मेल्यायलस, येहोsss!!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
महा अनुभव दिवाळी २०१९.
पासपोर्टबरोबर ठेवलेली एक
शंभर डॉलरची नोट मधून मधून हातात येते. आणखी एक नोट होती पण तिचा विनियोग कसा
करायचा हे स्पष्ट होतं म्हणून ती खर्च झाली. ही उरली. हिच्याबद्दल तुम्हाला काही
सुचवता आलं तर बघा. कारण होतं असं की ही हातात आली की मला रूट सिक्स्टी सिक्स
वरून, सेलीग्मनला घेऊन जाते. रूट सिक्स्टी सिक्स, अमेरिकेतील हा एक रस्ता. आता म्हातारा
झालेला, काहीसा निरुपयोगी, दुर्लक्षित, अडगळीत पडलेला. जेमतेम डागडुजी. पण जेमतेम
म्हणली तरी ती अमेरिकन जेमतेम, त्यामुळे प्रवास आजही सुखद. काही लोक तर मुद्दाम या
रस्त्याने येतात जातात. थोडं स्मरणरंजनीय, थोडं
ऐतिहासिक वगैरे वाटतं त्यांना. तशा इतिहासाच्या खाणाखुणा आहेतच इथे. जुन्या
रस्त्याच्या आसपास, प्रत्येक हॉटेलच्या दारात, गाड्या, घोडे, घोडागाड्या, सायकली,
मोटारसायकली असं काय काय मुद्दाम जुनेरं नेसवून मांडून ठेवलेलं. शोरूम मधल्या
नव्या कोऱ्या गाडी सोबत काढावेत त्याच उत्साहाने इथेही फोटो काढणारे लोक्स वगैरे
आहेतच. सेलीग्मनला तर विशेष. सेलीग्मनच्या आसपास आता या रस्त्याचा अगदी थोडासाच
अंश शिल्लक आहे. तो जुना जीर्ण, जुन्या जमान्यातल्या खुणा मिरवणारा भाग, आता ‘जैसे
था वैसा है’, म्हणूनच प्रसिद्ध आहे. एके काळी आधुनिक म्हणून चाकाखाली घातलेला हा
रस्ता आता, जुनी ठेव म्हणून, जणू प्रदर्शनातली वस्तू म्हणून आहे. यावं, थोडं
इकडेतिकडे करावं, खावं, प्यावं, आवारातल्या जुन्या गाड्यात बसून फोटो काढावेत आणि
आपल्या वाटेनी निघून जावं. अशा रेट्रो खाऊ-पिऊसाठी आता सेलीग्मन प्रसिद्ध आहे.
दोन दिवस इथेच मुक्काम करून
आसपासचा प्रदेश पहायचा प्लॅन ठरला मग. होम स्टे घ्यायचा असंही ठरलं. पहायचं काय,
तर तिथल्या नावाहो इंडियन लोकांनी जपलेली त्यांची खास वस्त्रालंकाराची तऱ्हा.
त्यांची घरं, दारं, जगणं, झोपड्या, कारागिरी आणि काय काय. हे तर अमेरिकेचे
मूळ-निवासी, यांच्याच बापजाद्यांच्या थडग्यावर आजचे इमले उभे आहेत. पण नवी वसाहत वसवायच्या
नादात, या मूळ निवासींचे तण उपटून वेळोवेळी लांब भिरकावून दिलेलं. पण तणच ते, ते
तिथेही रुजलं. नावाहो झाले की पुढे झायन पार्कचा खडा कडा, ब्राईस कॅनयनच्या खडकांवर
निसर्गानी केलेली रंगअदा, मग ग्रँड कॅनियनचा उभा चिरलेला डोंगरदरा, त्यातले कोटी
कोटी वर्ष खोल जाणारे खडकांचे स्तर; हे ही बघायचं होतच होतं.
