Wednesday, 27 December 2017

रुपांतरकराचे दोन शब्द

विल्यम गोल्डिंग यांच्या ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ ह्या कादंबरीचे मी देवाघरची फुले या नावाने नाट्यरुपांतर केले आहे. त्याचे प्रकाशन २६/१२/२०१७ रोजी झाले. त्या समारंभातील...

रुपांतरकाराचे दोन शब्द

विल्यम गोल्डिंग यांची ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ ही कादंबरी मी वाचली आणि भारावून गेलो.
एका निर्मनुष्य बेटावर काही शाळकरी मुलं अडकतात... आणि सुरु होतो जगण्याचा संघर्ष.
सुरवातीला सगळं कसं छान छान असतं पण मग हळू हळू त्यांच्यातली जनावरं जागी होऊ लागतात...
आदीम प्रेरणा, सुसंस्कृत वागणुकीचा कब्जा घेतात...
नव्या नव्या मिथक कथा जन्म घेतात...
गततट पडतात...
हाणामाऱ्या होतात...
विवेकाचा आवाज दाबला जातो...
निरागस कोवळी मुलं,
ही देवाघरची फुलं,
शेवटी एकमेकांविरुद्ध जीवघेणे सापळे रचतात...!!! चक्क खुनाचा कट रचतात... ह्या कटाचा भाग म्हणून वणवा लावला जातो... आणि हा धूर बघून लांबून जाणारी एक नेव्हीची नौका येते आणि यांची सुटका होते.
अशा कादंबरीवर नाटक न झालं तरच नवल...
माझ्या शाळेतल्या इंग्लिशच्या बाईंनी ही कादंबरी मला वाचायला सांगितली होती. त्यांच्या मते शालेय मुलांवरचं संस्कार छत्र काढून घेतलं तर काय होतं याचं दर्शन या कादंबरीतून घडतं. पण अर्थाचे अनेक पदर वाचता वाचता उलगडू लागतात. इथे जयच्या रुपात मानवी मनातील आदिम हिंसा आहे, राजच्या रुपात सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे, सायमनचा शोधक जिज्ञासू मानवही इथे आहे आणि बुक्कडच्या रुपात विचारी, विवेकी वर्तन आहे. इतकंच काय या विचारी, विवेकी बुक्कडचं एखाद्यावेळी कच खाणं आणि त्याचं लंगडं समर्थन करणंही आहे. कळपानी रहाण्याची वृत्ती, झुंडीत सामावून जाण्याची, सुरक्षितता शोधण्याची ओढ इतर पात्रांतून दिसते. या  साऱ्या मानवी मानसिकतेचा एक लुभावणारा पट इथे मांडला आहे. पशू अवस्थेतून मानव एक सामाजिक प्राणी म्हणून उत्क्रांत होत गेला. इथेही ही मुलं अचानक कसलाही आगापिछा नसलेल्या ठिकाणी येऊन पडतात आणि हळूहळू त्यांच्यातही काही सामाजिक संस्था उदयाला येतात. शंख वाजवला की सगळ्यांनी जमायचं, सभेत एकमेकांच्या विचारांनी निर्णय घ्यायचे असं काही काळ चालत. पण जयचं आक्रमक नेतृत्व शंख, सभा, शेकोटी, सुटका या संकल्पनाच बाद ठरवून टाकतं. शेवटी शंख आणि तो जपू पहाणाऱ्या बुक्कडवर अत्यंत थंडपणे वरून शिळा ढकलली जाते, दोघेही खोल दरीत समुद्रात पडतात. दोघांच्याही ठिकऱ्या ठिकऱ्या होतात. शंख आणि त्याची मालकी, सभा आणि सभेचे नियम आणि अखेरीस दोन्हीचा विलक्षण ऱ्हास यातून गोल्डिंग बरंच काही सुचवत राहतो. भूतमॅन ही तर भन्नाटच कल्पना आहे. दुरून दिसणारी मानवाकृती म्हणजे भूतमॅन आहे असं ही मुलं समजतात. मानवी मनातील अज्ञाताची, अदृष्टाची भीती इथे भूतमॅनच्या रुपात साकार झाली आहे. लवकरच या भूतमॅनचा भूतमॅनबाबा होतो. समाज मनात देवा-धर्माची उत्क्रांती कशी झाली याचं नेमकं दर्शन इथे घडतं. भीती, भीतीची गडद छाया, भूतमॅनची भीती, भूतमॅनबाबाची आळवणी, त्याच्यासाठी डुकराच्या मुंडकयाची बोली, तो दिसणं आणि त्याचा रहस्यभेद असा हा प्रवास आहे. सायमनसारखा जिज्ञासू या रहस्याचा छडा लावतो पण त्यात कोणालाच रस नसतो. उलट बेभान नाचात, कळत नकळत सायमनचाच खून होतो आणि ते रहस्य कायमचं शिल्लक रहातं. उरलेल्यांच्या मानगुटीवर कायमचं स्वार रहाण्यासाठी.
