Monday, 21 May 2018
'केगेल'ने होत आहे रे...
Saturday, 12 May 2018
प्रेग्नन्सी आणि विमानप्रवास
प्रेग्नन्सी आणि विमान प्रवास
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
कोणे एके काळी निव्वळ श्रीमंतांची मक्तेदारी असलेला विमान प्रवास हा आता नित्याचा झाला. त्यामुळे कोणे एके काळी निव्वळ गुळगुळीत कागदाच्या मासीकातच छापला जाईल असा हा लेख आज न्यूजप्रिंटवर छापला जातो आहे. बदलत्या भारताची ही एक हलकीशी खूण.
गर्भावस्थेत विमान प्रवासाने काही त्रास होतो का?
सारे काही यथास्थित आणि साधे सरळ असेल तर विमानप्रवासासारखा सुरक्षित प्रवास नाही. यात होणारे हवेच्या दाबातील आणि आर्द्रतेचे बदल काहीही दुष्परिणाम घडवत नाहीत. विमान प्रवासाने गर्भपात, कमी दिवसांची प्रसूती, पाणमोट फुटणे वगैरे प्रकार होत नाहीत. अर्थात शहाणी पोटुशी बाई दिवस भरायच्या आत कुठे ती भरारी घेऊन टाकेल. जुळेबिळे असेल तर ३२ आठवड्याच्या आत विमानोड्डाण उरकावे हे उत्तम. दिवस भरलेल्या, अवघडलेल्या, बाईला बहुतेक विमानकंपन्याच प्रवासी म्हणून घेत नाहीत. शिवाय इतक्या अवघडलेल्या बाईची जोखीम इन्सुरन्स कंपन्याही, कचकावून पैसे घेतल्याशिवाय, स्वीकारत नाहीत.
सदतीस आठवडे झाले की कायद्याने दिवस भरतात. त्यापुढे केंव्हाही कळा सुरु होऊ शकतात. प्रत्यक्षात तारीख दिलेली असते ४० आठवडे पूर्ण झाल्याची. ही तारीख म्हणजे त्याच दिवशी प्रसूती होईल ह्याची भविष्यवाणी म्हणून दिलेली नसते. प्रसूती नेमकी कधी होणार हे डॉक्टरनाच काय, ब्रम्हदेवाच्या बापालाही सांगता येणार नाही, असे म्हणतात, ते खरे आहे. प्रसूतीची तारीख म्हणजे बाळ पोटात सुरक्षित असण्याचा शेवटचा दिवस. तिथून पुढे वार म्हातारी होते, तिच्याच्याने बाळाचे सगळे ‘होत नाही’. त्यामुळे वाट पहायची वा नाही, आणि पहायची तर किती, हे तपासून ठरवावे लागते.
लांबच्या प्रवासात विशेष काळजी घ्यावी लागते पण तीन ते चार तासांच्या प्रवासात काही विशेष फरक पडत नाही. प्रवासाने किरकोळ त्रास होतो. जो एरवीही होतो, तो गरोदरपणात जास्त होतो. पाय सुजतात, नाक चोंदते, कानाला दडे बसतात. आधीच उलट्यांनी जेरीस आलेली कोणी असेल तर ती अधिक जेरीस येते.
प्रवासात पायात रक्त साठून रहाते, याच्या गुठळ्या होतात आणि एखादी गुठळी तिथून सटकली की थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचते. हे जीवावर बेतू शकते. मुळातच गरोदरपणात आणि पुढे प्रसूती पश्चात दीड महिन्यापर्यंत रक्त गोठण्याची क्रिया जलद होत असते. त्यात प्रवासात एका जागी बसल्याने रक्त प्रवाह मंदावतो आणि आणखी प्रॉब्लेम येतात. लांबचा प्रवास असेल, वजन जास्त असेल, आधी कधी असला काही प्रकार झाला असेल, तर आणखी प्रॉब्लेम येतात. तेंव्हा सैल पेहराव असणे, बूटही योग्य मापाचे असणे, शक्यतो पॅसजकडची सीट घेऊन पाय जवळ-लांब करणे, सतत पाय हलवण्याचे बसल्या जागीही करता येतील असे व्यायाम करणे, शक्य तितक्या फेऱ्या मारणे, भरपूर पाणी पिणे आणि दारू, कोला, कॉफी अशी अपेय पेये न पिणे, हे आवश्यक आहे. प्रवासात वापरण्यासाठी पायाच्या बोटापासून जांघेपर्यंत येणारे खास मोजे मिळतात. हे पावलाला आवळून बसतात आणि जसजसे वर जाऊ तसतसा आवळपणा कमी होतो. जांघेशी हे त्यामानाने सैलसर बसतात. ह्यामुळे पाउल, पोटरी, मांडीत, रक्त साठून रहात नाही. हे ही वापरता येतील. पण ह्यांचे माप परफेक्ट असायला हवे. प्रत्यक्ष घालून बघूनच खरेदी केलेले चांगले. ऑनलाईन मागवण्यात काही अर्थ नाही.
