळला होता आणि इथे एक दार्शनिक संस्कृती प्रदर्शनापुरती उरली होती.

पुढे मॉन्युमेंट व्हॅलीतल्या नावाहो इंडियन्सच्या घरी जाणं आणि रहाणं झालं. हे इथले मूळ निवासी. आता बरेचसे शिकले सवरले, बाहेरच्या जगात गेले, तिकडचेच झाले. काही उरले, त्यातल्या काहींनी आम्ही मुळचे, आमच्यावर अन्याय, आमचे अधिकार, अशी कैफियत मांडली. मग त्यांना खास सोयी सवलती, त्यांच्या संस्थांना या क्षेत्रात टॅक्सचा अधिकार, अशी समजूत काढली गेली. त्यामुळे ह्यांच्या गावात आता, लुटूपुटीचे का होईना, ह्यांचे सरकार. पण प्रवासदरम्यान कानाशी राव्हालनाची गुणगुण काही संपत नव्हती. ग्रँडमाची भाषा कळत नसल्याचं तो वारंवार सांगत होता. ह्या इतक्या इंडीयन लोकांत ग्रँडमाची भाषा जाणणारा कोणीच नाही याचं मला आश्चर्य वाटत होतं. मी राव्हालनाला तसं विचारताच तो म्हणतो कसा, ‘ग्रँडमा इज इंडियन मीनिंग फ्रॉम युवर कंट्री, इंडिया!! आय अॅम हाफ इंडियन हाफ नावाहो. माय फादर मॅरीड अ नावाहो गर्ल. बोथ माय ग्रँडपेरेंट्स केम फ्रॉम हातंबा, निअर बॉम्बे, स्पीकींग कोक्ने. डू यू नो द प्लेस? द डायलेक्ट?’ आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्या आजीची अगम्य इंडीयन भाषा मला समजते का, ते राव्हालनाला हवं होतं. हे गाव आणि ही भाषा अर्थात मलाही माहीत नव्हती. येणाऱ्या टूरीस्टांना त्यांनी वेळोवेळी विचारून झालं होतं. पण व्यर्थ. अमेरिकेत भारतीय खूप, पण खबदाडीतल्या सेलीग्मनला येणार जाणारे अगदी कमी. पण आता त्याच्याकडे आणखी एक दुवा होता. आजीची कुलुपबंद ट्रंक त्यानी नुकतीच उघडली होती आणि त्यात त्याला काही तरी लिहिलेल्या वह्या सापडल्या होत्या. परत हॉटेलवर येताच त्यांनी त्या वह्या दाखवल्या.

पहिल्याच पानावर  आजीनी चक्क देवनागरीत आपलं नाव-गाव लिहिलं होतं, सौ. यमुनाबाई गणेशराव पोंक्षे, हातखंबा. दोनच पिढ्यात यमुनाबाईची यामूनबा पोंकाशे झाली होती, हातखंबाचे हातंबा, कोकणीची कोक्ने आणि रवळनाथाचे राव्हालना पोंकाशे! मी स्तंभित झालो. दोनच पिढ्यात संस्कृतीचे संचित आटून गेले होते. नाव, गाव अर्थलोप पावले होते. साऱ्याचे जणू ‘नावाहो’ झाले होते. पुढे आजीच्या आयुष्याची कहाणी त्रोटक तुकड्यात खरडली होती.

