Saturday, 29 April 2023

ताज्या किशोर चे सुंदर मुखपृष्ठ.

किशोर मुखपृष्ठ: एका रसिकमनाची दाद 

डॉ. शंतनू अभ्यंकर 
मुखपृष्ठ: अन्वर हुसेन

किशोरचा मे २०२३ चा अंक हाती पडला.  मुखपृष्ठ नजरेस पडले आणि मी पाहतच राहिलो.
सायकल चालवणाऱ्या दोन मुली आहेत. अंगात वारं भरलेल्या त्या दोन मुली, सायकलवरून सुसाट सुटलेल्या. सायकलही नवी आहे, तिचा लाल रंग तुकड्या तुकड्यानी चमकतो आहे. सायकलला लावलेली फुलं आणि त्या मुलीच्या दोन पोनिटेल्स पिसाट वाऱ्याने मागे उडताहेत. बस्स, सायकलचा सैराट वेग सांगायला एवढंच पुरेसं. पण मनाचा आवेग? तो कसा  चित्रात पकडणार? त्यासाठी अन्वर हुसेन यांच्यासारखा मनकवडा चित्रकारच हवा.  
एक मुलगी कॅरियरवर बसलेली आणि एक जोरात पॅडल मारणारी. नाही, नाही ‘पायंडल हाणणारी’. अहो, गावाकडच्या आहेत त्या. नाहीतर आजूबाजूला इतकी हिरवाई कुठून असायला? मुली अगदी काटकुळया आहेत. अजून अंगाने भरायच्या आहेत. शाळेतल्याच असाव्यात. म्हणजे अर्थातच आडनिड्या वयातल्या आहेत.  अंगाला जेव्हा सायकल फुटते त्या वयातल्या.  सायकलवरून भन्नाट वेगाने गावभर, शिवारभर हुंदडण्याच्या वयातल्या.  
पहा ना, पहिल्या मुलीची मान वर, पाठ ताठ  आणि नजर आभाळावर खिळलेली. नव्याने प्राप्त झालेला नवथर, किशोर तोरा मिरवणारी. मुग्ध किशोरीची युवाकांक्षीणी होतानाची ही देहशोभा. मोठ्या आत्मविश्वासाने ती सायकल चालवते आहे. दुसरी मुलगी तिच्या मागे अलगद  बसलेली. तिचं भिरभिरतं लक्ष आसपासच्या फुलांकडे आणि स्वच्छंदी  फुलपाखरांकडे. पण यातही फुले कुठली आणि फुलपाखरे कुठली हे कळू नये असे नजाकतीचे, धूसर चित्रण. ही चित्रकाराची कारागिरी. त्या लहानगीलाही हे विश्व  नवीनच. आपल्या मोठ्या मैत्रिणी इतक्याच वेगानं तीही या नवलगरीत निघालेली.  
सायकल तर त्या विश्वात निम्मी बुडलेली. तिची चाके नक्कीच जमिनीवर टेकलेली नसणार. तरंगत असणार ती. त्या मुली आणि सायकलच नाही तर त्यांच्या आसपासचं  सगळं विश्व धूसर झालेले. त्यांच्या आसपास शेतांचे रंगीबेरंगी तुकडे. इतके मऊसूत, तलम आणि गुबगुबीत की त्यांची प्रेमळ गोधडी झालेली. हे तुकडेही एकमेकांत मिळून मिसळून गेलेले. बांधाची, कुंपणाची सीमा केंव्हाच पुसून गेलेली.  या असल्या आकारउकार आणि आऊटलाईन नसलेल्या विश्वात त्या मुली शिरल्या आहेत.  त्या पहिल्या मुलीचा लांब फ्रॉक तर जणू पिसापिसांचा बनलेला आहे.  ती मुलगी जणू परीराणीपदाला पोहोचलेली आहे.
ह्या परीराणीच्या सोबतीने आपणही क्षणात त्या जादुई विश्वात शिरतो. हे सामर्थ्य या चित्रकाराचे.  
चित्रकार अन्वर हुसेन आणि संपादक किरण केंद्रे यांचे अभिनंदन आणि आभार. मी कोणी चित्रकार नाही.  चित्रकलेतला जाणकार नाही पण हे चित्र पाहिल्या पाहिल्या मनावर उमटलेले तरंग मी टिपले, एवढेच.