असा इतिहासातच काय पण
प्रागैतिहासात डुबकी मारायला उत्सुक मी, सेलीग्मनच्या त्या घरगुती हॉटेलातले
वर्तमान पहाताच दचकलो. हॉटेल म्हणजे रस्त्यालगत रेस्टॉरंट, मागे घर. घराच्याच एका
भागात टूरीस्टांसाठी खोल्या काढलेल्या. मी दचकलो ते तिथल्या चिंचोळ्या व्हरांड्यात
आरामखुर्चीत बसलेल्या म्हातारीला पाहून. ती तिथे जगापासून तुटल्यासारखी; चेहऱ्यावर रिकामे हसू, त्या हसण्याला ना ओळखीची किनार
होती ना विषण्णतेची. विदूषकाच्या चेहऱ्यावरचं डिंकानी डकवलेलं कृत्रिम हास्य जणू. झिंज्याही
तशाच विदुषकासारख्या. पांढऱ्या शुभ्र झिंज्या, कृत्रिम वाटाव्यात इतक्या पांढऱ्या.
गोरापान, नाकेला, आता रया गेलेला चेहरा. सुजलेले,
ओघळलेले, लोंबते ओठ आणि थंडगार नजर
रोखणारे घारे डोळे, एवढेच नजरेत भरण्यासारखे होते. बाकी शरीर इतके कृश, इतके
थकेलेले, की त्या आराम खुर्चीच्या खोलीत पार बुडून गेलेलं. येणाऱ्या प्रत्येकाला
पाहताच म्हातारी म्हणते कशी,
‘वेलकम टू सेलीग्मन कॅफे अँड
इन्, मेल्यायलस, येहोsss!’
मी काही बोलणार तर दुसऱ्याच
क्षणी आजी शून्यात डोळे लावून तंद्रीत गेलेली. असेल इथल्या नावाहो भाषेतले स्वागत,
असं समजून मी खोलीकडे वळलो.
आवरून मी जरा वाचत बसणार
तोच रेस्टॉरंटमध्ये जमायचं फर्मान निघालं. उद्यापासून आमचा प्रवास सुरु होणार
होता. त्या आजीचा नातू, हॉटेल मालक, राव्हालना पोंकाशे, हाच आमचा गाईड असणार होता.
रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच त्यानी आपल्या जगप्रसिद्ध हॉटेलची कथा सांगायला सुरवात
केली. त्याचं हॉटेल जगप्रसिद्ध आहे हे ऐकून मी जरा बुचकळ्यात पडलो. त्याच्या जगात
असेल बुवा प्रसिद्ध पण माझ्या जगात तर ते अज्ञात होतं; म्हणजे परवा परवा मी गुगलेपर्यंत
तरी अज्ञात होतं. त्याच्या आजीनी, यामूनबानी, सुरु केलं होतं हे हॉटेल, १९४८
मध्ये. ही सगळी ‘इंडियन’ फॅमिली. त्यांची
नावं ऐकून मला शंका होतीच. बहुतेक नावाहो इंडियन असावेत.
ज्या रूट सिक्स्टी सिक्सवर
हे वसलं होतं त्या रूट सिक्स्टी सिक्सचा जन्म १९२५ सालचा. राव्हालनाच्या त्या
भेसूर आजीचा, ‘यामूनबा’चा बर्थडेही त्याच सालचा. आजच्याच दिवशीचा. बापरे, म्हणजे
आजी चांगली ९३ वर्षाची होती तर. मग
आजीसाठी केक कापला गेला, ‘हॅपी बर्थडे यामुनबा’ही झालं. भावनाशून्य, तटस्थ नजरेने
आजी आपली मिटींमिटी बघत होती. मधूनच अर्थहीन, लहरी हसत होती. तिला अल्झायमर्स
झाल्याचं लगेचच लक्षात आलं माझ्या. तो रस्ता म्हणजे जणू आजीचीच चित्तरकथा. चालू
जमान्यात दोघही संदर्भहीन. राव्हालना सांगत होता, १९२५ साली अमेरिकाही नव्याने
जन्म घेत होती. नव्या आशा, नवी उमेद घेऊन
देशोदेशीची चित्रविचित्र पण हरहुन्नरी माणसं येत होती. कष्टनिष्ठांची
मांदियाळी जमत होती. अनंत ध्येयासक्ती आणि अनंत आशा घेऊन आपापले किनारे सोडून
कित्येक जहाजं अमेरिकेच्या किनाऱ्यावर दाखल होत होती. हा रस्ता म्हणजे जणू ह्या साऱ्यांच्या
आशा, उन्मेषांची भाग्यरेषा. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत,
शिकागोपासून लॉस एंजल्सपर्यंत जाणारी, लक्ष्मी, संपत्ती, सुबत्ता, संधी दाखवणारी
अमेरिकेच्या तळहातावरची धनरेषा. ह्या रस्त्याच्या दुतर्फा मग व्यापार वाढला,
मालवहातुक वाढली, कुठल्या फुफाट्यात असलेली गावखेडी अचानक शहरांशी जोडली गेली.