गांधीहत्येनंतर पोंक्षांचं घर जाळलं गेलं होतं. घरच्या छापखान्यातला कागद भुरूभुरू जळला. वासे, पाटणी कोसळले, काही तासात होत्याचे नव्हते झाले होते. हाती लागेल ते किडूकमिडूक घेऊन, बाकीचे सारे कवडीमोलाने विकून, गणेश आणि यमुना मुंबईला आली होती. त्या आगीत या मातीशी असलेलं नातच जणू कोळपून गेलं. धडपड्या गणेशरावांनी अनेक हिकमती करून चक्क अमेरिकेत नोकरी पक्की केली. नव्यानेच सुरु झालेल्या टाटांच्या एअर इंडियाच्या ८ जून १९४८च्या पहिल्याच फ्लाईटमधून ती दोघं लंडनला आली.  मग बोटींनी न्यूयॉर्कला, तिथून शिकागो आणि रूट सिक्स्टीसिक्स वरून सेलीग्मनला. इथल्या छापखान्यात गणेशरावांनी नोकरी मिळवली होती. पुढे मुलगा झाला. नाव ठेवलं विनायक. सावरकरांवरून असावं असं आपलं मला वाटलं. विनायकनी तिथलीच, नावाहो मुलगी केली. पण विनायक आणि सून दोघंही अखंड दारूत बुडालेले. रवळनाथ सांगत होता, आज्जीचे आणि त्याच्या पप्पाचे रोज भांडण, दिवसातून अनेकदा, अनेक कारणांनी. तिला इंडियाला जायचं असायचं. पण तेवढे पैसे पुन्हा कधी जमलेच नाहीत. काही वर्ष तर फूड स्टँपवर काढावी लागली होती. पण ग्रँडमा आपला हेका सोडायला तयार नव्हती. इंडियाला जाण्याएवढे पैसे आहेतच, पण तू ते लपवून ठेवले आहेस असा तिचा आरोप. पप्पाची शंका अशी की, ग्रँडमानीच डॉलर डॉलर करत बराच गल्ला गोळा केला आहे आणि तो कुठे तरी लपवला आहे. तो उलट साठवलेले पैसे कुठे ठेवले आहेस ते सांग, म्हणून तिच्या मागे लागायचा.
ग्रँडमा लेकाला बजावायची, ‘विनायक, युवर सन मस्ट लर्न कोक्ने.’ पण ह्यात विनायकाला रस नव्हता आणि त्याच्या नावाहो बायकोला असण्याचा प्रश्नच नव्हता. त्याला फक्त सोमरसात रस होता. रवळनाथाचा बाप दारूत बुडाला होता, आजीला साठीतच स्मृतिभ्रंश झाला होता आणि भाषेचा दुवा निखळला होता. आजी आणि नातवातला संवाद गेली तीन दशकं वर्ष पार तुटला होता.

मग मी भेटलो तिला,
‘काय आजी बराय ना?’
तिचे डोळे लकाकले. जीवणी हसली आणि ग्रँडमा लागली की बोलायला. कुठल्या काळच्या, कुठल्या गावच्या, खोल खोल मन तळातल्या आठवणी. काही संगतवार, काही विसंगत. बोलत बोलत  आजी माहेरी गेली देवगडला. आजी आजोळी गेली कुणकेश्वरला. शाळेत फिरून आली, सागरगोटे खेळली, अचानक गायला लागली, ‘अय्या गडे इश्श्य गडे, चड्डीत झाले बटाटेवडे’; आणि फिदीफिदी हसत सुटली... तिला कुणकेश्वरला नवस फेडायला जायचं होतं. परिस्थितीनं भले तिला पृथ्वीच्या विरुद्ध टोकाला आणून सोडलं असेल पण तीचे ओढाळ मन, किंवा त्यातले जे शिल्लक होते ते, कुणकेश्वरी रमलं होतं.  बस्स पुढचं काहीच तिला आठवत नव्हतं. नवरा, अमेरिका, मुलगा, नातू काही नाही.
मधूनच मला म्हणाली, ‘वळीखते म्यां तुला?’
‘कोण मी?’
अचानक आजीच्या थकल्या डोळ्यात अंगार फुलला, ‘तू? तू माझ्या मावशीचा घोव असान तू!! माझां बालपण नासवलांस तू, मायझव्या...!!!’ असं म्हणून आजीनी ठेवणीतल्या दहा बारा कोकणी शिव्या हासडल्या आणि पुन्हा विझून ती आरामखुर्चीत थिजून गेली.

तिचा मेंदू आटला होता. आक्रसला होता. वर्तमानाशी संबंध संपला होता पण भूतकाळाशी तरी होता की नाही सांगता येत नव्हतं. मावशीच्या घोवाचा उल्लेख होता पण त्यात तथ्य किती हे सांगणं अशक्य. जीर्ण, खंगला देह आणि वाळलेले जुनेपुराणे मन. त्या मनाच्या गाभाऱ्यातून   मला लागले ते संदर्भ मी रवळनाथाला समजावून सांगितले. त्याच्या मूळ नावाचा, गावाचा, भाषेचा उच्चार  समजावला. देवगड, कुणकेश्वर गुगल मॅप्सवर दाखवले. सागरगोट्याचा खेळ युट्युबवर दाखवला. जे सांगण्यासारखे नव्हते ते नाहीच बोललो. रवळनाथला अगदी भरून आले. आजीशिवाय त्याला जगात कोणी नव्हते आणि अचानक भाषेची नाळ त्याला गवसली होती. गँग्रीन होता होता काळ्या ठिक्कर पडलेल्या अवयवात पुन्हा रक्त सळसळू लागावं आणि आपल्या डोळ्यादेखत तो भाग पुन्हा गुलाबीसर व्हावा तसं त्याचं झाले.