कादंबरीचं नाटक करावसं वाटलं ते त्यातील ही अर्थबहुलता पाहून.
पहिलाच प्रश्न होता यातलं वातावरण आहे तसच इंग्लिश ठेवायचं का त्याचं मराठीकरण करायचं हा. पण जगाच्या पाठीवर कुठल्याही संस्कृतीत घडू शकेल अशी ही कथा आहे त्यामुळे ती मराठी भाषेत आणि मराठी वातावरणात आणणं मला योग्य वाटलं. उगाच ‘माझी आजी मला डुकराच्या मासाची तळलेली भजी देते!’ असले भाषांतरीय अपघात आपोआप टाळले गेले.
मूळ कादंबरीत आणि या रूपांतरात काही भेद आहेत. मुळात जॅक मेरीड्यू, म्हणजे नाटकातला जय, आणि त्याची गँग हे शाळेतले कॉयर ग्रुपचे सदस्य आहेत. म्हणजे शालेय भजनी मंडळच म्हणा ना! शालेय समूह गायनाची खास टीम असा प्रकार आपल्याकडे नसल्यामुळे हा उल्लेख गाळला आहे.
सायमनला वारंवार अपस्माराचे झटके येत असतात, त्यात त्याला भास होत असतात आणि भूतमॅनच्या रहस्याचा भेद त्याच्या हातून होतो तो अपघाताने. नाटकात मात्र सायमन थोडा वेगळा दर्शवलेला आहे. जिज्ञासू, स्वप्नाळू असा हा मुलगा अगदी जाणीवपूर्वक भूतमॅनचा शोध घेतो असं मी नाटकात दाखवलेलं आहे. राजचं समन्वयी नेतृत्व, बुक्कडची विचारी बडबड आणि सायमन यांचे सूर जुळण्यासाठी सायमन हा असा शोधकवृत्तीचा, नव्याची आस असलेला, असावा असं मला वाटलं, म्हणून मी तो तसा रंगवला.
कादंबरीत कित्येक ठिकाणी वातावरणाची विस्तृत वर्णनं आहेत. अशी वर्णनं करणं नाटकात शक्य नाही. अतिशय काव्यमय आणि अर्थवाही अशी गोल्डिंगची भाषा आहे. सायमनच प्रेत लाटांबरोबर समुद्रात जातं याचं वर्णन करताना तो म्हणतो,
"The tide swelled in over the rain-pitted sand and smoothed everything with a layer of silver. Now it touched the first of the stains that seeped from the broken body and the creatures made a moving patch of light as they gathered at the edge.  The water rose further and dressed Simon’s coarse hair with brightness. The line of his cheek silvered and the turn of his shoulder became sculptured marble. The body lifted a fraction of an inch from the sand and a bubble of air escaped from the mouth with a wet plop. Then it turned gently in the water.