- डॉ. शंतनू अभ्यंकर 

#किशोरमासिक
#बालभारती

Friday, 21 April 2023

एक शहनशाह ने बनवाके हसीं ताजमहल...

एक शहनशाह ने बनवाके हसीं ताजमहल..... 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
ताजमहाल. शुभ्र संगमरवरातले ते भव्य शिल्प, समोर डोळ्याचे पारणे फेडत असते. ‘इक शहनशाह ने बनवाके हसीं ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है’, हे स्वर मनात रुंजी घालत असतात. मंत्रमुग्ध भावसमाधी आपण अनुभवत असतो. इतके प्रमाणबद्ध, इतके रेखीव, इतके साधे पण स्वर्गीय सौंदर्य समोर निथळत असते. कितीही वेळा अनुभवले तरी मन समाधान पावत नाही अशा कलाकृतीपैकी एक अव्वल कलाकृती ही. 
पण अचानक ही समाधी भंग पावते. सारी शांतता भेदून मनातून कुठून तरी काहीतरी  वर येतं. शांततेवर एक करकरीत ओरखडा उमटतो. मुमताज महल तर आठवतेच पण मग आठवतात मुमताज महल सारख्याच बाळंतपणात मृत्यू पावलेल्या अनेकानेक बायका. मग लक्षात येतं हे मुमताज महलचे स्मारक नाही. ही ‘मोहब्बत की निशानी’ नाही.  हे तर बाळंतपणणात मृत्यू पावलेल्या, माझ्या  आज्जीच्या आजीच्या काकूसारख्या, ज्ञातअज्ञात बायकांचे वृंदावन. माझ्या सारख्या हाडाच्या स्त्रीआरोग्य तज्ञ माणसाला ताज महाल जास्त वेळ सोसत नाही. 
मुमताज महल गेली ती  चौदाव्या बाळंतपणात, बुऱ्हाणपूरला, अडतिसाव्या वर्षी, लग्न झालं होतं एकोणिसाव्या वर्षी. म्हणजे वीस वर्षात चौदा मुलं! चौदाव्या वेळच्या कळा दीड दिवस चालू होत्या म्हणे. शेवटी ती सुटली. मुलगी झाली. ही गौहर आरा बेगम. पण मुमताज महलला रक्तस्त्राव झाला, तो थांबलाच नाही आणि त्यातच ती गेली (१६३१). पुढे २२ वर्षांनी ताजमहाल वगैरे.  
बाळंतपणात होणारा रक्तस्त्राव हे आजही मृत्युचं सर्वात कॉमन कारण आहे. जंतुबाधा (इन्फेक्शन), बाळंतवात (बीपी वाढणे/झटके येणे) आणि असुरक्षित  गर्भपात ही इतर कारणे. 
पैकी इन्फेक्शनची एक कथा माझ्या आज्जीच्या मनात रुतून बसली होती. मी एमडी गायनॅकला प्रवेश घेतला त्याचा आज्जीला कोण आनंद. त्या आनंदाच्या भरात, माझ्या किंचित भ्रमिष्ट आज्जीला, काय काय आठवायला लागलं.  तिच्या आजीच्या काकूची गोष्ट सांगितली तिनी मला. म्हणजे माझ्या खापरपणजीची काकू. ही  काकू घरीच ‘झाली’.  खूप वेळ लागला.  खूप आरडत होती, ओरडत होती; रडत-विव्हळत, कण्हत-कुंथत  होती. बाळाचं डोकं तोंडाशी येऊन थांबलं  होतं. चार सुइणी आणवल्या. बाया जमल्या. हुईना. बापे जमले तरीही हुईना. नेऊन न्यायचे तर दवाखाना पन्नास मैलावर. गावात छकडा एक. त्याचा बैल नेमका बसलेला.  लोकांनी पोट चोळलं. बुक्क्या मारल्या.  लाथा मारल्या.  पोटावरती स्वार होऊन ढकलंल.  पण तरीही आज्जीच्या आजीच्या काकूची काही सुटका होईना.  अखेरीस एका सुइणीने स्वतःचा चुडा फोडला आणि बांगडीच्या काचेच्या धारेने काकूचे अंग कापले. काकू सुटली. पण मुडदा निपजला. कोरड्या डोळ्यांनी आणि कोरड्या मनाने ते मूल, मागच्या अंगणात, वारेसकट पुरून टाकण्यात आलं. गाव पांगला. पुरुष मंडळी आपापल्या कामधंद्याला लागली आणि बायांची पावलं स्वयंपाकघराकडे वळली.  