 अचानक त्याला उचंबळून आलं. आपल्या मातीत आपल्या नात्याचं कोणी असेल का अशी उत्सुकता दाटून आली. त्या डायरीत काही पत्रही होती. एक लग्न पत्रिका होती. मराठे म्हणून घरातली, देवगडहून आलेली, ७२ सालची. काही फोन होते काही पत्ते होते पण फोन एकही उपयोगी नव्हता आणि पत्तेही बरेच बेपत्ता असणार हे उघड होते. चारदोन फोन मिळवून मी हातखंबा आणि देवगडच्या मंडळींशी बोललो. पण रवळनाथाच्या कुळाचे मूळ काही गवसले नाही. पोक्ष्यांचा प्रेस जळीतामध्ये गेला ह्याला दुजोरा मिळाला फक्त. देवगडचा माणूस तर महा गडबडीत होता. माहिती घेउन कळवीन म्हणाला.  

चार दिवसाचा प्रवासी मी पाचव्या दिवशी निघालो.  त्या वहीचे, पत्रांचे फोटो मी मोबाईलमध्ये घेतले. काही शोध लागला तर कळवीन असे रवळनाथला आश्वस्त केले. जाताजाता त्यानी चक्क दोनशे डॉलर माझ्याकडे दिले. शंभर मी त्याच्या कुळाचा शोध घेणार, त्याच्या खर्चासाठी आणि शंभर कुणकेश्वरला जाऊन मी पूजा, अभिषेक करावा म्हणून!! 

निघताना आजीच्या पाया पडलो. मनात विचार आला, ती भारतीय नसती, कोणी स्पॅनिश किंवा केनियन  असती तर मी असं केलं असतं का? नाहीच बहुतेक. 
‘आजी, येतो मी!’ मी तिच्या कानात ओरडलो.
आजीला अर्थातच काहीही कळलं नाही. तिनी तिचं ठरावीक वाक्य फेकलं, ‘वेलकम टू सेलीग्मन कॅफे अँड इन, मेल्यायलस, येहोsss!’
आणि माझ्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला, आजी म्हणत होती,
‘मेल्या, इलंsssस, ये हो!’







Tuesday, 22 October 2019

समाज पुरुषाच्या वर्मी लागलेली गोळी

समाजपुरुषाच्या वर्मी लागलेली गोळी
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. 
मो. क्र. ९८२२०१०३४९

मुले ही देवाघरची फुले असली तरी लागोपाठ आणि फारच मोहोर आला तर बाई मरायची सुद्धा. सर्व काही दैवाधीन होतं तेंव्हा ह्याची कोणाला काही पडली नव्हती. पण ह्याला आवर घालणं शक्य होताच ते आवश्यक ठरलं. 
कोणे एके काळी, बरीच मुले व्हावीत, तेंव्हा त्यातील काही मोठी होईपर्यंत टिकायची. तेंव्हा बरीच होणे हे वरदान होते. ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’, किंवा ‘विठू माझा लेकुरवाळा’ किंवा श्रावणात पूजले जाणारे जिवतीचे चित्र या साऱ्यातून हेच तर सांगितले आहे.

 पण जसजसं वैद्यकीय ज्ञान, स्वच्छता, लसी इत्यादींचा परिणाम दिसू लागला तसतसं अधिकाधिक संतती हा वर न ठरता शाप ठरू लागला. अटळ, अवांछित गर्भारपण ही एक मोठीच समस्या ठरली. यावर मात करण्यासाठी माणसं सतत युक्त्याप्रयुक्त्यांच्या शोधात होती. कसले कसले काढे, योनीमार्गात ठेवायच्या वनस्पती, लावायचे पडदे (डायफ्रॅम), फेसाळ जेली, पुंबीजनाशके, गर्भमुखाला लावायची झाकणे, असे आता हास्यास्पद वाटतील असे प्रयत्न चालू होते. त्याला प्रसंगोपात यशही मिळत होते. पण खात्रीचा उपाय हाताशी नव्हता. प्लॅस्टिकचे लीपीज लूप होते. हे आजच्या तांबीचे (कॉपर टीचे) आजोबा. हे  त्यातल्या त्यात खात्रीचे पण फार त्रासाचे होते. तेंव्हा  कंडोम भरवशाचे म्हणावे इतके बाकी प्रकार बेभरवशाचे आणि त्रासाचे होते. पण कंडोम वापरातही अनेक गोच्या होत्या. मुळात नवरे कंडोम वापरण्यात यशस्वी होतील याचा भरवसा नाही आणि नवरे यशस्वी ठरले तरी कंडोम यशस्वी ठरेल याचाही नाही (अपयशाचे प्रमाण २०%). 
अशा परिस्थितीत पहिली वाहिली गर्भनिरोधक गोळी आली. १९५० सालचा हिचा जन्म. आजही इंग्लिश मध्ये ‘द पिल’ म्हणजे दुसरीतिसरी गोळी नव्हे तर ही गर्भ निरोधक गोळी असाच अर्थ आहे. बाकी सगळ्या गोळ्या आजाराच्या नावानी ओळखल्या जातात. तापाची, जुलाबाची, डोकेदुखीची, टीबीची वगैरे, पण ही नुसतीच ‘गोळी’. हेवा वाटावं असं अहम् स्थान गोळीनी प्राप्त केले आहे. आजही कोणा पेशंटला विचारलं ‘गोळ्या’ चालू आहेत का? तर, ‘कसल्या’ हा प्रतिप्रश्न येत नाही. विराट म्हणजे जसं कोहलीच किंवा लता म्हणजे जसं मंगेशकरच तसंच काहीसं हे.   
ही गोळी अनेक बाबतीत पाहिलटकरीण ठरली. 