Somewhere over the darkened curve of the world the sun and moon were pulling; and the film of water on the earth planet was held, bulging slightly on one side while the solid core turned. The great wave of the tide moved further along the island and the water lifted. Softly, surrounded by a fringe of inquisitive bright creatures, itself a silver shape beneath the steadfast constellations, Simon’s dead body moved out towards the open sea."
हे नाटकात कसे आणावे बरे? मग सायमनच्या काव्यमय स्वगतातून हा प्रश्न सोडवला. सायमनचा मृत्यू होतो आणि सायमनच्याच आवाजातलं त्याचं पूर्वीचं एक स्वगत ऐकू येतं,
पृथ्वीभोवती चंद्र फिरे... किती नेटका, किती लयबद्ध...
सांभाळतो भरती ओहटीच्या लाटांचे कळसूत्र.
पुळणीवरती बिळेच बिळे
त्यात भरतीचे पाणी भरे.
ओहटीबरोबर समुद्रात जातात
काही जीव आणि काही कलेवरे.
 इथे प्रवेश संपतो.
हे समूहाचं नाटक आहे. समूह हेही त्यातील एक पात्र आहे. मुलांचं होत जाणारं रानटीकरण, लष्करीकरण हे नेटक्या समूहदर्शनाने अधोरेखित होत जाते. यातील समूह स्वर, कोरसने आळवलेली त्याच त्याच ओळींची लयबद्ध आवर्तनं, सामुहिक हालचाली ह्या प्रत्येक प्रसंगातील नाट्य जिवंत करतात. नाटक हे लेखकाचं माध्यम आहे असं म्हटलं जातं पण ह्या नाटकात दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीवर आणि प्रतिभेवर बरंच काही अवलंबून आहे. हे नाटक जितकं लेखकाचं  असेल तितकंच ते दिग्दर्शकाचंही असेल.
ह्यात बरीच लहान मुलं आहेत पण अगदी कॉलेजची मुलं घेऊनही हे नाटक छान वठवता येईल. मोठ्यानीच छोट्यांची काम करण्याचे ग्रिप्स थिएटर सारखे प्रयोगही करता येतील. शेवटी कागदावरचं नाटक हे काही नाटक नव्हे. या नाटकाला जीवंत करणारे रंगकर्मी आणि प्रेक्षक जसे ‘प्रतिक’च्या रूपांनी पूर्वी लाभले तसे पुढेही लाभतील तेंव्हाच हा प्रयत्न पूर्ण होईल असं मी मानतो. नाटक उभं करणाऱ्या भावी कलावंतांना खूप खूप शुभेच्छा.
वाईच्या प्रतिक थिएटर्स ह्या माझ्या घरच्याच संस्थेनी मोठ्या आस्थेनी आणि कष्टपूर्वक याचा प्रयोग बसवला. त्याचं उत्कृष्ट आणि उत्कट सादरीकरण केलं. यासाठी मी मंदार शेंडे, सतीश शेंडे, विनीत पोफळे आणि प्रतिक परिवाराचा ऋणी आहे.
आज अनेक वर्षानी या नाटकाची संहिता प्रकाशित करण्याचा योग येत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ह्यासाठी अनेकांचा हातभार लागलेला आहे. आभा प्रकाशनचे अनिरुद्ध भाटे यांच्याशी या निमित्ताने मैत्र जुळले. त्यांच्या सूचनांचा, मार्गदर्शनाचा यात मोलाचा वाटा आहे. त्यांचे विशेष आभार. माझे मित्र, ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. गिरीश ओक यांनी माझ्या विनंतीला मान देवून प्रस्तावना लिहून दिली. त्यांच्या प्रस्तावनेमुळे या संहितेचं मूल्य कितीतरी वाढलं आहे. त्यांचेही मनःपूर्वक आभार. वैखरी कुलकर्णी आणि सुदर्शन साबडे यांनी अर्थवाही मुखपृष्ठ चितारले आहे. संतोष गायकवाड यांनी अक्षरजुळणी आणि मुद्रितशोधनाची किचकट जबाबदारी पार पाडली आहे. मौज प्रिंटींग ब्युरोने त्यांच्या लौकिकाला साजेशी सुबक छपाई केली आहे. या साऱ्यांचे आभार.