व्यापार-उदीम, पैसाआडका, कला-संस्कृती असं सारं घेऊन, अमेरिकेच्या त्या भागात जणू
नवीन रक्त सळसळू लागलं. ती पिसाट पश्चिम ह्या रस्त्याने माणसाळली. त्यामुळे हा रस्ता
साऱ्यांना प्यारा. कित्येक अमेरिकनांच्या पहिल्यावहिल्या लांबलचक गाड्यातून
केलेल्या, पहिल्यावहिल्या लांबलचक सफरी या रस्त्यावरून घडलेल्या. मोठ्ठी गाडी,
मोठ्ठ्या आवाजात गाणी; आणि सगळ्यात लोकप्रिय गाणं होतं, ‘गेट युवर किक्स ऑन द रूट
सिक्स्टी सिक्स!’ (सिक्स्टी सिक्स नंबरचा, हा रस्ता नशीला.)
हे सगळं सांगताना राव्हालना
भरून आलं होतं. त्यानेही लहानपणी मम्मीपप्पा बरोबर या रस्त्याने प्रवास केला होता.
पुढे हा रस्ता पुरेना, मग त्याला पर्यायी मार्ग आले. ते ऐटबाज नवे मार्ग,
महामार्ग; अधिक सरळ, अधिक गुळगुळीत, अधिक सुविधा, अधिक मज्जा. मग ह्या रस्त्याला
कोण विचारतो? हळू हळू बरीचशी ट्रॅफिक आटली. धंदापाणीही आटलं, पुढे जवळपास बंदच
झालं. रस्त्याबरोबर ह्याचेही दिवस फिरले. आजोबा वारले. पप्पा आणि मम्मी आकंठ दारूत
बुडालेले होतेच. हा आठेक वर्षाचा असताना एके दिवशी ते दोघं हूवर डॅमच्या जलाशयात
पोहायला, पार्टीला, गेले आणि दोघंही पाण्यात बुडून मेले. घरी राहिले ते हे न चालणारं
हॉटेल, हा आणि आज्जी. पुढे तो तिथेच रेल्वेत कामाला लागला. पुढे भंगार सामानाचा
धंदा सुरु केलान. मग ग्रँडमाच्या डोक्यात
काय आलं कुणास ठाऊक, त्याच भंगारातून तीनी हॉटेल वैचित्र्यपूर्णरित्या सजवलं. रेल्वेतल्या सिटांची बाकं, गाड्यांच्या टपाची
टेबलं, पेट्रोल पंपाच्या खोकड्यात मुतारी,
अशा नामी कल्पना लढवत हे विचित्र रेस्टॉरंट, तिनी नावारूपाला की हो आणलं. ‘जुनं
आणि विचित्र’ हेच त्याचं विक्रीच इंगित. हॉटेल भंगारमालातून बनवलंय, हाच
प्रसिद्धीचा परीस झाला. पण त्याच्या इतकीच कामी आली, ग्रँडमाची तीक्ष्ण
विनोदबुद्धी. या सगळ्या अडगळीत बसल्या बसल्या सोबत होता खोडसाळ विनोदाचा प्रसन्न
शिडकावा.
दारावर एका टोकाला ‘पुश’
अशी पाटी आणि विरुद्ध टोकाला भलंथोरलं हँण्डल!