निरोगी, धडधाकट, बायकांनी घ्यायचं हे पहिलेच ‘औषध’. 
आधी साधने होती ती वापरायला डॉक्टरची गरज नव्हती. संततिनियमनाचे अग्रणी रघुनाथ धोंडो कर्वे डॉक्टर नव्हते, पण संततीनियमनाची ‘साधने’ देत होते. पण गोळी डॉक्टरी चिठ्ठीशिवाय मिळत नाही. डॉक्टर चित्रात आल्यामुळे गोळीला अधिक विश्वासार्हता प्राप्त झाली. 

कंडोमसारखे साधन वापरायचे ते कामक्रीडेदरम्यान ‘टाईमप्लीज’ म्हणून. समागमातली सगळी उत्स्फूर्तता, सगळी उत्कटता याचा थेट कचराच की. पण गोळ्या ह्या अधेमधे तडमडत नव्हत्या. तुम्ही तुमचं ‘काम’ करा, आम्ही आमचं करतो हा त्यांचा बाणा. शिवाय कंडोममुळे लिंगाची आणि  योनीमार्गाची  थेट भेट होत नाही. या स्पर्शसुखाला पारखे होणं कित्येकांना नकोसं वाटतं. त्याकाळचे कंडोमही आजच्या इतके पातळ, मऊसूत आणि ‘चिकनाईयुक्त’ नव्हते.  गोळ्यांनी हाही प्रश्न मिटला. कंडोम वापरणे न वापरणे हे बरेचसे पुरुषांच्या इच्छेवर होते. आता हे तो श्रींची इच्छा म्हटल्यावर सौंचा नाईलाजच की. पण गोळी बायांच्या हातात होती.
गोळी ही वापरायला अतिशय सोपी. ठराविक वेळी, गिळा गोळी. बस्स, एवढंच. अतिशय स्वस्त होती गोळी, अजूनही आहे. त्यामुळे गरीबाघरीही पोहोचली ती. 

‘एनोव्हीड’ नावानी ही सुरवातीला बाजारात आली. त्या पहिल्या जाहिरातीत चित्र होतं, अॅन्ड्रोमेडा या ग्रीक देवतेचं. पोसायडॉन या समुद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी हिचा बापच हिला पाताळ पिशाच्याच्या तोंडी देणार होता. त्याला ही सहज सापडावी म्हणून हिला समुद्र किनारी बांधून ठेवलं होतं.  त्या पिशाच्याचा वध करून हिला बंधमुक्त केलं, ते परसिअसनी. स्त्रियांना अॅन्ड्रोमेडाप्रमाणेच बंधमुक्त करणारी ही  महापराक्रमी गुटिका आहे असं ह्या जाहिरातीत सुचवले होते.  ही जाहिरात भविष्यवेधी ठरली खरंच. बायकांना  जखडणारे अनेक साखळदंड ह्या गोळीनी खळखळा मोकळे केले.