काहींना, काही आजारामुळे, ही गुठळ्या होण्याची शक्यता फारच असते. अशांसाठी हिपॅरीनचे इंजेक्शन आहे. ह्यानी रक्त सहज गोठत नाही. (पेशंटच्या भाषेत, ‘रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन’.) हे उड्डाणावेळी आणि नंतर काही दिवस घ्यावे लागते. इंजेक्शन सोबत न्यायचे तर त्याचे प्रिस्क्रिप्श्नही सोबत हवे हे लक्षात असो द्यावे. ‘रक्त पातळ’ होण्यासाठी अॅस्पिरींच्या गोळ्याही दिल्या जातात. प्रवासात जो त्रास होतो तो अॅस्पिरीननी टळत नाही. तेंव्हा हिपॅरीन सांगितले तर घ्यावेच घ्यावे, पण अॅस्पिरीन चालू असतील तर त्याही चालूच ठेवाव्यात.
कमी दिवसाची प्रसूती होईल असे वाटत असेल, रक्त खूपच कमी असेल, सिकलसेल आजारामुळे नुकताच काही त्रास झाला असेल (याला सिकलसेल क्राईसिस म्हणतात. आपल्याकडे विदर्भात सिकलसेलचे प्रमाण फार), वार खाली असेल (Placenta Previa) तर विमानप्रवास टाळणे उत्तम. काही कंपन्या नुकतेच हाड मोडलेले, नुकतेच कान फुटलेले किंवा नुकतीच पोटाची शस्त्रक्रिया झालेले प्रवासी घेत नाहीत. असे काही असेल तर आधीच विचारणा केलेली बरी. पहिल्या तीन महिन्यात सुमारे १५ ते २०% गर्भ ‘खाली होतात’. म्हणजे गर्भपात होतात. हे केंव्हाही होऊ शकते. त्यामुळे या दरम्यान आत्यावश्यक असेल तेंव्हाच प्रवास करावा.
निघण्यापूर्वी आणि पोहोचल्यानंतर, सारे काही जिथल्या तिथे आहे याची खात्री करण्यासाठी सोनोग्राफी केलेलीही बरी. कारण प्रवासानंतर काही बिघडले की ते प्रवासाआधीचे की नंतरचे यावरून सासर वि. माहेर असे यादवी युद्ध पेटू शकते.
विमानतळावरील नेहमीची सुरक्षाचाचणी बाळासाठी निर्धोक असते, त्यात एक्सरे वापरात असले तरीही. सीटबेल्ट लावणेही आवश्यक आहे. पुरेसा घट्ट आणि पोटाच्या खाली बसेल असा तो लावावा.
शेवटी प्रवास आवश्यकच आहे का?, प्रवासाने काही बिघडणार आहे का?, इन्सुरन्सवाले काय म्हणतात?, हे प्रश्न महत्वाचे. बरोबर आपले सर्व केसपेपर, औषधे, प्रिस्क्रीप्शने, फिटनेस सर्टिफिकेट, ड्यू डेट सर्टिफिकेट, इन्स्यूरन्स वगैरे असावे.
शुभास्ते पंथान: सन्तुII
उरोज कुंभापरी
उरोज कुंभापरी...!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
साहित्य, नाट्य, शिल्प, चित्र आणि चित्रपटात उन्नत उरोजांचा उठाव काय वर्णावा.