डॉ. शंतनू अभ्यंकर

Tuesday, 26 December 2017

डोंबलाचे गर्भसंस्कार

डोंबलाचे गर्भसंस्‍‍कार!...
डॉ शंतनु अभ्यंकर, वाई.
मी आहे गायनॅकाॅलॉजिस्ट, प्रॅक्टिस करतो एका लहान गावात. गेली वीस वर्षं मी नियमितपणे माझ्या रुग्णांसाठी ‘पालक मार्गदर्शन मेळावा’ घेतो आहे. होणारे आईबाबा आणि त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांना या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला आमंत्रण असतं. प्रत्येक वेळी प्रतिसाद अगदी छान असतो. इतकी वर्षं झाली, मी कटाक्षाने ‘गर्भसंस्कार’ हा शब्द टाळत आलोय. यामागे असणाऱ्या धार्मिक, अशास्त्रीय, छद्मशास्त्रीय गोष्टींना माझा ठाम विरोध आहे. या नावाखाली खपवले जाणारे गंडे-दोरे, मंत्र-तंत्र हे छद्मशास्त्राचं उत्तम उदाहरण आहे. बाळाला ऐकू येतं हे शास्त्रीय तथ्य. पण याचा अर्थ त्याला त्या आवाजांचा ‘अर्थ समजतो’ हे त्याला जोडलेलं मिथ्य. बाहेरच्या आवाजांनी बाळ दचकतं हे शास्त्रीय तथ्य. पण याचा अर्थ ते बाहेरील उत्तेजनांना (Stimulus) समजून उमजून प्रतिसाद देतं हे सोयीस्कर मिथ्य.
नुकताच माझ्या एका मित्राने माझ्याकडून स्फूर्ती आणि स्लाइड्स घेऊन असाच कार्यक्रम सुरू केला आणि नाव दिलं, ‘गर्भसंस्कार’! मी पडलो चाट. तर म्हणतो कसा, ‘अरे, तू आणि मी जे करतो, ते ‘खरे गर्भसंस्कार’, तेव्हा हा शब्द खरं तर आपण वापरायला हवा.’
मी एकदम हे ऐकून कान टवकारले. अरे, खरंच की. ‘गर्भसंस्कार’ म्हणजे मंत्र-तंत्र नव्हे, पूजा-पाठ नव्हे, प्रार्थना नव्हे... ‘गर्भसंस्कार’ म्हणजे आईला, बाबांना, आज्जी-आजोबांना नव्या नात्याची जाण करून देणं, आईच्या अडचणी समजावून घ्यायला मदत करणं, सुखरूप आणि सुदृढ बाळ व्हावं म्हणून काय-काय करता येईल याची सविस्तर चर्चा करणं. भीती, गैरसमज अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा-परंपरांची जळमटं काढून टाकणं, आधुनिक चाचण्या, उपचार रुजवणं. मग हे सगळं तर मी माझ्या मांडणीतून गेली वीस वर्षं करतोच आहे. पण या सगळ्याला ‘गर्भसंस्कार’ म्हणायला कचरतो आहे. मित्राच्या सांगण्यानं मला एक नवी दृष्टी दिली. मी जे शास्त्रशुद्ध, पुराव्यानुसार बोलतो तेच तर ‘खरे गर्भसंस्कार’.
मी आपला ओशाळवाणा ‘पालक मार्गदर्शन मेळावा’ असं अत्यंत गद्य शीर्षक वापरत होतो. मॅडच होतो की मी. मित्र म्हणाला, ‘अरे ‘गर्भसंस्कार’ हा आपला गड आहे, आपली जहागीर आहे ती. ती पुन्हा काबीज करायला भीड कसली. उलट हा शब्द न वापरून तू अशास्त्रीयतेला आपण होऊन जागा करून देतो आहेस. योग्य गर्भसंस्कार कुठले हे जाणून घेण्यापासून तुझ्या रुग्णांना वंचित ठेवतो आहेस. धिक्कार असो तुझा!’