अमेरिकेत तर हे विशेष घडले. वाढती श्रीमंती, बिनधास्त भोगलोलुपता यांनी बीज पेरलेलंच होतं. गोळीमुळे ते चांगलं तरारून फुटलं. लैंगिकतेत क्रांतीच झाली. उघड उघड लैंगिक संबंध दाखवणारा ‘ब्लू मूव्ही’ नावाचा चित्रपट आला. त्या पाठोपाठ असे अनेक बोल्ड सिनीमे आले. तो जमाना फ्लॅपर बायकांचा होता. फ्लॅपर म्हणजे जरा मोकळ्या ढाकळ्या वागणाऱ्या, स्वतःला मिरवण्यात कमीपणा न मानणाऱ्या, बॉबकट केलेल्या अशा आधुनिक बायका. गोळी हाती येताच ह्या बायका ‘चेकाळल्या’ म्हणता येईल इतके मोकळेढाकळे वातावरण निर्माण झाले. नवचैतन्याचा, अनवट आत्मविश्वासाचा दरवळ पसरला. पोरवड्यातून, ‘रांधा वाढा उष्टी काढा’ यातून, एकूणच चूल आणि मूल यापासून  सुटका झाली. शिक्षण, नोकरी, धंदा, संशोधन, राजकारण अशी  अनेक क्षेत्रे स्त्रियांना खुणावू लागली. आर्थिक स्वावलंबन आलं. कुटुंबात आणि कुटुंबव्यवस्थेत बरीच उलथापालथ झाली.

मातृत्वाचं ओझं पेलणे आता ऐच्छिक झालं. गोळीनी नकळतपणे गर्भारपण नाकारण्याचा अधिकार बायकांना बहाल केला. त्यामुळे ‘चुकून’ जर दिवस राहिले तर गर्भपाताची मागणी आता स्वाभाविक आणि तर्कसंगत ठरली. ही मागणी  आणि तिची पूर्तताही जोमानी पुढे आली. जर गरोदरपण टाळणे हा अधिकार आहे आणि प्रयत्न करूनही ते शक्य झाले नाहीये, तर उद्भवलेली गर्भावस्था संपवणे हाही अधिकार आहेच म्हणायचा. कायद्याने गर्भपाताला परवानगी देण्याशिवाय आता धुरिणांना गत्यंतर राहिले नाही. गर्भपाताला सर्वच धर्मांचा कडाडून विरोध आहे. पण गोळीने सुरु केलेले युक्तिवाद अटळपणे गर्भपाताचा अधिकार, कायदेशीर गर्भपात, ह्याच मार्गाकडे बोट दाखवत होते. परिणामी जगभर गर्भपाताचे कायदे आले ते कालांतराने  सैलसर झाले. भारतात निव्वळ ‘गर्भनिरोधक साधन फेल गेले’, या कारणे गर्भपात करायला कायद्यानी परवानगी आहे. आता प्रत्यक्षात असा प्रयत्न झाला होता वा नव्हता हे कसे पडताळणार? तेंव्हा पेशंटचा शब्द हाच पुरावा. थोडक्यात ‘मागेल तिला गर्भपात’ असा आपला कायदा आहे. (भारतातला गर्भपाताचा कायदा हा जगातील एक उत्कृष्ट कायदा ठरावा.) 
समागमाला सतत संतती संभवाची शय्यासोबत होती. ही जोडीगळी गोळीनी तोडली आणि उन्मुक्त संभोगसूख शक्य झालं. आलेत संबंध, राहिलेत दिवस, मग आता काय करणार? लावून टाका लग्न!!; असे मारून मुटकून विवाह कमी झाले. आता उशिरा लग्न केलं तरी चालणार होतं. मग लग्नाची घाई करा कशाला? किंवा लग्नाची उठाठेवच करा कशाला? एकूणच उशिरा उशिरा लग्न होण्यात आणि लहान लहान वयात शारीरिक संबंधांना सुरवात होण्यात, ह्या गोळीचाही काही वाटा आहे. लग्नाची गरज कमी झाली आणि त्याबरोबर येणाऱ्या आणाभाकांची साथसंगतही संपली. जन्मोजन्मी साथ देण्याच्या  वचनाची गरजही आता कमी झाली. बांधिलकी संपली. अवांछित संततीची भीती गेल्यामुळे विवाहबाह्य संबंधतले धोके आणि अडथळे कमी झाले. यामुळे स्त्रियांचा फायदा झाला का तोटा, हा अजूनही वादाचा विषय आहे. पुरुषांचा मात्र फायदाच झाल्याचं अभ्यास सांगतात. मुळात स्त्रियांच्याही काही लैंगिक भावभावना असतात, त्या पुरुषांपेक्षा भिन्न असतात, पुरुषांना वाटतात त्यापेक्षाही भिन्न असतात आणि त्या लग्न-निरपेक्ष असतात हा मुद्दा जोरकसपणे पुढे आला. प्रथमच, पुरुषांप्रमाणे, स्त्रियाही आता संततीछायेशिवाय संभोगसूख अनुभवू लागल्या. प्रस्थापित नैतिकतेला ह्या गोळीने जबरदस्त धक्का दिला. श्लीलाश्लील, नैतिक अनैतिक असे वाद अमेरिकेतही झडले. तिथे गोळी आधी फक्त विवाहित स्त्रियांनाच उपलब्ध होती. काही लोकचळवळी आणि काही कायदेशीर लढायानंतर ती अविवाहीतांना मीळू लागली. पण ह्या स्वातंत्र्याची काही कटू फळेही होती. गोळी उपलब्ध होताच विवाहबाह्य संबंध, गुप्तरोग, कुमारी मातृत्व, गर्भपात, एकल पालकत्व आणि घटस्फोट अशा सगळ्यातच लक्षणीय वाढ झाली. पण आज इतक्या वर्षानंतर ताळा मांडला तर एकुणात फायदाच झाला म्हणायचा. आता बायका वाममार्गाला लागणार, बजबजपुरी माजणार अशी हाकाटी पिटली जात असतानाच बहुसंख्य बायका चक्क शिक्षण आणि करीयरच्या मार्गाला लागल्या, कुटुंबसंस्था शाबूत ठेऊन स्वतः बंधमुक्त झाल्या.