माणसं स्वाभाविकपणे हँण्डल खाटखुट करणार, मग दार उघडत नाही म्हटल्यावर
पाटीकडे लक्ष जाणार आणि त्या दिशेने दार ढकलताच अलगदपणे दार उघडणार. ‘आईस्ड टी’
मागितला की ही देणार, थोडासा बर्फ आणि त्यात खोचलेली खेळण्यातली गोल्फची ‘टी’.
(गोल्फमध्ये बॉल ठेवायला वापरतात ती छोटी खुंटी. ह्या खुंटीचं नावही ‘टी’), कचरा
टाकायला गेलात तर तिथे कचऱ्यात तोंड घालून पसरलेला एक सहा फुटी मृतदेह!
पुरुषांच्या मुतारी बाहेर, ‘मेन अॅट वर्क’ अशी ठळक पाटी. पण मुळात मुतारीच्या
दारावरच्या पाट्याही अदलाबदली सहज होईल अशा. म्हणजे ‘पुरुषांसाठी’ (मेन) अशी मोठ्ठी
पाटी आणि खाली छोटासा बाण, शेजारच्या दाराकडे रोखलेला! ...आणि त्या दारावर तितकीच मोठ्ठी पाटी ‘महिलांसाठी’ (वुमेन)
म्हणून आणि तिथे उलटा बाण!! म्हणजे बाण नजरेतून हुकला तर तुमचा नेम चुकलाच
म्हणायचा. शिवाय वेड्यावाकड्या अक्षरात ‘नॉट रीस्पॉन्सिबल फॉर अॅक्सिडेंट्स’ हेही
होतंच. ‘स्मॉल कोला’ मागितला की अगदी नैवेद्याच्या ग्लास मधून कोला येणार, गिऱ्हाईक
पुरतं बावचळलं अशी खात्री होताच, नेहमीच्या स्मॉल ग्लासातून खिदळत खिदळत खराखुरा
कोला येणार. मग तुम्हीही तो खिदळत खिदळत पिणार. सूपच्या चमच्याला भलेथोरले भोक, तर
चायनीज स्टिक ना अणकुचीदार टोक. नेमकं काय आणि कसं मागावं ह्या संभ्रमात समोरचा माणूस पडला की यामूनबा खूष. कुणी ‘शो मी
द टॉईलेट’ असं विनवलं की ही बोटभर उंचीची खेळण्यातली टॉईलेट खिशातून काढून दाखवणार,
‘स्ट्रॉ’ मागताच गवत पुढे धरणार. ग्रँडमाची ही आयडिया भलतीच लोकप्रिय झाली. लोक मुद्दाम
मुद्दाम यायचे, आपण कसे बनवलो गेलो याची
मजा चाखायचे, खायचे, प्यायचे आणि खुश होऊन जायचे. ते हास्यसंस्कार आजही जारी आहेत.
प्रवासात राव्हालना तक्रार
करत होता; ‘यामुनबा स्पीक्स सम इंडिअन लँग्वेज, आय कांट फॉलो. शी स्पीक्स इंग्लिश
नो मोर!’ वय वाढल तसं साठीतच ग्रँडमाला अल्झायमर्सनी घेरलं. अब्द शब्द बोलणारी
बडबडी ग्रँडमा शब्द शब्द करत इंग्रजी भाषाच विसरली! चार दोन जुजबी शब्दांपलीकडे
तिला काही म्हणजे काही बोलता येईना. तिच्या लहानपणापासून अवगत असलेली कुठलीतरी
इंडीयन भाषा तेवढी ती बोलत होती. अल्झायमरमध्ये हे असंही होऊ शकतं. ताजी स्मृति
विस्मृतीत जाते आणि कळीकाळी मनात नोंदल्या गेलेल्या, गोंदल्या गेलेल्या,
मनतळातल्या आठवणी, शब्द, भाषा, तेवढ्या शिल्लक रहातात. पूर्वायुष्यात आणि
वर्तमानात एक दुभंग खडा होतो. ग्रँडमाची इंडियन भाषा राव्हालनाच्या पप्पाला येत
होती. पण राव्हालनाला येत नव्हती. तो ती शिकलाच नव्हता. ग्रँडमा मागे लागायची, पप्पा
मागे लागायचा, पण राव्हालनानी हे भाषा प्रकरण काही मनावर घेतलं नव्हतं. पण त्याची
खंत त्याला आत्ता जाणवत होती. ग्रँडमा इंग्लिश विसरल्यामुळे आणि तिची इंडियन भाषा
ह्याला न उमजल्यामुळे दोघांचा संवादच बंद झाला होता. ग्रँडमा म्हणे काय काय बडबडत
रहायची, तासनतास बरळत रहायची. पण ह्याच्या कानांना ते अगम्य. अर्थात तिच्या भाषेत
तरी त्याला काही अर्थ होता, की म्हातारपणातली ती भ्रमिष्ट बडबड होती, माहीत नाही.