यात, ‘घट्ट बसत्येय, हा दोष तुझ्या कंचुकीचा नाही’, असं शकुंतलेला खट्याळपणे बजावणाऱ्या कालिदासाच्या ‘शाकुंतला’तील मैत्रिणी आहेत. ‘सांगते उमर कंचुकी, बिचारी मुकी, सोसते भार...’ असे इंद्र्पुरीतून खाली आलेल्या अप्सरेचे बहारदार वर्णन आहे. खजुराहोची विवस्त्र, उत्तान, कामशिल्पे आहेत आणि कमनीय मिस वर्ल्डची, तोऱ्यात उभी असलेली, टॉपलेस, छबीदार छबी आहे.
हे सारे पहाता ज्यांना उरोजांच्या उन्नत उभाराची देणगी नाही, त्या स्त्रियांना ‘कसेसेच’ वाटले तर त्यात नवल ते काय?
‘मला स्तन-वर्धक शस्त्रक्रीया करून घ्यायची आहे कारण... माझी जाऊ मला सारखी हिणवते, तिचा साईझ खूप मोठा आहे!’, असे सांगणारी कुणी गावरान पेशंट, मग माझ्या सारख्या खेड्यातल्या डॉक्टरलाही भेटते. मग मला आठवतात, ते अमुक एका मापाची छाती असलीच पाहिजे, या ‘पुरुषी’ आग्रहाचा निषेध म्हणून अमेरिकेत झालेले कंचुकी दहनाचे जाहीर कार्यक्रम. हे सारे तिच्या गावी नसते आणि तिच्या गावीही नसते.
मग मला आठवते याच अमेरिकेतल्या एका नवऱ्याची भारतीय बायको. ती म्हणाली होती, ‘सक्काळी मी येईन. ऑपरेशन करून दुपारपर्यंत मला घरी जाता येईल ना?’
‘येईल की.’
‘त्याच काय आहे, रात्री माझा नवरा अमेरिकेहून यायचाय; त्याला मला सरप्राईज द्यायचय!’
पण जनमनातले आणि माध्यमांतले, हे लक्षवेधी आणि लक्ष्यवेधी वक्षस्थळ, म्हणजे डॉक्टरांच्या लेखी निव्वळ रूप बदललेल्या घामाच्या ग्रंथी! ‘उत्क्रांती दरम्यान घर्मग्रंथींचे काही पुंजके दुग्धग्रंथी म्हणून विकास पावले आणि नंतर त्यांना लैंगिक आयामही प्राप्त झाले’, असल्या तद्दन गद्य वाक्याने अॅनॅटॉमिच्या पुस्तकातला ब्रेस्टवरचा धडा सुरु होतो. अर्थात माझ्या पेशंटनी काही अॅनॅटॉमीचे पुस्तक वाचलेले नाही. त्यांचे प्रश्न थेट असतात. स्तनवृद्धी कशी करतात?
स्तनवृद्धी शस्त्रक्रियेत स्तनामागे प्लास्टिकची जेली भरलेल्या पिशव्या (Implant) सरकवल्या जातात. ह्या पिशव्या स्तनाच्या थेट खाली तरी सरकवल्या जातात किंवा त्याच्याही खाली स्नायू असतो (Pectoralis), त्याच्याखाली तरी सरकवल्या जातात किंवा दोन्ही थोडे थोडे केले जाते. ते असो आपण अधिक खोलात नको शिरायला.
यांनी स्तनाला योग्य तो आकार, उभार आणि दिशा देता येते. एकूण परिणाम पहाताक्षणी छाप पडणारा असतो. नंतर आरशात पहाताच पेशंटचा उर भरून येतो (म्हणे). शल्यक्रिया तशी छोटी आहे, सोपी आहे, साधी आहे, पण कौशल्याची आहे, महाग आहे. बिलाचे हे शल्य जन्मभर उरी बाळगावे लागू नये म्हणून हे स्पष्टीकरण. किंमत आहे ती त्या पिशव्यांची आणि शल्यकौशल्याची. पण हौसेला मोल नसते. पण हौसेला जरी मोल नसले तरी ह्याच्या मर्यादा, सामर्थ्ये आणि दूरगामी परिणाम, लक्षात घ्यायलाच हवेत.
यात मुळातले पिटुकले स्तन, धिटुकले करता येतात किंवा आता वयपरत्वे आणि प्रसूतीपरत्वे ओघळलेले स्तन उठावदार करता येतात. कधीकधी दोन स्तनांच्या आकारात मुळातच लाज वाटावी इतका फरक असतो, किंवा कॅन्सर वगैरेच्या शस्त्रक्रियेने निर्माण होतो; हेही दुरुस्त करता येतं. स्तनाखालच्या घडीखाली, दिसणार नाही अशा बेताने छेद घेतला जातो आणि या पिशव्या सरकवल्या जातात. टाकेही आतल्या आत घातले जातात. त्यामुळे वरून दिसायला हे सारे अदृष्य. कधी कधी काखेतून किंवा निपल झाकणासारखे उघडूनही ही कसरत करता येते.