 स्त्रीपुरुष संबंधांना असे वेगवेगळे आयाम गोळीने प्राप्त झाले आहेत. 
गोळीच्या वाह्यात समाज परिणामांवर भरपूर खल झाला आहे. मात्र गोळीमुळे समाजाची चाल बिघडत नाही, असं गोळीचे कर्ते, डॉ. जॉन रॉक आणि डॉ. ग्रेगरी पिन्कस, ह्यांनी ठासून सांगितलं. आधीही ‘अनैतिक’संबंध होतेच, दिवस राहू नयेत म्हणून युक्त्या प्रयुक्त्या आधीही वापरल्या जातच होत्या. गोळी ही अधिक प्रभावी पर्याय म्हणून पुढे आली एवढंच. उच्छृंखल वागायला काही गोळी सांगत नाही. तो निर्णय ज्याचा त्याचा असतो. उलट अशा वागणुकीतून उद्भवणारे दुष्परिणाम गोळीमुळे टळतात. अंधारात टॉर्च तर चोरही वापरतात आणि सावही; मग चोरीला साथ देतो म्हणून टॉर्चला धोपटण्यात काय हशील? 

पण अमेरिकन समाजातही गोळीचा प्रवेश हा लपूनछपूनच झाला. ‘असल्या’ विषयावर जाहीरपणे चर्चा, चर्चला निषिद्ध होती. गर्भनिरोधक मधील ‘ग’सुद्धा उच्चारायला अमेरिकेत कायद्याने बंदी होती. कोमस्टॉक कायद्यानुसार, गर्भनिरोधकाबद्दल बोलणेही अश्लीलतेखाली मोडत होते. त्यामुळे ही बाजारात आली ती ‘सायकल कंट्रोल’साठी! म्हणजे पाळीच्या अनियमितपणासाठी उपयुक्त म्हणून. ‘या गोळीनी बीज निर्मिती थांबते’ असा सावधानतेचा ‘वैधानिक इशारा’ तिच्यावर छापला होता.  मग डॉक्टर मंडळी ही गोळी इतर काही कारणांनी दिली असं कागदोपत्री दाखवायचे. पुढे कायदे बदलले आणि उजळ माथ्याने गोळी देणे शक्य झाले. 
तो काळच तसा होता. दुसरं महायुद्ध संपले होतं. वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय होता. तेव्हा गर्भनिरोधक साधन, स्वैर लैंगिक संबंध सुकर व्हावेत म्हणून नाही, तर लोकसंख्या आटोक्यात यावी म्हणून हवंहवंसं वाटत होतं. या गोळ्यांचा जन्म खास लोकाग्रहास्तव झाला. पण हा आग्रह सुप्त होता. सरकार, विद्यापीठे, सरकारी संशोधन संस्था यात मुळीच रस घ्यायला तयार नव्हत्या. यात पैसा ओतला तो एका श्रीमंत, उच्चशिक्षित म्हातारीनी. हिनी जवळपास एकहाती पैसा पुरवला आणि हे संशोधन तडीस नेलं. पंच्याहत्तरीची ती समृद्ध वृद्धा, होती कॅथ्रीन मॅक-कॉर्मिक. बाई हुशार होती. एम.आय.टी.तून जीवशास्त्र शिकली होती. स्वतः शास्त्रज्ञ होती. विधवा होती. नवऱ्याच्या गडगंज संपत्तीची वारस होती. स्त्री-कारणात रस घेणारी होती. ‘तेवढा गोळीचा शोध लागला की मी शांतपणे डोळे मिटायला मोकळी’, अशी तिची धारणा होती... आणि तिला यासाठी पटवलं अशाच एका वयस्क, चळवळ्या, म्हातारीनी, मार्गारेट सँगरनी.  ह्या स्त्रीमुक्तीवादी कार्यकर्तीने ह्या गोळीच्या संशोधनासाठी मोठा निधी उभारला. स्त्री, ही मुक्तीच्या मार्गातली धोंड असेलही पण स्त्री-मुक्तीच्या मार्गात मात्र, अटळ असे गरोदरपण हीच धोंड होती. इवल्याश्या गोळीनी ती प्रभावीपणे हटवली.