पण झालेल्या त्रासानं काकू गलीतगात्र झालेली. दुसऱ्या दिवशी तिला किंचित ताप भरला आणि तो थंडीताप रोज वाढत, वाढत, वाढत गेला. कसल्या कसल्या पाल्याची धुरी, कसले कसले लेप, कसलं वाटण, कसलं चाटण असे उपचार सुरू राहिले. उंबऱ्यावरच्या करवंटीतले  गोमूत्र, कडूलिंबाच्या पाल्याने  पायावर शिंपडून, मगच खोलीत प्रवेश सक्त केला गेला. शांतीपाठ, अंगारे धुपारे सुरूच होते.
शेवटी ती तापात बरळायला लागली.  मग चुनाभट्टी लावली गेली. जखमेला  त्याच्या वाफा दिल्या गेल्या. थंडी ताप वाढत गेला. अंगची जखम आता  टरारुन फुगली होती. दिवसेंदिवस ती चिघळतच  गेली.  तीतून बुडबुडे येऊ लागले. तिचा ओंगळ दर्प घरभर पसरला. कोणी जवळ जाणेही अशक्य झाले. बाळंतीण एकटी पडली. त्यात उलट्या आणि हाग-मूत सारे एकाच जागी. तशात एका रात्री पोट हे फुगलं. जखमेतून भराभळा रक्त व्हायला लागलं.  श्वास थांबल्यावरच रक्तस्त्राव थांबला. काकू गेली. 
शेतातच तिच्यावर अग्निसंस्कार केले गेले. काकांनी तिचं वृंदावन बांधलं. पंचक्रोशीतल्या बायबापड्यांनी ते पवित्र ठरवलं. आता तिथे हमरस्ता आहे. ‘काकूचे वृंदावन’ हा आता गजबजलेला बसस्टॉप आहे. समोर मोठा चौक आहे. कोपऱ्यात सरकारी दवाखाना आहे. एक सुसज्ज अॅंम्ब्यूलन्स तिथे सतत सज्ज उभी असते.  
आज्जीचं आणि आज्जीच्या आजीच्या काकूचं, काय मैत्र जुळलं होतं मला माहित नाही.  पण छान मेतकूट असावं. कळत्या-नकळत्या वयात पाहिलेला तो मृत्यू आज्जीच्या मनात कायमचा घर करून बसला असावा. सगळ्याचीच  वानवा, परकोटीची अगतीकता आणि  वैद्य-विदयेच्या अभावी आलेलं हे मरण; अहेवपणी आलं असलं तरी  आजीच्या मनात आयुष्यभर सलत होतं. जाण्यापूर्वी तो सल प्रसूतीतज्ञ व्हायला निघालेल्या नातवाच्या मनात ती जणू आवर्जून रुजवून गेली. ‘क्षणभर श्रावण स्रवला रे; मनातले सल रुजून त्याचा, आता झाला मरवा रे’ असं सांगून मनातल्या सलांचा मरवा होऊ शकतो असं बोरकरांनी सुचवले आहेच. 
एकेकाळी बाळंतपणात मेलेली बाई म्हणजे तिचे ठायी भय आणि भक्ती अशा दोन्ही शक्ती एकवटलेल्या. तिच्या वाट्याला वृंदावन क्वचित. वड किंवा विहीर नित्याचे. अशी बाई हडळ होते आणि वडा-विहीरीशी रहाते म्हणे. हडळ कधी एकदम समोर येत नाही. आधी बांगड्या वाजतात, मग मूल रडल्याचा भास होतो, मग केस जळल्याचा वास येतो; आणि मग ही एखाद्या सुंदरीचे रूप घेऊन येते. पुरुषांना वश करून घेते. देखण्या, भरदार, तरण्याताठया पुरुषाला मोहात पाडते. पुरुषाला मोहात  पाडलं तरच त्यांची शक्ती शाबूत राहते आणि वाढते. नपेक्षा शक्ति गायब! भरपूर सुख देऊन देऊन एकदा का पुरुष पूर्णपणे हीच्या कह्यात आला, की अचानक ती आपलं खरं रूप प्रकट करते. पुरुषाची पूर्ण गोची करते.  आता हाड आणि कातडं झालेलं शरीर, डोळ्यात वेडेपणाची झाक, लांब केस, लाल लुगडं, हिरवा चुडा, मोठ्ठं कुंकू; हा त्यांचा स्टेटसचा फोटो!!  