म्हणायचे प्लास्टिकच्या पिशव्या पण ह्या असतात सिलिकॉनच्या. आत असते सिलिकॉनची जेली किंवा क्वचित सलाईन. पण सलाईनपेक्षा सिलिकॉन जेलीमुळे मिळणारा ‘फील’ हा अधिक ‘न्याच्यूरsssल’ असतो. शिवाय हे अधिक टिकावू आणि अधिक ‘दिखाऊ’ असतात; म्हणजे सिलिकॉनने अधिक ‘न्याच्यूरsssल’ आकार येतो. देताना उत्पादक दहा वर्षाची ग्यारंटी देतात पण पुढे ते बरीच वर्ष टिकतात.
कोणाला किती मोठा इम्प्लांट बसवायचे याचे काही ठोकताळे आहेत. आले बाईजींच्या मना तेथे कोणाचे चालेना, असा प्रकार नसतो. मुळातल्या स्तनाचा आकार, उकार, ताणायला उपलब्ध त्वचा, त्या स्त्रीची इतर शरीरमापे, प्रमाणबद्धता ई. गोष्टी लक्षात घेऊन, योग्य माप (Size) निवडले जाते. एकुणात अत्यंत किरकोळ स्त्रीला जर अत्यंत उभार उरोज करून दिले तर दिसायला ते ‘काहीतरीच’ आणि ‘कृत्रिम’ दिसते. म्हणजे मूळ हेतूच बाद.
आकाराची (Shape) निवड मात्र बरीचशी पेशंटच्या इच्छा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे असे की ‘घुम्मट गोल’ इम्प्लांटमुळे, कंचुकीच्या गवाक्षातून बाहेर डोकावणारे वक्षस्थळ बहाल करता येतात. इथे गोलाई बरोबर ‘खोलाई’ (Cleavage) दिसण्यासाठी वायरचा आधार असलेली ब्रा वापरणे उत्तम. फिल्म्स किंवा मॉडेलिंग सारख्या क्षेत्रात करीयर करायची महत्वाकांक्षा असेल, तर हे नुसते आवश्यकच नाही तर जीवनावश्यक. ‘लंबोदर’ आकाराच्या (थेंबाच्या आकाराच्या) इम्प्लांटमुळे अधिक नैसर्गिक परिणाम साधला जातो. ‘घरेलू’ पेशंटसाठी हे उत्तम.
सिलिकॉन शरीरात वर्षानुवर्षे विनातक्रार रहाते. कालांतराने या सिलिकॉनच्या इम्प्लांट भोवती एक घट्ट कवच निर्माण होते आणि आकार आणि मऊपणा मार खायला लागतो. मग हे कवच ऑपरेशन करून काढावे लागू शकते. बऱ्याच वर्षाने ही सिलिकॉनची पिशवी आतल्या आत फुटू शकते, आणि ऑपरेशन करून काढावी लागू शकते. पण ब्रेस्ट कॅन्सर, किंवा अन्य कुठलाही कॅन्सर, होण्याचा (किंवा न होण्याचा) आणि या इम्प्लांटचा अर्थअर्थी काही संबंध नाही.
मुळात ही दिखाऊ शस्त्रक्रिया आहे हे लक्षात ठेवावे. शांतपणे, सर्व बाबींचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा. पुढे होणाऱ्या परिणामांची आणि त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य उपचारांसाठीची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी असावी. कोणी कसं दिसावं हा खरं तर जिचा तिचा प्रश्न. तेंव्हा हे असले निर्णय हे सर्वस्वी स्वेच्छेने घेतलेले असावेत. ‘स्व’ची इच्छा ही खरोखरच ‘स्व’ची आहे ही खुणगाठ महत्वाची. कुणाच्या अवास्तव अपेक्षांचे, मर्दानी मताचे किंवा मिडिया प्रमाणित मापाचे गारुड आपल्या मनावर नाही ना हे आपल्याच मनाला विचारून पहाणे उत्तम.