अमेरिकेतील कायदेशीर अडचणीमुळे पहिल्यावहिल्या गोळ्यांची ट्रायल झाली प्युर्तोरिकोमध्ये (मध्य अमेरिकेतील एक देश). तिथे जनता अफाट होती,  कायदे जाचक नव्हते आणि उद्भवणाऱ्या गंभीर दुष्परिणामांकडेही सरसकट दुर्लक्ष केलं तरी कोणी त्यात लक्ष घालणारे नव्हते. पेशंटची संमती, त्यांना संपूर्ण माहिती देणे, त्यातून उद्भवणाऱ्या दुष्परिणामांची संपूर्ण जबाबदारी संशोधकांनी घेणे; ह्या गोष्टी तर त्याकाळी संकल्पनांच्या पातळीवरही नव्हत्या. त्यामुळे संशोधन सोपं गेलं, पण कुणा अनामिकांवर अन्याय झालाच झाला. 

गोळी आणि तिच्या साईडइफेक्ट्सबद्दल उदंड चर्चा झाल्या आहेत. इथे दुष्परिणामपेक्षा सहपरिणाम हा शब्द मला अधिक योग्य वाटतो. कारण साईडइफेक्ट म्हटलं की  ते वाईटसाईटच असणार असं लोकांना वाटतं. वास्तविक असे परिणाम  दोन्ही तऱ्हेचे असू शकतात, असतात. गोळीच्या सहपरिणामांबाबत उभय पक्षांनी प्रतिपक्षावर अप्रामाणिकपणाचे आरोप केले आहेत. गढूळलेल्या वातावरणात कधी कधी वाटही हरवली आहे. अशा परिणामांची चर्चा प्रस्तुत आहे पण त्यांचा बागुलबुवा उभा करणे अप्रस्तुत. शिवाय गोळीच्या  सहपरिणामांची तुलना, ही गोळी न घेतल्याने उद्भवणाऱ्या, अवांछित गर्भधारणेच्या, परिणामांशी करायला हवी. नकोशा गर्भधारणेमुळे गर्भपात, त्यातली कॉम्प्लीकेशन, आर्थिक, सामाजिक कौटुंबिक ताणतणाव, गरिबी, दारिद्रय हे सर्व वाढीस लागते, त्याचे काय? हे सारे कमी झाले तर कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा फायदाच आहे की.  

मळमळ, अर्धशिशी, वजन वाढणे, सूज अशा जरा साध्याशा परिणामांपासून ते  रक्ताच्या गुठळ्या होणे, हृदय-बाधा, शर्करा-बाधा, यकृत-बाधा अशा गंभीर विकृतीपर्यंत अनेक प्रकार ह्या गोळ्यांनी घडत होते. ह्यातील कोणत्या औषधाने काय घडतंय याची गणिते डॉक्टर आणि संशोधक मांडत होते. एनोव्हीड मध्ये ९.८५ मिलीग्रॅम प्रोजेस्टेरॉन आणि ०.१५  मिलीग्रॅम  ईस्ट्रोजेन होतं. सर्वात कमी पण सर्वात प्रभावी डोस; सर्वात स्वस्त पण सर्वात सुरक्षित ईस्ट्रोजेन/प्रोजेस्टेरॉन यांचा सतत शोध सुरु होता; आजही आहे. या साऱ्यामुळे  आजच्या गोळ्यात हेच प्रमाण साधारण ०.३ मिलीग्रॅम प्रोजेस्टेरॉन (सुमारे ३० पट कमी) आणि ०.०२ मिलीग्रॅम ईस्ट्रोजेन (सुमारे आठपट कमी) इतकं कमी असतं. सततच्या संशोधनातून आपण अत्यल्प मात्रेची, अत्यंत परिणामकारक, अधिकाधिक सुरक्षित गोळी बनवू लागलो आहोत. गोळीच्या संशोधनातूनच  पुढे गर्भनिरोधकात अधिक विविधता आली. आता इंजेक्शन, त्वचेखालील इम्प्लांट, योनीमार्गात ठेवायच्या रिंग असे अनेक होर्मोनल पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. काही नॉन-होर्मोनल पर्यायही आहेत. एकुणात गोळीचे संशोधन बहुप्रसवा ठरलं तर!