पण राव्हालनाला वाटायचं ही काही तरी गुपित सांगत असेल, मरणापूर्वी काही घबाड योग
असेल.
मग चार दिवस ठिकठिकाणी जाणं
झालं. ब्राईस कॅनयनच्या त्या पातळखोल दरीतून उगवलेल्या महाकाय शिळा स्तंभांपुढे मी उभा होतो. निसर्गतः
साकारलेले उंचच उंच सुळके. अगदी शिडशिडीत. असं वाटावं की जरा जोरात वारं आलं तर
तोल जाईल त्यांचा. उन्हं उतरत होती आणि ते स्तंभ क्षणाक्षणाला आपलं रूप पालटत
होते. कधी त्यांच्यात मला गगनाला गवसणी घालणारे सूर्यमंदिराचे कळस दिसत होते तर
कशी शापित यक्ष किन्नर. नर, जनावर तर हरेक स्तंभात जणू लपून राहिले होते.
खऱ्याखुऱ्या आकाराला कल्पनेचा परीसस्पर्श व्हायचा अवकाश की खांबातून नर-नारी,
सिंह-नरसिंह, यक्ष-किन्नर, राक्षस-अप्सरा, शिळाश्वापद, असं काहीही प्रकट व्हायचं.
पळभरात सूर्य आणखी कलला की तत्क्षणी अंतर्धान पावायचं. त्या दगडांचे रंग, कोणी एकावर एक लगोरी रचावी
तशी त्यांची रचना, त्यांना पडलेल्या खिडक्या सर्व चकित आणि भयचकीत करणारं होतं.
त्या नावाहो इंडियन्सच्या पूर्वजांनी ह्यात भूत, प्रेत, आत्मे, प्रेतात्मे आणि
परमात्मे शोधले ते काही उगीच नाही. हे स्तब्ध चित्र बघून मीही शिळास्तब्ध झालो
होतो. निसर्गाशी मूक संवाद चालू होता. खोल दरीत दूर नावाहो वस्ती दिसत होती.
ढोलांचा आवाज घुमत होता. राव्हालना सांगत होता, इथल्या नावाहोना नव्यानी वसाहत
केलेल्या युरोपीयनांनी हाकलून दिलं होतं. १८६२ ची गोष्ट. सगळ्यांना गुरांचा कळप
हकलावा तसं हाकलत हाकलत लांबवर नेऊन सोडण्यात आलं. पोटुश्या बाईलाही सोडलं नाही.
ती पाय ओढत चालत होती, सबब तिला तिथल्या तिथे गोळी की हो घातली! पण माणसं लांब हाकलली तरी त्यांची ओढाळ मनं
फिरून इथेच येत होती. पण आता सारेच पक्के अमेरिकन झाले आहेत. सारी त्या एकाच
येशूच्या बापाची कोकरे झाली आहेत. एका प्रचंड इस्त्रीने सारे कसे एकसपाट केले आहे.
भाषा संपली, संस्कृती संपली, त्यातले अर्थ आणि बोध दोन्हीही लोपले. एवढच काय, नवस
बोलायला, फेडायला, कुठल्या कपारीत लपलेल्या पूर्वज देवाला पुजायला, आता मूळ देव
वगैरे काही उरलंच नाहीये. लोकांबरोबर देवही परांगदा झाले की.