आता मीदेखील ‘गर्भसंस्कार’ हा शब्द वापरायचं ठरवलं आहे. अगदी उजळ माथ्यानं. एक तर त्यामुळे योग्य, शास्त्रीय, आधुनिक गर्भसंस्कार म्हणजे काय हे आपोआप अधोरेखित होईल. पर्यायाने छाछूगिरी कुठली हेही समजेल. अर्थात आम्ही ज्या अपेक्षेने आलो होतो, ते ‘हे’ नाहीच, असं काहींना वाटू शकेल. आमची फसवणूक झाली असंही कोणी म्हणू शकेल. पण आमच्या दृष्टीने आम्ही जे करतोय तेच खरे गर्भसंस्कार असं म्हणता येईल.
मागे एकदा चेन्नईत चायनीज मागवल्यावर, चक्क सांबारात बुचकळून ठेवलेले नूडल्स पुढ्यात आले. हॉटेलवाल्याशी बऱ्याच वेळ हुज्जत घातल्यावर शांतपणे तो म्हणाला, ‘सर, धिस हॉटेल, धिस चायनीज!’
त्याच चालीवर म्हणता येईल, ‘धिस हॉस्पिटल, धिस गर्भसंस्कार!’
पण इतकं सगळं करूनही आजही हमखास प्रश्न येतो, ‘सर, आम्ही गर्भसंस्कार सुरू करू का?’ मग मी मनातल्या मनात डोक्याला हात लावून म्हणतो, ‘डोंबलाचे गर्भसंस्कार!’
गर्भसंस्कार. किती लक्षवेधी आणि लक्ष्यवेधी शब्द आहे हा. मुलांवर लहानपणी आपण संस्कार करतच असतो. कसं वागावं, बोलावं याबाबतीत यथाशक्ती सूचना आपण देतच असतो. शाळा देते, समाज देतो. ही एक न संपणारी क्रियाच. पण बहुतेक भर लहानपणावर. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, वगैरे. योग्यच आहे हे. शिक्षणतज्ज्ञ, बालमानसतज्ज्ञ नेमकं हेच सांगतात. मग याच न्यायाने गर्भावर संस्कार करायला काय हरकत आहे? जे लहानपणी करायचं ते गर्भावस्थेत सुरू केलं तर तेवढंच नंतरचं ओझं कमी. स्पर्धेच्या या युगात आपलं घोडं आणखी थोडं पुढे. संस्कार या शब्दाला एक वलय आहे. त्यात धार्मिक, अाध्यात्मिक आशय सामावलेला आहे. त्यामुळे गर्भसंस्कार म्हटलं की, कसं भारदस्त, पवित्र वगैरे वाटतं. गर्भसंस्कारवाल्यांनी अभिमन्यूची गोष्ट तर शोकेसमधे लावली आहे. ती गोष्ट म्हणून अतिशय काव्यमय आणि छानच आहे. पण पुरावा म्हणून निरुपयोगी. सुभद्रेला डोळा लागला पण अभिमन्यू झोपल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे त्याने सर्व युक्त्या ऐकायला हव्या होत्या. आई झोपल्याने बाळाचं श्रवण का बरं बंद होईल?