पुरुष प्रधान संस्कृतीने रचलेल्या ह्या लोककथा; स्त्रीला हडळ जरी बनवली, तरी त्याच्या आड सुप्त पुरुषी इच्छांचे विरेचन कसे वावरते आहे पहा. एकूणच बाईप्रती आदर वगैरे कमीच होता आणि  असतो. पेशंट प्रती आदर, तिच्या भावनांची कदर, तिला काय वाटेल हा विचार, हे जरा कमीच असतं. किंवा नसतंच. कामाचा दबाव असतो हे मान्य, पण अदबीने वागणे हा कामाचाच भाग आहे.  ‘रिस्पेक्टफुल मॅटरनल केअर’, आता आवर्जून शिकवले जाते. याने फरक पडतो. असं वातावरण असेल तर महिलांना आपलेपणा वाटतो, सुरक्षित वाटतं.
असुरक्षित गर्भपात हे मातामृत्यूचे आणखी  एक कारण. गर्भपाताबद्दल भारतीय कायद्यांइतके स्त्रीकेंद्री आणि रुग्णस्नेही कायदे कुठे नसावेत. त्यामुळे असुरक्षित गर्भपात कमी झाले आहेत आणि त्यातून उद्भवणारे मृत्यूही कमी झाले आहेत; पण संपलेले नाहीत.
बाळंतवात (Pregnancy induced hypertension) हा, माता मारणारा आणखी एक महत्वाचा आजार. आपल्या पूर्वजांना हा आजार म्हणून वेगळा ओळखतासुद्धा आला नाही. एकाही भारतीय भाषेत अथवा आयुर्वेदात याला नेमका शब्द नाही. असला ठकडा, दगलबाज आजार आहे हा. मी आपला ‘बाळंतवात’ म्हणतो. यात सूज येते, बीपी वाढते, लघवीवाटे प्रथिनपात होतो; मग वार, किडनी, लिव्हर, सारेच बिघडते. कधी पेशंटला  झटके येतात तर कधी रक्त साकळण्याची क्रिया पार बिघडते. मूल पोसले जात नाही. ते  आधी आतल्याआत हडकते, मग गुदमरते आणि मग मरतेसुद्धा.  कधी कधी सारे एकसाथ बिघडते आणि आईही दगावते.  यावर शेवटचा उपाय एकच. दिवस भरले असोत वा नसोत; प्रसूती! ‘झाल्याने होत आहे रे आधी झालीच पाहिजे’ हा उपचारचा मंत्र. अजूनही आपल्याला ह्या आजाराचे ना कारण माहीत ना त्यावरचे उपाय. म्हणूनच बाई दगावण्यात या ‘बाळंतवाता’चा वाटा मोठा असला तरी सध्या डॉक्टरही काहीसे हतबल आहेत. 
जगातील एक पंचमांश मातामृत्यू भारतात घडतात म्हणे. आपली लोकसंख्या अवाढव्य आहे. त्यात इंडिया आणि भारत असे दोन देश इथे एकत्र नांदत आहेत. त्यामुळे निव्वळ अशा संख्यांना अर्थ कमी. प्रमाण महत्वाचे. दर एक लाख जीवंत जन्माला आलेल्या अर्भकांमागे किती  जन्मदा मृत्यू पावतात हे  लक्षात घ्यायला हवं. 
म्हणूनच सांगतो; गुड न्यूज आहे! 