त्या नावाहो संस्कृतीचं
प्रदर्शन आणि विक्री तिथे शेजारच्या दुकानात चालू होतीच. त्यांच्या कपड्यालत्यावर,
भांडयापातेल्यावर, घरादारावर कसली कसली चिन्हं होती; भरलेली, कोरलेली, रंगवलेली,
आखलेली; पण त्यांचा अर्थ आज कुणालाच सांगता येत नव्हता. सारं काही गूढ. आज
त्यांच्या लेखीही ती निव्वळ ‘इंडियन डीझाइन्स’ होती. पण त्यांना दणकून बाजारमूल्य
होतं, बस्स इतकंच. पण ती विक्रीसाठी मांडलेली अर्थहीन संस्कृती बघून, मानवी
जीवनाचं वेगळच दर्शन मला झालं. सारखी मला यामूनबा आठवत राहिली. तिचा आणि नातवाचा संवाद तुटला होता, संस्कृतीचा
सांधा निखळला होता आणि इथे एक दार्शनिक संस्कृती प्रदर्शनापुरती उरली होती.
पुढे मॉन्युमेंट
व्हॅलीतल्या नावाहो इंडियन्सच्या घरी जाणं आणि रहाणं झालं. हे इथले मूळ निवासी. आता
बरेचसे शिकले सवरले, बाहेरच्या जगात गेले, तिकडचेच झाले. काही उरले, त्यातल्या
काहींनी आम्ही मुळचे, आमच्यावर अन्याय, आमचे अधिकार, अशी कैफियत मांडली. मग
त्यांना खास सोयी सवलती, त्यांच्या संस्थांना या क्षेत्रात टॅक्सचा अधिकार, अशी
समजूत काढली गेली. त्यामुळे ह्यांच्या गावात आता, लुटूपुटीचे का होईना, ह्यांचे
सरकार. पण प्रवासदरम्यान कानाशी राव्हालनाची गुणगुण काही संपत नव्हती. ग्रँडमाची
भाषा कळत नसल्याचं तो वारंवार सांगत होता. ह्या इतक्या इंडीयन लोकांत ग्रँडमाची
भाषा जाणणारा कोणीच नाही याचं मला आश्चर्य वाटत होतं. मी राव्हालनाला तसं विचारताच
तो म्हणतो कसा, ‘ग्रँडमा इज इंडियन मीनिंग फ्रॉम युवर कंट्री, इंडिया!! आय अॅम हाफ
इंडियन हाफ नावाहो. माय फादर मॅरीड अ नावाहो गर्ल. बोथ माय ग्रँडपेरेंट्स केम
फ्रॉम हातंबा, निअर बॉम्बे, स्पीकींग कोक्ने. डू यू नो द प्लेस? द डायलेक्ट?’ आत्ता
माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्या आजीची अगम्य इंडीयन भाषा मला समजते का, ते
राव्हालनाला हवं होतं. हे गाव आणि ही भाषा अर्थात मलाही माहीत नव्हती. येणाऱ्या
टूरीस्टांना त्यांनी वेळोवेळी विचारून झालं होतं. पण व्यर्थ. अमेरिकेत भारतीय खूप,
पण खबदाडीतल्या सेलीग्मनला येणार जाणारे अगदी कमी. पण आता त्याच्याकडे आणखी एक
दुवा होता. आजीची कुलुपबंद ट्रंक त्यानी नुकतीच उघडली होती आणि त्यात त्याला काही
तरी लिहिलेल्या वह्या सापडल्या होत्या. परत हॉटेलवर येताच त्यांनी त्या वह्या
दाखवल्या.
पहिल्याच पानावर आजीनी चक्क देवनागरीत आपलं नाव-गाव लिहिलं होतं,
सौ. यमुनाबाई गणेशराव पोंक्षे, हातखंबा. दोनच पिढ्यात यमुनाबाईची यामूनबा पोंकाशे
झाली होती, हातखंबाचे हातंबा, कोकणीची कोक्ने आणि रवळनाथाचे राव्हालना पोंकाशे! मी
स्तंभित झालो. दोनच पिढ्यात संस्कृतीचे संचित आटून गेले होते. नाव, गाव अर्थलोप
पावले होते. साऱ्याचे जणू ‘नावाहो’ झाले होते. पुढे आजीच्या आयुष्याची कहाणी
त्रोटक तुकड्यात खरडली होती.