वास्तविक आवाज ऐकण्याची क्षमता (श्रवणशक्ती) जरी गर्भावस्थेत प्राप्त होत असली तरी, भाषा समजण्याची क्षमता ही गर्भावस्थेत प्राप्त होतच नाही. ती नंतर हळूहळू निर्माण होते. कित्येक वर्षं लागतात त्याला. मग यावरही तोडगा असतो. निव्वळ वाद्यसंगीत, आलापी, असं खास संगीत गर्भसंस्कार संगीत म्हणून विकलं जातं. पण जे शब्दांचं तेच सुरांचं. आपण बोललेलं वा वाद्यसंगीत, त्या गर्भाला जरी ऐकू आलं तरी त्याच्या दृष्टीनं ते निव्वळ ‘आवाज’, अर्थहीन आवाज. तुम्ही किंवा मी, आपल्याला अवगत नसलेली भाषा ऐकल्यासारखंच की हे. इतक्या डिलिव्हऱ्या केल्या पण अजून कोणी गर्भसंस्कारित बाळाने, ‘खोल श्वास घे’ ही माझी साधी सूचनाही पाळलेली नाही. त्याने नाही घेतला श्वास, तर आजही मला कृत्रिम श्वासोच्छवासच द्यावा लागतो. अमुकअमुक करा, तुमचे अपत्य दिव्य, तेजःपुंज होईल, अतिशय हुशार होईल, असे दावे केले जातात. आता ‘तेजःपुंज’ याची काही व्याख्या आहे का? हुशारी म्हणजे नेमकं काय हेदेखील नीट मोजायची परफेक्ट साधनं नाहीत. शिवाय झालेलं बाळ एखाद्या क्षेत्रात तेजःपुंज आणि दुसऱ्या ठिकाणी अगदी ढेपाळू शकतं. शालेय शिक्षणात यथातथा असलेला क्रिकेटचा देव, व्यसनी महागायक किंवा महानायक अशी माणसं आसपास असतात. यांना तेजःपुंज म्हणायचं की नाही?
थोडक्यात, असे भोंगळ दावे तपासता येत नाहीत. अमुकअमुक करा तुमचं मूल शी-शू कधी, कुठे करायची हे वर्षाच्या आतच शिकेल, असा दावा कसा कोणी करत नाही? कारण हा झटकन तपासता येतो. मूल तेजःपुंज होईल हे सगळ्यात बेस्ट, कारण हे तेज वयाच्या कितव्या वर्षी उजेड पाडेल याला काही गणित नाही. शाळेत मागे असणारी मुलं कॉलेजमध्ये चमकतात, व्यवसायात नाव काढतात. उतारवयात उत्तमोत्तम साहित्य-संगीत प्रसवलेले कितीतरी प्रतिभावंत आहेत. हे सारं गर्भसंस्काराचं तेज म्हणायचं का?
मुलांमध्ये बुद्ध्यांक, वर्तन समस्या, ऑटीझम ह्यांच मोजमाप करता येतं. ‘गर्भसंस्कारीत तेजःपुंज संततीमध्ये हे प्रकार क्वचित आढळतील’; असा जर दावा असेल तर तो तपासण्याची सामुग्री तयार आहे. मग असे संशोधन टीकाकारांच्या तोंडावर मारून त्यांची तोंडे बंद का केली जात नाहीत? गर्भसंस्कारामुळे उत्तम बीज निर्मिती होते म्हणे. फारच छान. उत्तम बीज कसं ओळखावं ह्यासाठी टेस्ट-ट्यूब बेबीवाले डॉक्टर आणि पेशंट संशोधनाकडे डोळे लावून बसले आहेत. इतकी प्रभावी आणि साधी युक्ती गुपीत का आहे? स्त्री आणि पुरुष बीज जर उत्तम क्वालिटीचं होत असेल तर गर्भपात अगदी कमी होतील. मग संस्कारित आणि असंस्कारित दाम्पत्यात गर्भपाताचं प्रमाण तपासणं कितीतरी सोप्प आहे. हे का कोणी अभ्यासत नाही? 
उत्तमोत्तम संगीत ऐकावं, उत्तमोत्तम साहित्याचा, काव्याचा, चित्रांचा, आस्वाद घ्यावा, (चित्रपटांचा आणि शिल्पांचा मात्र उल्लेख नसतो) असा सल्ला हे गर्भसंस्कारवाले देत असतात. हा सल्ला छानच आहे की. पण मग त्यासाठी बाळंतपणच कशाला पाहिजे? हे तर सारं एरवीही करायला हवं असं आहे. आणि आईनेच का? बाप अधिक रसिक किंवा बहुश्रुत झाला तर ते काय वाईट आहे? आणि आई-बापच का सारं कुटुंब डुंबू दे की या आनंदसागरात.