भारतात माता मृत्यू वेगाने दुर्मिळ होत आहेत. आधीच्या तुलनेत तर भरीव प्रगती आहे. १९९० साली दर लाख प्रसवांपैकी ५५६ बायका मरायच्या! अगदी परवा परवा (२०१४-१६) हा आकडा १३० होता! तेवढी बालके आई विना भिकारी!! आता (२०२०) हा आकडा ९७ पर्यंत उतरलेला आहे. पुढच्या सात वर्षात, २०३० सालापर्यंत, सत्तरच्या आत आणायचाच  असा संकल्प आहे. परदेशांशी तुलना करायची तर, इटली, नॉर्वे पोलंड वगैरेत हे प्रमाण लाखात ५ ते १० एवढे अल्प आहे! लाडक्या अमेरिकेत आणि दोडक्या चीनमध्ये १९ आहे. पण नेपाळ (१८६) बांगलादेश (१७३) आणि पाकिस्तान (१४०) पेक्षा आपण बरेच पुढे आहोत. भले शाब्बास!
ज्या राज्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे नेहमीचीच रड आहे. गरीबी, अज्ञान, निरक्षरता, जात्यंध दृष्टिकोन, अंधश्रद्धा;  डॉक्टर आहेत तर औषधे नाहीत आणि औषधे  आहेत  तर डॉक्टर नाहीत  अशीही परिस्थिती असते. मग उपचार देणे हा प्रधान हेतू न ठरता केस लवकरात लवकर पुढे पाठवणे, वाटेत किंवा वरच्या दवाखान्यात मृत्यू घडला तर त्याची जबाबदारी झटकणे सोपे, अशी वागणूक बळावते. 
पण तरीही हा संकल्प तडीस जाईलच. उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमधे मुळातच परिस्थिती बिकट होती पण तिथेही हे प्रमाण सातत्याने घसरत आहे. केरळात हे प्रमाण २०२० सालीच  ३०वर आले आहे. म्हणजे २०३० सालचे उद्दिष्ट त्यांनी कितीतरी आधीच ओलांडले आहे. गरोदरपणातील मानसिक आजारांवर आता त्यांनी भर दिला आहे! 
बाळंतपणात बाई दगावते ती निव्वळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने नाही.  तिच्या मरणाला छपन्न हलगर्जीपणे. प्रत्येकच पातळीवरचा हलगर्जीपणा आता कमी झाला आहे. जरा समृद्धी आली, स्त्रियांप्रती जरा सन्मान वाढला, बालविवाह  उतरणीला लागले. वैद्यकीय सेवा सर्वदूर पसरल्या, बायका घरी होण्यापेक्षा वैद्यकीय देखरेखीखाली होऊ लागल्या. रक्तपेढ्या वाढल्या, ‘रक्त द्या’ म्हटल्यावर पळून जाणारे नवरे जावून आता ‘माझे घ्या’ म्हणणारे दहा हात पुढे येतात. मुळात रक्त वाढावे म्हणून उपचार आले, अॅनिमिया (रक्तक्षय) आटोक्यात आला. संततीनियमन समाजाने मोठ्या प्रमाणावर स्वीकारले, परिणामी बाळंतपणे आधी लांबली आणि मग लवकर थांबली. रक्तस्त्राव थांबवणारी नवीनवी औषधे निघाली; बोळे, टाके, फुगे वगैरे कल्पकतेने वापरुन डॉक्टरांनी रक्तस्राव थांबवण्यासाठी नव्या नव्या युक्त्या शोधल्या. जंतूंशी  सामना करणारी अत्यंत प्रभावी प्रतिजैविके आली.  अॅम्ब्युलंन्स धावू लागल्या, त्या ज्या रस्त्यावर धावणार ते रस्ते सुधारले. मोबाईलसारखी संपर्कसाधने आली, व्हिडिओ कॉलवर सल्ला मसलत नेहमीची झाली. रक्त आणि औषधे ड्रॉनने  पोहोचू लागली.  प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजनेसारख्या योजना आल्या; उपचार, जाणे-येणे, रहाणे-जेवणे सारे विनामूल्य झाले.. आणि सारेच चित्र पालटले. 
आता पुन्हा ताज महाल पाहीन तेंव्हा तिथे मला ‘काकूचे वृंदावन’ दिसणार नाही; ‘मोहब्बत की निशानी’च दिसेल. 


प्रथम प्रसिद्धी
लोकसत्ता
रविवार विशेष
९ एप्रिल २०२३

लोकसत्तेतील शीर्षक 
*आहे, आहे, गुडन्यूज आहे...*