गांधीहत्येनंतर पोंक्षांचं
घर जाळलं गेलं होतं. घरच्या छापखान्यातला कागद भुरूभुरू जळला. वासे, पाटणी कोसळले,
काही तासात होत्याचे नव्हते झाले होते. हाती लागेल ते किडूकमिडूक घेऊन, बाकीचे
सारे कवडीमोलाने विकून, गणेश आणि यमुना मुंबईला आली होती. त्या आगीत या मातीशी
असलेलं नातच जणू कोळपून गेलं. धडपड्या गणेशरावांनी अनेक हिकमती करून चक्क अमेरिकेत
नोकरी पक्की केली. नव्यानेच सुरु झालेल्या टाटांच्या एअर इंडियाच्या ८ जून
१९४८च्या पहिल्याच फ्लाईटमधून ती दोघं लंडनला आली. मग बोटींनी न्यूयॉर्कला, तिथून शिकागो आणि रूट
सिक्स्टीसिक्स वरून सेलीग्मनला. इथल्या छापखान्यात गणेशरावांनी नोकरी मिळवली होती.
पुढे मुलगा झाला. नाव ठेवलं विनायक. सावरकरांवरून असावं असं आपलं मला वाटलं. विनायकनी
तिथलीच, नावाहो मुलगी केली. पण विनायक आणि सून दोघंही अखंड दारूत बुडालेले. रवळनाथ
सांगत होता, आज्जीचे आणि त्याच्या पप्पाचे रोज भांडण, दिवसातून अनेकदा, अनेक
कारणांनी. तिला इंडियाला जायचं असायचं. पण तेवढे पैसे पुन्हा कधी जमलेच नाहीत.
काही वर्ष तर फूड स्टँपवर काढावी लागली होती. पण ग्रँडमा आपला हेका सोडायला तयार
नव्हती. इंडियाला जाण्याएवढे पैसे आहेतच, पण तू ते लपवून ठेवले आहेस असा तिचा
आरोप. पप्पाची शंका अशी की, ग्रँडमानीच डॉलर डॉलर करत बराच गल्ला गोळा केला आहे
आणि तो कुठे तरी लपवला आहे. तो उलट साठवलेले पैसे कुठे ठेवले आहेस ते सांग, म्हणून
तिच्या मागे लागायचा.
ग्रँडमा लेकाला बजावायची, ‘विनायक,
युवर सन मस्ट लर्न कोक्ने.’ पण ह्यात विनायकाला रस नव्हता आणि त्याच्या नावाहो
बायकोला असण्याचा प्रश्नच नव्हता. त्याला फक्त सोमरसात रस होता. रवळनाथाचा बाप
दारूत बुडाला होता, आजीला साठीतच स्मृतिभ्रंश झाला होता आणि भाषेचा दुवा निखळला
होता. आजी आणि नातवातला संवाद गेली तीन दशकं वर्ष पार तुटला होता.
मग मी भेटलो तिला,
‘काय आजी बराय ना?’
तिचे डोळे लकाकले. जीवणी
हसली आणि ग्रँडमा लागली की बोलायला. कुठल्या काळच्या, कुठल्या गावच्या, खोल खोल मन
तळातल्या आठवणी. काही संगतवार, काही विसंगत. बोलत बोलत आजी माहेरी गेली देवगडला. आजी आजोळी गेली
कुणकेश्वरला. शाळेत फिरून आली, सागरगोटे खेळली, अचानक गायला लागली, ‘अय्या गडे
इश्श्य गडे, चड्डीत झाले बटाटेवडे’; आणि फिदीफिदी हसत सुटली... तिला कुणकेश्वरला
नवस फेडायला जायचं होतं. परिस्थितीनं भले तिला पृथ्वीच्या विरुद्ध टोकाला आणून सोडलं
असेल पण तीचे ओढाळ मन, किंवा त्यातले जे शिल्लक होते ते, कुणकेश्वरी रमलं होतं. बस्स पुढचं काहीच तिला आठवत नव्हतं. नवरा,
अमेरिका, मुलगा, नातू काही नाही.