इतिहास आणि पुराणातील उत्तमोत्तम कथा वाचाव्यात असंही सांगण्यात येतं. इतिहासात, पुराणात जसे नायक असतात तसे खलनायकही असतातच. शिवाय पुराण आणि धार्मिक कथांतसुद्धा भरपूर हिंसा असते. ती फक्त व्हिडिओ गेम किंवा पिक्चरमध्येच असते, हा गैरसमज आहे. शूर्पणखेचं नाक कापण्यापासून, लंका दहन, रावणवध ही सारी हिंसाच आहे की. महाभारतातदेखील लाक्षागृहदहन, दुर्योधनाच्या रक्ताने माखलेल्या हाताने भीमाने द्रौपदीची वेणी घालणं, वगैरे वगैरे प्रकार आहेतच. ही महाकाव्यं मानवी व्यवहाराचा आरसा आहेत. त्यात सौंदर्य आहे, तसंच क्रौर्यही आहे. सुरूप आहे, कुरूप आहे, हेम आहे हीन आहे आणि हिणकसही आहे. कंस आणि कालियाशिवाय कृष्णाची गोष्ट अपूर्णच नाही का? मग हा गर्भ नेमकं काय स्वीकारायचं याचा नीरक्षीरविवेक कसा करतो? का नीती कल्पना त्या गर्भाच्या मेंदूत कोरलेल्याच असतात?
गर्भसंस्कार हे खरोखरच उपयुक्त असतील तर ते साऱ्या मानवजातीला एकसाथ लागू पडायला हवेत. पण हे तर अत्यंत संस्कृतिनिष्ठ, धर्म-वंश-देश-निगडित असलेले दिसतात. यावर मानभावीपणाने असं सांगितलं जातं की, आमचे मंत्र तर खर्रेखुर्रे पॉवरबाज आहेत. जो कोणी मनोभावे ते म्हणेल त्याला त्याचा लाभ होईल. म्हणजे लाभ नाही झाला तर ते मनोभावे नव्हते! विज्ञानात असं नसतं. निव्वळ मुसलमानांना लागू पडेल आणि अन्यांना नाही अशी कोणतीच लस नसते. निव्वळ कृष्णवर्णीयाचा ताप जाईल पण गोऱ्या माणसाचा नाही, असं तापाचं औषध नसतं. मग प्रश्न असा पडतो की, मानवी मनावर, व्यवहारावर इतके मूलभूत आणि दूरगामी परिमाण करणारे हे गर्भसंस्कार इतके कोते कसे? शास्त्रीय माहिती, व्यायाम, मानसिक, भावनिक आधार, सकारात्मक विचारसरणी, आनंदभाव जोपासणे, सर्व कुटुंबीयांचा सहभाग हेही या गर्भसंस्कारवर्गात सांगितलं जातं आणि हे स्वागतार्हच आहे. पण बाळाच्या भवितव्यासाठी सर्वस्वी आपणच (विशेषतः आईच) जबाबदार आहोत असा एककल्ली, टोकाचा विचार, हे खूळ आहे. ‘अभी नहीं तो कभी नहीं’, हे खूळ आहे. इच्छा धरताच दिव्यत्व आणि मंत्र म्हणताच त्याची इन्स्टंट प्रचिती, हे खूळ आहे. गरोदरपण आणि मातृत्व-पितृत्व हा अगदी आनंददायी अनुभव आहे. थेट गर्भावर अनाहूत अपेक्षांचं ओझं लादून आपण तो खुजा तर करत नाही ना याचा विचार सर्वांनी केला पाहिजे.
- डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
shantanusabhyankar@hotmail.com या आणि अशाच लिखाणासाठी माझा ब्लॉग अवश्य वाचा. shantanuabhyankar.blogspot.in