गोळ्या घेणाऱ्या  हजारातील एखाद्या स्त्रीला रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. पण दिवस राहिलेल्यापैकी, दर हजारी तीन बायकांना हा त्रास होतो. म्हणजे गोळाबेरीज करता गोळ्यांनी त्रास कमी होतो असंच म्हटलं पाहिजे. गोळ्यांमुळे अंगावरचे कमी जाते, परिणामी या कारणासाठी ऑपरेशन करावे लागत नाही, परिणामी ऑपरेशन आणि तदनुषंगिक आजार/मृत्यू टळतात. हाही मोठाच, पण सहसा लक्षात न येणारा, फायदा आहे. गोळ्यांनी ग्रीवेचा आणि स्तनाचा कँन्सर होतो का नाही हा वादाचा मुद्दा आहे पण गर्भाशयाच्या अस्तराचा आणि स्त्रीबीजग्रंथींचा कँन्सर टळतो हे निर्विवाद सत्य आहे. तेंव्हा परिणाम आणि सहपरिणामांचा विचार संदर्भासहित व्हायला हवा. 

गोळीकडे अनेकांनी अनेक नजरेनी बघितलं आहे. स्त्रीवाद्यांनी तर एकूणच गर्भनिरोधन संशोधनावर शरसंधान केले आहे. हा सारा स्त्रीयांविरुद्ध पुरुषप्रधान व्यवस्थेनी रचलेला बनाव आहे, सारीच निरोधके बायकांसाठीच का? पुरुषांसाठी मुळी संशोधनच नाही! हा प्रश्न सँगर, मॅक-कॉर्मिक इत्यादींनाही विचारला गेलाच होता. पण त्यांचं उत्तर होतं की, बायकाच साधन नीट वापरतील अशी आम्हाला खात्री आहे. न वापरल्याचा त्रास बायकांनाच भोगावा लागणार आहे. पुरुष लेकाचे करून सवरून नामानिराळे. तेंव्हा पुरुषांऐवजी बायकांसाठी गोळ्या शोधण्यावर त्यांनी जाणूनबुजून भर दिला. लोकसंख्या नियंत्रणाचं एक भक्कम हत्यार म्हणून गोळी विख्यात आहे. मुक्त कामाचाराला संरक्षण पुरवणारी म्हणून ही कुख्यात आहे. नेमक्या नकोशा लोकांना; म्हणजे काळ्या, दरिद्री, वेड्या, रोगिष्ट, परधर्मी लोकांना;  पिल्लावळ होऊ नये म्हणून गोऱ्या, श्रीमंत, शिष्ट, सुदृढ, धर्मवेड्या लोकांना ही हवीहवीशी वाटली आहे. उत्तम प्रतीच्या जाणत्या जनांनाच पुनरुत्पादनाची संधी देऊन, मानवी सुपर-उत्क्रांतीची स्वप्नही या गोळीच्या बळावर काहींनी पाहिली आहेत. गोळीसारख्या कोणत्याही प्रभावी तंत्रज्ञानाला काळी-पांढरी बाजू असतेच.

लोकसंख्येचा विस्फोट ह्या गोळीने (आणि अन्य साधनांनी) प्रभावीपणे रोखला आहे. लोकसंख्या वाढीचा वेग आता निम्यावर आला आहे. (म्हणजे गाडी अजून पुढेच जात आहे पण शंभर ऐवजी आता पन्नासच्या स्पीडने जाते आहे.) गर्भनिरोधक गोळ्या हा प्रकार आता इतका सर्रास वापरला जातो की ह्या इवल्याशा गोळीनी जगात काय उलथापालथ केली ते आपल्या लक्षातही येत नाही. बंदुकीच्या गोळीनंतर समाजपुरुषाच्या वर्मी लागली ती ही गोळी. कर्वे, फुले, आगरकरांइतकेच ह्या गोळीचेही स्त्रियांवर उपकार आहेत. गोळीचा पुतळा उभारता येत नाही एवढंच.

आजचा मराठवाडा, दिवाळी २०१९