मधूनच मला म्हणाली, ‘वळीखते
म्यां तुला?’
‘कोण मी?’
अचानक आजीच्या थकल्या
डोळ्यात अंगार फुलला, ‘तू? तू माझ्या मावशीचा घोव असान तू!! माझां बालपण नासवलांस
तू, मायझव्या...!!!’ असं म्हणून आजीनी ठेवणीतल्या दहा बारा कोकणी शिव्या हासडल्या
आणि पुन्हा विझून ती आरामखुर्चीत थिजून गेली.
तिचा मेंदू आटला होता.
आक्रसला होता. वर्तमानाशी संबंध संपला होता पण भूतकाळाशी तरी होता की नाही सांगता
येत नव्हतं. मावशीच्या घोवाचा उल्लेख होता पण त्यात तथ्य किती हे सांगणं अशक्य. जीर्ण,
खंगला देह आणि वाळलेले जुनेपुराणे मन. त्या मनाच्या गाभाऱ्यातून मला
लागले ते संदर्भ मी रवळनाथाला समजावून सांगितले. त्याच्या मूळ नावाचा, गावाचा, भाषेचा
उच्चार समजावला. देवगड, कुणकेश्वर गुगल
मॅप्सवर दाखवले. सागरगोट्याचा खेळ युट्युबवर दाखवला. जे सांगण्यासारखे नव्हते ते
नाहीच बोललो. रवळनाथला अगदी भरून आले. आजीशिवाय त्याला जगात कोणी नव्हते आणि अचानक
भाषेची नाळ त्याला गवसली होती. गँग्रीन होता होता काळ्या ठिक्कर पडलेल्या अवयवात
पुन्हा रक्त सळसळू लागावं आणि आपल्या डोळ्यादेखत तो भाग पुन्हा गुलाबीसर व्हावा
तसं त्याचं झाले.
अचानक त्याला उचंबळून आलं. आपल्या मातीत आपल्या नात्याचं
कोणी असेल का अशी उत्सुकता दाटून आली. त्या डायरीत काही पत्रही होती. एक लग्न
पत्रिका होती. मराठे म्हणून घरातली, देवगडहून आलेली, ७२ सालची. काही फोन होते काही
पत्ते होते पण फोन एकही उपयोगी नव्हता आणि पत्तेही बरेच बेपत्ता असणार हे उघड
होते. चारदोन फोन मिळवून मी हातखंबा आणि देवगडच्या मंडळींशी बोललो. पण रवळनाथाच्या
कुळाचे मूळ काही गवसले नाही. पोक्ष्यांचा प्रेस जळीतामध्ये गेला ह्याला दुजोरा
मिळाला फक्त. देवगडचा माणूस तर महा गडबडीत होता. माहिती घेउन कळवीन म्हणाला.
चार दिवसाचा प्रवासी मी
पाचव्या दिवशी निघालो. त्या वहीचे,
पत्रांचे फोटो मी मोबाईलमध्ये घेतले. काही शोध लागला तर कळवीन असे रवळनाथला आश्वस्त
केले. जाताजाता त्यानी चक्क दोनशे डॉलर माझ्याकडे दिले. शंभर मी त्याच्या कुळाचा
शोध घेणार, त्याच्या खर्चासाठी आणि शंभर कुणकेश्वरला जाऊन मी पूजा, अभिषेक करावा
म्हणून!!
निघताना आजीच्या पाया पडलो. मनात विचार आला, ती भारतीय नसती, कोणी
स्पॅनिश किंवा केनियन असती तर मी असं केलं
असतं का? नाहीच बहुतेक.
‘आजी, येतो मी!’ मी तिच्या
कानात ओरडलो.
आजीला अर्थातच काहीही कळलं
नाही. तिनी तिचं ठरावीक वाक्य फेकलं, ‘वेलकम टू सेलीग्मन कॅफे अँड इन, मेल्यायलस,
येहोsss!’
आणि माझ्या डोक्यात लख्खकन
प्रकाश पडला, आजी म्हणत होती,
‘मेल्या, इलंsssस, ये हो!’